Friday 7 July 2023

          Reflections for the 14th Sunday in ordinary time (09/07/2023) by Fr. Benjamin Alphonso.


सामान्यकाळातील चौदावा रविवार 


दिनांक: ०९/०७/२०२३

पहिले वाचन: जखऱ्या ९: ९-१०

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:९-११, १३

शुभ वर्तमान: मत्तय:११:२५-३०








  “अहो, कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन”.

प्रस्तावना: -

            प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करीत आहे. आजच्या ह्या गडबडीच्या, गोंधळलेल्या जगात आजची वाचने आपल्याला ‘नम्र’ होण्यास बोलावीत आहे. भरपूर लोकं गौरवाने फुगलेले तसेच अहंकाराने भरलेले आपल्याला दिसतात. अशा वेळेला देव आपल्याला नम्र होण्यास सांगत आहे. आजचे पहिले वाचन जखऱ्याच्या पुस्तकातून घेतलेले आहे. संदेष्टा आपल्याला सियोनेच्या भावी राज्याची कल्पना देतो. हा भावी राजा न्यायी व यशस्वी असेल. तो मनाचा दिलाचा सौम्य व लीन असेल.

          संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात, आत्म्याचे कार्य आणि त्या आत्म्याने प्रेरित होऊन आपण जीवनात कसे वागावे हे नमूद करतो. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो कि, येशू आपल्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद देत आहे आणि आपणा सर्वांस बालकासारखे होण्याचे आमंत्रण देत आहे. मनुष्य जोपर्यंत नम्र, लहान होत नाही तो पर्यंत देवाच्या रहस्याची त्याला जाणीव होत नाही. आपण सर्वांनी नम्रता अंगी बाळगावी व परमेश्वराचा गौरव पाहावा, म्हणून पवित्र मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

मनन चिंतन : -

          आज आपल्याला जगात आढळते कि, सर्वत्र अशांतता आहे. भरपूर ठिकाणी मारामाऱ्या, युध्ये, भांडणे सुरु आहेत. आपण जर ह्या गोष्टीचे विश्लेषण केले तर आपल्याला समजेल कि, ह्याच मुख्य कारण म्हणजे माणसामध्ये असलेला ‘मी’ पणा. आज भरपूर लोकं स्वार्थी झाली आहेत. जगात अहंकार वाढलेला आहे. अशा ह्या सामाजिक परीस्थित प्रभू ख्रिस्त म्हणत आहे कि, जे मनाने लीन व सौम्य ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आणि देव नक्कीच त्याचा मोबदला देईल. जे लीन, सौम्य व लहान असतात ते कधीच दुसऱ्यांना आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता दिखाऊपणाची भूमिका घेऊन दाखवायचा प्रयत्न करत नाही. ते सतत विनम्र, सहनशील, दुसऱ्यांपेक्षा कमी आणि इतर सर्व माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असेच समजतात.  अशा अनेक महान लोकांची उदाहरणे  आपल्या समोर आहेत. महान शास्रज्ञ आयझाक न्यूटन, महान नेते अब्राहाम लिंकन, नेल्सन मंडेला तसेच पवित्र लोकं, विशेष करून संत मदर तेरेजा, पोप संत जॉन पॉल दुसरे; ज्यांनी स्वतःला नेहमी नम्र म्हणून संबोधले व ह्याचं जीवन सुद्धा एक नम्रतेची साक्ष आहेत.

          एकदा एक साधू संत होता. तो फार प्रसिद्ध व पवित्र होता. त्याचे जीवन साधे होते. अनेक लोकांना तो साधू मदत करायचा आणि त्यांच्या समस्या सोडवायचा आणि देवाला सुद्धा हा साधू संत आवडायचा. देवाला ह्या संत पुरुषाला वरदान द्यायचे होते म्हणून देवाने आपल्या एका दुताला त्याच्याकडे पाठवले. देवाच्या दुताला पाहून साधू पुरुष आनंदी झाले, त्याने त्या देवदुतांचे स्वागत केले. तेव्हा  देवाचा दूत त्या साधूला म्हणाला कि, देव तुझ्या वागणुकी बद्दल फार खुश आहे. देवाचे वरदान देण्यासाठी मला तुझ्याकडे पाठवले आहे. तेव्हा त्या साधूने देवदूताचे आभार मानले व नम्र पणाने म्हणाला कि मला काही वरदान नको. मी जसा आहे तसा खुश आहे. तेव्हा देवदूत म्हणाला कि तू चमत्कार करण्याचे वरदान मांग. तेव्हा त्या पवित्र साधूने पुन्हा नम्र पणे नकार दिला. देवदूत त्या पवित्र साधूला म्हणाला कि, तु लोकांना आजारातून बरे करण्याचे वरदान मांग. तेव्हा पुन्हा साधूने देवाचे माभर मानत नम्र पणे  नकार दिला. तेव्हा देवदूत म्हणाला कि मी देवाकडून आलो आहे आणि वरदान दिल्याशिवाय देवाकडे जाऊ शकणार नाही. तेव्हा साधू संत म्हणाला कि, मग असे वरदान दे कि जेव्हा जेव्हा सूर्य तळपेल आणि कोणी गरजू व्यक्ती माझ्याकडे येईल तेव्हा त्याच्यावर सूर्य किरणे पडतील तेव्हा मला न कळाता त्याच्या मागण्या पूर्ण होऊ दे. देवदुताने उत्तर दिले, तथास्तु.    

          होय प्रिय भाविकांनो, संत लोकं मोठ्या आनंदाने येशू ख्रिस्ताच्या नम्रतेचा धडा गिरवत असतात. जे खरोखर नम्र, लहान असतात तेच परमेश्वराच्या दृष्टीकोनातून महान बनत असतात. नम्र होणे म्हणजे स्वतःला वाकून घेणे. दुसऱ्यांना आपल्या पेक्षा महान समजणे होय.

          प्रभू येशूख्रिस्त नम्रतेचे सगळ्यात महान व सुंदर उदाहरण आहे. मारिया माता सुद्धा स्वतः नम्र झाली. आजच्या तिन्ही वाचानाद्वारे प्रभू आपल्याला त्याच्यापासून शिकण्यासाठी आमंत्रण देत आहे. त्याच्यासारखे सौम्य, लीन,सरळ व नम्र होण्यासाठी आव्हान देत आहे. आपण जीवनात नेहमी, लीन, नम्र व्हावे म्हणून आजच्या ह्या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना: -

प्रतिसाद: - प्रभू, आमच्या प्रार्थाना स्वीकारून घे.

१.        1.   येशू ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार वागण्यास आपल्याला आपल्या धार्मिक नेत्यांना विशेषकरून             पोप फ्रान्सिस, महागुरू व धर्मगुरू ह्याना प्रभूने मार्गदर्शन करावे  म्हणून प्रार्थना करूया.

2.   प्रभू येशू ख्रिस्ताची सौम्येतेची व लीनतेची शिकवण आपण आचारणात आणून एक चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून प्रार्थना करूया.

3.   ह्यावर्षी भरपूर चांगला पाऊस पडावा. तसेच लोकाची शेतकरयाची शेती चांगली व्हावी म्हणून प्रार्थना करूया.

4.   मणिपूर येथील ख्रिस्ती बांधवासाठी तसेच जे दुख:त व अडचणीत आहे त्याच्यासाठी प्रार्थना करूया. परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावी व त्याचा विश्वास मजबूत व्हावा म्हणून प्रार्थना करूया.

5.   आपल्या व्यैयक्तीक गरजासाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment