Thursday 12 January 2023

 


Reflection for the Homily for Second Sunday in the Ordinary Time (14/01/2023) By Br. Gilbert Fernandes. 




सामान्य काळातील दुसरा रविवार

दिनांक: १४/ ०१/ २०२३

पहिले वाचन: यशया ४९: ३, ५-६

दुसरे वाचन: पौलाचे करिंथकरांस पहिले पत्र १: १०-१३

शुभवर्तमान: योहान १: २९-३४


विषय: “पाहा, हे देवाचे कोकरू. जगाचे पाप हरण करणारे."



प्रस्तावना:

प्रिय बंधू आणि भगिनींनो, नाताळचा काळ समाप्त झालेला आहे आणि आपण सामान्य काळात प्रवेश केलेला आहे. आज आपण सामान्यकाळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास सांगत आहे कि, येशु हा आपला देव आहे आणि तो आपल्यासाठी मरण पत्करून आपणास पापांतून मुक्त करील.

यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात यशया म्हणतो की, एक मसीहा येईल जो सर्वांना न्याय देवून एकत्रित आणणार आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल सुद्धा म्हणतो की, पवित्र शास्त्र हे आपणास देवाच्या आश्वासनाबद्दल माहिती देण्यासाठी आणि आपला विश्वास बळकट व्हावा म्हणून लिहिले गेले आहे. शुभवर्तमानात बाप्तिस्मा करणार योहान हा येशुबद्दलची साक्ष देतो आणि येशूला ‘देवाचे कोकरू’ असे संबोधतो. ख्रिस्तासारखे जीवन जगणे आणि त्याच्या प्रेमाच्या, दयेच्या आणि क्षमेच्या शिकवणुकीप्रमाणे आपले जीवन जगणे हाच आपल्यासाठी शांती आणि समेटाचा एकमेव मार्ग आहे.

आपण परमेश्वराकडे दयेची आणि क्षमेची याचना करू या. त्याने आपल्याला आपल्या पापांतून मुक्त करावे आणि ख्रिस्ताने दिलेल्या जीवनमार्गावर येणारे अडथळे त्याने काढावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

मनन-चिंतन:

आपलं जग हे मानवी स्वार्थामुळे, अहंकारामुळे, दृष्टपणामुळे, क्रूरपणामुळे नाशाच्या दरीकडे कूच करत आहे. कदाचित आपल्याला प्रश्न पडत असेल कि देवाने निर्माण करून सुशोभित केलेल्या आणि चांगुलपणाने भरलेल्या या माझ्या सुंदर जगात रोगराई, नैसर्गिक आपत्ती, दुष्टपणा, क्रूरता आणि अमानुषपणा कुठून आला? या सगळ्यांना जबाबदार कोण आहे? आणि हे सर्व आपल्या जगातून नष्ट कसं होऊ शकते? आपलं जग पुन्हा चांगल कसं होऊ शकते?

आपलं जग पुन्हा चांगल कसं होऊ शकते? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या शुभवर्तमानात मिळू शकते. बाप्तिस्मा करणारा योहान आपल्याला आज हे उत्तर देतो. जेव्हा तो प्रभू येशूला येताना पाहतो, तेव्हा तो म्हणतो: “पाहा, हे देवाचे कोकरू. जगाचे पाप हरण करणारे." होय ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तामध्येच सर्व प्रकारच्या बदलास आणि नाविण्यास आणि खास करून आपल्या ख्रिस्ती जीवनात बदल होण्यास सुरुवात होते.

बायबलमध्ये कोकरू ह्या शब्दाला फार महत्व आहे. कोकरू हा शब्द तीन महत्वाच्या बाबींचे प्रतिक आहे : सौम्यता, यज्ञ आणि विजय.

कोकरू हे सौम्यतेचे प्रतिक आहे:

कोकरू, सौम्य व निरपराधी प्राणी आहे. येशुसुद्धा सौम्य व नम्र होता. मत्तयलिखित शुभवर्तमानात येशु म्हणतो ‘माझ्यापासून शिका कारण मी मनाने लीन व सौम्य आहे’ (मत्तय १९:२९)

. कोकरू हे यज्ञपशूचे प्रतिक आहे:

जेव्हा योहानाने येशूला देवाचे कोकरू म्हणून संबोधले तेव्हा त्याला अर्पण केलेल्या यज्ञपशुची आठवण झाली. तसेच अब्राहामाला देवाने मुलाऐवजी मेंढरू दिले ह्याची आठवण झाली. येशु ख्रिस्त हा मानवाच्या तारणासाठी कोकरू बनला होता व कालवरी डोंगरावर त्याने स्वतःला अर्पण करून आपणास पापमुक्त केले.

. कोकरू हे विजयाचे प्रतिक आहे:

यहूदा मक्काबिच्या काळात शिंग असलेले कोकरू विजयाचे प्रतिक बनले. शमुवेल, दावीद व शलमोनाप्रमाणे मक्काबीचे वर्णन शिंग असलेले कोकरू म्हणून केलेले आहे. येशु ‘देवाचे कोकरू’ ह्याने सैतानावर व पापावर विजय मिळवला. हे विजयी कोकरू देवाच्या प्रजेची पापापासून मुक्तता करते आणि त्यांना देवराज्यात घेऊन जाते. तेथे तो त्यांच्यावर सत्ता गाजवतो म्हणून कोकरू हे विजयाचे प्रतिक आहे.

संत योहानाला आपल्याला सांगावयाचे आहे कि, परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे या जगात नाविन्य आणले आहे, प्रभू ख्रिस्ताद्वारे सर्व नवीन केले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपण परमेश्वराशी नव्याने संबंध किंव्हा नाते जोडू शकतो. जुन्या शास्त्रात वेगवेगळ्या विधींद्वारे, सोहळ्यांद्वारे आणि पशुबळींद्वारे परमेश्वराकडे जायचा प्रयत्न केला जात होता. परंतु, आता मात्र आपण येशूद्वारे परमेश्वराकडे जाऊ शकतो. प्रभू येशू हाच आता परमेश्वराकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. ज्याप्रमाणे मेंढरांच्या रक्ताद्वारे इस्रायली लोकांचे सर्व संकटांपासून आणि मोठ्या आपत्तीपासून संरक्षण झाले, त्याचप्रमाणे प्रभू येशूने क्रुसावर सांडलेल्या आपल्या रक्ताने आपल्या सर्वांची, या संपूर्ण मानवजातीची पापांतून मुक्तता करून आम्हाला तारणाचे दान दिले आहे. म्हणूनच बाप्तिस्मा करणारा योहान येशूला आपल्याकडे येताना पाहून उदगारला: "पहा हे देवाचे कोकरू, जगाची पापे हरण करणारे." (योहान १:२९)

जर आपण पहिले वाचन आणि शुभवर्तमान एकत्र वाचले, तर आपल्याला दिसून येईल, कि प्रभू येशू ख्रिस्त हाच तो सेवक आहे ज्याचा उल्लेख यशया संदेष्टा करतो. प्रभू येशू हा खरोखर सर्व राष्ट्रांना प्रकाश देणारा दिवा आणि जगातील सर्व माणसांचे रक्षण आणि तारण करण्याचा परमेश्वराचा एकमेव मार्ग आहे.” (यशया ४९:६) दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथ येथील ख्रिस्ती भाविकांना जे सांगतो, ते त्याने आपल्या सर्वांसाठी सुद्धा सांगितलेले आहे: "आपण सर्वजण देवाच्या सेवेला समर्पित केले गेलेलो आहोत आणि देवाने आपल्याला पवित्र होण्यास पाचारण केलेले आहे.” (१ करंथिकरांस पत्र १:२) होय परमेश्वराच्या पवित्र कोकराद्वारे, प्रभू ख्रिस्ताद्वारे आपण सर्व शुद्ध झालेले आहोत आणि आपलं देवाला समर्पण झालं आहे. ख्रिस्तामध्येच आपलं तारण आहे. ख्रिस्त हा सर्व राष्ट्रांचा प्रकाश आहे.

प्रभू येशू हाच परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे. तो आपला सर्वश्रेष्ठ आणि परममित्र आहे. तोच खरा वल्हांडणाचा कोकरु आहे, ज्याच्या रक्ताद्वारे आपण सर्व धुतले गेले आणि शुद्ध झाले आहोत. त्याच्याद्वारे आपल्या जीवनातील पापांचा अंधकार नष्ट झाला आहे. कारण त्याने त्याच्या मृत्यूने आणि पुनरुत्थानाने मृत्यूवर विजय मिळवला आणि सैतानाचा, पापाचा नाश केला. तोच मृत्युंजय ख्रिस्त आहे. त्याच्या रक्ताद्वारे आपलं तारण झाले आहे आणि प्रत्येक मिस्साबलिदानामध्ये आपल्याला या सत्याची आठवण करून दिली जाते, जेव्हा धर्मगुरू ख्रिस्तप्रसाद संस्कारा अगोदर पवित्र भाकर उंचावून म्हणतात: "पहा प्रभू येशू ख्रिस्त, देवाचे पवित्र कोकरू. या कोकराच्या भोजनास बोलाविण्यात आलेले आपण सर्वजण धन्य."

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: ‘हे परमेश्वराच्या पवित्र कोकरा, आमची प्रार्थना ऐक’.

१) आपले परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी आणि ख्रिस्तसभेच्या सर्व धार्मिक पुढार्यांनी सर्व ख्रिस्ती भाविकांना श्रद्धामय, प्रेममय आणि करुणामय जीवन जगण्यासाठी आणि ख्रिस्ती ऐक्याने बांधले जाण्यासाठी मदत आणि प्रेरणा द्यावी आणि त्यांच्या या पवित्र कार्यात त्यांना परमेश्वरी सहाय्य लाभावे म्हणून प्रार्थना करू या.

२) ख्रिस्तावरील विश्वासामुळे छळ, त्रास आणि अपमान सहन करावा लागणाऱ्या सर्व लोकांनी न भिता आणि अढळ श्रद्धेच्या बळावर आपले ख्रिस्ती जीवन जगण्यास परमेश्वराकडून कृपा आणि सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

३) सर्व आजारी, दुर्बल लोकांना परमेश्वराने आपल्या कृपेचा स्पर्श करून त्यांना नवजीवन द्यावे तसेच आत्म्याचे व शरीराचे चांगले स्वास्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

) आपल्या कुटुंबातील आणि आपल्या धर्मग्रामातील सर्व मृत व्यक्तींना दयाळू परमेश्वराने त्याच्या स्वर्गीय नंदनवनात चिरंतर शांती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

) आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करू या.


No comments:

Post a Comment