Friday 3 August 2018


Reflection for the Homily of 18th Sunday of Ordinary Time
 (05-08-18) By Br. Minin Wadkar 





सामान्य काळातील अठरावा रविवार
संत जॉन मारी व्हियानी संडे


दिनांक : ०५/०८/२०१८
पहिले वाचन : निर्गम १६: २-४,१२-१५
दुसरे वाचन : इफिसकरांस पत्र ४: १७,२०-२४
शुभवर्तमान : योहान ६: २४-३५






“मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.”

प्रस्तावना :

     आज आपण सामान्य काळातील अठरावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास येशू जीवनाची भाकर आहे, ह्यावर विश्वास ठेवून अध्यात्मिक तहान व भूक भागविण्यासाठी बोलावीत आहे. तसेच आज आपण व्हियानी संडे साजरा करीत आहोत.
     आजचे पहिले वाचन निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेले आहे. प्रभू परमेश्वर पिता इस्त्रायल लोकांची फारोच्या गुलामगिरीतून सुटका करतो. परंतु हीच देवाने निवडलेली प्रजा परमेश्वराने केलेल्या सर्व उपकाराची आठवण न ठेवता देवा विरुद्ध तक्रार करतात. इफिसकरांस पत्र ह्या दुसऱ्या वाचनात संत पौल येशूच्या शिकवणीप्रमाणे चालावे म्हणून सांगत आहे. योहान लिखित शुभवर्तमान आपणास सांगते की,  येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे, आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते.
     ह्या पवित्र मिस्सा बलिदानात सहभागी होत असताना आपण प्रार्थना करूया की, आपले ख्रिस्ती जीवन शारीरिक गरजा पुरते मर्यादित न राहता, अध्यात्मिक जीवनाने परिपक्व व्हावे व आपला ख्रिस्तावरील विश्वास दृढ व्हावा म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन : निर्गम १६:२-४,१२-१५

     इस्त्राएल लोक ही देवाने निवडलेली प्रजा होती. ही प्रजा फारोच्या गुलामगिरीत असताना अनेक संकटांना सामोरे जात होती. हे पाहून परमेश्वराने आपल्या निवडलेल्या प्रजेला आपल्या अदभूत चमत्काराने फारोच्या गुलामगिरीतून मुक्त केले. शक्तिशाली परमेश्वराने मोशेच्या नेतृत्वाखाली सर्व लोकांना निवडलेल्या ठिकाणी नेण्याचे ठरवले. त्या ठिकाणी जात असताना लोकांना अनेक अडी-अडचणींना सामोरे जावे लागत असे. अरण्यातून वाटचाल करत असताना त्याच्यांकडे पुरेसे अन्न नव्हते, म्हणून इस्त्रायली लोकांनी मोशेकडे कुरकुर केली, ज्या शक्तिशाली देवाने आपल्या अदभूत चमत्काराने इस्त्रायली लोकांना मिसर देशातून बाहेर काढले होते त्या देवाला ते विसरले होते. परंतु परमेश्वराला त्यांचा कळवळा आला आणि त्यांच्यासाठी स्वर्गातून मान्ना पाठवून त्यांची भूख भागवली. अन्ना व्यतिरिक्त लोकांनी मोशेकडे पाणी व इतर  शारीरिक गरजांची पूर्तता करण्यासाठी तक्रार केली. देवाने लोकांच्या सर्व गरजांची पूर्तता करण्याची जबाबदारी स्विकारली आणि सर्व लोकांना आनंदित केले.
     ह्याद्वारे आपल्याला असे दिसून येते की, इस्त्रायल लोकांच्या तक्रारी दाखल व अल्प विश्वासावर शक्तिशाली परमेश्वराने प्रेम, क्षमा व करुणेचा वर्षाव केला आहे.

दुसरे वाचन : इफिसकरांस : ४:१७,२०-२४

     ह्या पत्राद्वारे संत पौल इफिसकरांस चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी सांगत आहे. ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी विधर्मी व परराष्ट्रीय लोकांच्या मार्गावर विसंबून न राहता ख्रिस्ताने शिकविलेल्या मार्गाचा वापर करावा तसेच ख्रिस्तावर विश्वास ठेवणे हे फार आवश्यक आहे हे संत पौल सांगत आहे.

शुभवर्तमान : योहान : ६:२४-२५

     बहुतेक लोक येशूला आपला राजा म्हणून घोषित करत होते. हे येशूला मान्य नव्हते. कारण लोक त्याला राजकीय नेता किंवा राजा संबोधित होते. हे पाहून येशू तेथून निघून गेला. येशूचा शोध घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने कपरनाहूम येथे गेले. येशूला भेटल्यानंतर लोकांनी येशूला तुम्ही इथे कशासाठी आला आहात हा प्रश्न केला. येशूने लोकांना स्पष्टपणे सांगितले की, तुम्ही माझा शोध माझ्या शिकवणीसाठी न करता फक्त शारीरिक भूक भागविण्यासाठी करता आहात. येथे येशू ख्रिस्ताने शारीरिक भुके ऐवजी अध्यात्मिक भुकेला प्राधान्य दिले आहे.
     यहुदी लोकांचा देवपित्यावर विश्वास होता. परंतु त्यांना देव त्रेक्य आहे याची कल्पना नव्हती. यहुदी लोकांमध्ये कार्यरत असताना त्याने त्यांना देव त्रेक्य आहे, ह्याविषयी उघडपणे सांगितले नव्हते. परंतु येशूने आपल्या कार्याद्वारे यहुदी लोकांना पटून दिले होते की, तो देवापासून जल्मलेला आहे. तसेच त्यांना येशूच्या अदभूत कार्याद्वारे राज्याची प्रचिती झाली होती. असे असून देखील सुद्धा यहुदियांनी येशूकडे दुसरे एखादे अदभूत कार्य करण्याची विनवणी केली. यहुदी लोक येशूला सांगतात की, आमच्या पूर्वजांना वाळवंटामध्ये मोशेने चाळीस दिवसासाठी स्वर्गातून मान्ना पुरविला होता. (निर्गम १६:४) पण येशू त्यांना म्हणाला जो मान्ना तुम्हाला स्वर्गातून देण्यात आला तो मोशेद्वारे नव्हे तर माझ्या स्वर्गीय पित्याद्वारे देण्यात आला होता. ह्याद्वारे असे सूचित होते की, जो मन्ना देव देत आहे तो खुद्ध येशू ख्रिस्त आहे. आणि जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवनाचा लाभ होईल ह्याचे आश्वासन प्रभू देतो. सार्वकालिक जीवनाचा लाभ होईल असा स्वर्गीय मान्ना आम्हांला द्या अशी याचना लोकांनी येशूकडे केली. शारीरिक भूक भागविण्या इतक्या मर्यादित असलेल्या लोकांना येशू मोठ्या धैर्याने सांगतो, “जीवनाची भाकर मीच आहे; जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.”

बोधकथा :  

     एका पॅरीश मध्ये सण्डे स्कूलच्या मुलांना एका धर्मगुरूने प्रश्न केला, “समजा ह्या क्षणाला प्रत्यक्षात प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या समोर उभा राहिला तर तुम्ही काय कराल?” त्यावर मुलांनी वेगवेगळी उत्तरे देण्यास सुरुवात केली. एक मुलगा म्हणाला, “मी ताबोडतोब येशूपुढे गुडघे घालीन.” दुसरी मुलगी म्हणाली, “मी येशुपुढे लोटांगण घालीन.” त्या मुलांची ही श्रद्धेने भरलेली उत्तरे एकूण धर्मगुरू त्यांना म्हणाले, “मग पवित्र मिस्सेवेळी तुमच्यासमोर प्रत्यक्षात हजर असलेला येशूविषयी तुम्ही एवढा भक्तीभाव का दाखवत नाही?” धर्मगुरूचे शब्द एकूण ती मुले थोडीशी गोंधळली. धर्मगुरूंनी साध्या व सोप्या भाषेत स्पष्ट करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, “जो येशू प्रत्यक्षात तुमच्या समोर उभा राहिल्यावर तुम्ही त्याला एवढा आदर देण्याविषयी बोलले, तोच प्रभू मिस्सेवेळी पवित्र भाकरीमध्ये जिवंतपणे आपल्या समोर हजर असतो. परंतु आपण मात्र त्याचे भाकरीतील अस्तित्व ओळखण्यास अगदी कमी पडल्याने आपल्याकडून त्याचा योग्य तो आदर राखला जात नाही.” काहीवेळा ख्रिस्तप्रसाद स्विकारताना आपण ‘ख्रिस्ताचे शरीर’ ह्या शब्दानंतर ‘आमेन’ सुद्धा बोलत नाही. तसेच आपली पुरेशी आध्यात्मिक तयारी नसते. धर्मगुरूच्या साध्या व सोप्या भाषेतून मुलांना चांगला संदेश मिळाला.

मनन चिंतन 

“मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर  विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.”

     मानवी जीवनात शारीरिक गरजे व्यतिरिक्त आध्यात्मिक गरजां पूर्ण करण्याची फार गरज आहे. शारीरिक गरजांच्या उपभोगासाठी सर्व काही आपल्या हाती आहे. पैशाच्या बळावर आपण सर्वकाही साध्य करू शकतो. परंतु आध्यात्मिक गरजांच्या पूर्ततेसाठी आपल्याला पैशाची आवश्यकता नाही. बाजारात आपल्याला प्रेम, शांती, क्षमा व आशा मिळत नाही. ह्या गोष्टी फक्त परमेश्वराच्या सानिध्यात राहूनच मिळू शकतात. आध्यात्मिक गरजांच्या पूर्ततेसाठी भाविक पोट्टा तसेच कल्याण येथील ताबोर आश्रम व बाळ येशूच्या दर्शनासाठी नाशिकला जातात. तेथे गेल्यावर खरोखर सर्व आध्यात्मिक गरजांची पूर्तता होते असा अनेक भाविकांचा विश्वास असतो. त्यांचा येशूवर पूर्ण विश्वास असतो की, येशू माझी प्रार्थना ऐकणार. कारण येशू म्हणतो, “जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे ये आणि मी तुम्हांला विश्रांती देईन” (मत्तय ११:२८).
     मला आठवण येते ती माझ्या नातलगातील एका व्यक्तीची, जी व्यक्ती दारूच्या नशेतून मुक्ती मिळविण्यासाठी पोट्टा येथे तप (retreat) करण्यासाठी गेली होती. नऊ दिवसाचा तप करून जेव्हा ती व्यक्ती घरी आली, तेव्हा ती पूर्णपणे बरी झाल्याचे माझ्या लक्षात आले. आता त्याचे कौटुंबिक जीवन सुरळीतपणे चालू आहे. त्यांची दारूच्या नशेची भूक व तहान संपलेली होती. येशूच्या कृपादृष्टीमुळे त्याला शांती, प्रेम व क्षमा मिळाली.
     बहुतेक वेळा आपण आध्यात्मिक गरजा ऐवजी शारीरिक गरजांकडे लक्ष केंद्रित करत असतो. शारीरिक गरजांच्या आधारावर सर्व काही साध्य होते असा आपला समज असतो. आपण कधी-कधी शारीरिक गरजांनी एवढे भारावून जातो की परमेश्वराची आठवण आपल्याला येत नाही. निर्गम (१६:२-४,१२-१५) ह्या  पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, प्रभू परमेश्वर पिता इस्त्रायल लोकांची फारोच्या गुलामगिरीतून सुटका करतो. परंतु इस्त्रायल प्रजा देवाने केल्याने सर्व उपकारांची आठवण न करता देवा विरुद्ध तक्रार करतात. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या सानिध्यात राहण्या ऐवजी मिसर (फारोच्या गुलामगिरीत) देशात राहणे पसंत करतात. कृपाळू देव लोकांच्या तक्रारीकडे लक्ष न देता त्यांना अन्न व पाणी देतो. योहानलिखीत शुभवर्तमानात आपण पाहतो की, यहुदी लोक आपली शारीरिक भूक व तहान भागविण्यासाठी येशूच्या मागे येतात. यहुदी लोकांना येशूची गरज नव्हती तर येशू करीत असलेल्या अदभूत चमत्कारांची. येशू त्यांना स्पष्ट पणे सांगतो की, तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजांसाठी व तुम्हांला खावयास अन्न व पिण्यास पाणी मिळावे म्हणून तुम्ही माझ्या मागे येता. यहुदी लोक येशूला सांगतात की, मोशेने आम्हाच्या पूर्वजांना स्वर्गातून मान्ना पुरविला होता. परंतु येशू त्यांना सांगतो की, स्वर्गीय मान्ना मोशेने नव्हे तर माझ्या स्वर्गीय पित्याने दिला होता. हा स्वर्गीय मान्ना साधारण नसून तो मीच आहे, असे येशू त्यांस समजावून सांगतो. मीच आहे जीवनाची भाकर आणि जो कोणीही माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. असे आश्वासन येशू यहुद्याना देतो. तहान लागलेल्या येशूने शमरोनी स्त्रीकडे प्यावयास पाणी मागितले. शमारोनी स्त्री येशूला म्हणाली, “तुम्ही यहुदी आहात आणि मी एक शोमरोनी स्त्री आहे.” (यहुदी लोकांचे शोमरोनी लोकांशी सलोख्याचे संबंध नव्हते.) या दोघाच्या संभाषणात ‘जिवंत पाणी’ ह्या बाबीवर चर्चा होते. तेव्हा येशू म्हणतो, ”मी जे पाणी देतो ते पाणी जो पितो त्याला कधीही तहान लागणार नाही. मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत, पाण्याच्या झऱ्यासारखे होईल. त्या पाण्यामुळे त्याला अनंतकाळाचे जीवन मिळेल” (योहान ४: ४-१४). येशू म्हणतो, “मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे” (योहान  १४; ६). ‘देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी  त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळाचे जीवन मिळावे (योहान ३:१६).
     येशूने आपल्या सेवा कार्यात आंधळ्यास दृष्टी दिली, गरिबांस देवाच्या राज्याची घोषणा केली, आणि कैद्याची बंदिवासातून सुटका केली. येशू भाकर होऊन लोकांची आध्यात्मिक भूक भागवितो. प्रेम, क्षमा, समेट, शांती आणि दया इत्यादी गुणांचा येशूने वापर करून लोकांचे जीवन आध्यात्मिकतेने भरले.
     ख्रिस्ती धर्मात भाकरीच्या रूपाने येशू ख्रिस्त मिस्साबलिदानाच्या वेळी आमच्या समोर येत असतो. पवित्र मिस्साबलिदानात प्रत्यक्ष देवाचा  पुत्र शरीर व रक्ताच्या रुपात हजार असतो. ह्याच पवित्र मिस्साबलिदानामध्ये भाकर ही भाकर न राहता ती प्रत्यक्षात प्रभू येशूचे शरीर बनते व द्राक्षरसाचे प्रत्यक्षात प्रभू येशूच्या रक्तात रुपांतर होते. म्हणूनच संत अगस्तीन मिस्साबलिदानाबाबत आदर व्यक्त करत असताना ते म्हणतात, “परमेश्वर जो सर्वात प्रेमळ, सर्वात ऐश्वर्य-संपन्न व सामर्थ्यशाली आहे, त्याने आपले प्रेम ऐश्वर्य व सामर्थ्य जगाला दाखविण्यासाठी एकच गोष्ट निवडली, ती म्हणजे पवित्र मिस्सा-बलिदान.” जेव्हा आपण मोठ्या भक्तिभावाने येशूला आपल्या जीवनात स्विकारतो तेव्हा आपण त्याच्या सहवासात राहतो. त्याला आपल्या सर्व दैनंदिन गरजा ठाऊक आहेत. तो आपल्या सर्व गरजांची पूर्तता करत असतो. परंतु दैनंदिन गरजांकडे जास्त लक्ष केंदित न करता आध्यात्मिक गरजांकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे. आपल्या मनामध्ये प्रश्न उद्भवू शकतो. तो म्हणजे आधात्मिक गरजा कोणत्या आहेत? बायबल वाचणे, मनन-चिंतन करणे, देवाच्या आज्ञा पाळेन, पवित्र मिसात सहभाग घेणे, प्रायश्चित संस्कार घेणे, गरजू व्यक्तींना मदत करणे, इत्यादी आध्यात्मिक गरजा आहेत. ह्या  आध्यात्मिक गरजा जर आपण पूर्ण केल्या तर खरोखर देवाचे दर्शन आपल्याला होऊ शकते.
     ह्या पवित्र मिस्साबालिदानात सहभाग घेत असताना आपण प्रभूकडे प्रार्थना करूया की, आपल्या ख्रिस्ती जीवनात शारीरिक गरजा व्यतिरिक्त आध्यात्मिक गरजांकडे वाटचाल करावी जेणे करून आपण प्रभूच्या सहवासात राहू.

धर्म गुरूंचा आश्रयदाता संत जॉन मेरी व्हियानी




जॉन मेरी व्हियानी एक साधारण धर्मगुरू होता. म्हणून इतर धर्मगुरू त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करत नव्हते. अनेक वेळा आपल्याला असे वाटते कि, परमेश्वर असामान्य, हुशार व गुणसंपन्न लोकांची निवड करतो. परंतु जॉन मेरी व्हियानी कडे पाहिल्यावर असे लक्षात येते कि, परमेश्वर त्याच्या कार्यासाठी व्यक्ती निवडताना भेदभाव न करता सर्वांना आमंत्रित करतो. जॉन मेरी व्हियानी ह्यांनी आपल्या जीवनाद्वारे लोकांना ईश्वरी प्रेम, दया व शांती देण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच तो एक महान संत गणला गेला व सर्व धर्मगुरूंचा आश्रयदाता बनला.
व्हियानी यांचा जन्म ८ मे १७८६ साली फ्रान्समधील दारदिली येथे झाला. व्हियानी कुटुंबीय हे देवभिरू व गरजू व्यक्तींना मदत करत असल्यामुळे लहानपणीच एकमेकांना मदत करण्याचे संस्कार त्याच्यावर झाले. पुढे तो १९ वर्षाचा असताना त्याच्या वडिलांनी धर्मगुरू बॅले यांच्याकडे पुढील शिक्षणासाठी पाठविले. त्यावेळी लॅटीन भाषा शिकण्यासाठी त्याला भरपूर कष्ट करावे लागले. १८९० मध्ये फ्रेंच पोलिसांचे राज्य संपल्यावर  जॉन मेरी व्हियानी यांनी व्हेरीयस येथे तत्वज्ञानाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांना ईशज्ञानासाठी लिअॅन्सच्या सेमिनारीत पाठवण्यात आले. १२ ऑगस्ट १८१५ मध्ये व्हियानी यांना धर्मगुरुपदाची दिक्षा मिळाली. धर्मगुरू फादर बॅले यांच्या हाताखाली उपधर्मगुरू म्हणून इकोले पॅरिशमध्ये त्यांनी सेवा केली. फादर बॅले यांच्या मृत्युनंतर फ्रान्सच्या मध्यवर्ती भागातील आर्स या ग्रामामध्ये त्यांची नेमणूक झाली. या आर्स धर्मग्रामातील लोकांना देवाबद्दल योग्य अशी जाणीव नव्हती. त्या धर्मग्रामात आगमन झाल्यावर फादरांच्या नजरेस आली कि, येथील लोक खाण्यापिण्यात व नाचगाण्यात दंग आहेत. हे पाहून फादरांनी लोकांच्या उन्नतीसाठी काहीतरी करावे असा निश्चय केला. चर्चमध्ये पवित्र ख्रिस्तशरीर साक्रामेंतासमोर तासनतास प्रार्थना केली व उपास, सत्कृत्ये आणि स्वार्थत्याग करून लोकांचे जीवन बदलण्यासाठी फादारांनी प्रयत्न केले. चर्चला येणाऱ्या भाविकांची संख्या हळूहळू वाढू लागली. अनेक लोक प्रायश्चित संस्कार घेण्यासाठी फादारांकडे येऊ लागले. फादरांच्या सेवामय जीवनाद्वारे लोकांना परमेश्वराच्या कृपेचा आणि प्रेमाचा अनुभव येऊ लागला.
फादर व्हियानी रोज चौदा ते अठरा तास प्रायश्चित संस्कारासाठी बसत असत. तसेच त्यांच्या प्रार्थनेने व आशीर्वादाने अनेक लोकांचे आजारही बरे होऊ लागले. लोक अध्यात्मिक मुक्तीसाठी फादारांकडे येऊ लागली. व त्यांना आपल्या धर्मग्रामातील हजारो लोकांना देवाकडे आणण्यासाठी यशही मिळाले. फादर जॉन मेरी व्हियानी ४ ऑगस्ट १८५९ मध्ये मरण पावले. त्यांचे सर्व मिशनरी कार्य पाहून पवित्र ख्रिस्तसभेने ३१ मे १९२५ रोजी फादरांना संतपद बहाल केले. पोप पायस अकरावे यांनी फादर व्हियानी यांना जगातील सर्व ख्रिस्ती धर्मगुरुंचे आश्रयदाते म्हणून घोषित केले.
आज ख्रिस्तसभा संत जॉन मारी व्हियानी यांचा सण साजरा करते. या दिवशी सर्व धर्मगुरूंची आठवण केली जाते. सर्व धर्मगुरूंना चांगले आरोग्य लाभावे व मिशन कार्य करण्यासाठी देवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून विशेष प्रार्थना करू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : दयावंत प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु पोप फ्रान्सीस, महागुरू, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ बंधू-भगिनी ह्यांनी सदैव ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत असताना भाविकांच्या आध्यात्मिक गरजांची पूर्तता करावी व हे कार्य करत असताना त्यांना प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.  येशू म्हणतो, ‘मीच जीवनाची भाकर आहे. आणि जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल’. ह्या येशूच्या वचनावर आम्हा प्रत्येक ख्रिस्ती भाविकांचा विश्वास दृढ व्हावा आणि पवित्र मिस्सावेळी ख्रिस्तप्रसादाचे सेवन पूर्ण भक्तिभावाने करावे म्हणून प्रभूकडे याचना करूया.

३.  आजच्या ह्या जगाचे भवितव्य तरुण पिढीच्या हातात आहे. परंतु आजची तरुण पिढी अनैतिकता, आत्महत्या, भ्रष्टाचार आणि इतर वाईट मार्गावर चालून आपले भवितव्य बिघडवत आहेत. अशा ह्या तरुण पिढीला परमेश्वराने मार्गदर्शन करावे व त्यांनी योग्य तो मार्ग अवलंबवावा म्हणून प्रभू कडे प्रार्थना करूया.

४.  नैसर्गिक समस्येमुळे गरीब, पिढीत आणि ज्यांना कोणाचा आधार नसलेल्या लोकांचे दैनंदिन जीवन व राहणीमान विस्कळीत होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा ह्या बिकट परिस्थितीमध्ये लोकांना श्रीमंत व दानशूर लोकांची आर्थिक मदत मिळावी आणि त्यांचे जीवन पुन्हा एकदा सुरळीत पणे चालावे म्हणून प्रार्थना करूया.

५. आज आपण व्हियानी संडे साजरा करीत आहोत. धर्मगुरूंचा आश्रयदाता असलेल्या संत जॉन मारी व्हियानी द्वारे ख्रिस्त सभेतील सर्व धर्मगुरुना चांगले आरोग्य, त्यांच्या मिशन कार्यात प्रभूचे मार्गदर्शन लाभावे म्हणून परमेश्वरा चरणी प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व समाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.




No comments:

Post a Comment