Thursday 8 April 2021

            Reflection for the Second Sunday of Easter (11/04/2021) By Dn. Julius Rodrigues




पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार

दैवी दयेचा रविवार




दिनांक: ११-०४-२०२१

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ४:३२-३५

दुसरे वाचन: १ योहान ५:१-६

शुभवर्तमान: योहान २०:१९-३१


प्रस्तावना:

आज आपण पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत आणि हा रविवार दयावंत येशूचा रविवार म्हणून संबोधला जातो. आजच्या शुभवर्तमानात आपल्या सर्वांस विश्वासू होण्यासाठी बोलावीले आहे. भीतीमुळे आपण घाबरून जाऊ नये किंवा निराश होऊ नये परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवीत त्याची सेवा करण्यास पुढे गेलो पाहिजे व त्यासाठी हवी असलेली शक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवी दयेतून आपल्याला मिळत असते. परेश्वर  दयाळू आहे, प्रेमळ आहे आणि हीच त्याची कृपा आपल्या सर्वांस लाभावी म्हणून आपण ह्या मिस्सा बलिदानात प्रार्थना करू या.

मनन चिंतन:

आज आपण पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. हा रविवार दैवी करुणेचा रविवार असे म्हटले जाते. प्रभू येशू हा दयेचा व करुणेचा महासागर आहे, त्याच्या हृदयातून दयावंत कृपेचा झरा वाहत असतो.  त्याची दया आणि शांती अपार व सनातन आहे  आणि त्याचा अनुभव प्रभू येशू आपल्याला सर्वांना देत असतो.

असे म्हटले जाते, “जो डर गया वो मर गया”.  “डर के आगे जीत है”.  “डरना मना है”

 आज आपण भीती ह्या विषयावर मनन चिंतन करणार आहोत. धोक्याची स्पष्ट जाणीव असणे व त्या बद्दलची मानवी भावना मनात निर्माण होवून शारीरिक हानीची, धोक्याची व इजा होणारी संकल्पना ज्यावेळेस आपण अनुभवतो त्यास भीती असे म्हणतात.

 भीती ही एक मानसिकता किंवा भावना आहे आणि ही भावना वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या मनात निर्माण होते. उदाहरणार्थ अपघात पाहिल्यावर, भीतीदायक चित्रपट पाहिल्यावर किंवा स्वतः सोबत अपघात झाल्यावर इत्यादी... ह्यामुळे माणूस हा भिऊन जात असतो, घाबरत असतो, खचून जात असतो.

दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला लहान-मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत असते व त्यामुळे आपण घाबरून जात असतो, निराश होत असतो, आशाहीन बनत असतो व ह्यांतून आपण आपल्याला किंवा स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करीत असतो. उदारणार्थ...करोना.  करोना महामारीने संपूर्ण जग हादरून गेले आहे. सर्व लोक घाबरून गेले आहेत. आपले कसे होईल, सगळे पुन्हा कधी चालू होईल. आपला बचाव होईल का? आपल्याला करोना होईल का ? असे अनेक प्रश्न लोका समोर उभे आहेत आणि म्हणून लोक घरात लपून बसले आहेत. आणि आज अशाच प्रकारचा अनुभव आजचे  शुभवर्तमान आपल्या समोर ठेवत  आहे. येशूच्या मरणाने शिष्य घाबरून गेले होते. त्यांची दानादान झाली होती. जो ख्रिस्त त्यांचा आश्रयस्थान होता, त्यांचा प्रेरणास्थान होता, तोच मरून गेला होता आणि म्हणून त्यांच्या मनात एक भीतीचे वातावरण तयार झाले होते. ज्याप्रामाणे एखाद्या बोटीचा  तांडेल जेव्हा मरण पावतो तेव्हा ती बोट जशी दिशाहीन होते, अगदी त्याचप्रमाणे शिष्यांची स्थिती किंवा परिस्थिती झाली होती. थोडक्यात तेही दिशाहीन झाले होते. शिष्यांनी आपली इच्छाशक्ती गमावली होती. ते निराश झाले होते, हताश झाले होते. आपण आता काय करणार? आपले कसे होणार? आपला बचाव होईल का ?  ह्या नाना प्रकारचे प्रश्न त्यांना भेडसावत होते. परंतु येशू आपल्या दैवी शक्तीने पुनर्जीवित झाला होता, आणि आता त्यांच्यासमोर उभा राहिला होता. येशूने आपल्या शिष्यांना त्याच्या दैवीपणाचे बक्षीस म्हणून चार गोष्टी दिल्या आणि तो आज आपल्याला ही देणार आहे.

१.    १. दैवी आनंद: संध्याकाळची वेळ होती. शिष्य हे याहुद्यांच्या भीतीमुळे दारे बंद करून एका खोलीत लपून बसलेले होते. ह्यावरून आपल्याला समजते की, शिष्यांची बाह्य स्थिती खूप घाबरेपणाची आणि भित्रेपणाची झालेली होती आणि येशू अशावेळी आपले दर्शन त्यांस देतो व संपुर्ण वातावरण आनंदमय करतो. शिष्य किंवा प्रेषित आनंदाने हर्षवतात. त्यांच्यात असलेली भीती ही आनंदात बदलत असते. ते आनंदीत होतात. ज्या वेळेस आपण मिस्साला येतो तेव्हा ख्रिस्ताच्या येण्याने आपण आनंदित होतो का?

२. दैवी शांती: ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना एक दैवी देणगी आपल्या शांतीद्वारे दिली होती. “तुम्हास शांती असो” त्याने आपल्या शिष्यांची चलबिचल झालेली मने आपल्या दैवी शब्दाद्वारे शांत केली होती. शिष्यांस एक मन-शांती लाभली होती. त्यांनी सुखाचा जणू सुसकारा सोडला होता.

ख्रिस्ताची शांती आपण आपल्या जीवनात अनुभवतो का? आपली मने ख्रिस्ताच्या शांतीने प्रेरित होतात का ?

३. दैवी मिशन कार्य / सामर्थ्य: ज्याप्रमाणे पित्याने, येशूला आपले कार्य करण्यासाठी पाठविले, त्याचप्रमाणे येशू आपल्या शिष्यांना मिशन कार्य करण्यासाठी पाठवितो. आता त्यांना चार भिंतीआत नसून तर, चार भिंती बाहेर जायचे होते आणि म्हणून येशू आपला पवित्र आत्मा त्यांच्यावर पाठवितो आणि त्यांना दैवी मिशन कार्य करण्यासाठी दैवी सामर्थ्य परिधान करतो.

आपण ख्रिस्ताचा संदेश इतरांपर्यंत पोहचोवतो का? की, आपण अजून चार भिंतीआड बसून आहोत?

४. दैवी स्पर्श: थोमाला ख्रिस्त आपल्या कुशीत हात घालण्यासाठी पुढे बोलावतो आणि थोमाला एक दैवी स्पर्शाची देणगी देतो. थोमाचा हा अनुभव त्याला विश्वासहीनते कडून विश्वासनीयतेकडे आणतो, आणि मग थोमा पुढे म्हणतो, “माझ्या देवा, माझ्या प्रभो.” आपणाला ख्रिस्त प्रसादाद्वारे देवाचा दैवी स्पर्श होतो का? आपला विश्वास बळकट होतो का? जर आज ख्रिस्त आपल्यासमोर उभा राहिला तर, तो म्हणेल, ‘डरना मना है ! आणि डर के आगे जीत है’ !

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद:  “हे दयावंत प्रभू आम्हाला श्रद्धेचे वरदान दे”

१. ख्रिस्ती श्रद्धेचे विस्तार करणारे आपले पोप, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी ह्यांना सर्वांना पुनरुत्थित ख्रिस्ताचा प्रकाश इतरांना देण्यासाठी कृपा आणि शक्ती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. थोमाप्रमाणे आपल्या सर्वांच्या मुखातून विश्वासाची घोषणा व्हावी, “माझ्या देवा व माझ्या प्रभो.” आणि त्यांच्याशी विश्वासू राहण्यासाठी कृपा मागूया.

३. आपल्या धर्मग्रामात जे लोक आजारी आहेत, दु:खीत आहेत, अशा सर्वांना परमेश्वराच्या दैवी हृदयाचा अनुभव येवून त्यांना शांती आणि कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. आपण सर्वजण एक कुटुंब व एक ख्रिस्ती समूह आहोत ह्याची भावना आपल्या मनात निर्माण होऊन त्याप्रमाणे वागण्यासाठी पुनरुत्थित ख्रिस्ताची कृपा मागूया.

५. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या कौटुंबिक, वैयक्तिक, व सामाजिक हेतूंसाठी प्रभू कडे प्रार्थना करू या.



No comments:

Post a Comment