Friday 2 September 2022


Reflection for the Homily of Twenty Third Sunday in Ordinary Time (4/9/2022) by Trimbak Pardhi
सामान्यकाळातील तेविसावा रविवार


दिनांक: ०४/०९/२०२२.

पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ९: १३-१८.

दुसरे वाचन: फिलेमोन ९-१०; १२-१७.

शुभवर्तमान: लुक १४: २५-३३.




“जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही”.





 प्रस्तावना:

“जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही”. आज देऊळ माता सामान्य काळातील तेविसावा रविवार साजरा करत आहे. आजची उपासना आपणास शिष्यत्व म्हणजे काय हे शिकवत आहे.पहिल्या वाचनात आपण पाहतो की देवाचे हेतू, देवाची इच्छा आपण जाणू शकत नाही कारण आपली बुद्धी अल्प आहे. आपण कितीही ज्ञान मिळवले तरी ते ज्ञान देवाच्या ज्ञानापुढे अगदीच अल्प असते. आपण फक्त जगाच्या दृष्टीने विचार करतो. आपण आपल्या जागतिक सुखाच्या शोधात असतो व त्यासाठी प्रयत्न व कष्ट करीत असतो. जगाचे ज्ञान मिळविण्यासाठी आपण आपलं पूर्ण आयुष्य घालवित असतो. परंतु देवाचे ज्ञान मिळविण्यास आपणास खूप कठीण जात असते. देवाचे ज्ञान मिळविण्याचा आपण प्रयत्न करीत नाही. देवाचे दान आपणास पवित्र आत्म्याकडून मिळत असते. त्यासाठी देवाचे प्रेम ओळखून घेणे खूप गरजेचे आहे. देवाचे प्रेम ओळखणे हीच खरी ज्ञानाची खाण आहे. दुसऱ्या वाचनात आपणास फिलेमोन बरोबर आणि अनेसिम ह्याचा पैलाने घालून दिलेल्या  समेटाबद्दल ऐकतो.

आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपणास सदैव आज्ञनेत राहावयास सांगत आहे. सर्व काही त्याग करून देवाच्या मागे जाण्यास सांगत आहे. देवासमोर स्वतःचे घरदार कुटुंब याचा विचार नेहमी दुय्यम ठेवण्यास सांगत आहे. आपला स्वतःचा वधस्तंभ उचलून देवाच्या मागे येण्यास सांगत आहे.

 

मनन चिंतन

प्रिय भाविकांनो, ख्रिस्ताच्या मागे मोठमोठे लोक समुदाय चाललेले होते. ते त्यांचे कौतुक करणारे होते, पण त्यातील अगदी थोडेच त्याचे खरे शिष्य होते. म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त आपणास सांगत आहे की "जो कोणी स्वतःचा वधस्तंभ उचलून माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही". वधस्तंभ म्हणजेच आत्मत्याग आणि समर्पण. आपल्या जीवनासाठी देवाची जी इच्छा आहे ती स्वीकारणे म्हणजे स्वतःचा वधस्तंभ वाहने. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वधस्तंभ असतात. आजार, अपयश, निराशा, अडचणी, शाळेचा किंवा कॉलेजचा अभ्यास इत्यादी प्रकारचे वधस्तंभ उचलून चालावे लागते. आपण जर कोणत्याही व्यक्तीला विचारले की तुला तुझ्या जीवनात काय पाहिजे? प्रत्येक व्यक्ती म्हणेल आम्हाला चांगलं आरोग्य, आनंदी जीवन, चांगलं घर किंवा आरामाचे जीवन पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला दुःख किंवा कष्टाचे जीवन नको हवं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती सुखाच्या मार्गाने धाव घेत आहे.ह्याच सुखाच्या मार्गाने जाण्यास आज प्रभू येशू ख्रिस्त आपणाला स्वतःच्या वधस्तंभाला मिठी मारायला सांगत आहे. ज्याप्रमाणे प्रभू येशू ने वधस्तंभाला मिठी मारली, त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनातील सर्व अडचणी, आपले काम, दुःख, त्रास हालअपेष्टा, आपली कर्तव्य प्रेमाने स्वीकारायला हवीत.झोपाळा जेवढा मागे जातो तेवढाच पूढे सूद्धा येतो. झोपाळा ज्या वेगाने मागे जातो त्याच वेगाने पूढे सूद्धा येतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात जेवढी दु:ख संकट येतील तेवढच सुख सुद्धा येईल. मात्र ज्यावेळी दुःख येतील, त्यावेळी प्रभूच्या क्रूसाकडे पाहणे व देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणे आणि देवाचे खरे शिष्य बनणे खूप गरजेचे आहे.

प्रत्येक लोक काही दिवसापुरतेच शिष्य असतात, तर काही महिन्यासाठी, तर काही वर्षासाठी शिष्य असतात. कारण ख्रिस्ताचा शिष्य बनल्यावर आपल्या संपूर्ण आयुष्यावर त्याचा कोणता परिणाम होणार किंवा आपल्याला काय सोडावे लागेल व ख्रिस्तासाठी कसे जगावे लागेल याचा आपण विचार करत असतो.

देवाचे खरे शिष्य बनण्यासाठी आपल्यांला कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाची गरज नसते. येशूच्या शिष्यांनी कोणत्याही प्रकारचा अभ्यास केला नव्हता. येशू ने साध्या अशिक्षित मच्छीमारांची निवड केली होती, आणि त्याच अडाणी अशिक्षित लोकांनी येशूची सुवार्ता जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य केले होते.आज आपण सर्व काही सोडून देवाचे खरे शिष्य बनण्यास देवाला होकार दिला पाहिजे. म्हणून आज आपण प्रत्येक गोष्टीत देवाची इच्छा जाणून घेऊन स्वतःला देवाच्या अधिकारात ठेऊया. सर्वांचा निर्माता जो परमेश्वर त्याला प्रथम स्थान देऊया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

 

आपला प्रतिसाद : हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

 

१. अखिल ख्रिस्ती विश्वाची काळजी वाहणारे आपले पोप व त्यांचे विविध पदांवर ख्रिस्तसेवेत असणारे प्रतिनिधी ह्यांनी अखिल मानवजातीला ख्रिस्तसेवक बनण्यास त्यांच्या ख्रिस्तमय वागणुकीने पाचारण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आजच्या ह्या स्पर्धात्मक व चंगळवादाच्या युगात मानव देवापासून दूर जाऊ लागला आहे. फक्त अडचणीत देवाचा धावा करावा हा त्यांचा युक्तिवाद नष्ट व्हावा व देवाने केलेल्या उपकारांची त्यांना जाणीव व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. अनेक तरुण तरुणी उच्च पदवीधर असूनही नोकरीसाठी इतरत्र भटकंती करत आहे त्यांना त्यांच्या शिक्षणायोग्य नोकरी मिळावी व त्यांच्या कुटुंबासाठी ते भक्कम आधारस्तंभ बनावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. गरजवंत कुटुंबाना हवी असलेली मदत मिळावी तसेच मुलांचा आरोग्य व शांततेत सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. ज्या स्थानिक लोकांचे अस्तित्व व ओळख धोक्यात आहे त्यांना योग्य तो सन्मान मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. आता आपण शांतपणे आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभूचरणी मांडूया.

No comments:

Post a Comment