Thursday 7 June 2018


Reflection for the Homily of 10th Sunday (10-06-2018)
in Ordinary Time by Br. Lipton Patil 






सामान्य काळातील दहावा रविवार


दिनांक: १०/६/२०१८
पहिले वाचन: उत्पत्ती ३:९-१५
दुसरे वाचन: करिंथकरास दुसरे पत्र ४:१३-५:१
शुभवर्तमान: मार्क ३:२०-३५





 ‘क्षणिक सुख’ की ‘सार्वकालिक सुख’




प्रस्तावना:

     आज आपण सामान्य काळातील दहाव्या रविवारमध्ये पदार्पण करीत आहोत. आजच्या उपासनेत देऊळ माता आपणास ‘क्षणिक सुख’ की ‘सार्वकालिक सुख’ ह्या विषयावर सखोल मनन चिंतन करण्यास बोलावीत आहे.
     उत्पत्तीच्या पुस्तकातून घेण्यात आलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, आदाम व हव्वा ह्यांनी क्षणिक सुखासाठी बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊन देवाची आज्ञा मोडली आणि ते देवाच्या शिक्षेस पात्र ठरले. करिंथकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात आपण पाहतो की संत पौल दृश्य गोष्टी ऐवजी अदृश्य गोष्टीला जास्त प्राधान्य देतो कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत.  मार्कलिखित शुभवर्तमानात आपण पाहतो की शास्त्री येशूवर सैतानाच्या साहाय्याने भुते काढितो असा आरोप करतात. पण येशू शास्त्री लोकांचा गैरसमज दूर करून आपण सैतानाच्या साहाय्याने भुते काढीत नाही हे सिद्ध करतो. शेवटी येशू म्हणतो सर्व पापांची क्षमा मिळेल पण पवित्र आत्म्याची जो निंदा करेल त्याला क्षमा नाही.
     या ख्रिस्तयागात सहभागी होत असताना आपण स्वतःला प्रश्न विचारू या की, मी क्षणिक सुख पाहत आहे की सार्वकालिक सुख ? आपण सर्वाना सार्वकालिक सुख प्राप्त व्हावे म्हणून ह्या ख्रिस्तयागात विशेष प्रार्थना करूया. 

सम्यक विवरण:

पहिले वाचन: उत्पत्ती ३:९-१३

     जेव्हा देवाने आदामाला हाक मारली तेव्हा आदाम देवापासून लपून बसला होता कारण बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ त्याने खाऊन त्याने देवाची आज्ञा  मोडली होती आणि त्याला आपण नग्न आहोत ह्याची सुद्धा त्याला जाणीव झाली होती म्हणूनच तो देवाच्या नजरेपासून लपून बसला होता. आदामाने बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाल्ले हे खरे; पण तो देवासारखा बनू शकला नाही कारण त्याचा त्यात स्वार्थ होता.
     तू नग्न आहेस असे देवाने विचारल्यावर आदामाने हव्वाचे व हव्वाने सर्पाचे नाव सांगितले. ते सर्व एकमेकांना दोष देत होते. परमेश्वर देवाने सर्वाना शिक्षा केली. ह्याचे सविस्तर स्पष्टीकरण आपण ह्या वाचनात पाहतो. 

दुसरे वाचन: करिंथकरास दुसरे पत्र ४:१३, ५:१

     पौलाने व प्रेषितांनी देवावर पूर्ण विश्वास ठेवला होता. दुःखामध्ये विश्वास ठेवल्याने धैर्य मिळते व देवाच्या कृपेचा वर्षाव आपल्यावर अखंडीत राहतो असा त्यांचा विश्वास होता. त्यांनी संकटात किंवा अपयशात विश्वास सोडून दिला नाही तर विश्वासाने जीवन जगले. बाह्य गोष्टी प्रेषितांना देवावरील विश्वासापासून दूर खेचत होत्या; परंतु आंतरिक विश्वास त्यांना शक्ती देऊन ख्रिस्ताच्या सानिध्यात आणत होता. येथे संत पौल दृश्य गोष्टी ऐवजी अदृश्य गोष्टीला जास्त महत्व देतो कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. संत पौलचे असे मत आहे की प्रेषितांनी पृथ्वीवरील सुखाकडे लक्ष न देता स्वर्गातील सुखाकडे जास्त लक्ष केंद्रित करावे जेणेकरून ते त्यांच्या विश्वासात दृढ राहतील.

शुभवर्तमान: मार्क ३:२०-३५

     शास्त्री व परुशी येशूच्या कार्याबद्दल कुरकुर करत होते. ते येशूच्या कार्याला विरोध करत होते. ते म्हणाले की येशू सैतानाच्या सामर्थ्याने भुते काढीत आहे. त्याल बालजबुल लागला आहे व तो त्या भुतांच्या अधिकाऱ्याच्या साहाय्याने भुते काढितो असा ते येशूवर आरोप करीत होते. परंतु येशूने त्यांचा गैरसमज दूर गेला. येशू म्हणतो, सैतान सैतानाला कसा काढील? सैतान स्वत:वरच उठला व त्याच्यांत फूट पडली तर तोही टिकणार नाही, त्याचा शेवट होणार.
     पुढे येशू पापाबद्दल सांगतो. येशू म्हणतो सर्व पापांची क्षमा मिळेल पण पवित्र आत्म्याची जो निंदा करेल त्याला क्षमा नाही.

मनन चिंतन:

     आपण सर्वजण दोन हजार अठरा वर्षात आहोत. प्रत्येकांनी या नवीन वर्षाचा कार्यक्रम वेगवेगळ्याप्रकारे राबवला असेल. नवीन योजना, धोरणे व ध्येय आखली असतील. माझ्या मुलाला किंवा मुलीला चांगले शिक्षण देणार असे सुद्धा ठरवले असेल. यंदाचे दोन हजार अठरा वर्ष सुखाचे व समाधानाचे जाईल अशी आपली प्रत्येकांची आशा होती. परंतु त्या आशेवर पाणी पडले. नवीन वर्षाच्या पहिल्याच जानेवारी महिन्यात आठ वर्षाच्या आसिफा नावाच्या चिमुकल्या मुलीवर चार व्यक्तींनी बलात्कार केला आणि तिच्या डोक्यावर दगड मारून तिचा जीव घेतला. या चार बलात्कारी तरुणांनी आपल्या क्षणिक सुखासाठी त्या छोट्या मुलीचा जीव घेतला. त्या तरुणांना वाटले असेल की ह्याद्वारे सार्वकालिक सुख अनुभवायला मिळेल. पण हे त्यांचे सुख क्षणिकच राहिले. दुसऱ्या बाजूला आसिफाच्या कुटुंबाला कदाचित माहित असेल की आमचे हे दुःख क्षणिक असेल या आशेने, यातनेने व दुःखाने कायद्याकडे म्हणजेच त्यांनी कोर्टाची पायरी चढली. तेथे गेल्यावर आसिफाच्या वडिलांवर जुलूम, छळ व अत्याचार झाले. अन्यायी तराजूचे पाळणे आसिफाच्या कुटुंबावर पडले. कायद्याला पैशांची लालच दाखवून न्यायी तराजूचे पाळणे या चार बलात्कारी तरुणांच्या बाजूने पडले. असं म्हणतात की, “कायदा सांगतो तसे तराजूचे पाळणे खाली-वर होते.” क्षणिक सुख कधीच राहत नाही. हे चार बलात्कारी तरूण कायदा विसरून गेले होते. जानेवारी महिन्यापासून न्यायासाठी लढणाऱ्या आसिफाच्या कुटुंबीयाना शेवटी एप्रिल महिन्यामध्ये न्याय मिळाला.          
     होय माझ्या बंधू-भगिंनीनो जेव्हा आदाम व हव्वा (ऐवा) यांना देवाने निर्माण केले तेव्हा ते निरपराध अवस्थेत होते. त्यांना निवड करण्याचे स्वातंत्र होते. जन्मतः त्यांना स्वच्छ, निर्मळ व पावित्र्य अंतःकरणे लाभली होती. योग्य व चांगले काम करण्याची क्षमता त्यांच्या ठायी होती. देवाने त्यांना स्वतःची क्षमता व सहभागिता बहाल केली होती परंतु त्यांनी स्वतःचे ऐकून सैतानाला त्यांच्या जीवनात प्रवेश करून दिला. सैतान जो पापाचा कर्ता त्याला त्यांनी हाताशी धरले व त्याच्या साहाय्याने त्यांनी देवाची आज्ञा मोडली. सापाने त्यांच्या मनात देवाच्या वचनाबद्दल संशयाचे बी पेरले व हे दोघे मोहाला बळी पडले आणि त्या क्षणाला जगात पाप आले.
     आज माणूस आदाम व हव्वा (ऐवा) सारखा वागत आहे. आज्ञा मोडून देवापासून व इतरांपासून अलिप्त होत आहे. स्वतःचे ऐकून वाईट गोष्टी करत आहे. दिलेल्या कामामध्ये घोटाळा करणे, दुसऱ्याची फसवणूक करणे, पैशांसाठी व प्रसिद्धिसाठी दुसऱ्याचा उपयोग करणे, आपले नाव उंच करण्यासाठी दुसऱ्याचे नाव खराब करणे इत्यादी कामे सैतानाची आहेत. ज्या सापाने आदाम व हव्वाला (ऐवेला) आज्ञाभंग करायला सांगितले तो साप/सैतान अजूनपर्यंत काही माणसामध्ये वस्ती करीत आहे. सैतान माणसाला भुरळ घालून अंधारात व पापाच्या अग्नीत टाकत आहे. क्षणिक सुखासाठी माणूस सैतानाचे ऐकतो व सार्वकालिक सुखातून विभक्त होतो.
     करिंथकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात संत पौल सांगतो की, प्रेषित सार्वकालिक सुखाच्या मागे गेले त्यामुळे त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला. अडचणी, कष्ट, अपयश व वेद्नेमध्ये त्यांनी कधी विश्वास सोडला नाही. विश्वासामुळे ते मोहाच्या जाळ्यातून बाहेर पडले. ख्रिस्ताच्या मरणानंतर दुःख, यातना सहन कराव्या लागल्या असताना सुद्धा विश्वासात मजबूत राहून प्रेषितांनी सर्वकाही सहन केले. क्षणिक दुःख दीर्घकाळ राहत नाहीत याची त्यांना कल्पना असल्याने सार्वकालिक चैतन्य, वैभव व आनंदाची ते वाट पाहत होते. पृथ्वीवरील सर्वकाही नष्ट होईल त्यामुळे पृथ्वीवरील गोष्टीवर लक्षकेंद्रित न करता त्यांनी स्वर्ग निवासस्थान बनविण्यासाठी अथोनात प्रयत्न केले. जीवनात थोडे दुःख, त्रास व नैराश्य आल्यावर आपला विश्वास कमी होतो आणि आपण देवापासून दूर जातो. क्षणिक सुख व दुःख जास्त काळ राहत नाही ही कल्पना माणूस विसरून गेला आहे. माणूस जास्त क्षणिक सुखाच्या शोधात भरकटत असतो.
     आजच्या शुभवर्तमानात शास्त्री व परुशी येशूला दोषी ठरवून त्याला सैतान समजतात. येशू सैतानाच्या सहाय्याने भुते काढत असे असा त्यांचा समज होता. परंतु येशू तसे करत नसे. येशू माणसातून भुते काढून त्यांना बरे करीत होता. चांगले व नवीन जीवन तो त्यांना देत होता. वाकड्या रस्त्यावरून सरळ रस्त्यावर घेऊन येत असे. येशू हे सर्व काही करीत असताना शास्त्री लोकांना आवडत नसे. येशूने केलेली सत्कर्म्ये परुशींना आवडत नसे. उपस्थित असलेला समुदाय येशूची प्रशंसा करीत हे देखील त्यांना आवडत नसे.  भुताने पछाडलेल्या माणसातून भुते काढणे हे शक्य नाही. त्याच्यासाठी प्रार्थना, उपवास व दुसऱ्यांबरोबर चांगले संबंध असणे ह्या गोष्टीची गरज असते. येशूने स्वतः हे सर्वकाही करीत होता. शास्त्री लोकांनी येशूला खूप त्रास दिला परंतु येशू त्यांना शिक्षा देत नाही. परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील तो शिक्षेस पात्र ठरेल असे येशू म्हणतो. पवित्र आत्म्याची निंदा करणाऱ्या माणसावर कधीच क्षमेचा वर्षाव होत नाही. कारण पवित्र आत्मा आपल्याला साहाय्य करून अशक्य गोष्टी शक्य करायला नेहमी मदत करतो. संकटात तोंड द्यायला शक्ती व सामर्थ्य देतो. अडचणीत व दुःखात मार्गदर्शन करतो. पवित्र आत्म्याची छाया आपल्यावर नेहमी असते पण कधी-कधी आपल्यामध्ये असलेला अहंकार व गर्वामुळे तो आपल्याला दिसत नाही. जर आपण आपले तन-मन-धन पवित्र आत्म्यासाठी उघडे ठेवले तरच आपली सत्कृत्ये, सुविचार व सुबुद्धी चांगली राहून आपल्याला चांगले जीवन जगता येईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे देवा आम्हांला सार्वकालिक सुख शोधण्यास मदत कर.

