Monday 28 December 2015


Reflections for the Homily on Mary the Mother of God By: Br. Wilson D'souza.










देवमातेचा सण (नवीन वर्ष २०१६)


दिनांक: १/१/२०१६.
पहिले वाचन: गणना ६:२२-२७
दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र ४:४-७
शुभवर्तमान: लूक २:१६-२१

‘देवाचा आशीर्वाद घेऊन दुसऱ्यांसाठी आशीर्वाद बन’


प्रस्तावना:
     आज आपण नवीन वर्षाला सुरुवात करत आहोत. देऊळमाता वर्षाचा पहिलाच दिवस पवित्र मरियेला समर्पित करून त्या देवमातेचा सण साजरा करीत आहे.
     आजची तिनही वाचने आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळवून तोच आशिर्वाद एकमेकांना देण्यासाठी आमंत्रित करीत आहे.  
आजच्या मिस्साबलीदानात आपण विशेष करून हे वर्ष प्रत्येकाला सुखा-समाधानाचे, समृद्धीचे, आनंदाचे आणि एकेमकांवर परमेश्वराची दया आणि काकळूत दाखविण्याचे जावो म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: गणना ६:२२-२७
     प्रस्तुत उताऱ्यात देव मोशेला सांगत आहे की, ‘तू आरोनामार्फत त्यांच्या मुंला-बाळांवर आणि इस्रायल देशावर परमेश्वराचा विपुल आशिर्वाद माग. अडीअडचनीच्या आणि दु:खाच्यावेळी देव त्यांचा सांभाळ करो, त्याची कृपा आणि परमेश्वराच्या मुख प्रकाशात तुम्हीं परावर्तीत होवोत. विशेष म्हणजे युद्धात गुंतलेल्या आणि अंत:करांत शांती नसलेल्या ह्या जगात आणि मानवात सदोदित शांतीचा आशीर्वाद नांदो हेच परमेश्वराचे नवीन नाव आहे. ह्याच नावाने परमेश्वर सदोदित त्याच्या जनतेला आणि लेकरांना आशीर्वाद देत असतो.

दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र ४:४-७
     परमेश्वराने अनेकप्रकारे मानवत राहण्याचा प्रयत्न केला. त्यांना सृष्टीद्वारे आणि संदेष्टयाद्वारे आशीर्वादित केले. जगात पाप वाढल्यामुळे आशीर्वादाची जागा शापाने घेतली. परंतु दयाळू देवाने मानवाला सोडले नाही. काळाची पूर्तता होताच मरीयेच्या उदरी त्याने स्वत:चा पुत्र येशू ख्रिस्त ह्याला आशीर्वाद म्हणून पाठविले. तो जगाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर मानवा होऊन आला. त्याने पापांचे आणि नियमांचे साम्राज्य नष्ट करून, देवाला “आब्बा बापा” ह्या नावाने हाक मारण्यास शिकविले. देवबापाने पुत्राच्या सामर्थ्याने गुलामाचे राज्य नष्ट करून पुत्राचे राज्य अस्तिवात आणले. अशाप्रकारे मरीयेच्या उदरी जन्मलेला येशू लोकांसाठी आशीर्वाद म्हणून ह्या पृथ्वीवर उतरला.

शुभवर्तमान: लूक २:१६-२१
     लूक शुभवर्तमानकार आजच्या शुभसंदेशात येशू जन्माची पुनरावृत्ती आपल्या समोर सादर करत आहे. देवदुताने दिलेला संदेश घेऊन मेंढपाळ गाईच्या गोठ्याजवळ जमले असताना मरिया, योसेफ आणि बाळ येशू त्यांच्या नजरेस पडले. येशूच्या दर्शनाने मेंढपाळ आशीर्वादित झाले आणि येशूचे गुणगान त्यांनी मरिया आणि योसेफासमोर गायले. देवपुत्राच्या आशीर्वादाने आश्चर्यचकित झालेले मेंढपाळ मरियेला म्हणाले, ‘सर्व खजिन्यामध्ये उत्तम असा खजिना पृथ्वीवर आणणाऱ्या माते तू धन्य’, त्यांनी देवाची स्तुती आणि गौरव गायले. ह्या सर्व गोष्टी मरीयेने आपल्या हृदयात देवाचा आशीर्वाद आणि साध्या मेंढपाळाचा आशिर्वाद म्हणून साठवून ठेवल्या. यहुदी धर्माचे रितीरिवाज पाळत आठव्या दिवशी योसेफ आणि मरिया ह्यांनी येशूची सुंता केली आणि देवाच्या देवदुताने दिलेले नाव ‘येशू’ म्हणजेच ‘देवाच्या मुक्ततेचा आशीर्वाद’ हे ठेविले.

बोधकथा:
पहिल्याच वेळेला मी मंगळूर(कर्नाटक) येथे गुरुदिक्षीय शिक्षण घेण्यासाठी गेलो होतो. एके संध्याकाळी एका घरामध्ये प्रार्थना करण्याचे भाग्य मला लाभले. प्रार्थनेनंतर मुल आपल्या आई वडिलाकडून आणि आजी आजोबाकडून ‘माय पाय बेसांव दि’ (आई-वडील/आजी-आजोबा ह्यांच्याकडे जाऊन आशीर्वाद मागत होते). मला ही गोष्ट समजली नाही म्हणून माझ्या सोबत्याला मी प्रश्न विचारला, ‘ही लोकं आई-वडिलाचा आजी-आजोबांचा आशीर्वाद का मागत होते’? त्याने मला थोडक्यात आणि सोप्या भाषेत त्याचे स्पष्टीकरण दिले. प्रत्येक वेळेला प्रार्थना झाल्यानंतर वरिष्ठांचे आशीर्वाद घेणे, हा रीतीरिवाज आम्ही पाळत असतो. देवाचा आशिर्वाद मानवाद्वारे आपल्याला मिळत असतो हा आमचा विश्वास आहे. सकाळच्या प्रार्थनेनंतर आणि घरातून बाहेर पडताना, आमच्या आई-वडिलाचे आशीर्वाद घेतो. देवाचा आशीर्वाद मानावाद्वारे आम्हाला मिळतो ही आमची खात्री आहे.

मनन चिंतन:
आशीर्वाद ह्या शब्दाचा अर्थ काय?
     ‘आशीर्वाद’ हा शब्द मुळता हिब्रू भाषेतून जन्मलेला आहे. तो म्हणजे ‘brk’ ‘बाराक’ ह्या शब्दांचे अनेक अर्थ निघतात: १) दोन व्यक्तीमधील किंवा संघामध्ये असलेले अनुकूल संबंध (favourable relationship between two individuals or parties). २) देवाचे आभार मानने (thanksgiving) आणि ३) देवाने केलेल्या महतकृत्यांबद्दल देवाची स्तुती व आराधना करणे (praise and worship of God).
     जुन्याकरारात ‘आशीर्वाद’ हा शब्द ४०० वेळेस ऐकण्यास मिळतो. उत्पत्ती आणि स्तोत्रसंहिता ह्या पुस्तकांत त्याची अनुक्रमे ८८ आणि ८३ वेळेला नमूद केलेले आपणास आढळते. राहिलेले सर्व आपल्याला संपूर्ण जुन्याकरारातील पुस्तकांत आढळतात. 
जुन्याकरारात आशीर्वाद: ‘आशीर्वाद देणे’ म्हणजे ‘एखाद्याला जीवन बहाल केल्यासारखे आहे’. ज्याद्वारे आपल्या मनाला शांती लाभत असते. आशीर्वाद देणे म्हणजेच आपलं सर्वस्व, आपला अधिकार व शक्ती दुसऱ्यांना देणे. दिलेला
आशीर्वाद परत घेता येत नाही: आशीर्वाद डोक्यावर हात ठेऊन दिला जातो. नतमस्तक होऊन किंवा गुडघे टेकून स्वीकारला जातो. डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद देणे ह्याचा अर्थ असा की, ‘आशीर्वाद देण्याऱ्याचे सर्वस्व आशीर्वाद घेणाऱ्याकडे जाते असते.
आशीर्वाद कोण देऊ शकतो?
     देव केवळ माणसाला आशीर्वाद देऊ शकतो. पण देवाला मनुष्य आशीर्वाद देऊ शकत नाही. तो फक्त देवाला धन्यवाद, गौरव, आराधना व स्तुतीसुमने गाऊ शकतो. देवाचा आशीर्वाद माणसाच्या जीवनाला दिशा आणि गती देत असतो.
मनुष्य हा मनुष्याला आशीर्वाद देऊ शकतो. पण त्यांची वर्तणूक आणि क्षमता वेगळी असली पाहिजे. उदा. आई-वडील, गुरुवर्य आणि समाजातील प्रतिष्ठीत लोक.
आशीवाद केव्हा दिला जातो?
     प्रवास सुखाचा जाण्यासाठी, जीवनात यश मिळवण्यासाठी, चांगले आरोग्य लाभण्यासाठी, धंद्यात आणि कामात उन्नती होण्यासाठी, मुलाबाळांची प्राप्ती होण्यासाठी, जीवनातील संकटे व अडीअडचणी दूर होण्यासाठी. थोडक्यात संपूर्ण जीवनभर आपण देवाचे आणि एकमेकांचे आशीर्वाद घेत असतो.
     उत्पत्ती २:३ मध्ये देवाने दिलेला आशीर्वाद ‘फलद्रूप व्हा, द्विगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका’. आब्राहामाने दिलेला आशीर्वाद ‘मी तुला आशीर्वादित करीन व तुझे नाव मोठे करीन. इतके की, तुझ्या नावाने आशीर्वाद दिले जातील. जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, पण तुला शाप देतील त्यांना मी शाप देईन. तुझ्यामुळे मी सर्व राष्ट्रे आशीर्वादित करीत’ हे आपण १२:२-३ मध्ये वाचतो. इसाहाला दिलेला आशीर्वाद ‘मी तुझ्या मुक्कामास राहीन तुला सांगात देईन. तुझे वंशजन अनेक पटीने वाढवून आकाशातील ताऱ्या इतकी व भूतलावरील समुद्रातील वाळू इतकी करील’ हे आपण उत्पत्ती २६:३-४ मध्ये आपण ऐकतो. याकोबाला इसाहाने दिलेला आशीर्वाद ‘तू जिथे जाशील तिथे मी तुला संरक्षण देईन आणि तुझ्या जीवनाच्या अंतापर्यंत मी तुला अंतर देणार नाही’ हे आपण उत्पत्ती २८:१३-१५ मध्ये वाचतो. इस्राएल लोकांना देवाने दिलेला आशीर्वाद ‘साऱ्या राष्ट्रापेक्षा तुम्हांला अधिक आशीर्वाद लाभेल. तुमच्यातले कुणीही स्त्री-पुरुष निसंतान राहणार नाही किंवा गुरेढोरे वस्साविना असणार नाही’ हे अनुवाद ७:१४ मध्ये नमूद केलेले आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात दिलेला आशीर्वाद हा पुरोहिताचा आशीर्वाद म्हणून समजला जातो आणि तो आशीर्वाद मिस्साबलीत दिला जातो. संत फ्रान्सिस, ब्रदर लिओ ह्यांना मरण्याअगोदर तोच आशीर्वाद देतात. एक मुसलीम व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भेटल्यावर ‘सलाम वालेकुम’ असे अभिवादन करतो. मग ती व्यक्ती ‘वालेकुम सलाम’ हे प्रतिउत्तर देते. यहुदी लोक ‘शालोम’ ह्या नावाने अभिवादन करतात तर महाराष्ट्रीयन ख्रिस्ती बंधू-भगिनी ‘जय येशू’ ह्या शब्दाने संबोधीतात.
नव्याकरारात ‘आशीर्वाद’ हा शब्द ग्रीक भाषेतून येतो. ज्याचे नाम (evalogia) ‘एवलोगिया’ आणि क्रियापद ‘एवलोगेईन’ (evalogein) आहे. येशूने भाकरीला आशीर्वाद दिला ‘पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन स्वर्गाकडे पाहून देवाचे आशीर्वाद मागले, मग ते तुकडे शिष्यांजवळ दिले व त्यांनी ते लोकांस वाटून दिले’ असं आपण मत्तय १४:१९ मध्ये वाचतो. पुनरुत्थित ख्रिस्ताने स्वर्गात जाण्याअगोदर आपले हात उंचावून शिष्यांना आशीर्वाद दिला. आशीर्वाद देत असताना येशू त्याच्यापासून अलग स्वर्गात घेतला गेला (लूक २४:५०-५१).
     नववर्ष हे आशीर्वादच वर्ष. आज आपण नव्या वर्षाला सुरुवात करत आहोत. २०१६ हे वर्ष आपणाला आशीर्वादाच वर्ष जावं म्हणून ख्रिस्तसभेने देवाचा आशीर्वाद म्हणून देवमाता, मरिया माता दिलेली आहे. तिच्या मध्यस्तीने तिचा पुत्र स्वर्गांतून उतरलेली जिवंत भाकर तुमचं कुटुंब, आयुष्य, उद्योग धंदे आणि तुमचे सर्वस्व आशीर्वादित करो म्हणून ह्या नववर्षाच्या पहिल्या दिवशी स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ‘हे देवा, ह्या नव्या वर्षात आम्हांला आशीर्वादित कर’.
१. हे सर्वसमर्थ परमेश्वरा आमच्या परमगुरुंना, महागुरूंना, धर्मगुरूंना व धार्मिकांना, ख्रिस्तसभा योग्य मार्गाने चालावण्यासाठी आणि अखिल जगात आशीर्वादाचे प्रतिक होण्याचं भाग्य लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. हे सर्वसमर्थ परमेश्वरा तू जीवनाचा दाता व त्राता आहेस. ह्या नव्या वर्षी आपणा सर्वांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे व देवाने आपणास आशीर्वादित करावे म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.
३. देवमातेच्या मध्यस्थीने  आम्ही अनाथ, निराधार, परक्या आणि पोरक्यांसाठी आशीर्वाद मागतो. आमच्या दानशूर वृत्तीमुळे त्याचे जीवन सदोदित आशीर्वादमय ठरो म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. ज्या स्त्रिया मातृपदाची अपेक्षा आपल्या मनात बाळगून आहेत अशांवर देवाचा आशीर्वाद यावा व त्यांना मातृपद प्राप्त व्हावे म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.
५. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभूचरणी मांडूया.






1 comment: