Thursday 26 July 2018


Reflection for the Homily of 17th Sunday of Ordinary Time
 (29-07-18) By Br. Lavet Fernandes






सामान्य काळातील सतरावा रविवार

दिनांक – २९-७-२०१८
पहिले वाचन – २ राजे ४:४२-४४
दुसरे वाचन – इफिसकरांस पत्र ४:१-६
शुभवर्तमान – योहान ६:१-१५

"पाच भाकरी आणि दोन लहान मासे"




प्रस्तावना

       आज देऊळ मात सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला येशू ख्रिस्ताने केलेल्या ‘पाच भाकरी व दोन मासे’ ह्या चमत्काराबद्दल सांगत आहे.
       आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, ‘देवाने केलेल्या चमत्काराविषयी सूचित करण्यास आलेले आहे. तसेच देवाचा आपल्या लोकांवर असलेल्या अगम्य प्रेमाचा व सामर्थ्याचा उल्लेख करण्यास आला आहे.
       दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो की, जेव्हा आपल्याला देवाच्या प्रेमाचा व सामर्थ्याचा अनुभव येतो व त्यातून जी प्रेरणा मिळते ती प्रेरणा आपल्याला शेजाऱ्यावर प्रेम करण्यास प्रवृत्त करते.
       आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की, येशू ख्रिस्त सर्वसाधारण वस्तूचा वापर करतो. आणि त्या कृतीद्वारे तो आपल्याला त्याचे अलौकिक प्रेम दाखवून देतो. देवाचा अधिकार व सामर्थ्य अमर्यादित आहे; तसेच देवाचे प्रेम अफाट आहे, त्याला सीमा नाही. जर आपल्याला देवाच्या प्रेमाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे व त्यासाठी लागणारी कृपा व आशीर्वाद आपण ह्या प्रभू भोजनविधीमध्ये मागूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन : २ राजे ४: ४२-४४

       शंभर जणांना जेवण घालणे हे त्यांना शक्य नव्हते. परंतु हे शंभर लोक बहुदा संदेष्ट्याच्या समुदायातील होते. वीस भाकरी फार लहान होत्या व त्या इतक्या जणांना पुरे पडल्या नसत्या म्हणून सेवकाने चकित होऊन प्रश्न केला, तेव्हा देवाने दिलेला संदेश एलिशा सांगतो कि, अन्न भरपूर होईल व त्यातून काही अन्न उरेल. असे देवाने सांगितलेल्या भविष्यवाणी द्वारे घडले.

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र : ४:१-६

       यहुदी व परराष्ट्रीय यांना ख्रिस्तामध्ये कसे एक करण्यात आले. याविषयी सांगितल्यावर पौलाने त्यांच्या करिता अशी प्रार्थना केली की, त्यांनी ख्रिस्ताच्या प्रीतीने एक व्हावे.
       विश्वासणाऱ्याचे वैयक्तिक आचारण ख्रिस्ताला शोभेल असेच असावे. एकमेकांच्या उणीवा दिसत असल्या तरीही, एकमेकांशी अति नम्रतेने व सौम्येतेने वागा. सहनशिलतेने एकमेकांचे दुःख सहन करा. ख्रिस्ताच्या प्रीतीने एकमेकांस वागवून घ्या. हेच पाचारणास शोभेल असे आचारण आहे. 

शुभवर्तमान – योहान ६:१-१५

कोणतीही परिस्थिती येशू ख्रिस्ताला अवघड वाटत नव्हती. दैवी सामर्थ्याने तो रोग्यांना बरे करी. पाच हजार लोकांना भाकर व मासलीने तृप्त केले. हे देवाचे सामर्थ्य होते. यावरून तेथे जमलेल्या लोकांनी येशू हा देव आहे हे ओळखायचे होते. या उद्देशाने येशू ख्रिस्ताने हा चमत्कार केला. म्हणून त्यास चिन्ह म्हटले आहे. तरी त्या लोकांनी त्याचे दैवत्व मानले नाही ते त्याला फक्त संदेष्टा म्हणत.
तो देव आहे व हजारों लोकांस अन्न देण्यास समर्थ आहे यावर शिष्यही विश्वास ठेवत नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने त्या पाच भाकरी हातात घेतल्या व देवापित्याचे आभार मानले. तो त्या मोडत राहिला. त्याने आपले सामर्थ्य प्रकट केले. सर्वजण जेवून तृप्त झाले. हाच प्रभू आपल्या गरजा पुरवून शांती व समाधान देतो.

बोधकथा

जर्मनी मध्ये हुकुमशहा अडोल्फ हिटलर याच्या राजवटीत युद्ध कैद्याच्या बराचश्या छावण्या होत्या. त्यांना राजकीय कैद्याचे कोंडवाडे म्हणता येईल. त्या छावण्यामध्ये दोन हजार लोकांना शेळ्या-मेंढ्याप्रमाणे कोंडून ठेवले जात असे.
तेथे कमी खाणेपिणे दिले जात असे. दिवस भर चाबकाचे फटके खाऊन त्यांना भरभर काम करावे लागत असे. दररोज त्या छावणीतले प्रत्येकी १० लोक मारले जाऊन त्यांना खंदकात फेकून दिले जात असे व तिथे त्यांची मृत शरीरे पेट्रोल टाकून पेटवली जात असत. तरी दिवसा उन्हात काम करीत असताना त्यातले काही कामगार जोखीम घेऊन तेथून पळून जात असत. एकदा संध्याकाळी काळोख पडल्यावर त्यातले ६० कैदी सटकले. जेलरच्या ते खूप उशिरा लक्षात आले. तेव्हा त्यांनी १५ की.मी अंतर कापले असेल. त्यांचे घर १५० ते २०० कि.मी अंतरावर होते. ते सर्व अंतर ४८ तासात चालून चालून कापायचे होते आणि आपल्या घरी पोहचायचा चंग त्यांनी बांधला होता. आणि ४८ तासात ते अर्धेमेल्या अवस्थेत ते ६० जण आपल्या गावी पोहचले. भुकेने कासावीस होऊन थकलेल्या त्या लोकांच्या अंगात उभे राहण्यास ताकद नव्हती. त्यांच्या लोकांनी त्यांना ओळखून त्यांची सेवा करायला सुरुवात केली. त्यांना योग्य आराम व झोप काढायला लावली. आणि मध्यंतरच्या काळात त्यांच्या करिता जेवणावळ करायला सुरुवात केली परंतु त्या सर्वांनी एकमताने असे सांगितले की तुम्ही आमच्याकरिता जेवणावळ तयार कराच परंतु देवळातल्या फादारांना बोलावून आमचं पापनिवेदन ऐकण्याची व पवित्र मिस्सा करण्याची प्रथम व्यवस्था करा. कारण गेले वर्षभर आम्हाला पवित्र आत्म्याची भाकर अजून मिळालेली नाही. म्हणून आम्ही प्रथम आत्म्याची भाकर खाऊ आणि नंतर शरीराची भाकर म्हणजेच तुम्ही जी जेवणावळ करणार आहात ते पोटभर खाऊ.

मनन चिंतन


आजच्या शुभवर्तमानात आपण पाहत आहोत कि, येशू ख्रिस्ताकडे फक्त पाच भाकऱ्या व दोन मासे होते. तरीसुद्धा त्याने पाच हजार लोकांना जेवण दिले. कारण येशू ख्रिस्ताने लोकांची गरज ओळखली होती. आणि त्याच्याकडे लोकांची गरज पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य आणि अधिकार होता.
१.     येशू ख्रिस्ताला मनुष्याची प्रत्येक गरज माहित असते.
जेव्हा ख्रिस्ताने पाहिले कि, मोठा समुदाय त्याच्याकडे येत होता, तेव्हा त्याने फिलीपला विचारले कि, आपण ह्या लोकसमुदयासाठी जेवण कोठून आणणार? ते संपूर्ण दिवस आपल्या बरोबर आहेत. शिमोन म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ पाच भाकऱ्या आहेत. परंतु त्या सर्वांना कशा पुरणार? तेव्हा येशूने त्या भाकरी घेतल्या, आभार मानले व सर्वांना ते वाटले.
२.     येशू ख्रिस्त आपली गरज भागवत असतो.
येशू ख्रिस्त आपल्या आध्यात्मिक आणि शारीरिक गरजा पूर्ण करत असतो. ह्या सर्व गरजा देवासाठी फार लहान आहेत. येशूने हजारों लोकांना जेवण दिले; वादळ शांत केले; तसेच आपण लूकलिखित शुभवर्तमानात १:३७ मध्ये पाहतो कि, “देवाला काहीच अशक्य होणार नाही.” येशू ख्रिस्ताने खूप चमत्कार केले. जेव्हा कानागावी द्राक्षरस संपला होता तेव्हा त्याने पाण्याचे रुपांतर द्राक्षरसामध्ये केले. आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो कि, एका मुलाने पाच भाकऱ्या व मासे दिले आणि त्याद्वारे ख्रिस्ताने पाच हजार लोकांना जेवण दिले. येशू ख्रिस्ताने काही वस्तू शुन्यातून निर्माण केल्या असत्या, परंतु त्याने तसे केले नाही कारण ते त्याचे मिशनकार्य नव्हते. तो नवीन व्यवस्था किंवा रचना करण्यासाठी आला नाही तर जुन्या गोष्टींचे नुतनीकरण करण्यासाठी आला होता. जी मेंढरे हरवली होती व जे आजारी होते त्यांना शोधण्यासाठी व बरे करण्यासाठी आला होता.
३.     जेव्हा येशू ख्रिस्त आपल्या जीवनात येतो तेव्हा काहीच कमी पडत नाही.
जर प्रभू येशू आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू झाला तर आपल्या जीवनात सुंदर गोष्टी घडत असतात. ह्याविषयी अनेक उदाहरणे बायबलमध्ये पाहावयास मिळतात.
येशू ख्रिस्त गनेसरेत समुद्राच्या किनाऱ्याशी असताना शिमोनला म्हणाला कि, मासे धरण्यासाठी तुम्ही आपले जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरिले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यांत सापडला व जाळी फाटू लागली (लुक ५:१-६). जेव्हा येशू ख्रिस्त आपल्या जीवनात वस्ती करतो तेव्हा तेथे भरपूर असते.
आजचे शुभवर्तमान सांगते कि, पाच हजार लोक जेवल्यावरही बारा टोपल्या भाकऱ्या शिल्लक राहिल्या. जेव्हा येशू ख्रिस्त प्रवेश करतो तेव्हा तेथे पुष्कळ प्रमाणात सर्व काही उपलब्ध होते. प्रभू येशू आपल्यावर प्रेम करतो व तो आपली काळजी घेतो. मत्तय ६:२६ मध्ये येशू ख्रिस्त सांगतो कि, “आकाशातील पाखरांकडे पाहा. ती पेरीत नाहीत वा कापणी करीत नाहीत किंवा गोदामात साठवूनही ठेवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात, हे तुम्हांला माहीत आहे.” त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तर चिंतन करा आणि देवावर विश्वास ठेवा.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना
आपला प्रतिसाद:- हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.

१.     आज आम्ही ख्रिस्तसभेसाठी प्रार्थना करितो, विशेषकरून पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व धर्मभगिनी ज्यांनी आपले सर्व आयुष्य प्रभूसेवेसाठी अर्पण केले आहे; त्यांना सर्वांना देवाची कृपा व आशीर्वाद मिळावा व देवाची सुवार्ता त्यांनी जगाच्या काना कोपऱ्यात पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.     जे लोक आजारी आहेत त्यांना प्रभूचा दैवी स्पर्श व्हावा आणि ते लवकरात-लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करू या.
३.     जे युवक व युवती देवापासून दूर गेलेले आहेत व ज्यांच्या जीवनामध्ये काही ध्येय नाही, अश्या सर्वांना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व ते देवाच्या जवळ यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.     समाजामध्ये ज्या लोकांना न्याय मिळत नाही त्यांना ख्रिस्ताच्या कृपेने न्यायाचे वरदान मिळावे व त्यांच्यावर होणारे अन्याय व अत्याचार थांबावे आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाने व आदराने समाजामध्ये जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
५.     थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.




2 comments:

  1. Good help to preachers. Quality should improve. All the Best!

    ReplyDelete
  2. 1 point is written about Simon but is his brother Andrew.

    ReplyDelete