Wednesday 31 March 2021

                     Reflection for the Homily of Good Friday (02/04/2021) By Fr. Issac D’Souza







उत्तम शुक्रवार


दिनांक: ०२/०४/२०२१

पहिले वाचन: यशया ५२:१३-५३:१२

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ४:१४-१६; ५:७-९

शुभवर्तमान: योहान १८:१-१९:४२



प्रस्तावना:

          आज आपण शुभ शुक्रवार साजरा करीत आहोत. शुभ शुक्रवार दैवी प्रेमाचे प्रतिक आहे आणि हे प्रेमाचे प्रतिक प्रभू येशूच्या रक्ताने सजवण्यात आलेले आहे. प्रभू येशूचे दुःखसहन, त्याच्या यातना, त्याचे मरण ह्याद्वारे आपल्या सर्वांना आनंद आणि नवजीवन लाभले आहे.

          आपल्या जीवनात आनंद आणि दुःख, समस्या, अडचणी, आजार  व मरण, अशा नानाविविध रहस्याची उत्तरे प्रभू येशूच्या दुःखसहनाद्वारे आपल्याला मिळत असतात.

          ह्या पवित्र विधीमध्ये सहभागी होत असताना आपल्या जीवनातील दुःख आपण प्रभू येशूच्या दुःखाशी समरस करू या आणि ज्याप्रमाणे परमेश्वराची कृपा त्याच्या सोबत होती त्याप्रमाणे आपणा सर्वांना त्याची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

मनन-चिंतन:

          एक लहान मुलगा एका धर्मगुरूला म्हणाला आपण गुड फ्रायडे/ शुभ किंवा उत्तम शुक्रवारला उत्तम का म्हणतो? येशू ख्रिस्त ह्या दिवशी मरण पावला, परमेश्वराचा पुत्र ह्या दिवशी मरण पावला. हा दिवस उत्तम किंवा शुभ शुक्रवार कसा गणला जाऊ शकतो? आपण नाताळचा सण साजरा करीतो हे उत्तम आहे, हे शुभ आहे. आपण ईस्टरचा सण साजरा करितो, पुनरुत्थित येशूचा सण साजरा करितो हे गुड  आहे, उत्तम आहे, शुभ आहे. तेव्हा धर्मगुरू त्या मुलाला उत्तर देतात की, शुभ शुक्रवार शुभ आहे कारण प्रभू येशूच्या मरणाने आपणा सर्वांना तारण प्राप्त झालेले आहे. प्रभू येशूच्या रक्ताद्वारे आपण मुक्त झालो आहोत. त्याच्या छिन्न-विछिन्न झालेल्या देहाद्वारे आपला परमेश्वरासोबत समेट झाला आहे आणि पवित्र क्रुसाद्वारे सर्व जगाचे तारण झाले आहे. आज गुड फ्रायडेच्या दिवशी आपण पाच विषयांवरती मनन चिंतन करीत आहोत.

१. देवाचं प्रेम:

          जर आपण एका आईला विचारलं की तू आपल्या लहान मुलाला दिवसाला किती वेळा माफ केले आहे. तर ती आई आपल्याला सांगेल की मी कधी मोजले नाही. परंतु आपल्या वैऱ्याला/ शत्रूला विचारल की त्याला आपल्याजवळून किती वेळा त्रास झाला आहे तर तो नक्कीच लहानातील लहान, नगण्य अशा गोष्टीविषयी आपल्याला तपशील देईल. प्रेम आणि राग, मित्र आणि शत्रू ह्यामधील हा फरक आहे. येशू ख्रिस्ताच प्रेम त्याच्या शब्दात व्यक्त करण्यात आले आहे ते म्हणजे “There is no greater love than to lay down one’s life for one’s friend.” आज गुड फ्रायडेच्या दिवशी जगातील सर्वात महान प्रेमाची घटना आपण स्मरत आहोत. देव प्रेम आहे आणि त्याचं प्रेम क्रुसावरील मरणाद्वारे व्यक्तव्य केलेले आहे.

२. क्रूस:

          प्रभू येशूने जेव्हा हा क्रूस आपल्या खांद्यावर वाहिला तेव्हा त्याने आपल्या प्रत्येकाला त्याच्या हृदयामध्ये सामावून घेतले आहे. पवित्र क्रूस हा आपल्या तारणाचे प्रतिक आहे. क्रुसा आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करितो कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस.

३. दुःख/यातना:

          जो कारागीर लाकडाच्या सोबत काम करीत होता तोच त्या लाकडावर खिळला गेला. जो मेंढपाळ आपल्या मेंढरांची निगा राखीत होता तोच मेंढपाळ छिन्न-विच्छिन्न झालेला आहे. जो जिवंत पाण्याचा झरा आहे तोच पाण्यासाठी व्याकूळ झालेला आहे. ज्या हाताने तो इतरांना बरे करीत होता तेच हात खिळलेले आहेत, रक्तबंबाळ झालेले आहेत. जे हृदय प्रेम करीत होते व इतरांना प्रेमाचा संदेश देत होते त्याच हृदयात भाला भोसकण्यात आला आहे. प्रभू येशूने ह्या सर्व व्यथा सहन केल्या कारण त्याने आपल्यावर प्रेम केले आहे.

४. क्षमा:

          क्षमेचं सर्वश्रेष्ठ वरदान आपल्याला क्रुसावरून मिळालेलं आहे. “बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करीत आहेत ते त्यांना माहीत नाही.” आपल्या वैऱ्याला क्षमा करणे हा महामंत्र प्रभू येशू आपल्याला देत आहे. क्षमा आपण इतरांना देतो परंतु त्याचं फळ आपल्या प्रत्येकांना चांगुलपणामध्ये किंवा शांतीच्या रुपामध्ये मिळत असते.

५. त्याग/समर्पण:

          प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याग हा परिपूर्ण जीवनाचा महान संदेश आहे. क्रुसावरून त्याने आपला आत्मा देव पित्याच्या स्वाधीन केला. रक्त आणि पाण्याद्वारे त्याने आपल्या सर्वांचे पाप धुवून काढले, त्याची आई आपल्या शिष्याच्या स्वाधीन केली. म्हणजेच प्रभू येशूने स्वतःसाठी काहीच राखून ठेवले नाही. त्याने आपलं सर्वस्व आपणा सर्वांसाठी समर्पण केले.

          प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आपल्या प्रत्येकांच्या उद्धारासाठी समर्पित करण्यात आलेले आहे. त्याच्या मरणाद्वारे नवजीवनाचा मार्ग मिळालेला आहे. त्याच्या घायाद्वारे आपणा सर्वांना बरेपण मिळालेलं आहे. गुड फ्रायडे; गुड, उत्तम, शुभ आहे कारण आपणा सर्वांचा परमेश्वर पित्याबरोबर समेट झाला आहे. 

No comments:

Post a Comment