Thursday 17 December 2015


Reflections for the homily of 4th Sunday of Advent (20/12/2015)
By: Camrelo D'Mekar.












 आगमन काळातील चौथा रविवार



दिनांक:२०/१२/२०१५.
पहिले वाचन: मिखा ५:१-४.
दुसरे वाचन: इब्री १०: ५-१०.
शुभवर्तमान: लुक १:३९-४४.

“मरिया डोंगराळ प्रदेशातील एका गावास घाईघाईने गेली”




प्रस्तावना:
      आज ख्रिस्तसभा आगमन काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजची तिन्ही वाचने आपल्या समोर हालचालीचे दृश्य मांडत आहेत. ऐतिहासिक भाषेत आपण प्रत्येक हालचालीला ‘Movement’ असे संबोधतो, म्हणूनच आजच्या वाचनांद्वारे आपण भेटी-गाठी ह्या विषयावर मनन चिंतन करणार आहोत.
      प्रवक्ता मिखा ह्याच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात, परमेश्वर म्हणतो, बेथलेहेम एफ्राथामधून इस्रायलचा शास्ता निघेल आणि ह्या शाश्त्याद्वारे ह्या राष्ट्राचे ज्ञान लोकांना मिळेल. इब्री लोकांस पाठवलेल्या पत्रातून घेतलेल्या दुसरे वाचनात आपल्याला परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तर शुभवर्तमानात आपण पवित्र मरिया आणि तिची चुलत बहिण अलीशिबा ह्यांच्या भेटीचे वर्णन ऐकतो.
     प्रत्येक भेटीचे विशिष्ट वेगळेपण असते. आपल्या जीवनातील काही भेटी आपल्याला अविस्मरणीय आहेत. एका महत्वाच्या भेटीची आपण विशेष प्रतीक्षा करत आहोत ती म्हणजे प्रभू येशूची भेट. म्हणून पवित्र ख्रिस्तयागामध्ये योग्य रीतीने सहभागी होण्यासाठी आपल्या मनाची व हृदयाची आध्यात्मिक तयारी करूया आणि प्रभू येशुच्या भेटीचा सात्विक अनुभव आपणास मिळावा म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन : मिखा ५:१-४.
इब्री भाषेत ‘एफ्राथा’ शहराला ‘बेथलेहेम’ असे सुद्धा म्हटले जाते. हे ईशयाचे शहर होते आणि दावीद हा ईशयाचा पुत्र होता. दावीद ह्याची निवड इस्रायलच्या बारा वंशाचा राजा म्हणून केली होती. इस्रायलच्या लोकांनी भौतिक आणि राजकीय पातळीवर तिरस्काराचा अनुभव घेतला होता. त्यांना त्यांचा गमावलेला गौरव आणि वैभव परत आणायचा होता. त्यांना दावीदाच्या राज्याची संपूर्णपणे स्थापना करायची होती. दाविदाच्या कुळातून त्रास्तांचा वाली ह्याचा जन्म होईल, हा मसीहा राज्यकर्ता म्हणून ओळखला जाईल. हा राजा आपल्याला भेट देण्यासाठी येईल आणि आपल्या भेटीद्वारे ह्या भूतलावर शांतीचे राज्य प्रस्थापित करणार असे प्रतिपादन करण्यात आले होते. ज्या राज्यात शांतीचा राजकुमार जन्म घेईल ते राज्य लोकांच्या दृष्टीकोनातून महत्वाचे ठरेल. बेथलेहेम म्हणजे ‘भाकरीचे घर’ होय.

दुसरे वाचन: इब्री १०: ५-१०.
दुसऱ्या वाचनात आपण येशूख्रिस्त पुनरागमन करत आहे असे ऐकतो. मोशेने यज्ञ आणि अर्पणे ह्याबाबतीत दिलेल्या नियमांच्या पलिकडे स्वत:चे जीवन इतरांसाठी कसे अर्पण करावे ह्याची कल्पना दिलेली आहे. जेव्हा आपण एखादे अर्पण घेऊन देवाच्या मंदिरात जातो, ती आपली परमेश्वराला दिलेली भेट असते. यज्ञ म्हणजेच विधी आणि अन्नार्पणे, तसेच पापार्पणे ह्याविषयी प्रभू येशू असंतुष्ट आहे ह्याची जाणीव आपल्याला ह्या वाचनात मिळते. जुन्या करारातील यज्ञ हे येशू ख्रिस्ताच्या स्वदेह त्यागामार्फत नष्ट झाले आहेत. येशू ख्रिस्ताने देवाच्या इच्छेप्रमाणे सर्व यज्ञ आणि स्वार्थत्याग केला.

शुभवर्तमान: लुक १:३९-४४.
लूकलिखित शुभवर्तमानात झालेली अलीशिबा आणि मरिया यांची भेट हे आनंदाच्या रहस्यातील दुसरे रहस्य आहे. अलीशिबा आणि मरिया ह्यांच्या भेटीत येशुविषयी केलेले निवेदन आपण ह्या उताऱ्यात वाचतो. दयाळूपणा आणि सामाजिक प्रेम ह्याचे उत्तम उदाहरण मरीयेने वृद्ध आणि गरोदर अलीशेबेला मदतीचा हात देऊन आपणास घालून दिले आहे. एका चौदा वर्षीय यहुदी कुमारीने चार दिवस एकटीने प्रवास करावा ही एक धैर्याची गोष्ट आहे. संत लूक दोन्ही मातांना एकत्र आणतो – जेणेकरून दोघीजणी परमेश्वराची स्तुती करतील आणि प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव घेतील. संत लुक मरियेचे दोन विशेष पैलू येथे आपणास दाखवू पाहत आहे. एक म्हणजे तिने देवाच्या हाकेला दिलेला प्रतिसाद आणि दुसरा म्हणजे तिची चुलत बहिण अलीशिबा हिला तिच्या गरोदरसमयी केलेली मदत. परमेश्वराची इच्छा आणि शेजारप्रेम ह्यात घातलेली सांगड येथे स्पष्ट दिसून येते.

बोधकथा:
एकदा एका नामांकित राजाने एका गरीब गावाला भेट देण्याचे ठरविले. पण राजाने त्या गावातील लोकांना ह्याविषयी काहीच कळवले नाही. राजा जेव्हा अचानक त्या गावात पोहचला तेव्हा सर्व लोकांनी त्याचे मोठया वैभवाने स्वागत केले. त्याच वेळी राजाने एका चहाच्या गाडीवर जाऊन आँमलेटची मागणी केली. तेव्हा मोठया शिष्टाचाराने त्यांनी राजाच्या जेवणासाठी ताट तयार केले आणि जेवणात वापरण्यात येणारे काटे-चमचे इत्यादी साधनेसुद्धा व्यवस्थित मांडले.
जो स्वयंपाक बनवत होता, तो व्यक्ती पुन्हा-पुन्हा राजाला सांगत होता, तुम्ही माझ्यासारख्या गरीब माणसाच्या ठिकाणी न्याहारी करण्यासाठी आले, हे माझे भाग्यच आहे. जेवणाच्या टेबलावरील कपडा मळकट झाल्याकारणाने त्या व्यक्तीच्या मनात शरमेची भावना निर्माण झाली होती. कारण राजाचे राहणीमान हे उच्च दर्जाचे असल्या कारणाने त्याला आपल्या सामान्य राहणीमानाची लाज वाटत होती. त्यावर राजा त्या व्यक्तीला म्हणाला, ‘ह्या सर्व गोष्टीविषयी काही चिंता करू नकोस, इकडे जे काही आहे त्याविषयी मी संतुष्ट आहे’. नंतर राजा पुढे म्हणाला, ‘ह्या आँमलेटची मला किती रक्कम द्यावी लागेल’? तेव्हा तो व्यक्ती उद्दगारला, ‘एक हजार सोन्याची नाणी’. राजाला तर आश्चर्याचा धक्काच बसला. तो मनात विचार करू लागला, ‘ह्या गावामध्ये अंडी फारच महाग असतील किंवा अंड्यांची इकडे दुर्मिळता भासत असेल! राजाने त्याला विचारले, ‘इथे अंड्यांची दुर्मिळता आहे का’? तेव्हा तो व्यक्ती उद्गारला, ‘इथे अंड्यांचा कमीपणा कधीच भासत नाही, राजे महाशय, पण तुमची भेट दुर्मिळ आहे’!
राजा हा त्याच्या राज्यातल्या लोकांना क्वचितच आणि काही विशेष कारणास्तव भेटत असतो. तो आपल्या प्रजेला वारंवार भेटत नसतात. कारण ते इतर अनेक गोष्टीमध्ये गुंतलेले असतात. ही गोष्ट मात्र येशू ख्रिस्ताच्या बाबतीत नकारार्थी आहे. येशू ख्रिस्त दर-दिवस आपल्याला पवित्र मिस्सामध्ये भेटण्यासाठी येत असतो. येशूच्या भेटीचे स्वागत करण्यास आपण सज्ज असूया.

