Tuesday 22 December 2015


Reflection on the Feast of Holy Family By: Minin Wadkar.











पवित्र कुटुंबाचा सण


दिनांक: २७/१२/२०१५  
पहिले वाचन: १ शमुवेल १:२०-२२, २४-२८
दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र ३:१-२, २१-२४
शुभवर्तमान: लूक: २: ४१-५२


प्रस्तावना:
आज आपण ‘पवित्र कुटुंबाचा सण’ साजरा करीत आहोत. हा सण विशेषकरून योसेफ, मरिया, आणि येशू यांच्या जीवनावर आधारलेला आहे. कारण ह्या कुटुंबाने सदैव देवाच्या सानिध्यात राहून देवाच्या योजनेप्रमाणे जीवन जगून आपलं कुटुंब पवित्र केले. याच कारणामुळे ‘पवित्र कुटुंब’ देऊळ मातेच्या नजरेसमोर सर्व कुटुंबांसाठी एक आदर्श कुटुंब ठरलेले आहे. आदर्श कुटुंब बनविण्यासाठी विश्वास, कठीण परिश्रम, एकमेकांना स्वीकारून घेण्याची क्षमता, क्षमा, देवावर विश्वास आणि शेजाऱ्यांवर प्रिती ह्या सर्व मुल्यांची अत्यंत गरज असते.
कुटुंब हे मानवी जीवनाचे उगमस्थान आहे. म्हणून समाजाच्या उभारणीसाठी चांगल्या कुटुंबाची फार आवश्यकता असते. जर आपण कुटुंबाची पावित्रता सांभाळली नाही, तर मानवी जीवनाला अर्थच उरणार नाही. ‘देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये’ ही देवाची आज्ञा प्रत्येक कुटुंबाने आचरणात आणावी तसेच पवित्र कुटुंबाप्रमाणे आपणसुद्धा आपल्या कुटुंबाची पावित्रता सांभाळण्यासाठी चांगल कार्य करावे म्हणून त्यासाठी लागणारी कृपा-शक्ती, पवित्र कुटुंबाच्या सहाय्याने परमेश्वराकडे  ह्या मिसाबलीदानात मांगुया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: १ शमुवेल १:२०-२२, २४-२८
हन्ना परमेश्वराकडे पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करते. परमेश्वर हन्नाची प्रार्थना ऐकतो आणि तिला पुत्र होतो ज्याचे नाव ती शमुवेल म्हणजेच ‘परमेश्वराकडे मागितला’ असे ठेवते. जेव्हा हन्ना बालकास घेऊन वार्षिक होमबली अर्पिण्यास व नवस फेडण्यास परमेश्वराच्या मंदिरी जाते, तेव्हा ती एलीला आपण बालकासाठी परमेश्वराकडे केलेल्या प्रार्थनेची कबुली देते आणि हन्ना शमुवेलला परमेश्वराच्या स्वाधीन करते.

दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र ३:१-२, २१-२४
 योहान आपल्या पत्राद्वारे आपणास सांगतो की ‘आपण देवाची मुले आहोत आणि हे देवाने आम्हांला दिलेले प्रीतीदान आहे.’ त्याची आज्ञा हीच आहे, ‘त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे, आपण एकमेकावर प्रीती करावी’. कारण त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठायी राहतो व देव त्या माणसाच्या ठायी वास करतो.

शुभवर्तमान: लूक: २:४१-५२
लूक शुभवर्तमानकार प्रस्तुत उताऱ्यात आपल्याला येशूची ओळख करून देतो. येशूची ओळख करत असताना लूक, खालील बाबींचा उल्लेख करतो: ‘येशूचे कार्य, स्वर्गीय पिता व येशू ह्यांच्यातील नाते, येशूचे आई-वडील आणि येशूचा आज्ञाधारकपणा. ह्या बाबींचा उल्लेख करून लूक आपणाला येशूच्या समजूतदारपणाचे व कार्याचे कौतुक करण्यास सांगतो. तसेच लूक वल्हांडण सणाच्यावेळी येशूच्या आई-वडिलांनी येशूला शोधण्यासाठी केलेली धडपड याचेही वर्णन करतो.
     यहुदी लोक वल्हांडणाचा सण प्रत्येक वर्षी साजरा करतात. वल्हांडण सणाचे नियम जुन्या करारामध्ये निर्गम २३:१७; ३४:२३; लेवीय २३:४-१४ तसेच १ शमुवेल १:३, २१; २:१९ मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. हा सण साजरा करण्यासाठी मरिया, योसेफ व येशू येरुशलेमला जातात. वल्हांडण सण साजरा करून झाल्यानंतर, परतीच्या मार्गावर असता, बारा वर्षाचा येशू मागे राहतो. हे त्याच्या आई-वडीलांच्या लक्षात येत नाही. परंतु तिसऱ्या दिवशी मरिया व योसेफ येरुशलेमला परत जातात आणि त्यांना तेथे येशू, मंदिरात शास्त्री व परुशी ह्यांच्याशी संवाद करताना सापडतो.

बोथकथा:
एक राजा शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. तेव्हा तिथे त्याने एका साधूला झाडाखाली मनन-चिंतन करताना पाहिले. राजा साधू जवळ जाऊन नतमस्तक झाला आणि विचारले, ‘साधू महाराज! तुम्ही ह्या घनदाट व भयानक जंगलात एकटे कशाला राहतात?’ तुम्हांला जंगली प्राण्यांची भिती वाटत नाही का? साधू म्हणाला, ‘माझ्या मुला मी एकटा नाही, माझं कुटुंब माझ्याबरोबर आहे. राजाने आजूबाजूला पाहिलं पण त्याला कोणीच दिसलं नाही. म्हणून राजाने आश्चर्याने साधूला विचारले, ‘तुमचे कुटुंब कुठे आहे?’ साधूने शांतमनाने उत्तर दिले, अहो राजे महाराज! जगात सर्व गोष्टी दिसतातच असे नाही; काही दिसतात, काही दिसत नाही. गोंधळून गेलेला राजा पुन्हा साधूला विचारतो, ‘महाराज तुम्ही कशाबद्दल बोलत आहात ते मला अजून समजलेलं नाही. कृपा करून तुम्ही तुमच्या कुटुंबाविषयी सांगाल का?’ साधू म्हणाला, ‘सय्यम माझे वडील आहेत, ‘क्षमा माझी आई आहे, ‘शांती माझी साथीदार आहे, सत्य माझा मुलगा आहे, करूणा व अहिंसा माझ्या बहिणी आहेत, ज्ञान माझे जीवन आहे. ज्यांचे हे सर्व नातेवाईक आहेत तो कसा काय घाबरणार?’ साधूचे उत्तर राजाला रहस्यमय वाटले. राजा साधूकडे आश्चर्याने पाहू लागला.

[ जी व्यक्ती आध्यात्मिक आणि कौटुंबिक जीवन जगते ती व्यक्ती कशालाही घाबरत नाही. आपण कौटुंबिक जीवन नेहमीच जगतो, पण आध्यात्मिक कुटुंबाचं काय? आपण आध्यात्मिक कुटुंबाची निर्मिती केलेली आहे का? कौटुंबिक जीवनात अनेक संकटे येतात. पैसा, उदयाची चिंता व नोकरी या सर्व गोष्टींसाठी माणूस धडपडत असतो. तसेच विविध कारणांमुळे कौटुंबिक जीवन नाश होण्याच्या मार्गावर आहे. जर आपण आध्यात्मिक कुटुंबाची निर्मिती केली असेल, तर आपणाला कशालाही घाबरण्याचे कारण नाही. कारण कौटुंबिक जीवन हे आध्यात्मिक कुटुंबावर अवलंबून आहे. त्यामुळे कौटुंबिक जीवनाव्यतिरिक्त, आध्यात्मिक कुटुंबाची फार गरज आहे. जर दोन्ही कुटुंब मजबूत आणि एकमेकांना साहाय्य करणारे असतील तर माणूस बलवान व बलिष्ट होतो. योसेफ, मरिया व येशू यांचे जीवन सुद्धा आध्यात्मिक जीवनाने परिपूर्ण होते. कौटुंबिक जीवन जगण्यासाठी लागणारे आध्यात्मिक कुटुंब त्यांच्याकडे होते. सय्यम, क्षमा, करून, अहिंसा हे सारे गुण त्यांच्या अंगी होते. याच आध्यात्मिक जीवनाच्या बळावर त्यांनी कौटुंबिक जीवनात येणाऱ्या संकटावर मात केली. ]

मनन–चिंतन:
‘पवित्र कुटुंबाचा सण’ हा ‘कुटुंबांचा’ दिवस आहे. हा दिवस आहे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा. हा दिवस आहे कुटुंबातील प्रत्येक माणसाचे, मोठया मनाने कौतुक व अभिनंदन करण्याचा. कुटुंबात आजी-आजोबा, आई-वडील, मुले, नातेवाईक असतात. त्यांच्या कष्टांमुळे, त्यागामुळे व प्रेमामुळे कुटुंबातील प्रत्येकाचे जीवन सुखरूप बनत असते. म्हणूनच संत योहान म्हणतात, ‘आपण देवाची मुले आहोत आणि हे देवाने आपणाला दिलेले प्रीतीदान आहे’. हेच प्रीतीदान टिकवून ठेवण्यासाठी देव आपल्याला त्याच्या आज्ञा सांभाळण्यासाठी सांगतो.   
सर्व कुटुंबांनी पवित्र कुटुंबाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेऊन चांगले कौटुंबिक जीवन जगावे. योसेफाने चांगले जीवन जगून एका चांगल्या वडिलाची भूमिका चोखपणे बजावली. त्याने साधं सुताराचं काम करून, काबाडकष्ट करून, आपल्या कुटुंबाला म्हणजेच मरिया व येशूला साभाळून त्यांचे पालनपोषण केले. योसेफाने देवाच्या आज्ञाचे तंतोतंत पालन करून, मरियेशी तो प्रामाणिक राहिला. जर आम्ही देवाने दिलेले कार्य प्रामाणिकपणे किंवा विश्वासाने पार पाडले तर खरोखरच देवाचा आशिर्वाद आम्हावर राहील.
संत बहिणाबाई चौधरी म्हणतात, ‘अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर.’ हे बहिणाबाईंचे शब्द आईच्या जीवनाला साजेसे व योग्य आहेत. ‘आईचे काळीज’ ह्या चित्रपटामध्ये मुलगा आपल्या खडूस, क्रूर व लोभी पत्नीला हवं असलेल आईच काळीज तो तिचा खुण करून, त्याच्या पत्नीला देतो. आईचा खुण करून मुलगा तिचे काळीज घेऊन बायकोला द्यायला जात असता, तो वाटेवर पडतो आणि लगेच हळूच ‘हृद्यातून’ आईचा आवाज येतो, ‘बाळा तुला लागलं का?’ हे खरोखर सत्य आहे. आई म्हणजे माया. आईचे घरातील प्रत्येक व्यक्तींवर अपार प्रेम व माया असते. मरियेने देवाच्या पुत्राला जन्म देऊन त्याचे जीवन फलद्रूप केले. येशूच्या जन्मापासून ते मरेपर्यंत ती त्याच्या सोबत राहिली. त्याच्या सुखात तसेच दुःखातही सहभागी झाली. मरियेने सदैव नम्रतेचे, शांतीचे व एकोप्याचे जीवन जगुन, योसेफाला विश्वासू राहिली. याप्रकारे देवाने सोपविलेले कार्य मरीयेने सुद्धा निष्ठेने पार पाडले. तिच्या सारखे पवित्र जीवन जगण्यासाठी देव आपणास आज बोलावीत आहे. आपले कौटुंबिक जीवन सुखरूप आणि सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यासाठी आपल्याला येशूच्या आईचे मन जोपासण्याची अत्यंत गरज आहे.
जर घरामध्ये मुले असली तर घर आनंदाने भरून जाते. आई-वडिलांचे आपल्या मुलांवर प्रेम असते आणि ह्याच मुलांकडून त्यांच्या आई-वडिलांची अपेक्षा असते की, त्यांनी मोठं होऊन चांगलं जीवन जगावं. मुलांचे कुटुंबातील कर्तव्य म्हणजे, ‘प्रेम करणे, पालकांचा सन्मान व आदर करणे हे होय’. येशूचे बालपणातील जीवन मुलांनी आपल्या जीवनात आचरणात आणून त्यांच्यासारखे जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. मुलांनी सर्वप्रथम आई-वडिलांना विसरता कामा नये. त्यांनी घेतलेले कष्ट विनामुल्य असून, मुलांचेही कार्य विनामुल्य असावे. आई-वडिलांचे आभार, चुकलं तेव्हा माफी मागण्याची क्षमता आणि प्रेमाची भाषा इत्यादींची गरज आहे. आई-वडिलांच्या आपल्या मुलांवरील असलेल्या मर्यादा व नियम हे मुलांच्या उन्नतीसाठी असतात हे मुलांनी ध्यानात ठेवले पाहिजे व चांगले जीवन जगण्यासाठी सदैव प्रयत्नशील असावे.
 आई ही कुटुंबाचा श्वास आहे. वडिल हे कुटुंबाचे धड आहे तर मुलं-मुली त्या कुटुंबाचे हात-पाय आहेत. एकमेकांना कोणीच दुसऱ्यांपासून अलिप्त करू शकत नाही. ज्याप्रमाणे श्वासाशिवाय शरीर निर्जीव आहे, त्याचप्रमाणे धडाशिवाय श्वासाला काही अर्थ नाही. कुटुंबामध्ये आई-वडील आणि मुलं-मुली एकमेकावर तशाच पद्धतीने अवलंबून असतात. 
एक चांगलं कुटुंब घडवणे, हे एखाद्या मूर्तिकाराच्या कलाकुशलतेपेक्षाही फार कठीण आहे, कारण कुटुंबात आई-वडील हे दगडाच्या किंवा मातीच्या अथवा लाकडाच्या मुर्त्या घडवून त्यांना आकार देत नसतात, तर रक्ता-मासाच्या असलेल्या माणसांवर चांगले संस्कार करत असतात. त्यांना ते घडवत असतात आणि एक चांगले भावी आयुष्य जगण्यासाठी सज्ज करत असतात. म्हणूनच म्हणतात: ‘कुटुंब हा भावी आयुष्याचा पाळणा आहे’. हे सर्व जरी खरं असलं तरी आजच्या संगणक युगात आपण पाहतो की, कुटुंब–संस्था ही नाश पावत आहे. आज आपल्या समाजात बरीचशी कुटुंब आहेत, जी दुभागली आहेत. याला कारणे आहेत अनैतिक जीवन, वाईट वागणे, शिल्लक कारणांवरून भांडणे, घटस्पोट इत्यादी.
आपण स्वत:ला प्रश्न विचारूया: आपलं कुटुंब पवित्र आहे का? आपल कुटुंब पवित्र करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे?
१. प्रार्थनामय जीवन: कुटुंबामध्ये प्रार्थना करणे खूप गरजेचे आहे. ‘कशा विषयीही चिंताक्रांत होऊ नये, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार-प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवावी’ (फिलीपैकरांस पत्र ४:६). ‘जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्या मध्ये मी हजर आहे’ (मत्तय १८:२०). ‘प्रार्थनेत तप्तर असावे व तिच्यात उपकार-स्तुती करीत जागृत असावे’ (कलसैकारांस ४:२). 
२. एकमेकांचा आदर करणे: ‘माझ्या मुला, तु आपल्या आई-बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको’ (नीतीसुत्रे ६:२०). ‘तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देव तुझा देव परमेश्वर तुला जीवन देतो त्यात तु चिरकाळ राहशील आणि तुझे कल्याण होईल’ (अनुवाद ५:१६).
आपले सारे जीवन परमेश्वराच्या चरणी ठेऊया. आपल्या कौटुंबिक व आध्यात्मिक जीवनाच्या उन्नतीसाठी व भरभरासाठी देवाजवळ त्याची कृपा व सामर्थ्य मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे पवित्र कुटुंबा, आंम्हासाठी मध्यस्थी कर.
1.     आपले परमगुरुस्वामी, कार्डीनल्स, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी-धर्मबंधू ह्यांच्यावर व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशीर्वाद असावा, तसेच त्यांच्या कार्याद्वारे त्यांनी लोकांना एक पवित्र कुटुंब उभारण्या मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.     आपल्या प्रत्येकांच्या कुटुंबात शांती, प्रेम, ऐक्य सतत नांदावे व आपल्या त्यागमय जीवनातून एका सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा अनुभव सदोदित आपणास मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
3.     जी कुटुंबे अनैतिक वागणूक, गैरसमज अशा कारणांमुळे उध्वस्त झाली आहेत, अशांना पवित्र कुटुंबाचे मार्गदर्शन लाभून त्यांना समजूतदारपणाचे, शांतीचे व प्रेमाचे वरदान लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
4.     आपल्या वृद्ध आईवडिलांना आपल्या प्रेमाचे, मायेचे व करुणेचे छत्र लाभून त्यांना आनंदी ठेवण्यास परमेश्वराने आपणास कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
5.     आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.  







No comments:

Post a Comment