Monday 21 December 2015

Reflection for the Homily of Christmas Eve (24/12/2015) By: Br. Wilson Gonsalves. 











ख्रिस्त जन्मोत्सव


दिनांक: /१२/१५
पहिले वाचन: यशया ६२: १-५
दुसरे वाचन: प्रेषिताची कृत्ये १३: १६-१७, २२-२५
शुभवर्तमान: मत्तय १: १-२५  

“ईश्वरचा शब्द जाहला माणूस जनामध्ये वास त्याने केला”



प्रस्तावना:
आज आपण गव्हाणी-भोवती बाळ येशूला पाहण्यासाठी जमलेलो आहोत. ह्या महान ख्रिस्तजन्माच्या रात्री येशूचे दर्शन घेण्यासाठी देवाकडून आमंत्रण मिळालं ते फक्त त्या थंडीत कुडकुडत, शेकोटीची ऊब घेणाऱ्या, माळरानावरच्या गरीब मेंढपाळांना. त्यावेळी बेथलेहेमाच्या वाड्या-महालामध्ये एैशो-आरामात राहणाऱ्या धनिकांच्या ते भाग्यात नव्हते. हे कृपापूर्ण आमंत्रण त्यांना स्वर्गातील दुतांकडून प्राप्त झालेले होते. कारण ते हृदयाने, अंत:करणाने गरीब व नम्र होते.
बाळ येशूचे दर्शन घेण्यासाठी आपणाला त्या राजाच्या राज-दरबारामध्ये आमंत्रण मिळालेले आहे. आपण ह्या आमंत्रणास लीनतेची व नम्रतेची वस्त्रे परिधान केलेली आहेत का? पवित्र प्रभूजन्मविधीत बाळ येशूद्वारे प्रगट झालेली कृपा स्विकारून प्रेम, दया, क्षमा आणि शांतीचा शुभसंदेश आपण आपल्या आचारणात उतरवण्यासाठी ह्या मिस्साबालीदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ६२:१-५
    आजच्या पहिल्या वाचनात यशया भविष्यवादी असे सुचीत करतो की अंधकारात व मृत्यूच्या छायेत चालणाऱ्या रहीवाशांना प्रकाश लाभला आहे. त्यांना पुत्र दिलेला आहे व बधनातून मुक्त करण्यासाठी देवपुत्र मानव झाला.

 दुसरे वाचन: प्रेषितांची कृत्ये १३: १६-१७, २२-२५
प्रस्तुत उताऱ्यात पौलाने आपल्या भाषणात दाविदाचा पुत्र, ‘येशू ख्रिस्त’ ह्याच्याविषयी दिलेली साक्ष ऐकतो. पौलाचे श्रोते इस्रायली म्हणजेच यहुदी लोक होते. पौलाने प्रथम त्यांना त्यांच्या इतिहासाची आठवण करून दिली. दावीद, ‘राजा’ झाला तेव्हा तो ‘देवाच्या इच्छा पूर्ण करणारा राजा’ होता. त्यांच्याच वंशजात देवाने इस्त्रायलसाठी ‘येशू’ हा तारणारा जन्मास घातला. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने पश्चाताप करण्याची घोषणा करून प्रभू येशूच्या येण्याची पूर्वतयारी केली.

शुभवर्तमान: मत्तय १: १-२५.   
दाविदाचा पुत्र ‘येशू ख्रिस्त’ ह्याची वंशावळ  हा या शुभवर्तमानाचा गाभा आहे. देवाने आब्राहाम व दावीद ह्यांच्याशी दोन करार केले होते. हे करार ख्रिस्तामध्ये पूर्ण झाल्याचे दिसून येते. ‘येशू ख्रिस्त’ आब्राहाम व दावीद ह्यांच्या कुळातलाच होता हे या उताऱ्यातून कळते. तसेच योसेफ व मरीयेचा वाड़निश्चय झाला (वाग्दत्त) होता. ख्रिस्ताला मानवी देह धारण करता यावा याकरिता देवाने मरीयेची निवड केली. तिचा योसेफाशी सहवास येण्यापूर्वीच ती पवित्र आत्माने गर्भवती होती. अशारितीने ख्रिस्ताने मानवी देह धारण केला. येशू ख्रिस्त सनातन देव आहे व तो देह्धारी होणारा होता हे या घटनेपूर्वी सुमारे ६०० वर्षापूर्वी यशया संदेष्ट्याने लिहून ठेवले होते.  
                   
बोधकथा:
एका देवळाच्या आवारात, नाताळच्या मध्यरात्रीच्या मिस्सानंतर आनंद-मेळावा झाला, तदनंतर एक धर्मगुरू सहज आवारात फेरफटका मारत होते, तेव्हा त्यांना एक तरूण मुलगा कपाळाला हात लावून बसलेला दिसला, त्याच्या चेह-यावर नाताळचा आनंद कुठेच दिसत नव्हता. आनंद मेळाव्यातील बॅंड, नाच-गाणी, खेळ, हास्य-विनोद ह्या गोष्टी त्याच्या मनाला आनंदी करु शकनव्हते. आनंद-मेळावा फूकट गेला असे धर्मगुरूंना वाटले. धर्मगुरूंनी त्याला विचारले, काय रे मुला, घरी जाणार नाही का? त्यावर तो म्हणाला, घरी कशाला जाऊ? वडील खूप दारू पितात, आई व आजी एकामेकींचे तोंड देखील बघत नाही. आई किंवा बाबांकडून कधीच गोड शब्द ऐकायला मिळत नाहीत. घरामध्ये शांती कधीच नसते, मग मी कशाला घरी जाऊ? धर्मगुरू त्याला म्हणाले; मुला, हा नाताळ तुला एक आव्हान आहे. येशूची शांती घरी आणायला तूला एक संधी आहे. म्हणून येशूवर विश्वास ठेऊन तू घरी जा. धर्मगुरूच्या शब्दांचा आदर करून तो मुलगा आपल्या घरी जातो.  
दुस-यादिवशी धर्मगुरू त्याच्या घरी जातात व घरातील सर्वांना, घरात बनवलेल्या गव्हाणीजवळ एकत्र बोलावतात. सर्वांना एकमेकांची क्षमा मागायला लावतात आणि सांगतात की, झाले गेले ते विसरून जा, भांडण मिटवा एकमेकांमध्ये समेट करा; अशाप्रकारे नवीन सुरूवात करा, तुमच्या घरात आज बाळ येशू जन्म घेत आहे. प्रेम, दया, शांती, क्षमा घेऊन तो आला आहे. थोड्या वेळानंतर आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना म्हणण्यासाठी एकमेकांचे हात धरले असता त्या सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. अशाप्रकारे नाताळ सणाने त्यांचे तूटलेले संबंध जोडले गेले व त्यांच्या घरात ख-या अर्थाने नाताळ साजरा झाला.

मनन चिंतन:
आज आपण, नाताळचा सण साजरा करीत आहत. हा दिवस आपण 'ख्रिस्म' म्हणून साजरा करतो. 'ख्रिस्म' ह्या शब्दाचा अर्थ ख्रिस्त’, म्हणजेच देवाने अभिषिक्त केलेला आणि मस म्हणजे मानव (मनष्य). येशू हा देव, मानवरूप घेऊन मानवाच्या उध्दारासाठी ह्या भूतलावर अवतरला. येशू ख्रिस्त ज्यावेळी जन्माला आला त्यावेळची स्थिती पाहिली तर आपल्याला समजते की, यहूदी लोक हालाकीचे जीवन जगत होते. धार्मिक पूढारी आपल्या स्वार्थासाठी वावरत होते. रोमन राज्यांच्या गुलामीमूळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. एकंदरीत सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले होते. प्रत्येक यहूदी आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय शांततेसाठी झपाटलेला होता. अशा या अत्यंत बिकट परिस्थितीत येशू ख्रिस्त जन्माला आला आणि त्याने सर्व मानव जातीस देवाच्या प्रेमाचा व शांतीचा संदेश दिला.
आज जवळ-जवळ २००० वर्षानंतरदेखील आपली परिस्थिती ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी असलेल्या परिस्थितीसारखीच आहे. आपला समाज देखील दु:खाच्या खाईत बूडाला आहे. महिलांवर होणारे अत्याचार, लूट, चोरी, भांडण, बेरोजगारी, वस्तूची महागाई ह्यामुळे सामान्य माणसाचे जीवन कठीण झाले आहे व माणूस शांतीच्या शोधात अनैतिक गोष्टीकडे वळून आपले जीवन उध्वस्त करीत आहे. अशा या बिकट परिस्थितीत, आज आपण येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याचा वाढदिवस साजरा करीत आहोत. ख्रिस्त आज देखील आपणा सर्वांना त्याची शांती देण्यास आतूरलेला आहे. आज येशू ख्रिस्त गोठ्यामध्ये नव्हे तर आपल्या हृदयामध्ये जन्म घेण्यास व त्याची शांती इतरांपर्यंत पोहोचवण्यास आपणाला आवाहन आहे.
आज देऊळमाता आपणास सांगत आहे की, परमेश्वराने मानवजातीवर एवढे प्रेम केले की त्याने आपला एकूलता एक पूत्र आम्हासाठी दिला. देव आणि मानव यांच्यातील तुटलेले नाते पन्हा जोडण्यासाठी देवपूत्र स्वत: पृथ्वीवर अवतरला. त्याने प्रेमाचा, शांतीचा, क्षमेचा, समेटाचा, सलोख्याचा आणि मायेचा संदेश आणला. पण कालांतराने नाताळचा सण फक्त सुट्‌टीचा, नाच-गाण्याचा आणि खाण्या-पिण्याचा दिवस झाला.
एक कवी म्हणतो, कधीतरी एकदा होता नाताळ, आता आहे नाताळपार्टी, नाताळ वृक्ष, नाताळ खरेदी, नाताळ पक्वान्न, नाताळ कार्ड, नाताळ गीते. सगळे आहे पण बिचारा ‘येशू ख्रिस्त’ त्यामध्ये हरवलेला आहे त्याचा कुठे लवलेशही ह्या नाताळात दिसत नाही. जगामध्ये राग, द्वेष, मत्सर, वैर आणि भांडण आहेत, पण नाताळ कुठे आहे हे आपणाला दिसत नाही. हे सर्व बदलेले पाहिजे. पुन्हा एकदा आपण खराखूरा नाताळ साजरा करायला हवा. त्यासाठी येशू ख्रिस्ताने आपल्याला सुवर्ण नियम दिला आहे, तो म्हणजे. ‘जसे स्वत:वर तसे ऐकमेकांवर प्रेम करा आणि प्रेमामध्ये जगा, कारण देव प्रेम आहे आणि प्रेम देव आहे.

श्रद्धावंताच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे ख्रिस्ता, आम्हांला तुझ्यासारखे नम्र बनव.
१. आपले परमगुरुस्वामी पोप फ्रान्सिस, आपले आध्यात्मिक मेढ़पाळ व आपल्या धर्मप्रांतात कार्यरत असलेले सर्व धर्मगुरु व व्रतस्थ ह्यांच्यावर परमेश्वराने भरपूर आशीर्वाद पाठवावा व त्यांचे आरोग्य चांगले रहावे, तसेच ख्रिस्तसभेचे कार्य करण्याकरिता त्यांना योग्य मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. 
. बाळ येशूने आपणा प्रत्येकासाठी शांतीचा, नम्रतेचा, प्रेमाचा संदेश घेऊन भूतलावर जन्म घेतला. ख्रिस्ताचा हा संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचावा म्हणून आपण ख्रिस्तसभेसाठी प्रार्थना करूया.      
. देवाच्या हृदयात प्रवेश मिळतो तो फक्त नम्र हृद्याच्या धनवान व्यक्तींना. परमेश्वराने आपणा सर्वाना नम्र मनाने धनवान बनण्याचे दान द्यावे म्हणून आपण आज विशेष प्रार्थना करूया.   
.  आज अनेक लोक थंडीने कुडकुडत आहेत. जिवंत राहण्यासाठी धडपड करीत आहेत. अनेक जन मायेच्या उबेसाठी आसरा शोधीत आहेत. परमेश्वरान त्यांना मायेचे उबदार अंथरून घालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
.  आपल्या अवतीभवती अनेक व्यक्ती उपाशी व अन्नाविना जगत आहेत. अनेक जन भूकेने मरत आहेत. असाध्य आजारान निराशेच्या खाटेवर दु:ख भोगत आहेत. परमेश्वरान त्यांना प्रेमाचा स्पर्श व स्वगीर्य आशावाद त्याच्यात सतत तेवत ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
. आता, थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभू चरणी ठेऊ या.

अर्पणाची प्रार्थना: आपण आपली अर्पणे बाळ येशूच्या चरणाशी भक्तीभावे अर्पण करूया.
१.     मेणबत्ती: खिस्त जगाचा प्रकाश आहे. खिस्तजन्माने सारे विश्व प्रकाशित झाले आहे त्या प्रकाशाचे प्रतिक म्हणून आपण ही मेणबत्ती ख्रिस्ताला अपर्ण करूया.
२.     केक: ख्रिस्त गव्हाणीत जन्मला. तो सामान्य मनुष्य झाला. त्याने समाजातील गरीबी, दु:ख व निराशा आपल्यात सामावून घेतली. ज्याप्रमाणे केक अनेक पदार्थ एकत्रित करून तयार केला जातो, तसेच आपणही सर्वाशी एक होऊन त्यांच्या जीवनात गोडी निमार्ण करावी म्हणून आपण हा केक प्रभूला अपर्ण करूया.
३.     फुले: विविध रंगाची व आकारांची फुले ही आकर्षक, मोहक आणि सुगंधीत असतात सर्वाना हवीहवीशी वाटतात. ही फुले मानवाच्या जीवनात आनंद निर्माण करतात. फुलाप्रमाणे मानवाने एकमेकांच्या सहवासात व एकमेकांच्या आनंदात राहावे ह्याची आठवण करून देतात. आपला हा सुगध इतरापर्यंत पोहचावा  म्हणून ही फुले प्रभूला अर्पण करूया.
४.     तारा: ख्रिस्त जन्माची घटना ज्ञानी लोकांना ताऱ्यांद्वारे कळली. त्या ताऱ्याच्या साहाय्याने ते बाळयेशूपर्यंत पोहचू शकले. आपण देवाच्या मार्गाने व सन्मार्गाने चालावे, याची आठवण करून देणारा हा तारा आपण अर्पण करूया.
५.     भाकर व द्राक्षरस: प्रारंभी शब्द मानव झाला व मानवाच्या उद्धारासाठी ज्याने स्वतःचे जीवन समर्पित केले त्या समर्पणाचे प्रतिक म्हणून आपण ही भाकर व द्राक्षारस अर्पण करूया.




No comments:

Post a Comment