Sunday, 5 April 2020


Reflections for the Easter Vigil (12-04-2020) By Br. Brian V. Motheghar.





पुनरुत्थान रविवार
जागरण विधी



दिनांक: १२/०४/२०२०.
पहिले वाचन: उत्पत्ती १:१-२,२.
दुसरे वाचन: उत्पत्ती २२:१-१८.
तिसरे वाचन: निर्गम १४:१५-१५:१.
चौथे वाचन: यशया ५४:५-१४.
पाचवे वाचन: यशया ५५:१-११.
सहावे वाचन: बारुख ३:९-१५.३२-४:४.
सातवे वाचन: यहेज्केल ३६:१६-२८.
आठवे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-११.
शुभवर्तमान: मत्तय २८:१-१०.







आजच्या ह्या विधीचे चार भाग आहेत:
पहिला भाग: प्रकाश विधी:- पुनरुत्थित येशू जगाचा प्रकाश आहे हे आपण घोषीत करतो.
दुसरा भाग: प्रभुशब्दविधी:- येथे जुन्या व नवीन करारातील निवडक वाचने, जगाच्या सुरूवातीपासून देवाने मानवावर प्रेमाचा वर्षाव केला, त्याची आपणाला आठवण करून देतात.
तिसरा भाग: पाण्याला आशीर्वाद:- येथे बाप्तिस्म्यासाठी लागणाऱ्या पाण्याला आशीर्वाद दिला जातो. पुनरुत्थानाचे पहिले गोड फळ म्हणजे बाप्तिस्मा. ख्रिस्तामध्ये आपला बाप्तिस्मा होणे हा देवाचा अनन्य साधारण आशीर्वाद आहे.
चौथा भाग: ख्रिस्तशरीर स्विकारविधी:- येथे आपण ख्रिस्तशरीर स्विकारविधी साजरा करतो. स्वर्गीय भोजनाची चव ह्या ठिकाणी आपण घेतो.
           
प्रास्ताविक:
          प्रिय ख्रिस्ती मित्रांनोया पवित्र रात्री आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळविला. या शुभप्रसंगी ख्रिस्तसभा साऱ्या जगातील तिच्या मुलांना जागरण व प्रार्थना करण्यासाठी एकत्र बोलावित आहे. हा प्रभूच्या वल्हांडणाचा दिवस आहे. प्रभूचे शब्द ऐकून व त्याची दिव्य रहस्ये साजरी करून त्याच्या मृत्यूचे व पुनरुत्थानाचे आपण पुण्यस्मरण केले; तर त्याच्या मरणावरील विजयात आपणाला खात्रीपूर्वक सहभाग मिळेल व त्याच्याबरोबर शाश्वत जीवन जगता येईल. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जीवन-मृत्यू ओलांडून; वेळ-स्थळ ह्याच्या पलीकडे जाऊन; वल्हांडनाच्या सणाला नवीन अर्थ प्राप्त करून दिला आहे. आता हाच प्रभू येशू ख्रिस्त ह्या वल्हांडन सणाचा मध्यभाग आहे.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: उत्पत्ती १:१-२,२.
          उत्पत्तीच्या पुस्तकातील सुरुवातीच्या भागात देव कोण आहे? त्याचा जगाशी संबंध काय व कसा आहे? हे स्पष्ट केले आहे. सर्वकाही त्याचसाठी व त्याच्याद्वारे अस्तित्त्वात आहे. दहा दिव्य आज्ञांनी सहा दिवसांच्या काळात निर्मीतीची कृत्ये घडून आली. एक ते तीन दिवस आणि चार ते सहा दिवस यांच्यात काही अनुरुपता आहे. अखेरीस सातव्या (शब्बाथ) दिवशी त्याने विसावा घेतला.
          सहाव्या दिवशी सर्व उत्पत्तीचा मुकुटमणी असा मानव ‘नर व नारी’च्या रूपाने निर्माण केला; तेव्हा उत्पत्तीचे हे कार्य शिगेस पोहचले. देवाच्या उत्पत्तीच्या कार्यात मानवाची निर्मीती ही सर्वांत श्रेष्ठ कृती आहे; हे त्यांची निर्मीती व भूमिका यांविषयीच्या विस्तृत विवेचनावरून स्पष्ट होते. (१:२६-२९) "हा वृत्तांत वाचला तर त्यातून पृथ्वीवरील मानव जीवना विषयीची उत्कट कळकळ दिसते. सृष्टी निर्मीतीसंबंधीचे इतर प्राचीन पौर्वात्य वृत्तांत आहेत त्यांच्याशी तुलना करता, मानवी हिताची कळकळ अधिक उठून दिसते. देव फक्त एक आहे. तो काळातीत आहे. तोच आदि आहे. त्याने सर्वकाही उत्पन्न केले. इतर लोक ज्यांना दैवत समजत, ते सूर्य, चंद्र आणि तारे हेही त्याने उत्पन्न केले. त्याचा केवळ एक शब्द हे सर्व साधण्यास समर्थ होता. उत्पत्तीमधील वृत्तांतानुसार देव एकच आहे, तोच सार्वभौम उत्पन्नकर्ता आहे. निर्माण केलेल्या विश्वामध्ये स्त्रीपुरुषांना मानाचे स्थान आहे. कारण देवाने त्यांना दिव्य प्रतिरुपाचे असे निर्माण केले आहे. आम्ही देवाचा भाव प्रतिबिंबित करतो आणि या पृथ्वीवर आम्ही त्याचे प्रतिनिधी आहोत.

दुसरे वाचन: उत्पत्ती २२:१-१८.
          उत्पत्तीच्या पुस्तकातील ही एक अतिशय नाट्यमय घटना आहे. ईश्वरपरिज्ञानाच्या दृष्टीनेही ही घटना विशेष महत्त्वाची आहे. इसहाकचे यज्ञार्पण करण्याची निष्ठुर आज्ञेप्रमाणे, अब्राहामने आपल्या मुलाला घेऊन यज्ञार्पणाच्या जागी जड अंत:करणाने वर चढून जाणे, यातील कारुण्य, इसहाकला यज्ञपशूसारखे बांधून वेदीवर ठेवताना अब्राहामची झालेली अवस्था, त्याच्या अंत:करणाला होणाऱ्या वेदना आणि अगदी निर्वाणीच्या क्षणी स्वर्गातून हस्तक्षेप होऊन आनंदी-आनंद यामुळे जागतिक वाङ्मयात या वृत्तांताला उत्तमपणे सांगितलेली कथा म्हणून मानाचे स्थान मिळाले आहे. पण एवढेच याचे महत्त्व नाही. अब्राहामच्या विश्वासाची ही अखेरची सत्त्वपरिक्षा आहे. ही कसोटी होती असे आपणाला सांगितले असले, तरी अब्रामच्या दृष्टीने ही वास्तविक देवाची आज्ञा होती आणि ती पाळायची होती. भावनात्मक दृष्टीने आणि ईश्वरविज्ञानाच्या दृष्टीनेही ती अतिशय धक्कादायक होती, कारण आशीर्वादांची सर्व अभिवचने पूर्ण होणे इसहाकवर अवलंबून होते.
          एकीकडे अपत्यप्रेम आणि दुसरीकडे देवाचे आज्ञापालन अशा कात्रीत सापडलेल्या अब्राहामला काही सुचेना. काहीही केले तरी द:ख ठरले. पण टप्प्याटप्प्याने विश्वास व आशायांचा विजय झाला. भय आणि संशयाचे सावट हळूहळू दूर झाले आणि अखेर त्याने मुलाचा वध करण्यासाठी सुरा उगारला. दुसरा कोणताही विचार, भावनिक बंधन, ध्येये वगैरेसर्व बंध बाजूस करून आपण देवाच्या आज्ञेलाच सर्वस्वी महत्त्वाचे मानतो हे त्याने दाखवून दिले आणि त्याचक्षणी ही कसोटी संपली. तो या कसोटीत उत्तमप्रकारे उत्तीर्ण झाला. इसहाकच्या ऐवजी एका एडक्याचे अर्पण केले. अब्राहामने केलेल्या या कठोर आज्ञापालनामुळे अभिवचनांचा दर्जा बदलण्याचे देवदुताने त्याला जाहीर केले.

तिसरे वाचन: निर्गम १४:१५-१५:१.
          वल्हांडणापर्यंत घडलेल्या घटनांचे चक्र आणि प्रस्तुत भाग यात बरेचसे साम्य आहे. येथे पुन्हा काही ओळखीचे मुद्दे पुढे येतात. फारोचे मन कठीण होणे, मोशेच्या हातातील काठी समुद्रावर उगारणे आणि इजिप्तचे लोक व इस्राएल लोक यांच्यात देवाने केलेला भेद. इस्राएल लोक इजिप्तमधून बाहेर पडले. फारो आणि इजिप्तचे सैन्य सर्वच नष्ट झाले. येथे निर्गमच्या पुस्तकातील पूर्वार्धाचा उत्कर्षबिंदू गाठला आहे. पण अद्याप देवाच्या सामर्थ्याची आणखी एक अंतिम प्रचिती दिसायची होती, म्हणून देवाने इस्राएल लोकांचे कनानच्या दिशेने जाणे लांबवले. ते इजिप्तमध्ये तांबडया समुद्राच्या पश्चिम बाजूस राहिले. फारो आणि त्याचे सैन्य झपाटयाने पुढे आले. त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या दासांना गाठले. आता आपली पुरती फजिती झाली, आपण सापळ्यात सापडलो असे समजून इस्राएल लोक घाबरून गेले. परंतु मोशेने आपल्या हातातली काठी समुद्रावर सरळ पुढे धरली. समुद्राचे पाणी दुभंगले आणि मधील मोकळ्या वाटेने लोक सुखरूप पलीकडे गेले. इजिप्तचे लोक त्यांच्यामागे आले तेव्हा मोशेने आपला हात पुन्हा पुढे केला. फारो आणि त्याचे सैन्य यांच्यावर पाण्याचे लोटच्या लोट आले. त्यातला एकही वाचला नाही.

चौथे वाचन: यशया ५४:५-१४.
          या अध्यायातील उत्कर्षशांती आणि सुरक्षितता याचे वर्णन केलेले आहे. स्वगृही परत येण्याचे थोर वर्णन केले आहे. पौलाला सारा आणि हागार त्यांच्यात त्याला खरी मंडळी दिसली. तिच्या सभासदांचा जन्म वरून झाला आहे, जगव्यापी विस्ताराचे अभिवचन आणि जुन्या रचनेवर पडणारा भार या गोष्टी प्रेषितांच्या युगात दृष्टोत्पत्तीस येणार होत्या. बहकलेल्या बायकोचे रूपक, अपार सहानुभूतीने दोष नव्हे तर त्यातील वेदना पूढे आणल्या आहेत. येथे पूर्नमिलनातील जिव्हाळा आहे, जो कायमचा, बिनशर्त आणि योग्यता नसताना पात्र आहे. 
          रत्नखचित नगरी, सौंदर्य आणि सामर्थ्य यांच्या मिलापातून साधलेले मंडळीच्या या लखलखणाऱ्या चित्रापूढे संकुचित डेरा आणि उद्ध्वस्त यरुशलेम कोठल्या कोठे लोप पावतात याचा अधिक विस्तार केला आहे. मात्र याचा अर्थानवाद साध्याशब्दांनी केला आहे. त्यात धार्मिकता, अभेद्यता यांची मुळे वैयक्तिक शिष्यत्वात खोल गेलेली आहेत. शिष्यत्व हे नव्या कराराचे एक लक्षण आहे. देवाच्या नगरीचे खरे सामर्थ्य हेच आहे; तिला हल्ल्यापासून कायमचे प्रतिबंधक संरक्षण दिलेले नाही तर निरुत्तर करणारे सत्य हेच शख तिला दिले आहे.

पाचवे वाचन: यशया ५५:१-११.
          येथे गरजवंतांना व तान्हेल्यांना ज्या आपुलकीने व जिव्हाळ्याने आमंत्रण दिले आहे; ते नव्या करारातही दिसत नाही. या अध्यायाचे विवेचन दोनदा कळसास पोहोचतात. दारिद्रय, विपुलता, कार्यध्येय याचे चौफेर आवाहन सर्व मानवी गरजांना पुरून उरणारे आहे. तसेच हे आवाहन फक्त एकवक्तीही असले तर त्याच्यासाठीही आहे. पवित्र शास्त्राच्या समाप्तीच्या वचनात याचेच पडसाद उमटले आहेत, आणि येशूनेही योहान ६:३५ मधून ‘माझ्याकडे या’ ह्या शब्दांतून 'या... खा' असेच आवाहन केले आहे. 'पैक्यावाचून व मोलावाचून सौदा करा' या विरोधाभासातून कृपेद्वारे प्राप्त होणारी व संपूर्ण अवलंबने हे दोन घटक स्पष्ट होतात.
          निमंत्रण हे वैयक्तिक पातळीवर आहे. मनाला आणि इच्छेला आवाहन करून श्रोत्यांना करारामध्ये आणून मशीहाच्या जागतिक सेवाकार्यात सहभागी करण्याचे निमंत्रण आहे. राष्ट्रे याच मशीहाची प्रतीक्षा करीत आहेत. माणूस भुकेला असला तर त्याची भूक भागवण्याची गरज असते, त्याचप्रमाणे तो दुष्ट आहे त्याला तारणाची गरज आहे. देवाचे पाचारण आणि शोध याला पापी व्यक्तीचा प्रतिसाद हवा. इच्छा, सवयी आणि योजना  यांना आवाहन केले आहे. हे आवाहन नकारात्मक (त्यागकरा) आणि होकारात्मक (वळा) असे आहे.

सहावे वाचन: बारुख ३:९-१५.३२-४:४.
          परमेश्वराकडे परत फिरल्या नंतर जर आपण जो सन्मार्ग निवडला आहे त्याच्यावर चिकाटीने चालत राहिलो, तर आमचे कल्याण होईल. पुनरुत्थानाचा आनंद आम्हाबरोबर निरंतर राहील.

सातवे वाचन: यहेज्केल ३६:१६-२८.
          हा दिव्यसंदेश यहेज्केलच्या पुस्तकाचा केंद्र बिंदू आहे. हा संदेश थोडक्यात या पुस्तकाचा सारांश आहे. रक्तपात व मूर्तीपूजा करून इस्राएलने देवाचा अपराध केला होता, राष्ट्रांमध्ये पांगापांग, बंदिवास हीच या अपराधाची शिक्षा होती. परंतु देव त्यांना तिकडे तसेच वाऱ्यावर सोडून देणार नव्हता. ते त्यांच्या देशात परत येतील. देव त्यांना शुद्ध करील, त्यांचा पालट करील आणि ते त्याच्या मागे चालतील. देश व देशातील लोक यांची पुन्हा भरभराट होईल. देवाने कार्य केले आहे हे भोवतालच्या राष्ट्रांना समजेल. देव आपल्या लोकांना त्यांच्या बंदिवासातून परत का आणणार त्याचे कारण स्पष्टपणे सांगितले आहे. लोकांमध्ये मूळचाच काही चागुलपणा आहे; अगर ते प्रिय वाटावे असे काही त्यांच्यात आहे असेही नाही. आपल्या नावाची नाचक्की होऊ नये ही देवाची इच्छा, हेच ते कारण आहे. देव तारण करण्यासाठी कार्य करतो. पण तो ते आमच्या पात्रतेनुसार नव्हे; तर आपल्या विपुल दयेनुसार करतो.

आठवे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-११.
          ‘जे कृपेच्या राज्यात आहेत ते पापाला मेलेले आहेत.’ या वाक्याचा अर्थ या वचनांत दिलेला आहे. कृपा वाढावी यासाठी पाप करण्याची गरज नाही. आपण कृपेत प्रवेश केला आहे. ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला व जे नीतिमान ठरले आहेत त्यांना उद्देशून पौल 'आपण' हा शब्द वापरतो. आपण आपल्या पापामुळे मेलेले होतो (इफिस २.१). आपण नीतिमान ठरलो असलो तरी आपल्याकडून पाप होण्याची शक्यता आहे. जो ख्रिस्त पापासाठी मेला तो पापालाही मेला (व. १०). तसेच, आपणही पापाला मेलो आहोत (व. २). आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हाच ख्रिस्ताचे मरण, पुरले जाणे व जिवंत होणे या सर्व गोष्टीत ख्रिस्ताशी एकरूप झालो. या कृर्तीना ख्रिस्ताच्या मरणात बाप्तिस्मा घेणे असे म्हटले आहे (व. ३).
          आपला पाण्यात बाप्तिस्मा झाला तेव्हा आपण हे सत्य जाहीर केले. याचा अर्थ असा की, आपल्यावर पापाची सत्ता किंवा राज्य आता नाही. पापाचा व आपला संबंध तुटला आहे. आता ख्रिस्ताचे जीवन आपल्याला प्राप्त झाले आहे व त्या जीवनाने आपण पापाची सत्ता नसलेले नवीन जीवन जगू शकतो. या नवीन प्रकारच्या जीवनाने आपण जगावे व वाटचाल करावी.

पार्श्वभूमी:
इंग्रजीमध्ये विजील (vigil, जागरण, पहारा) ह्याचा अर्थ होतो ‘वॉच’ (watch, लक्ष देणे). लष्करामध्ये पहारेकरी लष्करी छावणीवर नेहमी लक्ष ठेवतात किंवा पहारा देतात. काही वर्षाअगोदर प्रत्येक गावामध्ये दिवसा अन् रात्री आळीपाळीने रखवालदार ठेवला जाई जेणेकरून गावाचे रक्षण होईल अथवा अनपेक्षितरित्या शत्रू गावावर हल्ला करून तो गाव आपल्या ताब्यात घेत असत.
ख्रिस्तावर विश्वास ठेवाणारा पहिला समुदाय प्रत्येक मोठ्या सणाच्या संध्याकाळपासून संपूर्ण रात्रभर जागरण करत असे परंतु हे जागरण भीतीमुळे किंवा कशाचाच पहारा करण्यासाठी नव्हते; तर उलट ते कोणाच्यातरी येण्याची आशेने व उत्कंठतेने वाट पाहत असत. ज्याची ते वाट पाहत तो व्यक्ती म्हणजे येशू ख्रिस्त होय. ख्रिस्ती समुदाय एकत्र जमून संपूर्ण रात्रभर पवित्र शास्त्र वाचण्यात, त्याचा खुलासा करून त्यावर मनन-चिंतन करण्यात व प्रभूची प्रार्थना व स्तुती-आराधना करण्यात घालवत असत व हे जागरण पहाटे ख्रिस्ताच्या बलिदानाच्या आठवणीने म्हणजेच ख्रिस्तयागाने संपवत असत.
वर्षातील सर्वात महत्वाचं जागरण ते येशूच्या पुनरुत्थानाच्या दिवशी करत असत, त्याला पास्काच जागरणम्हणून ते संबोधित असत. ख्रिस्ती समुदायाने हे नाव आणि त्याची तारीख यहुदी लोकांच्या वल्हांडण सणावरून घेतली आहे. परंतु याहुद्यांपेक्षा ख्रिस्ती जनतेला हा सोहळा सखोल अर्थाचा व अधिक महत्वाचा आहे. यहुद्यांसाठी वल्हांडण म्हणजे परमेश्वराच्या दूताने मिसर देशातील घरांना ओलांडून जाणेआणि यहुद्यांची घरे सुरक्षित ठेवून मिसर देशात जन्मलेल्या माणसांपासून तर गुराढोरांपर्यंत प्रथमवत्स्याचा वध करणे तसेच फारोच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन परमेश्वराने कबूल केलेल्या देशात निघून जाणे. परंतु ख्रिस्ती लोकांसाठी वल्हांडण म्हणजे येशूचे मरणातून पुनरुत्थानाकडे वाटचाल, जणूकाही तिमिरातून तेजाकडे आणि दु:खातून-सुखाकडे. ह्याच घटनेमुळे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती मरणातून पुनरुत्थानाकडे व पापातून नवीन जीवनाकडे वाटचाल करतो.

