Friday 25 December 2020

                          Reflection for the Feast of Holy Family (27/12/2020) by Fr. Benhur Patil




पवित्र कुटुंबाचा सण

दिनांक: २७-१२-२०२०

पहिले वाचन : बेनसिराची बोध वचने ३:२-६;१२-१४

दुसरे वाचन : कलस्सैकरांस पत्र ३:१२२१

शुभवर्तमान : लुक २:२२४०



प्रस्तावना:

आज देऊळमाता बाळ येशू, पवित्र मारिया आणि संत योसेफ, ह्या पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहे. कुटुंब ही पहिली शाळा आणि ख्रिस्ती सामाज्याची मुलभूत संस्था आहे. आपला समाज चांगला बनवायचा असेल तर प्रत्येक कुटुंब हे चांगलं आणि आदर्शवत असणे गरजेचे असते. नाझारेथच्या कुटुंबाचा आदर्श आपणासमोर ठेऊन, सर्व ख्रिस्ती कुटुंबे पवित्र बनावीत म्हणून आजचा सण आपणास विशेष आव्हान करत आहे. त्यासाठी परमेश्वरी कृपा व प्रेरणा आपल्या कुटुंबाना मिळावी म्हणून आपण खास प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन : बेनसिराची बोध वचने ३:२-६;१२-१४

आजचे पहिले वाचन बेनसिराच्या पुस्तकातून घेतलेले आहे. मुलांनी आई-वडिलांना मान दयावा आणि देवाने दिलेली आज्ञा पाळवी असा बोध ह्या पुस्तकात केलं आहे. त्याचप्रमाणे, जी मुले आई-वडिलाचा आदर करतात आणि त्यांच्या आज्ञेत राहतात तेव्हा त्यांना देव कश्याप्रकारे आशीर्वादित करतो आणि त्यांचे जीवन कसे सुफळ आणि कृपादायी करतो त्याच वर्णन आजच्या वाचनांत पाहायला मिळते.

दुसरे वाचन : कलस्सैकरांस पत्र ३:१२२१

आदर्शवत आणि पवित्र कौटुंबिक जीवन जगणे हि साधी-सुधी गोष्ट नाही. त्याच्यासाठी कुटुंबातील प्रत्येक लहान-मोठ्या सभासदाने आप-आपली वैयक्तिक जबाबदारी पार पाडणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे आपलं जीवन ख्रिस्ती मूल्यांनी आणि शिकवणुकीने जगणे हेही तितकेच गरजेचे असते. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल, चांगलं आणि पवित्र ख्रिस्ती कुटुंब जगण्यास सुंदर कानमंत्र देत आहे.

शुभवर्तमान : लुक २:२२४०

          ह्या शुभवर्तमानात संत लूक मरिया आणि योसेफाने येशूला मंदिरात समर्पण केले व आपली जबाबदारी पूर्ण केली ह्याबद्दल सांगत आहे. यहुदी नियमानुसार प्राणी किंवा मनुष्याच्या उदरातून येणारे पहिले अर्पण देवाला समर्पण करावे लागत असे. पण मनुष्याच्या बाबतीत ह्या नियमातून सुटका करण्यासाठी होमार्पणकरावे लागे. म्हणून येशूच्या बाबतीत योसेफ व मरीयेने पारव्याचे अर्पण केले. पारवा हे आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या लोकांचे अर्पण होते. ह्यावरून आपल्याला असे दिसते की ते अतिशय गरीबीचे जीवन जगले. पण त्याबद्दल ते असंतुष्ट नव्हते उलट त्यांनी देवाचे आभार मानले. देवाने त्यांचे दु:ख व कष्ट कमी करण्यासाठी काही चमत्कारी कृत्ये केले नाही तर त्या परिस्थिती अनुभवण्यास भाग पाडले.

मनन चिंतन:

प्रत्येक वर्षी ख्रिस्तसभा २५ डिसेंबर नंतरच्या रविवारी पवित्र कुटुंबाचा सण साजरा करते. ह्यामागचे कारण म्हणजे येशू ख्रिस्त, परमेश्वर पित्याचा एकुलता पुत्र, हा मारिया आणि योसेफाच्या कुटुंबात जन्मास आला. आणि त्याद्वारे कुटुंब हि देवाने निर्माण केलेली सुंदर संस्था आहे हे सिद्ध केलं. नाझारेथच्या कुटुंबाला आपण पवित्र कुटुंब म्हणून संबोधतो, त्याच मुख्य कारण म्हणजे येशू जो खरा आणि पवित्र देव हा मनुष्य झाला, आणि ह्या कुटुंबाचा सभासद म्हणून राहिला. त्याने आपल्या पावन स्पर्शाने सर्व कुटुंब प्रकाशमान व पवित्र केली.

          परंतु, मरिया आणि योसेफ ह्यानीसुद्धा एक पवित्र आणि आदर्श कुटुंबाला साजेल अस जीवन जगले. ज्या कुटुंबात ईश्वरभक्ती असते ते देवाला नेहमीच प्रिय असत. ज्या कुटुंबातील सभासद एकमेकांवर प्रेम करतात, एकमेकाच्या आज्ञेत राहतात, शांतीने आणि सौख्याने राहतात, त्यावर ईश्वर संतुष्ट असतो. नाझारेथच्या ह्या कुटुंबात हे सर्व आपल्याला पाहायला मिळते. मारिया आणि योसेफ हे देवभिरू आणि जबाबदार होते. योसेफ प्रामाणिकपणे सुताराचा धंदा करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतो, तर मारिया योसेफाच्या आज्ञेत राहून, दैनदिन काम करून घर सांभाळते. ते दोघेही आई-बाप म्हणून येशूला ज्ञानात, शरीराने, आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढण्यास मदत करतात. येशूने सुद्धा आपल्या आई-वडिलांचा सन्मान केला. तो नेहमीच त्यांच्या आज्ञेत राहिला व घरकामात हातभार लावला. म्हणूनच आज हा सण साजरा करत असताना ख्रिस्तसभा पवित्र कुटुंबाचा आदर्श आपणासमोर ठेवत आहे आणि आपलीही कुटुंबे पावन करण्यास आमंत्रण करत आहे.

माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या प्रत्येकाचा जन्म हा कुटुंबामध्ये झालेला आहे. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्यातरी कुटुंबाचे घटक आहोत, सदस्य आहोत. पण आपल्या कुटुंबाला आपण पवित्र कुटुंब म्हणू शकतो का? आज आमचं कुटुंब समाज्यात एक आदर्श कुटुंब आहे अस म्हणू शकतो का? आजकाल आपण कुटुंबात दृष्टीक्षेप टाकला, त्याच निरीक्षण केलं तर आपल्याला आढळून येईल कि आपल्या कुटुंबात ऐक्य नाही, शांती नाही आणि प्रेम नाही. आपल्या कुटुंबात ख्रिस्ती मूल्यांना वाव नाही आणि प्रार्थनेला स्थान नाही. आई-वडील नोकरीमुळे आपल्या मुलांना आपलं अमूल्य वेळ देऊ शकत नाही. ते एक माता-पिता म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यात मागे पडत आहेत. परिणामी आपल्या मुलामध्ये सुसंस्कृतपणा आणि सदगुणी जीवनाचा अभाव दिसत आहे.

प्रिय आई-वडिलानो, जर तुम्हाला वाटत असेल कि आपली मुले सुसंस्कृत बनावीत आणि म्हातारपणात आपलं आधार बनावीत, तर आज तुम्ही आपली जबाबदारी चोखपणे पार पडली पाहिजे. कुटुंब हि पहिली शाळा आहे आणि माता-पिता हे पहिले शिक्षक आहेत. तुम्ही आपल्या सदगुणी जीवनाद्वारे आपल्या मुलावर चांगले संस्कार केले पाहिजेत. त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्याचं संगोपन केलं पाहिजे. त्यांच्यात प्रार्थनेची आवड निर्माण केली पाहिजे. मराठीत अस म्हणतात कि, “विहिरीतच पाणी नसेल तर ते पोहऱ्यात कस येणार”. त्याचप्रमाणे जर आई-वडिलांच्या जीवनात सदगुणांना स्थान नसेल, ते सत्शील नसतील तर त्याची मुले तरी कसे चांगले, जबाबदार आणि आदर्शवत होणार.

आज आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करत असताना आपली कुटुंबेहि पवित्र बनावीत म्हणून विशेष प्रार्थना करूया.     

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमच्या कुटुंबाचे संरक्षण कर.

१. आपली देऊळमाता विश्वभर ख्रिस्ताचे प्रेम पसरवत आहे. हे प्रेमाचे कार्य पुढे नेण्यास त्यांना परमेश्वराची कृपा मिळावी व अधिका-अधिक लोकांना ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. कुटुंब हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याचे महत्व जाणून कुटुंबाचे पालन पोषण करण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपल्या प्रत्येकांच्या कुटुंबात शांतीप्रेमऐक्य सतत नांदावे व आपण त्यागमय जीवन जगून आपले कुटुंब सदासर्वदा सुखी रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जी कुटुंबे उध्वस्त झाली आहेतअशांना पवित्र कुटुंबाचे मार्गदर्शन लाभून त्यांना समजूतदारपणाचेशांतीचे व प्रेमाचे वरदान लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपल्या वृद्ध आईवडिलांना आपल्या प्रेमाचामायेचा व करुणेचा स्पर्श व्हावा व त्यांना आनंदी ठेवण्यास परमेश्वराने आपणास कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.  

No comments:

Post a Comment