Thursday, 21 September 2017

Reflection for the Homily of 25th Sunday in Ordinary Time  
(24-09-2017)  By Godfrey Patil. 







सामान्य काळातील पंचविसावा रविवार




दिनांक: २४/०९/२०१७
पहिले वाचन: यशया ५५:६-९
दुसरे वाचन: फिलीपीकरांस १:२०-२४,२७
शुभवर्तमान: मत्तय २०: १-१६






प्रस्तावना :

     आज देऊळमाता सामान्य काळातील पंचविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला स्वर्गराज्य मिळविण्यासाठी दैवी उदारता व दानशूरता अंगी बाळगण्यास आमंत्रण देत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपल्याला देवाची कल्पना तुमची कल्पना नव्हेत, त्याचे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत ह्या विषयी साक्ष देत आहे. तर आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणाला स्वर्गराज्यासाठी व देवासाठी संपूर्ण आयुष्य बहाल करण्यास आव्हान देत आहे. तसेच आजच्या मत्तयलिखीत शुभवर्तमानात प्रभू येशूख्रिस्त दाखल्याद्वारे देवाच्या उदारपणाचे व दानशूरतेचे विवेचन केलेले आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे शुभवर्तमानाच्या दुसऱ्या टप्यात स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर न करण्याचा इशारा ख्रिस्त देत आहे.
     आज मिस्साबलिदानात सहभागी होत असताना आपणाला देवाच्या उदारपणाचे, त्याच्या प्रेमाचे व क्षमेचे दान मिळावे म्हणून विशेष प्रार्थना करूया.

पहिले वाचन : यशया ५५:६-९

     आजच्या पहिल्या वाचनात प्रेरक गणला जाणारा देवाचा संदेष्टा यशया ह्याच्याद्वारे देव सर्वांसाठी त्याच्याजवळ येण्याचा मार्ग मोकळा करत आहे व त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यास प्रोस्ताहन देत असून, पापी लोकांस पाप सोडून नितीमत्व अंगी बाळगण्यास तसेच स्वत:च्या कल्पना सोडून देवाचे विचार व कल्पना सिद्धीस नेण्यास जणू प्रेरणादायी उपदेश करत आहे. यशया संदेष्ट्याद्वारे देव सर्वाना स्वत:कडे बोलावत असून, देव म्हणतो की, “तुम्ही मजकडे या, मी क्षमाशील आहे; माझ्या विचारांना, माझ्या कल्पनांना तुमच्या जिवनात स्थान द्या, माझ्या मार्गावर चाला, म्हणजे स्वर्गराज्यात तुमचा समावेश केला जाईल.” येथे आपणास देवाची उदारता दिसून येते. आपल्या प्रत्येकाच्या तारणासाठी खुद्ध देव यशया संदेष्ट्याद्वारे तारणदायी संदेश आजच्या पहिल्या वाचनात देत आहे.  

दुसरे वाचन : फिलीपीकरांस १:२०-२४,२७

     आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल फिलिपीकरांस ख्रिस्ताला पांघरण्याचा, ख्रिस्तामध्ये जीवन जगून खुद्ध ख्रिस्त बनण्याचा इशारा देत आहे. ख्रिस्ताची सुवार्ता अंगी धारण करून जगणे किवा मरणे हे केवळ ख्रिस्तासाठीच असले पाहिजे, व शेवटी जगताना ख्रिस्तासमवेत जगावे तर मरताना ख्रिस्त इतरांना देणे ह्या दोन बाबींचे अतिशय उत्कृष्टपणे वर्णन केलेले आपणाला दिसून येते. आपल्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा हा नक्कीच होतो. परंतू, आपल्या चांगल्या कार्याने मरणानंतर देखील त्याचा गौरव होऊ शकतो म्हणून संत पौल आवर्जून सांगतो की मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे.

शुभवर्तमान : मत्तय २०:१-१६

     मत्तयलिखीत शुभवर्तमानातून घेतलेल्या आजच्या वाचनात प्रभू येशू ख्रिस्त एका दाखल्याद्वारे स्वर्गराज्याचे भागीदार होण्यास आमंत्रण देत आहे, तसेच नीतिमान व पापी ह्यांच्यातील भेदाची तफावत नष्ट करित आहे. देव कधीच भेदभाव करीत नाही. सर्वाना तो समानतेने वागवतो. अशाप्रकारे प्रेमाच्या व क्षमेच्या उदारतेने व दानशूरतेने देव आपणा प्रत्येकास स्वर्गराज्याचे हक्कदार होण्यास पात्र ठरवत आहे. शुभवर्तमानाच्या दुसऱ्या भागात स्वतःची दुसऱ्याबरोबर तुलना न करता, स्वतःला श्रेष्ठ न समजता, दुसऱ्याच्या कमीपणात स्वतःचे योगदान देऊन समाजात जणू समानता प्रस्थापित करण्याचा संदेश ख्रिस्त आपणास देत आहे. अशाप्रकारे उदारता, दानशूरता व समानता ह्या तत्वाच्या माध्यमातून ख्रिस्त आपणास स्वर्गराज्यासाठी झटण्यास आव्हान देत आहे.    

बोध-कथा :

     श्रीमंत घराण्यातील एक देखणी बाई धर्मगुरूकडे येते आणि म्हणते की माझ्याकडे खूप संपत्ती व पैसा आहे. सर्व काही जे मला हवं आहे त्याची काहीच कमतरता नाही, परंतू, कुठेतरी मानसिक सुखाची उणीव मला भासत आहे, कुठेतरी मला माझे हे जीवन असमाधानी वाटत आहे. तिचे हे सर्व बोलणे ऐकून धर्मगुरूंनी चर्चमध्ये काम करणाऱ्या बाईला बोलावले व तिच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाचे कथन करावयास सांगितले. ती म्हणाली की दोन वर्षा अगोदर माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला व लगेच त्याच्या तीन महिन्यानंतर माझा मुलगा अपघातात मरण पावला. त्या क्षणा पासून मी हसणे विसरली होती व माझ्या जीवनात जणू दुःखाची मालिकाच सुरु झाली होती. खूप वेळा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. एके दिवशी मी घरात काम करत असता एक छोटस मांजरीचं पिल्लू आवाज करत घरात शिरलं, त्याच्या आवाजावरून मला जाणवल की हे पिल्लू खूप भुकेलेल आहे. मी स्वयपाक घरात गेली व थोडस दुध त्या मांजरीच्या पिल्लाला दिले. दुध पिऊन झाल्या नंतर त्या पिल्लाने हळूवारपणे माझ्या पायाला स्पर्श करायला सुरवात करून मला जणू स्मित हास्स दिले. मग मी त्या पिल्लाला माझ्या वेंगेत  घेऊन त्याच्याशी जणू खेळायला लागली त्या क्षणाला मला कळून चुकल की मी कुठेतरी माझ दुख विसरत चालली आहे. मी विचार करायला लागली की मी दिलेल्या त्या एक प्याला दुधाने मला खरंच आनंद झाला. तेव्हा पासून मी विचार केला की माझ्याकडे जे काही आहे ते मी इतरांना देईन व मी ते करायला सुरवात केली. मी गरजवंताना मदतीचा हात पुढे केला, आजाऱ्यानां भेटी द्यायला सुरवात केली. आज मला असं वाटते की माझ्या जीवनात सुरु झालेली ती दुख:ची मालिका संपलेली आहे, मला तर असं वाटते की माझ्या इतका आनंदी ह्या जगात कोणीच नसेल. हे सर्व ऐकून त्या श्रीमंत बाईचे डोळे पाण्याने भरून आले व तिने आपली संपत्ती गरिबांना दान करण्याचे ठरवले.

मनन-चिंतन :

ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत,
ज्यांचे स्वर जुळूनी आले त्यांनी दोन गाणी द्यावीत,
ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे,
शेवटी उदारपणात आपले सर्वस्व ख्रिस्ताप्रमाणे दुसऱ्यास द्यावे.

       दानशूरता व उदारता आपणा प्रत्येकाच्या अंगी धारण करण्यास ख्रिस्त आपल्याला बोलावत आहे. शुभवर्तमानातील दाखल्याद्वारे ख्रिस्त सर्वाना समानतेने वागवून जणू स्वर्गराज्यातील समानतेची व दैवी उदारपणाची प्रचिती प्रतिबिंबित करीत आहे. पहाटेस आलेल्या मजुरास एक रुपया व अकराव्या तासास आलेल्या मजुरास देखील एकच रुपया, असा त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला. मानवी दृष्ट्या हा अन्याय झालेले दिसतो, पण खरं पाहता हा अन्याय मुळीच नाही. कारण मालकाच्या व मजुराच्या ठरावानुसार योग्य तेच पहिल्यास व शेवटच्यास मिळाले. ठराव करून मालकाने मजुरी जर का कमी दिली असती तर अन्याय झाला असता पण ठरवल्याप्रमाणे योग्य तिच मजुरी मालकाने दिली. शेवटच्याला पहिल्या इतकेच देणे हे मालकाच्या दानशूरतेचे लक्षण आहे.
येशू ख्रिस्ताच्या काळात एक दिवस जर का मजुराला काम मिळाले नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंब उपाशी राहत असे व ज्याला सकाळीच काम मिळत असे तो आनंदीत होत असे ख्रिस्ताला कामगाराच्या हाल अपेष्टा व उदारनिर्वाहाची पुरेपूर जाणीव होती म्हणून त्याच परिस्थितीला साजेसा असा दाखला ख्रिस्त कथन करतो. ह्या दाखल्यात ख्रिस्ताच्या नजरेत उशिरा येणारे कामगार म्हणजे पापिलोक जे देवशब्द ऐकतात व पश्चाताप करतात आणि सकाळी आलेले कामगार म्हणजे शास्त्री व परुशी जे पाप्यांना कमी लेखतात, जे स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांबरोबर आपल्या श्रेष्ठत्वाची तुलना करतात.
      देव उशिरा आलेल्या कामगारावर समानतेने प्रेम करतो व त्यांना क्षमा करुन स्वर्ग-राज्यात स्थान प्रधान करतो. दोन हजार वर्षा पूर्वी कथन केलेला हा दाखला आज सुद्धा आपल्या प्रत्येकाशी व समाजाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या निगडीत आहे. आज समाजात नजर टाकली तर दिसून येईल की  माणूस उदारता हे ख्रिस्ती तत्व विसरून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी नाती-गोती तर विसरतोच पण त्याच बरोबर कोर्टाची पायरीसुद्धा चढतो. का? कारण आज माणूस फक्त ‘मी आणि माझे’ ह्याच गोष्टीचा विचार करतो व ह्या स्वार्थी वृत्तीमुळे भाऊ भावाला, तर माणूस माणुसकी विसरत चालला आहे. माणसाने स्वार्थीपणाला आलिंगन देऊन उदारता, प्रेम, क्षमा व समानता सारख्या ख्रिस्ती मूल्यांना विसरत चालला आहे. म्हणून देऊळमाता आपणा प्रत्येकाला आजच्या उपासनेद्वारे ख्रिस्ताच्या उदारपणाची आठवण करून देत आहे व स्वर्गराज्याचे भागीदारी होण्यास पाचारण करीत आहे. मग तो आपल्या जिवनातील सुरवातीचा तास असु दे कि शेवटचा. स्वर्गाचे राज्य आपण मिळवू शकतो. गरज आहे ती फक्त देवाच्या मळ्यात निस्वार्थीपणे काम करण्याची व सर्वाना समानतेने वागवण्याची.
      शुभवर्तमानाच्या दुसऱ्या टप्यात तुलनात्मक बाबीचे वर्णन केलेले आपणास दिसून येते. दाखल्यात नमुद केल्याप्रमाणे, जेव्हा मालक कामगारांस समानतेने वागवतो व समान मोबदला देतो तेव्हा पहाटेस आलेले कामगार मालका विरुद्ध कुरकुर करायला लागतात व स्वतःची दुसऱ्या बरोबर तुलना करून स्वतःला श्रेष्ठ समजतात व जणू शास्त्री व परुशाप्रमाणे स्वतःच्या पुण्यत्वाची तुलना इतर पापी लोकांबरोबर करतात. कधीकधी आपण सुद्धा स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांना कमी लेखतो, जेव्हा जेव्हा आपण इतरांना कमी लेखतो तेव्हा तेव्हा आपण शास्त्री व परुशी प्रमाणे स्वार्थात गुंततो. त्याच स्वार्थातून बाहेर पडण्यास आपली देऊळमाता आपणा प्रत्येकाला आजच्या उपासनेद्वारे बोलावत आहे.    
  
विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आमची प्रार्थना ऐकून घे.

१. आज आपण आपल्या पवित्र ख्रिस्तसभेसाठी विशेष प्रार्थना करूया. आपले पोप, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभागिनी व धर्मबंधू यांना प्रभुची सुवार्ता पसरविण्यासाठी भरपूर असा आशिर्वाद मिळावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांवर ख्रिस्ताचा आशीर्वाद यावा व स्वतःला नाकारून जगातील आनंदापासून वंचित राहून जागतिक मोह-मायेचा त्याग करून आपण शुभवर्तमानाच्या मुल्यांप्रमाणे जगावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
 ३. हे प्रभू परमेश्वरा, जी कुटूंबे तुझ्यापासून दुर गेली आहेत व तुझ्या शब्दाचा मान करत नाहीत, त्या सर्वांवर तुझा पवित्र आत्मा पाठव व तुझ्या कृपेने त्यांचे मनपरिवर्तन व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. हे प्रभू परमेश्वरा, आज आम्ही पूरग्रस्तांसाठी प्रार्थना करतो; ह्या आपत्तीतून बाहेर येऊन नवीन जीवन सुरु करण्यास तू त्यांना मदत कर तसेच नव्याने जीवन जगण्यास त्यांना भरगोस अशी मदत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.     

Thursday, 14 September 2017

Reflection for the Homily of 24th Sunday in Ordinary Time  (17-09-2017)  By Isidore Patil. 






सामान्य काळातील चोविसावा रविवार


दिनांक: १७-०९-२०१७
पहिले वाचन: बेनसिराक २७:३०-२८:७
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १४:७-८
शुभवर्तमान: मत्तय १८:२१-३५





"प्रभू ऐकमेकांना क्षमा करण्यास बोलावीत आहे"


प्रस्तावना:

     आज आपण सामान्य काळातील चोविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला परमेश्वराच्या अमर्यादित प्रेमाचा व क्षमेचा अनुभव घेऊन आपल्या दैनंदिन जीवनात ऐकमेकांना क्षमा करण्यास बोलावीत आहे. 
बेनसिरा यांची बोधवचने शेजाऱ्याविषयी कुभावना, संताप व द्वेष ह्यांच्यातून होणारे दुष्परिणाम व्यक्त करतात. म्हणून देवाची कृपा व क्षमा मिळविण्यासाठी हे सर्व सोडून क्षमाशिल होण्यास सांगत आहे. संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात सांगतो की ‘येशू, मरण व पुनरुत्थानाद्वारे मेलेल्यांचा आणि जिवंतांचाही प्रभू आहे.’ मत्तयलिखित शुभवर्तमानात ‘कृतघ्न चाकराच्या दृष्टांताद्वारे’ प्रभू येशू आपणा सर्वाना देवाच्या अपार क्षमाशिलतेचा अनुभव घेऊन जीवनात क्षमा व दया अंगीकारण्यास बोलावीत आहे.            देव प्रेमळ आहे. देवाची दया व क्षमा अनुभवण्यासाठी आपल्याला संताप, कुभावना, द्वेष सोडून देण्याची फार गरज आहे. ह्यासाठी लागणारी कृपा व सामर्थ्य ह्या पवित्र ख्रिस्त यागात सहभागी होत असताना मागूया.

पहिले वाचन: बेनसिराक २७: ३३-२८:९

बेनसिरा आपल्याला सांगतो की जो मनुष्य शेजाऱ्यावर क्रोध, कुभावना, राग  व्यक्त करतो तो पापांस बळी पडतो. जो मनुष्य आपल्या शेजाऱ्यावर द्या, क्षमा व प्रेम  दाखवतो त्याच्यावर देव सुध्दा नेहमी संतुष्ट असतो. परमेश्वर हा दयाळू आहे. तो नेहमी विश्वासू लोकांवर द्या दाखवतो. देवाची क्षमा व प्रेम अनुभवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तींनी आपला स्वभाव शांत ठेऊन आपल्या शेजाऱ्यावर संपूर्ण मनाने व अंतकरणाने प्रेम केले पाहिजे.  

दुसरे वाचन: रोमकरास पत्र: १४: ७-९

संत पौल सांगतो की आपण बाप्तिस्माद्वारे येशूच्या मरण व पुनरुत्थानात सहभागी झालेलो आहोत. आपण जिवंत किंवा मेलेले असलो तरी आपण येशूचे झालेलो आहोत. आपण सर्वांनी प्रभूसाठी जगले पाहिजे. प्रभू येशु एकदाच मेला व तो आता युगानयुगे जिवंत आहे. प्रभू येशू हा सर्व विश्वासू लोकांचा प्रभू आहे; मग ते मेलेले असोत किंवा जिंवत असोत.

शुभवर्तमान: मत्तय १८:२१-३५

सात वेळा पापक्षमा करून मी फारच उदारपणा दाखवीत आहे असे पेत्राला वाटले. जेव्हा पेत्राने येशूला विचारले, “जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी किती वेळा क्षमा करावी?” येशू त्याला सांगतो, “क्षमा सात वेळाच नव्हे तर साताच्या सत्तर वेळा करावी.” येशूच्या ह्या उत्तराने पेत्राला मोठा धक्काच बसला. येशू पेत्राला देवाच्या अमर्यादित क्षमेचा अर्थ समजून देण्यासाठी ‘कृतघ्न चाकराचा दृष्टांत’ त्याच्यापुढे ठेवतो. शुभवर्तमान सांगते की एक नोकराला आपल्या राजाला कर्ज द्यायचे होते. कर्ज परतफेड न करता आल्यामुळे राजाने त्याच्यावर दया दाखवून त्याचे सर्व कर्ज माफ केले. त्यानंतर त्या कर्जदाराला त्याचा एक सोबती भेटला ज्याने त्याचे शंभर रुपये घेतले होते. त्या व्यक्तीने विनवणी करून सुद्धा त्याला माफी मिळाली नाही. उलट त्याने त्याला तुरुंगात टाकले. राजाने दाखविलेल्या क्षमेची त्याला आठवण झाली नाही. नंतर जेव्हा राजाला माहिती पडले तेव्हा त्याने त्या क्रूर दासाला शिक्षा केली व कर्ज फेडीपर्यत त्याने तुरुंगात ठेवले. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेले सर्व दाखले स्वर्गाची वाट दाखवतात. देवाचे राज्य हे क्षमेचे व प्रेमाचे आहे. म्हणून देवाच्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी आपण ऐकमेकांना क्षमा केली पाहिजे जेणेकरून देव आपल्याला क्षमा करेल.

बोधकथा:

     संपत्ती आणि जमीन ह्यांच्या वाटपावरून दोन श्रीमंत ख्रिस्ती भावामध्ये वैर व सुडाची भावना वाढीस लागली. लहान भावाच्या घराशेजारी सुंदर फुलबाग होती. एक दिवस मोठ्या भावाच्या मुलीने त्या बागेमधील फुले तोडण्यास बागेत शिरली. हे पाहुन तिच्या मागे ऐकाने आपला कुत्रा सोडला. त्या कुत्र्याने तिला चावले व ती रक्तबंबाळ झाली आणि तिथेच गतप्राण झाली. मोठा भाऊ काहीच तक्रार करु शकला नाही, कारण चुकी त्याच्या मुलीची होती. परंतू, तो बदला घेण्याची संधी पाहू लागला. दोन्ही भावांनी पाऊस पडल्यावर शेकडो एकर जमिनीत बियाणं पेरलं. पावसाने मध्येच दांडी मारल्याने रुजलेले बियाण फुकट गेलं. मोठ्या भावाकडे पुन्हा पेरण्यासाठी भरपूर बियाणं होते. परंतू, छोट्या भावाकडे मात्र काहीच शिल्लक नव्हते. छोट्या भावाला बियाणं उसने घेण्याकरीता तोंड नव्हते. दोघे भाऊ एकमेकांचे मरणशत्रू झाले होते. माझ्या भावाचे बियाणं नसल्यामुळे काही लाखांचे नुकसान होणार ह्यापेक्षा मोठा सूड कोणता असू शकतो असे मोठ्या भावाला वाटले. परंतू, ह्या त्याच्या हट्टी स्वभावामुळे मोठ्या भावाला रात्रीची झोप येत नव्हती आणि जेवणही गोड लागत नव्हते. मध्यरात्रीपर्यंत झोप न आल्यामुळे त्याने लाईट लावली तर त्याची नजर भिंतीवरील क्रुसावर गेली. तेथे लिहिलेले शब्द त्याच्या हृदयात शिरले, ते शब्द असे होते, “क्षमा सात वेळा नव्हे तर साताच्या सत्तर वेळा करावी” व “हे पित्या त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना माहित नाही.” अशी वाक्ये वाचून तो सर्व राग व सूड विसरला. आपल्या दोन नोकरांना त्याने उठवले. बियाणांची वीस मोठी पोती भरलेली घेऊन तो आपल्या भावाच्या घराजवळ गेला. दार उघडताच जोराने त्याने भावाला मिठी मारली व म्हणाला, ‘क्रूसावरील ख्रिस्ताने मला तुला क्षमा करायला पाठवले आहे व तुझ्या शंभर एकर शेतजमिनीत पेरण्याकरिता मी वीस पोती बियाणं घेऊन आलो आहे’. ती समेटाची व समंजसपणाची कृती पाहून अपराधी भावाने गहिवरलेल्या शब्दांमध्ये माफी मागितली आणि भावाचे आभार मानले.

मनन चिंतन:

     दैनंदिन जीवनात ऐकमेकांना ‘क्षमा करणे’ खूप कठीण आहे. पण खरोखर जर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहायचे असेल तर आपण शेजाऱ्याविषयीची कुभावना, संताप व द्वेष बाजूला सारून त्यांना खऱ्या अंतकरणाने क्षमा करायला पाहिजे. परंतू, किती वेळा आपण ऐकमेकांना क्षमा करावी? जेव्हा पेत्राने येशूला विचारले, “जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी किती वेळा क्षमा करावी?” येशू त्याला सांगतो, “क्षमा सात वेळाच नव्हे तर साताच्या सत्तर वेळा करावी.” ह्याचा अर्थ म्हणजे आपली क्षमा अमर्यादित असली पाहिजे. हे कृतीत आणणे खूप कठीण आहे. पण जर आपण देवाच्या आज्ञेनुसार वागलो तर आपल्या जीवनात आमुलाग्र बदल घडून येऊ शकतो. जीवनात कित्येकवेळा आपण पाप करतो. पापांची कबुली करून देवाकडे क्षमेची व दयेची याचना करतो, असे असूनही आपण पाप करणे बंद करत नाही. राग, द्वेष, संताप इत्यादी वाईट गुणामुळे आपले देवावर असलेले नाते तुटून जाते. म्हणून देवाची कृपा व क्षमा मिळविण्यासाठी हे सर्व सोडून क्षमाशिल होण्यास बेनसिरा सांगत आहे. येशूने लोकांवर मरेपर्यंत प्रीती केली. “हे बापा त्यांना क्षमा कर; कारण ते काय करितात हे त्यांना समजत नाही (लुक २३:३४).” परंतू, येशूच्या प्रीतीचे फळ त्याला केवळ मरणच प्राप्त झाले. तसेच संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात सांगतो की ‘येशू मरण व पुनरुत्थानाद्वारे मेलेल्यांचा आणि जिवंतांचाही प्रभू आहे.’ जेव्हा पेत्राने येशूला विचारले, “जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी किती वेळा क्षमा करावी?” येशू त्याला सांगतो, “क्षमा सात वेळाच नव्हे तर साताच्या सत्तर वेळा करावी.” प्रभू येशू आपणा सर्वाना देवाच्या अपार क्षमाशिलतेचा अनुभव घेऊन जीवनात क्षमा व दया अंगीकारण्यास बोलावीत आहे. आपण दररोज प्रार्थना करतो. परंतू, प्रार्थनेचे योग्य ते फळ आपल्याला प्राप्त होत नाही कारण आपल्या अंतकरणात राग, द्वेष व क्रोध असतो. आपण येशूने शिकविलेल्या प्रार्थनेत मोठ्या विश्वासाने बोलतो की, ‘जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर.’ ह्याद्वारे आपण देवाला आपल्या पापांची क्षमा करण्यास विनंती करतो. जर आपण दुसऱ्यांना त्यांच्या पापांची क्षमा केली नाही तर देव सुद्धा आपल्याला आपल्या पापांची क्षमा करणार नाही. आपल्या जीवनात सुद्धा असे होऊ नये म्हणून आपण ऐकमेकांना क्षमा करून क्षमाशिलता अंगिकारली पाहिजे. कारण आजची उपासना आपल्याला क्षमा करण्याचा बोध देत आहे. ऐकमेकांना क्षमा करण्यासाठी आपल्याला देवाची कृपा मिळावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रेमळ पित्या, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐकून घे.

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले परमगुरु फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी व प्रांपचिक यांना ख्रिस्तमळ्यात काम करत असताना त्यांच्यावर देवाचा आशिर्वाद असावा तसेच त्यांनी देवाच्या दैवी क्षमेचा अनुभव लोकांपर्यत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ज्या कुटुंबामध्ये शुल्लक गोष्टीवरून भांडणे, तंटे व वादविवाद निर्माण होतात व कुटुंबातील प्रार्थनामय जीवन व शांती नष्ट होते, अशा कुटुंबांना देवाच्या दयेचा व क्षमेचा स्पर्श व्हावा आणि त्यांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन शांतीचे व क्षमेचे जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.  
३. आपल्या देशामध्ये गरिबी, भ्रष्टाचार, स्त्रीयावर अत्याचार असे प्रकार वाढत आहेत. प्रत्येकाने इतरांच्या प्रतिष्ठेचे भान ठेवून चांगली वागणूक दाखवावी व कुणालाही कमी न लेखता त्यांचा आदर राखावा व राजकीय पुढाऱ्यांनी देशाची निस्वार्थी सेवा करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. आजच्या तरूण पिढीला जीवघेण्या स्पर्धेला तोंड दयावे लागत आहे. प्रसंगी ते निराश होत आहेत. या तरूण पिढीत असलेला उत्साह कायम टिकून राहावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करूया.


    
    


Thursday, 7 September 2017

Reflection for the Homily of 23rd Sunday in Ordinary Time  (10-09-2017)  By Amit D'Britto. 




सामान्य काळातील तेविसावा रविवार


दिनांक: १०-०९-२०१७
पहिले वाचन: यहेज्केल ३३:७-९
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १३:८-१०
शुभवर्तमान: मत्तय १८:१५-२०








प्रस्तावना:

आज देऊळमाता सामान्य काळातील तेविसावा रविवार साजरा करत आहे. आज ख्रिस्तसभा आपल्याला प्रभूशब्दाद्वारे इतरांबरोबर चांगले जीवन जगण्यास, त्यांना मदत करण्यासाठी आवाहन करीत आहे. आपण स्वतः आदर्शमय जीवन जगून आपल्या समाजातील बंधू भगिनींना योग्य मूल्यवान जीवन जगण्यास मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.
आजच्या पहिल्या वाचनात प्रभू परमेश्वर संदेष्टा यहेज्केलद्वारे इस्त्रायल लोकांना आदर्शमय जीवन जगण्यास सांगत आहे.  आजच्या दुसऱ्या वाचनात एकमेकांवर प्रेम करणे हीच सर्वश्रेष्ठ आज्ञा आहे असे संत पौल आपणास सांगत आहे. तसेच आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपणास म्हणतो की, जर एखाद्या व्यक्तीने पाप केले, तर अपराध करणाऱ्याबरोबर कसे वागावे व त्याला समाजातून बहिष्कृत न करता त्याला त्यांच्या पापांची क्षमा कशी करावी याविषयी सांगत आहे.
आज ह्या मिस्साबलीदानात सहभागी होत असताना आपण समाजात आदर्शमय जीवन जगावे ह्यासाठी प्रभू परमेश्वराकडे कृपा मागुया.

पहिले वाचन: यहेज्केल ३३:७-९

देवाची वाणी लोकांपर्यत पोचवण्यासाठी देवाला एका व्यक्तीची गरज होती. यासाठी देवाने यहेज्केलची निवड केली होती. यहेज्केलने निराश झालेल्या लोकांना बावीस वर्ष बोध केला. यहेज्केलचा संदेश हा आजच्या ख्रिस्ती व यहुदी माणसांसाठी आहे. आजच्या वाचनात आपल्याला असे दिसून येते की, इस्त्रायल लोकांना सावध करण्याचे काम संदेष्टा यहेज्केलवर सोपवले आहे. देवाने पाठवलेले इशारे, सूचना त्यानेच लोकांना कळवायच्या आहेत. त्याने हे इशारे एखाद्याला कळवले नाहीत तर त्या व्यक्तिच्या भवितव्य विकासासाठी यहेज्केलच जबाबदार राहील. पण त्याने इशारा दिला असला तर त्याचा स्वतःचा बचाव होईल.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १३:८-१०

एकमेकांवर प्रिती करणे हा एक कधीही न फेडला जाणारा श्रण आहे असे संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनात सांगत आहे. ही आज्ञा पाळल्याने इतर सर्व आज्ञा परीपूर्ण होतात. तसेच संत पौल आवर्जून सांगतो की, प्रिती करणे या आज्ञेतच सर्व आज्ञा सामावल्या आहेत. तसेच संत पौल म्हणतो की, दुसऱ्यावर प्रिती करणे हीच पवित्र शास्त्रातील सर्वात महत्वाची येशूने दिलेली आज्ञा आहे. जर आपण एकमेकांवर प्रिती केली तर आपण नियमशास्त्रातील सर्व आवश्यक्ता पूर्ण करतो. हा येशूने दिलेला नवीन नियम मोशेच्या नियमशास्त्राची परिपूर्ती करतो. व या नियमानुसार जीवन जगण्यास आपणास आवाहन करतो.

शुभवर्तमान: मत्तय १८:१५-२०

   मत्तयलिखीत शुभवर्तमानातून घेतलेल्या आजच्या वाचनात प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्याला, एखाद्या व्यक्तीने पाप केले तर त्याला परत मार्गावर कसे आणावे ह्याबद्दल माहिती देत आहे. आपला भाऊ परत मिळवणे व त्याला पूर्वपदावर आणणे हेच उद्दिष्ट येथे आहे. त्याला शिक्षा करणे हा तर या वाचनाचा मुळीच हेतू नाही. चुकलेल्या भावाला सर्वप्रथम एकट्याने एकांतात व नंतर ऐकाला किंवा दुसऱ्याला सोबत घेऊन भेटावे. यातून काहीच साध्य झाले नाही तर मग स्थानिक मंडळीला कळवावे. व याद्वारे अपराधी हा वळणावर येईल ही अपेक्षा ठेवावी. जर तसे झाले नाही तर त्या व्यक्तिला वाळीत टाकावे. यामुळे त्या व्यक्तिला धक्का बसून तो पश्चाताप करील आणि अशाप्रकारे त्याला पूर्वपदावर आणता येईल अशी आशा ठेवावी. अशाप्रकारे प्रभू येशू ख्रिस्त हा समाजातील सर्व लोकांना क्षमा करून त्यांना तारणाचे दार व मार्ग प्राप्त करण्यास पाचारण करीत आहे.

बोधकथा:

सायली व तिची आई ह्या दोघी मॉलमधून परत येत होत्या. तेव्हा तिच्या आईच्या असे लक्षात आले की, सायलीने मॉलमधून एक चॉकलेट चोरले आहे. तेव्हा तिला शिक्षा देण्यासाठी तिच्या आईने तिला परत मॉलमध्ये जाऊन ते चॉकलेट परत देण्यास सांगितले. जेव्हा सायली मॉलमध्ये जाऊन मॅनेजरला भेटून घडलेली कथा सांगितली तेव्हा मॅनेजर म्हणाले, ‘काही काळजी करू नकोस, चॉकलेट ही छोठी वस्तू आहे; परंतु माझे कामगार तर खूप मोठ्या वस्तू चोरी करतात.’ मॅनेजरने सायलीच्या असे लक्षात आणून दिले की, छोट्या वस्तूची चोरी करणे हे योग्य आहे. परंतू सायलीच्या आईच्या मताप्रमाणे कोणतीही चोरी छोटी किंवा मोठी ही फार चुकीची गोष्ट आहे. समाजात ख्रिस्ती जीवन जगत असताना आपण सर्वांनी असा आदर्श ठेवला पाहिजे व ख्रिस्ताने दिलेल्या सर्व आज्ञेचे व मूल्यांचे पालन केले पाहिजे.

मनन चिंतन:

आजचे शुभवर्तमान हे तीन भागात विभागता येईल. 

१. चुकांची सुधारणा
आपण दुसऱ्यांच्या चुकांची सुधारणा का करावी? दुसऱ्यांच्या चुकांची दुरुस्ती करून आपण असे सिद्ध करू इच्छित नाही की, आपण चांगले व ते वाईट आहेत. तर आपण त्यांना एकत्र येण्यास व चांगल्या मार्गावर चालण्यास मदत करतो. यासाठीच चुकांची दुरुस्ती ही प्रेमाने करावी.
     चुकांची दुरुस्ती करण्यासाठी तीन पायऱ्या आहेत.
अ) ज्या व्यक्तीने पाप केले आहे त्या व्यक्तीशी समोरासमोर बोलून त्याला त्याच्या वाईट कृत्यांची जाणीव करून देणे व हे सर्व अगदी प्रेमाने व त्या व्यक्तीला अगदी आत्मविश्वास घेऊन करावे.
ब) दुसरी पायरी म्हणजेच जर त्या व्यक्तीने पहिल्या मार्गाचा स्वीकार नाही केला तर त्याला दोन-तीन व्यक्तीच्या प्रत्यक्ष हजेरीत घेऊन त्याला त्याच्या अपमार्गाची जाणीव करून द्यावी व त्याला ख्रिस्ती समूहात सामावून घ्यावे.
क) जर त्या व्यक्तीने दोन-तीन साक्षीदारांचे सुद्धा ऐकले नाही तर मग त्या व्यक्तीला ख्रिस्ती समूहासमोर हजर करावे आणि मग त्या व्यक्तीला त्याच्या पापांची जाणीव करून त्याला ख्रिस्ताने दिलेल्या मार्गावर चालण्यास मदत करावी. या मार्गाचा हेतू हाच असावा की, आपण त्या व्यक्तीला समाजापासून व देवापासून दूर जाऊ देऊ नये.
२. क्षमा
एखाद्या व्यक्तीच्या चुकांची दुरुस्ती करत असताना आपण त्या व्यक्तीला क्षमा  केली पाहिजे. ‘क्षमा करणे’ ही फक्त भावना नसून कृती आहे. कदाचित काही वेळा क्षमा करणे खूप कठीण असते परंतू क्षमा केल्याने आपल्याला खूप फायदे होतात. क्षमा न केल्याने आपण आपल्याच शरीरात विष पसरवत असतो. तसेच क्षमा न केलेल्या व्यक्तीला नकळतच अनेक आजार जडतात व व्यक्ती आपल्या स्वत:च्या जीवनातील आनंद, शांती व सामाजिक समतोल ह्या सर्व गोष्टींना गमावून बसतो.
     जेव्हा आपण क्षमा करण्यास नकार देतो तेव्हा आपण आपल्या स्वत:लाच शिक्षा करत असतो. म्हणून प्रभू येशूप्रमाणे आपल्या जीवनात अतिशय क्षमाशील व दयाळू होणे गरजेचे आहे.
३. प्रार्थना
     जर समाजात काही वाईट कृत्य घडत असताना दिसले किंवा एखादी व्यक्ती पापांच्या मार्गावर चालताना दिसली तर आपण त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करावी. एखाद्या व्यक्तीला अतिशय प्रभावीपने सुधारायेचे असेल तर आपण त्यासाठी प्रार्थना करावी. कारण दुसऱ्यांमध्ये बदल हा आपल्या चांगल्या शब्दामुळे होत असतो. ज्याप्रमाणे प्रभू पौलाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणतो, त्याचप्रमाणे तो इतरांसाठी सरळ मार्गावर येण्यास प्रवृत्त करतो. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू द्या करून आमची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्तसभेचे धुरा वाहणारे पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांनी प्रभू येशूची प्रेमाची व क्षमेची शिकवणुक साऱ्या जगात पसरावी म्हणून प्रार्थना करूया.
२. प्रभूच्या मळ्यात काम करण्यासाठी अनेक युवक व युक्तींनी पुढे यावे व त्यांना योग्य असा पाठिंबा व मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया.
३. सर्व आजारी व पिडीत लोकांनी प्रभूच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व त्यांची आजारातून सुटका होऊन त्यांच्या वेदना कमी व्हाव्यात यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. आपण सर्व ख्रिस्ती भाविकांनी प्रभू येशूने दिलेल्या प्रेमाच्या व क्षमेच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगावे व समाजात योग्य असा आदर्श निर्माण करावा यासाठी प्रार्थना करूया.
५. आपण शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.