Friday, 6 June 2025

 Reflection for the PENTECOST SUNDAY (08/06/2025) by Br. Criston B. Marvi.

पवित्र आत्म्याचा सण

(पेंटेकॅास्टचा सण)

दिनांक: ०८/०६/२०२५

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये :-११

दुसरे वाचन:  करिंथ १२:३ब-१२-१३

शुभवर्तमान: योहान २०:१९-२३

प्रस्तावना

      ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय भाविकानो आज आपण पेन्टेकोस्ट म्हणजे पन्नासावा दिवस, पवित्र आत्म्याच्या आगमनाचा सोहळा साजरा करत आहोत. आजच्या सर्व वाचनात आपण पवित्र आत्म्याविषयी ऐकतो. येशूख्रिस्ताने ज्या पवित्र आत्म्याचे त्याच्या शिष्यांना वचन दिले होते त्याच पवित्र आत्म्याचे आगमन आज आपण आजच्या पहिल्या वाचनात ऐकत आहोत. आणि आजच्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो की, पवित्र त्रैक्याची वेगवेगळे कार्याविषयी ऐकतो व शुभवर्तमानात आपण ऐकतो की, येशू ख्रिस्त आपल्याला पवित्र आत्मा देतो.

       आज ह्या पवित्र मिस्साबलिदानात सहभागी होत असताना ज्या कोणाकडे बोलण्याची वाचा नाही अशा व्यक्तींसाठी विशेष प्रार्थना करूया.

बोधकथा

      बरोबर एक महिन्याअगोदर आपल्याला नवीन पोप लिओ चौदावे यांच्या रूपात लाभले. २१ एप्रिल २०२५ रोजी जेव्हा पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले तेव्हा संपूर्ण जग त्यांच्या दुःखात सहभागी झाले. त्याच वेळेस जेव्हा कॉन्क्लेव्हचा विषय आला, तेव्हा सर्वांच्या मनात एकच विचार होता की, नवीन पोप कोण होणार. नवीन होणारे पोप हे पोप फ्रान्सिस ह्याच्या विचारांशी एकरूप होणार का? २१ एप्रिल ते ७ मे पर्यंत प्रत्येक ठिकाणी व आपल्याला एकच बातमी ऐकू येत होती की, कोणत्या कार्डिनलची नवीन पोप म्हणून निवड होणार. आणि त्यामुळे वेगवेगळे कार्डिनल्सची नावे आपल्या ऐकू येत होती. कारण हे सर्व कार्डिनल्स पोप फ्रान्सिस यांच्यासोबत कार्यरत होते व फ्रान्सिस यांना ते त्यांच्या कार्यात मदत करत होते. म्हणून सर्वांना वाटत होते की, त्याच्यापैकीस कोणीतरी एक पोप होणार. परंतु जेव्हा सिस्टाईन चॅपलच्या  चिमणीतून पांढरा धूर बाहेर आला तेव्हा कोणालाच ठाऊक नसलेले तेव्हाचे कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट ह्यांची पोप म्हणून निवड झाली.

       ह्याच्यावरून आपल्याला दिसून येते की, पवित्र आत्म्याद्वारेच ख्रिस्तसभा पुढे जात आहे. पवित्र आत्मा ख्रिस्तसभेची काळजी वाहतो. व ख्रिस्तसभेचे मिशन कार्य पुढे नेण्यास मार्गदर्शन करत असतो.

मनन चिंतन

       देऊळ मातेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी व ख्रिस्ताच्या नावाने एकत्रीत जमलेल्या प्रिय भाविकानो, आज आपण पवित्र आत्म्याच्या आगमनाचा सोहळा साजरा करत आहोत. ख्रिस्तसभा ही ख्रिस्ताचे शरीर या भूतळावर, स्वर्गात आणि अधोलोकात आहे. हाच आपला विश्वास आपण प्रकट करतो जेव्हा आपण म्हणतो ‘पवित्र कॅथलिक ख्रिस्तसभा यावर माझा विश्वास आहे.’ शिष्यांसाठी पवित्र आत्मेचे पहिले दान हे जिभेच्या रुपात आलेले दान होते. जेणेकरून ते सर्वजण वेगवेगळ्या भाषांमध्ये देवाची सुवर्ता लोकापर्यंत पोहचवतील आणि लोकांच्या मातृभाषेत चांगल्या प्रकारे समजून देतील. आपण लूकलीखित शूभवर्तनामध्ये ऐकतो की, “जेव्हा तुम्हाला सभा, सरकार आणि अधिकारी यांच्यासमोर नेतील तेव्हा कसे आणि काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे याविषयी काळजी करू नका कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्यास घटकेस तुम्हाला शिकवेल” (लूक १२:११-१२). तोच पवित्र आत्मा आज जिभेच्या रूपात आपल्यावर उतरला आहे. पवित्र आत्म्याने काय बोलावे हे ओळखण्यासाठी आपल्याला जिभेचे दान दिले आहे. जेणेकरून शुभवार्ता पसरण्यात आपण धाडसी असो. परंतु पवित्र आत्म्याचा स्वीकार करण्यासाठी आपल्याकडे विश्वासाचे दान असणे गरजेचे आहे.

       कैवारी पवित्र आत्मा हा देवाचा आत्मा आहे. म्हणून तो दैवी आहे. आणि तो आपल्यामध्ये व आपल्या सोबत राहतो. पवित्र आत्मा हा पवित्र त्रैक्यातील तिसरा व्यक्ती आहे. पवित्र आत्मा जो प्रेषितांवर उतरला व सर्व शिष्यांनी अनुभवला, तोच पवित्र आत्मा आजही ख्रिस्तसभेमध्ये ख्रिस्तसभा उभारण्यासाठी काम करत आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला मार्गदर्शन करत आहे. पवित्र आत्म्याच्या दानांचा वापर हा सर्व सामान्य लोकांच्या बरेपणासाठी झाला पाहिजे. जिकडे आपण एक चांगला ख्रिस्ती समाज बांधू शकतो.

       पवित्र ख्रिस्तसभा आपण कशी बांधू शकतो? ते आपण आजच्या शुभवर्तमानात ऐकले आहे. जर एखाद्याला ख्रिस्तसभा उभारायची असेल तर तो देवाच्या प्रेमाने परीपूर्ण होऊन बांधू शकतो. “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तसेच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे” (योहान २०:२२-२३). ख्रिस्तसभा ही देवाच्या तारण योजनेचा एक भाग आहे, ज्याचे अनावरण हे पुत्राद्वारे झाले आहे आणि आत्म्याने ते चालू ठेवले. जर का एखादी व्यक्ती पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार करण्यास तयार असेल तर तीच व्यक्ती एक चांगल्या प्रकारे ख्रिस्तसभा बांधू शकते. कारण अशीच व्यक्ती दुसऱ्यांच्या पापांचे क्षमा करून त्यांना दैवी प्रेमाचा अनुभव देऊ शकते.

       प्रिय भाविकानो बाजारात प्रत्येक गिफ्ट किंवा प्रत्येक वस्तू ही आपल्याला विकत घ्यावी लागते. परंतु पवित्र आत्म्याची दाने ही आपल्याला मोफत दिलेली आहेत. त्या दानांचा स्वीकार करण्यास मी तयार आहे का? त्या पवित्र दानांसाठी मी आतुरलेलं आहे का? या दानांचा वापर मी माझ्या जीवनात कशाप्रकारे, कुठे व कोणासाठी करत आहे? बाप्तीस्माच्या वेळेस आपणा सर्वांना शुभवार्ता पसरण्याचे मिशन दिले आहे. मिशन म्हणजे ख्रिस्ती समाज बांधण्याचे. ख्रिस्त समाज हा आपल्याला स्वर्गात नव्हे तर येथे, या जगात, या भूतलावरती बांधण्यात सांगत आहे. पवित्र आत्मा हा फक्त आपल्यावरती अवतरला नाही तर तो आपल्या सोबत राहत सुद्धा आहे.

विश्वासू लोकांची प्रार्थना

प्रतिसादहे परमेश्वरा तुझा पवित्र आत्मा पाठव आणि आमचे नूतनीकरण कर

१) हे परमेश्वरा तुझ्या ख्रिस्तसभेचं आणि ख्रिस्तीजणांचं नूतनीकरण कर आणि आम्हामधील प्रेमाची आणि श्रद्धेची भावना वाढीस लागू दे.

२) आमच्या जगातून हिंसा आणि सुडाची भावना नष्ट कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आमच्यातील अविश्वास आणि द्वेषाचं रूपांतर समेट आणि शांतीमध्ये होऊदे.

३) आमच्या धर्मग्रामात, आमच्या कुटुंबात ज्या व्यक्ती आजारी आहेत त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने स्पर्श कर आणि बरे कर.

४)आमच्या धर्मग्रामातील, आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्व व्यक्तींना तुझ्या स्वर्गराज्यात चिरंतन शांती दे आणि अनंत तेजाने त्यांना प्रकाशित कर.

५) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करू या.




No comments:

Post a Comment