Thursday 11 March 2021

       Reflection for the Homily of 4th Sunday of Lent (14/03/2021) By Br. Gilbert Fernandes




प्रायश्चित काळातील चौथा रविवार

दिनांक: १४-०३-२०२१

पहिले वाचन: २ इतिहास ३६:१४-१६,१९-२३

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र २:४-१०

शुभवर्तमान: योहान ३:१४-२१




प्रस्तावना:

          आज आपण प्रायश्चित काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. ह्या चौथ्या रविवारला “लेतारे रविवार” म्हणतात. ह्या लॅटिनमधील ‘लेतारे’ शब्दाचा अर्थ ‘आनंद करा!’ असा आहे. प्रायश्चित काळाच्या मध्यभागी आपण पोहोचलेलो असताना ख्रिस्तसभा आपल्याला आनंद करण्यास आमंत्रित करते. “येरुशलेमेबरोबर आनंद करा, तिजवर प्रेम करणारे तुम्ही सर्व तिजमुळे उल्लासा; तिजसाठी शोक करणारे तुम्ही सर्व तिजबरोबर अत्यंत हर्षित व्हा” (यशया:६६:१०). आपण आनंद केला पाहिजे कारण परमेश्वराने त्याच्या प्रितीद्वारे पापी मानवतेचे तारण केले. परमेश्वराचे प्रेम सतत उदार आणि त्यागमय आहे. ‘देवाने जगावर एवढी प्रिती केली की, त्याने आपला एकलुता एक पुत्र दिला’ (योहान:३:१६). आजची वाचने आपल्याला सांगतात की, आपले तारण ही दयाळू परमेश्वराची देणगी आहे, जी येशू ख्रिस्त त्याचा पुत्र याने आपल्याला दिली आहे. ही वाचने आपल्याला ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने केलेली दया, कृपा आणि महान प्रिती यांची आठवण करून देतात. या प्रायश्चित काळातील चौथ्या आठवड्यात प्रवेश करत असताना ख्रिस्तसभा आपल्याला परमेश्वराच्या कृपेचा, दयेचा आणि प्रेमाचा अनुभव घेण्यास बोलावीत आहे. ख्रिस्ताच्या प्रेमाचा आणि दयेचा अनुभव, इतरांपर्यंत पोहचविण्यासाठी आपल्याला परमेश्वराची कृपा लाभावी म्हणून या मिस्साबलिदानात प्रार्थना करू या. 

सम्यक विवरण:

पहिले वाचन: २ इतिहास ३६:१४-१६,१९-२३

          परमेश्वराची आपल्या लोकांवर करुणा होती,परंतु येरुशलेमातील लोकांनी अमंगल कृत्यांचे अनुकरण करून घोर पापे केली होती आणि जे मंदिर परमेश्वराने येरुसलेमेत पवित्र केले होते ते त्यांनी भ्रष्ट केले. ह्या कारणास्तव परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला आणि देवाने त्यांना सिदकीयाच्या कारकिर्दीत, सत्तर वर्षे गुलामगिरीत ठेवले. हे सर्व केवळ त्यांच्या अविश्वासामुळे घडले. 

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र २:४-१०

          दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला सांगतो की, परमेश्वर इतका दयाळू आहे की त्याने येशू ख्रिस्ताद्वारे दान म्हणून आपल्याला अनंतकाळाचे तारण आणि अनंतकाळाचे जीवन दिले आहे. 

शुभवर्तमान: योहान ३:१४-२१

          आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की परमेश्वराने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त केवळ एका पापी राष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण जगाच्या तारणासाठी ह्या भुतलावर पाठविला. योहान:३:१६ मध्ये आपण वाचतो की देवाने आमच्या तारणासाठी आपला एकलुता एक पुत्र पाठवून आपल्यावरील त्याचे प्रेम, दया आणि करुणा व्यक्त केली. ज्याप्रमाणे परमेश्वराने मोशेद्वारे अरण्यात पितळेचा सर्प उभारून सर्पदंश झालेल्या व्यक्तींना बरं केलं त्याप्रमाणे तो आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला वधस्तंभावर उभारून संपूर्ण मानवजातीला त्यांच्या पापांपासून वाचविणार आहे कारण परमेश्वराचे मानवजातीवर अफाट प्रेम आहे. 

मनन चिंतन:

          प्रत्येक व्यक्ती देवाचा शोध घेत असते. प्रत्येक युगातील वेगवेगळ्या लोकांनी देवाला जाणून घेण्याचा आणि त्याला समजण्याचा प्रयत्न केला आहे. देवावर विश्वास नाही असे म्हणणारा नास्तिकसुद्धा वेगवेगळ्या प्रश्नांवर खोल विचार करून आणि परमेश्वराला शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न करूनच त्या दुःखद निष्कर्षावर पोहोचलेला आहे.

          आपण बहुतेक वेळा पाहिलेलं असेल किंवा अनुभवलेलं असेल जेव्हा एखाद छोट बाळ थकलेलं किंवा घाबरलेलं असतं तेव्हा ते आपल्या आई किंवा वडिलांकडे जाते आणि त्यांना ते उचलून घेण्यास सांगते. ते बाळ स्वतःहून खूप प्रयत्न करते पण त्याच्यासाठी आई किंवा वडील उंच असतात. त्या बाळाला उचलून घेण्यासठी आई किंवा वडिलांना खाली वाकणे गरजेचे असते. परमेश्वराचा शोध आणि त्याला भेटण्याची मानवाची इच्छा सुद्धा अशीच आहे. परमेश्वराला समजून घेण्यासाठी आणि त्याला भेटण्यासाठी आपले मानवी प्रयत्न अपुरे ठरतात. आपल्याला गरज आहे ती म्हणजे परमेश्वराने आपल्यापर्यंत पोहचून आपल्याला त्याच्या जवळ घेण्याची आणि परमेश्वर आपल्यापर्यंत त्याच्या पुत्राद्वारे पोहोचलेला आहे. परमेश्वराने आपल्या पुत्राद्वारे स्वतःला प्रकट करून दाखवून दिले आहे की त्याने आपल्यावर किती प्रेम केले आहे. ‘देवाने जगावर एवढी प्रिती केली की, त्याने आपला एकलुता एक पुत्र दिला.’ हे शब्द प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवन आणि त्याच्या संपूर्ण शुभवर्तमानाचा सारांश आहे.

          परमेश्वर नेहमी आपल्यावर प्रेम करत असतो. हे प्रेम काय आहे? बायबलमध्ये परमेश्वराच्या प्रेमाचा अर्थ काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ग्रीक भाषेत प्रेमाला तीन वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत. ग्रीक भाषेत १. इरोस म्हणजे स्त्री-पुरुष यांच्यातील प्रेम किंवा वैवाहिक प्रेम. २. फिलीया म्हणजे बंधुप्रेम किंवा कौटुंबिक प्रेम. ३. आगापे म्हणजे त्यागमय प्रेम. वैवाहिक प्रेमात आपण घेण्यासाठी आतुरलेलो असतो, बंधुप्रेमात आपण घेतो व देतो आणि त्यागमय प्रेमात आपण फक्त देत असतो. मग, आता परमेश्वर आपल्यावर कोणत्या प्रकारचे प्रेम करतो? परमेश्वराचे प्रेम म्हणजे आगापे किंवा त्यागमय प्रेम आहे. ‘देवाने जगावर एवढी प्रिती केली की त्याने आपला पुत्र दिला.’ परमेश्वर आणि आपल्यामध्ये हाच एक मोठा फरक आहे. परमेश्वर आपल्याला भरपूर काही देत असतो आणि क्षमा करतो परंतु आपण मात्र त्याच्याकडून घेतो आणि त्याला विसरतो. परमेश्वराने आपल्यावर त्यागमय प्रेम केले आहे आणि हेच प्रेम आपणसुद्धा एकमेकांवर करणे गरजेचे आहे.

          जोपर्यंत आपण क्रुसावर टांगलेल्या येशू ख्रिस्ताला पाहत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराच्या महान प्रेमाची खरी किंमत समजू शकत नाहीत. येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ म्हणजे जेथे परमेश्वराचे प्रेम, आपल्या दुःखात आणि दुर्बलतेत आपल्याकडे खाली वाकते आणि आपल्याला त्याचे प्रेम आणि दया मिळते. येशूच्या वधस्तंभाद्वारे स्वर्ग आणि पृथ्वीचं मिलन झालेलं आहे, परमेश्वर आणि मानवता एक झालेले आहेत. ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारे परमेश्वर आपल्याकडे खाली वाकतो आणि आपण त्या वधस्तंभाकडे पाहत परमेश्वराकडे पोहोचतो. येशू म्हणतो, ‘मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही’(योहान:१४:६). शुभवर्तमान आपल्याला सांगते की येशू ख्रिस्ताचा क्रूस हा अरुंद मार्ग आहे ज्याद्वारे आपण आपल्या स्वर्गीय पित्याच्या प्रेमळ मिठीत आता आणि अनंतकाळाच्या जीवनात प्रवेश करतो. ज्याप्रमाणे एक आई व वडील आपल्या थकलेल्या, कंटाळलेल्या आणि घाबरलेल्या बाळाला उचलण्यासाठी खाली वाकतात त्याचप्रमाणे परमेश्वर देखील आपल्यापर्यंत खाली वाकतो आणि आपल्याला त्याच्या हृदयापाशी घेतो आणि हे सर्व त्याने आपल्याला ख्रिस्ताच्या क्रुसाद्वारे दाखवून दिले आहे. म्हणून आपण दररोज क्रुसावर टांगलेल्या येशू ख्रिस्ताला पाहूया आणि परमेश्वराची आपल्यावरील प्रिती किती महान आहे हे जाणून घेऊया.   

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक.

१. हे परमेश्वरा तुझ्या लोकांची सेवा करण्यासाठी तू आपले पोप फ्रान्सिस,बिशप्स, धर्मगुरू, व व्रतस्थ ह्यांची निवड केली आहेस. त्यांनी तुझ्या प्रेमाचा संदेश जगातील सर्व लोकांना द्यावा म्हणून तू त्यांना शक्ती प्रदान कर म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना योग्य अशी नोकरी मिळावी व आपल्या प्रत्येकाच्या कामधंदयावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. आपल्या पॅरिश मधील जे लोक आजारी आहेत, दुःखात आहेत, संकटात आहेत, त्यांस परमेश्वरिय साहाय्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. जगभरात अनेक लोक करोना व्हायरसने बाधित झालेले आहेत, अशा सर्वांना परमेश्वराचा स्पर्श होऊन त्यांना ह्या रोगापासून मुक्तता मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करू या.


No comments:

Post a Comment