Friday, 13 June 2025

Reflection for the SOLEMNITY OF THE MOST HOLY TRINITY (15/06/2025) by Dn. Reon Andrades

पवित्र त्रैक्याचा सण

दिनांक: १५/०६/२०२५

पहिले वाचन: नितीसुत्रे ८:२२-३१

दुसरे वाचन: रोमकारास पत्र ५:१-५

शुभवर्तमान: योहान १६:१२-१५


प्रस्तावना

    आज आपण पवित्र त्रैक्याचा सण साजरा करत आहोत. आजच्या दिवशी देउळमाता आपणास त्रैक्याच्या रहस्यावर मनन करण्या आमंत्रण करत आहे. स्वर्गीय पित्याने हा निर्माणकर्ता असून प्रभू येशू हा आपला तारणारा आहे व पवित्र आत्मा हा आपल्याला पवित्रतेने भरतो. म्हणून आपण पवित्र त्रैक्यावरील आपला विश्वास दृढ करून प्रकट करायला हवा.

   आपण आपल्या ख्रिस्ती भक्तीमध्ये पवित्र त्रैक्याला संबोधून आपल्या प्रार्थनेची सुरुवात करतो. कारण आपल्याला पित्याची प्रीती, पुत्राची कृपा व पवित्र आत्म्याचा सहवास सतत लाभत असतो.

    आजची वाचणे आपल्याला पवित्र त्रैक्याची ओळख करून देतात. जसे पिता, पुत्र व पवित्र आत्मा एक आहेत व त्यांच्यात धनिष्ट प्रेमाच नात आहे. त्याप्रमाणेच आमच्या खासगी जीवनात व कौटूबिंक जीवनात असचं प्रेमाच नात असाव, म्हणून या मिस्साबलीदानात सहभाग घेत असताना विशेष प्रार्थना करूया.

मनन चिंतन

       प्रत्येक ख्रिस्ती भक्ति आपण पवित्र त्रैक्याच्या नावाने सुरू करतोम्हणजे पितापुत्र व पवित्र आत्मा. आज आपण ह्या रहस्याला सहजपणे स्वीकारतो, कारण हा विश्वास आपणास आपल्या पूर्वजांनी दिला आहे. परंतु आपण कधी प्रश्न विचारला आहे का? की हे रहस्य आपल्या पूर्वजांनी कसं अनुभवलं”. त्रैक्य ही एक मानसिक कल्पना नसून, एक अनुभव आहे. पूर्वजांना म्हणजेच येशूच्या काळी व त्याच्या मरणानंतर विश्वास ठेवणाऱ्यांनी हा अनुभव ख्रिस्तामुळे आला. येशू ख्रिस्त हा जागतिक जीवन जगत असताना त्याने आपल्याला पित्याची ओळख करून दिली. तसेज पवित्र आत्म्याच्या सहकार्याने अनेक चमत्कार केले. अनेक भूतें काढली व मोहावरती मात देखील मिळवून तो विजयी झाला. सर्वात प्रथम येशूने आपला पिता हा देव आहे याची ओळख आपणास करून दिली. येशूच्या पुनरुत्थानानंतर त्याच्या शिष्याने येशू ख्रिस्ताला देव म्हणून अनुभवलं, तदनंतर पेंटेकॉस्टच्या सणानंतर त्याच्या शिष्याने पवित्र आत्म्याला देव म्हणून अनुभवलं. अशा प्रकारे त्याच्या शिष्यांनी व प्रथम ख्रिस्त सभेने तीन व्यक्तींमध्ये एका देवाला अनुभवलं. हे तीन व्यक्ती तीन वेग-वेगळे देव नसून एकच देव आहे, असा अनुभव त्या लोकांनी घेतला व तो आपणाला शिकवला. म्हणून आज आपण एक देव, तीन व्यक्ती: पिता, पुत्र व पवित्र आत्मा असा आपला विश्वास प्रकट करतो.

       आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, परमेश्वराचे ज्ञान जगाच्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. परमेश्वराचे ज्ञान हे जगाच्या सुरुवातीपासून त्याच्या बरोबर आहे. तर आजच्या शुभवर्तमानांमध्ये आपल्याला पवित्र त्रैक्याविषयी आपणास ज्ञान मिळते. आपण पाहतो की, कशाप्रकारे पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्यामध्ये नातेसंबंध आहे. पिता आपले सर्वस्व पुत्रावर व पवित्र आत्म्यावर समर्पण करत असतो. तसेच पुत्र देखील आपले सर्व काही पित्याला व पवित्र आत्म्याला समर्पित करतो. त्याचप्रमाणे पवित्र आत्मादेखील पिता आणि पुत्र यांना आपले सर्वस्व समर्पित करत असतो. अशा प्रकारचे घनिष्ठ नातं ते आपणामध्ये जोपासत असतात. अशा प्रकारचं नातं ह्या मानव जातीला एक आदर्श घालून देत आहेत. ह्यावरून आपणास कळून येत कि, आपण स्वतःसाठी जगू नये तर इतरांसाठी जगावे. ज्या प्रकारे  पिता पुत्र व पवित्र आत्मा एकमेकांवर प्रेम करतात त्याच प्रकारे आपण देखील इतरांवरती निस्वार्थ प्रेम करावे ही प्रेरणा आपल्याला पवित्र त्राक्याकडून मिळत असते. पवित्र  त्रेक्य सर्व मानवजातीला एक आदर्श म्हणून आहे, आपण स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी व त्यांच्या कल्याणासाठी व त्याच्यावरती प्रेम करण्यासाठी जगावे.

       एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून नीतिमान जीवन जगणे अगत्याचे आहे. तरीदेखील आपण पापास बळी पडतो. अनीतीचा मार्ग आपण आपल्या पापांद्वारे अंगी कारतो. अनेकवेळा आपण कठोर प्रयत्न करून एक नीतिमान जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आजच्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो की, आपण आपल्या कार्यामुळे नीतिमान बनत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे आपण नीतिमान बनत असतो. येशू ख्रिस्त आपल्या समर्पणाने आपणास नीतिमान बनवत असतो म्हणून जेव्हा आपण नीतिमान जीवन जगत असतो तेव्हा स्वतःची स्तुती न करता त्याचे सर्व श्रेय ख्रिस्ताला दिले पाहिजे. ख्रिस्त आपल्या पित्याला पवित्र आत्म्याच्या सहाय्याने सर्व मानवजातीला अर्पण करत असतो, म्हणून आपला विश्वास त्या ख्रिस्तावरती अधिक बळकट व्हावा म्हणून आपण आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया जेनेकरून आपण नीतिमत्वाचे श्रेय स्वतःला न देता पवित्र त्रेक्याला दयावे/

       आजचा पवित्र त्रैक्याचा सण आपल्याला हाच संदेश देत आहे कि, पिता, पुत्र व पवित्र आत्मा एक आहेत व त्यांची भूमिका वेगवेगळी असून ते तिन्ही जण अस्तित्वात असून त्यांच्यात प्रेमाच नातं दडलेले आहे. अशाच प्रकारचे नातेसंबंध प्रत्येक कुटुंबात आई-वडील व मुलांमध्ये असायला हवे, कि जेणेकरून ते एकत्र राहून त्यांची भूमिका बजावताना प्रत्येकाने जबाबदारीचे जीवन कुटुंबात जगावे. म्हणजे कौटुंबिक जीवनातून प्रेरणा मिळू समाजाच्या भल्यासाठी कार्य करावे. असे केल्यानेच सर्वत्र प्रेम व शांतीचे वातावरण पसरू शकते व सर्वांना देवाच्या कृपा-आशीर्वादाचा अनुभव मिळू शकतो.

विश्वासू लोकांची प्रार्थना

प्रतिसाद: हे पवित्र त्रैक्या आम्हांला आमच्या कुटुंबातील व समाजातील एकरूपता वाढविण्यास मदत कर.

१. आपले परमगुरु स्वामीमहागुरुस्वामीधर्मगुरूधर्मबंधू-भगिनी ह्यांनी पवित्र त्रैक्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ख्रिस्ती समाजख्रिस्ताठायी एकत्र करण्यास तत्पर राहावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. आपल्या ख्रिस्ती समुदायातील वेगवेगळे पंथ आपला स्वार्थभेदभाव बाजूला सारून एकत्र यावेत व ख्रिस्ती जीवनाची साक्ष जगाला द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात ऐक्यसलोखा नांदावासर्व प्रकारचा भेदभाव दूर व्हावा व एक आदर्श कुटुंब व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. ख्रिस्ती जीवन जगत असताना आपण सर्वांनी एकमेकांशी प्रेमभावनेने वागावेपरमेश्वराची दयाक्षमा इतरापर्यंत पोहचवावी व शेवटी ईश्वराठायी चिरंतर जीवन प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. आपल्या धर्मग्रामातील जे लोक आजारी आहेतअशांना परमेश्वरी कृपेचा स्पर्श व्हावात्यांना आजारात सहनशक्ती लाभावी व त्यांचा आजार बरा व्हावा म्हणून आपण प्रार्थना करू या.      

६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिककौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करू या.


Friday, 6 June 2025

 Reflection for the PENTECOST SUNDAY (08/06/2025) by Br. Criston B. Marvi.

पवित्र आत्म्याचा सण

(पेंटेकॅास्टचा सण)

दिनांक: ०८/०६/२०२५

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये :-११

दुसरे वाचन:  करिंथ १२:३ब-१२-१३

शुभवर्तमान: योहान २०:१९-२३

प्रस्तावना

      ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय भाविकानो आज आपण पेन्टेकोस्ट म्हणजे पन्नासावा दिवस, पवित्र आत्म्याच्या आगमनाचा सोहळा साजरा करत आहोत. आजच्या सर्व वाचनात आपण पवित्र आत्म्याविषयी ऐकतो. येशूख्रिस्ताने ज्या पवित्र आत्म्याचे त्याच्या शिष्यांना वचन दिले होते त्याच पवित्र आत्म्याचे आगमन आज आपण आजच्या पहिल्या वाचनात ऐकत आहोत. आणि आजच्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो की, पवित्र त्रैक्याची वेगवेगळे कार्याविषयी ऐकतो व शुभवर्तमानात आपण ऐकतो की, येशू ख्रिस्त आपल्याला पवित्र आत्मा देतो.

       आज ह्या पवित्र मिस्साबलिदानात सहभागी होत असताना ज्या कोणाकडे बोलण्याची वाचा नाही अशा व्यक्तींसाठी विशेष प्रार्थना करूया.

बोधकथा

      बरोबर एक महिन्याअगोदर आपल्याला नवीन पोप लिओ चौदावे यांच्या रूपात लाभले. २१ एप्रिल २०२५ रोजी जेव्हा पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले तेव्हा संपूर्ण जग त्यांच्या दुःखात सहभागी झाले. त्याच वेळेस जेव्हा कॉन्क्लेव्हचा विषय आला, तेव्हा सर्वांच्या मनात एकच विचार होता की, नवीन पोप कोण होणार. नवीन होणारे पोप हे पोप फ्रान्सिस ह्याच्या विचारांशी एकरूप होणार का? २१ एप्रिल ते ७ मे पर्यंत प्रत्येक ठिकाणी व आपल्याला एकच बातमी ऐकू येत होती की, कोणत्या कार्डिनलची नवीन पोप म्हणून निवड होणार. आणि त्यामुळे वेगवेगळे कार्डिनल्सची नावे आपल्या ऐकू येत होती. कारण हे सर्व कार्डिनल्स पोप फ्रान्सिस यांच्यासोबत कार्यरत होते व फ्रान्सिस यांना ते त्यांच्या कार्यात मदत करत होते. म्हणून सर्वांना वाटत होते की, त्याच्यापैकीस कोणीतरी एक पोप होणार. परंतु जेव्हा सिस्टाईन चॅपलच्या  चिमणीतून पांढरा धूर बाहेर आला तेव्हा कोणालाच ठाऊक नसलेले तेव्हाचे कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट ह्यांची पोप म्हणून निवड झाली.

       ह्याच्यावरून आपल्याला दिसून येते की, पवित्र आत्म्याद्वारेच ख्रिस्तसभा पुढे जात आहे. पवित्र आत्मा ख्रिस्तसभेची काळजी वाहतो. व ख्रिस्तसभेचे मिशन कार्य पुढे नेण्यास मार्गदर्शन करत असतो.

मनन चिंतन

       देऊळ मातेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी व ख्रिस्ताच्या नावाने एकत्रीत जमलेल्या प्रिय भाविकानो, आज आपण पवित्र आत्म्याच्या आगमनाचा सोहळा साजरा करत आहोत. ख्रिस्तसभा ही ख्रिस्ताचे शरीर या भूतळावर, स्वर्गात आणि अधोलोकात आहे. हाच आपला विश्वास आपण प्रकट करतो जेव्हा आपण म्हणतो ‘पवित्र कॅथलिक ख्रिस्तसभा यावर माझा विश्वास आहे.’ शिष्यांसाठी पवित्र आत्मेचे पहिले दान हे जिभेच्या रुपात आलेले दान होते. जेणेकरून ते सर्वजण वेगवेगळ्या भाषांमध्ये देवाची सुवर्ता लोकापर्यंत पोहचवतील आणि लोकांच्या मातृभाषेत चांगल्या प्रकारे समजून देतील. आपण लूकलीखित शूभवर्तनामध्ये ऐकतो की, “जेव्हा तुम्हाला सभा, सरकार आणि अधिकारी यांच्यासमोर नेतील तेव्हा कसे आणि काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे याविषयी काळजी करू नका कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्यास घटकेस तुम्हाला शिकवेल” (लूक १२:११-१२). तोच पवित्र आत्मा आज जिभेच्या रूपात आपल्यावर उतरला आहे. पवित्र आत्म्याने काय बोलावे हे ओळखण्यासाठी आपल्याला जिभेचे दान दिले आहे. जेणेकरून शुभवार्ता पसरण्यात आपण धाडसी असो. परंतु पवित्र आत्म्याचा स्वीकार करण्यासाठी आपल्याकडे विश्वासाचे दान असणे गरजेचे आहे.

       कैवारी पवित्र आत्मा हा देवाचा आत्मा आहे. म्हणून तो दैवी आहे. आणि तो आपल्यामध्ये व आपल्या सोबत राहतो. पवित्र आत्मा हा पवित्र त्रैक्यातील तिसरा व्यक्ती आहे. पवित्र आत्मा जो प्रेषितांवर उतरला व सर्व शिष्यांनी अनुभवला, तोच पवित्र आत्मा आजही ख्रिस्तसभेमध्ये ख्रिस्तसभा उभारण्यासाठी काम करत आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला मार्गदर्शन करत आहे. पवित्र आत्म्याच्या दानांचा वापर हा सर्व सामान्य लोकांच्या बरेपणासाठी झाला पाहिजे. जिकडे आपण एक चांगला ख्रिस्ती समाज बांधू शकतो.

       पवित्र ख्रिस्तसभा आपण कशी बांधू शकतो? ते आपण आजच्या शुभवर्तमानात ऐकले आहे. जर एखाद्याला ख्रिस्तसभा उभारायची असेल तर तो देवाच्या प्रेमाने परीपूर्ण होऊन बांधू शकतो. “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तसेच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे” (योहान २०:२२-२३). ख्रिस्तसभा ही देवाच्या तारण योजनेचा एक भाग आहे, ज्याचे अनावरण हे पुत्राद्वारे झाले आहे आणि आत्म्याने ते चालू ठेवले. जर का एखादी व्यक्ती पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार करण्यास तयार असेल तर तीच व्यक्ती एक चांगल्या प्रकारे ख्रिस्तसभा बांधू शकते. कारण अशीच व्यक्ती दुसऱ्यांच्या पापांचे क्षमा करून त्यांना दैवी प्रेमाचा अनुभव देऊ शकते.

       प्रिय भाविकानो बाजारात प्रत्येक गिफ्ट किंवा प्रत्येक वस्तू ही आपल्याला विकत घ्यावी लागते. परंतु पवित्र आत्म्याची दाने ही आपल्याला मोफत दिलेली आहेत. त्या दानांचा स्वीकार करण्यास मी तयार आहे का? त्या पवित्र दानांसाठी मी आतुरलेलं आहे का? या दानांचा वापर मी माझ्या जीवनात कशाप्रकारे, कुठे व कोणासाठी करत आहे? बाप्तीस्माच्या वेळेस आपणा सर्वांना शुभवार्ता पसरण्याचे मिशन दिले आहे. मिशन म्हणजे ख्रिस्ती समाज बांधण्याचे. ख्रिस्त समाज हा आपल्याला स्वर्गात नव्हे तर येथे, या जगात, या भूतलावरती बांधण्यात सांगत आहे. पवित्र आत्मा हा फक्त आपल्यावरती अवतरला नाही तर तो आपल्या सोबत राहत सुद्धा आहे.

विश्वासू लोकांची प्रार्थना

प्रतिसादहे परमेश्वरा तुझा पवित्र आत्मा पाठव आणि आमचे नूतनीकरण कर

१) हे परमेश्वरा तुझ्या ख्रिस्तसभेचं आणि ख्रिस्तीजणांचं नूतनीकरण कर आणि आम्हामधील प्रेमाची आणि श्रद्धेची भावना वाढीस लागू दे.

२) आमच्या जगातून हिंसा आणि सुडाची भावना नष्ट कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आमच्यातील अविश्वास आणि द्वेषाचं रूपांतर समेट आणि शांतीमध्ये होऊदे.

३) आमच्या धर्मग्रामात, आमच्या कुटुंबात ज्या व्यक्ती आजारी आहेत त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने स्पर्श कर आणि बरे कर.

४)आमच्या धर्मग्रामातील, आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्व व्यक्तींना तुझ्या स्वर्गराज्यात चिरंतन शांती दे आणि अनंत तेजाने त्यांना प्रकाशित कर.

५) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करू या.