Thursday, 10 December 2015

Reflections for the homily of 3rd Sunday of Advent (13/12/2015)
By: Brandon Noon.




आगमनकाळातील तिसरा रविवार

दिनांक: १३/१२/२०१५
पहिले वाचन: झफन्या ३:१४-१८ 
दुसरे वाचन: फिलीपिकारांस पत्र ४:४-७
शुभवर्तमान: लूक ३:१०-१२

“जो माझ्यामागून येत आहे, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील”



प्रस्तावना
आज आपण आगमनकाळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची तिन्ही वाचने, येशू येण्याविषयीची घोषणा करत आहेत.
   आजच्या पहिल्या वाचनात झफण्याचा लेखक, इस्रायलला जयजयकार व उल्हास करण्यास सांगत आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल फिलीप्पीकरांस ‘चिंताक्रांत होऊ नका, तर प्रार्थना करा व आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा असे सुचवितो. तसेच संत लूकलिखित शुभवर्तमानात योहान बाप्तिस्टा प्रभू-आगमनाची तयारी करत असता, ‘मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु जो माझ्यामागून येत आहे, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील’ असे म्हणतो.
प्रभूच्या आगमनासाठी प्रार्थना करून अंत:करणाची तयारी करत असता आपल्या सर्वांची ईश कृपेत वाढ व्हावी म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: झफण्या ३:१४-१८.
झफन्या संदेष्टा, ख्रिस्तपूर्वी ७ व्या शतकात, यहुदी लोकांना प्रवचन करायचा. मोशेची एकच देवाविषयीची शिकवण लोक विसरले होते व अनेक देवाची पूजा, पवित्र येरुशलेम शहरात ते करत असत. अशा काळात संदेष्टा झफन्या आशेची किरणे पाहतो व सांगतो जरी तुम्ही पापात आहात तरीही तुम्ही आनंद करा. कारण परमेश्वर येरुशलेमच्या लोकांना क्षमा करणार आहे. संदेष्टा झफण्याद्वारे येरुशलेमचे तारण होणार असे प्रस्तुत उताऱ्यात सांगत आहे. तो येरुशलेमातील लोकांना म्हणतो की, परमेश्वर त्याचे तुमच्यावरील असणाऱ्या प्रेमाने नवीन करार प्रस्थापित करील, म्हणून आनंद व उल्हास करा.

दुसरे वाचन: फिलीप्पीकरांस ४:४-७
संत पौल तुरुंगातून त्याच्या पहिल्या धर्मांतर झालेल्या लोकांना सांगतो की, तुम्ही आनंद करा. खरा ख्रिस्ती मनुष्य स्वर्गाच्या रस्त्यावर चालणारा असतो, तो परमेश्वराच्या व संतांच्या सानिध्यात आनंदी असणार आहे. आपण देवाचे आभार मानले तेवढे कमीच, परंतु आपली प्रार्थनेची सुरुवात देवाच्या आभारानेच करायला हवी असे तो ह्या परीच्छेदात म्हणतो. प्रत्येक मनुष्याला समस्या, अडचणी, अपयश ह्यांना सामोरे जावे लागते. परंतु हे सर्व देवाच्या योजनेनुसार, आपल्याला आध्यात्मिकतेत मजबूत बनवण्यासाठी असते; म्हणून आपण अशा ह्या कठीण प्रसंगी परमेश्वराचा धावा करायला हवा कारण तोच आम्हाला हे सर्व स्वीकारण्याची कृपा देत असतो. परमेश्वराच्या सानिध्यात राहिलो तर आपल्याला परमेश्वराची दैवी शांती मिळते.
शुभवर्तमान : लूक ३:१०-१२
योहान बाप्तिस्टाच्या प्रवचनाने सर्व लोक चकित झाले होते. काही जणांना वाटले की, तो एक नवीन संदेष्टा आहे. तर काहींना तो येणारा जो मसिहा आहे तोच हा असे वाटले. त्याचा मुख्य संदेश होता, ‘तुम्ही तुमची अंत:करणे स्वच्छ करा व येशूवर विश्वास ठेवा. मसीहा तुम्हाला रोमी लोकांच्या तावडीतून सोडवायला नव्हे, तर तुमच्या पापांतून सोडवून परमेश्वराची लेकरे बनवणार आहे.
अ) गुरुजी आम्ही काय करावे ?
   जे योहान बाप्तिस्टाचे ऐकत होते, त्यांना वाटत होते की, आमचे हृदयपरिवर्तन व्हावे. पण त्यांना प्रश्न होता तो म्हणजे, ‘कशाप्रकारे बदलावे’? आणि त्यावर योहान बाप्तिस्टा उपाय म्हणून, दानशूर व्हा व आपल्या शेजाऱ्यांना मदत करा असे सुचवतो.
आ) जकातदार व शिपाई विचारतात आम्ही काय करावे?
   हे जकातदार रोमी लोकांसाठी काम करत होते व लोकांकडून दुप्पट कर घ्यायचे व वरच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे वागायचे; तेंव्हा योहान बाप्तिस्टा सांगतो की, कोणावर जबरदस्ती करू नका, तर आपल्या पगारात तृप्त असा.
इ) मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो ?
यार्देन नदीत आंघोळ करणे महत्वाचे नव्हते परंतु ते आत्मरूपी शुद्धीकरणाचे प्रतिक होते. सर्वांना वाटत होते की योहानच ख्रिस्त आहे; तेंव्हा तो त्यांना सांगतो की, मी फक्त त्याच्या येण्याचा मार्ग तयार करावयास आलो आहे. परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतनाचा बंद सोडवायलादेखील मी योग्य नाही तो  तुमचा तारणारा माझ्यानंतर येणार आहे; तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील. जे त्याचा स्वीकार करतील ते देवाची लेकरे बनतील.
ई) अग्नी: जुन्या करारात अग्नी हे शुद्धीकरणाचे प्रतिक मानले जात असे (गणना २१:३१; मलाखी ३:३-१९).

बोधकथा:
एकदा एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या बाजूला झाडे लावत होता. तेव्हा त्याच्या बाजूने जाणाऱ्या मुलांनी विचारले, ‘बाबा तुम्ही तर म्हातारे झाले आहात, मग तुम्ही ही झाडे का लावता? तुम्हाला झाडांची फळे खायला मिळणार नाही’. तेंव्हा वृद्ध व्यक्ती त्या मुलांना सांगतो, ‘होय माझ्या मुलांनो मी म्हातारा झालो आहे मला या झाडांची फळे खावयास मिळणार नाहीत, परंतु जी पिढी माझ्या नंतर येणार त्यांना तर नक्कीच खायला मिळेल; मी माझे काम करतो जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्याचा स्वाद व आनंद घेता येईल’.  

मनन चिंतन:
आपल्या गावात किंवा घरी जेंव्हा कोणी मोठी व्यक्ती येणार असेल तेंव्हा आपण गावाची किंवा घराची चांगली साफ-सफाई करतो. आपण काळजीपूर्वक निरीक्षण करून घेतो की सर्व तयारी झाली आहे की नाही? किंवा काही कुठे राहिले आहे का? कारण आपल्याला त्या मान्यवरांचे चांगल्या प्रकारे/विशेष असे स्वागत करायचे असते. आपणा सर्वांना ठाऊक आहे, खुद्द येशू- ख्रिस्त आपल्यामध्ये, नाताळच्या दिवशी येणार आहे. मग आपण कशाप्रकारे पूर्वतयारी करायला हवी?
आजच्या तिन्ही वाचनात येशूच्या येण्याची पूर्वतयारी करण्यास आपल्याला पाचारण करण्यात आले आहे. पहिल्या वाचनात आपण ऐकलेच आहे की, संदेष्टा झफन्या, येरुशलेमच्या लोकांना सांगतो, ‘तुम्ही उल्हास व आनंद करा, कारण तारणारा देव येत आहे; तो तुमच्या पापांची क्षमा करणार आहे. म्हणून आनंद व उल्हास करा व उदास राहू नका’. दुसऱ्या वाचनात संत पौल फिलीप्पीकरांस सांगतो, ‘तुम्ही आनंद व उल्हास करा व परमेश्वराचे आभार माना, तुम्ही जेवढे देवाच्या जवळ रहाल तेवढे तुमचे संरक्षण होईल. तुमच्या जीवनातील समस्यांना, अडचणींना घाबरू नका; परंतु ह्या गोष्टीमुळे किंवा या सर्व प्रसंगामुळे तुम्ही अधिक देवाच्या जवळ येणार आहात. ह्या सर्व गोष्टी परमेश्वराला सांगा व तो तुमचे तारण करील’. लूकच्या शुभवर्तमानात आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची नम्रता आपणास पहावयास मिळते. लोकांनी त्याला मसिहा असे संबोधले परंतु त्याने येणाऱ्या मासिहाची स्वागतप्रणाली त्यांना सांगितली की, तो माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आणि धन्य आहे. तो तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करणार आहे. जो येणार आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या पायतणाचा बंद सोडावयास देखील योग्य नाही.
ज्या योहान बाप्तिस्टाविषयी आपण ऐकतो तो एका मार्गदर्शकाप्रमाणे आपल्याला येशूविषयीची माहिती व त्याच्या येण्याविषयीची योग्य ती जाणीव करून देत आहे. देवाने येशू ख्रिस्ताद्वारे ह्या जगात आगमन करण्यापूर्वी योहानाला प्रकाशाची साक्ष देण्यासाठी पाठविले. योहान दिवा होता तर खरा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे व हा प्रकाश सर्व विश्वाला प्रकाशित करून अंधारावर मात करतो.
अंधाराची भीती सर्वांना वाटत असते. त्यामुळे एखादाच मनुष्य अंधारात फिरण्याचे धाडस करीत असतो. परंतु एक लहान दिवा अंधाराचा धाव घेतो आणि अंधारावर विजय मिळवितो. अंधाराला नाहीसे करण्याचे परमेश्वरी सामर्थ्य एका लहानशा दिव्यात असते. असंख्य काजवे चमकल्याने काळोखही त्यांना शरण जातो, आपण तर माणसे आहोत. अंधारावर साम्राज्य गाजविण्याचे ईश्वरी सामर्थ्य योहानाप्रमाणे प्रत्येकात आहे परंतु या सामर्थ्याची जाणीव प्रत्येकास असतेच असे नाही. त्यासाठी ईश्वरतेजात म्हणजेच शाश्वत प्रकाशात स्वत:च्या सद्विचाराने, परमेश्वर तेजाचा अनुभव प्रत्येकाने घ्यायला हवा. ईश्वरी तेजात जीवन जगणाऱ्यांना अंधकार कधीच ग्रासत नसतो.
विश्वातील अन्याय, अत्याचार, अनीती, अविचारांचा अंधकार नाहीसा करून त्या अंधारावर मात करून मानवी जीवन सर्वस्वाने उज्वल करणे ही परमेश्वराची अनंत काळापासूनची इच्छा आहे. आपली अंधारलेली मने पुन्हा प्रकाशमान करण्यासाठी प्रकाशाच्या राजपुत्राला म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वराने या जगात पाठविले.
सर्वांना व्यापून टाकणाऱ्या काळोखात उंच आभाळात एक तारा दिव्य तेजाने लखलखत आहे. अंधारात राहणाऱ्याचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी येत आहे त्याच्या सहवासात अंधाराला स्थान नाही, अधर्माला जागा नाही. जे अधर्म करतात, अभक्तीला चालना देतात, जे अविचारी आहेत, ते तेजाची लेकरे नसून अंधाराचे गुलाम आहेत. परमेश्वराने आपले जीवन दिव्य तेजाने प्रकाशित केले आहे. प्रभू येशू म्हणतो दिवा लावून तळघरात किंवा पलंगाखाली कोणी ठेवीत नाही, तर आत येणाऱ्यास उजेड दिसावा म्हणून दिवठनीवर ठेवतो’. तुझा शरीराचा दिवा तुझा डोळा होय. तुझा डोळा निर्दोष असेल तर तुझे सर्व शरीरही प्रकाशमय असते. सदोष असला तर, तुझे शरीरही अंधकारमय असते. तुझे सर्व शरीर प्रकाशमय असेल आणि त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसेल तर दिवा आपल्या उज्वल ज्योतीने तुला प्रकाशमय करतो. याचाच अर्थ असा की, परमेश्वराचे तेज व्यक्तीठायी वसत असल्यास ती व्यक्ती अंधारात चालत नसते, तर त्याचे आयुष्य तेजात तळपून निघत असते. ती व्यक्ती स्वत: प्रकाशमय झाल्याने आपल्या सत्कृत्याने इतरांना ईश्वरी तेजाचा अनुभव देत असतो. इतरांचा अंध:कार नाहींसा करुन तोच ख्रिस्त तेजात न्याहुन निघाल्याने इतरांच्या विझलेल्या वाती पेटवत असतो. हेच आपल्या जीवनाचे ध्येय असायला हवे.
      होय माझ्या बंधू-भगिनीनो हि वेळ आहे येशूकडे वळण्याची आणि त्याच्या प्रकाशात चालण्याची ही नामी संधी आपल्याला दिली गेली आहे. आपण आपले जीवन बदलून देवाकडे येण्यासाठी तयारी करायला हवी, जेणेकरून आपण ख्रिस्ताला आपल्या जीवनात स्वीकारण्यास सदैव, जाणीवपूर्वक तयार असू.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे ख्रिस्ता, तुझ्यात आनंद शोधण्यास आम्हांला साहाय्य कर.
१) ख्रिस्तसभेत कार्य करणारे आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ ह्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता सर्वत्र निर्भीडपणे प्रकट करावी, त्यासाठी लागणारे धाडस प्रभुने त्यांना बहाल करावे म्हणून आपण प्रार्थना करूया .
२) बाप्तिस्मा स्वीकारलेल्या आम्हां प्रत्येकाला येशूच्या वचनांचे पालन करण्यास व त्याची इच्छा आमच्या जीवनात परिपूर्णरित्या उतरविण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३) सर्व ख्रिस्ती बांधवानी ह्या आगमनकाळात, येशूच्या स्वागतासाठी आध्यात्मिक व शारीरिकदृष्ट्या तयार असावे म्हणून आपण प्रार्थना करूया .
४) जे तरुण –तरुणी  देवापासून दूर गेलेले आहेत, जे व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत, त्यांना परमेश्वराची जाणीव व्हावी व त्यांनी येशुख्रिस्ताला नव्याने स्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) थोडा वेळ शांत राहून वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

 






1 comment:

  1. Brandon ur homily is too good... People appreciate homilies of all the brothers... Keep it up .... Praying for u.

    ReplyDelete