Thursday 22 April 2021

                 Reflection for the Fourth Sunday of Easter (25/04/2021) By Br. Roshan Rosario



पुनरुत्थान काळातील चौथा रविवार


दिनांक: २५/०४/२०२१

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ४: ८-१२

दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र: ३: १-२

शुभवर्तमान: योहान: १०: ११-१८


प्रस्तावना:

आज देऊळमाता पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणा सर्वांस येशू ख्रिस्त आपल्या उत्तम मेंढपाळावरील आपला विश्वास दृढ करण्यास आवाहन करीत आहे.

आजच्या पहिल्या वाचनात आपण वाचतो की, संत पेत्राने पुनरुत्थित ख्रिस्ताच्या नावाने रोग्यांस बरे केले व त्यांना आरोग्यदान दिले. तर संत योहान दुसऱ्या वाचनाद्वारे आपल्याला सांगत आहे की जर आपण देवाच्या नावावर विश्वास ठेवला तर आपण सर्वजण देवाची लेकरे बनू”.

तसेच आजचे शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे की, प्रभू येशू हा आपला उत्तम मेंढपाळ आहे. जशी मेंढरे आपल्या मेंढपाळाची हाक ऐकतात तशेच आपण प्रभू येशू जो आपला उत्तम मेंढपाळ आहे त्याची वाणी ऐकतो का? ह्या जगातील तात्पुरत्या आकर्षणांना मोहित होऊन आपण प्रभू येशूच्या वाणीकडे दुर्लक्ष करतो.

आज आपण सर्वजण पवित्र मिस्साबलित सहभागी होत असताना, आपण आपल्या जीवनात उत्तम मेंढपाळापासून बहकून न जाता त्याच्या सहवासात राहावे व जे कोणी ख्रिस्ता पासून दूर गेले आहेत ते परत यावेत म्हणून प्रभूकडे प्रार्थना करू या.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ४: ८-१२

पेत्राने मंदिराच्या अंगणात जमलेल्या लोकांना ख्रिस्ताचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. पुष्कळांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला. परंतु मेलेले जिवंत होतील यावर लोकांचा विश्वास नव्हता. म्हणूनच येशू मेलेल्यातून जिवंत झाला आहे हे ऐकून त्यांना राग आला व त्यांनी पेत्र व योहान ह्यांना अटक केली.

दुसऱ्या दिवशी त्या अधिकाऱ्यांनी पेत्र व योहान यांना धर्मसभेसमोर आणले व विचारले की, तुम्हाला ह्या पांगळ्याना बरे करण्याचे सामर्थ कोठून मिळाले व कोणत्या व्यक्तीने तुम्हाला हा अधिकार दिला? त्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे दरडावून विचारताच पेत्राला ख्रिस्ताविषयी सांगण्याची नामी संधी मिळाली.

ज्या व्यक्तीने आम्हाला हा अधिकार दिला ती व्यक्ती दुसरी कोणी नसून येशू ख्रिस्त आहे. ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याच येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही लोकांना बरे करीत आहोत. येशू मरणातून उठला आहे व जिवंत आहे. त्याला तुम्ही नाकारले पण तोच सर्वश्रेष्ठ ठरला आहे. ज्याच्याकडून तारण मिळाले तो एकमेव येशू आहे. या शब्दांत पेत्राने येशू ख्रिस्ताची श्रेष्ठता सांगितली.

दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र: ३: १-२

ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाची मुलेहे नाव देवाने दिले आहे. यावरून देवाने किती प्रिती केली आहे ते आपणास समजते. परंतु जगातल्या लोकांना हे कळत नाही व लोकं देवाची मुले म्हणून ओळखली जात नाहीत कारण जगातले लोक ख्रिस्त कोण आहे हे ओळखत नाहीत. जेव्हा ख्रिस्त प्रगट होईल तेव्हा देवाच्या मुलांच परिवर्तन होईल, त्यांना नवे शरीर प्राप्त होईल व ख्रिस्ताच्या सानिध्यात हा बदल घडून येईल.

शुभवर्तमान: योहान: १०: ११-१८

येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे. तो आपल्या मेंढरांवर प्रीती करतो. आपल्या मेंढरांचे रक्षण करण्यासाठी तो मेंढरांबरोबर असतो. एखादा चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरांचे कसे संरक्षण करतो याचे उदाहरण आपल्याला येशू ख्रिस्त देतो.

मेंढरांचे संरक्षण करताना मरण पत्करण्यास मी तयार आहे असे तो म्हणत नाही. मेंढरासाठी मी आपला प्राण देतो. कारण मनुष्याला सार्वकालिक जीवन देता यावे यासाठी येशू ख्रिस्ताला आपला प्राण वधस्तंभावर द्यावा लागला ही पित्याची आज्ञा होती. इतकेच नव्हे तर येशू ख्रिस्ताला आपला प्राण परत घेण्याचा सुद्धा अधिकार आहे. परंतु येशू ख्रिस्त मरण पावला व तिसऱ्या दिवशी मरणातून उठला व जिवंत झाला.

बोधकथा:

फ्रान्सिस बॅरॉड हा एक चित्रकार होता, मार्क नावाचा त्याचा एक भाऊ होता. जेव्हा मार्क यांचे निधन झाले, तेव्हा फ्रान्सिसला त्या मार्कच्या घरात खालील गोष्टी मिळाल्या: एक फोनोग्राफ प्लेयर, मार्कच्या आवाजाची नोंद आणि मार्कचा कुत्रा, निप्पर.

जेव्हा फ्रान्सिस मार्कच्या आवाजाची रेकॉर्डींग वाजवायचा तेव्हा त्याच्या असे निदर्शनास आले की, निप्पर त्या फोनग्राफकडे धावत जायचा, हे पाहण्यासाठी की आपल्या मालकाचा आवाज कोठून येत आहे. हे सर्व दृश्य फ्रान्सिसच्या आठवणींमध्ये इतके विस्मयकारक राहिले की, निप्परच्या निधनानंतर  त्याने ते दृश्य  रंगविले आणि त्याला त्याच्या गुरुंचा आवाज” (His Masters Voice) असे संबोधले.

थोड्या वर्षानंतर एका ग्रामोफोन कंपनीने चित्रकला £ 100 मध्ये खरेदी केली. आठ वर्षांपर्यंत हि चित्रकला लोकप्रिय झाल्यामुळे कंपनीने त्यांचे नाव बदलले आणि आज आपण ह्या कंपनीला 'HMV' ह्या नावाने ओळखतो.

मनन चिंतन:

आपल्या आयुष्यात आपण कोणत्या गोष्टीशी सर्वात जास्त परिचित आहोत? आमच्या  मनात बहुतेक वेळा कोणता आवाज प्रतिध्वनीत होतो? आपणाला नियमितपणे प्रभावीत करणारे बरेच अनुभव व गोष्टी आहेत. काही चांगले आहेत तर, काही तेवढेसे चांगले नाहीत. बर्‍याच वेळा आपल्याला अनेक आवाजकिंवा अनुभव प्रभावीत करतात. आजचं शुभवर्तमान आपल्याला आपल्या अंतर्गत असलेल्या संघर्षाबद्दल अंतःदृष्टी देते कारण ती मेंढपाळांच्या आवाजाशी व परक्या माणसाच्या आवाजाशी तुलना करते. मेंढरांना मेंढपाळांची हाक सहज ऐकायला व ओळखून घेण्यासाठी शिकवले जाते. मेंढरे मेंढपाळांचा आवाज ऐकतात कारण मेंढपाळ त्याच्या मेंढरांशी नियमितपणे बोलणे ही सामान्य पद्धत आहे. एकदा मेंढराला मेंढपाळाच्या आवाजाची सवय झाली की, जेव्हा जेव्हा मेंढरू मेंढपाळाचे आवाज ऐकतात, तेव्हा तेव्हा ते वळून त्याच्या मागे जातात. आपल्या जीवनात पण अशा प्रकारे असते. ज्याच्या बरोबर आपण सर्वात परिचित असतो त्याच्या आवाजाचे आपण अनुकरण करतो. आपण प्रत्येक दिवस ज्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करतो त्या गोष्टीचा प्रभाव आपल्या जीवनात वाढत जातो आणि आपल्याला नकळत अनुकरण करण्यास आकर्षित करतो. म्हणून आपण आपल्याला हा प्रश्न विचारायला पाहिजे की, आपण आपल्या जीवनात कशाशी परिचित आहोत? असं बघायला गेलो तर आपण देवाचं वचन, त्याची भाषा, स्वर आणि आवाज शिकण्यासाठी पुरेसा वेळ वापरायला पाहिजे. तसेच आपल्याला आपल्या दिवसाचा काही भाग, दररोज, देवाचा शब्द वाचनासाठी व त्यावर चिंतनासाठी समर्पित करायला पाहीजे. आपण हे करत असताना, त्याच्या आवाजाची आपल्याला सवय होईल आणि आपल्याला त्याच्या आवाजाने शांती आणि सांत्वन मिळेलं. एकदा ही सवय आपण अवगत केली कि, जेव्हा जेव्हा देव आपल्याबरोबर बोलेल तेव्हा तेव्हा आपण आपल्या व्यस्त दिवसामध्ये पण त्याचे बोलणे ऐकू शकू. आपण त्याची हाक ओळखून त्याचे अनुकरण करू. आज आपल्याला सोशल मीडिया, पॉप संस्कृती, पैशावर प्रेम, सामाजिक मान्यता अशे बरेच काही जगाचे दुसरे आवाज ऐकायला मिळतात. ह्या गोष्टींचा आपल्या जीवनात प्रचंड असा प्रभाव आहे आणि आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो आणि ते आपल्यावर परिणाम करतात. आज आपण स्वतःला विचारूया की आपल्या जीवनात आपल्याला सर्वात जास्त हाक कोणाची ऐकू येते. आपल्या दैनंदिन जीवनात जगातील इतर बर्‍याच आवाजांमध्ये देवाच्या आवाजाला हरवू देऊ नका. त्याऐवजी, त्याने बोलण्यास निवडलेल्या क्षणांसाठी आपण स्वत: ला तयार ठेवायला पाहिजे आणि जेव्हा तो आपल्याला बोलवील तेव्हा त्या आवाजाकडे आपले लक्ष केंद्रित करून आपण त्याचे अनुसरण करायला पाहिजे.

आज पुनरुत्थित ख्रिस्त आपल्याला त्याच्या मागे येण्यास बोलावित आहे. जो आपल्या सर्वांचा उत्तम व श्रेष्ठ मेंढपाळ आहे, तोच येशूख्रिस्त आपणास आपल्याला प्रत्येकाच्या नावाने हाक मारीत असतो. आपण ह्या आधुनिक काळाच्या व जगाच्या मोह मायामध्ये न गुरफटता व न अडकता, आपण एकनिष्ठेने व स्वच्छेने उत्तम मेंढपाळाची वाणी ऐकुया व सदा-सर्वदा येशूच्या सानिध्यात एका चांगल्या मेंढराप्रमाणे राहू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे, प्रभू तुझ्या लेकरांची वाणी ऐक.

१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वाना पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने चांगले आरोग्य द्यावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशिर्वाद राहावा, तसेच त्यांनी त्यांच्या मेंढरांची काळजी घ्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या

२. आपल्या कुटुंबातील गैरसमज दूर करून आपण एकमेकांना प्रेमाने समजून घ्यावे व प्रत्येकाचा आदर राखावा व त्याद्वारे एका चांगल्या ख्रिस्ती कुटुंबाची साक्ष समाजाला द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

३. जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळावी त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या कामा-धंद्यावर प्रभूचा वरदहस्त असावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

४. जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत, तसेच देवाची वाणी न ऐकता दुसऱ्यांची वाणी ऐकतात अश्या सर्व लोकांना देवाचा दैवी कृपेचा स्पर्श होऊन त्यांनी देवाची प्रेमळ वाणी सतत ऐकावी व देवाच्या जवळ यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

५. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजांसाठी व हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करू या.

No comments:

Post a Comment