Thursday, 12 December 2019

Reflection for the Homily of Third Sunday of Advent (15-12-2019) By Br. Julius Rodrigues


आगमन काळातील तिसरा रविवार




दिनांक: १५/१२/२०१९
पहिले वाचन: यशया ३५: १-६,१०
दुसरे वाचन: याकोब ५: ७-१० 
शुभवर्तमान: मत्तय ११: २-११






प्रस्तावना:
          आनंद करा, हर्ष करा, प्रभूच्या येण्याची तयारी करा. तो येणार आणि आपणास शांती, सुख, प्रदान करणार आहे. परमेश्वराच्या येण्याची वाट पहा, त्याच्या विजयी करुणेचा ध्यास धरा, पण उतावीळ होऊ नका. तो येऊन आम्हा सर्वांस धीर देणार आहे आणि आमच्या जीवनाचा कायापालट करणार आहे. तारणारा येणार आहे आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणणार आहे. हेच आपल्याला आजच्या उपासनेद्वारे सांगण्यात येत आहे. जो आनंद खरा आहे तो ख्रिस्ताचा आहे, म्हणून आपल्याला त्या ख्रिस्ताचा ध्यास धरावयास बोलावीत आहे. अनेक अशा वेळेस आपण इतर गोष्टींचा ध्यास धरला असेल, तर त्या परमेश्वराकडून क्षमा मागूया आणि ह्या मिस्साबलीदानात भाग घेऊया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ३५: १-६,१०
          आजच्या पहिल्या वाचनात अनेक अशा गोष्टी आपणास पहावयास मिळणार आहेत. यशया संदेष्टा अगदी वैभवशाली, अलंकारीक, स्फूर्तिदायक भाषा ह्या ठिकाणी वापरत आहे. सगळीकडे, सर्वत्र आनंद, जल्लोष, उत्साह साजरा केला जाणार आहे. यशया संदेष्टा म्हणतोय की, "अरण्य व रुक्ष भूमी ही आनंदित होणार, वाळवंट उल्लासेल, पण हे कसे शक्य आहे? कारण संदेष्टा आपणास सुचवत आहे की, या वाटेने देव येणार आहे." पुढे ओवि '' मध्ये आपणास सांगतोय की, घाबरणाऱ्यांस  म्हणा, धीर धरा, भिऊ नका, पहा तुमचा देव सुड घ्यावयास, अनुरूप असे प्रतिफळ द्यावयास येईल. तो (येशू) येईल व तुमचा उद्धार करेल. त्याच्या आगमनाचे कारण ह्या मधून उघड होते. आपल्या लोकांना स्वतःकडे, घरी नेण्यासाठी तो येणार आहे. तर ओवी (५-६) ह्या मधुन नवयुगाची पहाट झाल्याचे जाहीर होते. परमेश्वराचे आगमन अप्रत्यक्षपणे ह्या ओवीमध्ये दाखविले आहे. नव्या निर्गमाचे भावपूर्ण चित्रण, स्वतः देवाचे आगमन, सियोनेत पुन्हा लोकवस्ती आणि उद्धार पावलेल्या लोकांचा अखंड आनंद, यातून भावी सुस्थितीचे पूर्वसंकेत आपणास दिले आहेत.
दुसरे वाचन: याकोब ५: ७-१० 
          ख्रिस्ती लोकांनी धीर धरावा , ख्रिस्त पुन्हा येईपर्यंत त्याच्या येण्याची प्रतीक्षा करावी. ह्या ठिकाणी आपणास सांगण्यात येत आहे की, धीर हा सदगुण आहे. आपल्यामध्ये या गुणांची जोपासना करा. तो परिपक्व होऊ द्या, उतावीळ होऊ नका, हेच याकोबाचे आपणास सांगणे आहे. ख्रिस्ती प्रतीक्षा कशासाठी तरी नसून ती एका व्यक्तीची प्रतीक्षा आहे ती म्हणजे ख्रिस्ताची. याकोबाने प्रभूच्या आगमनाचा उल्लेख दोन वेळा केला आहे. न्यायाधीश दाराजवळ उभा आहे, असे त्याने एकदा म्हटले आहे. ह्याद्वारे आपणास दर्शविण्यात आले आहे की, त्याचा येण्याचा काळ जवळ आला आहे.
शुभवर्तमान: मत्तय ११: २-११
          बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला अटक व तुरुंगवास या विषयीचा अखेरचा उल्लेख ह्या ठिकाणी मत्तय करत आहे. आपण ज्याच्यासाठी मार्ग तयार केला, त्याच्या कार्याच्या प्रगतीवर, तो तुरुंगातुन लक्ष ठेवून होता, असे आपणास ह्या वाचनाद्वारे आढळते. ह्या भागामध्ये येशूच्या सेवाकार्याचे योहानाचे केलेले मूल्यमापन (२-६) आणि येशूने केलेले योहानाचे मूल्यमापन (७-१२) आणि त्या दोघांचे स्वागत जन सामान्यांनी केले, त्याविषयीचे येशूचे विचार ह्या ठिकाणी दिले आहेत. ह्या उताऱ्याद्वारे आपणास समजून येते की, येशूच्या सेवाकार्याची एकंदर रीत पाहून योहानला खूप आश्चर्य वाटले, असे त्याच्या प्रश्नाद्वारे आपणास समजते. त्याचप्रमाणे येशू खरा संदेष्टा म्हणून योहानची तोंड भरून प्रशंसा करत आहे.
मनन चिंतन:
          ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आज देऊळमाता आगमन काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. आजचा हा रविवार आपण (Gaudete) गावदेते रविवार म्हणून साजरा केला जातो. (Gaudete) गावदेते म्हणजे लॅटीन भाषेत ‘आनंद’, म्हणजेच आनंदाचा रविवार. आज जर आपण समाजात पाहिले तर, आपल्याला आढळून येईल की, प्रत्येकजण आनंदाच्या शोधात आहे. प्रत्येकजण पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत करतो, अनेकजण अशाप्रकारे जो तो आपल्या जीवनात आनंद अनुभवायला अतोनात प्रयत्न करीत आहे. त्यासाठी तो झपाटलेला आहे. आज आनंद हा अगदी बाजार वस्तू प्रमाणे झालेला आहे. आपल्या प्रत्येकाला वाटते की; आपण मध्यमान केले की ते आपल्याला आनंदी बनवेल, किंवा ते आपणाला आनंद देईल. आपल्याला एखाद्या बाईची सोबत करावयाची आहे अश्या हेतूने की ती आपल्याला आनंदी बनवेल. आणि इतर अनेक अश्या गोष्टी आहेत की; त्या करण्याने आपण आनंदी होऊ. पण ते असे काय आहे ते आपल्याला आनंदी ठेवेल? सुखी-समाधानी बनवेल? आजपण गोंधळून गेलो आहोत. आपल्याला हेच माहित नाही आहे की, आपल्याला आनंद मिळणार तरी कुठे? आनंद म्हणजे काय? एक आनंदी मन दिसायला कश्या आहे? एक आनंदी मन म्हणजे काय? असे अनेक प्रश्न आपल्या मनात घुटमळत घालून आहेत. असं म्हणतात की, आनंदाचा शोध आत घ्या, आणि तो आपण कसा घेणार तर ख्रिस्ताला स्विकारून, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून, आणि त्याच्या हातात आपली जीवन सोपवून.
          आज असे सिद्ध झाले आहे की; वैद्यकीय रित्या ही आपल्याला कळतं की वेदना एक प्रकारची केमिस्ट्री किंवा रासायनिक अनुभव आहे. त्याच प्रमाणे परमानंद हा वेगळ्या प्रकारचा रासायनिक अनुभव आहे. आज प्रत्येक माणसाला त्यांच्या अनुभवाला एक रासायनिक अनुभव असतो, परंतु तो रासायनिक अनुभव घेण्यासाठी आपल्याला त्या ख्रिस्ताजवळ व त्याच्या प्रेमात पडावे लागणार आहे. मग आपणास त्या परमानंदाचा अनुभव घ्यावयास मिळणार आ.हे
          तीच वाण’ ह्या मराठी चित्रपटातील हे सुंदर गीत मला ह्या ठिकाणी आठवत आहे. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंद, आनंद झाला, आज आनंद, आनंद झाला.’ होय आजची तिन्ही वाचणे आपणाला आनंदाविषयी माहिती करून देत आहे.
          पहिल्या वाचनात यशया संदेष्टा अगदी वैभवशाली भाषेचा वापर करत हे. सर्वत्र आनंद, जल्लोष आणि जयजयकार केले जाणार आहे. सर्व भूमी वाळवंट हे आनंदाने भरुन जाणार आहेत, अरण्य व रुक्ष भूमी ही देखील आनंदित होणार आहेत. अशाप्रकारे अगदी अतिशयोक्तीची भाषा या ठिकाणी वापरण्यात आली आहे. जेव्हा परमेश्वर येणार त्यावेळेस तुमचे तारण होणार आहे; तुमचा उद्धार होणार आहे. म्हणून त्या घटनेची वाट पहा, धीर धरा, खचून जाऊ नका. कारण तो आपल्याला स्वर्गीय नंदनवनात नेणार आहे, आणि खरा आनंद काय आहे तो आपणास अनुभवायला मिळणार आहे. परमेश्वराच्या येण्याने सर्व काही बदलून जाणार आहे.
          आजच्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकणार आहोत की, परमेश्वराच्या येण्याची वाट पहा, धीर रा. अनेकदा अशावेळेस आपण आपल्या जीवनात उतावळेपणा, घाई-घाई करत असतो. मग याचा वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावा लागतो. म्हणूनच म्हणतात की, वेळ आली की सगळे काही ठीक होईल आणि हे अगदी खरोखर आहे. त्या घटनेची वाट, वेळेचा धीर, आपण धरला पाहिजे आणि हाच संदेश आपणास देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, परमेश्वर हा त्याच्या वेळेनुसार येणार आहे; आणि म्हणून आपण हतबल होऊ नये, निराश होऊ नये, घाबरून जाऊ नये. तर त्याच्या येण्याची वाट पहावी अगदी डोळ्यात तेल टाकून.
          आजच्या शुभवर्तमानात देखील आपल्याला सांगण्यात ये आहे की, परमेश्वर हा खरा मसीहा आहे. त्याचे आगमन होणार आहे. तो सर्व काही बदलून टाकणार आहे. यहुदी लोकांची अशी अपेक्षा होती की, मसीहा म्हणजे ख्रिस्त; शत्रू पासून मुक्त करणारा असेल. तसेच दुपाई नष्ट करून पापाबद्दल न्याय करील व आपले राज्य प्रस्थापित करील. आपणसुद्धा अगदी त्याच विचारात गुरफटलेले आहो. आज आपण देखील त्याच यहुदी लोकांप्रमाणे आपली वाटचाल करीत आहोत. ख्रिस्त आपल्या हृदयात हजर आहे. त्याला आपण ओळखू शकत नाही. कारण त्याचा आपल्याला विसर पडला आहे. ख्रिस्त जो मसीहा; खरा आनंद आहे, त्याची आपल्याला जाणीव होत नाही.
          आज आपण अनेक इतर अशा गोष्टीच्या मागे जाऊन आनंदित होण्याचा प्रयत्न करत आहोत. सांगितल्याप्रमाणे ज्यांनी-ज्यांनी ख्रिस्ताला आपल्या जीवनात अनुभवले, अनुसरले त्यांना-त्यांना त्यांच्या हृदयात आनंदाच्या लहरी कोसळताना अनुभवल्या आहेत. म्हणून आजच्या उपासनेद्वारे आपणास एकच सांगण्यात येत आहे की, खर्‍या आनंदाची गुरुकिल्ली फक्त आणि फक्त ख्रिस्तामध्ये आहे. दुसरे सर्व काही क्षणिक, क्षणभंगुर आहे. म्हणून ख्रिस्ताच्या वाचनावर आपले जीवन, आपले घर उभारूया आणि त्याच्या प्रेमात आपण पडू या. तो येईल तेव्हा आपणास आनंदित करील यावर आपला विश्वास ठेवू या.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: ‘हे प्रभू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.’
१.आपले पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू व सर्व व्रत्स्त ह्यांना परमेश्वराने चांगले आरोग्य द्यावे व त्यांनी परमेश्वराच्या राज्याचा अनुभव लोकांना द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.आपल्या पॅरिश मधील जे लोक परमेश्वराच्या वचनावर, त्याने केलेल्या महान कृत्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि अन्य देवावर विश्वास ठेवतात व आनंद मानतात अश्या सर्वांना परमेश्वराने आपला गुणकारी स्पर्श करावा व ते पुन्हा एकदा देवा जवळ वळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.परमेश्वराच्या येण्याची तयारी आपण सर्वांनी आनंदाने करावी व त्याच्या दर्शनासाठी सज्ज व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.पॅरिशमधील जे लोक आजारी आहेत, दुःखात,संकटात, त्रासात आहेत. अशा सर्वांना परमेश्वराने धीर द्यावा आणि त्यांच्या गरजा पुरवाव्यात. म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.एक आनंदी, समाधानी, जीवन जगण्यासाठी आज आपणा सर्वांना ख्रिस्त सभा आमंत्रण देत आहे. आपल्या मधील नैराश्य दूर करून, ख्रिस्तात आपले जीवन आनंदमय करण्यास विशेष प्रार्थना करूया.

Thursday, 5 December 2019


Reflection for the Homily of Second Sunday of Advent (8-12-2019) By Br. Robby Fernandes





आगमन काळातील दुसरा रविवार



दिनांक : ८/१२/२०१९
पहिले वाचन : यशया ११:१-१०
दुसरे वाचन : रोमकरांस पत्र: १५:४-९
शुभवर्तमान : मत्तय: ३:१-१२



विषय: "पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे."

प्रस्तावना:

          आज देऊळमाता आगमन काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणास पश्चाताप करण्यास आवाहन देत आहे. या पश्चातापाद्वारे आपण स्वतःचे अंत:करण शुद्ध व निर्मळ करतो. अशाप्रकारे आपण प्रभूच्या येण्याची व त्याला स्वीकारण्यासाठी या आगमन काळामध्ये स्वतःची पश्चातापाद्वारे तयारी करतो.
          आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा सांगत आहे की परमेश्वर स्वतः दीन व दुबळ्यांचा न्याय करील, व दुर्जनांचा संहार करील. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगत आहे की, जसा देवाच्या गौरवा करिता ख्रिस्ताने तुमचा-आमचा स्विकार केला, त्याप्रमाणे आपण सुद्धा एकमेकांचा स्वीकार करावा.  शुभवर्तमानात बाप्तिस्मा करणारा योहान सांगत आहे की, "पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. प्रभूच्या आगमनासाठी वाट तयार करा."  या आगमन काळामध्ये आपण सुद्धा आपल्या मनाची व अंत:करणाची पश्चातापाद्वारे तयारी करूया, व ह्या मिसाबलिदानामध्ये आपल्याला लागणारी कृपा व शक्ती मागूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन : यशया ११:१-१०

          पहिले वाचन हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले आहे. आजच्या वाचनामध्ये यशया संदेष्टा परमेश्वराचे गुणगान गातो  तो म्हणतो: परमेश्वर स्वतः दुर्बळांचा न्याय करील; दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील. तसेच दुर्जनांचा संहार करील. लांडगा कोकराजवळ राहील. वासरू व तरुण सिंह एकत्र राहतील. तान्हेबाळ नागाच्या बिळा जवळ खेळेल. कारण सागर जसा जल पूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. यामुळे सर्व राष्ट्रीय परमेश्वराच्या जवळ शरणास येतील.

दुसरे वाचन : रोमकरांस पत्र: १५:४-९

          दुसरे वाचन हे संत पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले आहे. संत पौल सांगतो; "आपण एक मताने व एक मुखाने आपल्या परमेश्वराचे गुणगान व गौरव करावे." जसा देवाच्या गौरवा करिता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्विकार केला, त्याचप्रमाणे आपण सुद्धा एकमेकांचा स्वीकार करावा. कारण ख्रिस्त आपल्या सर्वांसाठी सेवक बनला जेणेकरून त्याचे परराष्ट्रीयांमध्ये स्तवन  गाईले जाईल.

शुभवर्तमान : मत्तय: ३:१-१२

        आजच्या शुभवर्तमानामध्ये मत्तय आपल्याला एक ताकीद देत आहे की, "पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे." तसेच अरण्यामध्ये अशी वाणी झाली की, "परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा व त्याच्या वाटा नीट करा."
         मत्तयलिखित शुभवर्तमानामध्ये मत्तय आपल्याला बाप्तिस्मा करणारा योहान याचा दाखला देत आहे. बाप्तिस्मा करणारा योहान ह्याला परमेश्वराने त्याचा मार्ग नीट करण्यास व त्याचा संदेश संपूर्ण जगाला देण्यास पाठविले होते. जेणेकरून लोक पापवृत्ती सोडून परमेश्वराच्या स्वागतासाठी तयार राहतील. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो; "मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा; परंतु माझ्या मागुन जो येत आहे, तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. त्यामुळे पश्चाताप करा व पाप वृत्तीपासून दूर रहा.

मनन चिंतन :

          माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, आज देऊळ माता आगमन काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहे. ह्या आगमन काळामध्ये देऊळ माता आपणासमोर अनेक प्रकारची व्यक्तिमत्त्व मांडत आहे. जेणेकरून आपण त्यांच्या जीवनाद्वारे, उदाहरणाद्वारे प्रेरित होऊ. ती व्यक्तिमत्वे म्हणजे; पवित्र मरिया, योसेफ, आणि बाप्तिस्मा करणारा योहान. येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या तयारी करीता, बाप्तिस्मा करणारा योहान हा आपल्यासमोर एक आदर्श असे व्यक्तिमत्त्व परमेश्वर आहे; किंबहुना आपण तारणाऱ्याचा  मार्ग तयार करण्यासाठी योहाना कडून प्रेरणा व उत्तेजन मिळवू शकतो. येशू ख्रिस्ताच्या अगोदर बाप्तिस्मा करणारा योहान पश्चातापा विषयी सर्व प्रथम बोलला. असे असूनही योहानाने स्वतःचा  दर्जा कधीच उंचाविला नाही  उलट त्याने म्हटले, "मी पाण्यानें तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा; परंतु माझ्या मागून  जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहणा उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे." (मत्तय ३:११) अशा प्रकारे योहानाने स्वतःला दुय्यम स्थान देऊन, परमेश्वराच्या पुत्राला प्रथम स्थान दिले. दोघानाही पश्चातापा विषयी लोकांना प्रबोधन केले. दोघे परमेश्वराच्या योजने प्रमाणे चालले, आणि परमेश्वराचा एक हेतू व उद्देश म्हणजे "तारणाचा" उद्देश त्यांनी  पूर्ण केला. 
          पश्चाताप म्हणजे  मेटानोईआ (Metanoia) म्हणजेच जीवनाचे कायापालट करून नव्या दिशेने जाणे. म्हणूनच  आज देऊळ माता आपल्याला पश्चातापाचा धडा गिरवण्याचे आमंत्रण देत आहे. जीवनाचा अर्थ पश्चातापाद्वारे समजविण्याचा प्रयत्न करीत आहे. आजची तिन्ही वाचने आपल्याला परमेश्वराजवळ येण्याचे आवहान करत आहे. यशया संदेष्टा आपल्याला एक नव्या प्रकारच्या जीवनाचा उलघडा करून देत आहे. जेथे लांडगा कोकराजवळ राहील, वासरू व सिंह एकत्र राहतील, तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल, अशा प्रकारचे दृश्य परमेश्वर आपल्याला दाखवत आहे. नव्या जगाची ओळख करून देत आहे. तसेच संत पौल म्हणतो की, “आपण एक मुखाने व मनाने परमेश्वराचे गुणगान करावे; कारण परमेश्वराचा पुत्र आपणा सर्वांसाठी सेवक बनला.” आजचे शुभवर्तमान स्वतःच्या हृदयाची, मनाची तयारी करण्यास योहानाच्या संदेशाद्वारे आपणाला सांगत आहे की, ‘पश्चाताप करा कारण देवाचे राज्य जवळ आले आहे.’ योहानाने फक्त उपदेश दिला नाही तर स्वतःचे उदाहरण आपणासमोर मांडले आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने पहिली स्वतःची तयारी केली व नंतर लोकांना पश्चातापाचा अनुभव घेण्यास आमंत्रण केले.
       योहानाने परमेश्वराच्या संदेशाची सुरुवात अरंण्यामधून केली. अरंण्य हे सुद्धा इस्रायली लोकांचे जन्मस्थान आहे. म्हणून होशेय संदेष्ट्याद्वारे परमेश्वर म्हणतो की, “मी परमेश्वर तिला शिकवीन, मी तिला वाळवंटात नेईन, व मी तिच्याशी प्रेमाने बोलेन.” (होशेय २:१४-१५) परमेश्वराने इस्रायली प्रजेला चाळीस वर्ष वाळवंटातून प्रवास करायला लावला, जेणेकरून सर्व इस्रायली प्रजा पश्चाताप करेल, व परमेश्वराच्या वचन बद्ध वतनामध्ये प्रवेश करेल. त्याच प्रमाणे परमेश्वर पश्चातापाद्वारे आपल्या सर्वांची शुद्धता करण्यासाठी व परमेश्वराच्या राज्यांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी, इस्रायल प्रजेप्रमाणे आपल्या अंत:करणाचे, मनाचे, तनाचे शुद्धीकरण करण्यासाठी बोलावीत आहे. जॉन होवर योडर म्हणतात, “पश्चाताप करणे म्हणजे फक्त वाईट वाटने नव्हे, तर वेगळ्याप्रकारे विचार करणे होय.”
          वसंत ऋतु मध्ये झाडांमध्ये खूप बदल घडून येतो. ज्याप्रमाणे झाडे स्वतःची पाने गाळतात व नव्या पालवीसाठी तयारी करतात; त्याचप्रमाणे आज परमेश्वर आपणा सर्वांची तयारी करण्यास सांगत आहे. ज्याप्रमाणे झाडांची पाने गळून पडतात त्याचप्रमाणे आपल्या वाईट वृत्ती-प्रवृत्ती आपण काढून टाकल्या पाहिजेत. नव्या पालवी प्रमाणे आपण नव्या संबंधांना, जीवनाला, नात्यांना अनुमती द्यायला पाहिजे. पश्चातापाच्या डोळ्यांनी आपण पाहायला शिकले पाहिजे, जेणेकरून आपण परमेश्वराच्या येण्याला हर्षाने आपल्या हृदयामध्ये जागा करू. म्हणूनच परमेश्वराने बाप्तिस्मा योहानाला परमेश्वराचा मार्ग तयार करण्यासाठी पुढे पाठविले. पण त्यांने स्वतःच्या जीवनाद्वारे लोकांच्या हृदयात व मनात बदल घडवून आणला. बाप्तिस्माद्वारे पापांचा पश्चाताप करण्यास त्याने लोकांना आवाहन केले. या आगमन काळामध्ये परमेश्वराच्या पुत्राचा स्विकार करण्यासाठी स्वतःच्या जीवनाची, घरांची, व हृदयाची तयारी करण्यासाठी देऊळ माता आपणा सर्वांना बोलावत आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना :

प्रतिसाद : ‘हे प्रभू आमची प्रार्थना स्विकार’

१. आपले परमगुरु फ्रान्सिस,  धर्मगुरू आणि सर्व व्रतस्थ बंधू-भगिनी ह्यांच्याद्वारे प्रभूची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरावी म्हणून प्रभु कडे प्रार्थना करूया.
२. आपल्या जीवनातील स्वार्थीपणा, गर्व अहंकार या सैतानी वृत्तींमुळे आपण परमेश्वरापासून दुरावलो जातो . ख्रिस्ताच्या दयेची, प्रेमाची जाणीव सर्वाना व्हावी व ख्रिस्ता जवळ सर्वांनी वळावे म्हणून प्रभुचरणी प्रार्थना करूया.
३. या आगमन काळात आपण प्रभूच्या स्वागतासाठी स्वतःच्या हृदयाची व मनाची तयारी करावी व स्वतःच्या जीवनात योग्य अशी जागा तयार करावी म्हणून प्रभु चरणी प्रार्थना करूया.
४. जे कोणी आजारी व हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना परमेश्वराचा गुणकारी स्पर्श व्हावा व त्यांच्या जीवनामध्ये प्रभूचा अनुभव यावा म्हणून प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक. सामाजिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रभु कडे प्रार्थना करूया.