Reflections for the Homily of Third Sunday of Easter (26-04-2020)
By Fr. Amrut Fonseca.
पुनरुत्थान काळातील तिसरा
रविवार
दिनांक: २६/०४/२०२०
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१४,२२-३३.
दुसरे वाचन: १ पेत्र १:१७-२१.
शुभवर्तमान: लुक २४:१३-३५.
प्रस्तावना:
भाविक हो शुभ सकाळ
ह्या प्रभू भोजन विधीसाठी आपणा सर्वांचे स्वागत. आज जगाला खऱ्या साक्षीदारांची गरज
आहे. काही लोक सत्य व न्याय जाणून देखील ते बोलत नाहीत. आपल्या भारतातील न्यायालयामध्ये
अनेक खटले चालत आहेत; परंतु न्याय मिळविण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्याचे कारण
म्हणजे; खऱ्या साक्षीदारांचा अभाव. ते सत्य जाणत असतात पण पैशासाठी विकले जातात,
किंवा सत्य सांगण्यासाठी पुढे येत नसतात. आजच्या उपासणा विधीत सहभागी होत असताना;
खरे ख्रिस्ती ह्या नात्याने आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारुया की, दैनंदिन
जीवनात ख्रिस्त मला साक्षीदार होण्यासाठी बोलावत आहे. मी जे पाहिले, बोलले व केले
त्याचा साक्षीदार होतो का? पुनरुत्थान काळ हा ख्रिस्तासाठी साक्षीदार बनण्याचा काळ
आहे. त्याचे खरेखुरे साक्षीदार होण्यासाठी आपण आजच्या उपासना विधीत विशेष
प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन:
प्रेषितांची कृत्ये २:१४,२२-२८.
येशू हाच मसीहा (ख्रिस्त) आहे:
पेत्राची साक्ष तो आपल्या
भाषणाद्वारे स्पष्ट करतो की; येशू जिवंत आहे, तो मसीहा
आहे, तो देवाला
मान्य असलेला व देवाला संतोष देणारा होता.
दुसरे वाचन: १
पेत्र १:१७-२१.
विखुरलेल्या ख्रिस्ती
यहूदी लोकांचा येशूवरील विश्वासामुळे छळ होत होता त्यांना
उत्तेजन आणि धीर देण्यासाठी पेत्र म्हणतो, ‘सोने
देऊन नव्हे, तर ख्रिस्ताच्या मौल्यवान
रक्ताने तुम्ही व्यर्थ वागणुकीपासून मोकळे झाला आहात.
शुभर्वतमान:
लूक २४: १३-३५.
अम्माउसच्या
वाटेवरील नाराज झालेले तसेच मनोबल खचलेले शिष्य अम्माउसच्या वाटेवर होते व
त्यावेळेला ते पुनरुत्थित ख्रिस्ताला भेटण्याच्या अपेक्षित नव्हते. आजपर्यंतच्या शिकवणीवरून
मसिहा दु:ख सोसून गौरवीला जावे असे शक्य नव्हते. त्यांचे गोंधळलेले मन शांत
होण्यासाठी ख्रिस्त जुन्याकारारात त्याच्याविषयी- म्हणजेच त्याचे दु:खसहन, मरण व
पुनरुत्थान- जे शिकवलेले होते त्याचा अर्थ सांगतो. पवित्र शास्त्राच्या उलघडा
केल्याने त्यांना नवा प्रकाश मिळतो व ते येशूला भोजन समयी ओळखतात.
आपल्या आध्यात्मिक निष्काळजीपणामुळे
आपण
पवित्र मिस्साबलीदानात जिवंत ख्रिस्ताला ओळखू शकत नाही.
पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहण्यासाठी फक्त शारिरीक डोळे पुरेसे नसून
त्यासाठी विश्वासातला स्पष्टपणा, आध्यात्मिक
जबाबदारी आणि दैवी प्रकाश्याची गरज आहे.
प्रवचन :
“अम्माऊसच्या वाटेवरील आम्ही साक्षीदार.”
(Christ At Emmaus by Rembrandt, 1648, Louvre)
“जगाला संजीवनाची मानव नवजीवनाची सुवार्ता येशूची ...”
भाविकहो संजीवनाची, नवजीवनाची,
पुनरुस्थित ख्रिस्ताची सुवार्ता घोषित करण्यासाठी व त्याची साक्ष देण्यासाठी आजची
उपासना आपणास पाचारण करत आहे.
रेमब्रांत नावाच्या एका डच चित्रकाराने
ख्रिस्त प्रभू आपल्या दोन शिष्य बरोबर टेबलावर जेवावयास बसल्याचे सुंदर चित्र
चित्तारले. ते चित्र इतक प्रभावी, बोलकं व आकर्षक होतं की पाहणारा तिथेच खिळून उभा
राही. हे चित्र वास्तूसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवले होते. वास्तूसंग्रहालयात
भेट देण्यास येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन करण्याठी नेमलेला मार्गदर्शक,
रेमब्रांत ह्या चित्रकाराने चित्तारलेल्या चित्रावर विवेचन करत होता, जे आजच्या
शुभवर्तमानात आपण वाचले व एकले. भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये एक जोडप होतं श्री व
श्रीमती ब्राऊन ज्यांचा एकुलता एक मुलगा अपघातात मरण पावला होता, त्यांच्यावर
दु;खाचा डोंगर कोसळला होता, त्यांचे अं:तकरण जड झाले होते त्या दु:खातून
सावरण्यासाठी ते ह्या प्रदर्शनात सहभागी झाले होते. परंतु त्यांचे मन ठिकाणावर
नव्हते, म्हणून त्यांचे मार्गदर्शन करणाऱ्यांच्या बोलण्यावर लक्ष नव्हते, परंतु
ज्यांनी मन लावून एकले ते सर्व भारावून गेले, आणि त्याचे कौतुक केले आणि म्हणाले
आम्ही अगोदर सुद्धा ह्या चित्रा बद्दल एकले होते परंतु तुमचे विवेचन खूप बोलके
होते व तुम्ही आत्मविश्वसाने बोलत होता हे कसे?
तो मार्गदर्शन करणार बोलू लागला एक काळ होता
मी सुद्धा ह्या चित्राचे व्यवस्थित विवेचन करू शकत नव्हतो, मग तुमच्यात बदल कसा
झाला? त्याला ब्राऊन जोडप्याने प्रश्न केला. गेल्या तीन वर्षा अगोदर तो मार्गदर्शक
बोलला माझी पत्नी कॅन्सरच्या असाध्य रोगाच्या विळख्यात सापडली, तिला खुप त्रास सहन
करावा लागला, तिचे खुप हाल झाले आणि हळू-हळू तिची प्राणज्योत मावळली. तिच्या त्या
अतीव दु:खात आणि अकाली मरणात मला जीवनाचा काहीच अर्थ कळला नाही मी पूर्णतः कोलमडून
गेलो, उध्वस्त झालो. माझी पत्नी खूप सालस, सज्जन व धर्मिक वृत्तीची स्री होती,
तिच्या वाट्याला हे दु:ख का यावे हे विचार सतत मला टोचत होते आणि मी फार खचून
गेलो, मी देवाला आणि दैवाला दोष देत होतो. माझ्या हृदयाचे तुकडे-तुकडे झाले होते.
माझ्यासाठी जगाचा व जीवनाचा अंतच झाला. का जगावे? कुणासाठी जगावे? मला काहीच कळत
नव्हते, माझ्या पत्नीच्या मरणाच्या विचाराने मला वेडं केलं होतं, अश्याच दु:खात
असताना मला इथे ह्या वास्तूसंग्रहालयात पुन्हा कामावर रुजू व्हावे लागले, आणि
पुन्हा मी ह्या चित्राची गोष्ट लोकांना सांगू लागलो, परंतु त्या मध्ये काय रस
नव्हता.
काही दिवसांनी मला दृष्टांत झाला की मी
जी कथा सांगतो ती अम्माउसच्या वाटेवरील त्या दोन दु:खी, हतबल, निराश व उदास
शिष्यांची नसून माझ्या स्वतःची आहे. माझा माझ्या खिस्तावर, पुनरुस्थानावर विश्वास
आहे. खिस्त सतत माझ्या बरोबर माझ्या सावली प्रमाणे आहे. पवित्र शास्राचे प्रत्येक
पान देवाच्या प्रेमाची साक्ष देत आहे. ख्रिस्त फक्त बायबलच्या पानात नाही; तो
माझ्या बरोबर आहे. असा विश्वास असून सुद्धा मी उदास आणि खिन्न झालो. परंतु देवाच्या
दैवी दयेने आणि कृपेने मला स्पर्श केला व मला त्या पुनरुस्थित जिवंत ख्रिस्ताचा
जीवनात अनुभव आला. एखादा मित्र ज्याने आपल्या जीवनात दु:ख, कष्ट, वेदना व यातना
सहन केल्या आहेत तो मझ्या बाजूला आहे. बोलत आहे व माझे सांत्वन करत आहे. मला धैर्य
देत आहे. अश्या वेळेला माझे डोळे सताड उघडले. मी वेगळ्या दृष्टीने पाहू लागलो. मला
जीवनाचा अर्थ कळाला. माझ्या हृदयात आतल्या आत उकळी फुटू लागली. आणि जस-जशी मी ह्या
चित्राची कथा सांगायाल सुरुवात केली; माझ्यामध्ये नवचैतन्य, नवी ऊर्मी, नवी आशा
निर्माण झाली. मला आरोग्यदायी स्पर्श झाला, व माझ्या जीवनातील हरवलेला आनंद मला
पुन्हा मिळाला. तो ख्रिस्त माझ्यात आहे. जिवंत आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. मी एक
सुवर्तिक आहे. ब्राऊन जोडपे मन लावून, लक्षपूर्वक त्याचे बोलणे एकत होते व
त्यांच्या डोळ्यातून अश्रू धारा गळत होत्या. आता ह्या अश्रू धारा मात्र दु:खाच्या
नव्हत्या तर, आशेच्या, कृपेच्या, आशीर्वादाच्या, होत्या. एक साक्षीदार बनण्याच्या
व सुवर्तिक होण्याच्या.
‘अम्माउसच्या वाटेवर येशूच्या
शिष्यांना येशूची भेट’ ही घटना एका साध्या प्रसंगापेक्षा अधिक
महत्वाची आहे. ही घटना आपल्याला येशूचे जीवन, मरण व पुनरुत्थानाविषयी
माहिती देते. ज्याप्रकारे भाकर मोडल्याने त्यांचे डोळे उघडले तसेच मिस्साबळीदानामध्ये
आपल्याला येशूचे पूर्ण अस्तित्व जाणवते. परंतु मिस्साबळीदान अथवा
आपली उपासना ही येशूला त्या पवित्र भाकारीद्वारे स्विकारण्याने
पूर्ण होत नाही तर, जेव्हा आपण मिस्साबळीदानात
ख्रिस्ताला सेवन करतो तेव्हा आपण आपल्या प्रभुशी व शेजाऱ्यांशी
एकरूप झाल्याची भावना आपल्यात निर्माण झाली पाहिजे. तसेच ज्याप्रकारे शिष्यांना
पुनरुत्थित ख्रिस्ताची ओळख पडताच ते ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी येरुशमेला
परतले तसेच; प्रत्येक उपासनेत अथवा मिस्साबलीदानात
आपण अनुभवलेल्या ख्रिस्ताची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचविण्यास आपण
प्रयत्न केले पाहिजेत.
बऱ्याच वेळी आपल्याला आपल्या
प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही. अथवा आपल्या अपेक्षा पूर्ण
होत नाहीत. अश्या वेळी हार किंवा अपयश मानून
मागे फिरण्याएवजी, प्रथम आपल्या अपेक्षा, प्रार्थना व विनंत्या
पडताळून त्या योग्य, निस्वार्थी व गरजेच्या आहेत का? हे पाहून त्यांना बदलण्यात
आपले हित आहे.
पुनरुस्थित ख्रिस्त आजच्या उपासनेद्वारे
आपणास साक्षीदार होण्यास बोलावत आहे. आपण सुद्धा अम्माउसच्या वाटे वरील शिष्य आहोत.
आपले डोळे सताड उघडे ठेवू या.पुनरुत्थित ख्रिस्ताला आपण ओळखू या. त्याची साक्ष
जगाला देऊ या. आपल्या अत:करणात ख्रिस्ताला जागा देऊ या. म्हणजे त्याला आतल्या आत
उकळी फुटेल. कोरोना जीवाणूच्या रोगाने आपल्याला ह्या क्षणभंगुर जीवनाची जाणीव करून
दिली आहे. आपले हृदय खूप गोष्टींसाठी तडफडत होते आणि आहे. परंतु जर; जीवनात देवाचे
अस्तित्व नसेल, ओढ नसेल, तर, जीवन शून्य आहे. हे ही आपण उघड्या डोळ्यांनी पहिले
आहे.
पुनरुस्थित ख्रिस्ताने आपल्यात नवचैतन्य
निर्माण करण्यासाठी, हरवलेला आनंद पुन्हा मिळवून देण्यासाठी, निराश व हतबल जीवनावर
मात करण्यासाठी व त्याच्या पुनरुस्थानाचे साक्षीदार बनण्यासाठी, सुवार्तीक होण्यासाठी
आपणास प्रेरणा मिळावी म्हणून ह्या बलिदानात विशेष कृपा, मदत व आशीर्वाद मागूया....तथास्तु.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “करितो मी याचना ऐकावी
प्रार्थना.”
१. आज आपण आपल्या ख्रिस्त सभेसाठी प्रार्थना करूया की, ह्या कोरोना
विषाणूच्या वेळी आपण चर्चला जात नाही. परंतु, देवाच्या अधिक समीप आहोत. देवाने
आपले परमगुरु फ्रान्सिस, कार्डिनल्स, महागुरू, धर्मगुरू, तसेच सर्व श्रद्धावंतांना
आशीर्वादित करून, सुखी-समाधानी व नीरोगी ठेवावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण आपल्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्स,
नर्सेस, व इतर सेवक सेविका ह्यांनी आपले जीव धोक्यात घालून रोग्यांची सेवा करत आहेत.
त्यांना परमेश्वराचा विपुल असा आशीर्वाद व त्यांच्या कुटुंबीयांवर सुद्धा यावा,
तसेच सर्व धोक्यांपासून त्यांचे संरक्षण व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपण आपल्या सार्वजनिक हितासाठी कार्य करणाऱ्या लोकांसाठी
प्रार्थना करुया की, विशेष म्हणजे पोलीस अधिकारी, साफसफाई करणारे कामगार, रोजचा
आहार पुरवणारे सेवक-सेविका, इत्यादी ह्यांना परमेश्वर सदोदित त्यांच्या बरोबर राहू
दे, त्याचप्रमाणे आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य करावे, उदार हस्ते मदत करण्याची
सुबुद्धी आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपण आपल्या राजकीय पुढाऱ्यांसाठी प्रार्थना करूया की, या
अडचणीच्या काळात विशेष म्हणजे कोरोना सारख्या महामारीच्या काळात महत्त्वाचे निर्णय
घेऊन लोकांचे संगोपन केले जावे, गोरगरिबांना आसरा दिला जावा, व त्यांना आणि
त्यांच्या कुटुंबियांना सदोदित तुझ्या प्रेमाच्या मायेखाली ठेवावे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
५. हे प्रभू आम्ही सर्वजण महामारीत अडकलेले आहोत. आमच्या मनात अनेक
शंका-कुशंका निर्माण होतात. आमच्या विश्वासाला तडा जाण्याची शंका नाकारता येत नाही.
तुझ्या अधिकाधिक जवळ येऊन तुझ्यावरच आमची श्रद्धा वाढव हा वरदहस्त आम्ही तुझ्याकडे
मागतो म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि व्ययक्तिक
हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment