Wednesday 18 March 2020


Reflections for the Homily of 4th SUNDAY OF LENT (22-03-2020) By 
Br. Julius Rodrigues.


प्रायश्चित काळातील चौथा रविवार


दिनांक: २२/०३/२०२०
पहिले वाचन: १ शमुवेल १६:१ब, ६-७,१०-१३अ
दुसरे वाचन: एफीसकरांस पत्र ५:८-१४
शुभवर्तमान: योहान ९:१-४१



विषय: “अंधकार धिक्कारा, प्रकाश स्विकारा.”
प्रस्तावना:
          आज आपण प्रायश्चित काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. ह्या रविवाराला आनंदोल्हास रविवार असे सुद्धा संबोधले जाते. उपवास काळात आनंदोत्सव आमच्यामध्ये दोन परस्पर विरोधी भावना निर्माण करतात. पहिली, आपला प्रभू येशूला दुःख सहन आणि क्रूसावरील मरण पत्करावे लागते याबद्दल दुःख तर, मृत्यूवर विजय मिळवून पुनरुत्थीत प्रभू आम्हाला सुद्धा त्याच्या वैभवशाली पुनरुत्थानात सहभागी होण्यास पाचारण करतो म्हणून आनंदोत्सव. आजच्या उपासनेद्वारे प्रभू येशू आपणामध्ये असलेल्या प्रकाशाची ओळख करून देऊ इच्छित आहे व त्याद्वारे तो प्रकाश इतरांस देण्यास आमंत्रण देत आहे. म्हणून त्याच्या भेटीसाठी आपण ह्या मिस्साबलीदानामध्ये आपल्या पापांची आठवण करून ह्या परमेश्वराकडून आपल्या पापांची क्षमा याचना मागुया.

सम्यक विवरण:
 पहिले वाचन: १ शमुवेल १६:१ब, ६-७,१०-१३अ
          शौलाला दूर करण्याची प्रक्रिया देवाने कशी आरंभीली ते आपणास १६व्या अध्यायात सांगितले आहे. मानवाचा आणि परमेश्वराचा बघण्याचा दृष्टिकोन कसा विरोधात असतो ह्याची सांगड ह्या ठिकाणी आपल्याला घालून देण्यात आली आहे. देवाची निवड ही मानवी निवडी पेक्षा भिन्न असते. इस्रायल लोकांची अशी अपेक्षा होती की, आपले पुढारी देखणे, प्रभावी व्यक्तिमत्वे, दुसऱ्यांवर प्रथम दर्शनी छाप पाडणारे असावेत. परंतु त्यांच्या ह्या अपेक्षेचा भंग होत असल्याचे आपणास देवाच्या आवडी नुसार दिसून येत आहे.

दुसरे वाचन: इफीसकरांस पत्र ५:८-१४
          प्रकाश हा मानवी जीवनातील अगदी महत्वाचा भाग आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात ह्या दोन  बाजूंचा आसरा घेऊन आपले जीवन जगत असतो. ते म्हणजे प्रकाश आणि अंधार. संत पौल हा इफीसकरांस प्रकाशाचे महत्त्व पटवून देत आहे. पुढे तो म्हणतोय की, तुम्ही ख्रिस्तात प्रकाशित झाला आहात आणि म्हणून तुम्ही अंधकाराला धिक्कारा. ख्रिस्ताचा प्रकाश आपणास सत्याचा मार्ग दाखवील ह्या विषयी पौल आपणास कान उघडणी करून देत आहे.

शुभवर्तमान: योहान ९:१-४१
          आजच्या शुभर्वतमानामध्ये येशू ख्रिस्त जन्मापासून आंधळा असलेल्या एका मनुष्याला दृष्टिदान देतो. नकळतपणे या चमत्काराव्दारे प्रभू आमच्या आध्यात्मिक अंधत्वावर बोट ठेवतो व सर्व प्रकारच्या अंधत्वातून बाहेर पडण्याचे आव्हान करतो. येशू ख्रिस्ताच्या पवित्र स्पर्शाने त्या जन्मांध माणसाला सर्व काही दिसू लागले.

मनन चिंतन:
“आता आपण कुठे आहोत याचा आत्मशोध घ्या.
          जो मला अनुसरतो... त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. आजच्या उपासनेमध्ये आपण विशेष करून दोन गोष्टी ऐकणार आहोत. अंधकार आणि प्रकाश. विशेष करून ह्या विषयांवर मनन चिंतन करणार आहोत. प्रथम प्रकाश माझ्या जीवनात किती महत्त्वाचा आहे? प्रकाशाविना आम्ही काय केले असते? वर्षभरातील प्रत्येक दिवशी डोळे उघडताच २४ तासांसाठी अंधकार असल्याची जरा कल्पना करा. अशा एका जगाची कल्पना करा जिथे रंगच नाहीत, कारण प्रकाशावीना कोणताच रंग असू शकत नाही. खरोखर जर प्रकाश अस्तित्वात नसता, तर आपणही नसतो. आमचे अस्तित्वही आज नसते. हे झाले प्रकाशाविषयी.
          अंधार म्हणजे संपूर्ण काळोख, प्रकाशाची उणीव. अशा ह्या अंधारात कोणतेही काम आपण करू शकत नाही. कारण आपली दृष्टी त्याठिकाणी हरवलेली असते. आपण कोणतेही चांगले कार्य ह्या ठिकाणी करू शकत नाही. हतबल झालेलो असतो, नीराश असतो, बेचेन असतो, हताश झालेलो असतो, व त्या अंधकारात आपले जीवन व्यथीत करत असतो.
          माझ्या प्रिय भाविकांनो, आजच्या उपासनेमध्ये आपणास प्रकाश ह्या विषयी कान उघडनी करून  दिली आहे. पहिल्या वाचनात आपणास सांगण्यात येत आहे की, देवाची निवड कशी असते आणि त्यामागे देवाचा काय हेतू आहे, हे समजून येते. खऱ्या राजाची निवड करणे म्हणजे प्रजेचा विकास, त्याची उन्नती व संगोपन. जर राजा विश्वासू असेल तर त्यांची प्रजा देखील विश्वासू राहते. म्हणूनच आपल्याला आज पहिल्या वाचनाद्वारे सांगून देण्यात आले आहे की, देव आपल्या प्रजेला प्रकाशाकडे नेत आहे. त्याचे संरक्षण करत आहे. म्हणूनच तो दाविदाची निवड आपल्या प्रजेसाठी करत आहे.
“अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची देवाची वाटचाल.”
          तर दुसऱ्या वाचनात आपणास संत पौल सांगत आहे की, प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. जे पापमार्गाने जात आहेत. ते अध्यात्मिक अंधारात चालत आहेत. त्यांचे भागीदार होऊ नका. तुम्ही ख्रीस्तात प्रकाशित झालेला आहात. ख्रिस्ताच्या प्रकाशित किरणांचा भारा तुमच्या जीवनावर झालेला आहोत आणि म्हणून तुम्ही त्या ख्रिस्ताच्या प्रकाशाने, प्रकाशात उज्वलीत झाला आहात. म्हणूनच जो ख्रिस्त प्रकाश आहे तो तुमच्यात वस्ती करीत आहेत. म्हणूनच सर्व अंधकार सोडून द्या, आणि त्या प्रभूमध्ये त्या प्रकाशात विलीन व्हा. आपल्या जीवनात आपल्याला प्रकाशाची जाणीव होत नसते. आम्ही मग आपण त्या अंधारात आपले जिवंत घालवत असतो. परंतु आज ह्या रविवारी ख्रिस्ताच्या प्रकाशाचा अनुभव घेऊया. हेच आपल्याला सांगण्यात आले आहे.
          शुभवर्तमानावर मनन चिंतन करत असताना मला दिवाळीचा सण साजरा होत आहे असे वाटते. कारण आज त्या अंध व्यक्तीला प्रकाश मिळालेला आहे. जन्मापासून ह्या व्यक्ती अंधकार काय आहे आणि कसा असतो ह्याचा अनुभव घेत होता, रडत होता व शोक करीत होता. परंतु आज येशू ख्रिस्त त्याला दृष्टी बहाल करीत आहे. प्रकाशाची तेजस्वी ज्योत त्याच्या डोळ्यात टाकत आहे. आणि म्हणूनच जणू काही तो आनंदोत्सव साजरा करीत आहे. असे म्हणतात “तमसो मा जोतीर्गमया” म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल. अंधारावर प्रकाशाने मिळविलेला विजयाचा उत्सव. जणू तो आज साजरा करत आहोत. अशा ह्या परिस्थितीमध्ये तो परमेश्वराला ओळखत आहे. आपला विश्वास त्यात प्रबल करीत आहे.
          परुशी आणि शास्त्री ह्यांना देखील देवाचा प्रकाश बहाल करण्यात आला होता. परंतु त्यांना त्या प्रकाशाची जाणीव झालेली नव्हती. ते अंधकारात आपले जीवन सारीत होते. ख्रिस्ताची खरी ओळख त्यांना झालेली नव्हती. अशी म्हण आहे की, झोपलेल्या व्यक्तीला उठविणे शक्य आहे. परंतु झोपण्याचे सोंग केलेल्या व्यक्तीला उठविणे कठीण. होय खरोखरच शास्त्री आणि पुरुशी ह्यांनी सोंग केले होते. म्हणूनच त्यांना ख्रिस्ताची दैवीपणाचा अनुभव आला नाही. तथापि त्या अंध व्यक्ती त्या ख्रिस्ताचा स्पर्श झाला आणि त्याचा विश्वास वाढला.
          आज आपण उपवास काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. म्हणूनच स्वतःला विचारूया; मी ख्रिस्ताचे जीवन जगत आहे का? अंधकाराचा प्रभाव माझ्या जीवनावर किती आहे? ख्रिस्त जो खरा प्रकाश आहे त्याची ओळख मला झाली आहे का?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे परमेश्वरा लोकांची प्रार्थना ऐक.”
१. हे परमेश्वरा तुझ्या लोकांची सेवा करण्यासाठी तू आपले पोप फ्रान्सिस,बिशप्स, धर्मगुरू, व व्रतस्थ ह्यांची निवड केली आहेस. त्यांनी तुझ्या प्रेमाचा संदेश जगातील सर्व लोकांना द्यावा म्हणून तू त्यांना शक्ती प्रदान कर म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ह्या उपवास काळात आपण प्रत्येकाने चांगले सहकार्य करावे तसेच कार्य परमेश्वराची गोड्वी गोरगरीब पर्यंत पोहोचवावी म्हणून त्या दयाधना कडे प्रार्थना करूया.
३. आपल्या पॅरिश मधील जे लोक आजारी आहेत, दुःखात आहेत, संकटात आहेत, त्यांस परमेश्वरिय साहाय्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जगभरात अनेक लोक करोना व्हायरसने बाधित झालेले आहेत, अशा सर्वांना परमेश्वराचा स्पर्श लागून त्यांचे ह्या रोगापासून मुक्तता मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.


1 comment: