Thursday 14 June 2018


Reflection for the Homily of 11th  Sunday (17-06-2018) in Ordinary Time by Br. Rahul Rodrigues. 






सामान्य काळातील अकरावा रविवार




दिनांक: १७/०६/२०१८
पहिले वाचन: यह्ज्केल १७: २२-२४
दुसरे वाचन: २ करिंथ ५:६-१०
शुभवर्तमान: मार्क ४:२६-३४









प्रस्तावना:

     आज आपण सामान्य काळातील अकरावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात यहेज्केल संदेष्ट्याद्वारे देव म्हणतो की, “मी निचास उंच व जे स्वतःला उंच असे मानतात त्यांना नमविल”. तर दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये, ‘श्रद्धेच्या मार्गदर्शनाने आम्ही धैर्याने वागतो आणि प्रभूला संतोषविणे हेच आमचे ध्येय होय’ असे म्हणतो.
     तसेच शुभवर्तमानात आपण पाहतो की येशू देव-राज्याची तुलना ‘मोहरीच्या बी’ बरोबर करतो. मोहरीचे बी हे दिसण्यात जरी लहान असले तरी रुजल्यानंतर ते सर्व झाडा-पाल्यामध्ये मोठे होते व ते अनेकांच्या आश्रयाचे आशास्थान बनते. कारण ते जरी दिसण्यात लहान असले तरी त्या मध्ये एक मोठे वृक्ष होण्याची क्षमता असते तसेच त्याला जमिनीशी त्याचे जवळीक जोडावे लागते तेव्हाच ते रुजते.
     तसेच आपणही परमेश्वराचे वचन ग्रहण केले व त्याचा अंकुर आपल्या जीवनात वाढत गेला तर आपले ही जीवन परमेश्वराच्या असंख्य कृपादानानी बहरून जाईल व आपणही त्या मोहरी प्रमाणे फार मोठे होऊ. म्हणून त्यासाठी लागणारी कृपाशक्ती ह्या मिस्साबलीदानात मागुया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: यह्ज्केल १७: २२-२४

     ह्या वाचनाचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला त्याचा इतिहास जाणून घेणे फार गरजेचे आहे. इस्त्रायल आपल्या हाताचे बाहुले व्हावे यासाठी बाबेलच्या लोकांनी पध्दतशीर योजना आखून ती पार पाडली होती. त्यांनी राजघराण्यासाठी सर्वांना धरून नेले. पण कारभार पाहण्यास त्यांच्यातील एका दुर्बल माणसाला मागे ठेवले. हा माणूस होता सिद्कीया. त्यांनी त्यांच्याकडून जबरदस्तीने बाबेल तहनामा करून घेतला. आता त्यांच्या दृष्टीने इस्त्राएलची निष्ठा पक्की झाली. देशाचा कारभार चालवण्यास हुशार व कर्तबगार असे जेवढे कोणी होते तेवढ्यांना देशांतरास नेले. यामुळे त्यांनी संघटीत प्रतिकार होऊ देण्याची संधी ठेवली नाही.
ह्या सर्वांत त्यांना वाटले कि आता इस्त्रायलचा नायनाट होईल व ते राज्य संपुष्टात येईल परंतु तसे होत नाही. तर खुद्द देव म्हणतो मी ते राज्य पुन्हा उभारीन.

दुसरे वाचन: २ करिंथ ५:६-१०

      करंथीकारस लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात संत पौल म्हणतो कि, देव आम्हामध्ये कार्य करीत आहे. व त्याचा आत्मा आम्हाला मिळाला आहे. या खात्रीमुळे पौल धैर्याने जगत होता. ४:१६-१८ या वाचनातील प्रमुख विचार त्याने पुन्हा विस्ताराने मांडत आहे. पुढे संत पौल म्हणतो, आम्ही स्वर्गात जाईपर्यंत मंडपरुपी गृहात राहत असून आमचा बाह्य देह क्षय पावत आहे. हि गोष्ट आम्ही लक्षात ठेवतो व हि स्थिती आपण या शरीरात वस्ती करू तोवरच असणार. अशा परिस्थितीत आपण कसे वागावे या प्रश्नाचे उत्तर तो लगेच देत आहे.
    पौलाचे लक्ष्य भविष्य काळावर खिळले होते. भविष्यकाळात जी गौरवी स्थिती विश्वासणाऱ्याला प्राप्त होणार आहे त्याबद्दल त्याला खात्री होती. आज्ञापालनामुळे कठीण प्रसंग आले तरी त्या आज्ञा पळत राहणे हा पौलाचा जीवनक्रम होता. स्वर्गात गेल्यावर प्रभूला संतुष्ट करण्यासाठी तो झटत होता. ख्रिस्त आपल्या मंडळीला घेऊन जाण्यास आल्यावर प्रत्येक विश्वासणारी व्यक्ती ख्रिस्ताच्या न्यायासमोर उभी राहील व प्रत्येकाच्या सेवेचे मूल्यमापन होईल.

शुभवर्तमान मार्क ४:२६-३४

     संत मार्क आपल्याला आज आपल्या अध्यात्मिक वाढी संबधीचे सुस्पष्ट दाखले देत आहे. आमच्या अंतःकराणामध्ये देवाच्या राज्याची सतत शांतपणे वाढ होत असते हे आम्हाला पहिल्या दाखल्यातून सांगण्यात आले आहे. आपण चिंतातूर होऊन धडपड करण्याची काहीच गरज नाही. पेरलेले बी वाढून आपोआप फळ देईल. नैसर्गिक वाढीची प्रतिक्रिया आपल्याला समझत नाही. पण त्या वाढीत सहभागी होण्यासाठी ती समझुन घेण्याची आम्हाला गरज नाहीच. पिक मिळण्याचे अभिवचन तर आहेच पण त्याबरोबर पवित्र शास्त्रात अनेकदा देवाच्या न्यायाची सूचनाही आहे.
     दुसऱ्या दाखल्यामध्ये पुन्हा न लक्षात येणारी वाढ आणि त्याचे आश्चर्यकारक परिणाम याचे वर्णन केले आहे. मोहरीचे बीअगदी छोटे असते पण त्याची वाढ झाली कि कालांतराने एका मोठ्यात मोठ्या रोपात त्याची गणना केली जाते. देव राज्याची वाढ हि अशीच असते. प्रारंभी ते अगदी अल्प वाढते पण अखेरीस त्याचाच जय होतो.

बोधकथा

    एकदा एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या व्यक्तीने त्याच्या सुट्टीच्या दिवसात काही वैद्यकीय औषधात पिवळ्या रंगाचे पावडर मिसळून कपडे धुण्याचे पावडर म्हणून विकू लागला. व त्याला निरमा असे नाव दिले. काही दिवसाताच ह्या निरमा पावडरला फार मागणी वाढली. व अखेरीस त्याने  निरमा नावाची कंपनी चालू केली. हळूहळू त्याने निरमा साबण व टूथपेस्ट ही बनवली. व त्याला फार मागणी मिळाली. काही वर्षातच ह्या व्यक्तीने ६०० करोड रुपये चा नफा केला. त्या व्यक्तीचे नाव आहे करसान भाई पटेल. त्याचे वडील एक गरीब शेतकरी होते. आज निरमा कंपनी फार नावाजलेली आहे. त्याच्या जीवनाची कथा आजच्या शुभवर्तमानाशी फार जुळत आहे. ज्याप्रमाणे बीज पेरल्यावर ते एखाद्या वृक्षामध्ये वाढत जाते त्याचप्रमाणे करसान भाईचा व्यवसाय ही वाढत गेला.

मनन चिंतन :

