Sunday 5 April 2020


Reflections for the Good Friday (10-04-2020) By Br. Suhas Fereira.





शुभ शुक्रवार





दिनांक: १०/०४/२०२०.
पहिले वाचन: यशया ५२:१३-५३:१२.
दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ४:१४-१६;५:७-९.
शुभवर्तमान: योहान १८:१-१९:४२.




प्रस्तावना:
          शुभ शुक्रवार! ख्रिस्ताच्या दुखःसहनाचा दिवस. आजच्या दिवशी दोन हजार वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांच्या पापांसाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले होते. ख्रिस्ताने आपल्या स्वतःच्या मरणाने आपल्या सर्व मानवजातीच्या पापांवर विजय मिळविला म्हणूनच ह्या दिवसाला पवित्र शुक्रवार म्हणून मानला जातो. आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यशया प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखसहनाविषयी  अगोदरच भाकित करीत आहे; आणि दुसऱ्या वाचनात आपणास कळून चुकते की, प्रभू येशू ख्रिस्त हाच खरा याजक आहे, ज्याद्वारे संपूर्ण सृष्टीचे तारण होणार होते.
          आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण येशूच्या दुःखसहनाविषयी तसेच त्याच्या क्रूसावरील यातनादायी मरणाविषयी ऐकणार आहोत. येशूने अतोनात कष्ट आणि दुःख सोसले, परंतु एका शब्दानेही त्याने त्याच्या मारेकऱ्यांची निंदा केली नाही. क्रूर शिपायांनी येशूची थट्टा-मस्करी केली, त्याच्या अंगावर थुंकले, त्याचे कपडे फाडले. इतकेच नव्हे तर येशूला क्रुसावर खिळले, परंतु येशूने शेवटच्या घटकेलाही त्यांना क्षमाच केली. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरण व दुःखसहनावर चिंतन करत असताना; आपल्यालाही प्रभू येशू ख्रिस्ता प्रमाणे इतरांना क्षमा करण्याची प्रवृत्ती लाभावी म्हणून आजच्या पवित्र उपासनेमध्ये विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ५२:१३-५३:१२
          आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपणास परमेश्वराच्या एकुलत्या एका पूत्राची ओळख करून देत आहे. आपल्या बापाची आज्ञा मनात ठेवून येशू ख्रिस्ताने आपणा सर्वांसाठी क्रूसावर आपल्या प्राणाची आहुती दिली. तो पडला, घायाळ झाला, परंतु त्याने तक्रार न करता आपल्या सर्वांसाठी मध्यस्थी केली.

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ४:१४-१६;५:७-९
          आजच्या दुसऱ्या वाचनात आपण पाहतो की, प्रभू येशू ख्रिस्त जो प्रमुख याजक आहे; तो आपल्या पित्याच्या अज्ञात एकनिष्ठ होता. त्याच्या मरणाद्वारे त्याने आपल्या सर्वांना जीवन प्राप्त करून दिले आहे. तो देवाचा एकुलता एक पुत्र असूनही त्याने दुःखाचा स्वीकार केला.

शुभवर्तमान: योहान १८:१-१९:४२
          आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपणास कळून चुकते की, प्रभू येशू ख्रिस्त हा अतिशय शांत आणि सौम्य स्वभावाचा होता. ज्यावेळी शिपाई त्याला पकडण्यात आले; तेव्हा त्यांने त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा राग व्यक्त न करता शांतपणे स्वतःला त्यांच्या हाती स्वाधीन केले. आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपणाला असा संदेश मिळतो की, ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या मारेकऱ्यांना क्षमा केली तशीच क्षमा आपणही इतरांना केली पाहिजे.

बोधकथा:
          एकदा बिशपांच्या निवासस्थानामध्ये एक चोर रात्रीच्या वेळेस चोरी करण्यास शिरतो. बिशपांच्या गळ्यावर सुरी ठेवून तो बिशपांना मारण्याची धमकी देतो. परंतु बिशप थोडेही न घाबरता त्या चोराला समजावण्याचा प्रयत्न करतात. रात्री १२:३० ची वेळ. बिशप चोराला फ्रीजमध्ये असलेले जेवण गरम करून खायला देतात. आणि तदनंतर त्याला झोपण्यास खोलीची व्यवस्थाही करतात. “सकाळी उठून शांतपणे पुन्हा बोलू” असे म्हटल्यावर चोर आश्चर्यचकित झाला. त्याने बिशपांना प्रश्न विचारला की, “मी चोर असून सुद्धा तुम्ही माझ्याशी इतक्या प्रेमाशी का वागतात? तेव्हा बिशप म्हणाले, “तु चोर असला तरी देवाचा मुलगा आहेस आणि माझा भाऊ. त्यामुळे माझ्या भावाशी मी प्रेमानेच वागायला हवे ना?” असे म्हणून बिशप झोपायला आपल्या खोलीत निघून गेले. इतक्यात थोड्या वेळात चोराच्या मनात पुन्हा चोरीचा विचाराला आला. त्याची नजर त्याच्या समोर असलेल्या दोन सोनेरी रंगाच्या मेणबत्तींवर गेली. त्या मेणबत्त्या सोन्याच्या समजून चोराने त्या पिशवीत घातल्या आणि लागलीच तेथून पळ काढला. सकाळी सुमारे साडेपाचच्या दरम्यात पोलीस पहाऱ्यावर असताना नेमका हा चोर त्यांच्या तावडीत सापडला. दोन कानाखाली खातच चोराने सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. तेव्हा पोलिसांनी चोराला बिशपांकडे आणले आणि त्या दोन्ही मेणबत्त्या बिशपांकडे देऊन चोराला पुन्हा चोप देऊ लागले. त्यावर बिशपांनी पोलिसांना थांबवले आणि तो चोर, चोर नसून आपणच त्याला ह्या मेणबत्या दिल्याचे सांगितले. त्यावर पोलिस काही न करता तेथून निघून गेले. चोराला तर आश्चर्याचा धक्काच बसला. तेव्हा बिशपांनी त्याला सांगितले की, “मी तुला सांगितले होते ना! की, तू माझा भाऊ आहेस म्हणून.” त्यावर चोराला त्याची चूक लक्षात आली. आपल्या चुकीबद्दल पश्चाताप व्यक्त करून त्या चोराने आपले संपूर्ण आयुष्य प्रभू सेवेत घालविण्याचा निर्णय घेतला.

मनन चिंतन:
          क्रुसावर खिळलेल्या ख्रिस्ताच्या दुःखसहनात सहभागी होण्यास जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. नदी स्वतःचे पाणी कधीच स्वतः पीत नसते; तर इतरांची तहान भागवत असते. फुल स्वतःचा सुगंध स्वतःसाठीच ठेवित नसतात; तर इतरांना देत असतात. झाडे स्वतःची फळे कधीच स्वतः खात नसतात; तर इतरांना देत असतात. होय माझ्या प्रियांनो अगदी अशाच प्रकारे आपणही आपले जीवन स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगले पाहिजे. “स्वतःसाठी जगला तर, मेलास पण इतरांसाठी जगला तरच खरा जगलास.” आजची उपासना हि कुण्या साध्या-सुध्या संदेष्ट्या विषयी किंवा चमत्कारा विषयी बोध देत नाही. तर आजची उपासना परमेश्वराचा एकुलता एक पुत्र खुद्द प्रभू येशू ख्रिस्त यांची महती जगाला पटवून देत आहे. 
          प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये अवतरला तो म्हणजे साधारण मानवाच्या रूपामध्ये. साध्या-सुध्या गव्हाणीमध्ये त्याने मारियेच्या उदरी जन्म घेतला. साधारण माणसाप्रमाणे तो जीवन जगला. तुम्हा-आम्हा सारखे त्याने कष्ट केले, तो राबला. आपल्या सर्व कृतीमध्ये त्याने फक्त इतरांचा विचार केला. स्वतःला कधीही न उंचाविता नम्रपणे इतरांची सेवा केली. तो राजा होता; परंतु सेवक झाला. स्वतःने काट्यांचा मुकुट परिधान केला आणि आपल्याला फुलांच्या पाकळ्यांत ठेवले. परंतु त्याने ज्यांना सर्वकालिक जीवन प्राप्त करून दिले होते; त्यांनीच त्याला मारण्याचा कट रचला.
          आपल्या दैनंदिन जीवनातही बऱ्याच वेळेला आपण अगदी त्या क्रूर शिवरायां प्रमाणेच वागत असतो. परमेश्वर आपल्यावर भरपूर अशी प्रीती, प्रेम करत असतो. परंतु त्या प्रेमाची जाणीव न ठेवता आपण नेहमी पापांच्या आहारी जात असतो. राग, मत्सर, हेवा, द्वेष, चीड, इतरांबद्दल सूडाची भावना, अशा अनेक कितीतरी गोष्टींमुळे आपण देवाच्या दूर जात असतो. कधी-कधी या जागतिक सुखाच्या मागे आपण इतके बेधुंद होतो की, आपल्याला देवाचा जणू विसरच पडलेला असतो. परंतु माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आपण देवाच्या कितीही दूर गेलो तरी देव मात्र आपल्या जवळ असतो. तो नेहमी आपल्यावर नजर ठेवून असतो. ज्याप्रमाणे आपण लुकच्या शुभवर्तमानात १५ व्या अध्यायात वाचतो की, उधळ्या पुत्राने सर्व धनसंपत्ती विकून मौजमजा केली; परंतु जेव्हा त्याचे डोळे उघडले आणि त्याला समजले की त्याने चूक केली होती; तेव्हा त्याने पुन्हा त्याच्या पित्याकडे धाव घेतली. पित्याने दूरवरून पाहतच धाव घेतली आणि आनंदाने आपल्या परतलेल्या मुलाचा स्विकार केला. पृथ्वीवरील पिता जर आपल्या मुलाच्या परतण्याविषयी इतका खुश असेल; तर आपल्या पापांच्या पश्चातापाने आपला स्वर्गीय पिता किती खुश होईल? लुक १५:७ सांगते, ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतीमनांपेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल. परंतू आपण पश्चाताप करण्यासाठी तयार आहोत का? की अजूनही भौतिक सुखाची धुंद आपल्या डोळ्यावर फडफडत आहे.
          आज मनुष्य स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करण्यासाठी तयार आहे. सृष्टीची हनी तर करतोच; परंतु इतर मानवांची हानी करण्यासाठीही तो पुढे मागे बघत नाही. त्याचाच परिणाम नुकताच जगप्रसिद्ध झालेल्या करोना व्हायरसने आपण अनुभवत आहोत. करोना व्हायरस हा देवाने नाही तर मानवानेच निर्माण केला आहे. त्यामुळे त्याचे परिणामही मानवालाच भोगावे लागत आहेत. आज आपण विशेष प्रार्थना करूया की, मानवाला एकमेकांवर प्रेम करण्यासाठी प्रेरणा लाभू दे. ज्याप्रमाणे ख्रिस्त आपल्यासाठी क्रुसावर मरण पावला; त्याच प्रमाणे आपणही आपले जीवन इतरांसाठी व्यस्थित करावे जेणेकरून परमेश्वराची कृपा आपल्या सर्वांवर सदोदित राहील. आमेन.

No comments:

Post a Comment