Reflection
for the SOLEMNITY OF THE MOST HOLY TRINITY (15/06/2025) by
Dn. Reon Andrades
पवित्र त्रैक्याचा सण
दिनांक: १५/०६/२०२५
पहिले वाचन: नितीसुत्रे ८:२२-३१
दुसरे वाचन: रोमकारास पत्र ५:१-५
शुभवर्तमान: योहान १६:१२-१५
प्रस्तावना
आज आपण पवित्र त्रैक्याचा सण साजरा करत
आहोत. आजच्या दिवशी देउळमाता आपणास त्रैक्याच्या
रहस्यावर मनन करण्यास आमंत्रण करत आहे.
स्वर्गीय पित्याने हा निर्माणकर्ता असून प्रभू येशू हा आपला तारणारा आहे व पवित्र
आत्मा हा आपल्याला पवित्रतेने भरतो. म्हणून आपण पवित्र त्रैक्यावरील आपला विश्वास
दृढ करून प्रकट करायला हवा.
आपण आपल्या ख्रिस्ती भक्तीमध्ये पवित्र त्रैक्याला संबोधून
आपल्या प्रार्थनेची सुरुवात करतो. कारण आपल्याला पित्याची प्रीती, पुत्राची कृपा व
पवित्र आत्म्याचा सहवास सतत लाभत असतो.
आजची वाचणे आपल्याला पवित्र त्रैक्याची ओळख करून देतात. जसे पिता, पुत्र व पवित्र आत्मा एक आहेत व त्यांच्यात धनिष्ट प्रेमाच नात आहे. त्याप्रमाणेच आमच्या खासगी जीवनात व कौटूबिंक जीवनात असचं प्रेमाच नात असाव, म्हणून या मिस्साबलीदानात सहभाग घेत असताना विशेष प्रार्थना करूया.
मनन
चिंतन
प्रत्येक ख्रिस्ती भक्ति आपण पवित्र त्रैक्याच्या नावाने सुरू
करतो, म्हणजे पिता, पुत्र व पवित्र
आत्मा. आज आपण ह्या रहस्याला सहजपणे स्वीकारतो, कारण हा विश्वास
आपणास आपल्या पूर्वजांनी दिला आहे. परंतु आपण कधी प्रश्न विचारला आहे का? “की हे रहस्य
आपल्या पूर्वजांनी कसं अनुभवलं”. त्रैक्य ही एक मानसिक
कल्पना नसून, एक अनुभव आहे. पूर्वजांना म्हणजेच येशूच्या काळी व त्याच्या
मरणानंतर विश्वास ठेवणाऱ्यांनी हा अनुभव ख्रिस्तामुळेच आला. येशू ख्रिस्त हा जागतिक जीवन जगत
असताना त्याने आपल्याला पित्याची ओळख करून दिली. तसेज पवित्र
आत्म्याच्या सहकार्याने अनेक चमत्कार केले. अनेक भूतें काढली व
मोहावरती मात देखील मिळवून तो विजयी झाला. सर्वात प्रथम
येशूने आपला पिता हा देव आहे याची ओळख आपणास करून दिली. येशूच्या
पुनरुत्थानानंतर त्याच्या शिष्याने येशू ख्रिस्ताला देव म्हणून अनुभवलं, तदनंतर
पेंटेकॉस्टच्या सणानंतर त्याच्या शिष्याने पवित्र आत्म्याला देव म्हणून अनुभवलं. अशा प्रकारे
त्याच्या शिष्यांनी व प्रथम ख्रिस्त सभेने तीन व्यक्तींमध्ये एका देवाला अनुभवलं. हे तीन व्यक्ती
तीन वेग-वेगळे देव नसून एकच देव आहे, असा अनुभव त्या
लोकांनी घेतला व तो आपणाला शिकवला. म्हणून आज आपण
एक देव, तीन व्यक्ती: पिता, पुत्र व पवित्र आत्मा असा आपला विश्वास प्रकट करतो.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, परमेश्वराचे ज्ञान जगाच्या
ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. परमेश्वराचे ज्ञान हे जगाच्या सुरुवातीपासून
त्याच्या बरोबर आहे. तर आजच्या
शुभवर्तमानांमध्ये आपल्याला पवित्र त्रैक्याविषयी आपणास
ज्ञान मिळते. आपण पाहतो की, कशाप्रकारे पिता
पुत्र व पवित्र आत्मा यांच्यामध्ये नातेसंबंध आहे. पिता आपले
सर्वस्व पुत्रावर व पवित्र आत्म्यावर समर्पण
करत असतो. तसेच पुत्र देखील आपले सर्व
काही पित्याला व पवित्र आत्म्याला समर्पित करतो. त्याचप्रमाणे
पवित्र आत्मादेखील पिता आणि पुत्र यांना आपले सर्वस्व समर्पित करत असतो. अशा प्रकारचे
घनिष्ठ नातं ते आपणामध्ये जोपासत
असतात. अशा प्रकारचं नातं ह्या मानव जातीला एक
आदर्श घालून देत आहेत. ह्यावरून आपणास कळून येत कि, आपण स्वतःसाठी
जगू नये तर इतरांसाठी जगावे. ज्या प्रकारे
पिता पुत्र व पवित्र आत्मा एकमेकांवर प्रेम करतात त्याच प्रकारे आपण देखील
इतरांवरती निस्वार्थ प्रेम करावे ही प्रेरणा आपल्याला पवित्र त्राक्याकडून मिळत
असते. पवित्र त्रेक्य सर्व मानवजातीला
एक आदर्श म्हणून आहे, आपण स्वतःसाठी नव्हे तर
इतरांसाठी व त्यांच्या कल्याणासाठी व त्याच्यावरती प्रेम करण्यासाठी जगावे.
एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून नीतिमान जीवन
जगणे अगत्याचे आहे. तरीदेखील आपण पापास बळी पडतो. अनीतीचा मार्ग
आपण आपल्या पापांद्वारे अंगी कारतो. अनेकवेळा आपण
कठोर प्रयत्न करून एक नीतिमान जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आजच्या दुसऱ्या वाचनात
आपण ऐकतो की, आपण आपल्या
कार्यामुळे नीतिमान बनत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे आपण नीतिमान बनत
असतो. येशू ख्रिस्त
आपल्या समर्पणाने आपणास नीतिमान बनवत असतो म्हणून जेव्हा आपण नीतिमान जीवन जगत
असतो तेव्हा स्वतःची स्तुती न करता त्याचे सर्व श्रेय ख्रिस्ताला दिले पाहिजे. ख्रिस्त आपल्या पित्याला
पवित्र आत्म्याच्या सहाय्याने सर्व मानवजातीला अर्पण करत
असतो, म्हणून आपला विश्वास त्या ख्रिस्तावरती अधिक बळकट व्हावा
म्हणून आपण आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया
जेनेकरून आपण नीतिमत्वाचे श्रेय स्वतःला न
देता पवित्र त्रेक्याला दयावे/
आजचा पवित्र त्रैक्याचा सण आपल्याला हाच संदेश देत आहे कि, पिता,
पुत्र व पवित्र आत्मा एक आहेत व त्यांची भूमिका वेगवेगळी असून ते तिन्ही जण
अस्तित्वात असून त्यांच्यात प्रेमाच नातं दडलेले आहे. अशाच प्रकारचे नातेसंबंध
प्रत्येक कुटुंबात आई-वडील व मुलांमध्ये असायला हवे, कि जेणेकरून ते एकत्र राहून
त्यांची भूमिका बजावताना प्रत्येकाने जबाबदारीचे जीवन कुटुंबात जगावे. म्हणजे
कौटुंबिक जीवनातून प्रेरणा मिळू समाजाच्या भल्यासाठी कार्य करावे. असे केल्यानेच
सर्वत्र प्रेम व शांतीचे वातावरण पसरू शकते व सर्वांना देवाच्या कृपा-आशीर्वादाचा
अनुभव मिळू शकतो.
विश्वासू
लोकांची प्रार्थना
प्रतिसाद: हे पवित्र त्रैक्या आम्हांला आमच्या
कुटुंबातील व समाजातील एकरूपता वाढविण्यास मदत कर.
१. आपले परमगुरु स्वामी, महागुरुस्वामी, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी
ह्यांनी पवित्र त्रैक्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ख्रिस्ती समाज, ख्रिस्ताठायी
एकत्र करण्यास तत्पर राहावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. आपल्या ख्रिस्ती
समुदायातील वेगवेगळे पंथ आपला स्वार्थ, भेदभाव बाजूला सारून एकत्र
यावेत व ख्रिस्ती जीवनाची साक्ष जगाला द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. आपल्या प्रत्येकाच्या
कुटुंबात ऐक्य, सलोखा नांदावा; सर्व प्रकारचा भेदभाव दूर
व्हावा व एक आदर्श कुटुंब व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. ख्रिस्ती जीवन जगत असताना
आपण सर्वांनी एकमेकांशी प्रेमभावनेने वागावे; परमेश्वराची दया, क्षमा इतरापर्यंत
पोहचवावी व शेवटी ईश्वराठायी चिरंतर जीवन प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू
या.
५. आपल्या धर्मग्रामातील जे
लोक आजारी आहेत, अशांना परमेश्वरी कृपेचा स्पर्श व्हावा, त्यांना आजारात
सहनशक्ती लाभावी व त्यांचा आजार बरा व्हावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
६. थोडा वेळ शांत राहून आपण
आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी
प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment