Friday, 10 January 2025

Reflection for the Solemnity of the Baptism of the Lord (12/01/2025) 

By: Fr. Rakesh Ghavtya.


येशूच्या स्नानसंस्काराचा सण

दिनांक: १२/०१/२०२५

पहिले वाचन: यशया: ४०:१-५, ९-११

दुसरे वाचन: संत पौलाचे तीताला पत्र २:११-१४, ३:४-७

शुभवर्तमान: लूक ३:१५-१६, २१-२२


प्रस्तावना

        आज अखिल ख्रिस्तसभा प्रभूयेशूच्या स्नानसंस्काराचा सण साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला कृपेचे जीवन जगण्याचे प्राचारण करत आहे.

        आजचे पहिले वाचन यशया संदेष्याच्या पुस्तकातून घेतले आहे. या वाचनात सियोन सबंधी परमेश्वराचे सांत्वनपर उदगार ऐकायला मिळतात. परमेश्वराची वाणी ऐकू येते की, "अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा." परमेश्वर पराक्रमासारखा येत आहे.

        दुसऱ्या वाचनात संत पौलचे तीताला पत्र यात आपण ऐकतो की, देवाने नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्याद्वारे आपल्या दयेनुसार आपणास तारिले. त्यांने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्याद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे. त्यामुळे जी कृपा लाभली आहे त्यास्तव आपण जीवनाचे वारीस झालो आहोत.

        शुभवर्तमानात आपण योहानाची प्रभूयेशूबद्दलची साक्ष ऐकतो. योहान बाप्तीस्ता म्हणतो की, "मी तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो, परंतु जो (येशू) माझ्यापेक्षा समर्थ आहे तो तुम्हांला पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा देईल." येशूने योहान मार्फत बाप्तिस्मा घेतला असताना, पवित्र आत्मा देह रूपाने कबूतराप्रमाणे त्याच्यावर उतरला व देवाने आपल्या पुत्राला प्रकट केले.

        प्रभूयेशुचा बाप्तिस्मा आपल्याला प्रत्येकाच्या बाप्तिस्म्याची आठवण करून देतो. हा जो स्नान संस्कार आम्ही स्वीकारला आहे, त्यामुळे आमच्यात देवाची कृपा आली असून पवित्र आत्मा कार्यरत आहे. त्यामुळे आम्ही आमचे ख्रिस्ती जीवन जगताना ख्रिस्ताला परिधान करूया.

        म्हणजे आमच्या संपूर्ण आचरणातून ख्रिस्त प्रकट व्हावा. या मिस्साबलिदानात सहभाग घेत असताना लागणारी कृपा व आशीर्वाद देवाकडे मांगूया.


मनन चिंतन

        ख्रिस्ती जीवनाचा आध्यात्मिक प्रवास हा स्नानसंस्कार (बाप्तिस्मा) या संस्काराने सुरू होतो. या संस्काराद्वारे ख्रिस्ती व्यक्तीसाठी दैवी कृपेचा खजिना उपलब्ध करून दिला जातो व परिपूर्ण जीवनासाठी आवश्यक असलेले प्रेम तिच्यातही उत्पन्न केले जाते. म्हणून स्नान संस्कार हे देवाने मानवाला दिलेले सुंदर वरदान आहे.

        इ.स. १४४२ साली फ्लोरेन्स येथे भरलेल्या धर्मसभेमध्ये अशी शिकवण देण्यात आली होती की, “पवित्र स्नान संस्कार” हा ख्रिस्ती जीवनाचा पाया, पवित्र आत्म्याच्याठायी मिळणाऱ्या नवजीवनाकडे नेणारे प्रवेशद्वार आणि इतर संस्काराचे भांडार उघडे करून देणारा दरवाजा आहे. स्नानसंस्काराद्वारे पापापासून आपली सुटका होते व आपण देवाची मुले म्हणून नवजीवन मिळवतो. आपण ख्रिस्ताचे अवयव बनतो, ख्रिस्त सभेमध्ये आपला समावेश होतो आणि ख्रिस्त सभेच्या प्रेषित कार्यात आपल्याला सहभाग दिला जातो.

        रोमन धर्मग्रंथ खंड २:-५ मध्ये असे म्हटले आहे की, "प्रभू शब्द आणि पवित्र पाण्याच्या अभिषेकाद्वारे नवजीवन देणारा संस्कार म्हणजे स्नान संस्कार होय."

        या संस्काराला पवित्र आत्म्याठायी नवजीवन असेही म्हटले जाते. यासंदर्भात ख्रिस्ताचे वचन म्हणते, "पाण्याने आणि पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाल्याशिवाय आणि नव्याने जन्म घेतल्याशिवाय कोणीही स्वर्गराज्यात प्रवेश करू शकत नाही." (तीत: 3:5) (योहान: ३:५) म्हणूनच स्नानसंस्काराद्वारे ख्रिस्ताच्या ठायी नवजीवनामध्ये आपला जन्म होतो व हा संस्कार तारणासाठी आवश्यक आहे.

        ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आपल्याला आपल्या बाप्तिस्माची आठवण करून देतो. आजच्या शुभवर्तमानात आपण येशूच्या बाप्तिस्माविषयी ऐकतो. येशूने यार्देन नदीत संत योहान बाप्तिस्ता यांच्याहस्ते बाप्तिस्मा स्वीकारून मगच आपल्या प्रेषितीय कार्यास सुरुवात केली. येशू प्रार्थना करीत असताना आकाश उघडले गेले व येशूच्या बाप्तिस्माचा प्रकट झाला. याच क्षणी येशूला अं:तरिक पाचारण व मिशन कार्य करण्याची प्रेरणा देण्यात आली.

        कॅथोलिक ख्रिस्तसभेच्य श्रद्धाग्रंथात असे नमूद करण्यात आले आहे की, "प्रभुने केवळ पाप्यांसाठी असलेला बाप्तिस्मा स्वच्छेने स्वीकारला तो फक्त सर्व धर्माचरण परिपूर्ण व्हावे म्हणूनच." (मत्तय ३:१५) त्याद्वारे “त्याने आपणास रिक्त केले.” (फिलिप्पी २:) जो आत्मा जगाच्या प्रारंभी जलाशयावर तळपत होता, तो आत्मा ख्रिस्तावर पाठवून देवाने नवनिर्मितीच्या कार्याचा शुभारंभ केला व येशूला आपला परमप्रिय पुत्र म्हणून घोषित केले. (मत्तय ३: १६-१७)

        "तू माझा प्रिय पुत्र आहेस; तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे." (लुक ३: २२) या वाणीतून असे प्रकट होते की, येशूचा आपल्या बापाशी घनिष्ठ संबंध होता. यासंदर्भात परमेश्वराचे शब्द स्तोत्रकारांच्या वाणीतून ऐकू येतात, "तू माझा पुत्र आहेस; आज मी तुला जन्म दिला आहे." (स्तोत्र २:) तसेच यशयाच्या पुस्तकात (४२:) आपण ऐकतो, "पहा, हा माझा सेवक! याला मी आधार आहे; पहा, हा माझा निवडलेला! याच्याविषयी मी आपला आत्मा घातला आहे." या वाणीद्वारे येशूच्या पवित्र मिशन कार्याला सुरुवात झाली.

        स्वतःच्या दुःखसहनाद्वारे येशूने अखिल मानवजातीसाठी स्नानसंस्काराचा झरा खुला केला. त्यामुळेच देवराज्याच्या प्राप्तीसाठी पाण्याचा आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेऊन नव्याने जन्म घेणे शक्य झाले आहे. प्रेषित पौलाच्या मते, स्नानसंस्कारामध्ये ख्रिस्ती श्रद्धावंत ख्रिस्ताबरोबर मरण पावतो, पुरला जातो आणि त्याच्यासह जिवंत होतो. आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्स्तीस्माने त्याच्या बरोबर पुरलो गेलो ह्यासाठी  कि, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला त्याचप्रमणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. (रोम ६:-) यावरून आपल्याला अशी जाणीव होते की स्नान संस्काराचा संबंध श्रद्धेशी आहे.

        संत अगस्तीण ह्यांनी स्नानसंस्काराविषयी पुढील उद्गार काढलेले आहेत: "स्नानसंस्कारामध्ये शब्द देहधारण करतो आणि संस्कार रूपाने आपल्यामध्ये वस्ती करतो. म्हणून स्नानसंस्कार हा आपल्याला केवळ पापापासून शुद्ध करतो इतकेच नव्हे, तर आपल्याला अंतर्बाह्य नवीन करतो. आपण एक नवी उत्पत्ती बनतो, देवाचे दत्तक पुत्र बनतो, ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी बनतो, ख्रिस्ताचा अवयव आणि त्याचबरोबर सहवास बनतो." (१ करिंथ ६:१५) तसेच, "आपण पवित्र आत्म्याचे मंदिर बनतो." (१ करिंथ ६:१९)

        देवाची कृपा ही आम्हा सर्वांवर सदैव असते. ती अनुभवण्यासाठी आम्हाला प्रत्येक संस्कार दिला जातो. बाप्तिस्मा या संस्काराद्वारे आम्ही शुद्ध होऊन आमचे जीवन कृपेने भरते. जसा येशूने बाप्तिस्मा घेतला व देवाची कृपा त्याच्यावर राहिली, त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा बाप्तिस्मा घेतो, तेव्हा देव आम्हालाही त्याची कृपा बहाल करतो.

म्हणून येशूच्या बाप्तिस्म्याची आठवण आपल्याला तीन गोष्टींची ओळख करून देते:

1. येशूचा बाप्तिस्मा आपल्याला आमची ओळख करून देतो:
आपण कोण आहोत व कोणाचे आहोत याची ओळख होते. बाप्तिस्माद्वारे आपण देवाची प्रेमळ लेकरे बनतो, येशूचे भाऊ-बहीण व ख्रिस्त सभेचे उमेदवार म्हणून ओळखले जातो. यास्तव आम्ही देवाच्या सान्निध्यात राहून कृपेचा अनुभव घ्यावा.

2. येशूचा बाप्तिस्मा आम्हाला आमच्या मिशन कार्याची आठवण करून देतो:
देवाचे अस्तित्व आम्हाला व इतरांमध्ये अनुभवून आम्ही देवाच्या लोकांवर प्रेम करावे, त्यांची सेवा करावी व त्यांना आदराने वागवावे. आम्ही आमचे ख्रिस्तीजीवन चांगले आचरण धारण करून जगावे व ख्रिस्ताचा संदेश इतरांपर्यंत शब्दांनी आणि कृत्यांनी पसरावा. तसेच, आम्ही पवित्र जीवन जगून कृपेने भरले जावो व इतरांना देवाची कृपा मिळवून द्यावी. म्हणून सतत प्रार्थना करत राहावे.

3. येशूचा बाप्तिस्मा आम्हाला आमच्या बाप्तिस्म्याची आठवण करून देतो:
स्नानसंस्काराद्वारे आपण ख्रिस्ताच्या याजक, संदेष्टा व राजा या तिन्ही भूमिकेतून प्रेषितकार्यात सहभागी होत असतो. स्नानसंस्काराद्वारे सर्वांना सामान्य याजकपदात सहभाग मिळत असतो. स्नान संस्काराद्वारे ख्रिस्तामध्ये एक झालेली व्यक्ती ख्रिस्तस्वीकार करते. त्याच स्नान संस्काराद्वारे आपण ख्रिस्ताचे आहोत ह्या पदाला जणू ण पुसला जाणारा हा आध्यात्मिक ठसा आमच्या ख्रिस्ती जीवनावर उमटविला जातो. ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेल्या आम्ही ख्रिस्ताचे बनलो, व पवित्र आत्म्याच्या कृपाशक्तीने आमच्यावर ख्रिस्ताचे तेज पसरते.

        या मिस्साबलिदानात सहभाग घेत असताना देवाकडे हीच प्रार्थना करूया की, "हे परमेश्वरा, आम्हाला तुझ्या कृपाशीर्वादाने भर. म्हणजे आम्ही पवित्र जीवन जगून तुझी प्रेमळ मुले म्हणून गणली जाऊ."

जीवनात देवाला ओळखावे. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

धर्मगुरू:

आज आपण प्रभूयेशुच्या स्नानसंस्काराचा सण साजरा करताना देवाचे आभार मानूया, कारण देवाने आपल्याला बाप्तिस्मा हा संस्कार दिला आहे व आपल्याला त्याची प्रिय लेकरे बनविली आहेत. याच देवाकडे कृपेची याचना करूया, की त्याद्वारे आपण योग्य ख्रिस्ती जीवन जगू.

प्रतिसाद: प्रभू, आम्हाला तुझ्या कृपेने भर.

१.  सर्वसमर्थ प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या चरणी आमचे पोप महाशय फ्रान्सिस महागुरू, सर्व धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी यांसाठी विशेष प्रार्थना करतो. त्यांच्या प्रेषितीय कार्यात तुझ्या सहवासाचा अनुभव व पवित्र आत्म्याचा स्पर्श होऊ दे. ते कृपा व आशीर्वादाने भरून त्यांच्याकडून उत्तम सेवा घडवू यावी, म्हणून प्रार्थना करूया.

२. सर्वसमर्थ दयाळू परमेश्वरा, आम्ही सर्व बाप्तिस्मा घेतलेल्या बंधू-भगिनींसाठी खास प्रार्थना करतो. आम्ही सर्वांनी आमचे अंत:करण शुद्ध ठेवून कृपेच्या जीवनाकडे वाटचाल करावी, म्हणून प्रार्थना करूया.

३. सर्वसमर्थ प्रेमळ पित्या, आम्ही या क्षणी ख्रिस्ती भाविकांसाठी प्रार्थना करतो, जे बाप्तिस्मा स्वीकारण्यासाठी तयारी करत आहेत. त्यांना तुझ्या अस्तित्वाची जाणीव होऊ दे व पवित्र आत्म्याच्या स्पर्शाने त्यांचा विश्वास वाढू दे व त्यांच्या श्रद्धेत भर होऊ दे, म्हणून प्रार्थना करूया.

४. सर्वसमर्थ दयाळू पित्या, आम्ही आमच्या तरुण-तरुणींसाठी प्रार्थना करतो, जे तुझ्यापासून दुरावलेले आहेत व ऐहिक गोष्टींच्या मागे लागले आहेत. त्यांना तुझ्या शक्तीने जवळ आण, म्हणजे ते पुन्हा एकदा ख्रिस्ती जीवन विश्वासाने व भक्तिभावाने जगण्यास पुढे यावेत, म्हणून प्रार्थना करूया.

५. सर्वसमर्थ शक्तिशाली परमेश्वरा, आम्ही सर्व आजारी, दुःखी, कष्टी व निराश झालेल्या लोकांसाठी विशेष प्रार्थना करतो. त्यांना तुझ्या गुणकारी स्पर्शाने बरे कर, सुखी व समाधानी ठेव आणि त्यांना चांगल्या आरोग्याचे वरदान दे. म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो.

६. (थोडावेळ शांत राहून आपल्या खासगी आणि सामुदायिक हेतूसाठी विशेष प्रार्थना करूया.)

धर्मगुरू:

हे स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या अपार प्रेमामुळेच आम्हाला बाप्तिस्मा या संस्काराद्वारे कृपा मिळते. आमच्या या गरजा व विनंती तुझ्यासमोर ठेवत असताना, तुझ्या इच्छेने त्या सफल कर व आम्हाला तुझ्या सान्निध्यात ठेव, की जेणेकरून आम्ही आमचे ख्रिस्ती जीवन तुझ्या श्रद्धेने व विश्वासाने जगू. ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करतो.

No comments:

Post a Comment