Wednesday 23 December 2020

     Reflection for the Homily of Christmas Vigil Mass (24/12/2020) by Br. Gilbert Fernandes





ख्रिस्त जयंतीनाताळ

मध्यरात्रीची मिसा

दिनांक: २४/१२/२०२०

पहिले वाचन: यशया ६२:१-५

दुसरे वाचन: प्रेषितांची कृत्ये १३:१६-१७, २२-२५

शुभवर्तमान: मत्तय १:१-२५




प्रस्तावना: 

आज आपण प्रभू येशू ख्रिस्त, आपला मसीहा आणि तारणारा याच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करत आहोत. संदेष्ट्यानी भाकीत केले होते की एक कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव इम्मॅन्युएल आणि शांतीचा राजा असे असेल, आणि त्याच अभिवचनाची पूर्णता साजरी करण्यसाठी आपण इथे एकत्र जमलो आहोत. येशू ख्रिस्ताचा जन्म हा या अंधकारमय, निराशामय, भीतीदायक आणि दहशतवादी जगात प्रकाशाचे प्रवेशद्वार म्हणून आपण साजरा करतो. हा एक आनंदाचा उत्सव आहे. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे हा एक असा दिवस आहे जेव्हा देव पिता आपल्या आत्म्यात पुत्राद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रगट होतो. हे एक मानवतेसाठी देवाचे स्वतःचे प्रकटीकरण आहे. हा थियोफनीचा एक प्रकार आहे, म्हणजेच देव मनुष्यास स्वतःला प्रकट करतो. इस्त्रायलच्या इतिहासात, देव इस्त्रायलचा बचाव करणारा देव म्हणून अनेक मार्गांनी प्रगट झाला. त्याने त्यांना इजिप्तच्या गुलामगिरीतून वाचवले. आणि शेवटी त्याने आपल्या पुत्राला या जगात पाठवून संपूर्ण मानवजातीचे तारण केले.  देवाने मानवजातीवरील  प्रेम ख्रिस्ताद्वारे प्रकट केले आहे.

           आजच्या ह्या प्रेममय रहस्यात सहभागी होत असतानाआपण प्रत्येकाने ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव घेऊनहा अनुभव दुसऱ्यांना देण्यासइतरांमध्ये ख्रिस्त पाहण्यास आणि इतरांसाठी ख्रिस्त होण्यास विशेष कृपा शक्ती आपणांस लाभावी म्हणून बाळ येशू चरणी मोठ्या विश्वासाने व नम्रतेने प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: यशया ६२:१-५

          आजचा हा उतारा यशया प्रवक्त्याच्या काव्यमालेतील एक कविता आहे. यशया ४२:१४ मध्ये परमेश्वर म्हणतो, “मी दीर्घकाळ मौन धरिले आहे.” तसेच ४९:१४ मध्ये सियोन म्हणते, “परमेश्वराने माझा त्याग केला आहेतो मला विसरलेला आहे.” आणि हे दीर्घकालीन मौन परमेश्वराने जणू आजच्या वाचनात (६२:१-५) सोडलेले आहे. आणि आता सियोनमधील लोकांच्या जीवनात वैभवशाली बदल घडवून आणल्याशिवाय मी त्यांच्याशी बोलणे थांबवणार नाही असे वचन परमेश्वर त्यांना देतो. जरी हे लोक त्यांच्या पापांद्वारे व कठोर हृदयाने परमेश्वराला क्रोधित करताततरीसुद्धा परमेश्वर त्यांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना पवित्र करण्यासाठी सतर्क आहे. जरी लोकदेव आणि त्याचे मार्ग सोडून गेलेतरी तो त्यांना विसरणार नाही किंवा सोडणार नाही. तो त्यांच्याशी बोलणे सुरु ठेवेल आणि अर्थपूर्ण संबोधाने त्यांना संबोधित करेल. असे ह्या उताऱ्यात सांगितलेले आहे.

दुसरे वाचन: प्रेषितांची कृत्ये १३:१६-१७, २२-२५

          दुसऱ्या वाचनात संत पौल देवाच्या निवडलेल्या लोकांवर देवाची दया कशी झाली याचा इतिहास सांगतो. आपल्या बहुप्रतीक्षित मसीहाविषयीची भविष्यवाणी पूर्ण करून देवाने त्याच्या निवडलेल्या इस्त्रायल लोकांवर दया दाखविली. त्याने आपला पुत्र, तारणहार आणि दाविदाचा वंशज म्हणून पाठविला.

शुभवर्तमान: मत्तय १:१-२५

          आजच्या शुभवर्तमानात येशूच्या वंशावळीचा आढावा घेतला आहे आणि संदेष्ट्याने भविष्यवाणी केल्यानुसार दाविदामार्फत अब्राहमच्या वंशातील व्यक्तींचा वंश शोधून काढला आहे. त्यानंतर बेथलेहेममधील आपला तारणहार म्हणून त्याच्या जन्माचे वर्णन केले आहे आणि हे सर्व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने शक्य झाले आहे. सर्वप्रथम देवाने देवदूताला पाठवून योसेफाच्या शंकांचे निराकरण कशे केले आहे हे देखील या शुभवर्तमानात दिसून येते. त्यानंतर त्याने योसेफाला धीर दिला आणि त्याच्या मुलाचे नाव येशू ठेवण्यास सांगितले. येशू हे नाव ‘येहशुआ’ या इब्री भाषेचे ग्रीक रूप आहे, याचा अर्थ “परमेश्वर मोक्ष आहे.” ज्याप्रमाणे पहिल्या यहोशवाने (मोशेचा उत्तराधिकारी) इस्त्रायल लोकांना त्यांच्या शत्रूंपासून वाचवले, त्याचप्रमाणे दुसरा यहोशवाने (येशू) त्यांना त्यांच्या पापांपासून वाचवले.

मनन चिंतन:

          आज आपण ह्या ख्रिस्तजयंती किंवा नाताळचा सण साजरा करण्यास किंबहुना, ‘देवशब्द’ मानव झालाहे रहस्य साजरं करण्यासाठी मोठ्या विश्वासाने व श्रद्धेने येथे एकत्र जमलेलो आहोत.

एकदा एका जंगलात एक मिठाची बाहुली राहत होती तिने समुद्र कसा दिसतो हे पाहिले नव्हते. समुद्र कसा असतो, समुद्राच्या पाण्याची चव कशी असते हे सर्व पाहण्याची इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. ती समुद्राच्या शोधात निघाली. अनेक दिवस आणि रात्र तिने ते जंगल पार करण्यात घालवले आणि एके दिवशी रात्रीच्या शांतसमयी ती समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन पोहचली. समुद्र बघताच तिला खूप आनंद झाला. हे प्रिय सागरा तू किती सुंदर आहेस. मला तुझ्याबरोबर खेळायचं आहे असे म्हणत ती बाहुली समुद्रात चालत गेली आणि थोड्याच वेळात ती पाण्यात विरघळून गेली व समुद्राशी एक झाली.

स्वत: परमेश्वराला सुद्धा मनुष्याच्या प्रेमाची व संगतीची ओढ वाटू लागली. माणसे काय करतात? त्यांचे जीवन कसे आहे? त्यांच्या जीवनातील सुख-दु:ख, वेदना, आनंद ह्या सर्वांचा अनुभव घेण्याची ईच्छा परमेश्वरामध्ये निर्माण झाली आणि मानवजातीच्या प्रेमाची चव घेण्यासाठी तो स्वत: मानव होऊन भूतलावर आला आणि त्या मिठाच्या बाहुलीप्रमाणे मानवाशी एकरूप झाला.

 नाताळच्या दिवशी देव आपल्याला त्याचा पुत्र येशू ख्रिस्त अमुल्य दान म्हणून देतो. ‘इम्मॅन्युएल’ म्हणजे “देव आपल्याबरोबर आहे” हाच ख्रिस्तजयंतीचा सर्वात महत्त्वाचा आणि खरा अर्थ आहे.

          मत्तयचं शुभवर्तमान योसेफाच्या दृष्टीकोनातून येशूच्या जन्माची गोष्ट सांगते. मरीयेचं योसेफासी वाग्दान झाल्यावर योसेफाला समजले की मरिया गरोदर आहे. पहिल्या शतकातील यहुदी संस्कृतीत जेव्हा एखाद्या जोडप्याचं वाग्दान होत असे, तेव्हा विवाहाच्या   दिवसाआधीचकायदेशीररित्या ते जोडपे विवाहित मानले जात असे. तो एक विवाह कराराचा भाग होता. या कराराचं उल्लंघन व्यभिचार मानला जात असे. व्यभिचार सिद्ध झाल्यास मृत्यूची शिक्षा दिली जात असे. मोशेच्या कायद्यात योसेफाचे हक्क होते, परंतु त्याने मरीयेच्या संरक्षणासाठी विवाहाचा करार मोडण्याच्या आपल्या योजनेत विचारपूर्वक निर्णय घेतला. योसेफ आणि मरीयेने या विलक्षण परिस्थितीचा सामना केल्यामुळे या पवित्र लोकांबद्दल आणि देवावरील त्यांचा विश्वास याबद्दल आपण बरेच काही सांगू शकतो.

          स्वप्नात देवदुताने योसेफाला जो संदेश दिला त्याद्वारे मरीयेच्या बाळाबद्दल आणि देवाच्या योजनेत त्या बाळाच्या भूमिकेविषयी अनेक अशी महत्त्वपूर्ण धार्मिक माहिती दिली गेली. त्याचा पवित्र आत्म्याच्या कृपेने जन्म होईल, त्याचे नाव येशू असे ठेव, ज्याचा हिब्रू भाषेत अर्थ आहे “देव तारतो.” तो यशयाच्या भविष्यवाणीची पूर्तता होईल. तो इम्मॅन्युएल असेल, “आम्हांबरोबर देव” हेच रहस्य आहे. देव मनुष्य होऊन ह्या भूतलावर अवतरला. योसेफाने सर्व काही परमेश्वराच्या दूताच्या सांगण्याप्रमाणे केले. त्याने मरीयेला त्याची पत्नी म्हणून स्वीकारले आणि तिच्या उद्रातील बालकाला स्वतःचेच बाळ म्हणून स्वीकारले. जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा योसेफाने त्या देवदूताच्या मार्गदर्शनाचे पालन केले. आपल्या तारणासाठी देवाने केलेल्या योजनेत आपल्याला मरीयेने केलेले सहकार्य वारंवार आठवते. आजची उपासना आपल्याला योसेफाच्या भूमिकेची आठवण करून देते, जी येशूच्या जन्माच्या योजनेसाठी महत्त्वपूर्ण होती.

          आज आपल्याला दुसऱ्या व्यक्तींमध्ये येशूचा शोध घेण्याची गरज आहे. ख्रिस्तजयंतीच्या ह्या दिवसांत आपणही त्या तीन राज्यांप्रमाणे येशूला सर्वात मौल्यवान भेट दिली पाहिजे. आपण येशूला सर्वात संभव नसलेल्या ठिकाणी आणि सर्वात त्रासदायक लोकांमध्ये- जे लोक संकटात, गरिबीत किंवा भीतीने जगतात अशा लोकांमध्ये शोधले पाहिजे. ख्रिस्तजयंतीचा संदेश असा आहे की जर आपण येशूला योग्य ठिकाणी- रस्त्यावर, झोपडपट्ट्यांमध्ये, अनाथाश्रमांमध्ये, रुग्णालयात शोधले तर येशू आपल्याला खरोखर सापडेल. आणि त्याची सुरुवात आपण आपल्या घरातून आणि कामाच्या ठिकाणी केली पाहिजे. आपण अशा लोकांमध्ये पाहण्याची गरज आहे ज्याकडे जगाने दुर्लक्ष केले आहे विशेषकरून बेघर, आजारी, व्यसनी, अप्रिय लोक, आपल्याकडील भिन्न संस्कृतीचे लोक. आपल्या जगातील पिडीत व्यक्तींसाठी आशा आणि मुक्तीचा संदेश आपण बनले पाहिजे. त्यांना त्यांच्या दुःखातून मुक्त करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. येशू आपल्याला त्याला शोधण्यासाठी मेंढपाळांसारखे आणि सुज्ञ माणसांप्रमाणे व्हायला आव्हान करत आहे, ज्यांनी येशूचा शोध घेण्यासाठी त्यांच्या भीतीवर मात केली व लांब पल्लाचा प्रवास केला आणि मग त्यांना ख्रिस्त, तारणाऱ्याचा खरा आनंद अनुभवता आला. आज आपल्या तारणकर्त्याला आपल्या जीवनात प्रवेश देण्याची गरज आहे. पोप अलेक्झांडर म्हणतात की, “या ख्रिस्तजयंतीच्यावेळी येशू जगभरातील हजारो गोठ्यांमध्ये जन्माला आला, परंतु माझ्या हृदयात जन्माला नाही तर मला काय फायदा?” तर या ख्रिस्तजयंतीच्यावेळी आपल्या हृदयात ख्रिस्ताला स्वीकारुया. आपण त्याग आणि नम्रतेची भावना आपल्या जीवनात विकसित करूया. दीनांतअनाथातआणि दुःखात असलेल्या लोकांत ख्रिस्त पाहण्यास आपणांस कृपा व सामर्थ्य लाभावे म्हणून काही वेळ शांत राहून त्या गव्हाणीतील ख्रिस्ताकडे दयेची प्रार्थना करूया.    

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे बाळ येशूआमची प्रार्थना ऐक.

१) अखिल ख्रिस्त सभेची काळजी घेणारे आपले परमगुरुस्वामीसर्व महागुरूधर्मगुरू आणि व्रतस्थ बंधू-भगिनींनी गव्हाणीतील बाळ येशूची सुवार्ता आपल्या सेवाभावी कार्याद्वारे इतरांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रभूने त्यांना सहाय्य करावे म्हणून प्रार्थना करूया. 

२) आपल्या देशाचा कारभार पाहणाऱ्यांना समाज्याच्या कल्याणासाठी व विकासासाठी झटण्यास आणि विशेषकरून चांगला निर्णय घेण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) आमच्या उद्धारासाठी ख्रिस्त ज्याप्रमाणे स्वतः नम्र होऊन मानव झाला. त्याचप्रमाणे आम्ही सुध्दा नम्र व उधार होऊन गरजवंतांना मदतीचा हात देण्यास सतत तयार राहायला लागणारी कृपा बाळ येशूचरणी मागुया.

३) प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने एकमेकाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन एकमेकांस सहाय्य करावे व गव्हाणीतील येशू बाळाचा प्रेमाचादयेचा आणि क्षमेचा संदेश आपल्या आचरणात आणावा म्हणून प्रार्थना करूया.

४) आज जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेतजे साथीदाराच्या शोधात आहेत त्यांच्या मनोकामना बाळ येशूने पूर्ण कराव्यात व जे लग्नाची किंवा दीक्षाविधी स्विकारण्यासाठी तयारी करीत आहेत अशांवर प्रभूने आपल्या पवित्र आत्म्यचा वर्षाव करावा म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया. 

५) आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक व्यक्तीला नाताळ निमित्ताने विशेष आशीर्वाद मिळावाआमच्या प्रत्येकाच्या जीवनात खऱ्या अर्थाने ख्रिस्ताने जन्म घ्यावा म्हणून विशेष प्रार्थना करुया.  

६) थोडा वेळ शांत राहून आपल्या सामाजिक व वैयक्तिक मागण्या बाळ येशूचरणी ठेवूया.






No comments:

Post a Comment