Friday 6 September 2019



Reflection for the Homily of 21th SUNDAY IN ORDINARY TIME (08-09-2019) By Br David Gudinho 







धन्य कुमारी मरीयेचा जन्म दिवस



दिनांक: ८/९/२०१९
पहिले वाचन: मीखा  ५: १-४
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८: २८-३०
शुभवर्तमान: मत्तय १: १-१६, १८-२३

प्रस्तावना:

          प्रिय बंधू- भगिनीनो, आज आपणा सर्वांना खरोखर आनंद होत आहे,  कारण गेले नऊ दिवस मरीया मातेची भक्ती करून आज त्या मातेचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यास आपण येथे जमलो आहोत.
          मरीयेचा जन्म दिवस म्हणजे ख्रिस्ताच्या जन्माची घोषणा आहे, हे आपण मिखा प्रवक्ताच्या पुस्तकातून घेतलेल्या वाचनात ऐकणार आहोत. मरीयेच्या आगमनाने इस्त्रायलच्या तारणासाठी केलेली प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि तारणाची पाहट झालेली आहे.
          आज ह्या मरिया मातेचा आपल्या आईचा जन्मदिवस  साजरा करीत असताना, आपणही आपल्या जीवनात मरीयेप्रमाणे, आपल्या शब्दाद्वारे, कृतीद्वारे परमेश्वराच्या इच्छेला आपल्या जीवनात प्रथम स्थान देवून, परमेश्वराचे कार्य पूणर्त्वास नेण्यास, मारिया मातेच्या मध्यस्तीने, परमेश्वर चरणी मोठ्या श्रद्धेने व विश्वासाने प्रार्थना करूया.

सम्यक विवरण             

पहिले वाचन: मीखा  ५: १-४

          आजचे पहिले वाचन मीखा प्रवक्ताच्या पुस्तकातून घेतले आहे आणि मीखा ५:२ ह्या ओवीत  आपणास मसिहा म्हणजे तारणाऱ्या विषयी सांगतात. यहुदी लोकामध्ये अशी समज होती की मीखा प्रवक्त्याच्या पाचव्या अध्यायात दुसऱ्या ओवी मध्ये तारणाऱ्या विषयी सांगितले आहे. म्हणून जेव्हा हेरोद राजाने विचारपूस केली तेव्हा यहुदी लोकांच्या प्रमुख व्यक्तींनी मीखा प्रवक्त्याच्या पुस्तकातून  ओवी ५: २ हा संदर्भ दिला होता. (मत्तय २:६) म्हणून हा मीखा प्रवक्त्या मधील ५:१-४  हा उतारा विशेष करून ख्रिस्त जो तारणारा आहे त्याच्या आगमना विषयी स्पष्टपणे बोलत आहे.

 दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८: २८-३०

          रोमकरांस लिहिलेल्या पत्रात संत पौल आपणास सांगतो की, जो मनुष्य देवावर प्रीती करतो आणि त्याच्या योजनेप्रमाणे किंवा संकल्पनेप्रमाणे जीवन जगतो त्या मनुष्याला स्वर्गाच्या राज्याची दारे  उघडलेली असतील, तसेच तो पुढे सांगतो की, परमेश्वराने त्याच्या योजने प्रमाणे आपणा प्रत्येकास पाचारण केलेले आहे. ह्या पाचारणास स्व:खुशीने होकार देण्यास आपणांस आजचे हे दुसरे वाचान प्रोत्साहन करीत आहे. 

शुभवर्तमान: मत्तय:१;१-१६, १८-२३/ १८-२३

          मत्तय लिखित शुभवर्तमानातून घेतलेल्या ह्या उताऱ्यात आपणास येशूच्या वंशावाळीची माहिती दिलेली आहे आणि पवित्र मारिया कशा प्रकारे प्रभू येशूची आई झाली ह्या विषयी सांगण्यात आलेले आहे. वंशावळ सांगण्याचा मागचा हेतू येशू हा अब्राहामाच्या व दाविदाच्या वंशावळीतून जन्मलेला आहे असा आहे. आणि अशाप्रकारे परमेश्वराने केलेली भाकीत आज पूर्ण झाले आहे. ओवी १८-२३ मध्ये आपणास प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी सांगितलेले आहे. हा उतारा वाचताना आपणास समजेल कि येशूचा जन्म हि दैवी योजना होती आणि ह्या दैवी योजनेला पूर्ण करण्यासाठी योसेफ आणि मारीयेच्या संमतीची अत्यावशक गरज होती. ह्यास्तव परमेश्वराचा दूत प्रभू येशूच्या जन्माबद्दल घोषणा करतो हे  नमूद केले आहे.

मनन चिंतन:

          आज जगभरात कॅथोलिक ख्रिस्तसभा पवित्र मारीयेचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहे. आपली  देऊळ माता येशूख्रिस्त, मारिया माता व संत योहान बाप्तीस्ता, फक्त ह्या तीन व्यक्तीचा जन्मदिवस साजरा करते. म्हणून आजची उपासना पवित्र मारीयेच्या जन्माविषयी मनन चिंतन करण्यासाठी आपणास बोलावत आहे.
          उत्पतीच्या पुस्तकात ३:१५ मध्ये आधीच पवित्र मारीयेच्या जन्माविषयी लिहून ठेवलेले आहे व भाकीत केले आहे. परमेश्वराने सापाला  सांगितले कि, एक स्त्री तुझे डोके तिच्या पायाने ठेचेल आणि म्हणूनच आपण मारीयेचे चित्र पाहतो जेथे मारिया तिच्या पायाने सापाचे डोके ठेचताना दिसते.
          बायबल मध्ये मारीयेच्या जन्माविषयी आपणास जास्त माहीती मिळत नाही. परंतु, बायबलची पाने जर का आपण चाळली त आपल्या लक्षात येईल कि, मारियेला झालेले पाचारण हे, ख्रिस्ताला किंवा तारणाऱ्याला ह्या जगात आणण्यासाठी होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ख्रिस्ताची आई होण्यासाठी तिचा जन्म झाला होता, आणि मानवजातीला ख्रिस्त देणे आणि ख्रिस्ताकडून देवाकडे  नेणे हा त्या मागचा हेतू होता. म्हणून आपण पाहतो कानागावी लग्नात द्राक्षरसाची कमतरता भासू लागली तेव्हा मारीयेने सेवकांना ख्रिस्ताकडे पाठविले तो सांगेल तसे करा असे त्यांना सांगितले. अशाप्रकारे सतत मारिया पवित्र ख्रिस्त सभेला तिच्या पुत्राकडे आणण्यास  प्रयत्न करीत असते.
          संत अगस्तीन म्हणतात मारीयेचा जन्म परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारणाच्या कार्याशी जोडला गेला आहे. तो म्हणतो कि, हे पृथ्वी हर्ष कर आणि मारीयेच्या जन्मात प्रकाशमय हो. तो पुढे म्हणतो कि, ती (मारिया) एका बागेतील फुलासारखी आहे, जिच्यातून अनमोल अशी लिलीची काळी फुललेली आहे. तिच्या जन्माने जो कलंकित मानवी स्वभाव आपल्या पहिल्या आई-वडिलांकडून आपणास मिळाला होता तो आता नष्ट झाला आहे, किव्हा बदललेला आहे.     
          आजच्या मिस्साच्या सुरवातीची प्रार्थना आपणास पवित्र मारीयेचा जन्म हा आपल्या तारणाची पहाट आहे असे सांगत आहे. म्हणजे देवाने मारियेला आपल्या तारण योजनेत एक महत्वाची कामगिरी बजाविण्यासाठी निवडून घेतले, हि तारण योजना कोणती? आदाम-एवा ह्याच्यापापामुळे देव- मानवांचा संबंध तुटला होता. मानव देवापेर्यत पोहचू शकत नव्हता. मानवाला स्वर्गाचे दार बंद झाले होते. मानव देवाकडून कसलीही कृपा मिळवू शकत नव्हता. परंतु मनुष्याला त्याच्या हातून घडलेल्या पापांची क्षमा करून त्याला परत एकदा आपल्याशी जोडण्याचे देवाने वचन दिले होते. त्या वाचनाच्या पूर्ततेसाठी देवाने मानव होण्याचे ठरविले. देव मानव बनून, देव आणि मानव, ह्यामधील दरी बुजून टाकणार होता. आणि त्यासाठी देवाला मानवी आई हवी होती, म्हणून देवाने मारीयेची निवड केली. आपले देवा बरोबरचे संबंध पुनर्स्थापित करणे हि योजना म्हणजे आपल्या तारणाची योजना होय, ह्या योजनेतून देवदूताच्या निरोपाच्या वेळी मारीयेने दिलेल्या होकारात मारीयेचे तारण कार्यातील सारे सहकार्य सामावले आहे. म्हणजेच सुरवातीला सांगितल्याप्रमाणे मारीयेचा जन्म हा तारणाऱ्याला जगात आणण्यासाठी झाला होता.
           मारिया हि कोणी सामर्थ्यवान देवी नाही जी भक्तांच्या मागण्या पूर्ण करते. ती तुम्हा आम्हा सारखी साधे सुधे जीवन जगलेली एक स्त्री होय. मारिया देवाची व आपली आई. तिच्याद्वारे आपल्याला ख्रिस्ताची मैत्री व जीवन लाभते. म्हणून मारीयेची भक्ती देवभक्तीच्या आड येत नाही परंतु तिला सर्व शक्तिमान देवी बनविणे चुकीचे आहे. म्हणून मारीयेची भक्ती योग्य आहे किवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी पुढील  निकषांचा आपण उपयोग करावा. १) तिच्या भक्तीने आपली ख्रिस्त भक्ती म्हणजेच ख्रीस्तावरची श्रद्धा, आज्ञापालन, दुख, सहनशक्ती हि वाढली पाहिजे. (२) तिच्याठायी आपल्याला देवाचे मातृ हृदय अनुभवायला मिळाले पाहिजे. (३) एक दिवस तिच्या सारखे स्वर्गात सदेह राज्य करण्याची इच्छा व आशा निर्माण झाली पाहिजे.  
          नऊ दिवस मारिया मातेची भक्ती करून आज त्या मारिया मातेचा, आपल्या आईचा वाढदिवस मोठ्या हर्षाने साजरा करीत असताना मारिया आई आपणा प्रत्येकास प्रभू येशूच्या तारण कार्यात आप- आपल्या पद्धतीने हातभार लावण्यास पाचारण करीत आहे. ज्याप्रमाणे तिने आपल्या जीवनात परमेश्वराच्या इच्छेस प्राधन्य दिले त्याच प्रमाणे आम्ही सुद्धा परमेश्वराची हाक एकूण त्या हाकेस स्व:खुशीने होकार देण्यास कृपा व शक्ती मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: मारीयेच्या मध्यस्थिने, हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.’

(१) ख्रिस्त सभेचे मेंढपाळ पोप फ्रान्सीस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व धर्मभगिनी ह्यांनी पवित्र मरिये प्रमाणे देवाच्या हाकेस होकार देवून प्रभू येशूचे कार्य मोठ्या उत्साहाने पूर्ण करण्यास त्यांस कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
(२) देशाचा देशकारभार  चालविण्यासाठी निवडून आलेल्या सर्व राज्यकर्त्यांनी स्वत:चा स्वार्थ न पाहता निस्वार्थीपणे जनतेच्या हितासाठी झटावे व भारताच्या संविधानानुसार देशाचा कारभार सुरळीतपणे चालविण्यास कृपा लाभावी म्हणून पवित्र मारीयेच्या मध्यस्थिने प्रभूकडे प्रार्थना करूया.
(३) पवित्र मारिया आपली आई, हिचा जन्मदिवस साजरा करीत असतांना आपण सर्व स्त्रीयांसाठी प्रार्थना करूया. आपल्या समाजात त्यांना मानाने व आदराने जगता यावे, सर्व गुलामगिरीतून त्यांची सुटका व्हावी व समाजात त्यांच्यावर होणाऱ्या अन्याया व अत्याच्यारा विरुद्ध झटण्यास मारीयेच्या मध्यस्थिने प्रभूकडे मागुया.
(४) नोव्हेण्याचे नऊ दिवशी असंख्य अशा मारिया भक्तांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मारीयेची भक्ती केलेली आहे. ह्या सर्व भाविकांच्या इच्छा-आकांक्षा प्रभू परमेश्वराने त्याच्या इच्छे प्रमाणे पूर्ण कराव्यात  आणि त्यांची श्रद्धा बळकट करावी म्हणून ईश्वर चरणी मारिया मातेच्या मध्यस्थिने प्रार्थना करूया.
(५) आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा थोडा वेळ शांत राहून मारिया मातेच्या प्रभू चरणी ठेऊया.

No comments:

Post a Comment