Tuesday 12 April 2016



Reflection for the Homily of 4th Sunday of Easter (17/04/2016) By:Wicky Bhavigar.








पुनरुत्थान काळातील चौथा रविवार 
                         





दिनांक: १७/०४/२०१६.
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १३:१४, ४३-५२.
दुसरे वाचन: प्रकटीकरण ७:९, १४ब-१७.
शुभवर्तमान: योहान १०: २७-३०.


           “माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो.”




प्रस्तावना:
     आज आपण पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत.  आजच्या उपासनेचा मुख्य विषय आहे, “माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात.”
     आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पौल आपणास सार्वकालिक जीवनाची आठवण करून देतो की, अनेकवेळा आपणास देवाचे वचन ऐकने जमले पाहिजे जेणेकरून आपण पवित्र आत्म्याने पूर्ण होऊ. प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो की, स्वर्गात उद्धार पावलेल्या साक्षात्कार राजासनामध्ये ‘मेंढपाळ येईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल. तर शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपणा सर्वांचा उत्तम मेंढपाळ व आपण त्याची मेंढरे आहोत ह्याची जाणीव करून देत आहे.
     प्रभू येशूला लोकांचा कळवला आला कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते बहकले होते. आपले सर्वांचे जीवन कृपेने भरलेले असावे असे प्रभूला वाटते, मात्र आपण त्याला आपण जीवनाचा मेंढपाळ म्हणून स्वीकारायला हवे. ह्यासाठी लागणारी कृपा व सामर्थ्य ह्या पवित्र मिस्साबलिदानात मागूया. 

सम्यक विवरण
पहिले वाचन: प्रेषिताची कृत्ये १३:१४, ४३-५२

      लोकांनी केलेल्या विनंतीनुसार पुढल्या शब्बाथ दिवशी बहुतेक सर्व शहर देवाचे वचन ऐकण्यास जमले. ते पाहून यहुदी लोकांना पौल व बर्नाबास यांचा हेवा वाटला. तेव्हा पौल व बर्नाबास निर्भीरपणे म्हणाले, देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगायचे अगत्य आहे. अशी आज्ञा आम्हास प्रभूने दिली आहे. ह्याची ते लोकांना शाश्वती करून देत आहेत. (जितके सार्वकालीक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला, आणि प्रभूचे वचन त्या सर्व प्रांतात पसरले. (४८-४९) आणि शिष्य मात्र आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.)

दुसरे वाचन: प्रकटीकरण ७:९, १४ब-१७ 

     प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण ऐकतो की, आपणास कधीही तहान भूक लागणार नाही किंवा सूर्याचा किंवा कसल्याही उष्णतेचा त्यांना ताप होणार नाही कारण सिहाजवळ असलेले कोकरू त्यांचा मेंढपाळ होईल. तो त्यांना जीवनदायी झऱ्यावर नेईल आणि देव त्याचा डोळ्यातील प्रत्येक अश्रु पुसून टाकील. याचा अर्थ काळाच्या अंती साकारणाऱ्या भावी जीवनात सर्व प्रकारच्या दु:खाचा पूर्णपणे परिहार होऊन सुखाचा सुकाळ होईल. हे सूचित केले आहे.

शुभवर्तमान: योहान १०:२७-३०

     जगातील एकमेव सत्य म्हणजे, येशू उत्तम मेंढपाळ आहे. येशू पुनरुत्थित झाला आहे. जो कोणी देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल हा संदेश प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये देत आहे. मी उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरता आपला प्राण वेचतो. हे योहान शुभवर्तमानात आपणास आढळून येते. “पिता माझ्यावर प्रेम करतो. कारण मी माझा जीव अर्पण करण्यास तयार आहे. असा आदेश येशू ख्रिस्त एका मेंढपाळाच्या दाखल्याद्वारे आपणास सांगत आहे.
     मेंढपाळ आणि कळप ही जुन्या करारातील संकल्पना आहे. जुन्या करारातील स्तोत्रसंहिता पुस्तकामध्ये (अध्याय २३) देवाला मेंढपाळ म्हटलेले आहे. त्या काळी राजा स्वत:ला मेंढपाळ म्हणवून घेत असे. दुर्बलांचे रक्षण करणे हे त्याचे आद्य कर्तव्य होते. संदेष्टा इजिकीएल ह्याने खरा आणि खोट्या संदेष्टांचे केलेले वर्णन (अध्याय ३४) शुभवर्तमानकाराला विशेष भावले होते. त्याने येशूला ‘उत्तम मेंढपाळ’ म्हणून संबोधले आहे. ख्रिस्ती धर्माच्या प्रारंभीच्या काळात खांद्यावर कोकरू घेतलेले येशूचे चित्र खूप लोकप्रीय होते. चित्रकलेत आणि साहित्यात या प्रतिमेचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आढळतो.
     येशूने खऱ्या मेंढपाळाची लक्षणे सांगितली आहेत. ती अशी: खरा मेंढपाळ स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या कळपाचे रक्षण करतो. तो त्यांना कुरणात नेतो, त्यांचे मार्गदर्शन करतो, तो जखमी मेंढराच्या जखमा बांधतो. तो त्यांना विपुल जीवन देतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो त्यांच्यासाठी आपले प्राण वेचतो. हे सर्व येशूने केले आहे. कारण येशू हा तारणाचा एकमेव स्तोत्र आहे. व सार्वकालीक जीवन देणारा आहे. म्हणून पोप बेनेडीक्ट म्हणतात की, मेंढपाळ आणि कळप ह्याचे नाते जीव्हाळाचे असते. ते मालक आणि मालकीची वस्तू ह्या स्वरूपाचे नसून पालक व पाल्य किंवा पती आणि पत्नी या नात्यासारखे आहे. म्हणून येशू ख्रिस्त ह्या शुभवर्तमानात सांगत आहे, जो माणसाला ह्या सार्वकालीक जीवनाच्या गोष्टी पुरवतो, तोच त्याला विपुल जीवन देऊ शकतो. कारण मी आणि पिता एक आहोत (१०:३०).

बोधकथा:
देवाची वाणी’

एका कुटुंबामध्ये पती-पत्नी व एक मुलगी असा त्यांचा छोटासा परिवार होता. पत्नी फार गर्विष्ठ, कडक व कुणाचेही ती ऐकत नसे. देवाचेही ती ऐकत नसे. अनेक चुकीचे निर्णय ती घेत असे. पण तिला जाब विचारण्याची कुणालाही हिंमत झाली नाही. देवधर्म हा तिच्या आवडीचा विषय नव्हता. फक्त गरजेपुरताच ती देवाकडे धाव घेत असे. एके दिवशी आपला देवभिरू पती अचानक आजारी झाला व मरणाच्या खाटेला टेकला. आठ दिवस झाले तरी पतीच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही म्हणून तिने आपला मोर्चा देवाकडे वळवला. तिने देवाला वचन दिले की, मी आजपासून तुझे ऐकेन. पतीचे ऐकेन, तू सांगशील तसे करीन, परंतू माझ्या पतीला जीवदान दे. परमेश्वराने त्याला स्पर्श केला व तो बरा झाला. व तिचे कठीण हृदय मऊ झाले.

तात्पर्य: आपण कितीही देवाकडून दूर गेलो तरी तो आपल्याला ओळखतो. व त्याच्याप्रमाणे मेंढरासारखी मेंढपाळाची हाक ऐकण्यास आपणास बोलावीत असतो.  
  
मनन चिंतन:
    सामान्य जनांना योग्य मार्गदर्शन करणारा नेता मिळणे कठीण आहे. दु:ख, संकटे, आजार, चिंता, अपयश व निराशा आली असताना नक्की कुणाचा सल्ला घ्यावा हे सुचत नाही. अशा परिस्थितीत माणसे बहकून जातात व त्याची स्थिती मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी बनते. प्रभू येशू ख्रिस्त आपला उत्तम मेंढपाळ असून आपले संरक्षण करणारा, मार्ग दाखवणारा, व सांभाळकर्ता मुक्तिदाता आहे. आपण जीवनात बहकलेले असताना तो त्याच्या शिकवणूकीद्वारे योग्य-अयोग्य, सत्य-असत्य आणि चांगल्या-वाईटाची जाणीव करून देतो. पापरूपी अंधकारातून बाहेर काढून प्रभू येशू आपल्याला सत्याच्या प्रकाशात आणतो. त्याच्या वचनाद्वारे प्रभू आपल्याला दु:खात, संकटात, आजारात व निराशेत असताना आधार देतो व मार्गदर्शन करीत असतो.
     आजच्या शुभवर्तमानात आपण पाहिले आहे की, प्रभू येशूला लोकांचा कळवला आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते बहकलेले होते. आपल्या सर्वांचा प्रभूला कळवला येतो. आपले सर्वांचे जीवन कृपेने भरलेले असावे असे प्रभूला वाटते, मात्र आपण त्याला आपल्या जीवनाचा ‘मेंढपाळ म्हणून स्वीकारायला हवे. त्याच्या वचनावर विश्वास ठेऊन त्याच्या कृपेच्या राजासनाजवळ जायला हवे. यामुळेच तर पुनरुत्थानातील आजचा चौथा रविवार सार्वकालीक जीवन देण्याची शक्ती फक्त प्रभू ख्रिस्ताकडे आहे हे आपल्याला उत्तम मेंढपाळ व मेंढराच्या उदाहरणाद्वारे सिद्ध करतो. सर्व प्रकारच्या भीतीची, समस्यांची, बंधने दूर सारून जीवनदायी प्रभू सदासर्वदा देव पवित्र आत्म्याच्या सानिध्यात जगून या जीवनामध्येच खऱ्या सुख-शांती समाधानाचा अनुभव घेण्यासाठी आपणास बोलावीतो. म्हणून हे प्रभू येशू, तूच उत्तम मेंढपाळ आहेस, सन्मार्गावर चालण्यास व तुझी वाणी ऐकण्यास आम्हाला कृपा व शक्ती दे. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्या मेंढरांना तुझे साहाय्य दे.                                                                                                         १.    ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू, धर्म-भगिनी  व सर्व प्रापंचिक ह्या सर्वांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशिर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जो ख्रिस्त आपल्या सर्व मानवजातीच्या पापांसाठी मरण पावला व जिवंत होऊन सर्वाना नवजीवन दिले तो ख्रिस्त मेंढपाळ आपणाला अधिक पवित्र बनवण्यास धैर्य व शक्ती देवो म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
३. जी मेंढरे मेंढपाळाची वाणी ऐकत नाही आणि जी माणसे मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे बहकलेले आहेत. अशांना परमेश्वराच्या मदतीने सन्मार्गावर चालण्यास कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
४. जी कुटूंबे वेगळी झाली आहेत. जेथे प्रेम, शांती व दया नाही अशा कुटुंबात प्रेम, शांती व दया प्रस्थापित व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. हे प्रभू येशू, तूच उत्तम मेंढपाळ आहेस. आज आपण इथे एकत्रीत जमलो असताना आपण स्वत:साठी न जगता इतरांसाठी जगावे व आपले जीवन कृपेने भरलेले असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.



  




No comments:

Post a Comment