Friday 21 July 2023

 Reflections for the 16th Sunday in Ordinary Time (23/07/2023) by Br. Reon

 


सामान्यकाळातील सोळावा रविवार

 

दिनांक: २३/०७/२०२३

पहिले वाचन: ज्ञान ग्रंथ १२:१३,१६-१९

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२६-२७

शुभवर्तमान: मत्तय १३:२४-४३





प्रस्तावना

        आज आपण सामान्यकाळातील सोळावा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपणास देवाच्या राज्याची प्रचीती देत आहे. अनेक वेळेस आपण ख्रिस्ती आदर्श इतरांना देण्यास कमी पडत असतो. अनेक वेळेस आपल्याला हे ख्रिस्ती जीवन जगणे, लाजिरवाणी वाटत असते. हे सर्व करत असतांना आपण ख्रिस्ताचे राज्य ह्या भूतलावर आणण्यास मागे जात असतो. लहान-मोठी सत्कार्ये करण्यास आपणास लाज वाटते व आपण इतरांपर्यंत ख्रिस्त पोहोचवीत नाही. देवाचे राज्य ह्या जगात यावे व ते प्रस्थापित करण्यास आपला हातभार लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

मनन चिंतन

        सामान्यकाळातील सोळाव्या रविवारी ख्रिस्तसभा आपणास स्वर्गाच्या राज्याविषयी उलघडा करत आहे. आजच्या शुभवर्तमानात आपल्या समोर देऊळमाता तीन दाखले सादर करीत आहे. ते म्हणजे गहू आणि निन्दन, मोहरीच्या दाण्याचा व खमिराचा. ह्या तिन्ही दाखल्यांमधून आपणास देऊळमाता व खुद्द प्रभू येशुख्रिस्त काय सांगू इच्छितोय. आजची तिन्ही वाचने आपल्याला देवाचे राज्य कसे आहे ते कसे वाटते ह्याची माहिती आपणास देण्याचा प्रयत्न करत आहेत. इतिहास पाहिला तर आपणास कळून चुकेल कि, जगातील सर्व राज्ये भौतिक पार्श्वभूमीवर दाखवले जातात अथवा जिंकली जातात. हि राज्ये जिंकण्यासाठी अथवा विस्तारकार्ण्यासाठी अनेक महान कृत्ये व शौर्याची कामे अनेक राजे व त्यांचे सैनिकांना करावी लागली. जेव्हा आपण देवाचे राज्य म्हणतो ते भौतिकरित्या आपण दर्शवू शकत नाही कारण ते राज्य लोकांमध्ये आहे, लोकांच्या हृदयामध्ये आहे.

        ज्या प्रमाणे एखाद्या बी मध्ये फळ देण्याचे, मोहरीच्या दाण्यामध्ये झाड व इवलेशे खमिरात पीठ फुगवण्याचे सामर्थ्य आहे; त्याप्रमाणे आपणातही देवाचे राज्य विस्तारित करण्याचे सामर्थ्य आहे. ह्या सामर्थ्याची जाणीव आपणास नसली तरीही देवाला त्याची ओळख आहे. म्हणूनच परमेश्वर आपणास संधी देत आहेतो, वेळ देत असतो; जेणेकरून आपणात बदल होईल व आपण देखील देवाच्या राज्यास योग्य बनू. सर्वात प्रथम आपण देवाच्या राज्याची वैशिष्टे पाहूया. आजच्या पहिल्या वाचनात आपणास कळून येते कि, देवाच्या राज्यात न्याय मिळतो, ह्या राज्यात आपणास दया अनुभवण्यास मिळते, देवाच्या सामर्थ्याचे दर्शन देखील मिळते; देव सहनशीलतेने आम्हावर राज्य करतो, देव आपल्या वर्तनाने आपल्या लोकांना शिकवतो व पश्चातापाची संधी आपणास देत असतो. ही काही वैशिष्टे आपणास कळून चुकतात. हे देवाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणणे गरजेचे आहे ; त्या म्हणजे

१.                        छोटी सुरवात: - ज्या प्रकारे मोहरीचा दाणा सर्वात लहान असून देखील त्याचे एका मोठ्या वृक्षात रुपांतर होते त्याच प्रकारे आपणही देवाच्या राज्यासाठी लहान गोष्ठी करण्यास मागे पडू नये. अनेक वेळेस आपण विचार करतो कि, माझ्या ह्या लहान वर्तनाने अथवा कृत्याने काय फरक पडणार आहे? परंतु आपल्या ह्या लहान सत्कृत्याने महान अशा देवाच्या राज्याला ह्या भूतलावर प्रस्थापित करण्यास मदत होईल.

२.                        विश्वास: - स्वत:वर तसेच परमेश्वराच्या सामर्थ्यावर व त्याच्या योजनेवर  आपला विश्वास असणे गरजेचे आहे. पवित्र शास्त्र विश्वासाच्या अनेक उदाहरणांनी भरलेले आहे. जर का आपला विश्वास त्या परमेश्वरावर व त्याच्या सामर्थ्यावर असला तर आपण देवाचे कार्य करण्यास कधीच कमकुवत पडणार नाही.

३.                        वेळ: - गहू आणि निन्दानाच्या दाखल्यांमध्ये देव त्यास वाढण्यास वेळ देत आहे. त्याच प्रकारे तो आपणालाही आपली दुभावाची वर्तणूक बदलण्यास वेळा देत आहे. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर, आपल्याला अनेक अनैतिक लोकं, दुराचार करणारे लोकं ह्या जगात आढळतात व त्यांची प्रगतीही तितक्याच वेगाने होत असते. अनेक वेळेस आपणास प्रश्न उद्भवतो कि देव त्यांचा न्याय का करत नाही? कारण देवाच्या राज्याचे वैशिष्ट आहे कि देव दयाळू आहे. तो पश्चातापास वेळ देत असतो.

४.                        आसरा देणे: - ज्या प्रकारे मोहरीचे झाड पक्षांना आसरा देते त्या प्रकारे आपणही गरजू व्यक्तींना आसरा देणे; त्यांच्या मदतीस धावणे गरजेचे आहे. देवाचे राज्य हे लोकांनी बनवलेले असल्या कारणाने एक दुसऱ्यांची काळजी घेणे त्याच्या राज्याचा नियम आहे.

५.                        बदल घडवणे: - ज्या प्रकारे मोहरीचा दाणा व मापभर खमिराने बदल घडवून आणला त्या प्रकारे आपणही आपल्या कार्याने, वर्तणुकीने समाजात बदल घडून आणायला पाहिजे. आपल्या वागण्याने व व्यवहाराने आपण इतरांना नेहमी प्रेरित करावे म्हणून आपला जन्म ह्या भूतलावर झाला आहे.

        प्रश्न असा उभा राहतो कि, हे सर्व माझ्याने होईल का? मी तर अशक्त, निर्बल, व पापवासनांना आहारी गेलेला मनुष्य आहे. परंतु संत पॉल आजच्या दुसऱ्या वाचनात आपणास सांगत आहे कि, “आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो”. म्हणूनच संत पॉल म्हणतो, “जेव्हा मी अशक्त तेव्हा मी सशक्त आहे (When I am Weak, then I am Strong).

        आपणा सर्वांस देवाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी देवाचे सामर्थ्य व मदद मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. विश्वव्यापी ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले परमचार्य पोप फ्रान्सिस सर्व व कार्डिनल, बिशप्स धर्मगुरु, धर्म-भगिनी यांना चांगले स्वास्थ्य लाभावे व परमेश्वराचा शब्द लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्याद्वारे परमेश्‍वराचे राज्य प्रस्थापित व्हावे म्हणून प्रार्थना करूया.

२. स्वर्गीय पित्या, आम्ही येशूच्या नावाने तुझ्याकडे आलो आहोत, मणिपूर राज्यावर तुझी दया दाखव. व  या प्रदेशात शांतता आणि एकत्रितपणा यावा , व  हिंसाचार आणि जातीय संघर्ष थांबावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्याला या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस मिळावा व आपल्या शेतकरी बांधवांना चांगले पीक मिळावे आणि आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जे लोक निस्वार्थीपणे देवाची सेवा करत आहेत व जे लोक या जीवघेण्या आजारात लोकांना अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करत आहेत, त्याचप्रमाणे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, शासकीय कर्मचारी यामध्ये सहभागी असलेली इतर सर्व लोक यांना परमेश्वराचे मार्गदर्शन लाभावे, तसेच त्यांना निरोगी स्वास्थ्य लाभावे म्हणून प्रार्थना करूया.

४. जे लोक बेघर आहेत अन्न-पाण्याविना जीवन जगत आहेत. जे आजारी आहेत अशा सर्वांना योग्य वेळी मदत मिळावी व त्यांच्या ही गरज पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक घरासाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment