Thursday, 21 November 2019

Reflection for the Homily of CHRIST THE KING (24-11-19) By   Br. Rahul Rodrigues





ख्रिस्त राजाचा सण




दिनांक: २४/११/२०१९
पहिले वाचन: २ शमुवेल ५: १-३
दुसरे वाचन: संत पौलचे कलस्सैकरांस पत्र  १: १२-२०
शुभवार्मान: लुक  २३: ३५-४३

“ख्रिस्त करुणेचा राजा”

प्रस्तावना:

      आज आपण ख्रिस्त राज्याचा सण साजरा करत असून आज सामान्य काळातील शेवटचा आठवडा आहे. देऊळ माता आज आपल्याला आठवण करून देत आहे की, प्रभू येशू ख्रिस्त हा फक्त विश्वाचा राजा नसून तो आपल्या हृदयाचा, आत्म्याचा, शांतीचा, शरीराचा व कुटुंबाचा राजा आहे. त्याचे हे राज्य हे अनंत काळाचे राज्य.
          आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की इस्रायलच्या लोकांनी दावीदला आपला राजा म्हणून निवडले. तर दुसऱ्या वाचनात संत पौल ख्रिस्ताला विविध अशी उपमा देऊन ख्रिस्ताची श्रेष्ठता आपल्याला सांगत आहे. पुढे लूक लिखित शुभवर्तमानात येशू ख्रिस्त एक विश्वासू चोराला त्याच्या स्वर्ग ऐश्वर्यात तारणाचे आश्‍वासन देतो. प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या ही जीवनाचा राजा व तारण करत आहे. वधस्तंभावरील चोरा प्रमाणे आपल्यालासुद्धा तारणाचा मार्ग प्राप्त व्हावा व येशूची करूणा अनुभवावी म्हणून आपण एक चित्ताने ह्या मिस्साबालीदानात मागूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: २ शमुवेल ५: १-३

          दावीद इस्रायल राष्ट्रांचा राजा होतो हे प्रस्तुत उतारा यातून स्पष्ट करून दिले आहे. इस्रायलच्या सर्व वंशांच्याकडून दावीदला राजा होण्यासाठी विनंती केली गेली. मग इस्रायलच्या सर्व वडीलजणांनी हेब्रोनात एकत्र येऊन दावीदचा अभिषेक केला आणि त्याला इस्रायल वर राजा म्हणून नेमले.

दुसरे वाचन: संत पौलचे कलस्सैकरांस पत्र १: १२-२०

          संत पौलने कलस्सैकरांस लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात ख्रिस्ताच्या सर्व अधिकाराचे योग्यरीतीने विवरण केलेले दिसून येते. तो ख्रिस्ताविषयी सात  गौरवी सत्य सांगत आहे. ती ख्रिस्ताची श्रेष्ठता प्रगट करतात. संत पौल म्हणतो, ख्रिस्त अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्ती ते श्रेष्ठ आहे. तो संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आहे. तो शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी व मृतांतून प्रथम जन्मलेला आहे. त्याच्यामध्ये देवाची सर्व पूर्णता वसते  व समेट करणारा आहे. अशाप्रकारे ख्रिस्ताला सर्वाधिक प्राधान्य व वर्चस्व प्रदान करण्यात आले.

शुभवार्मान: लुक  २३: ३५-४३

          लुक लिखित शुभवार्मानात आपल्याला आपल्या विश्वासाच्या रहस्याचे दर्शन घडते. येशू ख्रिस्त क्रुसावर मरत असताना त्याला आपला तारणकर्ता व राजा म्हणुन घोषित करण्यात येते. लूक लिखित शुभवर्तमानात आजचा मुख्य विषय हा तारण असा आहे व हेच आज आपल्याला शुभवर्तमानात दर्शविण्यात येत आहे. येशू ख्रिस्त हा राजा आहे पण ही गोष्ट फक्त ज्यांचा दृढ विश्वास आहे, तेच मान्य करतात.
          येशूला वधस्तंभावर खिळताना त्याची फार निंदानालस्ती करण्यात आली होती. तसेच त्याला यहुद्यांचा राजा असे शीर्षकही त्याच्या उपहास म्हणून दिले गेले. वधस्तंभावर खिळलेला एका अपराध्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्यास म्हटले की, “आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” प्रभू येशूने लगेच त्याला त्याच्या तारणाचे अभिवचन दिले. “तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” त्या वधस्तंभावर या अपराधाला सार्वकालिक  जीवन मिळाले.

बोधकथा:

           एकदा एक राजा एक आपल्या राज्यातील गरीब मुलीच्या प्रेमात पडला. मग त्याने ठरवले की, ह्या मुलीला आपण आपल्या राजवाड्यात आणूया व लग्न करूया. परंतु त्याला असे वाटले की, आपण असे केल्यास त्या मुलीवर आपण अन्याय व जबरदस्ती करतो. त्यात त्यास त्याचे प्रेम कुठेच दर्शवले जाणार नाही. मग त्याने बरेचसे दिवस विचार केल्यानंतर व आपल्या राजावाडा व सर्व काही सोडून त्या मुलीच्या शेजारी राहू लागला. त्याचा हा त्याग व प्रेम पाहून ती मुलगी ही त्या राज्याच्या प्रेमात पडते.

मनन चिंतन:
 “देवाचे राज्य सामर्थ्यात नाही केवळ बोलण्यात
प्रारंभी शब्दच हो शब्द देवासह होता.”

          आपण खूप अशा राजा विषयी निरनिराळ्या पद्धतीने ऐकले आहे. इतिहासातही बरेचसे राजे होऊन गेले. त्यामुळे राज्याची प्रतिमा आपल्यासाठी काही नवीन नाही. राजा या शब्दाची फोड केल्यास आपल्याला दोन वेगळे अर्थ मिळतात: ‘रा’ म्हणजे जो राज्य करतो व ‘जा’ म्हणजे जो आपल्या प्रजेला जाणतो तो. बरेच राजे आले आणि धुळीस मिळाले, कारण ते स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठीच जगले. त्यांनी जनतेचा विचार फार कमी; मात्र स्वतःचा विचार जास्त केला. म्हणून आज लोक त्यांना विचारतही नाहीत. किंबहुना काही राजे चांगले सुद्धा होते. त्यांनी लोकांची सेवा केली.
          प्रत्येक राज्याची एक प्रजा होती. त्याचा राजवाडा होता. तो आपल्या थाटा माटात गजब जायचा. आपल्या सिंहासनावर बसून डोक्‍यावर सोन्याचा मुकुट घालून लोकांचा न्याय करत असत व कधी अन्याही करत असत.
          परंतु आजचे लुक लिखित शुभवर्तमानात आपल्यासमोर एक वेगळाच राजा प्रदर्शित करत आहे. तो आपल्या राजवाड्यात नाही तर कालवरीच्या डोंगरावर आहे. तो सिहांसनावर बसला नाही; तर ख्रुसावर निर्बल व हतबल होऊन टांगला आहे. तो लोकांचा न्याय करत नाही व लोक त्याची वाहवा ही करत नाहीत, तर ख्रुसा खाली जमलेले लोक त्याची थटा व निंदानालस्ती करत आहेत.
          मग हा कसा आपला राजा? जो क्रूर असे अपराध्या सारखा क्रुसावर मरत आहे? तर ख्रिस्त हा शांतीचा, प्रेमाचा, दयेच्या राजा आहे. “त्याचे राज्य इथले नाही तर त्याचे राज्य हे स्वर्गाचे आहे.” (योहान १८:३६) खरे पाहता येशूने कधीच राजेपणा सारखा कधीही वावर केला नाही; किंवा, ‘मी राजा आहे’ असे कधी घोषित ही केले नाही. मग येशूला यहुद्यांचा राजा असे का म्हटले? तर पाहता यिर्मया संदेष्ट्याने भाकीत केले होते की; “देव आपल्याला एक राजा देईल व तो त्याचे राज्य पुन्हा प्रस्थापित करील.” (यिर्मया २३:५-६) आणि तो अभिषिक्त केलेला असेल. (दानियेल ९:२५) म्हणून जेव्हा येशूने म्हटले की “मीच तो निवडलेला आहे.” (लुक ४:१८) आणि स्वर्गाच्या राज्याचाउल्लेख केला. ह्या कारणास्तव शास्त्री आणि परुषांनी येशूचा गैरफायदा घेतला, व आपल्या जाळ्यात पकडले.
          येशूला हे ठाऊक होते की; हे लोक त्याला जिवे मारू पाहतात. परंतु येशू एका हतबल शेळी सारखे आपले अर्पण करतो. कारण त्याला आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करावयाची असते. येशूला लोकांवर क्रूरतेने किंवा जबरदस्तीने राज्य करावयचे नव्हते, तर त्याला लोकांच्या मनात, त्याच्या हृदयावर राज्य करावयचे होते. जे राज्य कधीच संपुष्टात येनार नाही.
त्यामुळेच येशूकडे राजदंड नव्हता, तर रुमाल होता.
लोक त्याच्यासमोर झुकले नाहीत, तर येशू स्वतः हा झुकला व आपल्या शिष्यांचे पाय धुतले
त्याच्याजवळ सैन्य नव्हते, परंतु शिष्य होते.
तो राजासनावर नाही बसला, परंतु गाढवावर बसला.
त्याने सोन्याचा मुकुट नाही घातला, परंतु काट्यांचा मुकुट घातला.
त्याने कोणाचा प्राण नाही घेतला, परंतु आपला प्राण दिला.
त्याने कुठलीही सीमा नाही ठेवली, तर त्याने सर्वांना आपला राज्यात सामावून घेतले.
त्याने कोणाचे शोषण नाही केले, तर त्याने लोकांची सेवा केली व त्यांना धीर दिला.
          इतकेच नाही तर मरतेवेळी सुद्धा आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केली, व आपल्या उजव्या बाजूच्या चोराला स्वर्गाचे आश्वासन दिले. कारण त्याने येशूचे करुणेचे राज्य ओळखले व त्याला कळून चुकले की, येशू दयेचा व करुणेचा राजा आहे. आपणही आज ख्रिस्त राज्याचा सण साजरा करत असताना आपल्याला सुद्धा स्वर्ग राज्याचा अनुभव यावा, व आपण ही येशूच्या दयेचा व करुणेचा अनुभव घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: ’हे प्रभू तुझे राज्य आम्हांवर येवो.’

१.आपल्या ख्रिस्त सभेचा कारभार पाहणारे पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ज्यांनी आपले सर्व आयुष्य प्रभू सेवेसाठी अर्पण केले आहे त्यांना देवाची कृपा-आशीर्वाद मिळावा व त्यांनी येशूची सुवार्ता सर्वत्र पसरवली म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.आपले सर्व राजकीय पुढारी व नेते ह्यांनी येशू प्रमाणे जनहितासाठी झटावे व जनतेची अधिकाधिक सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.जे कोणी आजारी,  दुःखी व संकटांनी ग्रासलेले आहेत, आयुष्याला कंटाळलेले आहेत अशांना प्रभुचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.आज ख्रिस्त राज्याचा सण साजरा करत असताना प्रभू येशूला आपल्या जीवनाचा राजा बनवून त्याचे राज्य आपल्या हृदयात यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

Thursday, 14 November 2019


Reflection for the Homily of 33rd SUNDAY IN ORDINARY TIME (17-11-2019) By Br. Lipton Patil









सामन्य काळातील तेहतिसावा रविवार





दिनांक: १७/ ११/२०१९
पहिले वाचन: मलाखी ४: १-२
दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र ३: ७-१२ 
शुभवर्तमान: लुक २१: ५-१९


“परमेश्वराचा दिवस येत आहे”

प्रस्तावना:  

          आजपासून आपण सामान्य काळातील तेहतिसाव्या रविवारात प्रधार्पण करत आहोत. आजच्या उपासनेद्वारे ख्रिस्तसभा  आपणाला सांगत आहे की, “परमेश्वराचा दिवस येत आहे.” अर्थात, परमेश्वर येत आहे; शेवटचा बोध देण्यासाठी व न्यायनिवाडा करण्यासाठी.
           मलाखी संदेष्ठा आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला सांगतो की; गर्विष्ठ व दुराचारी यांचा नाश होईल. परंतु जे परमेश्वराचे भय बाळगतात त्यांना प्रभूठायी आरोग्य प्राप्त होईल. थेस्सलनीकाकरांस दुसऱ्या पत्रात आपण ऐकत आहोत की; संत पॉल मनुष्याच्या शारिरीक किंबहुना, आर्थिक जीवनाविषयी मार्गदर्शन करीत आहे. तसेच आजच्या लुकलिखित शुभवर्तमानात येरुशलेमचा विध्वंस व युगाची समाप्ती याविषयी ख्रिस्त बोलत आहे. ख्रिस्ताच्या अश्या ह्या बोलण्यावरून आपणाला असे कळून येते की ख्रिस्त आपल्याला तत्पर राहण्यासाठी बोलावत आहे. माझ्या श्रद्धावंतांनो, आजच्या या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असताना, थोडावेळ शांत राहूया व पश्चातापी अं:तकरणाने क्षमा मागूया व भक्तिभावाने सहभागी होऊ या.

सम्यक विवरण:

पहिले वाचन : मलाखी ४:१-२

          संदेष्टा मलाखी परमेश्वर येत आहे याची घोषणा करत आहे. परमेश्वर आल्यावर गर्विष्ठ व सर्व दुराचारी लोकांचा नाश करील व त्यांना शिक्षेस पात्र ठरवणार आहे. परंतु जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतील व त्याच्या सांगण्याप्रमाणे वागतील त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव होईल. ते लोक हर्षभरित राहतील.

दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र: ३:७-१२  

          संत पौल आपल्या जीवना द्वारे प्रभू येशूची सुवार्ता सांगत असे. विश्वासणाऱ्यांणी त्याच्या उपजीविकेची जबाबदारी घेणे योग्यच ठरले असते. पौलाने कोणावर भार टाकला नाही. इतरांना चांगले उदाहरण व्हावे म्हणून त्यांनी स्वतः रात्रदिवस श्रम व कष्ट केले. विश्वासणाऱ्यांणी आपल्या उपजीविकेसाठी व्यवसाय अगर नोकरी करावी व प्रभुजी सेवाही करावी; हा उत्तम कित्ता घालून दिला आहे. कोणाला काम करायची इच्छा नसेल, तर त्याने उपाशीच राहावे.

शुभवर्तमान: लुक २१:५-१९

           ते मंदिर अति भव्य होते. सुमारे १५ मीटर लांबीचे दगड एकावर एक ठेवून ते बांधलेले होते. सोन्याच्या साखळ्या व वेळी त्यांनी आतील भिंती सुशोभित केल्या होत्या. हे मंदिर त्या काळात एक मोठे आश्चर्य होते. असे असून चिऱ्यावर चिरा राहणार नाही; हे एकूण ऐकणाऱ्यांना मोठा धक्काच बसला. येशू ख्रिस्त खरे तेच सांगत होता. अशी त्यांची खात्री पटली आणि या गोष्टी केव्हा होतील हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.
           या प्रश्नांचे उत्तर देताना प्रभू येशूने; जगाचा शेवट होईल, त्यापूर्वी काय घडेल तेही सांगितले. लढाया, भूकंप, भयानक रोगांची साथ व दुष्काळ या गोष्टी जगात प्रामुख्याने घडतील. स्वार्थी मानव आपल्या स्वार्थासाठी एकमेकांचा विध्वंस करताना आढळतील. जगात शांती नसल्यामुळे लोक शांतीच्या शोधात असतील व खोटी ख्रिस्त प्रकट होतील.

मनन चिंतन:

          असे म्हणतात की आपल्या कृत्यांमुळे  ज्याप्रमाणे निसर्गाचे चक्र आज बिघडलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या जीवनाचे चक्र सुद्धा बिघडलेले आहे. 
 माझ्या ख्रिस्ती बांधवांनो, आज जगात अतिवृष्टी, चक्रीवादळ, भूकंप व हवामानात बदल इत्यादी गोष्टी घडत आहेत. अशा या गोष्टी घडत असताना, आपण म्हणत असतो की, जगाचा शेवट जवळ आला आहे, आपल्या कृतीमुळे परमेश्वर आपल्यावर कोपला आहे. असे नाना प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये थैमान घालत असतात. अशावेळी आपण खचून जातो की, खरोखरच जगाचा अंत होणार का?  या भीतीने आपण खूपच खचून जातो. आपणास प्रत्येकाला वाटते की, जे काही कमावले आहे. मग तो पैसा घर गाड्या संपत्ती व जमीन असो की नाव हे सर्वकाही नष्ट होईल. आपल्याला शारिरीक सुखाची भीती जास्त असते. शारिरीक सुख कसे मिळेल यावर आपण रात्रंदिवस श्रम करतो व अध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष करीत असतो.
           आजच्या तिन्ही वाचनांत आपण ऐकले आहे की,  ख्रिस्त पुन्हा येत आहे व सर्वांचा न्याय होणार आहे. हे सत्य आहे की, ख्रिस्त लवकर येऊन आपल्या प्रत्येकाचा न्याय करणार आहे. प्रत्येकाला आपल्या कार्याचा मोबदला न्यायाने मिळणार आहे. आपला न्याय आपल्या चांगल्या व वाईट कृतीने करणार आहे. जे लोक चांगले जीवन जगतात त्यांचा न्याय चांगल्या रीतीने होईल व जे दृष्ट कृत्य करतात त्यांचा न्याय त्यांच्या कृत्यानेच होईल.  ख्रिस्त आपल्या धनसंपत्ती ने न्याय करत नाही किंवा श्रम व गरीब यावरून न्याय करत नाही. तर  ख्रिस्त आपले अंतःकरण बघतो. आपले मन किती पवित्र व शुद्ध आहे यावरून आपला न्याय होईल. त्यासाठी संत पौल आपल्या मार्गदर्शन आपल्याला मार्गदर्शन करतो की,  आपण आपले जीवन कसे जगायचे.  जीवन जगत असताना आपण स्वतः जबाबदार असतो. आपण ख्रिस्ताची सुवार्ता सांगायला कमी पडू नये. आपल्या वागण्यातून आपण ख्रिस्त दुसऱ्यांना दिला पाहिजे. बायबल तत्त्वज्ञानाची व विज्ञानाची किंवा मोठी पुस्तके घेऊन ख्रिस्ताची सुवार्ता सांगितले पाहिजे असे काही नाही. सर्वकाही आपल्यामध्ये आहे. आपल्या स्मितहास्याने दुःखी चेहरे आपण आनंदित करू शकतो.  एकटे पडले आहेत अशांचे  साथीदार बनवून त्यांचा भार कमी करू शकतो. जे संत होऊन गेले त्यांनी काही महान गोष्टी नाही केल्या. तर छोट्या कृत्यातून, त्यांच्या छोट्या कार्यातून इतरांना ख्रिस्त दिला.  अस्सिकर संत फ्रान्सिसनी कृष्ठरोग्यांची सेवा केली.  तसेच पर्यावरणाची काळजी घेतली.  अशा प्रकारे त्यांनी ख्रिस्ताची माहिती  व प्रेम जगाला प्रकट केले. आपण सुद्धा या गोष्टी करू शकतो व जेव्हा ख्रिस्त येईल न्याय  करायला  तेव्हा आपला न्याय योग्य रीतीने होईल.   
          शुभवर्तमानात सांगितल्या प्रमाणे युगाची समाप्ती होणार आहे.  ही समाप्ती होण्याच्या  आधी काही चिन्हे दिली जातील.  ही चिन्हे आपण आज अनुभवत आहोत. परंतु ही चिन्हे पहात असताना खचून जाऊ नका. कारण ही चिन्हे आपल्यासमोर नवे आव्हान ठेवतात. आपल्याला जागृत करतात  अशासाठी की ख्रिस्त लवकर येत आहे व तो सर्वांचा न्याय निवाडा करणार आहे.  तर आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाची तयारी केली पाहिजे. आपल्यामधील असलेला अहंकार, गर्विष्ठपणा, राग, मत्सर व क्रोध काढला पाहिजे. सर्वांची दयेने, प्रेमाने व करूणेने वागायला हवे.  आपण आपल्या दररोजच्या जीवनात दुसऱ्यांसाठी अडचण न होता; हे सर्व काही केल्याने प्रत्येकाचा न्याय चांगल्याने होणार व सर्वजण सर्वकालीन जीवनाचा आनंद घेतील व मेल्यानंतरही आपल्याला अनुभवता येईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे ख्रिस्ता तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक”

१. ख्रिस्त सभेची अखंडितपणे सुवार्ता जगाला पोहोचविणारे पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स,बिशप्स, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ यांना सर्वांना ख्रिस्ताचे प्रेम, कृपा व दया मिळून ख्रिस्ताची सुवार्ता जगभर जोमाने पसरविता यावी  म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. देशात अत्याचार, काळाबाजार, अन्याय व वैराचार ह्यासारख्या गोष्टी घडत आहेत, त्यामुळे देशाची उन्नती होत नाही. अशा वेळी आपल्या राजकीय नेत्यांनी होत असलेल्या वाईट गोष्टीवर आवाज उठवून, देशाला योग्य दिशा द्यावी व देशाची चांगल्यारितीने वाटचाल व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आजच्या हवामान बदलामुळे कितीतरी लोकांचे नुकसान झाले आहे. काहीकांची घरे उध्वस्त झाली, तर शेतांची नासाडी झाली आहे. परमेश्वराने दया करून हे सर्व काही शांत करावे व लोकांना धीर द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आज युवक-युवती जीवनात योग्य साथीदार व नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना योग्य साथीदार व नोकरी मिळून त्यांचे जीवन आनंदित व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे लोक अतिशय आजारी आहेत, ज्यांची सेवा करायला कोणीही नाही. अशा सर्व लोकांना ख्रिस्ताचा करुणामय स्पर्श व्हावा व त्यांची आजारातून मुक्तता व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


Thursday, 7 November 2019


 Reflection for the Homily of 32nd SUNDAY IN ORDINARY TIME (10-11-2019) By Br. Godfrey Rodriques.




सामान्य काळातील बत्तीसाव रविवार


दिनांक: १०/११/२०१९
पहिले वाचन:  २ मक्काबी ७: १-२, ९-१४
दुसरे वाचन:  थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र २:१६-३:५
शुभवर्तमान: लुक २०:२७-३८

प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील बत्तीसावा रविवारी प्रदर्पन करीत असताना आजची  उपासना आपणास सार्वकालीन जीवनावर आपली श्रध्दा बळकट करण्यास  व ख्रिस्ताच्या विश्वासात वाढण्यास बोलावत आहे.  
     आपण आपल्या जीवनात सर्वदा सुख: दुखांना सामोरे जात असतो अश्या ह्या सुख दुखाच्या जीवनात जसा जन्म आपल्याला लाभलेला असतो तसेच मरण सुद्धा अटळ असते. आपली अशी  समजूत आहे की  ज्या प्रमाणे आपल्या जन्माने आपल्या आयुष्याची सुरवात होत असते त्याच प्रमाणे  मरणाने जीवनाचा शेवट होतो परंतु आपला  ख्रिस्ती विश्वास व शिकवण  आपणास शिकविते की, मरण हा आयुष्याचा शेवट नसून ख्रिस्तामध्ये अनंत काळाच्या जीवनाची जणू नवीनच सुरवात आहे.
          आजचा देव शब्द तिन्ही वाचनांनद्वारे आपणास जीवितांच्या देवावर विश्वास ठेवण्यास सांगत आहे. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे आपला देव हा मृतांचा देव नसून जीवितांचा देव आहे. तो आपणास मरण नव्हे तर नवीन जीवन देण्यासाठी आला आहे आणि हे नवजीवन आपल्याला ख्रिस्ताद्वारे प्राप्त होत असते. म्हणून आजच्या उपसानेद्वारे आपण जीवितांचा देव प्रभू येशु ख्रिस्त ह्याच्याकडे मरणा नंतर अनंत काळाचे जीवन जगण्यास लागणारी विशेष कृपा मागुया व स्वतःसाठी आणि एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन:  २मक्काबी ७: १-२, ९-१४

     आजच्या पहिल्या वाचनात आपण सात भाऊ व त्यांची विधवा आई ह्यांच्याबद्दल ऐकतो. एक विधवा आई व तिची सात मुले ह्यांस राजाने बंदिस्त करून ठेवले होते. हे कुटुंब धार्मिक असल्यामुळे त्यांच्या धर्माला काळिमा फासण्यासाठी चाबकाचे फटके मारून निषिद्ध असलेले डुकराचे मांस त्यांस खावयास सांगितले परंतु मुलांनी त्यांच्या वडिलांनी दिलेल्या नियमशास्त्राचा आज्ञाभंग न करता मरण पत्करले. कारण त्यांचा विश्वास होता की, ‘जीवनाच्या अनंत नुतनीकरणासाठी विश्वाचा राजा आम्हाला उठवील.

दुसरे वाचन:  थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र २:१६-३:५

          प्रस्तुत उताऱ्यात संत पौल थेस्सलनीकाकरांस त्यांचा दृष्ट शत्रूपासून बचाव व्हावा म्हणून प्रार्थनेसाठी विनंती करत म्हणतो की, ‘आम्हासाठी प्रार्थना करीत रहा ह्यासाठी की जसा तुमच्या मध्ये प्रभूच्या संदेशाचा प्रसार झाला तसा इतरांमध्येही तो व्हावा आणि ते गौरविले जावे. संत पौलाचा देखील असा विश्वास होता की, ‘आपला ख्रिस्त प्रभू आपल्या सर्व दुष्टांपासून आपल्याला राखील व श्रद्धेत स्थिर करील.

शुभवर्तमान: लुक २०:२७-३८

          संत लुकलिखीत शुभवर्तमानात आपण ऐकतो की, परमेश्वर हा मृतांचा देव नसून जीवीतांचा देव आहे.  नव्या करारात आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येते की, ख्रिस्ताला पकडण्यासाठी शास्री, परुशी व सदुकी योग्य वेळेची वाट पाहून त्यास संभ्रमात टाकण्यासाठी वेग-वेगळे प्रश्न विचारत असत आणि अशातलाच एक प्रश्न आजच्या शुभवर्तमान आपल्याला ऐकावयास मिळतो. येशू ख्रिस्त त्याला विचारलेल्या पुनरुत्थानाच्या प्रश्नाला परलोकविद्येने अचूक उत्तर देतो.

बोध कथा:

          दोन वर्षा अगोदर मुबई येथे एका पंचवीस वर्षाच्या मुलीला कॅन्सरच्या आजाराने ग्रासले होते व ती तिच्या जीवनातील शेवटची घटका मोजत होती. अशा वेळेस तिचे नाते वाईक व सर्व मित्र मंडळी तिला भेटावयास येत असत व तिच्या तब्बेती विषयी विचारत असत अशा तिच्या ह्या दैनंदिन भेटी-गाठीत एकदा त्यांचा  धर्मगुरू तिला भेट देण्यास आले असताना;  तिच्याशी बोलत असता व तब्बेती विषयी विचारत असता, तिच्या स्मित हास्याचे कौतुक करत, धर्मगुरूने म्हटले कि तुझ्या ह्या दुख दायक प्रवासात सुद्धा तुझ्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहून मनाला आनंद होतो, फादरांच्या त्या म्हणण्याला प्रतिसाद म्हणून ती म्हणाली “फादर लहान असताना आमचे धर्मशिक्षणाचे क्लास घेण्यासाठी एक ब्रदर यायचे  ते नेहमी एकाच गोष्टीवर भर दयायचे ते म्हणायचे कि, आपले शरीर मरण पावले तरी आपला आत्मा हा ख्रिस्ता समवेत एक होत असतो व आपण सार्वकालीन जीवन जगत असतो” त्या सार्वकालीन जीवानाचीच मी तयारी करीत आहे, सार्वकालीन जीवनाच्या आनंदामध्ये मी माझे हे क्षणिक दु:ख विसरून गेली आहे.    

मनन चिंतन:

          आजच्या शुभवर्तमानात आपण एकले आहे की, सादुकी हे अतिशय हुशार व शिकलेले होते. त्यांस संपूर्ण नियम शास्र अवगत होते. ह्यास्तव सर्वदा ते येशूची परीक्षा पाहण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवगेळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असत. जेव्हा प्रभू येशू पुनरुत्स्थाना बद्दल बोलत होता तेव्हा सादुकिनी ख्रिस्तास पुनरुत्थाना  बद्दल एका उदाहरणा द्वारे  प्रश्न विचारला की, ‘एका घरात सात भावांनी एका पाठोपाठ एका स्त्रीशि लग्न केले. आता जेव्हा ते मरण पावले तेव्हा पुनरुत्थाना वेळी ती स्त्री कोणाची बायको असणार? असा हा फसवा प्रश्न विचारला.    
          जुन्या  करारातील नियमशास्त्रात सामाजिक परिस्तिथीनुसार व समाजकल्याणासाठी काही नियम बनवले होते त्याच्यातील एक नियम म्हणजे, मुल बाळ नसलेला मोठा भाऊ जर का मरण पावला तर त्याच्या पत्नीशी छोट्या भावाने लग्न करावे व आपला वंश वाढवावा. ह्या संबंधात सादुकिनी येशू ख्रिस्ताला हा प्रश्न विचारला होता. सादुकी येशूच्या उत्तराची अपेक्षा करत असता ख्रिस्ताने अतिशय हुशारीने  त्यांस उत्तर दिले. ख्रिस्त म्हणाला की, ह्या युगात अशी नाती आहेत परंतु मरणानंतर ही सर्व नाती संपृष्टात येतात, कारण येणाऱ्या सार्वकालीन युगात ह्या सर्व नात्यांना स्थान नसते. लग्न करणे व लग्न करून घेणे हे फक्त पृथ्वीवरच आहे. नाती-गोती हि फक्त ह्या जागाची आहेत. आई-वडील, भाऊ-बहिण, मामा-मामी इत्यादी सर्व ह्या युगाचे आहे.
          पुन्हा येशू ख्रिस्त  पुनरुत्थाना विषयी बोलत असताना उदगारतो की, येणारे युग जिथे मी आणि माझा स्वर्गीय पिता आहे. ते युग सार्वकालीन आहे तिथे सर्वजण हे देवदूताप्रमाणे असतात, तेथे नाती-गोती चालत नाही. आपण सर्व सार्वकालीन जीवनात ख्रिस्तासमवेत एक होत असतो. देव मेलेल्यांना सुद्धा मरणांतून जिवंत करतो व त्याच्या समवेत एक करून सार्वकालीन जीवन देतो. कारण देव मेलेल्यांचाच नव्हे तर जिवंताचा देव आहे. आणि सर्वलोक जे त्यांचे आहेत ते जिवंत आहेत. ख्रिस्त म्हणतो; पुनरुत्स्थान व जीवन मीच आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल. ह्यास्तव आपल्या ख्रिस्तावरील विश्वासाने आपणास सार्वकालीन आनंद मिळत असतो .आपला पुनरुस्थित येशूवर कितपत विश्वास आहे? आपण जीवतांचा देव ह्याच्यावर विश्वास ठेवतो का?  कि की, सादुकी प्रमाणे ह्या क्षणिक युगातील नाती-गोती करण्यामध्ये गुंतलेलो आहोत? ह्या प्रश्नांवर मनन चिंतन करूया, व सार्वकालीन जीवना साठी लागणारी  कृपादाने व आशिर्वाद मागुया.   

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आम्हांला तुझ्या पुनरुत्थानात सहभागी कर.”          

१. आपले पोप महाशय, सर्व कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू-भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात अहोरात्र कार्य करतात त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी आपल्या कार्याद्वारे बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण आज अंधारलेल्या जगात राहत आहोत, निराशेने बरेच लोक वैफल्यग्रस्त झाले आहेत. अशांना ख्रिस्ताच्या आशेचा शुभसंदेश प्राप्त व्हावा व त्यांना नवचैतन्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. काही लोक हे पुनरुत्थित येशूवर विश्वास ठेवत नाहीत व दुसऱ्यांना विश्वासू लोकांचा विश्वास उध्वस्त करून त्यांस येशुपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांना प्रभूचा स्पर्श होऊन त्यांची श्रद्धा वाढीस लागावी व त्यांनी येशूजवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. परमेश्वराने आपल्याला दिलेल्या सर्व देणग्यांचा आपण योग्य प्रकारे वापर करावा व इतरांची सेवा करून नवजीवनाचा आनंद घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक  कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.