Thursday 12 March 2020



Reflections for the Homily of 3rd SUNDAY OF LENT

(15-03-2020) By Br. Robby Fernandes










प्रायश्चित काळातील तिसरा रविवार



दिनांक: १५/०३/२०२०
पहिले वाचन:  निर्गम १७:३-७
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:१-२,५-८
शुभवर्तमान: योहान ४:५-४२


प्रस्तावना:

          आज आपण सर्वजण उपवास किंवा प्रायश्चित काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आज देऊळमाता आपल्याला देवावर संपूर्ण मनाने, हृदयाने व अंत:करणाने विश्वास ठेवायला बोलावत आहे. तसेच त्याच्या वचनांवर चालायला आमंत्रण करीत आहे.
          पहिल्या वाचनात परमेश्वर मोशेच्या मध्यस्थीने खडकातून पाणी काढून इस्रायली लोकांची तहान भागवतो. तर दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की, "ख्रिस्ताच्या मरणाने आपण नीतिमान झालो आहोत." पुढे शुभवर्तमानात आपल्याला शोमरोनी स्त्री व येशू मधील सार्वकालिक जीवनाविषयी झालेले संभाषण ऐकावयास मिळते. जर आपल्याला सार्वकालिक जीवनाची प्राप्ती करायची असेल तर, आपल्याला आपली परमेश्वरावरील श्रध्दा आणि विश्वास वाढवण्याची गरज आहे. जेव्हा आपण देवावरील श्रद्धा व विश्वास बळकट करतो तेव्हा, देवाच्या दैवी दानांचा व सामर्थ्यांचा आपल्याला आपल्या जीवनात अनुभव येत असतो. आजच्या मिस्साबालीदानामध्ये आपणास सार्वकालिक जीवनाची व दैवी दानांची देणगी प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन:  निर्गम १७:३-७

          पहिले वाचन हे निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेले आहे. अरण्यातून चालत असताना लोक पाण्यासाठी कासावीस झाले होते. त्यामुळे ते मोशे विरुद्ध कुरकुर करत होते. ते म्हणाले, आम्हांला मिसर देशातून बाहेर का आणलेस? आमची मुले-बाळे, गुरेढोरे ह्यांना पाण्यावाचून मारण्यासाठी तेथून तू आम्हांला येथे आणले आहेस का? तेव्हा मोशेने परमेश्वराकडे धाव घेतली व त्यांची व्यथा परमेश्वराला सांगितली. तेव्हा इस्रायली प्रजेची तहान भागवण्यासाठी परमेश्वराने खडकातून त्यांना पाणी प्यावयास दिले. अशाप्रकारे परमेश्वराने त्याच्या अस्तित्वाची त्यांना जाणीव करुन दिली.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:१-२,५-८

          दुसरे वाचन हे संत पौलाच्या रोमकरांस पत्र यातून घेतलेले आहे. संत पौल सांगत आहे की, विश्वासामुळे आपण सर्वजण परमेश्वरापुढे नीतिमान ठरवलेले आहोत. जेव्हा आम्ही स्वतःचे तारण करण्यासाठी अशक्त होतो, तेव्हा आम्ही पापी असताना देखील ख्रिस्ताने स्वतःचा प्राण आम्हांसाठी दिला त्याद्वारे त्याने असे दाखवून दिले आहे की, त्याचे आपल्यावर खूप प्रेम आहे.

शुभवर्तमान: योहान ४:५-४२

          आजचे शुभवर्तमान योहानाच्या पुस्तकातून घेतलेले आहे. योहान आपल्यासमोर एक आगळ्यावेगळ्या दुष्टाचे चित्रीकरण करत आहे. जिथे येशू ख्रिस्त व शोमरोनी स्त्री व त्यांच्या मधील संभाषण आपल्या समोर मांडत आहे. येशू शोमरोनातील सुखार गावातून जात असताना; येशू याकोबाच्या विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी येतो. त्याच ठिकाणी शमरोनी स्त्री पाणी भरण्यासाठी येते. त्याच वेळेस येशू त्या शोमरोनी स्त्रीला जिवंत पाण्याविषयी सांगतो व "हे जिवंत पाणी कोणी पिईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही" आणि येशू  पुढे म्हणतो, "मी दिलेले पाणी अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल. त्या पाण्यामुळे त्याला अनंतकाळचे  जीवन मिळेल." अशापकारे येशूने स्वतः कोण आहे हे उघडपणे सांगितले. तेव्हा तिने आपली पाण्याची घागर तशीच विहिरीजवळ सोडून परत गावात जाऊन येशूविषयी लोकांना सांगितले व लोक येशूला भेटावयाला आले.

मनन चिंतन:

          ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आपण सर्वजण प्रायश्चित्त काळाच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आहोत. परमेश्वर आपणा सर्वांना स्वतःच्या हृदयाची तयारी करावयास अजून एक संधी देत आहे. परमेश्वराला आपल्या तन-मन-धनामध्ये घेण्यास व पश्चातापी जीवन जगण्यास बोलावत आहे. आपण प्रायश्चित काळाची सुरुवात आपल्या कपाळाला राख लावून केली. कारण आपण राखेद्वारे स्वतःला बजावून सांगतो की, आपण सर्वजण नश्वर आहोत, मातीचा भाग आहोत. तसेच ह्या प्रायश्चित काळात आपण तीन गोष्टींवर मोठ्या प्रमाणावर भर द्यायला देऊळ माता सांगत आहे. ती म्हणजे प्रार्थना, उपवास व दानधर्म.
           असं म्हणतात की, 'जेव्हा आपण एक पाऊल उचलून देवाकडे जातो तेव्हा देव आपल्या जवळ येण्यासाठी नव्यानव पावले उचलतो.' पण आजच्या वाचनातून आपल्याला असे दिसून येईल की, परमेश्वर स्वतः हरवलेल्या त्याच्या लेकरांजवळ येण्यासाठी शंभर पावले उचलतो. हेच चित्रीकरण आपण शोमरोनी स्त्री व येशू यांच्या दृश्यातून आपल्याला पाहायला मिळते. आज देऊळमाता आपणासमोर शोमरोनी स्त्रीचा दाखला ठेवत आहे.
          यहुदी लोक शोमरोनी लोकांचा फार तिरस्कार करत असत. कारण ते एका देवाची पूजा न करता अनेक देवाची पूजा करत असत. तसेच त्यांनी इतर लोकांशी लग्ने जुळवून घेत. त्यामुळे इस्त्रायली लोक त्यांना तुच्छ मानीत असत. शोमरोनी लोकांना स्वतःची अस्मिता नव्हती, खरे रूप नव्हते. त्यांना यहुदी लोक एका वस्तू समान मानायचे किंवा वागणूक द्यायचे. हे सर्व शोमरोनी स्त्रीला माहीत होते. म्हणून ती म्हणते, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्री जवळ प्यावयास पाणी मागता हे कसे? (योहान ४:९)  येथे येशू शोमरोनी लोकं जी हरवलेली मेंढरे आहेत, त्यांना शोधावयास आला होता. कारण ती देवापासून अलिप्त झाली होती, बहकून गेली होती. या ठिकाणी येशू स्वतः येऊन शोमरोनी स्त्री बरोबर वार्तालाप करत आहे व येशू दोन गोष्टींची प्रचिती करून देत आहे. ते म्हणजे, एक देवाचे दान म्हणजे काय? आणि दुसरे म्हणजे येशू स्वतःची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहे. या दोन गोष्टी समजल्या तर त्याने तिला जिवंत पाणी दिले असते. हे जिवंत पाणी म्हणजे, ‘सार्वकालीक जीवन’.
          हे सार्वकालीक जीवन केव्हा प्राप्त होईल? जेव्हा आपण प्रार्थना करतो, बायबल वाचतो, मिस्सामध्ये येशूच्या शरीराचे सेवन करतो. तसेच परमेश्वराजवळ स्वतःच्या अपराधांची क्षमा मागतो तेव्हा आपल्याला आपल्या जीवनात सार्वकालीक जीवनाची प्राप्ती होते. हा उपवास काळ आपल्या सर्वांना आणखी एक संधी देतो. ती संधी म्हणजे जिवंत पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी तसेच सार्वकालीक जीवन मिळविण्याची!
          अशाप्रकारे त्या शोमरोनी स्त्रीला समजून येते की, तिला कशाची तहान लागली होती? ती तहान म्हणजे परमेश्वराच्या प्रेमाची. ह्या ठिकाणी खुद्द प्रभू येशू मानवी ह्रदयाची तहान आहे आणि जो कोणी त्याला पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही.  (योहान ४:१४)  ही तहान फक्त  ख्रिस्तच भागवू शकतो. हे ख्रिस्त स्वतः आपल्याला स्पष्ट करून देत आहे.
          येशूने तिला तिच्या नवऱ्या विषयी विचारले असता तिने म्हटले की, "मला नवरा नाही." तर ज्ञानी किंवा विद्वान असे म्हणतात की, येशू ख्रिस्त तिच्या नवऱ्याविषयी नाही तर पाच देवा विषयी बोलत होता.  (निर्गम ३:८) शोमरोनी लोक बाबिलोनच्या बंदिवासातून परत येताना त्यांच्यासोबत त्यांनी पाच देव आणले व त्यांनी त्या पाच देवांची पूजा केली. पण त्यापैकी कुठल्याही देवाने तिला जीवनात दान दिले नाही. परंतु येशूने फक्त जीवनच नव्हे तर, सार्वकालिक जीवन देण्याचे वचन दिले. हे केव्हा शक्य आहे जेव्हा आपण येशूला खऱ्या देवाचा पुत्र म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वीकार करतो. तसेच सत्याने व आत्म्याने एकाच देवाची उपासना करतो.

बोधकथा:

          काही वर्षांपूर्वी एक माणूस राजासाठी नदीतून पाणी वाहत असे. त्या मनुष्याजवळ दोन मातीचे मडके होते. त्यामधील एक चांगलं तर दुसरे भेगाळलेलं होत. त्याने आणलेल्या पाण्याच्या प्रमाणात त्याला राजाकडून पैसे मिळायचे. दुर्दैवाने त्याच्या तडा गेलेल्या मडक्यातून बरेचसे पाणी वाया जायचे. या कारणास्तव त्या मनुष्याला कमी पैसे milaayache. पण हे सर्व त्या तडा गेलेल्या भांड्याला माहित होते. त्यामुळे त्या भांड्याला वाईट वाटत असे. तेव्हा ते भांडे त्याच्या धन्याला म्हणते, “धनी मला तडा गेला आहे, त्यामुळे मी जास्त पाणी आणू शकत नाही. मला तुम्ही टाकून द्या व माझ्या ऐवजी एक नविन भांडे ठेव, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबदल्याचे फळ मिळेल.” पण त्या मनुष्याने त्या भांड्याला म्हटले नाही. पुढच्या वेळेस तू तुझ्या जवळची बाजू काळजीपूर्वक पहा. तडा गेलेले भांडे त्याच्या बाजूला सौंदर्य पाहून आश्चर्यचकित झाले. तेव्हा त्या मनुष्याने त्याला  समजावले. मला माहित होतं की तुला तडा गेला आहे.  तुझ्यातून मला कमी पाणी मिळते. पण मी तुझ्या बाजूने फुलांच्या बिया पेरल्या होत्या व तू त्यावर पाणी शिंपडले. तुझ्यामुळे राजाच्या राजवाड्याचा रस्ता शुशोभित झाला आहे. हे सर्व ऐकल्यावर त्या तडा गेलेल्या भांड्याला चांगले वाटले.
          आपल्याला आजच्या वाचनातून तीन प्रकारच्या व्यक्ती पहायला भेटतात. ते म्हणजे येशू, शोमरोनी स्त्री आणि मोशे. या तीन प्रकारच्या व्यक्तींची तुलना आपण गोष्टींमधील पाणी आणणार्‍या व्यक्तीशी, चांगल्या भांड्याशी, तसेच तडा गेलेल्या भांड्याशी करू शकतो. पाणी आणणारा व्यक्ती येशू. चांगले भांडे मोशे व तडा गेलेले भांडे म्हणजे शोमरोनी स्त्री, जी परमेश्वरापासून दूर गेली होती. पण जेव्हा येशूच्या सानिध्यात ती येते तेव्हा तिच्या जीवनाचे परिवर्तन होते. ज्या शोमरोनी स्त्रिच्या भांड्याला तडा गेला होता, त्याच शोमरोनी स्त्रीने परमेश्वराचा अनुभव स्वतःला न ठेवता तिने येशूचा संदेश व त्याची ओळख संपूर्ण गावाला दिली. अशाप्रकारे शोमरोनी स्त्रीने खऱ्या देवाची ओळख संपूर्ण लोकांना दिली.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.”

१. आपल्या ख्रिस्तसभेचे दूरा वाहणारे पोप फ्रान्सिस, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी व व्रतस्थ यांना परमेश्वराने शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य द्यावे व योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याची शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे कोणी जीवनात निराश आहेत, हताश आहेत, अशांना परमेश्वराच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व आपले ख्रिस्ती जीवन त्यांनी विश्वासाने जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३ जे कोणी देवापासून दुरावलेले आहेत; त्यांना ह्या प्रायश्चित काळात देवाने स्पर्श करावा व त्यांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊन देवाजवळ परत यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. या प्रायश्चित काळात आपण आपल्या जीवनाला एक नवीन वळण देऊन परमेश्वराच्या शाश्‍वत जीवनाच्या पाण्याचा आस्वाद दुसऱ्यांना द्यावा व ह्याद्वारे परमेश्वराची प्रचिती आपल्या जीवनाद्वारे दुसऱ्यांना व्हावी म्हणून आपण प्रभुचरणी प्रार्थना करूया.
५. आज जग बर कोरोना व्हायरस नावाच्या आजाराने हाहाकार माजला आहे. सर्वत्र लोकाच्या मनात भीतीची भावना निर्माण झाली आहे. अश्या ह्या गंभीर परीरीस्थितीत परमेश्वरी सहाय्याने औषध मिळावे व ह्या आजारापासून मुक्त्तता मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, वैयक्तिक व कौटुंबिक हेतू प्रभू चरणी मांडूया.


No comments:

Post a Comment