Tuesday, 13 January 2015

Reflections for the homily By: John Mendonca.









सामान्य काळातील दुसरा रविवार



दिनांक – १८/०१/२०१५
पहिले वाचन – १ शमुवेल ३:३६-१०-१९
दुसरे वाचन – करिंथ ६:१३c- १५a -१७-२०
शुभवर्तमान – योहान १:३५-४२

“मसिहा आम्हाला सापडला आहे”




प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय भाविकांनो आज आपण सामान्य काळातील दुसरा रविवार साजरा करीत असताना आजची उपासना आपणाला प्रभूची वाणी ऐकण्यास व प्रभूच्या सान्निध्याचा अनुभव घेण्यास आमंत्रण करीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात देवाने शमुवेल प्रवादिस कशाप्रकारे पाचारण केले ह्याविषयी आपण एकतो, तर दुसऱ्या वाचनाद्वारे संत पौल करिंथकरास सांगतो की, तुम्ही देवाचे पवित्र मंदिर आहात.
तर आजच्या शुभवर्तमानाद्वारे संत योहान बाप्तिस्टाचे शिष्य, आंद्रिया आणि शिमोन घोषीत करतात की, त्यांना जगाचा तारणारा ख्रिस्त सापडला आहे. आपल्या
दैनंदिन जीवनात आपणही शमुवेलाप्रमाणे प्रभू ख्रिस्ताचा शोध करावा म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीदानामध्ये विशेष प्रार्थना करू या.

पहिले वाचन १ शमुवेल ३:३६-१०-१९.

शमुवेल छोटा बालक होता. ऐलीचा मान-सन्मान करून ऐली सांगेल ती कामे विश्वासाने करून तो देवाची सेवा करीत असे (३:१). शमुवेलाने आपल्या बालपणातच एक उत्तम गुण आत्मसात केला होता, तो म्हणजे आज्ञाधारकता म्हणूनच ऐली जे सांगेल त्यास तो आज्ञा मानीत असे. ज्या-ज्या वेळेस शमुवेलास हाक ऐकू येते त्या-त्या वेळेस तो ऐलीकडे आज्ञाधारकतेने ऐलीकडे उठून जातो (३:४, ३:६, ३:८) आणि सरतेशेवटी ऐली शमुवेलास आज्ञा देतो की, पुन्हा तुला हाक ऐकू आली तर म्हण, “प्रभू बोल! तुझा दास ऐकत आहे”.
ह्या हृदयस्पर्शी पाचारणाद्वारे देवाने शमुवेलाला आपला संदेष्टा म्हणून अभिषिक्त केले. देवाचे वचन शमुवेलाला नियमितपणे प्राप्त होत असे आणि शमुवेलाकडून ते इस्रायेलच्या सर्व लोकांना समजत असे (३:१९-२१, ४:१).

दुसरे वाचन करिंथ ६: १३c- १५a -१७-२०.

पौल करिंथकरांस आवर्जून सांगतो की, शरीर हे जारकर्मासाठी नाही. तर ते प्रभूच्या गौरवासाठी प्रत्येक व्यक्तीने समर्पित केले पाहिजे. ‘माझा देह’, ‘माझे शरीर’ असे कोणीही ख्रिस्ती व्यक्तीला कधी म्हणता येणार नाही कारण त्याला ख्रिस्ताने  किमंत मोजून विकत घेतले आहे; म्हणजेच ख्रिस्ताच्या मरणाने खंडणी भरून सोडवून घेतले आहे. आपल्या शरीराद्वारे देवाचे गौरव करणे, देवाला मान देणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे आणि पवित्र शास्यामध्ये घालून दिलेल्या नातेसंबधाच्या मर्यादेत इतरांशी सामाजिक व वैवाहिक नाते जोडल्याने ते साध्य होणार आहे ह्याची हमी संत पौल करिंथकरांस देतो.

शुभवर्तमानयोहान १:३५-४२.

सर्व प्रजा तारणाऱ्याची वाट पाहत होती. हा तारणारा येऊन रोमी सरकारच्या सत्त्येतून सुटका करील अशी त्यांची आशा होती. अश्या बिकट परिस्थितीत योहान बाप्तीस्ता मोठ्या सामर्थ्याने संदेश देत होता, ह्यास्तव योहानच तारणारा असावा असे वाटून येरुश्लेमेतल्या यहुद्यानी योहानाकडे पुरोहित व लेवी पाठवून विचारणा केली , ‘आपण कोण आहा?’ (योहान१:१९,१:२२) ह्या प्रसंगी योहानाने येशू ख्रिस्ताविषयी साक्ष दिली, त्याच्या पादत्रानाचे बंध सोडण्याची माझी लायकी नाही, (योहान१:२-६).
निर्भीडपणे योहान प्रभू येशू ख्रिस्तास “देवाचे कोकरू” ही उपमा दोन वेळेस वापरतो(योहान१:२९), वचन१:३५ मध्ये ‘देवाचे कोकरू’ ही उपमा योहान पुन्हा वापरतो. येशूच्या मागे गेलेल्या दोघा शिष्यांना योहानाने वापरलेल्या उपमेचे मर्म थोडेफार समजले होते, आणि योहानाने ज्याच्याकडे निर्देश केले होते त्याचे थोडे तरी महत्व त्यांना समजले होते, हाच ह्या पुनरुवुत्तीचा उद्देश आहे.
योहानाच्या साक्षीमुळे योहानाच्या दोन शिष्यांना ख्रिस्ताची ओळख व्हावी असे वाटू लागले व ते येशूच्या मागोमाग निघाले (योहान १:३७). त्यांचे येशूच्या मागे-मागे येणे येशूच्या निदर्शनास येताच येशूने त्यांना विचारले, “तुम्ही काय शोधता?”( योहान १:३८).
येशू ख्रिस्ताच्या ह्या प्रश्नाला त्या दोन शिष्यांचे उत्तर व त्यांनी त्याला ‘रब्बी’ म्हणून संबोधले यावरून ख्रिस्ताच्या मागे-मागे जाण्यात त्या दोन शिष्यांना येशू ख्रिस्ताला जाणून घेण्याची आस्था होती असे दिसून येते. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहून त्यांनी ख्रिस्ताच्या सानिध्याचा अनुभव घेतला व येशू ख्रिस्त हाच तारणारा आहे ते त्यांनी ओळखले आणि त्यांची खात्री पटली. त्यांना इतका आनंद झाला की आंद्रीयाला पहिल्यांदा त्याचा सख्खा भाऊ शिमोन भेटला असता आंद्रिया ख्रिस्ताविषयी साक्ष देताना म्हणतो, “आम्हाला मशीहा सापडलेला आहे!”(योहान१:४१). आंद्रिया ख्रिस्ताविषयी फक्त साक्षच देत नाही तर तो शिमोनाला प्रभू येशूकडे घेऊन येतो.(योहान१:४२). 
  
  बोधकथा:

डायक्लोशियन या क्रूर सम्राटाच्या काळात मार्सेलिनस नावाचे धर्मगुरु कार्य करीत होते. पिटर ह्याला दुष्टात्मा निवारणाचे अदभूत सामर्थ्य लाभलेले होते. या दोघांना सम्राटाने त्यांच्या श्रद्धेपायी तुरुंगात टाकले होते. त्या तुरुंगात अनेक ख्रिस्ती लोक आपल्या श्रद्धेपायी दु:ख वेदना सहन करीत होते. मार्सेलिनस आणि पिटर ह्यांनी तुरुंगातील लोकांना ख्रिस्ती शिकवणुकीचे धडे दिले. त्याचा परिणाम असा झाला की हे कैदी आनंदाने आपली शिक्षा भोगू लागले ते पाहून तेथील तुरूंग अधिकारी- आर्थिमिऊस हा ख्रिस्ती झाला.
पिटर व मार्सेलिनस ह्यांना मुत्युदंडाची शिक्षा फरर्मावण्यात आली. तुरुंगातील कैद्यांकडून प्रतिकार होऊ नये म्हणून दोघांना सिल्वा नायाग्रा नामक जंगलात नेण्यात आले. तिथे त्यांच्या मारेक-यांनी त्यांच्या खाचा आधीच तयार करून ठेवलेल्या होत्या. कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तींना त्यांची थडगी मिळू नयेत अशी त्यांची योजना होती. परंतु काही कालांतराने ह्या दोन रक्तसाक्ष्यांच्या मारेक-यांचेच परिवर्तन होऊन ते ख्रिस्ती झाले व त्यांनीच ह्या खाचा सर्व ख्रिस्ती लोकांना दाखविल्या.

मनन-चिंतन:

प्रिय भाविकानो आजची उपासना आपणा सर्वांस देवाची वाणी ऐकण्यास व देवाच्या प्रेमाची साक्ष जगजाहीर करण्यास आमंत्रण देत आहे.
     आपण आपले दैनंदिन जीवन जगत असताना अनेक वेळा देव आपल्याला साद घालीत असतो परंतु आपण ह्या जागतिक मोह-मायामध्ये इतके रमून गेलेलो असतो की देवाची प्रेमळ हाक आपल्या हृदयापर्यंत पोहचतच नाही. ज्या प्रमाणे आजच्या पहिल्या वाचनामध्ये शमुयेलने देवाची हाक ऐकली त्याप्रमाणे आपणसुद्धा ऐकली पाहिजे. शमुवेल हा सुस्वभावी, नम्र, आणि आज्ञाधारक होता. ह्या त्याच्या सुस्वभावामुळेच जेव्हा त्याला तीनवेळा हाक ऐकण्यात येते तेव्हा तो तिन्ही वेळेस ऐली जवळ नम्रपणे जाऊन विचारतो, “काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली”. नंतर ऐली शमुवेलास आज्ञा देतो कि, ‘जेव्हा परत तुला हाक ऐकण्यास येईल तेव्हा माझ्याकडे न  येता असे म्हण की, “हे परमेश्वरा, बोल तुझा दास ऐकत आहे” आणि जेव्हा शमुवेल ऐलीच्या आज्ञेप्रमाणे वागतो तेव्हा त्याला देवाच्या वाणीची जाणीव होते, व देव शमुवेलास प्रवादी म्हणून अभिषिक्त करतो. शमुवेल देवाच्या वचनाशी एकनिष्ठ होता. देवाचे वचन शमुवेलला नियमितपणे प्राप्त होत असे आणि ह्याच देवाच्या वचनाची साक्ष तो इस्राएल लोकांना देत असे.
         ज्याप्रमाणे देवाने देवाच्या वचनांची साक्ष देण्यासाठी शमुवेलास पाचारण केले त्याचप्रमाणे आजच्या शुभावार्तामानामध्ये येशू ख्रिस्ताने आपल्या पहिल्या शिष्यास पाचारण केले. योहानाच्या उपदेशावरून योहानाच्या शिष्यांमध्ये येशू ख्रिस्तास जाणून घेण्याची तीव्र आस्था निर्माण झाली होती. ह्याच आस्थेपोटी आंद्रिया येशूच्या पाऊलखुणांचा मागोवा घेतो. येशू ख्रिस्त जेव्हा विचारतो, “तुम्ही काय शोधता”? तेव्हा ते नम्रपणे ख्रिस्तास विचारतात, “रब्बी आपण कुठे राहता”?
         ‘या आणि पहा’ ह्या ख्रिस्ताच्या प्रतिउत्तराला आंद्रिया कसलाही विचार न  करता संपूर्ण हृदयाने व मनाने ख्रिस्ताच्या मागोमाग जाऊन, ख्रिस्ताच्या सहवासाचा व प्रेमाचा अनुभव घेतो. येशूख्रिस्त हा जगाचा तारणारा, “मशीहा” आहे हे सत्य तो जाणून घेतो आणि ह्याच सत्याची साक्ष तो आपला सख्खा भाऊ शिमोन ह्यास देतो. इतकेच नव्हे तर तो शिमोनास ख्रिस्ताजवळ  घेऊन जातो.
         आपण आपल्या जीवनाच्या पहिल्या श्वासापासून ते जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत देवाचे प्रेम अनुभवत असतो. आपल्या दैनंदिन जीवनात, संसारात, आणि आपल्या प्रत्येक सु:ख-दु:खात आपण देवाच्या प्रेमाचा अनुभव घेत असतो; अंधाऱ्या मार्गी तो आपल्याला प्रकाश देतो, दु:खाच्या लहरीत तो आपल्याला सावरतो, थकल्या भागल्या मनाला तो विसावा देतो, हरवलेल्यांचा तो शोध घेतो, निराश्रीतांस तो आश्रय देतो, भुकेल्यांस तो अन्न देतो, तहानलेल्यांस तो जीवनदायी पाणी देतो आणि सर्व आनिष्टांपासून तो आपले प्रेमाने संरक्षण करतो. अशा सर्व प्रकारच्या परिस्थितीत आपण देवाच्या प्रेमाची साक्ष आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाद्वारे जगजाहीर करतो का?
         आजच्या या आधुनिक युगात आपले अनेक ख्रिस्ती बांधव वेगवेगळ्या अन्याय-अत्याचाराला नीडरपणे सामोरे जात आहेत. जे ख्रिस्ताचे प्रेम त्यांनी त्यांच्या जीवनात अनुभवले आहे त्याच प्रेमाखातीर, विश्वासाने आणि संयमाने हे लोक अनेक प्रकारच्या अन्यायाला सामोरे जात आहेत. वेळप्रसंगी देवाच्या प्रेमाची साक्ष देता देता आपल्या प्राणाची आवृत्ती सुद्घा देत आहेत.
         आजची उपासना आपणा सर्वाना देवाची वाणी ऐकण्यास, आपल्या जीवनात ख्रिस्ताचा शोध घेण्यास आणि ख्रिस्ताचे प्रेम अनुभवयास आवाहन करीत आहे. आजच्या शुभावार्तामानाद्वारे ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना विचारले, “आपण काय शोधता?”. हाच प्रश्न येशू ख्रिस्त आज आपणा सर्वांस विचारत आहे. ज्याप्रमाणे शिष्य, मशीहाच्या शोधात होते, त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनात ख्रिस्ताच्या शोधात आहोत का? आणि आपल्याला ख्रिस्त सापडल्यावर आपण ख्रिस्ताची साक्ष जगजाहीर करतो का?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद – कर दानांचा वर्षाव देवा, कर दानांचा वर्षाव
. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, बिशप्स, सिस्टर्स आणि सर्व प्रापंचिक लोक ह्या सर्वांना, देवाच्या प्रेमाची साक्ष जगजाहीर करण्यासाठी कृपा-शक्ती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
. आपल्या देशातील अन्याय-अत्याचाराचे वातावरण दूर व्हावे व सर्वांनि भेदभाव विसरुन आपल्या कुटुंबात, समाजात आणि देशात शांतीचे वातावरण प्रस्थापित करावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
. जे लोक वाईट व्यसनांच्या अधीन झालेले आहेत, अशा सर्व लोकांना वाईट व्यसनांपासून परावृत्त होण्यासाठी प्रभूचे ध्येर्य-सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
. प्रभूच्या कृपेने निराशितांना आश्रय, पिडितांना आरोग्य, दुखीतांना सहारा, आणि भुकेल्यांस अन्न लाभावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
. आपण सर्वांनी आपल्या जीवनात ख्रिस्ताचा शोध एकनिष्टेने करावा व ख्रिस्ताच्या प्रेमाची साक्ष आपल्या दैनंदिन जीवनाद्वारे इतरांना द्यावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
. आता आपण आपल्या हृदयातील अव्यक्त गरजा प्रभू चरणी समर्पित करुया.








Wednesday, 7 January 2015

Reflections for Homily By: Suresh Alphonso




प्रभू येशूचा स्नानसंस्कार


दिनांक: ११/०१/२०१५.
पहिले वाचन: यशया ५५:१-११
दुसरे वाचन: १ योहान ५: १-९
शुभवर्तमान: मार्क १: ७-११

“तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे”


प्रस्तावना:

     आज ख्रिस्तसभा प्रभू येशूच्या स्नानसंस्काराचा सण साजरा करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा, ‘परमेश्वर वैभवयुक्त आहे व तो इस्त्रायलचा पवित्र प्रभू आहे’ असे सांगतो. येशू हा खिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मला आहे असे दुसऱ्या वाचनात सांगितलेले आहे. तर शुभवर्तमानात आपण प्रभू येशूच्या बाप्तिस्माविषयी ऐकतो जेथे पवित्र आत्मा प्रभूयेशूवर उतरतो व त्याचा स्वर्गीय पिता, ‘प्रभू येशू ख्रिस्त हा त्याचा परमप्रिय पुत्र आहे’ असे जाहीर करतो.
स्नानसंस्कार हा आपल्या ख्रिस्ती जीवनातील महत्वाचा संस्कार आहे. त्याद्वारे आपली ख्रिस्ती श्रद्धेत व विश्वासात वाढ होत असते. हीच ख्रिस्ती श्रद्धा अधिक दृढ होण्यासाठी लागणारी कृपा-शक्ती आपणास मिळावी म्हणून आजच्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ५५:१-११.
     यशया संदेष्टा आपणास परमेश्वराकडून आपण सर्वांस मिळणाऱ्या ‘दयेच्या मोफत देणगीविषयी’ सांगतो. यशया संदेष्टा हा देवाने त्याच्या सेवेसाठी व लोकांच्या तारणासाठी निवडलेला होता. त्याने देवाची ओळख लोकांना पटवून दिली. म्हणूनच यशया संदेष्टा लोकांना आवाहन करतो की, “अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैसा नसलेले तुम्ही या; सौदा करा, खा; या, पैश्यावाचून व मोलावांचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा!” (यशया ५५:१) असे आवाहन फक्त जो देवाचा माणूस आहे, ज्याचा देवावर दृढ विश्वास आहे असाच माणूस करू शकतो. अश्याच प्रकारच्या विश्वासामुळे देवाने त्याला निवडिले होते.

दुसरे वाचन: १ योहान ५:१-९.
योहान आपल्याला ख्रिस्ताच्या शिष्यांची श्रद्धा किती मजबूत आहे हे सांगतो. योहान म्हणतो, ‘येशू हा ख्रिस्त आहे, असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे.’ आपण जेव्हा देवावर प्रीती करितो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा आपल्याला कळून येते की, आपण देवाच्या मुलांवर प्रीती करितो.

शुभवर्तमान: मार्क १:७-११
     मार्ककृत शुभवर्तमानात आपण बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश ऐकतो. योहानाने येशूच्या येण्याचा मार्ग कसा तयार केला हे पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र होता व जगाच्या तारणासाठी त्याला देवपित्याने ह्या जगात प्रेषितीय कार्यास पाठविले होते. ते कार्य व्यवस्थित करण्यासाठी प्रभू येशूच्या जन्माअगोदर देवपित्याने अनेकांना पाठविले होते. अनेक संदेष्टे व प्रवक्ते तयार केले होते व त्यातील योहान हा एक संदेष्टा होता. ज्याने देवाच्या इच्छेप्रमाणे येशूच्या येण्याचा मार्ग मोकळा केला. त्याने लोकांची मने बदलली व त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रगट झाला. त्यामुळे सगळा यहुदीया देश व सर्व येरूसलेमकर त्याच्याकडे ओढले गेले व त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत योहानाद्वारे बाप्तिस्मा घेतला. पुढे योहान म्हणतो, “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला खरा; तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे.” कारण येशूचे कार्य हे योहानाच्या कार्याहून सर्वस्वी वेगळे होते.
     त्यानंतर येशूचा बाप्तिस्मा योहानाच्या हातून यार्देन नदीत झाला आणि लागलेच पाण्यातून वर येताना आकाश उघडले व कबुतरासारखा आत्मा येशूवर उतरला व देववाणी झाली, “तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे”. ह्यावरून येशू देवाचा पुत्र होता हे स्पष्ट होते व येथूनच येशूच्या नविन मिशनकार्याला सुरुवात होते.

बोधकथा:

एक विधवा कबाडकष्ट करून मोठ्या श्रध्येने परमेश्वरी जीवन जगत होती. तिची सातही लेकरे प्रभूच्या श्रध्येने वाढलेली. एक दिवस तिथल्या राजाने हुकुमाद्वारे खऱ्या देवाची भक्ती करण्यास मनाई केली. त्यामुळे विधवा व तिची सातही मुले खऱ्या विश्वासापासून तसूभरही ढळली नाहीत. परिणामी राजाने सर्वांना ठार करण्याचा आदेश दिला. पहिल्याला जेव्हा ठार करण्यात आले तेव्हा त्याला खऱ्या देवापासून दूर करण्यासाठी डाव खेळण्यात आला. पण तो वदला नाही. असे सहाही पुत्र ठार केल्यानंतर राजाने सातव्य मुलाकडे येत त्या विधवा बाईला सांगितले की हा तुझा शेवटचा घराण्याचा वारस. माझ्या आदेशाप्रमाणे वागल्यास तुम्ही दोघेही वाचू शकाल, पण विधवा मोठी श्रद्धावंत तितकीच हजार जबाबी. तत्काळ ती आपल्या मुलाला म्हणाली, “ तुझे सहाही भाऊ स्वर्गात परमेश्वराच्या राज्यात चिरंतन सुख उपभोगत आहेत. तू या राजाच्या आदेशला जुमानू नकोस आणि तसेच झाले. सातव्या मुलाने आदेश नाकारल्यावर तत्काळ त्याचा वध करण्यात आला. त्या विधवेने नक्कीच आपल्या मुलाविषयी “मी संतृष्ट आहे” असे म्हटले असेल. धन्य ती बाई व तिचा विश्वास.

मनन चिंतन:

मार्कचे शुभवर्तमान येशूचा स्नान-संस्कार कसा झाला व योहानाचे त्याच्या येण्याची कशी तयारी केली हे सांगत आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करा व बाप्तिस्मा घ्या अशी घोषणा करत त्याने अरण्यात घोषणा केली कारण इस्रायलचे संदेष्टेही हाच सुपरिचित संदेश देत असत. हाच संदेश योहानाने लोकांना दिला परंतु तो वेगळ्या पद्धतीने तसेच त्याने प्रभूच्या येण्याचा मार्ग तयार केला. त्यामुळे तेथील लोकांचे त्वरित हृद्यपरिवर्तन झाले व त्यांनी लगेच योहानाकडून बाप्तिस्मा घेतला.
परंतु योहान इतक्यावरच थांबला नाही. तर त्याने प्रभू येशू येण्याचा आपल्याला संदेश दिला. म्हणूनच योहान घोषणा करताना म्हणत असे माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्यामागून येत आहे, त्याच्या पायतनाचा बंध लवून सोडण्याची देखील पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केलेला आहे. तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. येथे आपणांस योहानाचा नम्रपणा जाणवतो कारण त्याला माहित होते की माझ्या मागून येत आहे तो दुसरा कोणी नसून जगाचा तारणारा प्रभू येशु ख्रिस्त आहे. ह्याची त्याला पूर्ण जाणीव होती, त्यामुळे त्याने त्याचा मार्ग तयार केला. पण त्याच्यानंतर जो येणार तो आत्म्याने अंतकरने शुद्ध व नवीन करणार होता. त्यामुळे येथे आपणास येशूचे कार्य हे योहानापेक्षा वेगळे व सामर्थ्याने होते हे दिसून येते.
म्हणूनच प्रभू येशू गालीलातील नाझरेथहून आला तेव्हा त्याने योहानाच्या हातून यार्देनेत बाप्तिस्मा घेतला येशू जरी देवाचा पुत्र होता तरी त्याने श्रेष्ठपणा दाखवला नाही व नम्रपणे योहानाकडून बाप्तिस्मा घेतला. त्यामुळे येशू मानव होता हे आपणास दिसून येते. तसेच तो देवपुत्र असल्यामुळे लागलेच पाण्यातून वर येताना आकाश विदारले व आत्मा कबुतरासारखा त्याच्यावर उतरताना येशूला दिसला व आकाशवाणी झाली की “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्या विषयी मी संतृष्ट आहे.” देवाचा कृपाशीर्वाद त्याच्यावर येतो. व इथूनच प्रभूयेशुच्या प्रेषितीय कार्याची सुरुवात होते. येथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते.
आज पवित्र देऊळमाता ख्रिस्ताच्या बाप्तीस्माचा सण साजरा करीत आहे. ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या बाप्तीस्म्याची आठवण करून देते. आपल्या सगळ्यांचा बाप्तिस्मा पाण्याने व पवित्र आत्म्याने झालेला आहे. देवाने आपल्या सर्वांना त्याची लेकरे म्हणून निवडले आहे आणि ह्याची साक्ष देण्यासाठी ख्रिस्ताप्रमाणे जगात आपल्याला जगात पाठवले आहे. आपल्याविषयी देव संतुष्ट आहे. आपले आईवडील तसेच धर्म-आईबाप आपल्यासाठी देवाला वचणे देतात. आपण ती वचने आपल्या दररोजच्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे व त्याप्रमाणे वागून आपण जगाला ख्रिस्ताच्या प्रेमाची व दयेची साक्ष देणे गरजेचे आहे.
मदर तेरेसा म्हणत असत, “माझ कार्य अथांग सागरातील एका थेंबाप्रमाणे आहे. मदरचे प्रचंड कार्य पाहता त्यांनी प्रौढी मिरवली असती पण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाप्रमाणे तिच्यात जगावेगळी नम्रता होती. मदरप्रमाणे आपल्याला ही नम्रता धारण करता येणे हे प्रभूच्या कार्यासाठी अगत्याचे आहे.
ख्रिस्त मला त्याच्या कार्यासाठी खूप प्रकारे बोलावत आहे. त्यासाठी चर्च हे उत्तम प्रकारचे कार्य करण्याचे साधन आहे. चर्च सलग्न खुप काही संघटना आहेत. एखाद्या संघटनेत सहभागी होऊन देवाचे कार्य करूया. म्हणजे खरे ख्रिस्ती असल्याचा अभिमान वाटेल. तसेच बाप्तिस्मातला आपला पवित्र आत्मा आपल्याला त्यासाठी प्रेरणा देईल. देवाचे कार्य करण्यासाठी खूप तरुणांनी पुढे यावे व देवाची सुवार्ता सर्वत्र पसरावी म्हणून आपण आजच्या स्नान्संस्काराच्या सणा दिवशी खास प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद : प्रभो आमचा विश्वास दृढ कर
  1.  ख्रिस्तसभेत कार्य करणारे आपले पोप, बिशप्स व इतर सर्व प्रापंचिक लोकांना देवाची सुवार्ता पसरविण्यास कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. आपल्या राजकीय नेत्यांनी आपला स्वार्थीपणा बाजूला ठेवून जन कल्याणासाठी नेहमी कार्य करत राहावे व देशाची नेहमी प्रगती करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3.  आपले सर्व मिशनरी बंधू भागीनींवर देवाचा आशीर्वाद असावा व त्याचे कार्य करण्यास व येणाऱ्या संकटाना सामोरे जाण्यास परमेश्वराकडून प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. जे तरुण तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत, ज्यांना जगण्यात अर्थ उरला नाही व जे इतर वाईट मार्गाला लागले आहेत अश्यांना परमेश्वराने चांगला मार्ग दाखवावा व ते परमेश्वराकडे परत वळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

Thursday, 1 January 2015


 Reflections for Homily By: Baritan Nigrel





प्रकटीकरणाचा सण

दिनांक: ०४/०१/२०१५.
पहिले वाचन: यशया ६०: १-६
दुसरे वाचन: इफीसी ३:२-३, ५-६ 
शुभवर्तमान: मत्तय २:१-१२ 


प्रस्तावना:

ख्रिस्तसभा आज प्रभू येशूच्या प्रकटीकरणाचा म्हणजेच तीन राजांचा सण साजरा करीत आहे. प्रभू येशू या जगाचा प्रकाश आहे. पूर्वेकडील आलेल्या तीन राजांनी आपली दाने ख्रिस्ताला समर्पित करून ह्याच प्रकाशमय ख्रिस्ताचे दर्शन घेतले म्हणून देवाने त्यांचे जीवन प्रकाशमय बनवले.
यशया आजच्या पहिल्या वाचनात आपणांस सांगतो, ‘सर्व राष्ट्रे एक होऊन प्रभूच्या प्रकाशाकडे येतील’. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला देवाच्या प्रकटीकरणाविषयी सांगतो. हे प्रकटीकरण सर्व लोकांसाठी आहे आणि म्हणूनच विदेशीयांना सहवारस व सहसभासद करून संत पौल त्यांचा उल्लेख करीत आहे. तर आजचे शुभवर्तमान आपल्याला तीन राजांची ख्रिस्ताला भेट ह्याविषयी जरी सांगत असेल तरीही शुभवर्तमान हे राजांचा राजा, प्रकाशाचा प्रकाश जो जन्माला आला आहे, त्याच्याविषयी आहे. 
तीन राजांनी ज्याप्रमाणे आपली दाने ख्रिस्ताला समर्पित केली, त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनात ख्रिस्ताच्या तेजस्वी प्रकाशाला शरण जाऊन, आपले सर्वस्व त्याच्या चरणी समर्पित करूया तसेच आपल्या व इतरांच्या जीवनात आनंद व प्रकाश निर्माण व्हावा म्हणून आजच्या या पवित्र मिस्स्साबलीदानात प्रार्थना करूया.

पहिले वाचन: यशया ६०: १-६

आजचे पहिले वाचन हे सियोन या माता नगरीला उद्देशून आहे. तिचे पुत्र व कन्या केवळ इस्त्रायलातील पांगलेले नाहीत तर प्रत्येक राष्ट्रातील आहेत. ही सर्व राष्ट्रे प्रकाशात येतील. आणि ज्याप्रमाणे कबुतरे आपल्या खुराड्याकडे आपोआप येतात तसे ते देवाकडे येतील. आणि आशेने देवाकडे पाहतील. हे आपणास यशया संदेष्टा सांगत आहे.

दुसरे वाचन: इफीसी ३:२-३, ५-६ 

यहुदी लोकांना वाटत होते की, ‘ते देवाची निवडलेली माणसे आहेत’. म्हणून संत पौल दुसऱ्या वाचनात ‘विदेशी लोकांचा देवामध्येच समावेश आहे’ या बाबीवर विशेष भर देतो कारण दुसऱ्या जातीतील लोकांना प्रभूच्या राज्यात वारसा मिळावा व त्यांनीसुद्धा त्या एकाच शरीराचे अवयव व्हावे आणि त्यांना ही ख्रिस्ताची अभिवचने मिळवावीत असे पौलाला वाटते. देवासाठी सर्व लोक एक समान व प्रिय आहे. आपण प्रेषितांची कृत्ये १०: ३४-३५ मध्ये एकतो, ‘देव तोंड पाहून माणसांना वागवीत नाही तर जे त्याला भितात व त्याच्या इच्छेप्रमाणे योग्य तेच करतात – मग ते कोणत्याही वंशाचे व जातीचे असो. देवाला त्या व्यक्ती मान्य व प्रेमळ असतात’.

शुभवर्तमान: मत्तय २:१-१२

‘येशू’ हा जुन्या करारातील देवाने वचन दिलेला इस्त्रायलचा तारणारा आहे. तो इस्त्रायलचा राजा आहे असा विषय मत्तयच्या शुभवर्तमानात मांडला आहे. भविष्यवाद्यांनी भाकीत केलेला तारणारा आणि राजा हा येशूच आहे आणि त्याचे आपण मनोभावे स्वागत करावे व आपण विश्वास ठेवावा असे मत्तय आपल्या वाचकांना आवर्जून सांगत आहे. 
आजच्या शुभवर्तमानात जे मागी लोक ख्रिस्ताला भेट देण्यास येतात ते ज्योतिषी होते. ग्रहताऱ्यांचे सूक्ष्म निरीक्षण आणि अवलोकन यांच्या आधारे ते आपले निष्कर्ष काढीत. पूर्वेकडील प्रदेशात ग्रहताऱ्यांचे निरीक्षण व गणिते करून पॅलेष्टाइन देशात राजकुळात महत्त्वपूर्ण व्यक्तीचा जन्म झाल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. अर्थात या ‘बाळराजाच्या’ भेटीसाठी थाटामाटाने जाणे त्यांना अगत्याचे वाटले कारण देवाचे हे त्यांना अस्सल प्रकटीकरण होते.

बोधकथा:

     एकदा एक तरुण मुलगा मुलीच्या पाठीमागे चालत होता. त्या मुलीने त्या मुलाला पहिले. आणि धाडस करून त्याला विचारले,’माझापाठलाग तू का करतोस?’ मुलाने सांगितले, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, मुलीला आश्चर्य वाटले. ती त्याला म्हणाली माझ्या पाठीमागे येणारी मुलगी माझी बहिण आहे, ती माझ्यापेक्षा अधिक सुंदर आहेआहे. तू जा आणि तिला बघ.
     त्या मुलाने कुठलाही विचार न करता घाईमध्ये पाठीमागे तिच्या बहिणीला बघायला गेला. जेंव्हा त्याने येणाऱ्या मुलीला पहिले तेंव्हा त्याला आश्चर्याचा धाक्का बसला. ती मुलगी सुंदर नसून एकदम दुर्मिळ व विचित्र दिसत होती. रागामध्ये तो मुलगा परत पहिल्या मुलीकडे धावत गेला आणि विचारले, ‘तु मला खोटे कशाला बोलली?’ तिने न घाबरता प्रत्युत्तरदिले, ‘तर मग तु मला सत्य कधी सांगितले तू माझ्यावर प्रेम करतो. जर तुझे खरोखर माझ्यावर प्रेम असते तर तू दुसरी मुलीच्या शोधात पाठीमागे गेला नसता.
      येशू ख्रिस्त, राजांचा राजा, प्रकाशाचा प्रकाश जन्माला आला हि बातमी ऐकल्यावर ते तीन राजे त्याच्या शोधात निघाले तेंव्हा त्यांच्या मार्गावर अनेक अडथळे आले, कधी-कधी ते रस्ता विसरले पण ते कधी गोष्टीतील मुलाप्रमाने पाठीमागे फिरले नाही. त्यांना ख्रिस्ताचा प्रकाश त्याच्या अंगी स्वीकारायचा होता म्हणून ते पाठीमागे अंधारात फीरले नाहीत. देवाने दाखविलेल्या ताऱ्याच्या मदतीने त्या तीन राज्यांना ‘जगाचा सुपरस्टार’ शेवटी गाईच्या गव्हानीमध्ये गवसला. तिथे होता ख्रिस्त, जगाचा तारणहार. ख्रिस्ताचे दर्शन घेऊन ते आता ख्रिस्ताचे तेजस्वी तारे झाले होते. आणि म्हणूनच जाताना ते ख्रिस्ताचा प्रकाश घेऊन निघाले.
      आपल्या स्वत:ला ख्रिस्त सापडला नसेल तर आपण दुसऱ्यांनाख्रिस्ताकडे आणू शकणार नाही. ख्रिस्त जेव्हा आपल्याला सापडेल तेंव्हा खरोखर आंपण त्याचे तेजस्वी तारे होऊन या जगात प्रकशित होऊ व इतरांना ख्रिस्ताकडे येण्याचा मार्ग दाखवू शकतो. ख्रिस्ताचा शोध करत असताना कधी कधी झंझावाताने आपल्या हातातील कंदील कदाचित विझेल परंतु तो पुन्हा पेटवून आपण आपला मार्ग क्रमन करीत जायला पाहिजे. त्या तीन राजांच्यामार्गावर जेंव्हा ताराअदृश्य झाला तेंव्हा ते घाबरले नाही किंवा परत पाठीमागे फिरले नाही. त्यांनी ख्रिस्ताचा शोध चालूच ठेवला, कारण ते देवापुढे नम्र झाले. देव त्यांच्याबरोबर होता. आपणही जर देवापुढे नम्र झालो तर देव आपली कधीच साथ सोडणार नाही. कुठ्ल्याहि परिस्थितीत तो आपल्याला मार्ग दाखवील.
     आपल्या जीवनाच्या मार्गावर हेरोद राज्यासारखे अनेक काटे येतील. पण जर आपले ख्रिस्तावरील प्रेम खरे असेल तर ते सर्व काटे आपल्याला फुलासारखे वाटतील. आणि एक दिवस नक्कीच आपण ख्रिस्ताला भेटू. आपण ख्रिस्ताला शोधण्याची व भेटण्याची त्या राजाप्रमाणे चिकाटी धरली तर आपण यशाचे धनि बनू. देव आपल्याला नक्कीच ख्रिस्ताचा मार्ग दाखवील.

‘स्टारने दाखविला सुपरस्टार’
मनन चिंतन: मत्तय २:१-१२

नाताळ जवळ आला की आपण गोठयाची तयारी करायला सुरुवात करतो. गोठ्यामध्ये आपण बाळ येशू, योसेफ, मारिया, मेंढपाळ, गुरे-मेंढरे आणि तीन राजे उंटावर ख्रिस्ताच्या दर्शनासाठी येतात, असे सहसा चित्र दर्शवितो. जेव्हा ह्या तीन राजांविषयी आपण ऐकतो व वाचतो तेव्हा आपल्या मनात एक किमया भासते की या राजांना खरोखर बाळ येशूचे दर्शन घेण्याची गरज होती का?
जर आपण वास्तुस्थिती हाताळली तर आपल्या लक्षात येते की, अनेक माणसे दूरवरून राजांना भेटण्यासाठी त्यांच्या दरबारात येतात. राजा कधीच माणसांना भेट द्यायला त्यांच्या घरी जात नाही. मात्र बायबलमध्ये आपण वाचतो कि तीन राजे स्वतः आपल्या दरबारातून बेथलेहमध्ये जन्मलेल्या येशु बाळाला भेटण्यासाठी उत्सुकतेने व आनंदाने निघतात. गावातील लोकांनी त्यांची थठ्ठा केली असेल. ते वेडे झाले आहेत म्हणून कित्येक लोक त्यांच्यावर हसले असतील. पण देवाने जी ख्रिस्ताविषयी सुवार्ता त्यांना प्राप्त केली होती – राजांचा राजा, प्रकाशाचा प्रकाश जन्माला आला आहे, त्याच्यावर त्यांची पूर्ण श्रद्धा होती. म्हणूनच त्यांनी ख्रिस्ताला भेटून नमन करावे अशी चिकाटी धरली. त्यांना खरोखर ख्रिस्ताच्या दर्शनाची गरज होती, कारण जरी ते राजे असले तरी त्यांचे जीवन अंधकारमय होते. त्यांना प्रकाशाची गरज होती. त्यांच्या जीवनात शांती नव्हती, ख्रिस्त शांती देणार होता. त्यांच्या जीवनातील प्रेमाची ज्योत विझलेली होती. ख्रिस्त ती ज्योत त्यांच्या प्रेमाने पेटवणार होता.
येशू ख्रिस्त हा ‘प्रकाशाचा प्रकाश’ व ‘राजांचा राजा’ आहे हे गूढ त्या तीन मागी राज्यांना समजले होते. म्हणून कुठलाही विचार न करता, ते लगेच ख्रिस्ताच्या दर्शनासाठी आपली दाने घेऊन बेथलेहेम गावाकडे निघतात. बायबलमध्ये आपल्याला त्यांच्याविषयी जास्त काही सांगण्यात आलेले नाही. ते तीन राजे ज्ञानवंत, प्रज्ञावंत  होते. ते येशू बाळाचे दर्शन घेण्यासाठी पूर्वेकडून आले. असे सांगतात की, त्या राज्यांची नावे – ग्स्पार, बाल्ताझार आणि मेल्कीऑंर होते. येशू बाळाला भेटण्यासाठी ते रिकाम्या हाताने न येता ते आपल्याबरोबर सोने, धूप व गंधरस आणून  ते येशू बाळाला दान म्हणून भेट करतात. त्या तीन दानांचा अर्थ खालीलप्रमाणे होतो. सोने म्हणजे राजाचा सुवर्ण मुकुट. येशू हा राजांचा राजा आहे म्हणून सोने हे येशूचे राजेपण दर्शवितो. धूप म्हणजे येशूचे देवपण जरी देवशब्द मनुष्य झाला तरी तो देवाचा पुत्र होता. आणि गंधरस म्हणजे येशुचे दु:खसहन जे त्याला मानवाच्या कल्याणासाठी आणि तारणासाठी क्रुसावर मरेपर्यंत सोसावे लागणार होते.
येशु म्हणतो, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.”(मत्तय १६:२४) हे शब्द तीन राजांनी हे ख्रिस्ताचे शब्द ऐकले नाही, तरीही त्यांनी आपला राजदरबार, आपली कुटुंबे आणि प्रजा सोडून ख्रिस्ताच्या दर्शनासाठी आले म्हणजे ख्रिस्ताला नमन करून ते ख्रिस्ताचे शिष्य बनण्यास आले होते. ते पूर्वेकडून ख्रिस्ताचा शुभसंदेश, घेण्यासाठी आले होते. मात्र बेथलेमातून निघताना ते ख्रिस्ताचे मिशनरी व ख्रिस्ताचा प्रकाश बनून परतले ते ख्रिस्ताचे संदेशवाहक झाले.
     परमेश्वर जेव्हा माणसांवर आपल्या कृपेचा वर्षाव करतो, तेंव्हा माणूस स्वत:चा राहत नाही. तसेच जेव्हा माणूस पूर्णपणे ईश्वराला शरण जातो. तेव्हा परमेश्वर त्याच्या जीवनाचा ताबा घेत असतो. हीच अनुभूती तीन राजे आपल्याला देत आहेत. जेव्हा ते देवापुढे शरण होतात तेंव्हा देव त्यांच्या माध्यमातून योग्य रितीने मार्गदर्शन करतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना :-
प्रतिसाद : हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
  1.  ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करीत असलेले आपले पोप फ्रान्सीस, सर्व कार्डीन्ल्स, बिशप्स, धर्मबंधू-धर्मभगिनी व सर्व प्रापंचिक यांना ख्रिस्ताचे योग्य मार्गदर्शन लाभावे व त्यांनी त्यांच्या जीवनाद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश इतरांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. आपण सर्वांनी देवाच्या प्रेरणेने ख्रिस्ताचा शोध खऱ्या मनाने व हृदयाने करावा व आपल्याला जीवनात ख्रिस्ताची शांती व प्रेम मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. जे पापी लोक ख्रिस्ताच्या प्रकाशापासून दुरावलेले आहेत व पापाच्या अंधारात अजूनही भटकत आहेत अश्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा व त्यांच्या जीवनात आशेचा व ख्रिस्ताच्या प्रेमाचा किरण प्रकाशित व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4.  देव हा सर्वाचा एक आहे. हि भावना अखिल मानव-जातीच्या मनात रुजावी व सर्वांनी एक जुटीने, आनंदित, प्रेमान जगावं म्हणून आपण प्रार्थना करूया.