शुभवर्तमान: मत्तय २८:१-१०. 
यहुदी लोक मृतांना काळजीपूर्वक पुरत असत. मृतांना कपड्यामध्ये कश्याप्रकारे गुंडाळायचे, विशेषप्रकारचा मलम कसा वापरावा जेणेकरून शरीराचा ऱ्हास होण्यापासून किंवा सडण्यापासून बचाव कसा करता येईल हे सर्वकाही ते मिसरवासियांकडून (इजिप्तच्या लोकांकडून) शिकलेले होते. श्रीमंत लोक फार मोठी रक्कम खर्च करून त्यांच्या घरच्यांना पुरण्यासाठी हे सर्वकाही करत असत.
येशू ख्रिस्त गरीब होता, त्याच्याकडे अशाप्रकारची उत्तरक्रिया करावयास पैसे नव्हते, पुरण्यासाठी त्याच्याकडे स्वतःची कबर देखील नव्हती. परंतु शुभवर्तमान सांगते की निकदेमस नावाच्या श्रीमंत माणसाने (जो येशूचा गुपीत अनुयायी होता: योहान ३:१-२१) सुमारे शंभर रत्तल मिश्रण आणले जेणेकरून यहुद्यांच्या उत्तरक्रियेच्या रितीप्रमाणे येशूची उत्तरक्रिया होईल (योहान १९:३९). ज्यादिवशी येशू मरण पावला तो शुक्रवार होता आणि त्याची उत्तरक्रिया करावयास त्यांच्याकडे पुरेसा वेळ नव्हता कारण (वल्हांडण सणाच्या) तयारीचा दिवस सुरु होणार होता (लूक २३:५४, मार्क १५:४२) आणि अश्याप्रकारचे कोणतेही कामे करण्याची नियमशास्त्रानुसार परवानगी नव्हती (निर्गम १६:२३, २०:८, ३१:१४, अनुवाद ५:१२), म्हणून ते तसेच घाईमध्ये परंतु पुन्हा शब्बाथ संपल्यानंतर येऊन नीट पुरण्याच्या आशेने येशूला कपड्यामध्ये गुंडाळून जातात.
शब्बाथानंतर पहिल्याच दिवशी म्हणजेच सूर्याची पहिली किरणे दिसताचभल्या पहाटे स्त्रिया कबरेवर जाण्यासाठी निघतात, परंतु तेथे पोहचताच त्यांना कबर रिकामी सापडते. येशू पुनरुत्थित झाला आहे हे त्या कबरेवर बसलेला दूत त्यांना सांगतो व कशाप्रकारे येशू ख्रिस्ताने त्याचे दु:खसहन, मरण व पुनरुत्थान ह्याविषयी सांगितले होते व त्याची पूर्तता कशी झाली हे त्यांच्या मनी आणुन दिले (मत्तय १६:२१, १७:२३, २०:१९, २६:३२, लूक २४:७). हे दृश्य येथेच संपत नाही. त्या स्त्रिया परतत असताना येशू त्यांना दर्शन देतो. ते म्हणजे“ही शुभवार्ता स्वत:पुर्ताच न ठेवता इतरांना देखील सांगा” (मत्तय २८:७, २८:१०).

येशूच्या पुनरुत्थानाची सूचकता किंवा अर्थपूर्णता:
(१). पुनरुत्थान सिद्ध् करते की येशू देवाचा पुत्र होता: येशू म्हणाला होता की कोणालाही जीवन देण्याचा आणि तो घेण्याचा अधिकार त्याला आहे’ (योहान १०:१७-१८). 
(२). पवित्र ग्रंथात असलेल्या सत्याची पुष्ठता करते (सिद्ध् करते): जुन्या करारात आणि येशूच्या शिकवणुकीत येशू पुनरुत्थानाविषयी अचूक शिकवण देतो (स्त्रोत्रसंहिता १६:१०, ११०:१). जर येशू कबरेतून बाहेर आला नसता तर धर्मग्रंथ किंवा पवित्रग्रंथ खोटा ठरला असता.
(३). येशूचे पुनरुत्थान, आपले पुनरुत्थान निश्चित करते: येशू मरण पावला व पुन्हा उठला, त्याचप्रमाणे आपणदेखील त्याच्याबरोबर उठविले जाऊ (१ थेस्सलनिकाकरांस पत्र ४:१३-१८). ख्रिस्ती श्रद्धा ही येशूच्या पुनरुत्थानावर बांधली आहे. जर आपण पुनरुत्थान वगळले, तर आपणाकडे काहीच आशा उरत नाही.
(४). भविष्यात होणाऱ्या न्यायाच्या हे प्रमाण (पुरावा) आहे: “त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे, त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे” (प्रे. कृत्ये १७:३१).
(५). ख्रिस्ती जीवन जगण्यास सामर्थ्य/ शक्ती देते: आपण आपल्या स्वतःच्या बळावर परमेश्वरासाठी जगू शकत नाही परंतु आपण स्वीकारलेल्या त्याच्या (येशूच्या) मरणातील बाप्तीस्म्याने आपण येशुमध्ये पुरले जाऊ व त्याचा पुनरुत्थानाने परमपित्याची इच्छा व त्याचा गौरव आपल्या जीवनाद्वारे इतरांस दाखवू शकू (रोमकरांस पत्र ६:४). 

मनन चिंतन: 
“ख्रिस्त आज विजयी झाला मरना जिंकूनी या उठला!”
          पुनरुत्थित ख्रिस्ताच्या रहस्यात सहभागी होणाऱ्या माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, आज ही रात्र आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची व जल्लोषाची आहे. कारण आजच्या ह्या रम्य, निदान रात्रीत आपला तारणारा मृत्यूवर मात करून मरणातून उठला आहे. कबरे वरून धोंड बाजूला सारली गेली आहे. शुभ शुक्रवारच्या अंधारा नंतर पास्काची पहाट उगवली आहे. आपल्या श्रद्धेनुसार सत्य हे कधीच कबरेत राहू शकत नाही. असत्याची सर्व बंधने तोडून सत्य हे आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपात पुनरुत्थित झाले आहे. आपल्या पुनरुत्थानाद्वारे प्रभू येशू हा जगाच्या स्थळ-काळ मर्यादेपलीकडे गेला आहे. मृत्यु हा ख्रिस्ती जीवनाचा पूर्णविराम नसून, तो एका खऱ्या जीवनाचा प्रारंभ आहे. तेव्हा शुभ शुक्रवाराला अर्थ आहे, तो म्हणजे पास्काच्या प्रकाशात, पुनरुत्थित प्रभूच्या प्रकाशात. म्हणूनच पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त हा आदी आणि अंत आहे. प्रारंभ आणि शेवट आहे. आपल्या जीवनाचा पाया आणि कळस आहे. म्हणून हि रात्र आम्हा सर्व श्रद्धावंतानसाठी एक आनंदाची, जल्लोषाची रात्र आहे. ही रात्र वैऱ्याची नव्हे; तर प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची आहे.
          आपण जर आजच्या प्रभूशब्दविधीवर नजर टाकली; तर आपल्याला प्रत्येक वाचनात प्रभूची कीर्ती किती महान आहे हे आढळते. पहिल्या वाचनात आपल्याला आढळते की, उत्पत्ति किंवा निर्मितीद्वारे परमेश्वराने आपल्या अस्तित्वाची कशी निर्मिती केली हे आपल्या निदर्शनास येते. दुसऱ्या वाचनात इसाहाकाच्या अर्पणाद्वारे आपल्याला नवीन करारात येणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या अर्पणाचे, त्याच्या प्रचितीचे व त्याच्या बाबतीत घडणार्‍या घटनांचे वर्णन केलेले दिसून येते. या वाचनात इसहाक आपल्या बापाला प्रश्न विचारतो की, “होमार्पनासाठी कोकरू कोठे आहे?” त्याचे उत्तर आपल्याला नव्या करारात बाप्तिस्मा करणारा योहान देतो, “हे पाहा, देवाचे कोकरु, जगाचे पाप हरण करणारे.” (योहान १:२९,३६) तिसऱ्या वाचनात आपल्याला इस्रायली लोकांना परमेश्वराने फारोच्या गुलामगीरीतून कसे वाचवले व मोशेद्वारे समुद्र कसा विभागला याविषयी सांगण्यात आले आहे. याद्वारे आपल्याला समजते की, परमेश्वर त्याच्या निवडलेल्या प्रजेवर किती प्रेम करतो.
          चौथ्या वाचनात परमेश्वर व आपले संबंध हे यशया संदेष्टा एका पती-पत्नी प्रमाणे आहेत असे दर्शवितो. ज्याप्रमाणे प्रियकर व प्रेयसी एकमेकांच्या प्रेमात गुंतलेले असतात, त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. जरी आपण त्याच्यापासून दूर गेलो; तरी तो आपल्या मागे येऊन आपला हात थांबवत असतो. पाचव्या वाचनात आपल्याला परमेश्वराच्या अस्सीम प्रेमाचा अनुभव येतो. सहाव्या वाचनात आपल्याला परमेश्वर कोण आहे? इस्राएली लोकांनी परमेश्वराच्या आज्ञांना का ओळखले नाही? हे सांगण्यात आले आहे. सातव्या वाचनात आपल्याला दिसून येते की, इस्रायली लोकांनी कशाप्रकारे परमेश्वराच्या नावाला कलंक लावला, म्हणून त्यांची दानादान झाली. कारण परमेश्वराचे नाव हे सर्वात मधुर नाम आहे. त्यांना दिलेल्या दहा आज्ञांन मधील दुसरी आज्ञा त्यांनी मोडून टाकली होती. त्याच प्रमाणे आपण आपल्या नामाची प्रचीती करतो का? व देवाच्या नावाला कलंक लावतो का? 
          आठवे वाचन हे नव्या करारातील वाचन आहे. जेथे आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये मरण पावलो तरी जीवन आहे, याची खात्री करून दिली आहे. म्हणून तर हा पास्काचा सण हा आपल्यासाठी एक नवीन आशा घेऊन आला आहे. ज्याप्रमाणे आजच्या तिसऱ्या भागात आपण आपल्या बाप्तीस्म्याचे नूतनीकरण करणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचे ख्रिस्तामध्ये नूतनीकरण करण्यासाठी आपल्याला आवाहन किंवा पाचारण केले आहे.
          ह्या सर्व वाचनांचा सारांश किंवा कळस हा आपल्याला आजच्या शुभवर्तमानात आढळतो. ह्या सर्व वाचनांचा कळस हा शुभवर्तमानात पुनरुत्थान झालेल्या प्रभू येशूमध्ये आढळतो. या सर्व वाचनांमध्ये एक दुवा आढळून येते. तो म्हणजे तारण प्राप्तीच्या इतिहासात, परमेश्वराचे मानव जातीवर किती प्रेम आहे. त्याचा कळस हा त्याच्या एकुलत्या एका पुत्राला ह्या भूतलावर पाठवून; त्याच्या क्रूसावरील प्राणार्पणाद्वारे पूर्णत्वास नेला आहे.
          आजच्या शुभवर्तमानावर बारकाईने लक्ष दिले, तर आपल्या मनात काहीक प्रश्न उद्भवतील:
          १) (२८:१) ‘शब्बाथाचा पहिला दिवस उजाडताच मग्दालीया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पाहण्यासाठी आल्या होत्या.’ प्रश्न:- वल्हांडनाचा सण येवढ्या जोरात चालु असताना देखील, ह्या स्त्रिया वल्हांडनाचा सण सोडून कबरेजवळ का आल्या होत्या? कारण यहुदी लोकांना वल्हांडनाचा सण हा खूप महत्त्वाचा सण होता. ह्याचे उदाहरण आपणाला आजच्या तिसऱ्या वाचनात पहावयास मिळते. ह्या स्त्रिया वल्हांडनाचा सण सोडून कबरीजवळ आल्या होत्या; कारण त्त्यांचा ‘वर’ हा आता कबरेत झोपी गेला होता.(मत्तय ९:१५, मार्क २:१९,२०, लुक ५:३५) जर वराती मधला ‘वरच’ नसेल तर जल्लोष कशाचा? आनंद कशाचा? आणि कसला सण? मग्दालीया मरिया कबरेजवळ आली होती; ‘कारण तिची जी पुष्कळ पापे होती त्यांची तिला क्षमा झाली होती.’ (लुक ७:४७) म्हणून आपल्या प्रेमाखातर उदार, कृतज्ञतेने तिने संसाराच्या रूढी-परंपरांचा धिक्कार करून, स्वतःच्या आनंदाचा त्याग करून, परमेश्वराच्या कबरे जवळ आली होती. ज्याने तिला नवजीवनाची गुरुकिल्ली दिली होती. त्याच्या कबरेजवळ, त्याच्या देहाला सुगंधित द्रव्य लावण्यासाठी ती आली होती. जेणेकरून त्याच्या देहाचा वास येऊ नये. ज्याने तिच्या मनात वास केला होता व तिच्या देहाला पापमुक्त करून सुगंधित, पवित्र केले होते.
          २) (२८:२) ‘तेव्हा पाहा, मोठा भुमिकंप झाला.’ ‘धोंड एकीकडे लोटली गेली होती.’ येशूने क्रुरसावर प्राण सोडला तेव्हा सुद्धा भूमीकंप झाला होता. (मत्तय २७:५१) परंतु त्यावेळेस भुमिकंप किंवा धरणीकंप हा सृष्टीचा सृजनहार मरण पावला होता; म्हणून सृष्टी रडत होती. आता भूमीकंप झाला त्यात प्रभू येशू मरणातून उठून, त्याच्याबरोबर दुसरेजण थडग्यात होते त्यांना सुद्धा उठवले होते म्हणून आनंदोत्सव करत होती. ‘धोंड एकीकडे लोटली गेली होती.’ प्रश्न:- धोंड कोणासाठी बाजूला लोटली गेली होती? येशू ख्रिस्ताला बाहेर येण्यासाठी की, आपल्याला आत जाण्यासाठी? येशू ख्रिस्त जो वेळ-स्थळ यांच्या पलीकडे गेला होता, जो शिष्य जेव्हा खोलीत बंद असताना दरवाजाच्या आरपार जाऊ शकला होता. (योहान २०:१९, २६) त्यासाठी का? नाही. तर कबर उघडली होती ती, मग्दालीयाची मरिया व आम्हा सर्व श्रद्धावंतांसाठी. जेणेकरून आम्ही आत जाऊन आपल्या विश्वासाला अधिक दृढ करू की, खरोखर ख्रिस्त हा मरणावर विजय मिळून जिवंत झाला आहे.
          ३) (२८:९) ‘मग पाहा, येशू त्यांस भेटला व त्यांना आज्ञा केली की, जा माझ्या भावांस सांगा की, त्यांनी गालीलात जावे.’ प्रश्न:- देवदुताने सांगितल्याप्रमाणे त्या हर्षानिशयाने गेल्या. मग येशूला त्यांना वाटेत भेटण्याची काय गरज होती? गरज होती, ती म्हणजे देवदूताने सांगितलेल्या गोष्टींची शिक्कामुहूर्त करण्याची, त्यांचा गैरसमज सुद्धा होऊ शकत होता की, ‘तो तिथे नाही! त्याला कोणीतरी चोरले नाही ना?’ (योहान २०:१३) अशा शंकांनी त्या जाऊ नयेत म्हणून त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी व देवाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवण्यासाठी भेट देण्याची गरज होती.
          ‘जा माझ्या भावांस सांगा की त्यांनी गालीलात जावे.’ येशू येथे आपल्या शिष्यांना आता शिष्य नव्हे; तर भाऊ संबोधतो. जे त्याला त्याच्या कठीण व वाईट घटकेस सोडून पळून गेले होते, त्यांना तो आता भाऊ म्हणून संबोधतो. हे आपल्या मानवी विचारसरणी पलीकडे आहे. म्हणून तर ‘परमेश्वराचे विचार हे, आपले नाहीत. त्याचा मार्ग हा आपला नाही.’ (यशया ५५:८) प्रश्न:- गालीलातच का? दुसऱ्या ठिकाणी का नाही? कालवरी, येरुशलेम किंवा इतर ठिकाणी का नाही? असे म्हणतात की, ‘पहिले प्रेम हे खरे प्रेम असते.’ गालील हे असे ठिकाण आहे जिथे येशू ख्रिस्ताला स्विकारण्यात आले होते. कालवरीवर त्याचा धिक्कार करण्यात आला होता. त्या उलट गालीलात येशू त्याच्या शिष्यांच्या पहिल्यांदा प्रेमात पडला. उलट शिष्य येशू ख्रीताच्या प्रेमात पडले. (मत्तय ४:१८-२२; मार्क १:१६-२०; लुक ५:१-११) शिष्यांना पहिले पाचारण गालीलात झाले होते. परंतु ह्याचा आपल्याशी काय संबंध? ह्याचा आपल्या जीवनाशी खोलवर सबंध आहे.
          आपल्याला आपल्या जीवनात कुठे न कुठे परमेश्वराची हाक आली आहे. किंवा आपल्या जीवनाचा असा एक अविभाज्य भाग आहे किंवा क्षण आहे; जिथे आपण परमेश्वराच्या प्रेमात गुंतलेलो होतो. उदाहरणार्थ धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांच्या जीवनातील त्यांचा प्रथम व्रतविधि किंवा गुरुदीक्षाविधी, वैवाहिक जीवनातील लग्नाचा दिवस, ख्रिस्ती जीवनातील बाप्तीस्म्याचा दिवस इत्यादी. हे क्षण आपल्याला शिष्यांप्रमाणे निराशेच्या, संकटांच्या, संशयांच्या वेळी ख्रिस्ताशी एकरूप करत असतात. अशा स्थितीत आपल्याला ख्रिस्त हेच आवाहन करत असतो की, ‘जा तुम्ही तुमच्या गालीलातील अनुभवाकडे जा आणि माझ्या प्रेमाचा आढावा घ्या, माझ्या प्रेमात एकरूप व्हा.’
          आजच्या वस्तुस्थितीत आपल्याला हाच उद्देश करण्यात आला आहे. जगभर कोरोना वायरस सारख्या रोगाने हाहाकार माजला आहे. जेथे आपला प्रभू परमेश्वरावरील विश्वास डळमळत आहे. अशा स्थितीत गालीलाचा अनुभव घेण्यास आज ख्रितसभा आपल्याला बोलवत आहे. म्हणून हा अनुभव तुमच्या पर्यंतच ठेवू नका; तर त्या स्त्रियांप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या पुनरूत्थाचा संदेश इतरांपर्यंत दिला. त्याचप्रमाणे आपण सुद्धा जाऊन जगजाहीर करूया की, आमचा देव हा, ‘आब्राहामाचा, इसाहाकाचा, याकोबाचा देव आहे.’ (निर्गम ३:६,१५ मत्तय २२:३२ प्रे. कृत्ये ७:३२) तो मेलेल्यांचा नव्हे तर मेलेल्यातून उठून जीवंत देव आहे. ज्याप्रमाणे येशूने मरणावर विजय मिळविला त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या दररोजच्या जीवनात येणाऱ्या मरणावर विजय मिळवूया. म्हणजेच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची व आनंदाची शुभवार्ता संपूर्ण जगाला घोषित करू शकू.

(टीप: पुनरुत्थानाच्या रात्रीच्या मिस्सावेळी पश्चातापविधी, प्रस्तावना व श्रद्धावंतांच्या प्रार्थना वगळण्यात येतात.)

तुम्हा सर्वांना पास्काच्या सणाच्या हार्दीक शुभेच्या.




No comments:

Post a Comment