. ख्रिस्तामध्ये राहून प्रेषितांसारखे सार्वकालिक सुख अनुभवणारे व दुसऱ्याला देणारे आपले पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू-धर्मभगिनी व प्रापंचिक ह्यांना येशूचे कार्य जोमाने पुढे नेण्यास कृपा, शक्ती व आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. क्षणिक सुखाच्या मागे जाणारी आजची युवापिढी वाईट व चांगले यातील साम्य विसरून गेले आहेत. अशा युवापिढीला सार्वकालिक सुखाच्या मागे जाण्यासाठी देवाने विपुल असा आशीर्वाद द्यावा जेणेकरून त्यांचे परिवर्तन होऊन जीवनात चैतन्य घडेल म्हणून आपण प्रार्थना करूया.  
३. आपले शेतकरी बांधव पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या वर्षी योग्य व चांगला पाऊस पडून शेतकऱ्याना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळावे व तहानलेल्यांची तहान भागावी व तसेच सर्वांचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. लवकरच २०१८-१९ शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. या शैक्षणिक वर्षात मुला-मुलींचे वाईट प्रकरणापासून बचाव व्हावा, त्यांना चांगले ज्ञान आत्मसात करण्याची क्षमता मिळावी व चांगली सुबुद्धी, आचार-विचार मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.  

No comments:

Post a Comment