Thursday 19 May 2016

 Reflection for the Feast of Most Holy Trinity  (22/05/2016) By: Ashley D'Monte.



पवित्र त्रैक्याचा सण





दिनांक: २२-५-२०१६
पहिले वाचन: नितिसुत्रे ८:२२-३१
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:१-५
योहान: १६:१२-१५


पवित्र त्रैक्य: आदर्श कुटुंबाचे प्रतिक




प्रस्तावना:

     आज देऊळमाता पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्या पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत आहे. पवित्र त्रैक्य हे ख्रिस्ती विश्वासाचा गाभा आहे. प्रत्येक ख्रिस्ती उपासना व प्रार्थना ही पवित्र त्रैक्याला संबोधून सुरु केली जाते. ख्रिस्ती श्रद्धेचा उगम व शेवट हा पवित्र त्रैक्यातच होतो. आजचा प्रभू शब्दविधी त्रैक्याचे गुणगान गातो व पवित्र त्रैक्यातील ऐक्य आपणास पटवून देतो.
         नितिसुत्रामधून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण ज्ञानाची थोरवी गायिलेली पाहतो. परमेश्वराने ही सृष्टी निर्माण करण्याआधीच ज्ञान त्यावेळीस पैदा केले. परमेश्वराच्या प्रत्येक महान कृत्यात त्यात ज्ञानाची हजेरी होती.
रोमकरास लिहिलेल्या पत्रात संत पौल विश्वासाचा परिणाम काय होतो हे सांगत आहे. आपल्या पवित्र त्रैक्यातील विश्वासामुळेच आपण नितिमान ठरलो आहोत असे पौल म्हणतो. विश्वासानेच आपणास त्रैक्याची जाणीव होते. तर योहानाच्या शुभवर्तमानात प्रभू येशू पाचव्या व शेवटच्या वेळीस पवित्र आत्म्याच्या येण्याची घोषणा करतो. हा सत्याचा आत्मा आपणास पिता, पुत्र व आत्मा या विषयी शिकविल, असे येशू म्हणतो.
पवित्र त्रैक्य हे एक रहस्य आहे. हे रहस्य केवळ विश्वासाने व पवित्र आत्माच्या सामर्थ्याने उलघडू शकते. पिता, पुत्र व पवित्र आत्म्याची खरी ओळख आपणाला व्हावी व आपली श्रद्धा दृढ व्हावी म्हणून आजच्या ह्या मिस्साबलीदानात आपण प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: नितिसुत्रे  ८:२२-३१ 
   
नितिसुत्रे हे जुन्या करारातील एक ज्ञानात्मक पुस्तक आहे. ह्यात अनेक बोध वचनांचा व मार्गदर्शनांचा संचय केलेला आहे. आजच्या अध्यायात ज्ञानाची केलेली स्तुती आपणास आढळते. ज्ञान हे परमेश्वराच्या निर्मितीकार्यापूर्वीपासून अस्तिवात होते असे नितिसुत्रे सांगत आहेत. ज्ञानाची व्यक्तिश: तुलना केलेली असून ती व्यक्ती असून ती व्यक्ती खुद्द येशू ख्रिस्ता विषयी नमूद करते. म्हणजेच परमेश्वर हा सृष्टीचा निर्माता असून ह्या त्याच्या निर्मितीकार्यात त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताचा पूर्ण सहभाग होता. हा सृष्टीक्रम परमेश्वराच्या ज्ञानाने व शहाणपणाने निर्मित केला आहे. मनुष्य हा सर्व निर्मितीत अप्रतिम आहे, त्यामुळेच त्याचा निर्माता म्हणजेच परमेश्वर सदैव त्यावर संतुष्ट राहील. ज्यांनी कोणी ज्ञानाचा मार्ग निवडला ते सदैव हर्ष करतील कारण त्याच्याठायी परमेश्वर राज्य करील व आनंद पावेल.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:१-५

संत पौलाचे रोमकरांस पत्र ह्यातील पाच ओव्या पवित्र त्रैक्याच्या तत्वप्रणाली नमूद करतात. आपण नितिमान ठरण्यात पवित्र त्रैक्यातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग आहे. येशूच्या मरण व पुनरुत्थानाने आपण पित्याठायी एकनिष्ठ झालो आहोत. पवित्र आत्मा आपल्यामध्ये वास करतो व पित्याचे प्रेम आपल्या हृदयात प्रज्वलित ठेवतो. संत पौल पुढे म्हणतो, ‘मानवाची निर्मिती परमेश्वराठायी चिरंतर वास करण्यासाठी केलेली आहे व हा गौरव आपणास त्याच्या पुत्रावरील विश्वासाद्वारे, जो आपणासाठी मनुष्य झाला त्यामुळे प्राप्त होत आहे. आपल्या ख्रिस्ती विश्वासामुळेच परमेश्वराशी आपली मैत्री झाली आहे; त्याठायी एक नवे नाते निर्माण झाले आहे. जर आपण ख्रिस्ती विश्वासाला खरे ठरलो व त्याच्या शिकवणुकीप्रमाणे जर वागलो तर आपणास स्वर्गीय नंदनवनाचे वैभव पाहण्याचे भाग्य लाभेल. संत पौलास व प्रत्येक ख्रिस्तीजनांस ख्रिस्ताच्या दु:खसहनात सहभाग घेणे ही फार भाग्याची बाब होती. पौल म्हणतो दु:ख, संकटे खरे ख्रिस्ती सद्गुण उभारण्यास व ख्रिस्ती आशेचा पाया भक्कम करण्यास लाभदायक ठरतात. परमेश्वराच्या स्वर्गीय वैभवाची आशा खोटी ठरणार नाही कारण आपणास पवित्र आत्म्याचे आश्वासन लाभले आहे. आपल्या बाप्तीस्माच्यावेळी आपणा प्रत्येकाने त्रैक्यातील ह्या तिसऱ्या व्यक्तीचा विचार केला आहे. पवित्र आत्मा प्रत्येक व्यक्तीत वास करतो व त्यास आपल्या दानांनी सद्रुढ करतो. पौल म्हणतो, ‘देवाच्या दैवी प्रेमाचा आत्मा आपल्या प्रत्येकाची हृदये त्याच्या प्रेमाने दररोज भरून टाकतो.’

शुभवर्तमान: योहान १६:१२-१५

येशू, भोजनप्रसंगी केलेल्या उपदेशात, पवित्र आत्मा पाठविण्याचे आश्वासन आपल्या शिष्यांस देतो. हा आत्मा त्यास धीर व सामर्थ्य देईल व येशूने सांगितलेल्या गोष्टींचा उलघडा करून देईल. आजच्या वाचनातही येशू त्याच आश्वासनाची पुन:रावृत्ती करीत आहे. येशूला शिष्यांना भरपूर गोष्टी सांगावयाच्या होत्या परंतु त्यांची मने मात्र, येशू आता आम्हांस सोडून जाणार, आता पुढे काय होणार ह्या विचारांनी ग्रासलेली होती. अशा प्रसंगी येशू जे काही सांगणार होता ते त्यांच्या ध्यानात येणारे नव्हते म्हणून येशू पवित्र आत्मा, सत्याचा आत्मा पाठविण्याचे आश्वासन देतो. तो त्याच्या शिष्यांना योग्यवेळी येशूने शिकविलेल्या गोष्टी सांगील. तेव्हा त्यांस सत्याची जाणीव होईल की, येशू हा देवपुत्र होता व त्याच्या कार्याची त्यांस प्रचीती होईल. ज्याप्रमाणे ख्रिस्ताला शिकवणुकीचा अधिकार पित्याकडून प्राप्त झाला त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याला शिकवणुकीचा अधिकार पिता व पुत्राकडून प्राप्त होईल. म्हणजेच जे सत्य आत्मा प्रकट करील ते पवित्र त्रैक्याच्याद्वारे होईल. हा आत्मा परमेश्वराचे गौरव करील व त्याच्या शिष्यांतही गौरव करण्यात शिकविल. शेवटी येशू पवित्र त्रैक्याची कार्यप्रणाली प्रकट करतो. तीनही व्यक्ती मानवाच्या कल्याणासाठी सहकार्य करतात व एकत्रितपणे कार्य करतात.

 बोधकथा: 

      संत अगुस्तीन पवित्र त्रैक्याचे रहस्य समजण्याचा प्रयत्न करत होते व ह्या रहस्यावर एकांतात विचार करण्यासाठी एक दिवस समुद्रकिनारी फेरफटका मारत होते. किनाऱ्यावर चालत असताना त्याला एक मुलगा किनाऱ्यावर खेळत असताना दिसला. तो काय करत आहे हे पाहण्यासाठी संत अगुस्तीन त्या मुलाजवळ गेले. त्या मुलाने किनाऱ्यावर एक छोटासा खड्डा केला होता व तो पाण्यापाशी जाऊन आपल्या ओंजळीत समुद्राचे पाणी घेत होता व ते पाणी त्याने केलेल्या खड्ड्यात ओतत होता. हे पाहिल्यावर संत अगस्तीन त्या मुलाला म्हणाला, ‘तू काय करत आहेस?’ तेव्हा तो मुलगा म्हणाला की, ‘मला संपूर्ण समुद्र ह्या खड्ड्यात रिकामा करायचा आहे.’ हे ऐकून संत अगुस्तीन स्मितहास्य देत म्हणाले, ‘ते कस काय शक्य आहे? एवढा मोठा अथांग सागर ह्या छोट्याश्या खड्यात रिकामा करणे अशक्य आहे.’ तेव्हा तो मुलगा म्हणाला, जर तुम्हाला वाटत असेल की, आपल्या बुद्धीसामर्थ्यापलीकडील हे पवित्र त्रैक्याचे रहस्य तुम्ही समजू शकता तर मी का नाही ह्या खड्ड्यात समुद्र रिकामा करू शकणार?’ एवढे म्हणून ते बाळ तिथून अदृश्य झालं, तेव्हा पवित्र त्रैक्याचे संपूर्ण रहस्य आपल्या बुद्धिचातुर्यापलीकडीचे आहे हे संत अगुस्तीनला समजले.

मनन चिंतन:

     त्रैक्य म्हणजे तीन गोष्टी, व्यक्ती एकत्र येणे; एकत्रितपणे कार्य करणे, पवित्र त्रैक्य म्हणजे पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्या तीनही व्यक्तीचे एकत्रित संमेलन. एक देव व तीन व्यक्ती हा आपला ख्रिस्ती विश्वास आहे. ह्या तीनही व्यक्ती अलग नसून जणू एकमेकांत गुंफलेल्या आहेत. त्यांचे विचार, त्यांचे ध्येय एकच आहे. ह्या तीनही व्यक्तींचे त्यांनी केलेल्या कार्यानुसार वर्गीकरण करण्यात येते: पिता हा सर्व सृष्टींचा निर्माणकर्ता आहे, पुत्र हा मानवजातीचा तारणकर्ता व पवित्र आत्मा हा सर्व गोष्टींचे पवित्र्यकरण करतो. तीनही व्यक्तींचे कार्य जरी वेगवेगळी असली तरी त्यांचा उद्देश, हेतू एकच आहे मानवजातीचा उद्धार. एकच देव पण तीन व्यक्ती कशा ? ही बाब समजणे थोडे कठीण आहे म्हणून हे एक ख्रिस्ती रहस्य आहे. जे केवळ परमेश्वराच्या कृपेनेच कळते. हा केवळ विश्वासाचा भाग आहे. विश्वासाने सर्व गोष्टी कळीत होतात असे संत पौल रोमकरांस पत्रात आज म्हणतो व विश्वासाबरोबर पवित्र आत्म्याचे दान लाभणे गरजेचे आहे हे आपण शुभवर्तमानात ऐकले. म्हणजेच हे रहस्य मानवाच्या बुद्धीमतेच्या पलीकडे आहे, कारण ज्या गोष्टी मानवाला अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.
     ख्रिस्ती ह्या नात्याने पवित्र त्रैक्याचे अस्तिव आपण नाकारु शकत नाही कारण हा आपल्या ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. त्यामुळेच प्रेषितांचा विश्वास ह्या प्राथनेत आपण आपला त्रैक्यावरील विश्वास प्रथम प्रकट करतो. ह्या त्रैक्यामध्ये एकता आहे. तीन व्यक्ती एकत्रितपणे आपले कार्य करतात. कुठल्याही प्रकारचा दुरविचार, स्वार्थ तेथे नाही. पिता जे काही करतो ते पुत्र जाणून आहे व पुत्र काय करणार ह्याची जाणीव आत्म्याला आहे. ह्या तीनही व्यक्ती एकसमान आहेत. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. एका त्रिकोणाच्या समान बाजूप्रमाणे त्रैक्य आहे. पवित्र त्रैक्याप्रमाणे आपणही आपला ख्रिस्ती समाज एकत्रितपणे बांधून ठेवला पाहिजे. जेथे कुठलाही भेदभाव नाही, स्वार्थ नाही. सर्व एकमनाचे व एकविचाराचे असून ख्रिस्ती जीवन जगावे व जगाला ख्रिस्ताची साक्ष द्यावी व शेवटी त्या स्वर्गीय नंदनवनात परमेश्वराची स्तुती-गीत गावे.
     त्रैक्यातील एकतेला सलामी देत असता पवित्र त्रैक्यातील तीनही व्यक्तीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण पित्याने ह्या विश्वाची निर्मिती केली, आपणास निर्माण केले इतकेच नव्हे तर आपल्या तारणासाठी त्याच्या एकुलत्या एका पुत्रास पाठवून जगाचे तारण केले व आपणास त्याची लेकरे बनविले. परमेश्वराने पवित्र आत्म्याला पाठविले जेणेकरून आपणा प्रत्येकाची हृदये परमेश्वराच्या प्रीतीने भरून  जाओत. त्या परमेश्वराची व त्रैक्याची स्तुतिसुमने गाणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा आपला मानवी दुर्बलपणा जाणून आहेत व ह्या  दुर्बलपणावर मात करून आपण स्वर्गीय नंदनवनाकडे वाटचाल करतो. त्यामुळेच ही संधी सर्वाना उपलब्ध आहे. पवित्र त्रैक्य कुणालाच ह्यापासून वंचित ठेवणार नाही.
     पिता, पुत्र व पवित्र आत्मा आपणा सर्वास मानवी दुर्बलतेवर मात करण्यास कृपाशक्ती देवो; जेणेकरून आपण परमेश्वराच्या प्रेमात आपले जीवन व्यथीत करून शेवटी पवित्र त्रैक्याच्या सान्निध्यात त्या चिरंतर जीवनाचा अनुभव घेऊ. 
  
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो, पवित्र त्रैक्यात आम्हात संघटीत कर.

१.आपले परमगुरु स्वामी, महागुरुस्वामी, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी ह्यांनी पवित्र त्रैक्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ख्रिस्ती समाज, ख्रिस्ताठायी एकत्र करण्यास तत्पर राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या ख्रिस्ती समुदायातील वेगवेगळे पंथ आपला स्वार्थ, भेदभाव बाजूला सारून एकत्र यावेत व ख्रिस्ती जीवनाची साक्ष जगाला द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात ऐक्य, सलोखा नांदावा; सर्व प्रकारचा भेदभाव दूर व्हावा व एक आदर्श कुटुंब व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ख्रिस्ती जीवन जगत असताना आपण सर्वांनी एकमेकांशी प्रेमभावनेने वागावे; परमेश्वराची दया, क्षमा इतरापर्यंत पोहचवावी व शेवटी ईश्वराठायी चिरंतर जीवन प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या धर्मग्रामातील जे लोक आजारी आहेत, अशांना परमेश्वरी कृपेचा स्पर्श व्हावा, त्यांना आजारात सहनशक्ती लाभावी व त्यांचा आजार बरा व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.                 

No comments:

Post a Comment