Reflections for
the Homily of Easter Sunday (12-04-2020) By Fr.
Wilson D’Souza.
पास्काचा सण
(सकाळची मिस्सा)
दिनांक: १२-०४-२०२०.
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्यें १०:३४,३७-४३.
दुसरे वाचनः कलस्सैकरांस पत्र: ३:१-४.
शुभवर्तमान: योहान २०:१-९.
विषय: “पुराव्याची नव्हे तर पूर्णत्वाची गरज”
प्रस्तावना:
आज
आपण येशूच्या पुनरुत्थानाचा दिवस साजरा करीत आहोत. आपणास पुनरूत्थान सणाच्या अनेक
शुभेच्छा.
ईस्टर हा
महत्त्वाचा सण असला तरी ख्रिस्त जन्माची जेवढी तयारी केली जाते, तेवढी मात्र होत
नाही. ईस्टर हा एक देखावा नसून; देवाचा पुत्र मरणावर विजय मिळवून पुनरुत्थित झाला आहे.
हा एक सण नवजीवनाचा आहे, आशेचा आहे, विश्वासाचा आहे. त्यासाठी आपल्याला पुराव्याची
गरज भासत नाही. जे विश्वास ठेवत नाहीत; त्यांना कितीही पुरावे दिले तरी अपुरेच
असतात. हा सण अनुभवाचा सण आहे. त्यासाठी रिकामे थडगे, येशू कसा जिवंत झाला ह्याचे
वर्णन करता येत नाही. त्याचे पुनरुत्थित शरीर कसं होतं हे सांगता येत नाही. संत पौल
म्हणतो; “जर आपला ख्रिस्ताच्या पुनरूत्थानावर विश्वास नसेल तर, आपल्या ख्रिस्ती
जीवनाला अर्थ नाही.” पुनरुत्थानाचा सण थाटा माटात साजरा जरी केला जात नसेल तरीही
ख्रिस्ती धर्माचा गाभारा ह्या सणात दडून राहिला आहे.
ह्या पवित्र मिस्साबलिदानात सहभागी होत असताना
पुनरुत्थित येशूचा प्रकाश, कृपा आणि शांती आम्हावर सदैव रहावी आणि आम्ही सुद्धा
आमचे ख्रिस्ती जीवन आणि कार्य, प्रामाणिकपणा आणि विश्वास ह्या मुल्यांनी भरावे
म्हणून प्रभूकडे याचना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची
कृत्येंं १०:३४,३७-४३.
प्रेषितांची
कृत्येंं ह्या पुस्तकात प्रामुख्याने आपल्याला प्रभू
येशू ख्रिस्ताने पुनरुत्थित झाल्यानंतर आपल्या शिष्यांना दिलेल्या दर्शनाविषयी
तसेच शुभवर्तमानाच्या प्रचाराविषयी केलेल्या आज्ञेबद्दल वृत्तांत आढळून येतात.
आजच्या पहिल्या वाचनात आपण मरणातून पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताविषयी संत
पेत्राने दिलेल्या साक्षी विषयी ऐकत आहोत. संत
पेत्र म्हणतो,
‘पवित्र आत्म्याने अभिषिक्त केलेला नाझरेथकर येशूने मरणावर
विजय मिळवून; तो
जीवंताचा व मेलेल्यांचा न्यायधीश बनला आहे. त्यांच्यावर श्रध्दा ठेवणाऱ्या
प्रत्येकाला त्यांच्या नावाखाली पापांची क्षमा लाभली आहे.’
ख्रिस्ताने मरणावर विजय
मिळवून आम्हाला स्वर्गीय नवजीवनाचे भागीदार बनविले आहे. ज्या देवाने ख्रिस्ताला
मरणातून उठविले आहे. तोच देव आम्हाला सुध्दा न्याय-दिनाच्या
दिवशी मरणातून उठवून व आपल्या मांगल्यमय जीवनाचे सार्थक घडवून आणील.
दुसरे वाचनः कलस्सैैकरांस पत्र:
३:१-४.
आजच्या दुसऱ्या
वाचनात संत पौल कलस्सैकरांना, ख्रिस्ताबरोबर पुनरूत्थित होण्याचे परिणाम
स्पष्टपणे नमुद करून देत असताना आपल्याला उद्देशून म्हणतो की, “ख्रिस्ताबरोबर
आपण देखील उठवले गेलो आहोत. आता आपण त्यांच्या पुनरूत्थित जीवनात सहभागी झालो
आहोत.” ह्यास्तव, आपले
जीवन आता वेगळे असायला हवे. स्वर्गीय गोष्टीकडे लक्ष वेधण्यास संत पौल आपल्याला
विंनती करतो. कारण तेथे ख्रिस्ताच्या प्रकाशाची, प्रेमाची व सत्याची सत्ता
स्थापित आहे.
शुभवर्तमान: योहान २०:१-९.
शुभवर्तमानकार संत योहान
आपल्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाविषयीच्या घडलेल्या घटनेचे
विवरण करीत असताना “रिकामी कबर” ह्या
प्रसंगाचा उल्लेख प्रथमरीत्या नमुद करतो. येशूची ‘रिकामी
कबर’ हा
आपल्या ख्रिस्ती विश्वासाचा गाभा मानला जातो व ख्रिस्ताच्या गौरवशाली
पुनरूत्थानाचा एक अविभाज्य असा भाग मानला जातो.
तथापिः या घटनेमधून संत
योहान आपल्यासमोर काही आधात्मिक धड्याचे विवरण साधू इच्छितो. तसे पाहिल्यास चारही
शुभवर्तमानकांरानी (मत्तय, मार्क, लूक व योहान) सांगितलेल्या
पुनरुत्थानाविषयीची विविध प्रंसगाची एका वाक्यात सलगपणे चित्र उभे करणे सोपे नाही.
उदाः संत योहान २०:१
मध्ये, “मरिया
माग्दालिया एकटीच कबरेजवळ” असल्याचे नमुद करतो. तथापि
संत मत्तय आपल्या २८:१ ओवीत, “मरिया माग्दालिया व दुसरी
मरीया” ह्या
दोन व्यक्ती कबरेजवळ असल्याचे नमुद करतो. तर, संत मार्क १६:१
ह्यामध्ये,
“मरीया माग्दालिया, याकोबाची आई मरिया व सलोमे” ह्या
तीन व्यक्तीची ओळख देतो. ह्या विविध वृत्तांतावरून साध्य करण्याची
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘येशू ख्रिस्त मरणातून उठला
आहे व त्यांने मेलेल्यांतून पुन्हा उठावे’ असा जो शास्त्रलेख लिहिला
गेला होता तो आज परिपूर्ण झाला आहे.
तसेच आजच्या शुभवर्तमानात
येशूच्या बारा शिष्यांपैकी दोन शिष्यांचा उल्लेख केला गेला आहे. शिमोन पेत्र
ह्यांचे नाव शुभवर्तमानात स्पष्टपणे मांडण्यात आले आहे. परंतू, दुसऱ्या
शिष्याचे नाव गुपीत असल्याचे दिसून येते. पण, त्या शिष्यांविषयी येशूठायी
असलेले प्रेम दर्शविण्यात आले आहे. येशूचा अतिप्रिय शिष्य म्हणून संत योहानाला
संबोधले जाते. मरिया माग्दालिया हिने दिलेल्या वृत्तांतवरून
दोन शिष्य, पेत्र
व योहान, येशूच्या
रिकामी कबरे जवळ येतात व ख्रिस्ताने
सांगितल्याप्रमाणे, ‘मी तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठेन’ ह्या
वचनावर विश्वास ठेवतात.
मनन
चिंतन:
ज्याला जिवंत
देवाचा अनुभव झालेला असतो, त्या व्यक्तीमध्ये बदल घडत असतो. संत पौलाला दीमस्काच्या
वाटेवर पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव झाला आणि त्याच्या जीवनाचे परिवर्तन झाले. Easter is a feast of
Transformation. पहिल्या ख्रिस्त सभेचे घटक, येशूच्या मरणाने भयभीत
झाले होते. जीवनात काही अर्थ राहिला नव्हता. मसीहा, तारण करणाराच मरण पावला होता.
परंतु तो स्वतः म्हणाला होता: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास
ठेवतो तो/ती मेला/मेली तरी सदोदित जिवंत राहील.” (योहान ११:२५-२७) होय तोच आब्राहामाचा,
इसाकाचा व याकोबाचा केवळ देव नसून, तो जीवंताचा देव आहे. मरणाचा त्याच्यासमोर
टिकाव लागत नाही.
पहिल्या वाचनात
प्रेषितांची कृत्ये आपल्याला येशू विषयी माहिती देत आहे. पेत्र परराष्ट्रीयांच्या
बरोबर बोलत आहे; त्यांना सांगत आहे की, “ह्या दिवसांनी आपण ऐकलेले आहे; येशू नजरेथकर
कसा जिवंत होऊन आपल्यामध्ये वावरत आहे.” तो देवाचा अभिषेक व निवडलेला,
त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याच्या शक्तीने आणि समर्थ्याने कार्य करत असे. येशूच्या
जन्मापासून तर पुनरुत्थित होईपर्यंत काय प्रकार घडले ह्याचे कथन पेत्र करत आहे.आम्ही
त्याच्याबरोबर उठलो, फिरलो, जेवलो, त्याच्या सहवासात राहिलो, त्याच्याशी संवाद
साधला, त्याच्या जीवन-मरण-पुनरुत्थानाचे आम्ही साक्षीदार आहोत. येशू जिवंत झाला
आहे हे वैज्ञानिक दृष्ट्या स्पष्ट करता येत नसले तरी; पहिली ख्रिस्तसभा येशूच्या पुनरुत्थानाने
जिवंत व पुनरुत्थित झाली. जिवंत येशूला साक्ष देण्यासाठी आपले सर्वस्व व जीव
देण्यास तयार झाली. ह्याच पुनरुत्थानाचा व येशू जिवंत असलेल्याचा एकमेव पुरावा आहे. The timid community
became courageous, the apostles’ life was transformed and they became witnesses
to him that is the first and the best proof of his resurrection. ख्रिस्तासाठी
आणि सुवर्तेसाठी आपलं सर्वस्व वाहणारे अज्ञानी, अनपढ, लोकांना बळ कोठून आले असेल.
ह्या जीवन देणाऱ्या लोकांचं जीवन हा येशूच्या पुनरुत्थानाचा दुसरा पुरावा आहे. ही
लोक स्वतःसाठी जगत नसत, त्याचे लक्ष पृथ्वीवरील गोष्टीकडे नव्हते तर, ते
स्वर्गाकडे, जिवंत देवाकडे, त्यांचे तन-मन लक्ष वेधून गेलेलं होते.
संत पौल कलस्सेकरांस पत्रात सांगत आहे की, ख्रिस्ताने
त्याच्या दुःखसहनापूर्वी, मरणावरती व पुनरुत्थानाद्वारे स्वर्गीय सुख बहाल केले
आहे. म्हणून स्वर्गीय गोष्टीकडे आपले लक्ष लावा, आपली विचारसरणी
देवासारखी करा. आपण जगत नसून ख्रिस्त आपल्यामध्ये जगत आहे. त्याचे जीवन
आपल्यामध्ये दडून राहिले आहे. जेव्हा तो पुन्हा गौरवाने येईल तेव्हा, तो आपल्याला
पुनरुत्थानाचे रहस्य प्रकट करील. आपण त्याला देवाच्या उजवीकडे बसलेले बघू.
आजच्या शुभवर्तमानात
आपल्याला येशूच्या मेलेल्यातून जिवंत झाल्याचे वर्णन केलेले आहे. मारिया
माग्द्लेना भर पहाटे, अंधार असताना कबरेजवळ येते. तिच्या मनाची चलबिचल होत असते.
ते म्हणजे आपल्यासाठी कबरेवर असलेली धोंड बाजूला कोण सारेल? आपल्याला समजून घेणारा,
आपल्यावर प्रेम करणारा, मरण पावल्याचे दुःख होतेच; पण तिची काळजी व धास्ती वेगळीच
होती. आणि अशा विचारात असताना पहिला-वहिला चमत्कार तिने तिच्या डोळ्यांनी पहिला.
तो म्हणजे ती मोठी धोंड कबरेवरून बाजूला सारली गेली होती. तिच्या मनावरचा भार कमी
झाला होता.
जड पावलांनी
चालणारी मारिया माग्द्लेना आता पळत धावत सुटते. पुनरुत्थानाचा व येशू जिवंत उठल्याचा
दुसरा पुरावा. मेलेली, शोकांतिक झालेली मारिया माग्द्लेना धावायला व पळायला लागली.
सगळ्यांना सांगू लागली, “तो मेलेल्यातून उठला आहे, पुनर्जीवित झालेला आहे.” मोठ्या
हिमतीने व हिकमती ती ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष बनली. येशू जिवंत झाला आहे.
ही बातमी घेऊन पेत्राकडे आणि योहानाकडे धावत गेली. मारिया माग्द्लेना, येशू थडग्यात
नाही. त्याला कोणी नेले तर नसेल ना? ह्या शंका-कुशंका घेऊन पेत्र-योहानाकडे आलेली मारिया
माग्द्लेनाचे पूर्ण ऐकेपर्यंत योहान कबरेच्या बाजूने धावू लागला. पेत्रही त्याच्या
मागोमाग धावला.
जो प्रेम करतो, तो
जीव तोडून धावतो. पण ज्याच्या मनात थोडीशी देखील चुकीची भावना निर्माण होते,
त्याची पावले जड होत असतात. पेत्र धावत होता; पण त्याला त्याच्या नाकारण्याची
जाणीव झाली. आपण पेत्र आणि खडक आहोत ह्याच खडकावर प्रभू येशू त्याची ख्रिस्तसभा
उभारणार होता. अजूनही पेत्राला थोडे पुढे ठेवून त्याच्या कार्याची आणि जबाबदारीची
आठवण करून दिली गेली. योहान कबरेजवळ पहिला पोहोचला त्याने स्वतःहून पुढाकार घेऊन
रिकाम्या थडग्यात तो शिरला नाही. उलटअर्थी त्याने पेत्राच्या अधिकाराचा मान-सन्मान
राखला. पेत्राला दिलेला अधिकार, त्या खडकावर उभी राहणारी ख्रिस्तसभा ह्याची
पूर्णपणे योहानाला खात्री होती. तो पेत्राला पुढे करतो. कबरेजवळ आलेला पेत्र प्रथम
थडग्यात शिरतो. केवळ मारिया माग्द्लेना नव्हे तर योहानाने पेत्राच्या अधिकाराचा
सन्मान राखला. प्रथमच पेत्र गर्विष्ठ होता. ‘मोडेन पण वाकणार नाही’ ह्या भूमिकेचा.
पण थडग्याजवळ आल्यानंतर वाकाव लागलं. स्वतःला उंचावतो तो नमवीला जाईल. पण जो स्वतःला
नमवितो तो उंचविला जाईल. पेत्राच्या अधिकाराचा मान राखणारे मारिया माग्द्लेना आणि योहान
ह्यांनी आपल्या कृतीद्वारे ख्रिस्त जिवंत झाला आहे हा तिसरा पुरावा दिला. ते केवळ
येशूच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार झाले नाहीत; तर त्यांनी पेत्राच्या अधिकाराचा
मान-सन्मान, ख्रिस्तसभेचा मान-सन्मान केला. तीच ख्रिस्तसभा पुनरुत्थित
ख्रिस्ताच्या विश्वासात बांधली गेली आहे. ख्रिस्ताच्या जिवंतपणाबद्दल अविश्वास
म्हणजे; जी श्रद्धा ख्रिस्तसभा प्रकट करते तिच्यावर अविश्वास ठेवणे होय.
ख्रिस्त जिवंत
झाला आहे, हे सांगण्यासाठी सौम्य-लीन आणि नमवीलेला पेत्र ह्याच ख्रिस्ताच्या
पुनरूत्थानाचा साक्षीदार झाला. आज आपण येशू जिवंत झाला आहे, हे सत्य प्रकट
करण्यासाठी वैज्ञानिक पुराव्याची गरज नाही, जास्त विवेकबुद्धी तल्लीन करण्याची गरज
नाही. त्यासाठी काही पुरावे मागण्याची गरज नाही. तर त्याच्या पुनरुत्थानाचा अनुभव
घेऊन तो जगापुढे प्रकट करण्याचा आहे. त्याच्या पुनरुत्थानाचे आपणास साक्षीदार
व्हायचे आहे. येशू ख्रिस्त जिवंत झाला आहे, हे सांगण्यासाठी शंकेची धोड बाजूला
सारायला हवी. पुनरुत्थित ख्रिस्त जगाला देण्यासाठी मारिया माग्द्लेना सारखे
धावत-पळत सुटायला पाहिजे. त्याचे पुनरुत्थानाचे सुवर्तिक व्हायला पाहिजे. शेवटी पेत्रासारखे
केवळ नम्र न होता आपण जिवंत असल्याचे साक्षीदार झाले पाहिजे. ह्याच आमच्या ह्या पुनरुत्थित
सणाच्या आपणास सदिच्छा व शुभेच्छा. पुनरुत्थित ख्रिस्ताची शांती तुम्हांबरोबर
सदोदित असो.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद: “ख्रिस्त आज विजयी झाला, मरणा जिंकुनिया उठला.”
१. आपले परमगुरुस्वामी फ्रान्सीस, आध्यात्मिक मेंढपाळ बिशप, सर्व धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनिंना
ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा अनुभव त्यांच्या कार्यात यावा. ख्रिस्ती
श्रद्धावंतांना त्यांच्या श्रद्धेत व विश्वासात त्यांनी आपल्या कार्याद्वारे
प्रेरित करावे व स्वर्गीय नवजीवनाचा आनंद उपभोगण्यास मनोबळ द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. पुनरुत्थित येशू ख्रिस्ताच्या विजयाचा, आनंदाचा
व प्रकाशाचा संदेश जे धर्मगुरू व धर्मभगिनी आज इतरांपर्यंत
पोहचविण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांच्या कार्यात प्रभूची कृपा व शक्ती
मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले
आहेत, त्यांनी
आपल्या विवेकबुद्धीला जागवून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व
अडचणी जाणून घ्याव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना
करूया.
४. जगभरात अनेक लोक करोना व्हायरसने बाधित झालेले आहेत, अशा
सर्वांना परमेश्वराचा स्पर्श लागून त्यांचे ह्या रोगापासून मुक्तता मिळावी म्हणून
आपण प्रार्थना करूया.
५. सतत आजारामुळे ज्या कुटुंबांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यांना
पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या वैभवशाली शक्तीने दिलासा दयावा व सर्व
आजारातून त्यांची सुटका करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
६. सर्व धर्म सहभाव, सर्व धर्म स्नेहभाव, सर्व धर्म समीपभाव व सर्व धर्मसन्मानभाव या चौकटीवर विविध धर्मांच्या
लोकांनी एकत्रित येऊन ऐकमेकांचा उध्दार व सन्मान करावा, गुण्यागोविंदाने नांदत राहावे व जगात शांतीचे व प्रेमाचे वातावरण निर्माण
करावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
७. आपल्या कौटुंबिक व सामाजिक गरजेसाठी प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment