Monday, 21 December 2015


Reflection for the Homily of Christmas Day (25/12/2015) By: Br. Lavet Fernandes.











नाताळ सण (सकाळ)



दिनांक: २५/१२/२०१५.
पहिले वाचन: यशया ५२:७–१०.
दुसरे वाचन: इब्री १:१-६.
शुभवर्तमान: योहान  १:१-१८.

“प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता”



प्रस्तावना:
     आज आपण नाताळ हा सण साजरा करत आहोत. आजची तिन्ही वाचने देवाने त्याच्या पुत्राद्वारे केलेल्या तारणाची घोषणा करतात.
आनंद करा, उल्हासित हो कारण आज बाळ येशू जन्मलेले आहे. ह्या संदेशाची भविष्यवाणी यशया संदेष्टा आजच्या पहिल्या वाचनाद्वारे करत असताना सियोनातील लोकांना आनंद्घोष करण्यास सांगत आहे. इब्री लोकांस पाठवलेल्या बोधपत्रात आपल्याला असा संदेश मिळतो की, प्राचीनकाळी देव संदेष्ट्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. देवाचा पुत्र देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. आता देव आपल्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये संत योहान आपल्याला सांगत आहे की, प्राचीनकाळी जो शब्द देवाबरोबर होता त्या शब्दाने आता मनुष्यरूप धारण करून जगाच्या कल्याणासाठी व तारणासाठी पृथ्वीवर जन्म घेतला आहे.
आपण ह्या पवित्र मिस्साबलीदानात भाग घेत असताना, बाळयेशूकडे आशीर्वाद व कृपा मागूया आणि त्याच्या प्रेमाचा शांतीचा, दयेचा व क्षमेचा संदेश लोकांपर्यंत पोह्चवण्यासाठी विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ५२:७-१०.
सियोनेतील लोक जेव्हा राजाच्या गुलामगिरीमध्ये होते, तेथे त्यांचे खूप छळ चाललेले होते. तेव्हा यशया संदेष्टा त्यांच्यासाठी चांगली बातमी घेऊन येतो. तो त्यांना ह्या प्रस्तुत उताऱ्याद्वारे प्रोत्साहन देतो. जी व्यक्ती चांगल्या बातम्या आणते, त्या व्यक्तीचे नेहमी स्वागत केले जाते. निवेदकाची चांगली बातमी हिच की, ‘तारण जवळ आलेले आहे ते अगदी तुमच्या समोर आहे. ह्या जगात शांती अवतरली आहे आणि आता युद्ध संपुष्टात येतील. बाबीलोनची नैसर्गिकरीत्या हद्दपार झाली असून ते येरुशलेममध्ये परत आलेले आहेत’.

दुसरे वाचन: इब्री १:१-६.
देव प्राचीन काळी त्यांच्या निवडलेल्या संदेष्ट्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला व काळाची पूर्तता झाल्यावर त्याने आपला एकुलता एक पुत्र ह्या भूतलावर पाठवला. देवाचा पुत्र देवदूतांपेक्षा श्रेष्ठ गणला व देवाने त्याला सर्व गोष्टींचे वारीस बनविले. तो पुत्र ह्या सृष्टीची देखरेख देव ‘शब्दाच्या’ (येशू ख्रिस्त) शक्तीद्वारे करत असतो.

शुभवर्तमान: योहान १:१-१८.  
     योहानाच्या शुभवर्तमानाची सुरुवात ही ‘शब्दाने’ झालेली आहे. योहानाने ‘शब्दाला’ खूप महत्व दिलेले आहे. हाच ‘शब्द’ आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये वाचतो. ह्याचा अर्थ असा की, ‘शब्द’ हा वेळेच्या अगोदर होता. ग्रीक भाषेमध्ये ‘शब्दाला’ ‘लोगोस’ असे म्हणतात. हा ‘शब्द’ ‘दैवी’ होता. येशू हा ‘देवाचा पुत्र’ ख्रिस्त आहे. तो युगानूयुगापासून आहे, हे सांगण्यासाठीच योहान म्हणतो, ‘प्रारंभी देव होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता तोच प्रारंभी देवासह होता’. ख्रिस्त हा विश्वासाच्या सुरुवातीपासून आहे, हे योहानाला झालेले प्रगटीकरण आहे. ‘शब्द’ हा सृष्टीच्या अस्तित्वा अगोदर होता. सृष्टी देवाच्या शब्दाने निर्माण झाली म्हणून शब्द हा जीवनाचा उगम व सुरुवात आहे. शब्दामध्ये व देवामध्ये खूप जवळीक नाते आहे, त्यामुळे ‘शब्द’ अनंतकाळचे देणारे जीवन आहे.

 बोधकथा:
एकदा एका स्त्रीला स्वप्न पडते व तिला वाटते की, ती एका सुंदर शहरामध्ये उभी आहे. तिकडे उंच इमारती आणि उंच दुकाने आहेत. तिच्या ह्या आनंदाला पारावा नसतो; त्यामुळे ती एका दुकामध्ये जाते. तिथे जाऊन पाहते तर काय येशू ख्रिस्त स्वत: त्या कांऊटरवर बसलेला आहे. ती आश्चर्यचकित होते. ती स्त्री ख्रिस्ताला विचारते की, ‘प्रभू, तुम्ही ह्या दुकानात काय विक्री करता? येशू ख्रिस्त त्या स्त्रीचे स्वागत करत, विचारतो, ‘जी वस्तू तुमच्या मनात आहे, ती वस्तू येथे भेटते’. हे शब्द ऐकल्यानंतर ती स्त्री बोलते, ‘प्रभू मला सर्वकाळचा आनंद आणि शांती दया’. ती स्त्री थोडा वेळ थांबते, विचार करु लागते आणि पुन्हा बोलते, ‘मलाच नाही तर सर्व मानव जातीच्या प्रत्येक मानवाला सर्वकाळ आनंद आणि शांती दया’. हे सर्व ऐकल्यानंतर येशू ख्रिस्त हसतो आणि बोलतो, ‘माझ्या प्रिय स्त्रीये तुम्ही चुकीच्या जागेवर आलेले आहेत. इकडे फळे विकली जात नाहीत तर फक्त बिया विकल्या जातात’.
(होय, खरोखर आपण नाताळ सणाचा अनुभव घेतो का? हा प्रश्न आज आपल्याला पडत असेल. जेव्हा आपल्या घरामध्ये व आपल्यामध्ये शांती नसते, तेव्हा आपली स्थिती त्या स्त्रीसारखी होते. बी घेण्याऐवजी आपण फळ विकत घेतो. मग आपल्याला कशी भेटणार ती शांती जी आपल्याला हवी असते? म्हणून आपण ह्या नाताळ सणाच्या दिवशी शांती प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करूया).

मनन चिंतन:
आज आपण नाताळचा सण साजरा करीत आहोत. हा दिवस आपण ‘ख्रिसमस’ म्हणून साजरा करतो. देवाचा पूत्र मानवरूप धारण करून, आपल्यामध्ये आज आलेला आहे. मानवजातीच्या उद्धारासाठी ख्रिस्ताने मानवरूप धारण केले व ख्रिस्त आपल्यासारखाच एक ‘मनुष्य’ म्हणून भूतलावर जन्मला आला. देवाने मानवजातीवर एवढी प्रिती केली कि, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र ह्या भूतलावर पाठविला. देवाने आपल्या पवित्र पुत्राला मानवी स्वभाव दिला, जेणेकरून येशू ख्रिस्त आम्हांमध्ये राहील व आमच्या भावना समजून घेईल. देवाने आपल्यावर खूप प्रेम आणि प्रिती केली. देवाने आपल्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी केल्या, कारण देवाचे मानव जातीवर खूप प्रेम होते. खरे पाहता मानवी अवताराने देवत्व प्राप्त केले व ख्रिस्त एक मनुष्य बनला आणि अपरिहार्याने आपण स्वर्गाचे वारस बनले आहोत.
आपण देवाने केलेले सर्व उपकार विसरलेलो आहोत, त्याऐवजी आम्ही देवाचा अपमान केला आहे. देवाला फार दुखवले आहे. आपल्या पापी वृत्तीमुळे आम्ही देवापासून दूर गेलो आहोत. हे आम्ही आमच्या कृतीद्वारे स्पष्ट केले आहे. जगात होणाऱ्या वाईट कृतीमुळे मानवजात देवापासून दुरावली आहे. २००० वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताने शांतीचा संदेश ह्या भूतलावर आणला. जेणेकरून आपल्यामध्ये शांतीचे वातावरण निर्माण होईल. परंतु ह्या शांतीचा नायनाट व भंग झाला आहे. जगामध्ये शांतीचे जीवन जगणे फार बिकट झाले आहे. महिलांवर होणारे अत्याचार, लुट, चोरी, भांडण, बेरोजगारी, वस्तूची महागाई, गरिबांचे हाल व देशा-देशांमध्ये होणारी लढाई ह्यांमुळे सामान्य माणसाचे जीवन जगणे फार कठीण झाले आहे. मनुष्य शांतीच्या शोधात, वाईट व अनैतिक गोष्टीकडे वळून आपले जीवन नष्ट करु लागला आहे. अशा भयंकर व बिकट परिस्थितीत येशू ख्रिस्त ह्या रम्य सकाळी, त्याच्या जन्माच्या दिवशी तो आपल्याला बोलावत आहे व आपल्याला शांती देण्यास आपली आतुरतेने वाट पाहत आहे. पण आपण त्या बाळ येशूची शांती घेण्यास तयार आहोत का?
२००० वर्षापूर्वी येशू ख्रिस्त गव्हाणीमध्ये जन्मला, पण आज हा येशू ख्रिस्त आपल्या हृदयामध्ये जन्मला पाहिजे, तरच आपण येशू ख्रिस्ताची शांती इतरांना देऊ शकतो व खऱ्या अर्थाने आपण हा नाताळ सण साजरा करु शकतो. आज आपल्याला देऊळमाता निमंत्रण देत आहे जेणेकरून आपण एकमेकांवर प्रेम व प्रिती करावी. जशी येशू ख्रिस्ताने आपल्यावर प्रेम व प्रिती केली तशीच आपणही इतरांवर प्रेम व प्रिती केली पाहिजे. येशू ख्रिस्ताने जसे आपल्यामधील तोडलेले नाते व संबंध जोडले, तसे आपणही आपणामधील नाते व संबंध जोडले पाहिजेत व एकमेकांना प्रेमाचा, शांतीचा, मायेचा व क्षमेचा संदेश दिला पाहिजे. आपला हा नाताळचा सण फक्त आपल्या कुटुंबापर्यंत मार्यादित न राहता शेजाऱ्यापर्यंत, गावापर्यंत व देशापर्यंत पोचला पाहिजे तरच आपण म्हणू शकतो की, आम्ही नाताळ सण खऱ्या अर्थाने साजरा केला.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे देहधारी ख्रिस्ता, आमची प्रार्थना ऐक.
1. पोप फ्रान्सिस, सर्व कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरु, धर्मभगिनी ह्यांनी आपले सर्व आयुष्य प्रभूसेवेसाठी अर्पण केले आहे. त्यांना देवाची  कृपा व आशिर्वाद मिळावा व देवाची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरविण्यासाठी त्यांना सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
2. जे युवक व युवती देवापासून दूर गेलेले आहेत व त्यांच्या जीवनामध्ये काही धैर्य नाही, अशा सर्व युवक व युवतींना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व ते देवाच्या जवळ यावेत म्हणून आपण प्रार्थना करुया.
3. आज येशू ख्रिस्त आपल्यामध्ये जन्मलेला आहे. ख्रिस्ताने शांतीचा व प्रेमाचा संदेश आपल्याला दिलेला आहे. हाच संदेश आपण इतरांना द्यावा व इतरांचे जीवन आनंदमय व शांतीमय बनावे म्हणून आपण प्रार्थना करु या.
4. हे प्रेमळ ख्रिस्ता, सर्व बालकांना विशेष करून जी मुले अनाथ-आश्रमांमध्ये आहेत व ज्या मुलांच्या आई-वडिलांनी त्यांना सोडून दिलेले आहे. हे प्रभो तू त्यांचा सांभाळ कर, त्यांची काळजी घे व त्यांना चांगला मार्ग दाखव. इतरांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
5. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूं प्रभूचरणी ठेऊया.



         

   

No comments:

Post a Comment