Saturday, 4 April 2020


Reflections for the Homily of Maundy Thursday (09-04-2020) By Br. Roshan Rosario.



आज्ञा गुरुवार



दिनांक: ०९/०४/२०२०
पहिले वाचन: निर्गम १२:१-८,११-१४
दुसरे वाचन: १ करिंथ.११:२३-२६
शुभवर्तमान: योहान १३:१-१५




विषय: “नवीन आज्ञा तुम्हांस माझी परस्परावर प्रेम करा.

प्रस्थावना:
          आजपासून आपण पवित्र तीन दिवसीय उपासनेमध्ये प्रवेश करीत आहोत. जो प्रायश्चितकाळ आपण राखेच्या बुधवारपासून सुरू केला होता; त्याची सागांता आज होणार आहे. आज पासून आपण नवीन पर्व सुरु करत आहोत; ते म्हणजे प्रभूच्या दु:खसहनाचे व ते आपण त्याच्या पुनरुत्थानापर्यंत चालणार आहोत. परंतु ह्याचा अंत कधीही होणार नाही. कारण, ही तीन दिवशीय उपासना म्हणजे प्रभूच्या अधिक जवळ येण्याचा काळ. ह्या उपासनेद्वारे आपणाला प्रभूच्या पुनरुत्थानाचा सण अधिक भक्तीभावाने साजरा करता येईल.
          आजच्या उपासना विधीचा केंद्रबिंदू प्रेमामध्ये दडलेला आहे. आपल्या प्रभू येशूच्या असीम प्रीतीचे किंवा प्रेमाचे स्वरूप हे त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुऊन एक नवीन उदाहरणाद्वारे आपल्यासमोर ठेवले आहे. आजच्या ह्या आज्ञा गुरुवाराच्या दिवशी प्रभू येशूने आपल्याला एक नवीन आज्ञा दिली आहे; ती आज्ञा म्हणजे ‘निस्वार्थी प्रेम’ किंवा आगळवेगळ प्रेम जे त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुऊन आपल्या पुढे चित्रित केले आहे. आज या आज्ञा गुरुवारी प्रभूने आपणा सर्वांसाठी नविन मेजवानी तयार केली आहे. जेथे प्रभू हाच त्या मेजवानीची भाकर म्हणून आपले पोषण करतो व ह्या वेदीवर दैनंदिन प्रकट होत असतो. ज्याप्रमाणे तो आपल्या शिष्यांना शेवटच्या भोजनावर प्रकट झाला होता.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: निर्गम १२:१-८,११-१४
          “मिसरमधील प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा.... मरतील.” अशी नाट्यमय घोषणा निर्गम ११:५ मध्ये आपण पाहतो. ह्या घोषणेच्या परिपूर्तीवरच आता भरपूर लक्ष दिले आहे. आजच्या पहिल्या वचनात इस्राएल लोकांचे सर्व प्रथम जन्मलेले या भयानक प्रसंगातून अनन्यप्रकारे वाचले. इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांना मरण ओलांडून गेले, म्हणून या विलक्षण घटनेला वल्हांडण म्हटले आहे. नव्या करारात येशूच्या मृत्यूचा अर्थ समजून घेण्यामध्ये वल्हांडणाचे प्रमुख महत्त्व आहे. शुभवर्तमानावरच्या वृतांतानुसार अखेरचे भोजन हे वल्हांडणाचे भोजन होते. पुढे याचीच प्रभूभोजन म्हणून स्थापना झाली आहे.

दुसरे वाचन: १ करिंथ.११:२३-२६
          आजच्या दुसऱ्या वाचनात पौलाला प्रभूपासून मिळाले तेच शिक्षण त्याने करिंथकरांना तो तिथे असताना समक्ष सांगितले होते. त्याचाच तो आता पुनरुच्चार करीत आहे. प्रभू येशूला विश्वासघाताने धरून दिले, त्या रात्री त्याने जे केले, जे सांगितले त्याचीच उजळणी येथे केली आहे. येशूच्या मृत्यूचे स्मरण करण्यासाठी त्यांने भाकर मोडायची होती. येशूने आपल्या रक्ताने प्रस्थापित केलेल्या नव्या कराराच्या स्मरणार्थ त्यांने पेल्यातून प्यावयाचे होते. प्रभू भोजनाने प्रभू पुन्हा परत येईपर्यंत त्याच्या मरणाची घोषणा होत असते. येशूने केलेल्या कृतीवर अधिक भर देण्यासाठी पौलाने येशूच्या शब्दांचा पुनरुच्चार केला आहे. येशूने स्वतःचा विचार न करता स्वच्छेने, नि:स्वार्थीपणे त्याच्यासाठी आपले जीवन अर्पण केले. करिंथकरी भोजनाच्या वेळी आपल्या जेवणात इतरांना वाटा देत नव्हते. यातून करिंथकरांचे अपार उणेपण आणि येशूचे अपार उदारपण दिसून येते. त्याच्या मृत्यूची आठवण व्हावी यासाठी नेमलेल्या भोजनाच्या समयी ते याप्रकारे स्वार्थी अप्पलपोटेपणाचे वर्तन करतात. ज्याच्या स्मरणार्थ ते हे भोजन करतात, त्या प्रसंगाचे त्यांचे वर्तन पुन्हा त्याचा विश्वासघात करण्यासारखेच नाही का?

शुभवर्तमान: योहान १३:१-१५
   सेवाभावपवित्र मिस्साबलीदानाची स्थापनाहा आजच्या शुभवर्तमानाचा मुख्य गाभा आहे. ख्रिस्त आपल्या शिष्यांना नवीन आज्ञा देऊन म्हणत आहे, “तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी”(योहान १३:३४). आपल्या शिष्यांवरील असलेली प्रीती ख्रिस्ताने त्यांचे पाय धुवून दर्शविली. आपल्या प्रमुख अतिथींचे पाय धुवून स्वागत करणे ही यहुदी समाजाची परंपरा होती. हे काम घराचा मालक नव्हे तर फक्त चाकर किंवा गुलाम करत असत. त्यामुळेच पेत्राने ख्रिस्ताला आपले पाय धुण्यास नकार दिला. ख्रिस्त राजांचा राजा असूनही त्याने एका चाकराचे काम का करावे? ते केवळ आपल्या शिष्यांना सेवेचे व लीनतेचे उदाहरण घालून देण्यासाठी. योहानच्या मतानुसार त्याच्या ख्रिस्ती मंडळीनी ह्यावरून धडा शिकावा की, प्रत्येक मिस्साबलीदान अर्पण करताना, त्यांना ख्रिस्ताने दिलेल्या आज्ञेची आठवण व्हावी व ती आज्ञा आपल्या जीवनात अंगीकारावी. ह्या उताऱ्यात शुभवर्तमानकार योहानने, ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुवून एक नवीन महामंत्र जगाला दिला आहे असे म्हणतो. इतर कोणताही शुभवर्तमानकार आपल्या शुभवर्तमानात ह्या उताऱ्याचा उल्लेख करीत नाही.

बोधकथा:
          असिसिकर संत फ्रान्सीस ह्यांच्या जीवनात घडलेली ही एक सत्य घटना आहे. संत फ्रान्सीस जेव्हा त्यांच्या तारुण्यात होते तेव्हां ते खूप श्रीमंत होते. त्यांना त्यांच्या जीवनात फक्त श्रेष्ठ गोष्टींची आवड होती. आपल्या आजच्या भाषेत बोलायला गेले तर; ते गर्भ श्रीमंत होते. पण त्यांच्या जीवनात एक प्रकारची अस्वस्थता होती, ती म्हणजे आत्मिक शांती. अशा द्विधा मनातील अस्वस्थ परिस्थितीत असतांना संत फ्रान्सीस आपल्या घोड्यावर शहराच्या बाहेर जात होते. त्याच वेळी त्यांच्या समोर एक कुष्ठरोगी आला, कुष्टरोग्याला पाहताच संत फ्रान्सिस ह्यांच्यात एक प्रकारची तिरस्काराची भावना निर्माण झाली; पण त्याचवेळी अं:तकरणात सद्-भावना निर्माण झाली होती. ते आपल्या घोड्यावरून उतरले व त्यांनी त्या कुष्ठरोग्याला आलिंगन दिले व त्याच्या घायांचे चुंबन घेतले. त्याच क्षणी संत फ्रान्सिस ह्यांना त्या कुष्टरोग्यात साक्षात्कार प्रभू येशूचे दर्शन झाले; ते म्हणजे कुष्टरोग्याचे रूप धारण करून खुद्द प्रभू येशूच त्याच्या समोर उभा होता असे त्यांना वाटले. संत फ्रान्सीस सारखे प्रभू येशू त्यंच्या जीवनाद्वारे दोन हजार वर्षा पूर्वीच आपल्यासमोर सेवेचे व प्रेमाचे उदाहरण ठेवत आहेत. जो माणूस इतरांच्या सेवेत नम्र होतो तोच देवाचे उदाहरण आपल्या जीवनात जगत असतो.

मनन चिंतन:
          ख्रिस्ता ठायी माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो. वधस्तंभाच्या मार्गे आपण पित्याकडे चाललो आहोत ह्याची प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्ण जाणीव होती. स्वतःला त्या वेदनांच्या दरीतून जायचे होते. त्याविषयी विचार करीत न बसता; येशू ख्रिस्ताने शेवटल्या क्षणापर्यंत आपल्या प्रिय शिष्यांवर प्रीती केली. दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या वाचनात आपण बघतो की, प्रभू येशू हा यहूदा एस्कायोत जो प्रभू येशूचा विश्वासघात करणार होता त्याच्यावर सुध्दा त्याने प्रीती केली. यहूदा एस्कायौत हा सैतानाच्या मसलतीने चालला होता; तरी येशू ख्रिस्त हताश झाला नाही. त्याच्यावरची प्रीती त्याने कधीही कमी केली नाही. कारण प्रभू हा प्रीतीत तुडुंब भरून वाहणाऱ्या महान नदिवसासारखा आहे.
प्रीती करणे म्हणजे सेवा करणे.
          आजच्या शुभवर्तमानात आपल्याला प्रभू येशूची प्रीत पाहावयास मिळते. पहिल्या प्रथम प्रभू येशूला हे माहित होते व ह्या सर्व गोष्टींची जाणीव होती कि; सर्व गोष्टी त्याच्या हाती दिल्या होत्या. त्याला माहित होते की; त्याच्या धरण्याची, घात करण्याची वेळ जवळ आली होती. पण त्याला हे पण माहीत होते की; त्याच्या गौरवाची वेळ सुध्दा जवळ आली होती. त्याला हे ही माहीत होते की; थोड्याच वेळात तो देवाच्या सिंहासनावर आपली जागा घेणार आहे. अशा सर्व विचारांनी त्याला गर्वाने फुगवले नाही तर, त्याने आपल्या शिष्यांसाठी एक महामंत्र दिला व त्यांच्या जीवनाचे कायापालट करणार असे नम्रतेचे उदाहरण त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुवून त्यांच्या समोर ठेवले. प्रेम पण त्याने त्यांच्यावर केले व हाच प्रेमाचा संदेश व सेवेचा संदेश आपल्याला आपल्या जीवनात पाळण्यास सांगितले आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आपला कोणी जवळचा आजारी पडतो आपण त्या व्यक्तीसाठी मोठ्यातले मोठे व लहानातले लहान काम करत असतो. हे काम प्रेमाने व स्वखुशीने करत असतो. कारण आपण त्या माणसावर प्रेम करतो म्हणून.
          दुसरे म्हणजे; येशूला माहित होते की, तो देवापासून किंवा सृष्टीच्या निर्मात्या पासून आला आहे, आणि तो त्याच्याकडे म्हणजेच त्याच्या पित्याकडे परत जाणार आहे. अशा वेळी जेव्हा त्याने अनुभवले की, तो त्याच्या पित्याच्या जवळ परत जाणार आहे तेव्हा; त्याला असे पण वाटले असेल की, माझा आणि ह्या जगाचा काय संबंध? का मी ह्या जगाविषयी चिंता करू? पण अशावेळी दुसरा-तिसरा विचार न करता; जे देवपित्याने त्याला सोपवले होते ते तो पूर्णत्वास नेण्यासाठी झटत होता. म्हणजेच तो आपला स्वतःचा विचार न करता ह्या संपूर्ण मानवजातीचा विचार करत होता, व आपल्याला ते त्याने त्याच्या सेवाकार्याद्वारे सिध्द करून दाखवले आहे. हा पित्याबारोबारचा सबंध त्याला मानव जातीपासून दूर न नेता; त्याला मानवाच्या अधिक जवळ आणले आहे. असे म्हणतात की, जे मानवाच्या अधिक जवळ असतात; म्हणजेच जे इतरांच्या हलाखीच्या वेळी त्यांच्या जवळ असतात तेच देवाच्या हृदयाजवळ असतात.
          तिसरे म्हणजे प्रभू येशूला जाणीव होती की, कोणी एक त्यांच्या मधला त्याचा विश्वासघात करणार आहे. तरी हे सत्य ठाऊक असतांना देखील त्याचा मानवाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला नाही किंवा त्यांच्यावर तिरस्काराची भावना ठेवली नाही, तर उलट त्याने त्यांच्यावर दया केली व अधिक प्रीती केली कारण तो प्रीतीने ओतप्रोत भरलेला आहे. जितक्या प्रमाणावर मानवजातीने त्याचा तिरस्कार किंवा विरोध केला तितक्याच प्रमाणात त्याचे आपल्यावरचे प्रेम अधिक वाढत गेले.
          शेवटी आपल्याला प्रभूने प्रेम म्हणजे काय हे दाखवून दिले आहे. आणि हे त्याने त्याच्या स्वतःच्या उदाहरणाद्वारे सिद्ध करून आपल्या समोर एक अनुकरण करण्याजोगे उदाहरण ठेवले आहे. आणि ते म्हणजे “प्रीती म्हणजे सेवा करणे होय.” इस्रायली लोकांच्या पद्धतीप्रमाणे ह्या वल्हांडणाच्या महत्त्वाच्या भोजनाला बसण्यापूर्वी घरातील दास हा सर्वांचे पाय धुवत असे. आपणामध्ये मोठा कोण आहे ही स्पर्धा शिष्यांमध्ये चालू होती. ते एकमेकांवर प्रीती करीत नव्हते. फक्त एकच जण जमलेल्या प्रत्येकावर प्रीती करत होता. तोच उठला. तो दास झाला व शिष्यांचे पाय धुवू लागला. असे करताना प्रभू येशूने शिष्यांच्या वृत्तीबद्दल कुरकुर केली. पेत्र दचकला. तरी त्याच्याशी प्रीतीने बोलत येशू पाय धुवत राहिला. त्याने विश्वासघातकी यहुदाचेही पाय धुतले.
          ज्यांचा नवा जन्म झाला आहे, त्यांच्याकडून पाप घडणे शक्य नाही. ते ख्रिस्ताद्वारे शुद्ध होत राहतील. तर त्याच्या आशीर्वादात राहतील, हा धडा प्रभूला पेत्राला शिकवायचा होता. आज आपण आपल्या जगात पहिले; तर परिस्थिती काही वेगळी नाही. आपल्या अवतीभवती आपण अनुभवतो की कित्येक वेळा आपल्याला आपल्या समाजामध्ये मानाचा दर्जा नाही भेटला तर आपण परिस्थती बिकट किंवा वाईट करून टाकतो. व आपल्या कर्तव्यात आपण मागे पाडतो. आपण प्रभू येशूने देलेली आज्ञा किंवा शिकवण विसरतो की, जगात एकाच प्रकारची महानता आहे आणि ती म्हणजे सेवेची महानता. जगात असे कितीतरी लोक आहेत जे उंच दर्जावर उभे आहेत. पण हे विसरून जातात की, येशू सारखी गुडघे टेकून मिळणारी महानता कोणीच प्राप्त करू शकत नाही. लोकांच्या ह्या उंच दर्जाच्या किंवा पदवीच्या लोभामुळे, इच्छेमुळे जगात अशांती पसरलेली आहे. आज आपणाला येशू आपल्या स्वतःच्या उदाहरणातून हे सांगू इच्छित आहे की, जेव्हा आपणाला मोठी पदवी, दर्जा, प्रतिष्ठा, जागा व हक्काचा लोभ होईल; तेव्हा आपण आपल्या डोळ्यासमोर त्याच देव पुत्राचे सेवाधार्माचे प्रतिकृती किंवा प्रतीभिंब ठेवणे गरजेचे आहे. ते म्हणजे तोच देवपुत्र आपले वस्त्र काढून कमरेस रुमाल बांधून, घुडगे टेकून आपल्या शिष्यांच्या पायाखाली बसला आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे ख्रिस्ता तुझ्याप्रमाणे चांगले सेवाकार्य करण्यासाठी आम्हांला तुझी प्रेरणा आणि शक्ती दे.”
१. आपल्या ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप, सर्व बिशप्स व सर्व धर्मगुरू आज धर्मगुरूपदाचा सोहळा साजरा करीत आहेत. प्रभू येशूप्रमाणे चांगले सेवाकार्य करण्याची प्रेरणा आणि शक्ती सर्व धर्मगुरूंना मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
२. पवित्र मिस्साबलिदानास आपल्या कुटुंबात महत्त्वाचे स्थान मिळावे व पवित्र ख्रिस्तशरीरात मिळणाऱ्या येशूच्या कृपेचा व शांतीचा अनुभव आपणास यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
३. आपल्या धर्मग्रामातील धर्मगुरूंना त्यांच्या धार्मिक कार्यात येशूची प्रेरणा, कृपा आणि शक्ती मिळावी, त्याचप्रमाणे जे धर्मगुरू आजारी व वयस्कर आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
४. या प्रायश्चित काळातील शेवटच्या दिवसात आपण पूर्ण मनाने व अं:तकरणाने परमेश्वराकडे वळून आपल्या जीवनाद्वारे प्रेम व सेवा ही ख्रिस्ताची मुल्ये आपल्या कुटुंबात, समाजात पसरावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
५. संपूर्ण जगात कोरोना वायरस मुळे हजारों लोक या रोगास बळी पडले आहेत, आणि बहुसंख्य लोक मरण पावले आहेत. ह्या रोगावर लवकरात लवकर औषधोपचार मिळावा व जे लोक ह्या रोगास बळी पडले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत आणि सर्वत्र चांगले आरोग्य प्रस्तापित व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आज आपण सर्व चिकित्सा क्षेत्रात कार्य करणारे व जे कोरोना ग्रस्त व्यक्तींच्या सेवेत आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निस्वार्थ पणे सेवाकार्यात झोकून घेतले आहे; त्यांना परमेश्वराची कृपा व शक्ती, तसेच त्यांच्या कार्यात त्यांना यश प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
७. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.




No comments:

Post a Comment