Wednesday, 2 December 2015

Reflection for the Homily of 2nd Sunday of Advent (06/12/2015) 
By: Glen Fernandes.











आगमन काळातील दुसरा रविवार



दिनांक: ०६/१२/२०१५.

पहिले वाचन: बारुख ५:१-९.

दुसरे वाचन: फिलीप्पीकरांस पत्र १:४-६, ८-११.
शुभवर्तमान: लूक ३:१-६.

 

“प्रत्येक खोरे भरेल, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल”





प्रस्तावना: 

     आज आपण आगमन काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आगमन काळ म्हणजे प्रभूच्या येण्याचा काळ. आजची तिन्ही वाचने आपल्याला न्यायाचे पालन करा, धर्माचे आचरण करा, कारण तुमच्या मुक्तीची वेळ जवळ आली आहे हा संदेश देत आहेत.
     बारुख ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, शत्रूने केलेल्या स्वारीमुळे जेरुसलेमचा पाडाव झाल्यामुळे, लोक हवालदिल झाले होते. देव अशा लोकांना संदेष्टा बारुख ह्याच्याद्वारे आशेचा किरण दाखवत आहे, तो त्यांचे सांत्वन करीत आहे. संत पौलाने फिलीप्पीकरांस लिहिलेल्या पत्रातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात, संत पौल फिलीप्पीकरांच्या विश्वासाबद्दल, कृतज्ञता व आनंद व्यक्त करत आहे. तर संत लूक लिखित शुभवर्तमानात, योहान बाप्तिस्टा, जे लोक परमेश्वराचा मार्ग तयार करतील ते सर्व देवाने केलेलं तारण पाहतील अशी घोषणा करत आहे.
     परमेश्वराचा स्वीकार करण्यासाठी आपले आचरण बदलावे असा संदेश आजची उपासना आपल्याला देत आहे. ह्या हेतूसाठी लागणारी कृपा आपल्याला लाभावी म्हणून ह्या मिस्साबलीदानात आपण विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: बारुख ५:१-९.
ख्रिस्तपूर्व ५८७ मध्ये यहुदी लोकांचा युद्धात पराभव झाला. त्यांना बाबीलोन शहरात कैदी म्हणून नेण्यात आले. तो त्यांच्यासाठी एक अतिशय दुःखद अनुभव होता. शत्रूने केलेल्या स्वारीमुळे लोक हवालदिल झाले होते. आपले घर, मंदिर, मातृभूमी ह्यापासून दूर जुलूम सहन करत असताना, त्यांनी परमेश्वराकडे धावा केला. आपली गाऱ्हाणी ते परमेश्वराजवळ मांडू लागले. संदेष्टा बारुख ह्याने सांत्वन करणारा संदेश त्यांना दिला. तसेच संदेष्टाने त्यांच्या धर्मबुडव्या वर्तनाबद्दल त्यांची खरडपट्टी देखील काढली. लोकांनी पश्चाताप करून आपली नियत सुधारावी अशी देवाची त्यांच्याकडून अपेक्षा आहे, असे त्यांना बजावले गेले.
समाजामध्ये नैतिक, अनाचर व सामाजिक अन्याय बोकळला होता. न्यायासाठी लढणे हा धार्मिकपणाचा गाभा आहे, त्याविना धार्मिक आचरण म्हणजे दांभिकपणा आहे. संदेष्टे नेहमीच गोरगरिबांच्या बाजूने उभे राहिले. त्यांनी देवाच्या नावाने धनवानाविरुद्ध आघाडी उभारली. दुर्बल घटकांचे शोषण होत असल्यामुळे परमेश्वराचा कोप होईल, परचक्राचे संकट ओढवेल असे इशारे संदेष्टांनी दिले होते. संदेष्टांनी देवाच्या नावाने हे संदेश दिले होते, ही बाब ध्यानात घेतली पाहिजे. देवाला गरिबांवर केलेला अन्याय मुळीच खपत नाही हे सिद्ध होते. व आता पराकष्टात असताना बारुख संदेष्टा त्याच देवाचा संदेश देताना म्हणतो, ‘परमेश्वराचे मार्ग तयार करा, सर्व लोक गरीब-श्रीमंत, विविध जाती, जमाती एकत्र बसून देवाचे गौरव पाहतील, कुठलीही विषमता न ठेवता देवाचा दिवस सर्वांसाठी उगवेल’ अशी आशा बारुख त्या लोकांना घालून देतो.

दुसरे वाचन: फिलीप्पीकरांस पत्र १:४-६, ८-११.
फिलिपिकरांस लिहिलेल्या पत्रात आपण ऐकतो की, संत पौल फिलिप्पीकरांचे आभार मानतो. तो म्हणतो, ‘जेव्हा जेव्हा मला तुमची आठवण येते, तेव्हा तेव्हा मी माझ्या देवाचे आभार मानतो. जेव्हा मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा माझे मन आनंदाने फुलून येते.” संत पौलाने फिलिप्पी या शहरात कार्यारंभ केल्यावर त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्याने मोठा शिष्य परिवार जमवला. गुरुशिष्यांमध्ये अतिशय आपुलकीचे नाते निर्माण झाले. त्याचे प्रस्तुत प्रतिबिंब ह्या पत्रात घडते. पत्र आनंदाच्या भावनांनी ओतप्रोत भरले आहे. हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ख्रिस्त येणार आहे, अशी ग्वाही पौल फिलिप्पीकरांस करून देतो. प्रभू ख्रिस्ताचे पुनरागमन होईल, हे निश्चित; परंतु ते नक्की कधी होईल, हे संत पौल सांगत नाही. तरीसुद्धा तो लोकांचे मनोधैर्य वाढवितो. तो लिहितो की, ‘ज्याने तुमच्या जीवनात शुभकार्याला प्रारंभ केला आहे, तो ते कार्य ख्रिस्ताच्या आगमनाच्या दिवसापर्यंत पूर्णत्वास नेईल, अशी शाश्वती मला आहे’.

शुभवर्तमान: लूक ३:१-६.
संत लूकक्रत शुभवर्तमानात बाप्तिस्मा करणारा योहान व त्याचा संदेश ऐकत आहेत. मसीहाच्या आगमनापूर्वी एलिजा नावाच्या संदेष्टाचे पुनरागमन होईल, अशी तत्कालीन यहुद्यांची समजूत होती. प्रारंभीच्या ख्रिस्ती लोकांसाठी योहान हाच एलिजाचा अवतार होता.
यहुदी जनता रोमी लोकांचा छळ सहन करत होती. पारतंत्र्यात असताना योहान यार्देनजवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चातापाच्या बाप्तीस्म्याची घोषणा करीत फिरला. यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा’, हा संदेश दिला. योहानाने समाजात एकता व बांधिलकी असावी, म्हणून प्रयत्नांची पराकष्टा केली. अभिजन, धार्मिक व श्रीमंत ह्यांच्या विरोधाची पर्वा न करता योहानाने आपले कार्य अखंडीतपणे सुरु ठेवले.
“प्रत्येक खोरे भरेल, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल, खडकाळीच्या वाटा सपाट होतील”, हे यशया संदेष्टाच्या पुस्तकात जसे लिहिले आहे, त्याप्रमाणे योहानाने घोषणा केली. समाजातील उच्च-निच, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा हे सर्व नष्ट होईल व सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील अशी आशा प्रकट केली आहे. येशू हा सर्व जगाचा तारणारा होता. त्याचे वैभव व गौरव हे समाजातील सर्वांसाठी होते. त्याचीच जाणीव आपणास ह्या प्रस्तुत उताऱ्यातून होते.

मनन चिंतन:
 
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा ह्यांनी ४ जून २००९ रोजी इजिप्त येथील कैरो विद्यापीठात अप्रतिम भाषण केले. ते म्हणाले, “खूप अश्रू व खूप रक्त वाहून गेले आहे, पण एक दिवस असा असेल, जेव्हा इस्रायली व पॅलेस्तीन माता आपल्या मुलांना निर्भयपणे वाढवू शकतील, जेव्हा तीन धर्माचे उगमस्थान असलेली पवित्र भूमी, ईश्वराला मान्य असलेले शांतीस्थळे बनेल; जेव्हा येरुशलेम यहुदी, मुस्लीम, व ख्रिस्ती धर्माचे सुरक्षित व नित्याचे आगर बनेल आणि तिथे अब्राहमची सर्व लेकरे इस्रायलच्या गोष्टीमध्ये सांगितल्यानुसार गुण्यागोविंदाने नांदतील आणि जेव्हा मोशे येशु व मोहम्मद एकत्र प्रार्थना करतील; पण तो दिवस खेचून आणण्याची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे”.
     आपण सर्व आशेवर जगतो. हे जग विश्वासावर जगते. काहीतरी चांगले घडेल, घडले पाहिजे हि आपल्या सर्वाची अपेक्षा असते. आजची तिन्ही वाचने ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवसाबद्दल आपणास उपदेश करीत आहे. आगमन काळ म्हणजे परमेश्वराचा येण्याचा काळ जेंव्हा तो येईल, तो दिवस कसा असेल?  ह्या आशयाची वाचने आपण ह्या काळात ऐकतो.
     आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो कि, प्रभू समाजातील सर्व विषमता दूर करणार आहे. ‘त्यादिवशी, प्रत्येक खोरे भरेल, डोंगर व टेकडी सपाट होईल, वाकडी वळणे सरळ होतील; जो मोठा आहे, तो नमविला जाईल व जो छोटा आहे, तो उंचावला जाईल. सर्वजण एक होतील सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील; हे तारणाचे आमंत्रण अखिल मानवजातीसाठी आहे. परंतु त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपण परमेश्वराचे राज्य ह्या धरतीवर येण्यासाठी झटले पाहिजे. ‘अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी की, वाटा निट करा. अशी मोठी जबाबदारी आपणावर आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात सुद्धा आपण ऐकल्याप्रमाणे, ‘परमेश्वर नेहमी सर्वांवर प्रीती करत असताना गरीबांबरोबर तो ठामपणे उभा राहतो, त्यांचा तो आधार होतो’. धर्म नेहमीच गरिबांना आसरा देतो व आशेचा किरण निर्माण करतो. भारत हि एक महासत्ता होणार आहे अशी स्वप्ने रंगविली जात आहेत. ते स्वप्न साकार होणार असेल तर आनंदच आहे. दुर्दैवाने ते दिवास्वप्नच ठरण्याची मोठी शक्यता आहे. उद्योगपतींचे जीवन सुखकर होईल अशी हमी भारताच्या अर्थमंत्र्यांनी जगाला दिली आहे! गोरगरिबांचे जीवन हालाकीचे करूनच श्रीमंतांचे जीवन सुखी करता येते अशी समजूत आहे.
     परमेश्वराचे राज्य हे सर्वांसाठी आहे व त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. एक दिवस मार्टीन ल्युथर किंग(Jr) रस्त्यावरून जात असताना त्यांनी एक कृष्णवर्णीय व्यक्ती रस्त्यावर पडलेला पाहिला. अपघात झाल्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत आपली अखेरची घटका तो मोजत होता. त्यांनी इस्पितळात फोन केला. काही क्षणातच रुग्णवाहिका आली व रुग्णवाहिकेतील व्यक्तींनी त्या दु:खात विव्हळत पडलेल्या कृष्णवर्णीय व्यक्तीस पाहिले तरीही त्याक्षणी त्यांनी तेथून निर्गमन केले. हा धक्कादायक अनुभव पाहून मार्टीन ल्युथर किंग ह्यांना फार वाईट वाटले. आपण सर्व एका परमेश्वराची लेकरे असताना असा भेदभाव का? मार्टीन ल्युथर किंग ह्यांनी एक स्वप्न पहिले व त्यासाठी ते जगले. ‘I Have a Dream’. त्यांच्या भाषणात त्यांनी परमेश्वराचा दिवस येण्याचे स्वप्न पाहिले. माणसाच्या शरीराचा रंग न पाहता माणसातील देव पाहण्यासाठी त्यांनी आव्हान केले. एक दिवस सर्व काही ठीक होईल अशी आशा त्यांनी बाळगली व त्यासाठी लढत असताना, त्यांनी आपला प्राण गमावला. परंतु त्यांचे स्वप्न सत्यात उतरले. आज कृष्णवर्णीय असलेले बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत व लॅटिन अमेरिकेत सर्वांना समान अधिकार आहेत. विश्वाच्या समाप्तीच्या वेळी इडा-पिडा टळेल आणि देवाचे राज्य साकार होईल. मग सर्व संघर्ष, वैमनस्य, शत्रुत्व विलयास जाईल. असा आशावाद पवित्र बायबल मध्ये व्यक्त केलेला आहे. भावी सुखी-काळाचे वर्णन करताना, संदेष्टा यशया म्हणतो, ‘तेव्हा लांडगा आणि कोंकरू, चित्ता आणि करडू एकत्र बागडतील, तान्हे बाळ नागाच्या बिळात हात घालतील, अर्भक सापाच्या बुबुळावरून हात फिरवतील, कुणी कुणाला उपद्रव देणार नाही, त्रास देणार नाही वैराचा मागमूस उरणार नाही’ (यशया ११:६-८).
            मानवी जीवन सुखकर होण्यासाठी समाजात शांतीचे वातावरण असणे अनिवार्य आहे. शस्त्राच्या धाकामुळे कायमस्वरूपी शांती निर्माण होणे अशक्यप्राय बाब आहे. आज जगात शस्त्र स्पर्धा चालू आहे. शस्त्रास्त्र निर्मितीवर होणारा खर्च शेतीकडे वळविला, तर जगातील सर्व लोकांना पुरेसे अन्न मिळेल. कुणीही उपाशीपोटी जाणार नाही. सर्वच राष्ट्रांनी तलवारी मोडून त्यांचे नांगराचे फाळ बनविले तर शांतीचे स्वप्न साकार होऊ शकेल.
     जगातील सारेच धर्म शांतीच्या मंत्राचा घोष करतात. ह्या धरतीवर शांतीचे राज्य अवतरावे अशी सर्व धर्मांची प्रार्थना आहे. धर्माची नाळ सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्यायाबरोबर जोडली गेली नाही, तर ‘धर्माचे रुपांतर’ ‘अफूच्या गोळीत’ होण्यास वेळ लागत नाही. उच्चनिय भाव, वंश आणि वर्णश्रेष्ठता, स्री-पुरुष भेदभाव, जातीभेद, आर्थिक विषमता ह्यांचे समूळ निर्मुलन झाल्याशिवाय शांतीची पहाट होऊ शकत नाही. शांतीसाठी समता अनिवार्य आहे.
     न्यायाशिवाय शांती नाही आणि शांतीशिवाय समृद्धी नाही. मोक्ष, मुक्ती किंवा निर्वाणपण साधायचे असेल तर न्याय व शांतीसाठी झटणे आवश्यक आहे. परमेश्वराचे राज्य या धरतीवर यावे म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. म्हणून हवी असणारी कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.
१.     आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांनी त्यांचे मिशनकार्य चालू असताना सामाजिक व आर्थिक पातळीवर आधारित, श्रद्धावंतांमध्ये भेदभाव न करता सर्वांना एकत्र करून त्यांची आध्यात्मिक काळजी घ्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. 
२.     आज मोठया संख्येने लोक आपल्या मायभूमीतून स्थलांतर करीत आहेत, अनेक अडचणींना व संकटांना तोंड देत आहेत, ते हालाकीचे जीवन जगत आहेत. त्यांनी नेहमी त्यांच्या प्रियजनांच्या संपर्कात असावे व जेथे ते स्थायिक होतात, तेथे त्यांना सुरक्षित वाटावे म्हणून आपण प्रार्थना करूया. 
३.     जे शेतकरी पिके घेण्यासाठी सर्व गोष्टींची गुंतवणूक करतात व अचानकपणे उदभवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अपयशी ठरतात, अशा शेतकऱ्यांनी आत्महत्येस बळी पडू नये, ह्यासाठी त्यांना सर्वोपरीने मदत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. 
४.     जिवंत व मेलेल्यांचा न्याय करण्याकरिता अचानकपणे येणाऱ्या स्वर्गीय न्यायकर्त्या प्रभूसाठी आपण सदैव जागृत असावे म्हणून प्रार्थना करूया. 
५.     जे लोक येशूला त्यांचा तारणारा आणि राजा म्हणून स्वीकारीत नाहीत, अशांनी त्याचे व त्याच्या राज्याचे आपल्या जीवनात स्वागत करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. 
६.     थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभूचरणी मांडूया.


No comments:

Post a Comment