     स्वर्गाचे राज्य हे एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे. आज पुन्हा एकदा आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशू ख्रिस्त लोकांना शिकवण्यासाठी दोन दाखल्याचा वापर करतो. कारण ते लोक सर्वसामान्य होते व त्यांना शिकवण्यासाठी येशू ख्रिस्ताने अगदी साधी व सरळ भाषा वापरली व त्यांना महत्व पटवून देण्यासाठी त्याच्या दररोजच्या जीवनातील गोष्टीचा समावेश केला .
     तसे पाहता मोहरीचा दाण्याचा दाखला हा खूप प्रेरणादायी आहे. मोहरीचा दाणा खूप लहान असतो. परंतु त्याचे मोठ्या वृक्षात रुपांतर होते. हे सर्व मोहरीच्या दाण्यांमध्ये असलेल्या शक्तीमुळे होते. हाच वृक्ष अनेकांच्या आश्रयाचे स्थान बनतो. तसेच आपण जर परमेश्वराचे वचन ग्रहण केले व त्याचा अंकुर आपल्या जीवनात वाढत गेला तर आपले जीवन परमेश्वराच्या असंख्य कृपादानांनी बहरू शकते.
     परंतु बऱ्याच वेळेला आपण स्वतःला कमी लेखतो. आपण म्हणतो मला हे जमणार नाही पण खरे पाहता आपल्या सर्वामध्ये भरपूर अशी क्षमता व सामर्थ्य असते. ज्या प्रमाणे मोहरीचा दान इतका छोटा असून मातीच्या संपर्कात येताच एका वृक्षात वाढतो त्याच प्रमाणे आपल्यालाही वाढण्यासाठी देवाच्या सानिध्यात येणे फार गरजेचे आहे.
     ह्यासाठी आपल्यला जीवनात परमेश्वराला प्राधान्य दिले पाहिजे तरच आपल्याला त्याच्या कृपेचा अनुकूल असा अनुभव मिळेल. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचे सर्वस्व अर्पण करून आपणा सर्वांचे तारण केले. त्याच्याठायी आपण सर्वजण मोहरीच्या दाण्यासारखे आहोत. आपण जरी स्वतःला अपात्र समजत असलो; व देवापासून दूर गेलो असलो तरीसुद्धा परमेश्वर सतत व कायम स्वरूपी आपल्यावर करुणामय दृष्टीने पाहत असतो.
     तसेच आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण देवाच्या राज्याविषयी सुद्धा एकतो. ज्या प्रमाणे एखादा शेतकरी बी पेरतो. परंतु त्या बीजाला अंकुर कसा फुटतो व त्याचे रोपटे कसे तयार होते हे त्या शेतकऱ्याला कळत नाही. देवाने घातलेल्या निसर्गाच्या नियमानुसार सर्व काही घडत असते. व तेच आपण आजच्या पहिल्या वाचनात एकतो कारण आपला देव असा आहे जो वाकडया ओळीवर सुद्धा सरळ लिहतो. देवाचे राज्य त्यासारखेच आहे. देवाच्या वचनाचा अंकुर माणसाच्या जीवनात वाढत जातो व माणूस देवाच्या अधीन असल्यामुळे देवराज्याच्या दिशेने अपोआप वाटचाल करतो.
     ज्या प्रमाणे संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनात म्हणतो कि, मी देवाच्या जवळ असो कि दूर असो पण मला देवाला प्रसन्न करण्यास बरे वाटते. मला त्याच्या सानिध्यात राहून त्याची सेवा करणे बरे वाटते. तसेच आपले सुद्धा असावे. आपलेही ध्येय देवाच्या सानिध्यात राहून, त्याची सेवा करणे असावे.
     तर आपणही देवाच्या सानिध्यात राहून मोहरीच्या दाण्यासारखे एका वृक्षात वाढावे व मोठे व्हावे यासाठी लागणारी कुपा, शक्ती आणि सामर्थ्य श्रद्धेने प्रभूचरणी मागू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद :- हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.

1. आमचे परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी व सर्व कार्यकर्त्यांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व प्रभूच्या प्रेमशांतीचा संदेश त्यांनी सर्वत्र पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
2. यंदाच्या वर्षी सुद्धा आपल्याला चांगला पाऊस मिळावा व आपल्या शेतकरी बांधवाना चांगले पिक घेता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
3. जे कोणी आजारी आहेत त्यांना चांगले आरोग्य, जे दुःखी आहेत त्यांचे दुःख दूर व्हावे व जे एकटे आहेत अशांना प्रभूचा सहवास मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
4. जे तरुण-तरुणी देवापासून दूर जाऊन अंधारात भरकटत आहे, त्यांना प्रभूच्या प्रकाशात मार्गक्रमण करावे व जागतिक मोह सोडून प्रभूच्या प्रेमाकडे वळावे म्हणून प्रार्थना करूंया.
5. दहावी बारावी चे रिझल्ट लागले आहेत, त्या विद्यार्थांनी जीवनात चांगला मार्ग निवडावा व आयुष्यात चांगले काही करावे व त्यासाठी लागणारी कृपा, दृष्टी व सामर्थ्य त्यांना लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
6.थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक गरजासाठी देवाकडे प्रार्थना करूया.  





No comments:

Post a Comment