Tuesday, 14 October 2014

Reflections for the homily by: Valerian Patil.













सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार







दिनांक: १९/१०/२०१४
पहिले वाचन: यशया ४५:१, ४-६
दुसरे वाचन: १ थेसलोनिकाकरांस १:१-५ब
शुभवर्तमान: मत्तय २२: १५-२१

प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार व त्याचबरोबर मिशन रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यशया आपल्याला सांगतो की, आपला देव एकच आहे व त्याची ओळख पृथ्वीच्या कानाकोप-यातील लोकांना झाली पाहिजे. तर दुस-या वाचनात संत पौल थेसलोनिकाकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रात म्हणतो, ‘बंधुजनहो, तुम्ही देवाला प्रिय आहात आणि त्याने तुमची निवड केली आहे, त्याची तुम्हांला जाणीव व्हावी’. तसेच शुभवर्तमानात येशू, ‘जे कैसराचे आहे ते कैसराला द्या व जे देवाचे आहे ते देवाला द्या’ असे सांगून कर देणाचा प्रश्न सोडवतो.
आज आपण मिशन रविवार साजरा करीत असताना जे मिशनकार्य करत आहेत त्यांना त्यांच्या कार्यात योग्य अशी मदत मिळावी व सर्व वाईटापासून त्यांचे संरक्षण व्हावे व आपणसुद्धा आपल्यापरीने ह्या मिशनकार्यात सहभाग घ्यावा म्हणून ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ४५:१, ४-६

देव हा सर्वसामर्थ्य आहे त्याचे जगव्यापी प्रकटीकरण त्याच्या सत्याच्या समर्थनाच्या पार्श्वभुमीवर आधारित आहे. अभिषिक्त ही संज्ञा ‘मसिहा’ या अभिधानाचा आधार आहे पण जुन्या करारात ही संज्ञा विशेषकरून देवाचा अभिषिक्त राजाच्या  संबंधात वापरली आहे (उदा.१ शमु.२४:६ मध्ये शौल). सायरसला एक सवौच्च कार्यासाठी नेमले व सज्ज केले आहे आणि त्याचे सर्व विजय या कार्याची प्रारंभिक प्रस्तावना आहे यावर ह्या संज्ञेने भर दिला आहे.

दुसरे वाचन: १ थेस्सलोनीकाकरांस १:१-५ब

आपल्या बहुतेक पत्रांच्या प्रारंभीच पौलाने आपल्या वाचकांच्या जीवनात देव जे करीत आहे त्यासाठी त्याची उपकार स्तुती केली आहे. प्रार्थनेसबंधीच्या या उल्लेखातून आपल्या मित्राविषयी त्याची स्वतःची प्रीती व आस्था स्पष्टपणे दिसून येते आणि यातूनच त्यांना आपल्या ख्रिस्ती जीवनात धीर व उत्तेजन मिळते. वाचकांनी आपला मुळचा विश्वास तेवढयाच उत्साहाने व चिकाटीने दृढ ठेवला आहे. परिणामी ते इतर लोकांना ख्रिस्ताचे साक्षीदार झाले आहेत हाच मुद्दा येथे आहे. सुवार्तेद्वारे देवाने त्यांना पाचारण केले एवढेच नव्हे तर त्यांनीही विश्वासाने त्याला यथार्थ प्रतिसाद दिला हे मुलभूत ख्रिस्ती गुण सर्वांच्या अंगी असावेत. कारण आपण देवाचे प्रिय आहोत.

शुभवर्तमान: मत्तय २२: १५-२१

येशूच्या विरोधात परुशी नेहमीच होते. त्याला बोलण्यात पकडावे, त्याच्या तोंडाची उलट-सुलट विधाने त्याच्यावरच उलटवावी हा त्यांचा उद्देश होता. ......    रोमन सरकारला द्यावा लागणा-या कराविषयी होता. देशप्रेमी यहुदयांना या कराची वचनबद्धता होती, हे राजकीय अधिनतेचे चिन्ह असे त्यांना वाटे. सुमारे पंचवीस वर्षापूर्वी गालीलातील एक लोकप्रिय पुढारी यहुदा याने या कराच्या विरोधात मोठी बंडाळी माजवली होती. ‘जीलोत’ गटाला प्रेरणा देणारा हा यहुदा होता. तसा हा फसवा, कावेबाज प्रश्न होता. कर दिला पाहिजे असे म्हटले तर तो देशद्रोही ठरतो आणि त्याला विरोध करणे राजकीय दृष्टीने धोक्याचे होते.
येशूने त्याच्याकडे एक नाणे पाहायला मागितले आणि त्यातून त्याने त्यांचा दाभिकपणा उघड केला. कोणताही देशप्रेमी यहुदी माणूस हे नाणे बरोबर घेऊन फिरला नसता. या नाण्यावर बादशहाचा मुखवटा होता आणि त्यावर त्याची ‘देवाचा पुत्र’ ही पदवी कोरली होती. ही एक प्रकारे मूर्तीपूजा होती. ते कैसराचे चलन वापरतात तर त्यांनी त्याचा कर भरणे वाजवीच आहे या प्रकारे येशूने स्वतःला त्या ‘जीलोत’ गटापासून निश्चयाने दूर ठेवले आणि विधर्मी सरकारशी निष्ठा ठेवणे ही गोष्ट देवावरच्या निष्ठेशी विसंगत नाही हे यातून स्पष्ट केले.

बोधकथा:

एकदा एक तरूण चित्रकार, एक बाई तिच्या लहानशा बाळाबरोबर भयंकर अशा वादळ वा-यात सापडलेली आहे अशा प्रकारचे चित्र रंगवत होता. त्याने चित्र इतक्या उत्कृष्टरित्या रेखाटलेले होते की, त्या चित्रातून जिवंत भावना व्यक्त होत होत्या. हे चित्र पाहून तो चित्रकार स्वत:चे भान विसरून गेला. ते ह्दयस्पर्शी चित्र पाहून त्या तरूण चित्रकाराने आपल्या हातातील रंगकामाचा ब्रश बाजूला ठेवला आणि स्वत:शीच म्हणाला, “खरतर मी अशा परिस्थितीत असलेल्या लोकांना माझ्या मदतीचा हात पुढे केला पाहिजे, त्यांचे मी फक्त चित्र रंगवून त्यांना काय लाभ?” ह्या प्रश्नावर भारावून गेलेल्या ह्या चित्रकाराने आपल्या कलेचा त्याग केला व गरीब लोकांची सेवा करू लागला आणि हाच तरूण चित्रकार आफ्रिकेतील युगांडा येथील लोकप्रिय मिशनरी बिशप बनला.

मनन चिंतन:

1) येशू ख्रिस्ताला कसेही करून नजरेआड करण्याचा यहुदी धर्मपुढा-यांनी निश्चय केला होता. कोणत्याही मार्गाचा उपयोग करण्याची त्यांची तयारी होती. ते रोमी लोकांना आपले कट्टर शत्रू मानत. मात्र, येशू ख्रिस्ताला ठार करण्यासाठी ते त्यांच्याशी तडजोड करण्यास तयार होते. येशू ख्रिस्ताला बोलण्यात पकडण्याचा डाव त्यांनी रचला. येशूला रोमी सरकारविरुद्ध बोलण्यास लावून आपणास आरोप ठेवण्यास चांगलेच कारण मिळेल असे त्यांना वाटले.
त्यांनी आपले शिष्टमंडळ पाठविले. त्या शिष्टमंडळाने येशूची तोंडस्तुती करून आरंभ केला. नंतर त्यांनी एक प्रश्न विचारून आपला डाव टाकला. “कैसराला कर देणे योग्य आहे किंवा नाही” व त्याने “होय” म्हटले असले तर येशू इस्राएल राष्ट्राचा शत्रू आहे असं प्रचार त्यांनी केला असता. “नाही” म्हटले असते तर रोमी सरकारविरुद्ध अप्रचार करणारा आरोप ठेवता आला असता. येशूने त्यांचे ढोंग व दुष्टपणा ओळखले. सरकारला कर मागण्याचा हक्क आहे व त्याच वेळी देवाचे ऐकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे त्याने दाखवून दिले.

2) मिशन कार्य ही येशूने दिलेली आज्ञा आहे. दिलेली आज्ञा तोडता येत नाही तर ती पाळली जाते. आपले ख्रिस्ती मिशन म्हणजे केवळ paying, praying and obeying नव्हे तर देवाने दिलेले कार्य करणे देखील आहे. मिशन कार्य करणे म्हणजे फक्त दूरवर जाणेच नव्हे. परमेश्वराने आपणाला आठवड्यातून सात दिवस दिलेले आहेत, ह्यापैकी जे देवाचे आहे म्हणजेच चर्चला येऊन त्याची भक्ती करणे, त्याची पुजा करणे व उरलेल्या दिवसात आपण जेथे काम करत आहोत, जेथे आपण राहत आहोत, जेथे कुठे आपण जात आहोत त्या-त्या सर्व ठिकाणी आपल्या शब्दातून आणि आचरणातून परमेश्वर इतरांना देणे हे देखील मिशनच आहे. यशया संदेष्टा देखील आजच्या वाचनात अप्रत्यक्षरित्या मिशनविषयी म्हणत आहे. तुझी ओळख नसतानादेखील मी तुझी चांगल्या कार्यासाठी नेमणूक केली आहे, तुला पदवी बहाल केली आहे जेणेकरून खरा परमेश्वर कोण आहे ह्याची ओळख लोकांना तुझ्याद्वारे होईल. संत पौल देखील आपण प्रत्येकजण देवाचे प्रिय आहोत असे सांगत आहे कारण त्याने त्याच्या शुभसंदेशासाठी आपली निवड केली आहे. तो शुभसंदेश केवळ शाब्दिक नसून प्रभावी व पवित्र आत्म्याने प्रेरित झालेला होता व पूर्ण प्रत्ययकारी होता. मग आपण कुठे आहोत? आपण प्रभूच्या मिशन कार्यात सहभागी होऊन जे देवाचे आहे ते देवाला आणि जे कैसराचे आहे ते कैसरला देत आहोत का?    

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐक.
  1. आपले पोप, कार्डीनल्स, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्या सर्वांना त्यांच्या मिशन कार्यात प्रभूचा आशीर्वाद लाभवा व सर्व संकटापासून त्यांचे संरक्षण व्हावे  म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. जे कोणी जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी कार्य करत आहेत त्यांना त्यांच्या कार्यात अधिकाअधिक मदत व्हावी व त्यांच्या कार्याद्वारे ह्या जगात शांतीमय वातावरण निर्माण व्हावे  म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. येणा-या नवीन सरकारने आपल्या राज्याच्या उन्नतीसाठी निस्वार्थीपणे झटत राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. आपल्या धर्मग्रामातील सर्व आजारी लोकांना देवाने आरोग्यदायी स्पर्श करावा व त्यांना परत एकदा चांगले आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5.  आता आपण शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करुया.   

Wednesday, 8 October 2014

Reflections for the homily, by: Fr. Sandeep Koshav.
Fr. Sandeep Koshav belongs to St. Bonaventure Province Maharashtra. At present he is rendering his service as a secretary to the provincial at Vidyavihar.








            सामान्य काळातील अठठाविसावा रविवार























दिनांक: १२/१०/२०१४   
पहिले वाचन: यशया २५:६-१०
दुसरे वाचन: फिलिप्पैकरांस पत्र ४:१२-१४
शुभवर्तमान: मत्तय २२:१-१४

“बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत”

प्रस्तावना:

आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील अठ्ठावीसावा रविवार साजरा करीत आहे. मनुष्याच्या प्रत्येक कृतीमागे कारण असते. जर हे कारण उचित असेल तर कृतीही उचित घडत असते परंतु जर कृती चुकीची घडली तर त्यामागे मनुष्य चुकीची अनेक कारणे देत असतो. आजच्या शुभवर्तमानाद्वारे येशू ख्रिस्त आपणांस देवाच्या राज्याचा अविभाज्य भाग होण्याचे आमंत्रण देत आहे. देवाच्या आमंत्रणाला होकार दिल्यावर माणसाची प्रगती होते, समृद्धी होते व नकार दिल्यावर त्याचा –हास होतो व तो लयास जातो याचा अनुभव आपल्याला प्रतिदिनी येतो. या आमंत्रणाचा स्वीकार करावा किंवा नकार द्यावा हे प्रत्येकाने ठरवायचे आहे. देवाने दिलेल्या आमंत्रणाला योग्य तो प्रतिसाद देण्यासाठी लागणारी कृपा आपण या प्रभू भोजनामध्ये मागू या.

पहिले वाचन: यशया २५:६-१०

आजच्या पहिल्या वाचनात प्रवादी यशया देवाच्या आमंत्रणांस होकार दिलेल्या लोकांसाठी कशाप्रकारे देवाने मिष्टान्नाचे टेबल सज्ज ठेवलेले आहे याचे वर्णन करतो. देवाच्या डोंगरावर त्याच्या शब्दाने तारलेल्या लोकांसाठी सर्व प्रकारच्या वस्तूंची विपुलता आहे. देवाने सज्ज केलेले हे मिष्टान्नाचे टेबल ज्यांनी-ज्यांनी त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला आहे त्या सर्वांसाठी खुले आहे.

दुसरे वाचन: फिलिप्पैकरांस पत्र ४:१२-१४  

आजच्या दुस-या वाचनात संत पौल म्हणतो की दैन्या अवस्थेत व संपन्नतेमध्ये कसे रहावे हे मला समजले आहे. तृप्त आणि अतृप्त याच्यामधील भेद मी जाणलेला आहे परंतु या सर्व अवस्थेमध्ये परमेश्वर सर्वकाही पुरवतो याचा अनुभव घेणे महत्वाचे  आहे.

शुभवर्तमान: मत्तय २२:१-१४ 

मागील काही रविवार आपण देवाचे राज्य या दाखल्यावर विचार-विनिमय करत आहोत. या सर्व दाखल्यातून येशू एकच गोष्ट आपणासमोर ठेवू इच्छितो, जो परमेश्वराच्या आमंत्रणाचा स्विकार करतो त्याला देवाच्या राज्याचा आनंद (सार्वकालिक जीवनाचा अनुभव) सदैव प्राप्त होतो. आजच्या दाखल्यात देखील दोन भाग आहेत.
पहिल्या भागात- देवाचे भोजनासाठी सर्वांना आमंत्रण आहे. तारणाच्या पूर्ण इतिहासात अनेक संदेष्टे, प्रवादी पाठवण्यात आले परंतु निवडलेल्या लोकांनी त्यांचा स्विकार केला नाही. आता ते ख्रिस्ताचा देखील स्विकार करणार नाहीत आणि म्हणून आपल्या शिष्यांद्वारे ख्रिस्त हा तारणाचा संदेश इतर न निवडलेल्या लोकांपर्यंत पोहोचवेल व त्यांना आपल्या आपल्या प्रीती भोजनाच्या (पवित्र मिस्सामध्ये) विधीमध्ये वाटेकरी करील.
दुस-या भागात- आपणांस आढळते की, ज्याने ख्रिस्ती जीवन व ख्रिस्ताला स्वीकारलेले आहे, त्यांनी ख्रिस्ताला कशाप्रकारे स्वीकारलेले आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने शुद्धतेचे, न्यायाचे व विश्वासाचे नवे वस्त्र धारण केले आहे का?

बोधकथा:

 एकदा एका शहरात विशेष प्रकारे आयोजित केलेल्या सार्वजनिक सभेसाठी दोन प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्यांना बोलण्यासाठी बोलाविले होते. त्यांनी गरिबी, मुलभूत तत्वे, शोषण, दडपशाही किंवा समाज्यात होणारे जुलूम अशा विविध विषयांवर मार्गदर्शन/प्रबोधन केले. ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी मोठमोठ्या संस्थेच्या अधिका-यांना, धार्मिक पुढाका-यांना सहभागी होण्यासाठी बोलावले होते त्याचबरोबर शहरातील सर्व धर्मीय युवकांना देखील ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रण होते. सर्व धर्माचे युवक ह्या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. शंभरपेक्षा जास्त आमंत्रण पत्रे पुढाका-यांना आणि अधिका-यांना पाठवण्यात आली होती मात्र फक्त दोन वा तीन अधिकारी ह्या सभेसाठी उपस्थित होते. त्या दोन सामाजिक कार्यकर्त्यांचे वक्तव्य फक्त शाब्दिक नसून त्यांच्या दररोजच्या जीवनावर देखील आधारित होते. त्यांनी फक्त शब्दांवरच भर न देतो जे काही ते बोलले त्याचा आपल्या दररोजच्या जीवनात देखील आणण्याचा प्रयत्न केला हे त्यांनी त्यांच्या बोलण्यातून दाखवले. जे युवक सभेसाठी आले होते त्या सर्वांनी मिळालेल्या ह्या संधीमुळे आयोजकांचे आभार मानले कारण “जे बोलतात तेच आपल्या आचरणात आणतात” हे फारच थोड्यांना ऐकण्याची संधी भेटत असते.
कार्यक्रमानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी आमंत्रित मान्यवर ह्या विशेष अशा सभेसाठी का म्हणून आले नाही ह्याची विचारपुस केली. जी उत्तरे त्यांनी दिली ह्यावरून त्यांच्या जीवनात प्राधान्य/अग्रस्थान किंवा मूल्य कोणत्या गोष्टींना आहे हे निदर्शनास आले: एकजण म्हणाला, “मी माझ्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलो होतो”, दुसरा म्हणाला, “मी खरेदारीसाठी गेलो होतो”, तिसरा म्हणाला, “मी माझ्या शाळेत होणा-या खेळांचे आयोजन करत होतो”, “येत्या शनिवारी आमच्या सणाची व त्याच्या सजावटीमध्ये मी मग्न होतो”, आणि नाना प्रकारची कारणे जी न सांगितलेली बरी. ते काय गमावून बसले होते ह्याचे त्यांना भान नव्हते कारण जे वक्ते होते त्यांच्या जीवनाच्या पार्श्वभूमीची त्यांना काहीच कल्पना नव्हती परंतु जे युवक मोठ्यासंख्येने  ह्या सभेसाठी आले त्यांना ह्या वक्त्यांच्या पार्श्वभूमीची व ह्या सभेला उपस्थित राहून काय परिणाम होईल ह्याची त्यांना पुरेपूर जाणीव होती.  

मनन चिंतन:

आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण राजाच्या उदारतेचा अनुभव घेतो. हा राजा जो आपणाला आमंत्रित करतो तो दयाशाली व सहनशील आहे. आपणासमोर हा जो उतारा प्रभू येशू ठेवत आहे तो पूर्णपणे त्याच्या जीवनाशी निगडीत आहे. आमंत्रित करणारा राजा हा खुद्द परमेश्वर आहे; आणि ज्या लग्न मंडपात तो बोलावत आहे ती ख्रिस्तसभा आहे. राजाचे पहिले आमंत्रित हे जुवीश (यहुदी) बंधू आहेत परंतु त्यांनी राजाच्या आमंत्रणाला होकार दिला नाही तर त्याला क्रुसावर ठार केले, आणि म्हणून ज्याप्रमाणे राजाने आपल्या सैन्याला पाठवून इतरांना आमंत्रित केले व राजभोजनात वाटा घ्यायला सांगितला. परंतु राजाने आमंत्रित केलेल्या लोकांनी दोन चुकीच्या गोष्टी केल्या. सर्वप्रथम ज्या राजाच्या राजहद्दीत ते राहत होते, त्या राजाचा मान-सन्मान त्यांनी केला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी राजाच्या सैनिकांना चुकीची वागणूक दिली व काहींना जिवे देखील मारले. राजाच्या सहनशीलतेचा व औद्याचा त्यांनी गैरवापर केला आणि म्हणून ते राजाच्या क्रोधाला बळी पडले.
आपणाला आमंत्रित करणारा राजा पिता परमेश्वर हा दयेचा सागर आहे, त्यांनी आपणासाठी टेबल सज्ज ठेवलेले आहे. तो आपणांस बोलावीत देखील आहे परंतु परमेश्वराच्या या आमंत्रणाला मी साद घालतो का? जेव्हा आपल्याला एखाद्या श्रीमंत किंवा प्रतिष्ठित व्यक्तीकडून एखाद्या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळते तेव्हा मी किती पूर्वतयारी करत असते, त्याच्या आमंत्रणाला आपण कधी नकार देत नाही, उच्च प्रतीचे, सुशुभ्र असे कपडे आणि सर्वकाही टापटीप आहे याची आपण खात्री घेतो, मग परमेश्वर खुद्द जेव्हा मला आमंत्रित करत आहे तेव्हा कशा प्रकारची आध्यात्मिक, शारीरिक तयारी मी करत असतो. आजच्या उता-यामध्ये आपण लग्नाची वस्त्र परिधान न केलेल्या व्यक्तीचे ऐकतो, त्याला लग्नमंडपातून बाहेर घालवण्यात आले. का? कारण त्याने स्वतःची तयारी केली नव्हती, तो आध्यात्मिक व शारीरिक दृष्ट्या पात्र नव्हता, शुद्ध नव्हता आणि म्हणून येशू म्हणतो, पुष्कळांना आमंत्रित केले आहे परंतु पात्र थोडे निवडलेले आहे. त्या निवडलेल्या लोकांमध्ये आपली गणना होऊ शकते का? त्या निवडलेल्या लोकांत बसण्यास मी पात्र आहे का?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: प्रभो तुझ्या आमंत्रणाला होकार देण्यास आम्हाला सहाय्य कर.
  1. आमचे परमगुरु, महागुरू, धर्मगुरु व धर्मभगिनी यांनी देवाच्या आमंत्रणाला होकार देऊन इतरांना त्या पथावर चालण्यास सहाय्य करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2.  देवाच्या आमंत्रणाला नकार देऊन जीवनाच्या मार्गाऐवजी पापांचा, अंधाराचा मार्ग चालणा-या बंधू-भगिनींना ख-या सत्याची जाणीव व्हावी व सुयोग्य मार्गावर ते चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. कौटुंबिक जीवनावर होणा-या या सिनडमध्ये भाग घेणा-या लोकांवर देवाचा विपूल वरदस्त यावा व कौटुंबिक जीवन चांगल्याप्रकारे समजण्यास व जगण्यास योग्य ते निर्णय त्यांना घेता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. आपल्या महाराष्ट्रात होणा-या निवडणुकीतून चांगले सरकार जे लोकांसाठी व समाज्याच्या हितासाठी कार्य करेल असं सरकार मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.    



Thursday, 2 October 2014

Reflections for Homily By: Manuel Fernandes.












सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार


दिनांक: ०५/१०/२०१४
पहिले वाचन: यशया ५:१-७
दुसरे वाचन: फिलिप्पैकरांस पत्र ४:६-९
शुभवर्तमान: मत्तय २१:३३-४३

प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार साजरा करत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात आपण द्राक्षमळ्याच्या दुष्टांताविषयी ऐकतो. ह्या दुष्टांताद्वारे यशया संदेष्टा, सेनाधीश प्रभू हा द्राक्षमळ्याचा अधिकारी आहे व ज्या वेलीची त्याने आवडीने लागवड केली ते यहूदी लोक आहेत हे सत्य प्रकट करतो. दुस-या वाचनात संत पौल फिलिप्पैकरांस परमेश्वराचे आभार स्तवन करण्यास प्रोत्साहित करून सदैव आनंद करण्यास सागत आहे.
तसेच शुभवर्तमानात येशू ख्रिस्त द्राक्षमळा आणि माळेकरी यांचा दाखला देत आहे. यहुदी धार्मिक अधिका-यांनी व पुढाका-यांनी त्यांच्या अधिकारांचा दुरूपयोग केल्यामुळे त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे हे येशू ख्रिस्त ह्या दाखल्याद्वारे स्पष्ट करतो. आपण आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या अधिकारांचा दुरूपयोग न करता त्यांचा वापर इतरांच्या सेवेसाठी करावा म्हणून ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ५:१-७:
हा छोटासा दाखला अतिउत्कृष्ट आहे. याचा आरंभ प्रेमगीतासारखा आहे. तो कर्णमधुर, कल्पक आहे. हा दाखला वाचत असताना आपण स्वतःचीच चौकशी करून घेत आहोत असे आढळते. तसेच ह्या दाखल्याद्वारे पापाचे खरे स्वरूप स्पष्ट होते व ते सर्वस्वी असमर्थनीय आहे हे जाणवते.

दुसरे वाचन: फिलिप्पैकरांस पत्र ४:६-९:
या पत्रामध्ये आनंद हा विषय मांडला आहे. प्रेषिताने आपल्या वाचकांना सदोदीत आनंद करण्यास सांगितले आहे. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा हेच त्याचे आवाहन आहे. ‘प्रभूमध्ये स्थिर राहा’. ख्रिस्ती व्यक्तीचे जीवन आणि नातेसबंध यातून जीवनाचा एक विशिष्ट गुण सर्वांना उघडपणे कळून यावा असे तो सांगतो. ख्रिस्ती लोकांच्या जीवनात चिंतेला अजिबात थारा नसावा कारण त्यांना प्रत्येक गोष्टीविषयी प्रार्थना, विनंती करता येते व ती करावी.
ख्रिस्ती व्यक्तीचे विचार जीवनाला धरून असावेत अशा गीष्टीचा उल्लेख पौलाने येथे केला आहे. ह्या गोष्टींचे मनन केल्याने आपल्या वृत्ती-प्रवृत्तींना आकार मिळतो. आपले उच्चार व आचार-कृती सर्वांना चांगले वळण लावतील कारण या गोष्टी ख-या, प्रामाणिक, योग्य, शुद्ध, सन्माननीय आणि प्रिय अशा आहेत.

शुभवर्तमान: मत्तय २१:३३-४३
या दाखल्यात द्राक्षमळा व माळेकरी यांचे उदाहरण दिले आहे. परगावी राहणारा जमीनदार व त्याचे माळेकरी ह्यांचा हा वृतांत आहे. मळ्याचा खंड म्हणून उत्पन्नाचा काही ठराविक हिस्सा मालकास देण्यास ते नकार देत होते व ह्याच कारणावरून त्यांना काढून टाकणे हे पुरेसे कारण होते परंतु जमीनमालकाच्या मुलाचा खून केल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले. या दाखल्याचे मर्म याजक आणि परुशी ह्यांना ताबडतोब उमजले कारण संदेष्ट्याचे पुस्तक माहीत असणा-या कोणालाही ते समजले असते. इस्राएल देवाच्या अपेक्षा पूर्ण करण्यास सर्वथा उणे पडले हे यशयाने त्या सर्वश्रुत द्राक्षमळ्याच्या दाखल्यातून प्रतिक रूपाने दाखवले आहे. हे पुढारी आता लवकरच देवाच्या पुत्राला ठार करणार होते. त्यातून गतकाळात त्यांनी देवाच्या संदेष्ट्याचा पुन्हा-पुन्हा अव्हेर केला होता. या वाचनातून या दाखल्याचा गर्भीव अर्थ स्पष्ट केला आहे; इस्राएलच्या पुढा-यांनी ज्याला नाकारले त्याला सन्मानाच्या सर्वोच्च पदासाठी निवडलेले आहे, हे सप्रमाण सिद्ध होते. द्राक्षमळा या चिन्हाचे दर्शविलेले राज्य त्यांचे नव्हे तर देवाचे आहे आणि देव ते जबाबदार व्यक्तीस सोपवून देईल.

बोधकथा:
डॉक्टर अडोल्फ लॉरेन्स हे विएन्ना मध्ये त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी प्रख्यात झाले होते. हिच प्रकिया कशी करावी व त्याचा वापर कसा करावा ह्याचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना अमेरिकेला बोलावण्यात आले होते. जेव्हा ते अमेरिकेला पोहचले तेव्हा त्यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली व त्याच बरोबर त्यांना विशिष्ट प्रकारची सुरक्षा प्रदान करण्यात आली. परंतु एके दिवशी ते गुपचुपपणे बाहेर टहळण्यासाठी निघून गेले, त्याचवेळी मुसळधार पाऊस चालू झाला. आसरा शोधण्यासाठी ते ऐका घरापाशी जाऊन त्यांनी त्या घराचा दरवाजा ठोठावला. त्या घरातील बाईने दरवाजा उघडून घरात पहिलेच दुःखाचे डोंगर आहेत असे म्हणून त्यांच्या तोडावर दरवाजा बंद केला. काही क्षणांनतर त्या हॉटेलचे सुरक्षाव्यवस्थापक येऊन त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेले.
दुस-या दिवशी सर्व वर्तमानपत्रात डॉक्टर अडोल्फ लॉरेन्सविषयी त्यांच्या फोटोसह माहिती देण्यात आली होती. ही माहिती जेव्हा त्या महिलेने वाचली तेव्हा तिला कळून चुकले की हेच डॉक्टर माझ्या दारापुढे उभे होते आणि लागलीच तिला जाणीव झाली की, तिच्या मुलीचा जो आजार आहे त्या आजरावर फक्त तेच एकमेव डॉक्टर यशस्वी शस्त्रक्रिया करू शकत होते. (देवाने सुद्धा इस्त्राएल लोकांच्या तारणासाठी अनेक अशे संदेष्टे पाठविले व सरतेशेवटी आपल्या एकुलत्या एका पुत्राला आपल्या तारणासाठी पाठविले परंतु लोकांनी त्याससुद्धा ओळखले नाही.)

मनन चिंतन:
आजच्या उपासनेत आपल्याला जबाबदारी व विश्वास ह्या दोन मुख्य गोष्टी आढळतात. शुभवर्तमानात द्राक्षमळा व माळेकरी ह्यांचे उदाहरण आहे. तसेच इस्राएल राष्ट्राने संदेष्टे व ख्रिस्ताचा कसा धिक्कार केला याचे वर्णन केले आहे.
  इस्राएली लोकांना यहोवाचा द्राक्षमळा म्हटले आहे, आजच्या दाखल्यात द्राक्षमळ्याच्या माळ्यांना इस्राएली लोकांच्या पुढा-यांची उपमा दिलेली आहे. देवाने आपले संदेष्टे इस्राएली लोकांपुढे पाठविले परंतु त्यांनी बहुतेकांचा छळच केला. शेवटचा संदेष्टा बाप्तिस्मा करणारा योहान हा होता, त्याचा देखील वध करण्यात आला. शेवटी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यालाही त्यांनी जीवे मारले त्यामुळे इस्राएली लोकांचा न्याय करण्यात आला.
आज जगात कितीतरी गोष्टी घडत आहेत; कामगार मालकाचा खून करतो, कामगार आपल्या मालकाच्या घरी चोरी करतो, इत्यादी. कामगार व मालक ह्या दोघांमध्ये खूप फरक आहे. आपण कितीतरी वेळेला आपल्या मालकाविषयी वाईट विचार करतो. कधी-कधी आपण एवढे दूर जातो की आपली आपल्याला लाज वाटते. आजच्या शुभवर्तमानात येशू म्हणत आहे, “जी शिळा गवंड्यांनी नापसंत केली तोच कोनशीला झाला”. ह्यावर विश्वास ठेवून आपल्या जीवनात येशूला प्रथम स्थान देऊया कारण तोच आपल्या जीवनाचा कोनशीला आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो, दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
  1.  ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू ह्या सर्वांना देवाचा शब्द जगाच्या कानाकोप-यात पसरविण्यासाठी विशेष शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2.  सर्व ख्रिस्ती लोकांचे वाईटांपासून रक्षण व्हावे व प्रार्थनेद्वारे त्यांचे जीवन आनंदमय व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3.  आपल्या गावातील तरुण पिढीला देवाने स्पर्श करावा जे देवापासून दूर गेले आहेत ते परत यावे तसेच जे देवाचे कार्य करत आहेत त्यांनी ते अधिक तन्मयतेने करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना परमेश्वरी कृपेने त्यांच्या कुवतीप्रमाणे योग्य तो रोजगार मिळवा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.