Friday 27 January 2023

 






Reflection for the Homily for Fourth Sunday In Ordinary Time 
(29/01/2023) By  Fr. Suhas Pereira.





सामान्य काळातील चौथा रविवार

दिनांक: २९/०१/२०२३

पहिले वाचन: सफन्या २:३, ३:१२-१३

दुसरे वाचन: पौलचे करिंथकरांस पहिले पत्र १: २६-३१

शुभवर्तमान: मत्तय ५: १- १२




प्रस्तावना:

प्रिय बंधू-भगिनींनो, प्रत्येक मनुष्याला आपल्या जीवनात आनंद हवा-हवासा असतो. प्रत्येक मनुष्याला आनंदी जीवन जगायचे असते. परंतु प्रत्येक मनुष्याची आनंदाची व्याख्या आणि कल्पना वेगवेगळी असते. खरा आनंद काय आहे? आज आपण सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करत आहोत. आजची तिन्ही वाचने आपणास सांगत आहेत कि, खरा आनंद आपल्याला परमेश्वरच देऊ शकतो. तोच खऱ्या आनंदाचा स्रोत आहे. म्हणून ऐहिकतेमध्ये खरा आनंद न शोधता केवळ परमेश्वराकडून येणाऱ्या खऱ्या आनंदाचा शोध घेण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी आजची उपासना आपल्याला पाचारण देत आहे. आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा सफन्या आपल्याला सांगतो, कि जे लीनता आणि नम्रतेने परमेश्वराचा शोध घेतात आणि त्याच्या आज्ञा पाळून त्याचीच सेवा करतात अशांना खऱ्या शांतीचा आणि आनंदाचा अनुभव येईल. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथ येथल्या लोकांना देवाने त्यांना केलेल्या पाचारणाची आठवण करून देतो आणि त्यांना ऐहिकता आणि नैतिकता यांमधील फरक दाखवून देतो. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याला खऱ्या आणि चिरकाल टिकणाऱ्या आनंदाकडे जाणाऱ्या मार्गाबद्दल बोध करत आहे.


मनन चिंतन:

