Thursday 2 September 2021

                                              


   Reflection for 23rd Sunday in Ordinary Time (05/09/2021) By Bro. Aaron Lobo



सामान्य काळातील तेविसावा रविवार


दिनांक ०५-०९-२०२१

पहिले वाचन यशया - ३५:४-७

दुसरे वाचन याकोबाचे पत्र - २:१-५

शुभवर्तमान मार्क ७:३१-३७


 “‘इफ्फाथा,’ मोकळा हो”


प्रस्तावना

            आज आपण सामान्य काळातील तेविसावा रविवार साजरा करीत आहोत. परमेश्वर दयाळू व विश्वासू आहे. आजची उपासना आपल्याला परमेश्वाच्या दयेवर विश्वास ठेवण्यास बोलावत आहे. पहिल्या वाचनात आपण वाचतो कि, देव आपल्याला वाचवतो आणि आपल्याला नवीन जीवन देतो. दुसरे वाचन आपल्याला सांगते कि, देव निःपक्षपाती आहे आणि त्याच्या सर्व मुलांवर तो प्रेम करतो. तसेच शुभवर्तमानात, येशू बधिर माणसाला बरे करतो. आजची वाचने आपल्या मनात अनेक प्रश्न आणतात. देव आपल्या प्रत्येकांवर निःपक्षपाती प्रेम करतो यावर आपण खरोखर विश्वास ठेवतो का? आपण देवाप्रमाणे प्रेम करण्याचा प्रयत्न करतो का? आणि देव आपल्याला काय सांगत आहे, हे ऐकण्यासाठी आपण आपले कान उघडून तयार आहोत का?

मनन चिंतन

            आजची तिन्ही वाचने आपल्याला, देवाने केलेल्या चमत्कारांविषयी सांगत आहेत. पहिल्या वाचनात यशया संदेष्टा निराश्रित इस्त्राएली लोकांना आशेचे किरण दाखवतो. याच हताश लोकांची प्रतिमा आपण आजच्या शुभवर्तमानात असलेल्या बहिऱ्या-तोतऱ्या माणसात पाहतो. ज्या संदेष्याविषयी यशया संदेष्ट्याने इस्त्राएली लोकांना भाकीत केले होते, ते शुभवर्तमानातील मूक व बधिर असलेल्या माणसात पूर्णत्वास आले.

        बहिऱ्या-तोतऱ्या माणसाला बरे करण्यामागे प्रभू येशू चार कृत्ये करतो, ज्याचावर आपण मनन चिंतन करणार आहोत. सर्व प्रथम येशू त्या माणसाला एकीकडे नेतो, म्हणजेच, त्याला इतर लोकांपासून वेगळे करितो, त्याची निवड करतो. ह्या कृत्याचे महत्व असे कि, ज्या प्रमाणे येशूने ह्या माणसाची निवड केली त्याच प्रमाणे देवाने ही इस्त्राएली लोकांना इतर राष्ट्रांपासून विंचले किंवा इस्त्राएली लोकांना इतर राष्ट्रांपासून वेगळे केले. एखाद्या व्यक्तीची अशी निवड करणे हे त्या व्यक्तीबद्दल स्वःमनात असलेले प्रेम जाहीर करते. त्यानंतर येशू त्याच्या कानाला स्पर्श करतो. स्पर्श हे प्रेमाची  अभिव्यक्ती आहे. एखाद्या तान्ह्या बाळाला त्याच्या आईचे प्रेम तिच्या स्पर्श्याद्वारेच समजून येते; हेच मातृत्वाचे प्रेम प्रभू येशू आपल्या स्पर्श्याद्वारे त्या निराश्रित माणसासमोर दर्शवतो. तिसरे कृत्य म्हणजे, येशूने थुंकून त्या माणसाच्या जिभेला स्पर्श केला. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिल्यास मानवी थुंकीमध्ये उपचारक गुणधर्म असतात. ह्या माणसाच्या आरोग्य प्राप्तीमध्ये प्रभू येशू थुंकी ह्या एका नैसर्गिक बाबीचा उपयोग करतो. ह्याचे कारण असे कि, या कृत्याद्वारे येशू ख्रिस्ती संस्काराचे मूल्य प्रकट करतो. ख्रिस्ती संस्कार जी दैविक कृपा मिळवून देते, ही सगळी अशाच नैसर्गिक बाबीचा वापर करतात, तर थुंकी हे ख्रिस्ती संस्काराचे प्रतीकात्मक प्रकटीकरण आहे. ज्या प्रमाणे त्या थुंकीद्वारे त्या माणसाला आरोग्य प्राप्त झाले, त्याच प्रमाणे ख्रिस्ती संस्कारही पवित्र साक्रामेंताद्वारे आरोग्य प्राप्त करून देते. चौथे कृत्य म्हणजे, येशूने ‘इफ्फाथा’ आसा शब्द उचारला, ज्याचा अर्थ ‘मोकळा हो’. येशूच्या शब्दात अपार अशी शक्ती आहे, आणि संत पेत्राने म्हटल्या प्रमाणे, त्याच्या शब्दात सार्वकालिक जीवन आहे (योहान ६: ६८).

        आजच्या आधुनिक काळात आंधळे, मुके व बहिरे हे गंभीर आजार आहेत परंतु त्यांच्यावर उपचार शक्य आहेत. या शारीरिक आजारापेक्षा, आध्यात्मिक आंधळेपणा, बहिरेपणा व मुकेपणा हे जास्त गंभीर आहेत. समाज्यात अन्याय घडतात पण त्याच्यावरती आपण कानाडोळा करतो व त्याच्याविरुद्द आपण आवाज उठवण्यापेक्षा शांत राहतो हेच आजच्या आधुनिक युगातील आंधळेपणा, मुकेपणा व बहिरेपणा आहेत. ह्या आजारांपासून वंचित राहण्यापेक्षा त्याच्यावर उपचार म्हणून येशू आपल्याला त्याच्या स्पर्शाद्वारे, त्याच्या शब्दांद्वारे, त्याच्या संस्काराद्वारे ह्या आजारांवर तोडगा म्हणून आपली निवड करतो. ह्या आजारांपासून बरे होणे म्हणजेच आपल्याला मिळालेली सुवार्ता आपण इतरांपर्यंत पसरविण्याचे आवाहन आहे.

        ह्या आजारांतून बरे होण्याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे. ह्या करिता आपला दैविक विश्वास आपण आपल्या कृत्याद्वारे आपण व्यक्त केला पाहिजे. अन्यायाविरुद्द तोंड देणे, निराश्रितांच्या बरोबर उभे राहणे, आणि घडलेल्या अन्यायांचा धैर्याने सामना करणे, ह्याद्वारे आपण जो ख्रिस्ताने घडविलेला चमत्कार आपल्या कृत्याद्वारे प्रकट करू शकतो. तर मग हा चमत्कार आजच्या समाज्यात घडविण्यासाठी आपण तयार आहोत का? आपल्या बंधू-भागीनींवर घडलेल्या अन्यायाविरुद्द तोंड देण्यास व त्यांना सहानुभूती देण्यास आपली तयारी आहे का? तर मग ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून ख्रिस्ताप्रमाणे दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणण्यास ख्रिस्ताला अनुसरुया. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

आपला प्रतिसाद : हे प्रभू, दया करून आमची प्रार्थना ऐक.

१) आपल्या धर्माची धुरा वाहणारे आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी, धर्मगुरू आणि धर्मभागिनी ह्या सर्वाना देव राज्यांची मुल्ये आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे जगजाहीर करता यावी व त्यासाठी त्यांना परमेश्वराची कृपा मिळा,वी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) आपण आपल्या कुटुंबातील व मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने व सहनशीलतेने समजून घ्यावे व एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरुण-तरुणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) सर्व पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत, त्यांना देव राज्याविषयी शिकवण द्यावी, स्वतः परमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून, मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment