Thursday 12 September 2019


Reflection for the Homily of 24th SUNDAY IN ORDINARY TIME (15-09-2019) By Br Roshan Rosario.



सामान्यकाळातील चोविसावा रविवार


                                                                                                                              दिनांक: १५/०९/२०१९
पहिले वाचन: निर्गम ३२: ७-११, १३-१४.                                
दुसरे वाचन:  १तिमथी १: १२-१७.
शुभवर्तमान: लूक १५: १-३२.                                                                    

क्षमा व नवजीवनाची आशा

प्रस्तावना:

आज आपण सामान्यकाळातील चोविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास क्षमा व नवजीवनाची आशा याविषयी सांगत आहे.
परमेश्वर हा दयेचा सागर आहे व तो आपल्या लोकांस त्यांच्या अपराधांची क्षमा करतो. तो त्यांस नवजीवनाची
संजीवनी देतो.  हिच शिकवणूक आजच्या तिन्ही वाचनांत आपणास पहावयास मिळते. निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि इस्त्रायली जनतेने देवाच्या पहिल्या म्हणजेच एकाच देवाची पूजा कर मूर्ती पूजा करू नकोह्या आज्ञेचा भंग केला तरीही देवाने त्यांना करुणामयी अंतःकरणाने क्षमा केली.
          दुसऱ्या वाचनात संत पौल मी ख्रिस्ताचा आणि ख्रिस्तीजनांचा जरी छळ केला तरीही परमेश्वराने मला क्षमा केली व त्याचा सुवार्ताप्रचार करण्यास पात्र केले अशी साक्ष देतो. तर लुकलिखीत शुभवर्तमानात येशु करुणामयी परमेश्वराच्या दयेचा आरसा आहे हे तीन दाखल्यांद्वारे स्पष्ट होते.
परमेश्वर केवळ आपल्या चुकांची क्षमा करीत नाही तर तो सर्व पापी लोकांस जे त्याच्यापासून बहकले आहेत अशांना त्याच्या जवळ येण्यास आमंत्रण देत आहे. आपण दैवी करुणेचे वर्ष साजरे करीत असताना परमेश्वराची दया, करुणा, आपल्या जीवनात अनुभवावी व तिच दया, करुणा इतरांपर्यंत पोहचवावी म्हणून ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: निर्गम ३२: ७-११, १३-१४

          मानवी निष्ठा व भक्ती हे क्षणभंगुर असते हे आजच्या पहिल्या वाचनात दिसून येते. एका क्षणी देव परमेश्वर इस्रायल लोकांमध्ये अदभूत कार्य करून त्यांची मिस्सर राष्ट्रांत सुटका करतो. तर दुसऱ्या क्षणात इस्रायल हे देवाची कृपा विसरून दुसऱ्या देवाची पूजा करतात. इस्रायल लोकांचा हा हट्टीपणा त्यांना देवाची अपार कृपा स्वीकारण्यास एक बाधा निर्माण करते. पण इस्रायल लोक जरी अनिष्ट पणाने वागले तरी देव जो दयाळू आणि नीतिमान आहे, तो मोशेच्या मध्यस्तीद्वारे इस्रायली लोकांस माफ करतो.

दुसरे वाचन: १तिमथी १: १२-१७

संत पौल तिमथीला पहिल्या पत्रात आपल्याला लाभलेल्या परमेश्वरी कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहे. शौलाचा पौल हा केवळ ईश्वरी कृपेमुळेच झाला. शौल हा ख्रिस्ताला अज्ञात होता, त्यामुळे तो ख्रिस्ती जनांचा छळ करीत असे. शौल ख्रिस्ती विश्वासात रमला नव्हता; शौल परमेश्वरापासून जरी दूर असला तरीही परमेश्वराने त्याचा पाठलाग सोडला नाही. परमेश्वराने त्याला आपली दया दाखविली व ख्रिस्तीलोकांचा छळ करणाऱ्या शौलाचे परिवर्तन ख्रिस्ती श्रद्धेचा प्रसार करणाऱ्या पौलमध्ये झाले. त्यामुळे पौल म्हणतो, ‘आपल्याला प्रभूची कृपा विपुल झाली’. पौल पापी असूनही परमेश्वराचा अनुयायी करणारा झाला व ख्रिस्त ह्या पापी लोकांसाठी ह्या जगात आला हि बाब परमेश्वराला आपल्या प्रजेस पटवून द्यावयाची होती म्हणून त्याने पौलाची निवड केली.
                
शुभवर्तमान: लूक : १५: १-३२

          लूकच्या शुभवर्तमानातील अध्याय १५ हा परमेश्वराच्या दयेच्या दाखल्यांनी भरलेला आहे. येशू आपल्या शिकवणुकीत ३ दाखले देतो:  ‘हरवलेल्या कोकराचादाखला, ‘हरवलेल्या नाण्याचादाखला व उधळ्या पुत्राचादाखला. परुशी लोक, ज्यांना समाज्यातील पापी आणि पश्चाताप  न करणारे समजत. आशा लोकांबरोबर येशू मिळून मिसळून राहत असे. त्यामुळे ते त्याच्यावर सतत टीका करत असत. येथे तीन दाखल्यांच्या संदर्भाने येशू हा संदेश देत आहे कि हरवलेला पापी परत पूर्वस्थितीवर आल्याने देवाला मोठा आनंद होतो. म्हणूनच हरवलेल्यांना शोधावे व त्यांचे तारण करावे हीच येशूची सेर्वोच्च इच्छा आहे.   

मनन चिंतन:

आजच्या शुभवर्तमानात देव हा संदेश देतो कि, जरी आम्ही कितीही वाईट मार्गाने भटकून गेलो तरी, देवाचे आमच्यावरील प्रेम कमी होत नाही. जेव्हा येशू हा जकातदार व पापी ह्याच्या संगतीत जात असे तेव्हा परुशी कुरकुर करत असत, ते म्हणत असत कि, हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर, त्यांची ह्या तक्रारीला उत्तर देण्याकरता येशूने तीन दाखले दिले. ते म्हणजे हरवलेल्या मेढराचा, हरवलेल्या नाण्याचा व उधळ्या पुत्राचा. ह्या दाखल्या द्वारे प्रभू येशू आज आम्हाला असा संदेश देतो कि मनुष्याचा पुत्र हरवलेल्यांस शोधण्यास व तारावयास आला आहे. (लुक १९:१०) ह्या तीन दाखल्यांतून आपल्याला देवाच्या प्रेमाचे तीन पुरावे दिसून येतात.
देव आपल्याला निवड करण्याचा व आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा हक्क देतो. धाकट्या मुलाने बाबाला मालमतेचा आपला भाग विचारला पण बाबाने काहीही न विचारता त्याला त्याचा भाग दिला ह्याच्यातून आम्हाला कळते कि, देव आम्हाला आमचा मार्ग निवडण्यास संधी देतो तो आमच्या राजी कुशीला नाकार न देऊन आमच्या वर कोणत्याहि प्रकारची सक्ती करत नाही. देव आम्हाला आमच्या निवडलेल्या मार्गावर जायला देणार, तो चुकीचा असेल तरी पण, कारण हेच खरे प्रेम आहे.
देव आम्हाला शोधतो:
 हा विषय आपल्याला तिनी दाखल्यांमध्ये दिसून येतो. आपला परमेश्वर आपल्याला सदैव सुधारण्यास त्याच्याजवळ येण्यास व त्याचा प्रेमाचा अनुभव घेण्यास संधी उपलब्ध करीत असतो. पण कित्येकदा आपण ह्या जागतिक मोहमायेत एवढे गुरफटून जातो की, आपणास परमेश्वराची वाणी ऐकुच येत नाही त्यामुळेच पोप जॉन पौल दुसरे म्हणतात की, ‘आज सर्वात मोठे पाप म्हणजे मानवाच्या मनात अपराधीपणाची भावनाच शिल्लक राहिली नाही, त्यास पाप ही भावनाच नकोशी वाटते व त्याने पाप केलेच नाही असे वाटते. देव केवळ आपल्या पापांची क्षमाच करीत नाही तर सर्व पापी लोकांना तो आपणाकडे आमंत्रित करतो, त्यांना क्षमा करतो, फक्त आपण सर्वांनी दु:खी अंतःकरणाने त्याच्यापाशी गेले पाहिजे. हाच आपला ख्रिस्ती विश्वासाचा आकर्षित करणारा गाभा आहे. परमेश्वर आपल्या सर्व अपराधांची आपणास क्षमा करतो. जे लोक अंधकारात गुरफटलेले आहेत एकमेकांविरुद्ध पाप करत आहेत, परमेश्वर अशा लोकांच्या मदतीस सर्वप्रथम धावून येतो. त्यास पश्चाताप करण्यास पुकारीतो व पापक्षमा मिळवून देतो. त्यामुळेच येशू सर्व जकातदार व पापी मनुष्यांबरोबर जेवावयास बसतो, कारण जेवणास एकत्र बसणे म्हणजे, बसलेल्या लोकांशी संलग्न होणे, त्यांस आपले मानून घेणे. येशू हा पाप्याच्या तारणासाठी ह्या भूतलावर आला होता. त्यामुळे शास्त्री व परुशी येशूवर आक्षेप घेतात. ते फक्त कायद्याचे पालक होते, त्यांच्या ठायी दया, करुणा नव्हती. येशू मात्र परमेश्वराची दया, करुणा सर्व लोकांपर्यंत पोहचवत होता, विशेषतः पापी व समाज बहिष्कृत जनांपर्यंत. ख्रिस्त हा पापी लोकांसाठी एक आशेचे किरण होता. व तो आजही आपणा सर्वांसाठी आशास्थान आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
                                                                                                              
प्रतिसाद:     हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.’        

१. परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ ह्यांनी परमेश्वराच्या महान व दैवी दयेचा व करुणेचा आदर्श ठेवून त्याच दयेचा व करुणेचा प्रचार सर्वत्र करावा म्हणून प्रार्थना करूया.
२. जे लोक परमेश्वरापासून दूर गेले आहेत वाईट मार्गाला लागले आहेत, वर्षानुवर्षे पापांत खितपत पडलेले आहेत अशांना परमेश्वराचा अनुभव यावा, त्यांनी कुमार्गांना सोडून परमेश्वरापाशी ते परत यावेत म्हणून प्रार्थना करूया.
३. जगात आज शांती पसरावी, हिंसा, भ्रष्टाचार, द्वेष यांचा विनाश व्हावा म्हणून प्रार्थना करूया.
४. जी कुटुंब दुभंगलेली आहेत अशा कुटुंबात सलोखा निर्माण व्हावा आपापसातील मतभेद बाजूला सारून एकमेकांना क्षमा करावी व ख्रिस्ती जीवनाचा आदर्श व्हावेत म्हणून प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment