Thursday 16 September 2021

  Reflection for 25th Sunday in Ordinary Time (19/09/2021) By Bro. Gilbert Fernandes



सामान्य काळातील पंचविसावा रविवार

दिनांक – १९-०९-२०१८

पहिले वाचन – शलमोनचा ज्ञानग्रंथ २:१२;१७-२०

दुसरे वाचन – याकोब  ३:१६,४:३

शुभवर्तमान – मार्क ९:३०-३७


‘जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे.




प्रस्तावना

        आज आपण सामान्य काळातील पंचविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची तिन्ही वाचने आपल्या नितीमत्व, एकाग्रता व नम्रता ह्या मानवी जीवनातील तीन महत्वपूर्ण गोष्टींवर विचार- विनिमय करण्यास बोलावत आहेत.

        शल्मोनाच्या ज्ञानग्रंथातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, जर नीतिमान माणूस देवाचा पुत्र असेल तर देव त्याला सहाय्य करील आणि त्याची शत्रूंच्या तावडीतून सुटका करील. दुसऱ्या वाचनात संत याकोब आपल्याला ह्या जगातील ऐहिक गोष्टींचा मोह न धरता, ख्रिस्ताच्या वचनाचा ध्यास आपल्या जीवनात कसा उतरावा ह्या विषयी उपदेश करत आहे. शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्या शिष्यांना बालकाचे उदाहरण देऊन नम्रतेविषयी धडा देत आहे. प्रभू म्हणतो, “जो कोणी पहिला होऊ इच्छितो त्याने प्रथम सेवक झाले पाहिजे”.  

         मानवी जीवनातील अहंकारपणा किंवा मी-पणा मानवाला ख्रिस्ताकडून व त्याच्या शिकवणुकीतून दूर नेत असतो. ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतीरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण करून आपल्यासमोर नम्रतेचे आणि लीनतेचे उत्तम उदाहरण ठेवले आहे. ह्या पवित्र मिस्साबलीदानामध्ये सहभागी होत असतांना, आपणही ख्रिस्तासारखे नम्र व लीन बनावे व त्यासाठी लागणारी कृपा आपल्याला प्रभुने द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन - शलमोनचा ज्ञानग्रंथ २:१२;१७-२०

            शलमोनचा ज्ञानग्रंथ आपल्याला सांगत आहे की, नीतिमान मनुष्य ह्या त्याच्या चांगल्या कार्यामुळे त्याच्या शत्रूंना सतत अडथळा आणत असतो. व त्या कारणामुळे ते त्याला जीवे मारण्यास तयार असतात. हा नीतिमान मनुष्य इतरांनाही चांगले जीवन जगण्यास आव्हान करीत असतो. परंतु ते त्यांना पटत नाही. त्यांना हे ही माहित असते की, देव त्याच्या सहाय्यास येतो तरीही ते त्याला जीवे मारण्याचा कट रचतात.

            परंतु आपण पुढे पाहतो की, नीतिमान हा त्याच्या चांगल्या कार्यामुळे शाश्वत जीवनास योग्य ठरतो. तो वाईटापासून व ऐहिक मोहापासून दूर राहतो. अशा नीतिमान व चांगल्या लोकांची कसोटी वेळो-वेळी केली जाते; परंतु देवावर पूर्ण विश्वास ठेवल्याने नीतिमान मनुष्याची विरोधकाराच्या तावडीतून सदैव सुटका होत असते. कारण त्याची चांगली कार्ये व सौम्यपणा त्याच्या मदतीला येत असतात.

दुसरे वाचन - संत याकोबाचे पत्र ३:१६,४:३

            संत याकोब आपल्या पत्राद्वारे ख्रिस्ती जनांसमोर खोटे व खरे ज्ञान कुठचे हे सांगतो. मुळात ज्ञान कधीच घमेंड करत नाही. जेथे मत्सर असतो आणि तट-फुटी पाडण्याचा प्रयत्न केलेला असतो, तेथे खरे ज्ञान नसेत. ज्याला ज्ञान म्हटले जाते ते देवापासून नसते, तर ऐहिक जगापासून असते. ते पापी स्वभावापासून व इंद्रियजन्य असते. ते सैतानाने पुरविलेले असते व यामुळे गोंधळ व अव्यवस्था माजते व सर्व प्रकारचे वाईट घडते.

            परंतु जे ज्ञान देवापासून मिळते ते १००% शुद्ध असते. ते पवित्र असते. या ज्ञानाने तट न पडता शांतीची स्थापना होते.

            पुढे संत याकोब म्हणतो, आपण का भांडतो, तर आपणा प्रत्येकामध्ये पापी स्वभाव असतो. या पापी  स्वभावाचे प्रमुख गुणलक्षण “स्वार्थ” हा आहे. आपण सदा आपल्या फायद्याचे पाहतो व त्यामुळे आपल्याला हवे ते मिळत नाही पण जर का आपण निस्वार्थी जीवन जगलो. दुसऱ्याच्या भल्याचे केले तर नक्कीच आपलेही भले होईल.

शुभवर्तमान - मार्क ९:३०-३७

            मार्क लिखित शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशू पुन्हा एकदा आपल्या मरणाविषयी शिष्यांना सांगत आहे. व नेहमी प्रमाणे शिष्यांना काही समजत नाही. आपण पाहतो की, येशूला त्यांच्या मरणाची पूर्व खबर होती व तो आपल्या शिष्यांना त्यासाठी तयार करीत होता. येशूला माहिती होते की, आपले राज्य इथले नाही तर स्वर्गाचे आहे. परंतु शिष्यांना ह्याची जाणीव होत नाही व ते येशूचे राज्य इथले  समजतात व त्या अनुशंगात ते स्वःताच्या मोठेपणाची चर्चा करतात.

            परंतु येशू त्यांचा गैरसमज दूर करतो व सांगतो, देवाच्या राज्यात जो अधिकार गाजवितो तो मोठा असतो असे नाही तर मोठा तो असतो जो स्वतःला दुसऱ्याच्या सेवेसाठी नमवितो. पुढे येशू त्यांना लहान बालकाचे उदाहरण देतो. बालके हे स्वभावाने निर्मळ, स्वाभिमानी व वागण्याने नितळ असतात. ह्यास्तव जो कोणी बालकाप्रमाणे आपल्या जीवनात स्वाभिमान व नितळपणा ह्यांचा स्विकार करतो, तो ख्रिस्ताचाच नव्हे तर ज्याने ख्रिस्ताला पाठवले आहे त्याचा स्विकार करतो.

मनन चिंतन:

            आजचे आधुनिक जग हे जाहिरातीचे, प्रसारमाध्यमाचे व तत्वज्ञानाचे युग आहे. सर्वत्र जो तो मान-सन्मान, प्रतिष्ठा, मोठेपणा ह्याच्यामध्ये गुंफलेला आहे. जीवनात आपण कसे होऊ व नव-नवीन उच्च पदवीस्थाने कसे मिळवू? ह्यामध्ये गुरफटत चालला आहे. खरे पाहिले तर हा जगाचा नियम आहे. जगाच्या निर्मितीपासूनच ह्या नियमाची जोड जगाला लागली होती, येशू ख्रिस्ताचे शिष्य ह्या अस्तित्वाला निराळे होते असे नाही. संत मार्कच्या शुभवर्तमानात ऐकल्याप्रमाणे येशूचे शिष्य आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण? ह्याविषयी चर्चा करीत होते. तेदेखील मान-सन्मानमोठेपणा ह्यामध्ये गुंफून गेलेले होते.

        शिष्यांना ठाऊक होते कि, येशू ख्रिस्त ज्याने इतके चमत्कार केले आहेत तो सर्वसामान्य मनुष्य नसून एक दैवी मानव आहे. तो एक चमत्कारी असून त्याच्याठायी दैवी शक्ती आहे. त्याचे गौरवशाली राज्य प्रस्थापित करण्यासाठी तो ह्या जगात अवतरला आहे. त्या वैभवशाली राज्याचे भागीदार होण्यासाठी, वारस होण्यासाठी त्याने आमची निवड केली आहे. एक दिवस आम्हांला सुद्धा मान-सन्मान, प्रतिष्ठा गाठता येईल.

        परंतु आजच्या शुभवर्तमानाद्वारे ख्रिस्त त्यांना नम्रतेचा व लीनतेचा धडा शिकवत आहे. “जो कोणी तुम्हांमध्ये उच्च होऊ इच्छितो, त्याने सर्वांचा सेवक बनावे”.

        जीवनात यशस्वी होणे किंवा कोणतेही उच्च पद मिळविणे हे मुळीच चुकीचे नाही. देवाने दिलेल्या देणग्यांचा वापर करूनच आपण जीवनात यशस्वी बनत असतो. पण अनेक वेळा आपल्याला, आपल्या यशस्वीपणाचा अहंकार चढतो. आपण दुसऱ्याला विसरतो. दुसऱ्याकडे दुर्लक्ष करतो. संकटकाळी त्यांच्या मदतीला पाठ फिरवत असतो. अशा ह्या ‘मी’ घटक वृत्तीला बळी न पडण्यासाठी जीवनात नम्र व लीन राहणे आवश्यक आहे. 

        येशू ख्रिस्ताने शुभवर्तमानात आपला संदेश, आपली शिकवणूक स्पष्ट करण्यासाठी अनेक अशा वृतांचा, दाखल्यांचा व चिन्हांचा वापर केला आहे. आजच्या शुभवर्तमानात देखील त्याने ‘बालकाचे’ उदाहरण त्याच्या शिष्यांसमोर ठेवल्याचे आपण पाहतो. छोटी मुले ही मनाने नितळ व शुद्ध असतात. त्यांच्यात कुभावना कदापि नसते. कोण मोठा व कोण छोटा असा भेदभाव ते कदापि करत नसतात. बालकांप्रमाणे नितीमान, नितळ शुद्ध, प्रेमळ होण्यासाठी ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना पाचारले होते. ते जगातील राज्याचे शिष्य नसून, स्वर्गीय राज्याचे शिष्य होते. ह्याची जाणीव ख्रिस्ताला आपल्या शिष्यांना करुन द्यायची होती.

          आजचे शुभवर्तमान आपल्याला नम्रतेने आणि लीनपणे जीवन जगण्यास बोलावीत आहे. स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जीवन जगणे खूप महत्वाचे आहे. एके दिवशी एक माणूस देवाला म्हणाला, “देवा, मला स्वर्ग आणि नरक कसे आहेत हे जाणून घ्यायचे आहे. देवाने त्या माणसाला दोन खोल्या दाखविल्या पहिल्या खोलीच्या मध्यभागी एका मोठ्या टेबलावर स्वादिष्ट अशा रस्स्याने भरलेले पातेले होते. पण त्या टेबलाभोवती बसलेले लोक पातळ आणि आजारी होते. त्यांच्याकडे लांब हाताचे चमचे होते. त्या चमच्यांनी तो रस्सा घेणे त्यांना शक्य होते. परंतु त्या चमच्यांनी भरलेला रस्सा त्यांच्या स्वतःच्या तोंडाजवळ आणणे त्यांना अशक्य होते. हे त्यांचे दुःख पाहून तो माणूस थरथरला. देव त्याला म्हणाला हे तू नरक पहिले. मग देव त्याला माणसाला दुसऱ्या खोलीत घेऊन गेला. त्या खोलीत सुद्धा एका मोठ्या टेबलावर स्वादिष्ट अशा रस्स्याने भरलेले पातेलं होतं, पण त्या टेबलाभोवती बसलेले लोक चांगले आणि सदृढ होते त्यांच्याकडे सुद्धा लांब हाताचे चमचे होते, परंतु ते स्वतःन तो स्वादिष्ट रस्सा न पिता दुसऱ्यांना भरवत होते. हे सर्व दृश पाहून तो माणूस आश्चर्यचकित झाला. देवा त्याला म्हणाला, हे तू स्वर्ग पाहिले आहे. नरकातील लोक स्वतःचा विचार करत होते. ते स्वार्थी वृत्तीचे होते. याउलट स्वर्गातील लोक दुसऱ्यांचा विचार करत होते. ते निस्वार्थी होते.  

आपले जीवन हे निःस्वार्थीपणे दुसऱ्यांच्या सेवेसाठी वापरणे गरजेचे आहे. आज आपल्या समोर संत मदर तेरेजा, संत मॅक्सिमिलीयन कोलबे ह्यांसारखे अनेक आदर्श आहेत; ज्यांनी आपले संपूर्ण जीवन दुसऱ्यांच्या सेवेसाठी व उद्धारासाठी पणाला लावले. आज त्यामुळे ते संत म्हणून गणले जातात. त्यामुळेच जर का आपल्याला सुद्धा श्रेष्ठ व्हायचे असेल तर आपण सुद्धा आपल्या जीवनात निस्वार्थी वृत्तीने व नम्रपणे इतरांची सेवा करण्यास झटावे व त्यासाठी लागणारी कृपा परमेश्वराने आपल्याला द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे प्रभू आम्हाला तुझ्यासारखे नम्र बनव.

१) आपल्या ख्रिस्तसभेत अखंडरीत्या कार्य करणारे परमगुरु, महागुरू, धर्म-गुरु आणि धर्म-भगिनी व इतर सर्व ख्रिस्ती-बांधव जे देवाचे कार्य पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने ख्रिस्तामध्ये नम्र होऊन करत आहेत, या सर्वांना देवाने चांगले व निरोगी आरोग्य बहाल करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक लोक रस्त्यावर आलेले आहेत, त्यांची पुष्कळ अशी हानी झाली आहे. ह्या सर्वांना प्रभूने दिलासा द्यावा व त्यांना नव्याने जगण्यास प्रेरणा मिळावी म्हणून, आपण प्रार्थना करूया.

३) जे लोक आजारी आहेत अश्यांना प्रभूचा प्रेमदायी स्पर्श व्हावा व त्यांना त्यांचा आजार सहन करण्यास सहनशीलता व शक्ती मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी कार्य करणारे आपले राजकीय पुढारी व नेत्यांनी नम्रता हा गुण अंगी बाळगून देशाच्या हितासाठी कार्यरत रहावे व जनतेच्या कल्याणासाठी निःस्वार्थीपणाने झटावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

 


 

No comments:

Post a Comment