मनन चिंतन:
आजच्या वाचनांचा सारांश भेटीविषयी सांगत आहे. जेव्हा आपण कोणत्याही प्रवासाला जाण्याचे ठरवतो तेव्हा प्रवासाची पूर्वतयारी करण्यात गुंग असतो. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रवास असतात. एखादा प्रियकर आपल्या जिवलग प्रियसिला भेटण्यासाठी उत्सुकतेने प्रतीक्षा करतो. त्यांच्या त्या भेटीत, दोघेजण आपल्या जीवनातील सुख दु:ख एकमेकांना कथित करून त्या प्राप्त क्षणाचा आनंद पूर्णपणे घेतात. एखादे आई-वडील आपला मुलगा किंवा मुलगी घराबाहेर काही कामासाठी गेल्या कारणामुळे घरी येण्यास उशीर झाला म्हणून आतुरतेने त्याची/ तिची वाट बघत घराच्या दारासमोर टक लावून बसलेले असतात. एखादा तरुण प्रथमच आपले घर सोडून, आई-बाबा आणि कुटुंबातील इतर व्यक्तीबरोबर असलेला सहवास तोडून जेव्हा सेमीनरीमध्ये दाखल होतो, तेव्हा त्याच्या मनात वारंवार घोळत असलेला विचार म्हणजे, ‘मी माझ्या आई-बाबांना कधी भेटायला जाणार’? अशी कित्येक उदाहरणे, आपणाला ठाऊक असतील.
आजच्या शुभवर्तमानात आपण पवित्र मरिया आणि अलीशिबा ह्यांच्या भेटीचे केलेले वर्णन ऐकले. पवित्र मरीयेने सुद्धा तिच्या भेटीची पूर्वतयारी केली होती असे दिसून येते. तिने प्रभूच्या वचनांवर संपूर्ण मनाने विश्वास ठेऊन तिच्या हृदयाची पूर्वतयारी तयारी केली असावी. प्रभू येशूला आपल्या उदरात वाढवून, मरीयेने तिच्या प्रवासाची तयारी केली. नाताळच्या सणासाठी फक्त काहीच दिवस उरले आहेत. प्रत्येकजण घराची साफ-सफाई करतो, काहीजण गोड पदार्थ तयार करण्यात तसेच आपली युवक मंडळी ‘गव्हाण’ (गाईचा गोठा) तयार करण्यासाठी गुंतलेले आहेत. प्रत्येकजण प्रभू येशूला भेटण्यासाठी मोठया आतुरतेने वाट पाहत आहे. प्रत्येकाला जाणीव आहेच कि, येशु ख्रिस्त आपल्याला भेटण्यासाठी येणार आहे. त्यामुळेच आपल्या सर्वांची मने आनंदाने भरली आहेत.
मरीयेने अलीशेबेची घेतलेली भेट ही एक आगळी-वेगळी भेट आहे. मरिया जेव्हा अलीशेबेला भेटायला जाते, तेव्हा ती एकटी जात नाही. ती तिच्याबरोबर एका महत्वाच्या व्यक्तीला घेऊन जाते आणि ती व्यक्ती म्हणजे ‘जिवंत देवाचा पुत्र’ जो पवित्र मरीयेच्या उदरामध्ये वाढत होता. मरियेने प्रभूची पहिली भेट अलिशेबेला देऊन ह्या जगात इतिहासाच्या नवीन ओळी लिहून ठेवल्या. मरीयेची अलीशेबेला भेट ही फक्त सेवा करण्याची भेट नव्हती, तर मरीयेच्या भेटीने अलीशेबेच्या उदरातील असलेल्या बाळकाचा आशीर्वाद देण्याचा उद्देश असावा; आणि त्याची पुष्टी अलीशिबेच्या बालकाने तिच्या उदरात आनंदाची मुसंडी मारून दिली ते आपण ऐकले. त्यामुळे नाताळचा आनंद हा प्रभूच्या जन्माअगोदरच अलीशिबेने आणि तिच्या उदरातील बाळाने अनुभवला होता. प्रभूची उपस्थिती आपल्यासाठी आनंदाचे वातावरण निर्माण करते आणि तोच आनंद आपण इतरांसोबत साजरा करतो.
भारताचे पंतप्रधान मोदी जेव्हा ‘शिकागो’ येथे भेटीला जाणार होते, तेव्हा कित्येकांना वाटले होते कि, हि भेट सुद्धा स्वामी विवेकानंदाच्या भेटीसारखी ऐतिहासिक भेट होणार. पोप फ्रान्सिस ह्यांची १४ ऑगस्ट २०१४ मधील ‘कोरियाला’ दिलेली भेट त्यांच्या जीवनातील आशीर्वाद आहे असे सांगतात. तसेच नुकतीच पोप महाशयांची ‘क्युबा’ येथील भेट १९ सप्टेंबर २०१५ मध्ये समेट आणि ऐक्य ह्यांची साक्ष देते. म्हणून प्रत्येक भेट महत्वपूर्ण असते असे म्हणणे यथायोग्य आहे.
नाझरेथपासून जिथे पवित्र मरिया राहत होती, तेथून पश्चीम जेरुसलेम जिथे अलीशिबा राहत होती तेथील प्रवास हा चार दिवसाचा चालत केलेला प्रवास आहे. तेथील रस्ते आणि पायवाटा ह्या दगड, चढण-उतरण, वाहणारे झरे, रस्त्यावरून जाणारे विषारी साप, विंचू आणि दरोडेखोर ह्यांनी गजबजलेला होता. पवित्र मरीयेची अलीशेबाला दिलेली भेट हि एक पावित्र्याची साक्ष आहे. जेव्हा अलीशेबेने मरीयेचे अभिवादन ऐकले, तेंव्हाच ती पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली होती.
प्रत्येक भेट आपल्यासाठी ठराविक प्रकारचा आशीर्वादच असते. प्रत्येक व्यक्ती जी आपल्याला भेटण्यासाठी येते, ती त्यांच्याबरोबर बऱ्याचदा आनंदाची बातमी घेऊन येते. जेव्हा तीन पुरुष अब्राहमला भेटण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी अब्राहमाला व साराला पुत्र होणार (उत्पत्ती १८:१०) अशी आनंदमय बातमी दिली. सराफत येथील विधवा हिला तिच्या गरिबीमध्ये आशीर्वाद भेटला जेव्हा संदेष्टा एलिया तिला भेटायला गेला. ईश्वराचा कृपाप्रसाद म्हणून परमेश्वराने तिच्या पीठाचे मडके आणि तेलाची कुपी कधीही आटवू दिली नाही (१ राजे १७:१६). पूर्वीच्या काळात आपल्या धर्मामध्ये दुसऱ्यांना भेटण्याची प्रथा होती. आपण आपल्या कुटुंबासोबत नातेवाईकांना भेटण्यासाठी जायचो आणि दूरदूरचे आपले सगे-सोयरे सुद्धा आपल्याला भेटायला येत असत. त्यामुळे आपल्या कुटुंबातील ऐक्य दुसऱ्यांसोबत टिकून राहत असे. आपण एक-दुसऱ्यांबद्दल संवेदनशील राहत असत. इतरांच्या अडी-अडचणीत त्यांना मदत करत असत. अशी हि परंपरा आपल्या जीवनात अनुभवलेली आहे.
   आजच्या युगात अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसून येतात का? आजचा आधुनिक मानव हा यांत्रिकी प्रसारमाध्यमांच्या जाळ्यात अडकलेला आहे. कोणत्याही समारंभाच्या शुभेच्छा ह्या एका फोटोच्या स्वरूपामध्ये वॉटस-अॅप आणि फेसबुकवरून पाठवतात. त्यामुळे आपल्याला दुसऱ्यांकडून शुभेच्छा भेटतात मात्र त्या भेटीत जिव्हाळा अनुभवला जात नाही. हि एक दुःखाची बाब आहे.
नाताळच्या सणाची पूर्वतयारी करत असताना आपण पवित्र मरीयेच्या जीवनावरून बोध घेऊन, आपण सुद्धा आपल्या परीने इतरांना भेट देऊन येशुख्रिस्ताची उपस्थिती इतरांसमोर प्रगट करूया. त्यामुळे सर्वजण येशुख्रिस्ताचे प्रेम त्यांच्या जीवनात अनुभवतील.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐकून घे.
1. आपले पोप महाशय, कार्डीनल्स्, बिशप्स्, धर्मगुरू, सर्व व्रतस्थ व प्रापंचिक अगदी कठीण परिस्थितीत आपल्या कार्याद्वारे आणि शुभसंदेशाने सर्वत्र समेटाचे, मनोमिलनाचे कार्य करीत आहेत. त्यांना यश प्राप्त व्हावे व प्रभूचे कार्य अखंडित पुढे चालवण्यास त्यांना कृपाशक्ती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
2. परमेश्वराने आपल्या निवडलेल्या लोकांवर सतत आपला वरदहस्त ठेवावा तसेच त्यांच्या जीवघेण्या त्रासात व अडी-अडचणीत प्रभूने त्यांना साथ दयावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
3. आपण करत असलेल्या चुका आपण मान्य कराव्यात व त्या चुका दुरुस्त करण्यासाठी नेहमीच तयार असावे, त्यातून आपण सर्वांनी अधिक पुर्ततेकडे वाटचाल करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
4. जे तरुण तरुणी देव आणि ख्रिस्त सभेपासून दूर गेले आहेत, त्यांना प्रभू प्रेमाचा स्पर्श होऊन त्यांनी ऐहिक अपवित्र मार्ग सोडून प्रभूच्या मार्गावर मार्गक्रमण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
5. जसे पवित्र मरीयेने स्वत: प्रभूची माता असूनही अलीशिबेकडे जाऊन तिला तिच्या कठीण प्रसंगी मदत केली, तसेच आपणही आपला सामाजिक आणि आर्थिक दर्जा ह्यांना न जुमानता इतरांची भेट घेऊन त्यांना आधार व दिलासा द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
6. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.





     

No comments:

Post a Comment