Thursday, 20 December 2018


Reflection for the Homily of Christmas Vigil Mass 
(24-12-18) By Br. David Godinho  







ख्रिस्त जयंती–नाताळ
मध्यरात्रीची मिसा

दिनांक: २४/१२/२०१८
पहिले वाचन: यशया ६२:१-५
दुसरे वाचन: प्रेषितांची कृत्ये १३:१६-१७, २२-२५
शुभवर्तमान: मत्तय १:१-२५



प्रस्तावना: 
स्वर्गामधुनी तेज उतरले, गायीच्या गव्हाणी!
मंगल ह्या समयी, गा आनंदाची गाणी!
      आजच्या ह्या शुभरात्री नाताळच्या आनंददायी उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी जमलेल्या सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत!
      खरोखरच आजची ही रात्र पवित्र व मंगलमय आहे. कारण खुद्ध देव मानवीरूप घेऊन छोट्या बालकाच्या रुपात ह्या भूतलावर अवतरलेला आहे. आज तारणारा जन्मलेला आहे. देवाचे बाळ म्हणजे खुध्द परमेश्वराने कुमारी मरीयेच्या उदरी बेथलेहेमच्या गव्हाणीत जन्म घेतला आहे. यशया संदेष्ट्याने सांगितलेले भाकीत, - तेव्हा लोक म्हणतील, “हा आपला देव आहे आपण ज्याची वाट पाहत आहोत तो हाच. तो आपले रक्षण करावयास आळा आहे.” (यशया २५:९) हे आज पूर्ण झाले आहे.
      आजची तिन्ही वाचने ह्या परमेश्वराच्या निस्सीम प्रेमाची महती गात आहेत. प्रवक्ता याशाया म्हणतो की, ‘तुम्हाला देवाची आवडती माणसेअसे म्हणतील, कारण परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. आणि ह्याच परमेश्वरी प्रेमाची घोषणा करीत आपल्या भाषणामध्ये संत पौल लोकांना सांगत आहे की, ‘दावीदाच्या वंशजातून देवाने इस्राएल लोकांचा तारणारा म्हणजेच येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवले आहे.हे देवाचे अभिवचन आजच्या मंगलमय रात्री पूर्ण झाले आहे. तसेच शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की, ह्या देवाचे नाव इम्मॅन्युएलम्हणजे, ‘आम्हांबरोबर देवअसे आहे.
      आजच्या ह्या प्रेममय रहस्यात सहभागी होत असताना, आपण प्रत्येकाने ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव घेऊन, हा अनुभव दुसऱ्यांना देण्यास, इतरांमध्ये ख्रिस्त पाहण्यास आणि इतरांसाठी ख्रिस्त होण्यास विशेष कृपा शक्ती आपणांस लाभावी म्हणून बाळ येशू चरणी मोठ्या विश्वासाने व नम्रतेने प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया ६२:१-५
      आजचा हा उतारा यशया प्रवक्त्याच्या काव्यमालेतील एक कविता आहे. यशया ४२:१४ मध्ये परमेश्वर म्हणतो, “मी दीर्घकाळ मौन धरिले आहे.तसेच ४९:१४ मध्ये सियोन म्हणते, “परमेश्वराने माझा त्याग केला आहे, तो मला विसरलेला आहे.आणि हे दीर्घकालीन मौन परमेश्वराने जणू आजच्या वाचनात (६२:१-५) सोडलेले आहे. आणि आता सियोनमधील लोकांच्या जीवनात वैभवशाली बदल घडवून आणल्याशिवाय मी त्यांच्याशी बोलणे थांबवणार नाही असे वाचन परमेश्वर त्यांना देतो. जरी हे लोक त्यंच्या पापांद्वारे व कठोर हृदयाने परमेश्वराला क्रोधित करतात, तरीसुद्धा परमेश्वर त्यांचे रक्षण करण्यासठी आणि त्यांना पवित्र करण्यासाठी सतर्क आहे. जरी लोक, देव आणि त्याचे मार्ग सोडून गेले, तरी तो त्यांना विसरणार नाही किंवा सोडणार नाही. तो त्यांच्याशी बोलणे सुरु ठेवेल आणि अर्थपूर्ण संबोधाने त्यांना संबोधित करेल. असे ह्या उताऱ्यात सांगितलेले आहे.

दुसरे वाचन: प्रेषितांची कृत्ये १३:१६-१७, २२-२५
      संत पौलाचे भाषण ह्या उताऱ्यात आपल्याला ऐकावयास मिळते. हे भाषण त्याने यहुदी तसेच देवाचे भय बाळगणाऱ्या विदेशीय उभयतांना उद्देशून केले आहे. हे लोक उपासनेसाठी, यावेळी सभास्थानामध्ये उपस्थित होते. या भाषणाच्या पहिल्या आणि सर्वात दीर्घ भागात ख्रिस्ताच्या आगमनापर्यंतच्या प्रसंगाचे पुर्नकथन केले आहे. पहिल्या भागात देवाने इस्राएलची केलेली निवड आणि निवडलेल्या लोकंसाठी कानान देशातील राष्ट्रांचा विध्वंस ह्याचा उल्लेख केला आहे. इस्राएल लोकांच्या चांगल्या वर्तनाने हे वतन त्यांनी मिळवले असे नाही, उलट त्यांचे गैरवर्तन सहन करून देवाच्या कृपेने हे वतन त्यांना प्राप्त झाले आहे. दुसऱ्या भागात शौलाला दूर करून देवाच्या पसंतीच्या दावीदाला राजा करण्याचा उल्लेख आहे. तिसऱ्या भागात बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा उल्लेख केलेला आहे. पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा असे योहानाने घोषविले. आपण मुळातच यहुदी आहोत असे मानणाऱ्या लोकांनाही परिवर्तनाची गरज असल्याचे योहानाने आपल्या घोषणेतून ध्वनित केले.तसेच ख्रिस्त हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असे सांगून त्याला दिलेले कार्य जणू त्याने पूर्णत्वास नेले.

शुभवर्तमान: मत्तय १:१-२५
मत्तयच्या शुभवर्तमानाचा मुख्य विषय आहे: येशू इस्राएलच्या लोकांसाठी केलेल्या भविष्यवाणीची पूर्तता. हे दाखविण्यासाठी मत्तय येशूची वंशावळी पासून सुरुवात करतो.
येशूची वंशावळ:
आजच्या मत्तयकृत शुभवर्तमानात येशूच्या वंशावळीचा उल्लेख केला आहे. ही वंशावळ या शुभवर्तमानाच्या सुरुवातीस आढळून येते. याचा अर्थ असा की, वंशावळ ह्या शुभवर्तमानाचा परिचय म्हणून कार्य करते. यहुदी लोकांसाठी वंशावळ खालील बाबींसाठी फार महत्वाची आहे.
१) इस्राएलचा राजा एक यहुदी असायला पाहिजे, परदेशी नव्हे. (अनुवाद १७:१५)
२) हा राजा दावीदाचा वशंज असायला पाहिजे. (२ शमुवेल ७:१२-१३)
३) जेव्हा यहुदी बॅबीलोनच्या कैदेतून परत आले, तेव्हा यां निर्वासितांनी त्यांचे मुळ यहुदी होते, हे दर्शविणे महत्त्वाचे होते आणि हे ते वंशावळीतून शोधू शकत होते. वंशावळीच्या नोंदीमध्ये नाव न मिळू शकणारे कोणीही पुरोहित म्हणून सेवा देऊ शकत नाहीत. (एज्रा २:६२)
४) तारणारा, हा दावीदच्या वंशातील असेल, असे प्रभूने भाकीत केले होते.(स्तोत्र १३२:११, यशया ११:१, यिर्मया २३:५)
तारणारा, हा दावीदाच्या वंशातील असेल केलेले भाकीत, प्रभू येशूच्या जन्माने, जो दावीद राजाच्या, तसेच अब्राहामच्या वंशातील आहे, ते आज पूर्ण झाले, हे दाखविण्यासाठी मत्तय येशूच्या वंशावळीचा समावेश आपल्या शुभवर्तमानाच्या सुरुवातीस करीत आहे.
मरीयेचे योसेफास वाग्दत्तपण:
आज आपण वाग्दात हा शब्द वापरत नाही, परंतु सोयरिक हा शब्द वापरतो. म्हणून आपण म्हणू शकतो की, मरियाची आणि योसेफशी लग्नासाठी सोयरिक किंवा मागणी झालेली होती. ही सोयरिक किंवा मागणी आजच्या सोयरिकी पेक्षा अधिक गंभीर होती. आजकायद्यातील कोणत्याही समस्यांशिवाय सोयरिक तोडली जाते.तसेच आज सोयरिक ही कायदेशीररित्या बंधनकारक नाही. परंतु ज्यू संस्कृतीतजेव्हा एखाद्या जोडप्याची सोयरिक होत असे, तेव्हा विवाहाच्या दिवसाआधीच, कायदेशीररित्या ते जोडपे विवाहित मानले जात असे. म्हणूनच ओवी १९ मध्ये योसेफला मरीयेचा पती म्हटलेले आहे. आणि ही सोयरिक मोडण्यासाठी योसेफने मरीयेला गपचूप सोडून देण्याचा म्हणजेतिला घटस्फोट देण्याचा विचार केला.     
देवदूताचा संदेश:
देवदुताने स्वप्नामध्ये योसेफला दिलेल्या संदेशावरून असे दिसून येते की, देवाच्या योजनेत मरीयेच्या बालकाच्या भुमिकेविषयीच्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा खुलासा केला आहे. बाळाचे नाव येशू म्हणजेच हिब्रू भाषेत देव वाचवितोअसा होतो. तसेच हे बाळ यशयाच्या भविष्यवाणीची पूर्तता करेल. आणखी महत्त्वाचे म्हणजे इमॅनुएल असेल, ‘देव आपल्याबरोबर.आन हेच खरे नाताळचे रहस्य  यां दिवशी आपण साजरे करतो.

बोधकथा:
एका गावात एक बाई आपल्या दोन लहान मुलांबरोबर एका छोट्याशा झोपडीत राहत होती. आपल्या ह्या मुलांना काही कमी पडू नये, किंवा कशाचीही उणीव भासू नये म्हणून ती दिवस-रात्र काबाडकष्ट करत असे. जरी आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असली तरी, तिने अन्न, कपडे आणि इतर कोणत्याही मुलभूत वस्तूंची कमतरता भासू दिली नाही. ह्या शारिरीक गोष्टींची काळजी घेताना, आध्यात्मिक गोष्टीकडे दुर्लक्ष केले नाही. चांगल्या ख्रिस्ती मूल्यांनी तिने त्यांचे संगोपन केले होते.
नाताळच्या सणानिमित्त आपल्या मुलांनी काहीतरी खरेदी करावी मुलांनी काहीतरी स्वतःसाठी खरेदी करावी म्हणून तिने काही पैसे साठवून ठेवले होते. एके संध्याकाळी ते पैसे त्या दोघा मुलांना देत म्हणाली, “थोड्या दिवसात आपण नाताळचा सण साजरा करणार आहोत, आणि म्हणून हे पैसे घेऊन तुम्ही बाजारात जा, व तुमच्यासाठी काही खरेदी करा.हे ऐकून दोन्ही मुल खूप खुश झाली व त्या संध्याकाळी बाजाराच्या दिशेने जाऊ लागली. वाटेत त्यांना एक गरीब माय-लेक भिक मागताना दिसली. ह्या मुलीच्या अंगावरचे कपडे खूप जुने, खराब व फाटके होते. हे दृश्य पाहून ह्या दोन्ही मुलांना त्यांची द्या आली व जवळच असलेल्या कपड्याच्या दुकानावर जेथे ते स्वतःसाठी काही कपडे खरेदी करणार होते तिकडे जाऊन, दुसरा तिसरा विचार न करता त्यांनी एक सुंदर असा ड्रेस तिच्यासाठी खरेदी केला तिला दिला. जेव्हा त्या मुलीने तो ड्रेस घेतला, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.
आता ह्या मुलांजवळ काहीच पैसे शिल्लक राहिले नव्हते, परंतु त्या मुलीच्या आनंदाने त्यांचाही आनंद द्विगुणीत झाला होता. जेव्हा ते रिकामी हाताने घरी आले ते पाहून आईला खूप राग आला व ती त्यांना खूप काही बोलली, शांत झाल्यावर घडलेली सर्व वस्तुस्थिती मुलांनी आईला सांगितली. व ते पुढे म्हणाले, आई तू आम्हाला आज पर्यंत कशाचीही उणीव भासू दिली नाहीस, परंतु त्या मुलीला आमच्यापेक्षा जास्त त्या ड्रेसची गरज होती. खरा नाताळचा आनंद आम्हाला तिच्या आनंदात पाहायला मिळाला.

मनन चिंतन:
      आज आपण ह्या मध्यरात्री ख्रिस्तजयंती किंवा नाताळचा सण साजरा करण्यास किंबहुना, ‘देवशब्दमानव झाला, हे रहस्य साजर करण्यासाठी मोठ्या विश्वासाने व श्रद्धेने येथे एकत्र जमलेलो आहोत. आज सर्वत्र आनंदी आनंद पसरलेला आहे, म्हणून मला एका कवितेतील ओवी आठवते, “आनंदाचे डोही आनंद तरंग.
      जो जगाचा तारणारा आहे, त्याने गव्हाणीत जन्म घेतला, तो गरीब झाला जेणेकरून आपण श्रीमंत बनू. संत अथानासियुस म्हणतात, “तो मानव झाला, यासाठी की, मानवाने देवासारखे व्हावे.हिप्पोचे संत आगुस्तीन म्हणतात,“देवाने आपल्याकडून काहीही स्विकारून स्वतःला आमचे कर्जदार बनवले नाही, परंतु आम्हाला महान आशीर्वादाचे आश्वासने दिले आहे आणि जणूकाही तो आपला कर्जदार बनला आहे.आणि हे आश्वासन बाळ येशूच्या आगमनाने आज पूर्ण झाले आहे.
      २००० वर्षापूर्वी ख्रिस्त ह्या जगात येऊन देवाच्या निस्सीम प्रेमाचा अनुभव त्याने आपल्याला दिलेला आहे. आज ह्या प्रेमाचा अनुभव दुसऱ्यांना देण्यास देऊळमाता आपणांस आमंत्रण करत आहे. ख्रिसमस किंवा नाताळ हा देवाचा जगात येणारा एक आनंदोत्सव आहे. आजची खरी समस्या अशी आहे की, आपण खऱ्याखुऱ्या देवाच्या येण्यासाठी थांबलेलो आहोत. ख्रिस्ताचं जगात येणं आपण साजरा करतो, परंतु अजून आपल्या हृदयात आपण त्याचं स्वागत केलेल नाही. होयतो जगात आला आहे आणि आपल्यामध्ये वस्ती करत आहे, पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, आपण त्याला ओळखण्यास नाकारत आहे आणि म्हणून त्याचे स्वागत करण्यात अयशस्वी झालो आहोत. कारण आपण माणुसकी विसरलेलो आहोत.
      गरीब कुटुंबात वअत्यंत गरीबीच्या वातावरणात जन्म घेऊनजणू येशू आपल्याला तो कुठे वस्ती करतो हे सांगत आहे. तो वैभवशाली ठिकाणी राहत नाही, तर तो गरीब, खाली पडलेल्याआजारीभुकेलेल्याथंडीत गारठलेल्यामध्ये, पीडित आणि ज्यांच्यावर आपण प्रेम करत नाही अशा ठिकाणी वास करत आहे. आज आपण पाहतो की, माणूस समाजापासून दुरावत आहे. त्याने दुसऱ्या माणसापासून स्वतःला अलिप्त ठेवले आहे. या गोष्टीचे आज मनन-चिंतन करणे फार गरजेचे आहे.
      या नाताळच्या उत्सवांमध्येथोडा वेळ थांबून, आपल्या सभोवताली असलेल्या त्या बाळ येशूला ओळखण्याचा प्रयत्न करूया. तो आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक प्रसंगामधून व यातनांमधून येत असतो. ज्यांच्या आयुष्यात आनंद आणि शांती नाही, अशा लोकांमध्येसुध्दा त्याला ओळखण्याचा प्रयत्न करूया.आपणही येशूप्रमाणेच आपल्या सभोवतालच्या लोकांना भेटण्यासाठी त्यांचे सांत्वन करण्यासाठी आपल्या आरामाच्या दुनियेतून खाली येणे गरजेचे आहे. तेव्हाच आपण खऱ्याअर्थाने नाताळचे रहस्य साजरे करू शकू.
      एका कवितेतील काही ओवी मला आठवतात त्या अशा आहेत:
शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा अपुल्या अंतरी!
      खरोखर ही ओवी आपल्याला मानवाच्या अंतःकरणात नांदणाऱ्या देवाची ओळख करून देत आहे. मानव देवाच्या दर्शनासाठी स्वर्गाकडे दृष्टी लावून बसला होता. त्याला मानवामध्येच देव बघायला शिकविण्यासाठी प्रभू ख्रिस्तानं अठाराविश्र्वे दारिद्र्यात, गुराच्या गोठयामध्ये, गरीब आईबापाच्या पोटी मानवरुपात जन्म घेतला. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, त्या मानवरूपातील ख्रिस्ताची आम्ही निर्जीव मूर्ती केली आणि त्याची आम्ही पूजा करायला लागलो. मात्र मानवामध्ये सामावलेल्या जीवंत देवाला आम्ही विसरलो. परमात्मा खऱ्या अर्थाने जर कुठे असेल, तर तो दीनदलितांच्या रूपामध्ये आहे. तो दुःखितांच्या अश्रूमध्ये आहे. तो आपल्या अगदी शेजारी आहे. परंतु आपल्याला अशी शिकवण मिळाली आहे की, तो कुठेतरी निर्जीव वस्तूमध्ये दडलेला आहे. तो कुठेतरी मंदिरात निवास करीत आहे. तो कुठेतरी दूर स्वर्गात आहे. हा मुर्तीमधला देव, मंदिरातला देव, स्वर्गातला देव शोधण्याच्या कामात माणूस एवढा गुंतला आहे की, तो माणसातल्या देवाला पूर्णपणे विसरला आहे. तो माणुसकी विसरला आहे. आणि म्हणूनच मानवातील माणुसकी जगविण्यासाठी प्रभू येशूने मानवाच्या रुपात ह्या जगात जन्म घेतला आहे. पोप फ्रान्सिस सांगतात ख्रिस्ताला पेटी मध्ये बंद करून ठेऊ नका तर त्याला बाहेर काढा व इतरांना द्या.
      कोलकत्त्याच्या संत मदर तेरेजा म्हणतात, “आपण नाताळच्या वेळी येशूचे ख्रिस्ताचे स्वागत आमच्या हृदयातील थंडगार गव्हाणीमध्ये नव्हे, तर प्रेमाने आणि नम्रतेने भरलेल्या हृदयात, जे शुद्ध, अत्यंत पवित्रआणि जेथे एकमेकांबद्दल उबदार प्रेम-भावना आहे, तेथे करायला हवे.दीनांत, अनाथात, आणि दुखःत असलेल्या लोकांत ख्रिस्त पाहण्यास ह्या नाताळच्या दिवशी आपणांस कृपा व सामर्थ्य लाभावी म्हणून काही वेळ शांत राहून त्या गव्हाणीतील ख्रिस्ताकडे दयेची प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक.
१) अखिल ख्रिस्त सभेची काळजी घेणारे आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू आणि व्रतस्थ बंधू-भगिनींनी गव्हाणीतील बाळ येशूची सुवार्ता आपल्या सेवाभावी कार्याद्वारे इतरांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रभूने त्यांना सहाय्य करावे म्हणून प्रार्थना करूया. 
२) आपल्या देशाचा कारभार पाहणाऱ्यांना समाज्याच्या कल्याणासाठी व विकासासाठी झटण्यास आणि विशेषकरून चांगला निर्णय घेण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३) आमच्या उद्धारासाठी ख्रिस्त ज्याप्रमाणे स्वतः नम्र होऊन मानव झाला. त्याचप्रमाणे आम्ही सुध्दा नम्र व उधार होऊन गरजवंतांना मदतीचा हात देण्यास सतत तयार राहायला लागणारी कृपा बाळ येशूचरणी मागुया.
३) प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने एकमेकाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन एकमेकांस सहाय्य करावे व गव्हाणीतील येशू बाळाचा प्रेमाचा, दयेचा आणि क्षमेचा संदेश आपल्या आचरणात आणावा म्हणून प्रार्थना करूया.
४) आज जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत, जे साथीदाराच्या शोधात आहेत त्यांच्या मनोकामना बाळ येशूने पूर्ण कराव्यात व जे लग्नाची किंवा दीक्षाविधी स्विकारण्यासाठी तयारी करीत आहेत अशांवर प्रभूने आपल्या पवित्र आत्म्यचा वर्षाव करावा म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया. 
५) आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक व्यक्तीला नाताळ निमित्ताने विशेष आशीर्वाद मिळावा; आमच्या प्रत्येकाच्या जीवनात खऱ्या अर्थाने ख्रिस्ताने जन्म घ्यावा म्हणून विशेष प्रार्थना करुया.  
६) थोडा वेळ शांत राहून आपल्या सामाजिक व वैयक्तिक मागण्या बाळ येशूचरणी ठेवूया.

Wednesday, 19 December 2018



Reflections for the homily of 4th Sunday of Advent
 (23-12-2018) by: Br. Julius Rodrigues.



आगमन काळातील चौथा रविवार

दिनांक : २३-१२-२०१८
पहिले वाचन : मीखा ५:१-४
दुसरे वाचन : इब्री १०: ५-१०
शुभवर्तमान :  लूक १:३९-४४




मरीयेची अलीशेबेला भेट!

प्रस्तावना:
          आज ख्रिस्तसभा आगमन काळातील चौथ्या आठवड्यात प्रवेश करीत आहे. हा रविवार ‘आशेचा रविवार’ म्हणून मानला जातो. मागील तिन्ही आठवड्यात ख्रिस्तसभेने आपल्याला  वेगवेगळ्या प्रकारे येशूच्या येण्यासाठी आपली आध्यात्मिक तयारी केली आहे. अगदी त्याचप्रमाणे आजची उपासना देखील प्रभूचे दर्शन घेण्यासाठी पाचारण करीत आहे. आजचे पहिले  वाचन प्रवक्ता मीखा ह्या पुस्तकातून घेतले आहे आणि हा प्रवक्ता आपणास एका नव्या आशेच्या किरणाची झुळूक दाखवत आहे, जणूकाही आपल्याला सहानुभूती देत आहे. तो जो येणार आहे, त्याविषयी केलेले भाकीत ख्रिस्ताच्या रूपाने पूर्णत्वास नेणार आहे, असे आपणास संगितले आहे. तसेच दुसरे वाचन इब्री लोकांस पत्र ह्यामध्ये देखील ख्रिस्ताच्या येण्याचा हेतु काय आहे? हे स्पष्ट करून त्याने आपल्याला स्वतःचा प्राण देऊन  मुक्ती दिली आहे हे सांगण्यात आले आहे.  त्याचप्रमाणे शुभवर्तमानात मरीयेची तिच्या मावस-बहिणीला भेट आणि तिच्या मावस-बहिणीला झालेल्या दैवी आविष्काराची तोंड ओळख आपणास करून दिली आहे. ख्रिस्त जो नव-किरण आहे, त्या आशेच्या किरणाद्वारे आपण त्या परमपित्याचा अनुभव आपल्या जीवनात घ्यावा आणि तोच अनुभव इतरांस देता यावा म्हणून आपण त्या परमपित्याकडे प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन : मीखा ५:१-४
   इब्री भाषेत एफ्राथाशहराला बेथलेहेमअसे सुद्धा म्हटले जाते. हे ईशयाचे शहर होते आणि दावीद हा ईशयाचा पुत्र होता. दावीद ह्याची निवड इस्रायलच्या बारा वंशाचा राजा म्हणून केली होती. इस्रायलच्या लोकांनी भौतिक आणि राजकीय पातळीवर तिरस्काराचा अनुभव घेतला होता. त्यांना त्यांचा गमावलेला गौरव आणि वैभव परत आणायचे होते. त्यांना दावीदाच्या राज्याची संपूर्णपणे स्थापना करायची होती. दाविदाच्या कुळातून दुःखग्रस्तांचा वाली ह्याचा जन्म होईल, हा मसीहा राज्यकर्ता म्हणून ओळखला जाईल. हा राजा आपल्याला भेट देण्यासाठी येईल आणि आपल्या भेटीद्वारे ह्या भूतलावर शांतीचे राज्य प्रस्थापित करणार असे प्रतिपादन करण्यात आले होते.

दुसरे वाचन: इब्री १०: ५-१०
      इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रातील हा उतारा, आपणास ख्रिस्ताचा भुतलवार येण्याचा उद्देश काय होता? हे सांगत आहे. ख्रिस्त जयंतीची तयारी करीत असताना आपणा प्रत्येकास आठवण करून दिली पाहिजे की देवाला मनुष्य होण्याची गरज नाही, परंतु परमेश्वराने आपल्या सारखे होण्याचे निवडले, मानवी रूप धारण करून आपणास पापांतून मुक्त केले. परमेश्वराने आपल्याला पापात ठेवून, त्याच्या परिणामाचा अनुभव घेवू दिला असता परंतु त्याचे आपल्यावर असलेल्या निस्सीम प्रेमामुळे त्याने आपला स्वतःचा प्राण दिला. ख्रिस्ताने आपल्यासाठी योग्य त्याग करून आपले स्वतःचे शरीर व रक्त अर्पून आपल्याला आपल्या पापांच्या दरीतून मुक्त केले आहे आणि ही देवाची असलेली इच्छा ख्रिस्ताने पूर्णत्वास आणली आहे आणि अशाप्रकारे आपण पाप मुक्त झालो आहोत.

शुभवर्तमान: लूक १:३९-४४
        लूकलिखित शुभवर्तमानात, अलीशिबा आणि मरिया ह्यांच्या भेटीत येशूविषयी केलेले निवेदन आपण वाचतो. दयाळूपणा आणि सामाजिक प्रेम ह्याचे उत्तम उदाहरण मरीयेने वृद्ध आणि गरोदर अलीशीबेला मदतीचा हात देऊन आपणास घालून दिले आहे. एका चौदा वर्षीय यहुदी कुमारी चार दिवस एकटी प्रवास करते, ही एक धैर्याची गोष्ट आहे. संत लूक दोन्ही मातांना एकत्र आणतो जेणेकरून दोघीजणी परमेश्वराची स्तुती करतील आणि प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव घेतील.
  
मनन चिंतन:
अतिथी देवो भवः
           आपणा प्रत्येकास नेहमी वाटत असते की, कोणीतरी माझ्या घरी यावे, माझ्याशी बोलावे. थोडा वेळ माझ्याबरोबर राहावे आणि गप्पा माराव्यात अशी आपली मानसिकता असते. प्रत्येकजण हा आपल्या प्रिय व्यक्तीच्या भेटीस आतुरलेला असतो, वाट पाहत असतो, परंतु कधी-कधी आपण असेही पाहतो की, अपेक्षा नसलेली व्यक्तीदेखील अचानकपणे आपल्या दाराजवळ येऊन उभी राहते आणि आपल्याला एक आगळावेगळा आनंद देऊन जाते. परंतु, हा आनंद उपभोगण्यासाठी आपण देखील स्वतःच्या मनाची तयारी केली पाहिजे. असे म्हणतात, अतिथी देवो भवः, म्हणजेच आलेले पाहुणे हे देवासमान असतात. देव पाहण्याची इच्छा असेल, तर ती आपण आलेल्या पाहुण्यात देखील पाहू शकतो.
          जुन्या करारात आपण पाहतो, जेव्हा तीन पुरुष अब्राहमाला भेटण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी अब्राहमला व साराला पुत्र होणार (उत्पत्ती १८:१०) अशी आनंदमय बातमी दिली. सराफत येथील विधवेला तिच्या गरिबी मध्ये आशीर्वाद भेटला, जेव्हा एलीया तिला भेटावयास गेला. ईश्वराचा आशीर्वाद म्हणून प्रभूने तिच्या पीठाचे मडके आणि तेलाची कुपी कधीही कमी होऊ दिली नाही, तिला भरभरून आशीर्वाद दिला. (१ राजे १७:१६)
          आजचे पहिले वाचन प्रवक्ता मीखा ह्याच्या पुस्तकातून घेतले आहे. हा प्रवक्ता ख्रिस्ताच्या येण्याचे भाकीत करीत आहे की, बेथलेहेम त्याचे जन्मस्थान असावे आणि पुढे तो बोलतो की, ह्याच्या येण्याने सर्वत्र शांती-समाधानाचे अनुकूल वातावरण पसरणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो की, ख्रिस्त हा आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यास जन्माला आलेला आहे. तसेच आपल्या शरीराचे व रक्ताचे अर्पण करून कायम स्वरूपी मनुष्याला त्याने पाप मुक्त केले आहे. त्याचप्रमाणे शुभवर्तमानात देखील आपणास मरिया व अलीशिबेच्या भेटीचे वर्णन करीत आहे. मरीयेने अलीशेबेची घेतलेली भेट ही एक आगळीवेगळी भेट होती. कारण जेव्हा मरियाअलीशेबेला भेटायला जाते तेव्हा ती एकटी जात नाही, ती तिच्याबरोबर एका महत्वाच्या व्यक्तीला घेऊन जाते आणि ती व्यक्ती म्हणजे जिवंत देवाचा पुत्र, जो तिच्या उदरामध्ये वाढत होता. ही मरिया अलीशेबेला फक्त भेटण्यासाठी गेली नसावी परंतु, तिच्या उदरात असलेल्या बाळाचा आशीर्वाद देण्यास गेली असावी आणि त्याची प्रचीती अलीशेबेच्या बालकाने तिच्या उदरात आनंदाची उडी मारून दिली आहे. अलीशेबेला आता देवाचे म्हणजेच परमेश्वराचे दैवी दर्शन झाले होते.  तिचे हृदय आनंदाने भरून हर्षित झाले होते. असे म्हटले जाते, “दर्शन दे रे, दे रे भगवंता किती अंत आता पाहाशी अनंता.” होय खरोखरच, तो अंत अलीशेबेच्या जीवनातून संपला होता आणि देवाचे दर्शन तिला झाले होते.
          प्रत्येकजण हा देवाच्या दर्शनासाठी आतुरलेला आहे, व्याकुळलेला आहे. पण मग देव मला कसा दिसेल हा प्रश्न सुटत नाही. परमेश्वर हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येत असतो, ज्याप्रमाणे तो मरीयेच्या व अलीशेबेच्या जीवनात आला. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात दैवी व मानवी रूपाचे दर्शन होत असते. ह्या परमेश्वराच्या सहवासाची जाणीव आपल्याला होते का? आणि जेव्हा आपण परमेश्वराला आपल्या जीवनात मार्ग देऊ तेव्हा आपण त्याचा अनुभव घेऊ शकू. परमेश्वराला आपल्या जीवनात आमंत्रण देण्यासाठी आपण आपली तयारी प्रार्थनेने, पाप-निवेदन करून, सत्कृत्ये करून देवाशी एकरूप होऊया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद : हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.
१) आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू आणि सर्व व्रतस्थ ह्यांना प्रभूचा विपुल आशीर्वाद मिळावा व त्यांनी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून जगाला ख्रिस्ताचा शुभ संदेश द्यावा म्हणून आपण देवाचरणी प्रार्थना करूया.
२) आज आपण अश्या लोकांसाठी प्रार्थना करूया की ज्यांनी आपल्या जीवनात आशावादी दृष्टीकोन गमवला आहे. ख्रिस्ताने त्यांच्या जीवनात नवीन आशा किरण  प्रेरित करावा आणि त्यांना अंधारातून मुक्त करावे म्हणून आपण त्या परमेश्वराकडे प्रार्थना करूया.
३) ख्रिस्ताच्या येण्याची तयारी विशेष करून अध्यात्मिक तयारी आपण चांगल्या प्रकारे करावी व प्रभू दर्शनासाठी सज्ज व्हावे म्हणून लागणारी कृपा आपण परमेश्वराकडून मागुया.
 ४) जे लोक आजारी आहेत, विविध संकटांनी ग्रासलेले आहेत अश्या सर्वांना परमेश्वराने गुणकारी स्पर्श करावा आणि त्यांना चांगले आरोग्य द्यावे म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.
५) पवित्र मरीया स्वत: प्रभूची माता असूनही अलीशिबेकडे जाऊन तिला तिच्या कठीण प्रसंगी मदत केली, त्याच प्रमाणे आपणही आपला सामाजिक आणि आर्थिक दर्जा ह्यांना न जुमानता इतरांची भेट घेऊन त्यांना आधार व दिलासा द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
६) थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.







Wednesday, 12 December 2018



     Reflection for the Homily of 3rd Sunday of Advent 
(16-12-18) By Br. Robby Fernandes 





आगमन काळातील तिसरा रविवार

दिनांक : १६-१२-२०१८
पहिले वाचन : सफन्या ३:१४-१८
दुसरे वाचन : फिलीपिकरांस पत्र ४:४-७
शुभवर्तमान :  लुक- ३:१०-१८


 



हर्ष करा, जल्लोष करा, कारण आपले तारण जवळ आले आहे!

प्रस्तावना:

     आज आपण आगमनकाळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजचा रविवार हा हर्षाचा रविवार किंवा आनंदाचा रविवार म्हणून संबोधला जातो. कारण आजची वाचने आनंदाविषयी सांगत आहेत. तसेच परमेश्वराचा मार्ग नीट करून, त्याच्या अस्तित्वाचा अनुभव घ्यावयास पाचारण करीत आहे. कारण तो फार चांगला आहे, त्याच्या तारणाचा अनुभव वैयक्तिकरित्या प्रत्येकाने घेतला पाहिजे; हा परमेश्वर आपल्याबरोबर सदैव वस्ती करतो व सर्व वाईटांपासून आपला बचाव करीत असतो. जुन्या करारामध्ये अनेक संदेष्ट्यांनी भाकीत केले होते की, जेव्हा तारणारा किंवा मुक्तिदाता येईल तेव्हा तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल व आम्हालाही तो पवित्र करील.
     आजचे पहिले वाचन सफन्या प्रवाद्याच्या पुस्तकातून घेतलेले आहे व हा प्रवादी  आपल्याला सांगत आहे की, आपण आंनदोस्तव करत रहायला पाहिजे, हर्ष करत राहिलो पाहिजे. कारण त्याने आपले शत्रुंपासून निवारण करून आपल्यासाठी तारणाचा मार्ग खुला केला आहे. तसेच दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की, परमेश्वराचे आगमन जवळ आले आहे, म्हणून तुमच्या हृदयाची तयारी करा, दुसऱ्या कशाचीही चिंता करू नका. आनंदी व हर्ष करत राहा, कारण तुमच्या इच्छा आंकाक्षा ख्रिस्तामध्ये पूर्ण होणार आहेत. आजच्या लूकलिखित शुभवर्तमानामध्ये योहान बाप्तीस्ता स्पष्टपणे सांगतो की, ज्याच्याजवळ जास्त आहे, त्याने उदारतेने दुसऱ्याला द्यावे, कोणावरही जबरदस्ती करू नये. अशाप्रकारे आपण ख्रिस्ताच्या येण्यास तयार राहू शकतो. पुढे तो म्हणतो की, मी मसीहा नाही तर, माझ्यामागून जो येणार आहे तो माझ्याहून कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे व तो आत्म्याने तुम्हांस अभिषिक्त करील. असे सांगून तो ख्रिस्ताची थोरवी गातो.
     ह्या आगमन काळात ख्रिस्ताला स्विकारण्यासाठी आपल्या मनाची व हृदयाची तयारी करण्यास लागणारी कृपा आजच्या ह्या मिस्साबलीदानात परमेश्वर चरणी मागुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: सफन्या ३:१४-१८

सफन्या त्याच्या पुस्तकामध्ये सांगत आहे की, हे येरुशलेम कन्ये मनःपूर्वक उल्हास, उत्सव व जयजयकार कर. परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे व तुझ्या शत्रूपासुन तुला निवारले आहे. कारण इस्रायलचा राजा तुझ्यामध्ये आहे. भिऊ नको तर आंनदोस्तव करीत राहा. परमेश्वर वीरासारखा तुझ्याठायी, तुझ्याबरोबर आहे.

दुसरे वाचन: फिलीपिकरांस पत्र ४:४-७

संत पौल फिलीपिकरांस लिहिलेल्या पत्रात सांगतो की, तुम्ही आनंदी रहा, हर्ष करा. कारण परमेश्वराचे आगमन होणार आहे; व त्यासाठी स्वतःच्या हृदयाची तयारी करा. कशाची चिंता करू नका व तुमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या चरणी अर्पण करा, जेणेकरून तुमच्या इच्छा आकांक्षा ख्रिस्तामध्ये पूर्णत्वास येतील.

शुभवर्तमान: लुक- ३:१०-१८

आजचे शुभवर्तमान आपल्याला स्वतःची तयारी करण्याचा सल्ला देत आहे. तसेच दुसऱ्यांना न लुबडण्यास, जबरदस्ती न करण्यास व जे आपल्याजवळ आहे त्यात तृप्त राहण्यास सांगत आहे. लोकांचा असा समझ झाला कि, योहानच ख्रिस्त आहे. पण योहानाने स्पष्टपणे सांगितले कि, मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे तो तुम्हाला पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल. अशाप्रकारे तो ख्रिस्तासाठी मार्ग तयार करत होता.

बोधकथा:

पुरातनकाळी एक सरीफ नावाचा नावाजलेला राजा होता. तो जितका श्रीमंत तितकाच उदार व निःस्वार्थी होता. एके दिवशी आपल्या राजवाड्यात फेरफटका मारत असताना त्याच्या निदर्शनास एक भिकारी आला. राजा जवळून जात असताना त्या भिकाऱ्याने त्याच्याकडे भिक्षेची मागणी केली, तेव्हा राजाने काही वेळानंतर त्यास एक शेतजमीन बक्षीस दिली. भिकाऱ्याने राजाचे आभार मानले व तो निघून गेला. भिकाऱ्याने दुसऱ्या दिवशी ती जमीन एका मालकास विकली व काही दिवस मिळालेल्या पैशातून मौज-मजा केली आणि मग पुन्हा नेहमीप्रमाणे भिक मागू लागला. एक वर्षानंतर जेव्हा राजा पुन्हा फेर-फटका मारत असताना त्याच्या निदर्शनास तो भिकारी येतो. तेव्हा तो त्याला त्या जमिनीचे काय केले असे विचारतो. भिकारी उत्तरतो कि, “मी ती जमीन मालकास विकली.” तेव्हा राजा म्हणाला, “अरे मुर्खा मी त्या जमिनीत अनेक सोन्याची नाणी ठेवले होते, जेणेकरून तुझे जीवन चांगले होईल.”
परमेश्वर आपले दुःखमय जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न करत असतो, तसेच जो कोणी देवासमोर हात पुढे करतो त्याचे हात कधीही रिकामी राहत नाही.

मनन चिंतन:

आपण सर्वजण परमेश्वराच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. हीच आतुरता आणि उत्सुकता आपल्यामध्ये जिवंत ठेवणे गरजेचे आहे. ह्या रविवारला Gaudete रविवार म्हटलेले आहे; कारण ह्या रविवारी देऊळमाता परमेश्वरामध्ये उल्हासित होण्यासाठी आमंत्रण करीत आहे.
शुभवर्तमानात ‘आता आम्ही काय करावे’ हा प्रश्न लोकसमुदाय, जकातदार व शिपायी ह्याकडून प्रत्येकी तीन वेळा विचारला आहे. योहान त्यांना उत्तरतो कि, “ज्याच्याकडे दोन सदरे आहेत त्याने ज्याच्याकडे नाहीत त्याला द्यावेत, गरजेपेक्षा जास्त जमा करू नये. कोणाकडून बळजबरीने पैसे घेऊ नये व तुम्हाला मिळणाऱ्या पगारात समाधानी रहाण्यास सांगितले.” तसेच त्याने ख्रिस्ताच्या आगमनासाठी तयारी करण्यासाठी त्यांना त्यांची हृदये साफ करण्यास सांगितले. तसेच त्यांना हर्ष करून वाम मार्गाचा अवलंब न करण्यास मार्गदर्शन केले.
योहान बाप्तीस्ता हा घोषणा करण्यासाठी व ख्रिस्तासाठी मार्ग तयार करण्यासाठी आला होता. कारण जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा त्याला कशाचीही कमतरता न भासण्यासाठी व तसेच ख्रिस्ताला लोकांनी योग्य रीतीने स्विकारून घेण्यासाठी योहान प्रयत्न करीत होता. योहानाने सुचविल्याप्रमाणे आपण आपल्या जीवनातील गर्वाचे व रागाचे जे डोंगर आहेत ते भुईसपाट करून ख्रिस्ताला प्रथम स्थान दिले पाहिजे. जेव्हा आपल्या घरात पाहुणे येतात तेव्हा आपण त्यांची काळजी घेतो व त्यांचा योग्य असा पाहुणचार करतो त्याचप्रमाणे जेव्हा ख्रिस्त येणार आहे त्याचा आपण आपल्या हृदयात पाहुणचार केला पाहिजे. योहान बाप्तीस्ताने स्वतःला कधी उंचावले नाही तर त्याने म्हटले कि, “जो माझ्यापेक्षा सामर्थ्यशाली आहे तो येत आहे. त्यांच्या वाहनाचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही. योहान हा ख्रिस्तापुढे दास किंवा चाकर झाला, म्हणूनच असे म्हटले आहे कि, 
   दास असे मी प्रभू चरणाचा | दिन बिचारा दिन किती |
 दासीचा तव पुत्र असे मी | कृपा तुझी माझ्यावरती |
 वरील ओव्या योहान बाप्तीस्ताच्या जीवनाला शोभून दिसते. हा आगमनकाळ आपल्याला शिमोन व हन्ना सारखी प्रभूची वाट पाहण्यास बोलावत आहे; योहानासारखा मार्ग तयार करण्यास आमंत्रित करतो; तर मरीये सारखे ख्रिस्ताला स्वतःच्या जीवनात स्वागत करायला बोलावत आहे. जेणे करून येशू ख्रिस्त आपल्या जीवनात राहून आपल्याला नवजीवन प्राप्त करून देईल. हे नवजीवन प्राप्त करण्यासाठी आपण तयार आहोत का? आपण आपल्या जीवनाचा प्रभूस्वागतासाठी कायापालट करण्यास तयार आहोत का? ह्या नाताळ सणात ख्रिस्ताला आनंदाने स्विकारण्यासाठी आपण सुसज्ज राहू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे परमेश्वरा, दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू - धर्मभागिनी आणि प्रापंचिक ह्या सर्वांवर परमेश्वराचा भरपूर असा आशिर्वाद यावा आणि जेणेकरून परमेश्वराचा शब्द ते संपूर्ण जगापर्यंत पोहोचवतील यासाठी आपण प्रार्थना करूया.
२.  या जगातील जे बालके भुकेने उपाशी आहेत त्या सर्वांना दोन वेळचे जेवण मिळावे व त्यांच्या गरजा परमेश्वर पित्याने पूर्ण कराव्या म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.  आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक व्यक्ती हा मेंढरासारखा आहे. आपले स्थानिक धर्मगुरू हे आपले मेंढपाळ आहेत. सर्वांनी आपल्या मेंढपाळाच्या मार्गदर्शनाखाली चालून परमेश्वराचा गौरव करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आजच्या तरुण-पिढीने प्रसारमाध्यमाचा उपयोग योग्य रीतीने करावा व ते वाईट मार्गाने बहकून जाऊ नये म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.  आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक मागण्या प्रभूचरणी अर्पण करूया.

Friday, 7 December 2018



Reflections for the homily of 2nd Sunday of Advent
(09-12-2018) by: Br. Jackson Nato.






आगमनकाळातील दुसरा रविवार

दिनांक – ९-१२-१८
पहिले वाचन – बारुख ५:१-९
दुसरे वाचन - फिलिपिकरांस पत्र – १:४-६,८-११
शुभवर्तमान - लूक – ३:१-६





“पश्चाताप करा व बाप्तिस्मा घ्या”


प्रस्तावना

     आज आपण आगमन काळाच्या दुसऱ्या आठवड्यात पदार्पण करत आहोत. ख्रिस्त आपल्या मध्ये लवकरच येणार आहे. पण तो येईल तेव्हा त्याला स्विकारण्यास आपली तयारी असेल का? त्यामुळे देऊळमाता आज आपल्याला पश्चाताप करण्यास बोलावत आहे. “पश्चाताप करा व बाप्तिस्मा घ्या” ह्या शब्दांत योहान बाप्तिस्मा आपल्याला ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी करण्यास सांगत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराने आपल्या सर्वासाठी राखून ठेवलेल्या वैभवाची झलक पहावयास मिळते. रसातळाला गेलेल्या लोकांनी घाबरून जाऊ नये कारण परमेश्वर त्यांच्या आक्रोशाचे रुपांतर जल्लोषात करणार आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल फिलीप्पीकरांस लिहिलेल्या पत्रात परमेश्वराच्या प्रितीत जसे ते सुरवातीपासून जगत आले आहेत त्याच प्रितीत त्यांनी शेवटपर्यंत जीवन व्यतीत करावे म्हणून विनंती करत आहे. आजच्या शुभवर्तमानात योहान संदेष्टा ‘परमेश्वरासाठी मार्ग तयार करा व त्याची वाट नीट करण्याचा संदेश देत आहे.
     ह्या प्रभूशब्दांवर मनन चिंतन करत असताना आपण परमेश्वरापासून दूर गेले आहोत का? ह्याची पडताळणी करून आपण ख्रिस्ताजवळ येण्यास कृपा मिळावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण :
पहिले वाचन: बारुख ५:१-९

     ह्या उताऱ्यात आपणांस परमेश्वराने संपूर्ण मानवजातीसाठी भविष्यात राखून ठेवलेल्या वैभवाचा उलगडा करण्यात येत आहे. इथे नमूद केलेले यरुशलेम म्हणजे परमेश्वराचे राज्य होय; परमेश्वर यरुशलेमला आनंद करण्यास सांगत आहे. कारण शत्रूंच्या अत्याचाराला बळी पडलेल्या ह्या प्रजेस परमेश्वर पुन्हा एकदा नव चैतन्यमयकरणार आहे. त्यांनी गमावलेले वैभव त्यांस पुन्हा मिळवून देणार आहे. यरुशलेम म्हणजे शांती व धार्मिकतेचे शहर आणि म्हणून ह्या नावाने त्यांची ओळख कायमची राहील. चहूदिशांनी लोक यरुशलेमेत येतील कारण परमेश्वराने पुनर्वसित केलेले हे नवीन यरुशलेम फक्त अब्राहामाच्या वंशजांसाठीच मर्यादित राहणार नाही, तर प्रत्येक मानवासाठी त्याची दारे उघडी असतील व सर्व परमेश्वराचे वैभव पाहतील. कारण परमेश्वराने सर्वांवर सारखीच प्रीती केली आहे.

दुसरे वाचन: फिलीपिकरांस पत्र १:४-६, ८-११

     फिलीपि हे शहर पौलाने सुवार्ता घोषविलेलं पहिले शहर. आणि म्हणून इथल्या लोकांबद्दल पौलाच्या मनात एक आपुलकीची भावना रुतली होती. कारण ते ख्रिस्ताशी एकरूप होते. तसेच त्यांनी पौलाला त्याच्या मिशनरी कार्यात आर्थिक मदत केली. ही मदत फक्त आर्थिक नव्हती, तर त्या मदती मागे, ख्रिस्ताची सुवार्ता दुसऱ्यांपर्यंत पोहचावी हा हेतू होता. म्हणून संत पौल त्यांना सांगतो, की परमेश्वराने तुमच्याद्वारे चांगल्या कामाची सुरुवात केली आहे, आणि ती पूर्ततेस नेण्यास तो तुम्हास सहाय्य देवो. फिलीपिकर हे ख्रिस्ताशी एकनिष्ठ होते. ह्याचं उदाहरण म्हणजे त्यांची एकमेकांवर असलेली प्रीती. ही प्रीती अशीच कायम राहावी व ख्रिस्त जेव्हा परत येईल तोपर्यंत ती त्यांच्या जीवनात सजून राहावी, जेणेकरून त्याद्वारे परमेश्वराचा गौरव होईल.

शुभवर्तमान: लूक ३:१-६

     आजच्या ह्या उताऱ्यात आपणांस योहान बाप्तीस्ताचे दर्शन होते. योहान बाप्तीस्ता, हा सर्वांत शेवटचा पण सर्वांत महान संदेष्टा म्हणून ओळखला जातो. कारण त्याची निवड ही परमेश्वराचा मार्ग तयार करण्यासाठी होते. तो मार्ग तयार करण्यास आला हे पुराव्यासहित स्पष्ट करावे, हे एक सत्य आहे, ते लोकांना पटवून द्यावे म्हणून शुभवर्तमानकार लूक, त्यावेळी सत्तेत दृढ असलेल्या अधिकाऱ्यांची नावे नमूद करतो. ख्रिस्त आम्हामध्ये येणार आहे व मानवीरूप धारण करणार आहे, हे लोकांना पटवून द्यावे म्हणून योहानाने लोकांची मने तयार करण्याची जबाबदारी स्विकारली. त्याने लोकांना पश्चाताप करण्यास आव्हान केले. कारण ख्रिस्ताला स्विकारण्यास पश्चातापापेक्षा अजून चांगला मार्ग अस्तित्वात असणे शक्य नव्हते. कारण ख्रिस्त जग जिंकायला नव्हे, तर लोकांची मने जिंकायला आला होता. आणि त्यासाठी आपली पूर्व तयारी असावी ह्या कारणास्तव योहानाने आपले आयुष्य समर्पित केले.      
     
बोधकथा:

     एक दिवस एक सैनिक साधूकडे आला व साधूला म्हणाला, स्वर्ग आणि नरक काय आहे? ह्यातील फरक मला समजावून सांगा. त्यावर तो साधू उत्तरला, “तू खरोखरच एक भित्रा मनुष्य आहेस, तू एक शूर सैनिक नसून, भिधाड आहेस, तुला बंधूक वापरता येत नाही.हे ऐकून सैनिकाला आपला राग आवरेनासा झाला. आणि त्याच रागात त्याने साधूवर बंधूक ठेवली व थोड्याच वेळात तो गोळी चालवणार एवढ्यात साधू त्यास म्हणाला, “हीच ती आग, हाच तो नरक!हे ऐकून सैनिकाचा राग वितळला व त्याने आपली बंदुक मागे घेतली. हे दृश्य पाहून साधू सैनिकाला म्हणाला, “हा पहा स्वर्ग!

मनन चिंतन

     प्रत्येक घटनेपूर्वी एक बातमी असते; पावसाची वाऱ्यात, वादळाची शांततेत, सूर्याच्या आगमनाची पक्ष्यांच्या किलबिलतेत पण ख्रिस्ताची मात्र योहानाच्या आवाजात आहे. आजच्या शुभवर्तमानात योहान बाप्तीस्ता आपल्याला पश्चाताप करून ख्रिस्ताठायी मार्ग तयार करण्यास आमंत्रण देत आहे.
     एक दिवस बिशप फुल्टन शीन एका शहरात प्रबोधन करण्यासाठी जात होते. तेथे जात असताना त्यांनी एका मुलाला मार्ग माहित नसल्याने तेथे पोहोचण्याचा योग्य मार्ग विचारला. त्या मुलाने दिशा दाखवत असताना ते तिथे का जात होते ह्याबद्दल विचारले. ह्यावर बिशप म्हणाले की, “मी तिथे स्वर्गाकडे कसे जायचे ह्याबद्दल प्रबोधन करणार आहे”. तेव्हा तो मुलगा म्हणाला, “तुम्हांला तुमच्या प्रबोधन स्थळाकडे जाण्याचा मार्ग माहित नाही तर मग स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग कसा माहित पडणार?”
     जरी मुलाच्या शब्दांत तर्कशास्त्र नसले तरीही त्यात थोडीशी वास्तूस्थिती दडलेली आहे. कारण जर आपल्याला स्वर्गाकडे जायचे असेल तर आपल्याला मार्ग माहित असणे आवश्यक आहे. व तो मार्ग तयार करण्यासाठी आपली तयारी असली पाहिजे. आज योहान आपल्याला ख्रिस्त आपणामध्ये येणार आहे त्यासाठी मार्ग म्हणजेच आपल्या हृदयाची तयारी करण्यास सांगत आहे. वाळवंटात योहानाचा आवाज येतो की, लोकांनी पश्चातापाचा स्नानसंस्कार घ्यावा, त्यांची हृदये उघडी ठेवावी; कारण काळाची पूर्तता होत आहे व अब्राहामाला व दाविदाला परमेश्वराने केलेली वचने आता पूर्णत्वास येणार आहेत. आदामाच्या पापाने शापित झालेली मानवजात आता तारण अनुभवणार आहे. दुःखाने, छळाने व्याकूळ झालेली इस्त्रायल जनता नवीन जीवन अनुभवणार आहे कारण परमेश्वराने आश्वासित केलेला मसीहा हा आपल्यामध्ये अवतरणार आहे. म्हणून त्याला स्विकारण्यास तयारी करावी हे योहान छाती ठोकून सांगत आहे.
     मग ही तयारी कशी असावी? पूर्वीच्या काळी राजा जेव्हा पहाणी करण्यास जात, तेव्हा तिथले रस्ते, घरे, मैदाने सर्व स्वच्छ केले जात असे. आजसुद्धा आपण पाहतो की, एखादा मंत्री किंवा उच्च वर्गातील कोणी एक जात असेल तर त्यांच्यासाठी कडक सुरक्षा असते. साफ सफाई, नवीन रस्ते तयार केले जातात व त्यांच्या भेटीला सर्व लोक योग्य प्रकारे तयारी करून येतात.
     ‘ख्रिस्ताला भेटण्यासाठी आपली तयारी अशीच असावी का?’ नाही. आपली तयारी त्याहूनही अधिकपटीने असावी. ही तयारी केवळ भौतिक गोष्टींची नसावी, परंतु आपल्या अंतःकरणाची असावी आणि ही तयारी करण्यासाठी आपण आपल्या अंतःकरणाची तपासणी करावी. दैनंदिन जीवनात आपण पापांस बळी पडलो आहोत का? जगाच्या मूल्यांना प्राधान्य दिलेले आहे का? ह्यासाठी पश्चाताप करून आपली आंतरिक तयारी करणे गरजेचे आहे.
     योहान पुढे यशया संदेष्ट्याचे शब्द अध्याय ४०:३-७ मध्ये आपणांस सुनावतो की, “तुमचे मार्ग सरळ करा, प्रत्येक दरी भरून काढा, प्रत्येक पर्वत सपाट करा. वेडेवाकडे रस्ते सरळ करा, खडकाळ जमीन गुळगुळीत करा.ह्या ओवीद्वारे योहान आपणांस सांगू इश्चितो की, आपल्या जीवनात दुःखाच्या दऱ्या आहेत. दुःखे आणि संकटांनी एक सखोल घाव आपल्या अंतःकरणात पाडला आहे. आपण पर्वतासारखे गर्वाने भरलेलो आहोत. आपले नैतिक जीवन वेडेवाकडे झाले आहे. म्हणून आपण त्याकडे लक्ष द्यायला हवे. प्रभू येशू ख्रिस्त जो आनंद आपणांस घेऊन येणार आहे त्यामानाने, आपल्या यातना खूप कमी आहे म्हणून आनंद करा. आपण आपला गर्व सोडून नम्र व्हावे नाहीतर, इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजेच ख्रिस्त आपल्या मध्ये येऊन जाईल तरी आपणांस ओळखता येणार नाही. आपले नैतिक जीवन जे मलीन झाले आहे ते आपण स्वच्छ करावे. आपले शेजाऱ्याबरोबरील सबंध प्रीतीने व शांतीने भरून काढावेत. अशा प्रकारे योहान आपणांस ख्रिस्ताचे आगमन सुरळीत होण्यासाठी मार्ग तयार करण्यास सांगत आहे. कारण त्याद्वारे आपणांस तारण लाभणार आहे. ख्रिस्ताने आपणास तारण मिळवून दिले आहे. परंतु त्याचा अनुभव घेण्यास मी पात्र आहे का? व ह्या तारणात सहभागी होण्यासाठी आपण आज प्रार्थना करूया.  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
आपला प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. आमचे परमगुरु, महागुरू, धर्मभागिनी व धर्मबंधू व ख्रिस्तसभेत कार्य करणारे इतर प्रापंचिक ह्या सर्वांना मानसिक व शाररीक आरोग्य मिळावे व पवित्र आत्म्याचा सहवास त्यांना सदैव मिळावा म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.
२. आजच्या ह्या धावपळीच्या जगात अनेकांना देवाचा विसर पडला आहे व ते देवापासून दूर गेले आहेत. त्यांच्यावर परमेश्वराच्या कृपेचा वर्षाव व्हावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. आपले सर्व बंधू-भगिनी जे वेगवेगळ्या आजारांशी, रोगाशी सामना करत आहेत. त्यांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व त्यांचे जीवन सुरळीत चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ज्या ज्या ठिकाणी प्रवासी मार्ग बांधण्याचे उपक्रम हाती घेतले आहेत, ती सर्व कामे सुखरूप व यशस्वीपणे पार पाडून लोकांचा प्रवास सुरळीतपणे व्हावा व ज्या लोकांना अजून रस्त्याची उपलब्धता नाही, त्या सर्वांकडे परमेश्वराने दयेने पाहून त्यांची इच्छा पूर्ण करावी म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.
५. आपल्या वैयक्तिक गरजा परमेश्वराच्या कृपेने पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण थोडा वेळ शांत राहून विशेष प्रार्थना करूया.