अस्सिसीकर संत फ्रान्सिस ह्याला परमेश्वराची हाक ऐकू आली, त्या क्षणापासून त्याने शुभवर्तमानात प्रभू ख्रिस्ताचे, "जा आणि तुज्याजवळ जे आहे ते सर्व गरिबांना दे" हे आव्हान स्वीकारले. परमेश्वराच्या आणि देवाच्या नजरेत खरोखर मुक्त होण्यासाठी, सर्व मानवी आणि ऐहिक हाव आणि लोभापासून मुक्त होण्यासाठी एके दिवशी तो गोर-गरिबांना आपला पैसा वाटत असताना सिल्वेस्टर नावाचा एक धर्मगुरू त्याचं निरीक्षण करत होता. त्याच वेळेला त्याला आठवण झाली कि त्याने फ्रांसिसला देऊळाचा जीर्णोद्धार करण्यासाठी दगड दिलेले होते. आता फ्रांसिसला गरिबांना पैसे वाटताना पाहून, आपणसुद्धा संधीचा फायदा घ्यावा आणि आपण दिलेल्या दगडाच्या मोबदल्यात पैसे मिळवावेत अशी इच्छा त्याच्या मनात उत्पन्न झाली आणि तो लगेच फ्रांसिसकडे गेला. फ्रांसिसने मात्र त्याला क्षणाचाही विलंब करता एक बटवाभर सोन्याची नाणी दिली. सिल्वेस्टरला अत्यानंद झाला आणि तो घरी गेला कारण तो अचानक खूप श्रीमंत झाला होता. परंतु त्याला मात्र मनातल्या मनात चांगलं वाटत नव्हतं. त्याचा अंतरात्मा त्याला सांगत होता, कि त्याने चूक केलेली होती: "मी एक धर्मगुरू आहे, वडीलधारी आहे तरीसुद्धा मला पैशाचा खूप मोह आहे. फ्रान्सिस हा तरुण आहे, धर्मगुरूसुद्धा नाही तरीसुद्धा त्याला पैशाचा मोह नाही आणि तो शुभवर्तमानात प्रभू येशूची शिकवण तंतोतंत पळत आहे." त्याच क्षणी सिल्वेस्टर त्याला मिळालेला सोन्याच्या नाण्यांचा बटवा घेऊन फ्रांसिस्कडे गेला आणि त्याला तो परत केला आणि विचारलं: "मी तुझ्याप्रमाणे प्रभू येशूचा खरा शिष्य होऊ शकतो का?" अशा प्रकार सिल्वेस्टरच्या जीवनाचा कायापालट झाला आणि तो अस्सिसीकर फ्रांसीसचा एक महत्वाचा साथीदार बनला.
फ्रान्सिस ज्याप्रमाणे शुभवर्तमानाची शिकवण जगला त्याप्रमाणे आपण जगू शकणार नाहीत. आपण फ्रान्सिस नाहीत. आजचं शुभवर्तमान आपल्याला आमंत्रण देत आहे.: “जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे." असं म्हणतात कि अस्सीसीकर संत फ्रान्सिस जितका गरीब बनला, तितकाच जास्त आनंद, खरा आनंद तो अनुभवू शकला. कारण इतरांना आपल्याकडील सर्वकाही देण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे तो स्वार्थत्यागी बनला. आजच्या शुभवर्तमानात धन्यवाद आपल्याला स्वार्थत्यागी, आत्मत्यागी, नम्र, लीन, दीन, दयाळू, नीतिमान आणि शांतीप्रिय बनण्यासाठी  आणि त्याद्वारे खऱ्या आणि परिपूर्ण आनंदाचा उपभोग घेण्यास आमंत्रण देत आहेत. आजचं शुभवर्तमान जणूकाही सर्वकाही उलटंच पाहत आहे. आजच शुभवर्तमान गरीब, दीन, दुःखी, नम्र, शोक करणारे, छळ होणाऱ्या आणि निंदा-नालस्ती होणाऱ्या लोकांना धन्य म्हणत आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, कि स्वर्गाचे राज्य अशा लोकांचेच आहे. प्रभू येशू जणूकाही नवीन आज्ञाच देत आहे. मोशेने ज्याप्रमाणे सियोन पर्वतावरून देवच्या दहा आज्ञा लोकांना दिल्या, त्याप्रमाणे प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात डोंगरावर गेला आणि त्याने जणूकाही लोकांना स्वर्गराज्यातील प्रवेशासाठी आवश्यक नियमावली सांगितली.
परंतु आपल्याला प्रश्न पडेल कि, नम्र, दीन, दुःखी, शोक करणारे, ज्यांचा छळ होतो, ज्याची निंदा होते अशी लोकं धन्य कशी असू शकतात? कारण, त्यांच्या अशा वाईट परिस्थितीमध्येच परमेश्वराचं प्रेम अनुभवण्याची आणि त्यांचं हृदय आणि जीवन दैवी प्रेमाने भरून घेण्याची कृपा आणि क्षमता त्यांना लाभते. आपल्या सभोवतालीसुद्धा अशी लोकं आहेत जी गरीब आहेत, दीन आहेत, ज्यांच्या जीवनात दुःखच आहे. तरीसुद्धा अशी लोकं मात्र आपल्या सभोवताली हास्य, आनंद, प्रेम पसरवत असतात, जगाला आनंद देतात. प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवन हेच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे. आजच्या शुभवर्तमानात सर्व धन्यवाद प्रभू येशू आपल्या जीवनात जगला. त्याच प्रभू ख्रिस्ताचे अनुकरण आपण करू या. आजचं शुभवर्तमान आपल्याला एक उदार जीवन जगण्याची प्रेरणा देत आहे. आणि आपण आजच्या शुभवर्तमानात धन्यवाद आपल्या जीवनात जगताना जरी अनेक वेळा अपयश आपल्या पदरी पडलं तरीसुद्धा आपण नाउमेद न होता, प्रयत्न करावेत आणि पुन्हा एकदा नवीन सुरुवात करावी म्हणून आजची उपासना आपल्याला बोध करत आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

जो प्रभू येशूचा आदर्श घेऊन, त्याने दाखवलेल्या मार्गावर जीवनक्रमण करतो तो खऱ्या

 आणि परिपूर्ण आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे आपण आपल्या

 गरज देवपित्याच्या चरणाशी मांडू या.

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐकून घे.

) हे प्रभो देऊळमातेच्या सर्व सेवकांनी नम्र बनून प्रभूची सुवार्ता पुढे ठेवत असलेल्या आव्हानांचा स्वीकार करावा आणि प्रभूच्या सुवार्तेचे निष्ठावंत सेवक बनावे, म्हणून आम्ही आज प्रार्थना करतो.

) हे प्रभो, दुःख, अन्याय, हिंसा आणि भ्रष्टाचाराने भरलेलं आमचं जग या सर्व गुलामगिरीतून मुक्त व्हावं आणि आमच्या जगात तुझ्याकडून येणारी शांती प्रस्थापित व्हावी म्हणून आम्ही आज प्रार्थना करतो.

) हे प्रभो, शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रासलेल्या आमच्या सर्व बंधू-भगिनींना तुझ्या कृपेचा गुणकारी स्पर्श व्हावा आणि त्यांना नवीन अरींगचे आणि जीवन लाभावे, म्हणून आम्ही प्रार्थना करतो.

) हे प्रभो तुझ्यावरील विश्वासात जीवन जगून, हे जग सोडून गेलेल्या आमच्या बंधू-

भगिनींना स्वर्गाचे सुख लाभावे म्हणून आम्ही आज प्रार्थना करतो.


No comments:

Post a Comment