Wednesday, 29 April 2020

Reflections for the Homily of Fourth Sunday of Easter (03-05-2020) By Fr. Wilson D’Souza and Dn. Isidore Patil.



पुनरुत्थान काळातील चौथा रविवार


 दिनांक: ०३/०५/२०२०
 पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१४,३६-४२.
 दुसरे वाचन: १ पेत्र २:२०-२५.
 शुभवर्तमान: योहान १०:१-१०.



विषय: “येशू आमच्या जीवनात स्वर्गीय दार.”
 प्रस्थावना:
आज आपण पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. हा रविवार उत्तम मेंढपाळाचा रविवार म्हणून साजरा केला जातो. आजची उपासना आपल्याला आपल्या उत्तम मेंढपाळाप्रमाणे म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या जीवनावर मनन चिंतन करण्यास व त्याच्याप्रमाणे होण्यास आमंत्रण करत आहे.
          आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो; पेत्र आपल्याला पश्चाताप करण्याचे आवाहन करत आहे. पश्चाताप केल्याने आपण प्रभू येशू जो जीवन देणारा दरवाजा आहे, त्याच्या जवळ जाऊ शकतो. आज पेत्र दुसऱ्या वाचनात येशू ख्रिस्तने केलेल्या त्यागाविषयी सांगत आहे. त्याच्या पावलांवर पाऊल टाकून मेंढराप्रमाणे वागण्यास तो सांगत आहे. प्रभू येशू हा आपला उत्तम मेंढपाळ आहे आणि ह्या मेंढपाळाला आपण अनुसरावे कारण ह्या मेंढपाळाला तारण प्राप्ती झाली आहे. जेव्हा आपण ह्या तारण प्राप्ती झालेल्या मेंढपाळाला अनुसरु तेव्हाच आपल्यला सुद्धा तारणदायी जीवनाचा अनुभव येईल.
          उत्तम मेंढपाळाला नेहमी मेंढरांबरोबर राहावं लागत, कारण लांडगा केंव्हाही येऊन मेंढरावर हल्ला करून त्यांना खाऊन टाकू शकतो. त्यामुळे उत्तम मेंढपाळ नेहमी जागृत व सावध राहत असतो. प्रभू येशू शुद्धा आपला उत्तम मेंढपाळ आहे. तो आपल्यावर नेहमी निगा राखतो. सैतान लांडग्याप्रमाणे आपल्यावर केव्हाही हल्ला करू नये म्हणून, तो आपल्या बरोबर नेहमी राहत असतो. सैतानाच्या मोहात केव्हाही पडू नये म्हणून; तो नेहमी आपल्याला वाट दाखवत असतो. आपल्याला तारणप्राप्ती करून अनंत जीवनाकडे नेत असतो. म्हणून आजच्या ह्या उपासना विधीत सहभागी होत असताना देवाकडे आपल्याला उत्तम मेंढपाळाप्रमाणे होण्यास प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा व शक्ती मागुया. 

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१४,३६-४२.
          पेत्र व इतर शिष्य या सर्वांना पवित्र आत्म्याचे दान मिळाले आहे आणि त्यामुळे ते वेगवेगळ्या भाषेत बोलतात व लोकांना उपदेश करतात. आजच्या ह्या वाचनात पेत्र याहुद्यांना त्यांनी केलेल्या पापांसाठी पश्चाताप करण्यास सांगत आहे. पेत्र हा सर्व शिष्यामध्ये मोठा होता म्हणून पेत्राला घोषणा करण्यास शिष्यांनी सांगितले. पेत्र सांगत आहे की, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला मारले आहे. त्याला वधस्थंभावर खिळविन्यास मदत केली आहे. हे सर्व पेत्र संपूर्ण मानवजातीला निक्षून बोलत होता. कारण जेव्हा तेथे जमलेल्या याहुद्यांना त्यांच्या वागणुकीचा पश्चाताप झाला व ते पेत्राला विचारू लागले की, आम्ही आता काय करावे? यावर पेत्र त्यांना बाप्तिस्मा घेण्यास सांगत आहे व ते सांगत असता तो म्हणतो की, हे तुम्हाला व तुमच्या मुलांना व जीतक्यांना परमेश्वर देव बोलावत आहे त्यांना बाप्तिस्मा करावयास देव बोलावत आहे.

दुसरे वाचन: १ पेत्र २:२०-२५.
          ह्या वाचनात पेत्र सांगत आहे की, परमेश्वर त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यास आपणाला सांगत आहे. पेत्र सांगतो प्रभू येशू ख्रिस्ताने आपणा सर्वांसाठी खूप दु:ख सहन केले. त्याची चूक नसताना त्याची निंदा व थट्टा मस्करी केली. तरीही त्याने वाईट मानून घेतले नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने कधीही उलट उत्तर दिले नाही. किंबहुना त्याने कोणाचीही तक्रार केली नाही. त्याने निमुटपणे सर्व काही सहन केले. हे सर्व त्याने आपल्या पापांकरिता केले. कारण, प्रभू येशू ख्रिस्त हा आपला मेंढपाळ आहे व आपण त्याची हरवलेली मेंढरे आहोत. तो आपल्याला जीवनात येणाऱ्या काटेरी मार्गावर मात करून बोलावत आहे. ज्या प्रमाणे त्याने केव्हा तक्रार केली नाही त्या प्रमाणे आपणही विनातक्रार जीवन जगण्यास बोलावत आहे.

शुभवर्तमान: योहान १०:१-१०.

          आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू स्वत:ची तुलना दरवाजाशी करत आहे. ह्या वाचनात आपण ऐकतो की, येशु म्हणतो चोर चोरी करावयास मेंढवाड्यात जेव्हा येतो तेव्हा तो दरवाजाने आत जात नाही. परंतु मेंढपाळ नेहमी दरवाजाने आत जातो. मेंढरे मेंढपाळाची वाणी ओळखतात. जेव्हा मेंढपाळ मेंढरांना हाक मारतो; तेव्हा ते त्याच्या हाकेला पळून येतात. परंतु मेंढरे मेंढपाळशीवाय दुसऱ्या कोणीही हाक मारली तर मेंढरे त्याला प्रतिसाद देत नाहीत. कारण, मेंढरे फक्त मेंढपाळाचा आवाज ओळखतात व ऐकतात. येशू ख्रिस्त पुढे सांगतो की, मी दरवाजा आहे. आणि जो माझ्यामधून आत जातो त्याला तारणप्राप्ती होईल. चोर फक्त चोरी करावयास व घात करावयास येतो परंतु येशूख्रिस्त जीवनदान देण्यासाठी आला आहे.  

१. मनन चिंतन:
          माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला दाराशी संबंध येत असतो. दरवाजा आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग किंवा अंग झालेले असते. घराचा दरवाजा बंद असले म्हणजे आपल्याला कळून चुकते की, घरात कोणी नाही. आज अनेक प्रकारची दरवाजे आपण पाहत असतो. एकेरी दरवाजा, दुहेरी दरवाजा, रिमोटने उघडला जाणारा दरवाजा, ओढून बंद किंवा उघडला जाणारा दरवाजा (Push and Pull door), पारदर्शक दरवाजे असे असतात की, बाहेर काय चाललेले आहे ते दिसते, परंतु आत काय आहे हे नाही. काही दरवाजे कडी कोंड्याविना(See through) असतात. काहिक स्वयंचलित (Automatic) असतात.
          दरवाजे आपले अस्तित्व दाखवतात. आपण कोठे आहोत ह्याची जाणीव देतात. ऊन्हा-पावसाळ्यात व हिवाळ्यात आपल्याला सांभाळतात. एखाद्याचा दरवाजा बंद असेल व आपण तो उघडला तर त्यांना आवडत नाही, त्याद्वारे आपल्याला समजते की, एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात अडचण आल्यासारखे होते.
          मानसशास्त्रज्ञ दरवाज्या विषयी बोलताना आपल्याला सांगत आहेत की, दरवाज्यावरून आपणाला व्यक्तीचे व्यक्तिमत्व कळत असते. जी व्यक्ती आपला दरवाजा दुसऱ्यांसाठी उघडा ठेवते; ह्याला खुले व्यक्तिमत्व (Open Personality) म्हणतात. तर एखादी व्यक्ती दरवाजा ठोकल्यावर दारा समोर येते व आपल्याला आत घुसू देत नाही त्याला बंद व्यक्तिमत्त्व (Close Personality) म्हणतात. बंद व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती दुसऱ्याला आपल्या जीवनात स्थान देत नाहीत. तर काही लोक असे म्हणतात, ‘कशाला बाहेर उभे राहिलात? घर आपलंच आहे दार उघडून आत यावे.’ ह्या प्रकारची लोकं पारदर्शक आणि मनाने, आत्म्याने आणि अंत:करणाने साफ असतात.
          दरवाजा कसा आहे हे जाणण्यासाठी ते कसे कार्य करते हे सांगितले जाते. त्याचप्रमाणे माणसे कशी आहेत याचा अनुभव आपल्याला त्यांच्या भावनांवरून येतो ज्याला आपण भावनिक दरवाजे म्हणतो (Doors in our lives indicate our emotional self). पण त्याहूनही अधिक आणि आपल्या जीवनातील अध्यात्मिक दरवाज्याकडे थोडे लक्ष देऊ या.
          आपण आपल्या अंतःकरणाचा, हृदयाचा, काळजाचा दरवाजा कसा ठेवला आहे ह्याची थोडक्यात पाहणी करू या. आपण आपल्या काळजाचा दरवाजा उघडा ठेवला आहे का? तिथे कोणाची वस्ती आहे? कोणाचे आपल्या हृदयावर राज्य चालते ते पाहूया!
          हृदयाचा आणि अंतःकरणाचा दरवाजा पवित्र मानला जातो. रुफी कवी रुमी म्हणतात, “आपल्या अंतःकरणाचा अध्यात्मिक दरवाजा हा महामंदिरा (Cathedral) प्रमाणे असावा, जिथे गोडव्याचा किंवा मधुरलेचा अनुभव येतो (Sweet beyond telling). अविलाची संत तेरेजा म्हणतात, “आपल्या हृदयाचा दरवाजा म्हणजे मोठ्या किल्लेवजा वाडा (Castle) किंवा किल्ल्यासारखा असावा जो आंतरिक महाल, जिथे मला माझ्या हृदयाची, काळजाची, साफ-सफाई दिसते.
          अंतःकरणाचा दरवाजा उघडणे म्हणजे, देवाला आपल्यामध्ये राहण्यासाठी जागा तयार करणे. तो प्रकटीकरण ३:२० मध्ये म्हणतो, “पहा मी दाराशी उभा आहे व दार डोकावीत आहे. जर, कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर, मी त्याच्याजवळ आत जाऊन त्याच्याबरोबर जेवेण आणि तो/ती माझ्याबरोबर जेवेल.” संत पौल आपल्याला सांगत आहे, १ करिंथ ३:१६-१७ मध्ये की, ‘तुम्ही देवाचे मंदिर आहात, आणि तुम्हांमध्ये देवाचा आत्मा वास करीत आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, व तेच तुम्ही आहात.” ‘देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा, आता उघड दार देवा!’
          Teilhard de Chardin नावाचे ईशज्ञानी म्हणतात, “जेवढे आपण आपल्या अंत:करणाचे दरवाजे सतत उघडे ठेवू, तेवढेच आपल्याला आज जाता येईल व आपल्यामध्ये असलेल्या देवाची आपल्याला ओळख भेटेल. Thomas Mentor नावाचे अध्यात्मिक लेखक म्हणतात, “देवाचे प्रेम शोधायचे असेल तर, अंतःकरणातील गाभाऱ्यात जाण्याची गरज आहे. तिथे तो लपलेला आहे. हेच देवाचे रहस्य आहे.”
          ‘शोधीशी मानवा राहुरी मंदिरी नांदतो देव तो आपुल्या अंतरी.’ जेव्हा आपण आपल्या अंतःकरणाचा दरवाजा उघडा ठेवतो, तेव्हा देव आपल्यात जागृत होतो. कारण तो आपल्यामध्ये व आपल्या बरोबर आहे. आपण त्याच्या सानिध्यात राहतो. म्हणून संत पौल गलतीकरांच पत्र २:२० मध्ये म्हणतात, “जगतो जीवन नव्हे मी माझे, ख्रिस्त जगत असे मम जीवनी.”
          तोच ख्रिस्त माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो आपल्या जीवनाचे दार आहे. आजचे शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे की, “जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे.” होय ख्रिस्त आपल्या जीवनाचे स्वर्गीय दार आहे. तो आपला मेंढपाळ आहे, आपण त्याची वाणी ऐकतो. तो आपल्यासाठी दार उघडतो व आपल्याला नावाने साद घालतो. आपण त्याची व तो आपली वाणी ओळखतो.
          “मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर, त्याला तारण प्राप्त होईल. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.” ख्रिस्त आपल्या जीवनातील अध्यात्मिक दार आहे. त्याच्या शिवाय आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. तो आपल्याला लुक लिखित शुभवर्तमानात ११:९-१० मध्ये सांगत हे की, “मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल. होय ख्रिस्त आपल्या जीवनाचा दरवाजा आहे. आपल्याला सतत अरुंद दरवाजाने स्वर्गराज्यात प्रवेश करण्यासाठी सांगतो.
          हेच सत्य आजच्या पहिल्या व दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्यापुढे मांडत आहे. तो यहुदी व यरुशलेम रहिवाशांना सांगत आहे, “ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.” तो म्हणाला, “आपल्या अंत:करणाचे दरवाजे उघडे करा. पश्चाताप करा आणि आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल. अनेकांनी आपल्या अंतःकरणाचे, हृदयाचे, काळजाचे दरवाजे ख्रिस्तासाठी उघडले आहेत.” अंतःकरणाचा दरवाजा उघडा करणे म्हणजे, पापाला तिलांजली देऊन सदाचारण्यासाठी जगावे. कारण आपण मेंढरासारखे भटकत होतो, परंतु, आता तुमच्या जीवनाचा मेंढपाळ व संरक्षक ह्याच्याकडे आपण परत फिरले पाहिजे.
          आजच्या उपासनाविधीत सहभागी होत असताना; येशू ह्याला आपल्या जीवनाचा दरवाजा म्हणून स्विकारूया, त्याद्वारे आत शिरून त्याची वाणी ऐकू या. तो आपल्यासाठी सदोदित तारणाचा दरवाजा उघडून ठेवेल, त्याच दारातून आपण जीवण प्राप्ती व ती विपुल प्रमाणे करणार आहोत. त्या स्वर्गीय दरवाजातून स्वर्गात जाण्यासाठी ह्या उपासनाविधीत ख्रिस्त स्वर्गीय दार ह्याकडे विशेष प्रार्थना करू या.

२. मनन चिंतन:
“चोर आया चोरी करणे,
घात हत्या करणे
येशू आया जीवन देणे,
बहुतायक का जीवन देणे”.
ख्रीस्ताठायी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज देऊळमाता आपल्याला प्रभू येशू हा उत्तम मेंढपाळ व जीवन देणारा दरवाजा आहे ह्या दोन रहस्यांविषयी शिकवत आहे. आपण देवाची मेंढरे आहोत आणि येशू ख्रिस्त जो आपला मेंढपाळ आहे तो आपल्याला नेहमी चांगल्या वाटेने नेत असतो. चांगला मेंढपाळ हा कधीही आपल्या मेंढरांना चुकीच्या मार्गाने नेणार नाही. त्याच प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला चांगल्या आणि योग्य त्या वाटेने म्हणजेच तारणाच्या वाटेने नेत असतो. जेव्हा तो आपल्याला बोलावतो तेव्हा तो आवाज आपण ओळखतो. आपण त्याच्या मागे जातो; कारण आपल्याला त्याच्यावर विश्वास आहे. आपल्याला ठाऊक आहे की तो आपल्याला कधीही सोडणार नाही किंवा अंतर देणार नाही. प्रभू येशू आपला उत्तम मेंढपाळ आपल्याला तारणाची वाट दाखवतो व पुनरुत्थान व अनंतकाळच्या जीवनाकडे नेत असतो.
          आजच्या ह्या जगात आपल्याला खूप प्रकारचे आवाज ऐकायला भेटतात. वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती सामाजिक माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात. काही जाहिराती जीवनात कसं जगायचं. आपण ह्या वस्तू घेतल्या तर आपले जीवन सुखी होईल. आपलं जीवन आनंदाने भरून जाईल. ह्या सर्वांपेक्षा आपण प्रभू येशूची वाणी ऐकली पाहिजे. परंतु अनेक वेळेला आपण भरकटतो व वाईट मार्गाला लांगतो, त्यामुळे आपल्या जीवनातील सुख, आनंद व शांती नाहीशी होते. प्रभू येशू हा आपला उत्तम मेंढपाळ आहे आपण त्याचा आवाज ओळखला पाहिजे व त्याच्याच आवाजावर विश्वास ठेवला पाहिजे. तसे केले तर आपल्याला तारण प्राप्ती होईल. आपल्याला अनंतकाळाच्या जीवनाचा लाभ घेता येईल. ह्या उत्तम मेंढपाळाने आपल्यासाठी दु:ख सहन केले. आपल्यासाठी निंदा व मार सहन केला. जेणेकरून आपल्या वाटेवर काटे न येता; आपला मार्ग मोकळा होईल. आपल्याला अनंतकाळचे जीवनाचा अनुभव घेता येईल.

बोधकथा:

एकदा एक मेंढपाळ त्याच्या मेंढरांना त्याचा मेंढवाड्यात चारत होता. त्याच्या शेजाऱ्याकडे काही कुत्रे होते. एकेदिवशी त्या कुत्र्यांनी येऊन मेंढरावर हल्ला केला व काहीक मेंढरे खाऊन टाकली. असे खूप दिवस चालू होते. कुत्रे नेहमी येऊन त्या मेंढपाळाची मेंढरे खात असत. याला उपाय म्हणून त्या मेंढपाळाने तीन प्रकारचे उपाय सुचवले. पहिला उपाय म्हणजे; तो त्याच्या शेजाऱ्याला कोर्टात नेऊन बंदिवासात टाकावे. दुसरा म्हणजे; तो त्याच्या मेंढवाड्याभोवती मोठी भिंत बांधून कुत्र्यांना त्याच्या मेंढवाड्यापासून दूर ठेवणे. परंतु मेंढपाळाने तिसरा उपाय निवडला तो असा की, मेंढपाळाने त्याच्या त्या शेजाऱ्याला दोन मेंढर विकत आणून दिली.  यामुळे तो शेजारी त्याच्या त्या मेंढरांची चांगली देखबाळ करू लागला.  लागलीच थोड्या दिवसांनी ती दोन मेंढरे मोठी झाली. त्या दोन मेंढरांना अजून पिल्लं झाली. यामुळे शेजाऱ्याने उपाय म्हणून त्याच्या कुत्र्यासाठी पिंजरा बांधून कुत्र्यांना पिंजऱ्यात ठेवले. अशाप्रकारे मेंढरे खाण्याची जी समस्या होती, ती निराकरण झाले. त्या मेंढपाळाने थोडया धीराने व स्वतःच्या म्हणाच ऐकून घेऊन त्याच्या त्या समस्यावर चांगल्या कार्याने नाइनाट केला. मनातला आवाज म्हणजेच प्रभू येशू ख्रीस्ताचा आवाज. तोच आवाज नेहमी ऐकण्यास आपण तत्पर असलं पाहिजे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे ख्रिस्ता तुझ्या मेंढरांचे पालन-पोषण व रक्षण कर”.
  १. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू, धर्मगुरूभगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वांना पुनरूत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने चांगले आरोग्य बहाल करावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आर्शिवाद असावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
   २. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी कुपा दृष्टी आमच्या देशांच्या सर्व नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर असू दे. त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास मदत कर व त्यांना सर्व वाईट वृत्तीपासून दूर ठेव व चांगल्या मार्गांवर चालण्यास मदत कर, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
   ३. जगभरात अनेक लोक करोना व्हायरसने बाधित झालेले आहेत, अशा सर्वांना परमेश्वराचा स्पर्श लागून त्यांचे ह्या रोगापासून मुक्तता मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
   ४. हे प्रभू परमेश्वरा आज आम्ही विशेष करून सर्व आजारी माणसांसाठी प्रार्थना करितो, त्यांच्या कुटुंबावर तुझा आर्शिवाद असू दे व सर्व सकंटानां सामोरे जाण्यास त्यांना शक्ती दे. पुनरूत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना चांगले आरोग्य द्यावे व सर्व आजारातून त्यांची सुटका करावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
   ५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.

Thursday, 23 April 2020


Reflections for the Homily of Third Sunday of Easter (26-04-2020) By Fr. Amrut Fonseca.




पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार


दिनांक: २६/०४/२०२०
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१४,२२-३३.
दुसरे वाचन: १ पेत्र १:१७-२१.
शुभवर्तमान: लुक २४:१३-३५.




प्रस्तावना:

          भाविक हो शुभ सकाळ ह्या प्रभू भोजन विधीसाठी आपणा सर्वांचे स्वागत. आज जगाला खऱ्या साक्षीदारांची गरज आहे. काही लोक सत्य व न्याय जाणून देखील ते बोलत नाहीत. आपल्या भारतातील न्यायालयामध्ये अनेक खटले चालत आहेत; परंतु न्याय मिळविण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्याचे कारण म्हणजे; खऱ्या साक्षीदारांचा अभाव. ते सत्य जाणत असतात पण पैशासाठी विकले जातात, किंवा सत्य सांगण्यासाठी पुढे येत नसतात. आजच्या उपासणा विधीत सहभागी होत असताना; खरे ख्रिस्ती ह्या नात्याने आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारुया की, दैनंदिन जीवनात ख्रिस्त मला साक्षीदार होण्यासाठी बोलावत आहे. मी जे पाहिले, बोलले व केले त्याचा साक्षीदार होतो का? पुनरुत्थान काळ हा ख्रिस्तासाठी साक्षीदार बनण्याचा काळ आहे. त्याचे खरेखुरे साक्षीदार होण्यासाठी आपण आजच्या उपासना विधीत विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१४,२२-२८.
येशू हाच मसीहा (ख्रिस्त) आहे:
पेत्राची साक्ष तो आपल्या भाषणाद्वारे स्पष्ट करतो की; येशू जिवंत आहे, तो मसीहा आहे, तो देवाला मान्य असलेला व देवाला संतोष देणारा होता.

 दुसरे वाचन: १ पेत्र १:१७-२१.
          विखुरलेल्या ख्रिस्ती यहूदी लोकांचा येशूवरील विश्वासामुळे छळ होत होता त्यांना उत्तेजन आणि धीर देण्यासाठी पेत्र म्हणतो, ‘सोने देऊन नव्हे, तर ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही व्यर्थ वागणुकीपासून मोकळे झाला आहात.

 शुभर्वतमान: लूक २४: १३-३५.
          अम्माउसच्या वाटेवरील नाराज झालेले तसेच मनोबल खचलेले शिष्य अम्माउसच्या वाटेवर होते व त्यावेळेला ते पुनरुत्थित ख्रिस्ताला भेटण्याच्या अपेक्षित नव्हते. आजपर्यंतच्या शिकवणीवरून मसिहा दु:ख सोसून गौरवीला जावे असे शक्य नव्हते. त्यांचे गोंधळलेले मन शांत होण्यासाठी ख्रिस्त जुन्याकारारात त्याच्याविषयी- म्हणजेच त्याचे दु:खसहन, मरण व पुनरुत्थान- जे शिकवलेले होते त्याचा अर्थ सांगतो. पवित्र शास्त्राच्या उलघडा केल्याने त्यांना नवा प्रकाश मिळतो व ते येशूला भोजन समयी ओळखतात.
आपल्या आध्यात्मिक निष्काळजीपणामुळे आपण पवित्र मिस्साबलीदानात जिवंत ख्रिस्ताला ओळखू शकनाही. पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहण्यासाठी फक्त शारिरीक डोळे पुरेसे नसून त्यासाठी विश्वासातला स्पष्टपणा, आध्यात्मिक जबाबदारी आणि दैवी प्रकाश्याची गरज आहे.


प्रवचन :
“अम्माऊसच्या वाटेवरील आम्ही साक्षीदार.”

(Christ At Emmaus by Rembrandt, 1648, Louvre)

“जगाला संजीवनाची मानव नवजीवनाची  सुवार्ता येशूची ...”
          भाविकहो संजीवनाची, नवजीवनाची, पुनरुस्थित ख्रिस्ताची सुवार्ता घोषित करण्यासाठी व त्याची साक्ष देण्यासाठी आजची उपासना आपणास पाचारण करत आहे.
          रेमब्रांत नावाच्या एका डच चित्रकाराने ख्रिस्त प्रभू आपल्या दोन शिष्य बरोबर टेबलावर जेवावयास बसल्याचे सुंदर चित्र चित्तारले. ते चित्र इतक प्रभावी, बोलकं व आकर्षक होतं की पाहणारा तिथेच खिळून उभा राही. हे चित्र वास्तूसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवले होते. वास्तूसंग्रहालयात भेट देण्यास येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन करण्याठी नेमलेला मार्गदर्शक, रेमब्रांत ह्या चित्रकाराने चित्तारलेल्या चित्रावर विवेचन करत होता, जे आजच्या शुभवर्तमानात आपण वाचले व एकले. भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये एक जोडप होतं श्री व श्रीमती ब्राऊन ज्यांचा एकुलता एक मुलगा अपघातात मरण पावला होता, त्यांच्यावर दु;खाचा डोंगर कोसळला होता, त्यांचे अं:तकरण जड झाले होते त्या दु:खातून सावरण्यासाठी ते ह्या प्रदर्शनात सहभागी झाले होते. परंतु त्यांचे मन ठिकाणावर नव्हते, म्हणून त्यांचे मार्गदर्शन करणाऱ्यांच्या बोलण्यावर लक्ष नव्हते, परंतु ज्यांनी मन लावून एकले ते सर्व भारावून गेले, आणि त्याचे कौतुक केले आणि म्हणाले आम्ही अगोदर सुद्धा ह्या चित्रा बद्दल एकले होते परंतु तुमचे विवेचन खूप बोलके होते व तुम्ही आत्मविश्वसाने बोलत होता हे कसे?
          तो मार्गदर्शन करणार बोलू लागला एक काळ होता मी सुद्धा ह्या चित्राचे व्यवस्थित विवेचन करू शकत नव्हतो, मग तुमच्यात बदल कसा झाला? त्याला ब्राऊन जोडप्याने प्रश्न केला. गेल्या तीन वर्षा अगोदर तो मार्गदर्शक बोलला माझी पत्नी कॅन्सरच्या असाध्य रोगाच्या विळख्यात सापडली, तिला खुप त्रास सहन करावा लागला, तिचे खुप हाल झाले आणि हळू-हळू तिची प्राणज्योत मावळली. तिच्या त्या अतीव दु:खात आणि अकाली मरणात मला जीवनाचा काहीच अर्थ कळला नाही मी पूर्णतः कोलमडून गेलो, उध्वस्त झालो. माझी पत्नी खूप सालस, सज्जन व धर्मिक वृत्तीची स्री होती, तिच्या वाट्याला हे दु:ख का यावे हे विचार सतत मला टोचत होते आणि मी फार खचून गेलो, मी देवाला आणि दैवाला दोष देत होतो. माझ्या हृदयाचे तुकडे-तुकडे झाले होते. माझ्यासाठी जगाचा व जीवनाचा अंतच झाला. का जगावे? कुणासाठी जगावे? मला काहीच कळत नव्हते, माझ्या पत्नीच्या मरणाच्या विचाराने मला वेडं केलं होतं, अश्याच दु:खात असताना मला इथे ह्या वास्तूसंग्रहालयात पुन्हा कामावर रुजू व्हावे लागले, आणि पुन्हा मी ह्या चित्राची गोष्ट लोकांना सांगू लागलो, परंतु त्या मध्ये काय रस नव्हता.
          काही दिवसांनी मला दृष्टांत झाला की मी जी कथा सांगतो ती अम्माउसच्या वाटेवरील त्या दोन दु:खी, हतबल, निराश व उदास शिष्यांची नसून माझ्या स्वतःची आहे. माझा माझ्या खिस्तावर, पुनरुस्थानावर विश्वास आहे. खिस्त सतत माझ्या बरोबर माझ्या सावली प्रमाणे आहे. पवित्र शास्राचे प्रत्येक पान देवाच्या प्रेमाची साक्ष देत आहे. ख्रिस्त फक्त बायबलच्या पानात नाही; तो माझ्या बरोबर आहे. असा विश्वास असून सुद्धा मी उदास आणि खिन्न झालो. परंतु देवाच्या दैवी दयेने आणि कृपेने मला स्पर्श केला व मला त्या पुनरुस्थित जिवंत ख्रिस्ताचा जीवनात अनुभव आला. एखादा मित्र ज्याने आपल्या जीवनात दु:ख, कष्ट, वेदना व यातना सहन केल्या आहेत तो मझ्या बाजूला आहे. बोलत आहे व माझे सांत्वन करत आहे. मला धैर्य देत आहे. अश्या वेळेला माझे डोळे सताड उघडले. मी वेगळ्या दृष्टीने पाहू लागलो. मला जीवनाचा अर्थ कळाला. माझ्या हृदयात आतल्या आत उकळी फुटू लागली. आणि जस-जशी मी ह्या चित्राची कथा सांगायाल सुरुवात केली; माझ्यामध्ये नवचैतन्य, नवी ऊर्मी, नवी आशा निर्माण झाली. मला आरोग्यदायी स्पर्श झाला, व माझ्या जीवनातील हरवलेला आनंद मला पुन्हा मिळाला. तो ख्रिस्त माझ्यात आहे. जिवंत आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. मी एक सुवर्तिक आहे. ब्राऊन जोडपे मन लावून, लक्षपूर्वक त्याचे बोलणे एकत होते व त्यांच्या डोळ्यातून अश्रू धारा गळत होत्या. आता ह्या अश्रू धारा मात्र दु:खाच्या नव्हत्या तर, आशेच्या, कृपेच्या, आशीर्वादाच्या, होत्या. एक साक्षीदार बनण्याच्या व सुवर्तिक होण्याच्या.
          अम्माउसच्या वाटेवर येशूच्या शिष्यांना येशूची भेटही घटना एका साध्या प्रसंगापेक्षा अधिक महत्वाची आहे. ही घटना आपल्याला येशूचे जीवन, मरण पुनरुत्थानाविषयी माहिती देते. ज्याप्रकारे भाकर मोडल्याने त्यांचे डोळे उघडले तसेच मिस्साबळीदानामध्ये आपल्याला येशूचे पूर्ण अस्तित्व जाणवते. परंतु मिस्साबळीदान अथवा आपली उपासना ही येशूला त्या पवित्र भाकारीद्वारे स्विकारण्याने पूर्ण होत नाही तर, जेव्हा आपण मिस्साबळीदानात ख्रिस्ताला सेवन करतो तेव्हा आपण आपल्या प्रभुशी व शेजाऱ्यांशी एकरूप झाल्याची भावना आपल्यात निर्माण झाली पाहिजे. तसेच ज्याप्रकारे शिष्यांना पुनरुत्थित ख्रिस्ताची ओळख पडताच ते ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी येरुशमेला परतले तसेच; प्रत्येक उपासनेत अथवा मिस्साबलीदानात आपण अनुभवलेल्या ख्रिस्ताची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचविण्यास आपण प्रयत्न केले पाहिजेत.
          ऱ्याच वेळी आपल्याला आपल्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही. अथवा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. अश्या वेळी हार किंवा अपयश मानून मागे फिरण्याएवजी, प्रथम आपल्या अपेक्षा, प्रार्थना विनंत्या पडताळून त्या योग्य, निस्वार्थी व गरजेच्या आहेत का? हे पाहून त्यांना बदलण्यात आपले हित आहे.
          पुनरुस्थित ख्रिस्त आजच्या उपासनेद्वारे आपणास साक्षीदार होण्यास बोलावत आहे. आपण सुद्धा अम्माउसच्या वाटे वरील शिष्य आहोत. आपले डोळे सताड उघडे ठेवू या.पुनरुत्थित ख्रिस्ताला आपण ओळखू या. त्याची साक्ष जगाला देऊ या. आपल्या अत:करणात ख्रिस्ताला जागा देऊ या. म्हणजे त्याला आतल्या आत उकळी फुटेल. कोरोना जीवाणूच्या रोगाने आपल्याला ह्या क्षणभंगुर जीवनाची जाणीव करून दिली आहे. आपले हृदय खूप गोष्टींसाठी तडफडत होते आणि आहे. परंतु जर; जीवनात देवाचे अस्तित्व नसेल, ओढ नसेल, तर, जीवन शून्य आहे. हे ही आपण उघड्या डोळ्यांनी पहिले आहे.
          पुनरुस्थित ख्रिस्ताने आपल्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी, हरवलेला आनंद पुन्हा मिळवून देण्यासाठी, निराश व हतबल जीवनावर मात करण्यासाठी व त्याच्या पुनरुस्थानाचे साक्षीदार बनण्यासाठी, सुवार्तीक होण्यासाठी आपणास प्रेरणा मिळावी म्हणून ह्या बलिदानात विशेष कृपा, मदत व आशीर्वाद मागूया....तथास्तु.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “करितो मी याचना ऐकावी प्रार्थना.”
१. आज आपण आपल्या ख्रिस्त सभेसाठी प्रार्थना करूया की, ह्या कोरोना विषाणूच्या वेळी आपण चर्चला जात नाही. परंतु, देवाच्या अधिक समीप आहोत. देवाने आपले परमगुरु फ्रान्सिस, कार्डिनल्स, महागुरू, धर्मगुरू, तसेच सर्व श्रद्धावंतांना आशीर्वादित करून, सुखी-समाधानी व नीरोगी ठेवावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण आपल्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, व इतर सेवक सेविका ह्यांनी आपले जीव धोक्यात घालून रोग्यांची सेवा करत आहेत. त्यांना परमेश्वराचा विपुल असा आशीर्वाद व त्यांच्या कुटुंबीयांवर सुद्धा यावा, तसेच सर्व धोक्यांपासून त्यांचे संरक्षण व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपण आपल्या सार्वजनिक हितासाठी कार्य करणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करुया की, विशेष म्हणजे पोलीस अधिकारी, साफसफाई करणारे कामगार, रोजचा आहार पुरवणारे सेवक-सेविका, इत्यादी ह्यांना परमेश्वर सदोदित त्यांच्या बरोबर राहू दे, त्याचप्रमाणे आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य करावे, उदार हस्ते मदत करण्याची सुबुद्धी आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपण आपल्या राजकीय पुढाऱ्यांसाठी प्रार्थना करूया की, या अडचणीच्या काळात विशेष म्हणजे कोरोना सारख्या महामारीच्या काळात महत्त्वाचे निर्णय घेऊन लोकांचे संगोपन केले जावे, गोरगरिबांना आसरा दिला जावा, व त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सदोदित तुझ्या प्रेमाच्या मायेखाली ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. हे प्रभू आम्ही सर्वजण महामारीत अडकलेले आहोत. आमच्या मनात अनेक शंका-कुशंका निर्माण होतात. आमच्या विश्वासाला तडा जाण्याची शंका नाकारता येत नाही. तुझ्या अधिकाधिक जवळ येऊन तुझ्यावरच आमची श्रद्धा वाढव हा वरदहस्त आम्ही तुझ्याकडे मागतो म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि व्ययक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.


Thursday, 16 April 2020


Reflections for the Homily of Second Sunday of Easter (19-04-2020) By Br. Brijal Lopes.



पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार
दैवी दयेचा रविवार



दिनांक: १९/०४/२०२०
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:४२-४७
दुसरे वाचन: १पेत्र १:३-९
शुभवर्तमान: योहान २०:१९-३१





प्रस्तावना:
          आज आपण पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. हा रविवार दैवी दयेचा रविवार सुद्धा म्हणून साजरा केला जातो. ह्या सणाच्या नोव्हेनाची सुरुवात गुड-फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार पासून सुरू करण्यात आलेली आहे. प्रत्येक निर्मित केलेली व्यक्ती ही देवाला प्रिय असते. त्याला देवाने दिलेली एक महान देणगी म्हणजे विश्वास, आशा व प्रेम आहे. प्रेमाने प्रत्येक मनुष्य देवाकडे ओढला जातो; कारण संत फाँस्तीनाला प्रकट झालेल्या दैवी दयेने भरलेल्या ख्रिस्तामुळे. त्या म्हणतात की, परमेश्वराचे मानवावरील असलेले अस्सीम प्रेम, दया व क्षमा ह्यामुळे आपण पापापासून दूर राहून परमेश्वराच्या अधिका अधिक जवळ येण्यासाठी तो आपणास आमंत्रित करीत आहे.
          आजची उपासना आपणा सर्वांना परमेश्वराची आपल्यावर असलेल्या अमर्याद प्रेम, दया, करुणा, व क्षमा ह्या विषयी सांगत आहे. विश्वासाद्वारे व दैवी क्षमेद्वारे आपण सर्वांनी ख्रिस्ती मुल्ये जोपासून सुंदर समाज निर्माण करण्यासाठी ख्रिस्तसभा आपणास आमंत्रित करीत आहे.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:४२-४७
          आजचे पहिले वाचन ‘ख्रिस्ती मंडळाचे धार्मिक जीवन’ ह्यावर मार्गदर्शन करीत आहे. ह्या वाचनात आपण चार प्रकारचे महत्वपूर्ण वैशिष्ट्ये ख्रिस्तमंडळात कशा प्रकारे दाखवलेले आहेत हे आपण समजून घेणार आहोत. ते पुढील प्रमाणे.
१) चर्च: विश्वासूपणे शिष्य त्यांच्या शिकवणुकीवर भर देत होते.
२) सामाजिक जीवनातील चर्च: चर्चच्या शिकवणुकीनुसार सर्वजण एकमेकांशी समानतेने व गरिबांची काळजी घेणारे चर्च.
३) प्रार्थनामय चर्च: पवित्र भाकर मोडून व त्या भाकरीत वस्ती करणाऱ्या ख्रिस्ताचे प्रार्थनेद्वारे पाचारण करणे.
४) एक हर्षभरित व आनंदित असणारे चर्च: देवाचे आभार म्हणून लोकांत आनंद मानणारे. अशा प्रकारची ही वैशिष्ट्ये आजच्या वाचानाद्वारे आपणासमोर ठेवलेली आहेत.

दुसरे वाचन: १पेत्र १:३-९
          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पीटर आपल्याला ख्रिस्तमंडळाची ओळख, निष्ठा व प्रतिष्ठा ह्याविषयी सांगत आहे. विश्वास ह्याद्वारे देवाची तारणदायी योजनेद्वारे मानवाला दिलेली महत्त्वाची भेट म्हणजे कृपा आहे. ह्या कृपेद्वारे व विश्वासाद्वारे आपण ख्रिस्तासाठी मौल्यवान ठरावेत ह्याविषयी आपणास सांगण्यात येत आहे.

शुभवर्तमान: योहान २०:१९-३१
          आजच्या शुभवर्तमानात संत योहन ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल, भीतीने घाबरून गेलेल्या शिष्यांबद्दल व संत थॉमसच्या ख्रिस्ताच्या पुनरूत्थानावरील शंकेबद्दल सांगण्यात आलेले आहे. ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यावर शिष्यांचे आनंदी चेहरे व त्यातून त्यांचा विश्वास ह्याबद्दल आपणास सांगण्यात आलेले आहे. ज्यावेळी ख्रिस्त शिष्यांना प्रकट झाला; त्यावेळी ख्रिस्ताने त्याच्या प्रिय शिष्यांना नूतनीकरणाचे दान, पापांपासून क्षमा मिळवण्याचे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ख्रिस्ताच्या शांतीचे दान त्यांना प्रदान केले. ख्रिस्ताच्या पुनरूत्थाना अगोदर व त्याच्या पुनरुत्थाना नंतरची परिस्थिती ह्या वाचना द्वारे आपणा समोर ठेवण्यात आली आहे.

बोधकथा:
          मेरी व विल्सन यांचे एक छान कुटुंब होते. प्रेम विवाह असल्यामुळे ते अगदी आनंदात होते. एकमेकांशी चांगले राहत होते. परंतू लग्नाअगोदर ते एकमेकांना “मी तुझ्यावर प्रेम करतो, करते असे ते एकमेकांना म्हणायचे. पण लग्न होऊन दहा वर्ष झाली तरी सुद्धा मेरी आसुसलेली व अक्षरशा थांबली होती की, विल्सन मला “मी तुझ्यावर प्रेम करतो,” असे म्हणेल. ह्या आशेवर असताना एक दिवस मेरी विल्सनला म्हणाली, “की तू माझ्यावर प्रेम करतोस का?” मेरीने इतक्या वर्षानंतर हा प्रश्न विचारल्या नंतर तो स्तब्ध झाला आणि तिला विचारले कि, “तू हा प्रश्न का विचारत आहेस?” त्यावर तिने प्रत्युत्तर दिले की, “तू मला गेली दहा वर्षे ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे कधीच म्हणाला नाहीस म्हणून. परंतु त्याने तिला म्हटले की, “जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा मी तुला ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे म्हणालो तेवढे पुरेसे नव्हते काय?” पण त्यावर ती उद्गारली की, “तुम्ही पुन्हा म्हणा, मला ते ऐकायला फार आवडते.” तिचे हे प्रेमळ शब्द ऐकून त्याला खूप आश्चर्य वाटले व त्या आनंदभरीत हर्षाने म्हटले की, “मी तुझ्यावर प्रेम करतो.” असे बोलून पुढे तो म्हणाला की, “आता तुझे समाधान झाले आहे का?” आणि ताबडतोब तिने उत्तर दिले की, “मी तुला सांगितले होते म्हणून तू म्हणालास की, तू खरोखर तुझ्या अं:तकरणातून म्हणाला आहेस?”

मनन चिंतन:
          ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो ह्या बोधकथेद्वारे आपणास जाणवते की, कशाप्रकारे आजची श्रद्धावंत भाविक किंबहुना भाविक हे एक प्रबळ पुरावा शोधत आहेत. कशाचा पुरावा?  तर आपण जे ऐकतो, जे पाहतो किंवा स्पर्शाने आपण पुरावे एकत्र करतो; तेव्हा ती गोष्ट किंवा घटना ही आपण विश्वासाने, श्रद्धेने व पूर्णत: स्विकारत असतो. ह्या विषयीचा पुरावा. त्याद्वारे आपण सत्य परिस्थिती स्विकारत असतो.
          प्रेषित थॉमस ह्यांची अवस्था ही आपल्या प्रमाणे आहे. ती म्हणजे ज्या अवस्थेमध्ये आपण आहोत किंवा ज्या प्रसंगांमध्ये आपण आहोत, तो प्रसंग किंवा अवस्था आपण टाळतो किंवा त्याचा स्विकार करण्यासाठी आपली इच्छा होत नाही. येशूच्या प्रेषितांनी व शिष्यांनी थॉमसला येशूच्या पुनरुत्थानाबद्दल सांगितले तेव्हा त्याने त्याच्या प्रभूच्या पुनरुत्थानाबद्दल पुरावा मागितला. अर्थात ठामपणे व स्पष्टपणे सांगितले, “त्याच्या हातात खिळ्यांचे व्रण पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यावाचून आणि त्याच्या कुशीत आपला हात घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही.” पण जेव्हा ख्रिस्त पुन्हा त्याच्या शिष्यांना भेटतो, तेव्हा थॉमस देखील त्यांच्यात हजर असतो. आणि येशू शिष्यांमध्ये हजर असलेल्या थॉमसला सांगतो, तेही सौम्य फटकाराद्वारे ख्रिस्त म्हणतो की, “तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा. आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन होऊ नकोस तर, विश्वास ठेवणारा हो.”
          ख्रिस्त आपणाकडून काय अपेक्षा करत आहे? तो आपणास सांगत नाही की, पाठपुरावा करू नका किंवा कोणतीही गोष्ट अंधपणाद्वारे किंवा कोणत्याही प्रकारची कारणे नसताना व निर्लज्य होण्यास प्रोत्साहन करत नाही. तर, ख्रिस्त आपणास ‘साधी राहणी व उच्च विचारसरणी’ ह्या प्रकारे जीवन जगण्यास आमंत्रण करीत आहे. ह्याद्वारे ख्रिस्त आपणास सांगत आहे की, प्रत्येक प्रसंगाला किंवा घटनेला पुरावे मागून किंवा ते सिद्ध करून सुंदर व आनंदी जीवन जगता येत नाही. तर, व्यक्तीचा व्यक्तीवर असलेला विश्वास महत्वाचा आहे.
          थॉमस ह्याचा विश्वास हा एका लहान बालकाप्रमाणे होता. कारण, जे इतर शिष्यांनी पाहिले ते पाहण्यासाठी तो फार उस्तुक होता. पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहण्यासाठी थॉमसचा संशय हा एक आपणासाठी आशीर्वाद होता. वेश बदलणारा नव्हता, त्याचा संशय आपणासाठी पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव मिळाल्यावर व ठामपणे विश्वास ठेवल्यावर प्रेषित केवळ एकाच जागेवर राहिले नाहीत तर त्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता संपूर्ण जगाला दिली. थॉमसने भारतामध्ये येऊन देवाची योजना त्यानी साकारली व त्यात त्याने विश्वासाचा पाया रोवला. तोच विश्वास संत थॉमसने पूर्णपणे मातीत रुजवला, फुलवला आणि बहरला.
          आपण देखील ख्रिस्तामध्ये एक होऊन त्याची सुवार्ता, दया, करुणा, ममता व प्रेम इतरांपर्यंत आपल्या कार्याद्वारे व आपल्या वागणुकीद्वारे देता यावे म्हणून प्रयत्न करूया. दैवी दयेचा रविवार हा केवळ मुखाने नव्हे तर, दैनंदिन जीवनात आपल्या कृतीने व आपल्या वागणुकीद्वारे इतरांपर्यंत पोहोचवावे म्हणून आपण ह्या दानांकारीता प्रार्थना करूया. तसेच कोरोना ह्या महाभयंकर आजारामुळे भरपूर लोकांचे बळी गेले आहेत व अजूनही लोक त्या आजाराचा सामना करत आहेत, अशा सर्वांसाठी विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू आमची श्रद्धा दृढ कर.
१. आपले परमगुरु पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांच्यावर परमेश्वराचा भरघोस आशीर्वाद असावा, त्यांना चांगले आरोग्य लाभावे, त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या, नैतिक मूल्ये व परमेश्‍वराची दया व करुणा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी परमेश्वराने त्यांना सहाय्य करावे म्हणून प्रार्थना करू या.
२. जी लोक आजारी आहेत, खाटेला खिळलेली आहेत, करोना व्हायरसच्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत, अशा सर्वांना परमेश्वराच्या दयेचा अनुभव यावा, परमेश्वराच्या स्पर्शाने ते लवकरात लवकर ते बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. जी लोक देवापासून दूर गेलेली आहेत ज्यांनी देवाच्या श्रद्धेला स्विकारले नाही, त्या सर्वांची परमेश्वरावरील श्रद्धा वाढावी व त्याद्वारे परमेश्वराच्या दयेने व क्षमेने त्यांनी इतरांपर्यंत परमेश्वराची दया, शांती, प्रेम व क्षमा पोहचवावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. कोरोना व्हायरसमुळे त्रस्त झालेल्या व भीतीने घाबरून गेलेल्या लोकांना तसेच जगाला परमेश्वराच्या शांतीचा अनुभव यावा व त्यांनी देवाचा स्विकार करावा. त्याद्वारे देवाची शांती, करुणा व क्षमा ही सर्वत्र नांदावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. पुनरुत्थित ख्रिस्तावर आपली श्रद्धा दृढ व्हावी व त्याच श्रद्धेद्वारे देवाचे साम्राज्य आपण इतरांपर्यंत पोहोचवावे व इतरांना देवाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक, आणि व्ययक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.