Friday, 16 October 2020


 Reflections for the 29th Sunday in Ordinary Time & Mission Sunday (18/10/2020) by Fr. Isaac D’souza

 



सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार व मिशन रविवार

 

दिनांक: १८/१०/२०२०

पहिले वाचन: यशया ४५:१, ४-६

दुसरे वाचन: १ थेसलोनिकाकरांस १:१-५ब

शुभवर्तमान: मत्तय २२: १५-२१

 






“मग कैसराचे ते कैसराला आणि देवाची ते देवाला द्या.” (मत्तय २२:२)

 प्रस्तावना:

     आज आपण सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार व त्याचबरोबर मिशन रविवार साजरा करीत आहोत.

परमेश्वराच्या दहा आज्ञा पैकी पहिली आज्ञा, “मी परमेश्वर तुमचा देव आहे. माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत” (निर्गम २०:२-३). जुन्या करारामध्ये परमेश्वर आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या दैवी महत्त्वाची जाणीव पदोपदी करीत असतो. नवीन करारामध्ये प्रभू येशू परमेश्वराच्या राज्याची घोषणा करीत असतान, नेहमी परमेश्वराच्या महानतेची ओळख पटवून देत आहे.

आजचे पहिले वाचन परमेश्वरावर श्रद्धा ठेवण्यासाठी आणि देवाला प्राधान्य देण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करीत आहे. आजचे दुसरे वाचन आपल्याला परमेश्वराची स्तुती आराधना करण्यास सांगत आहे. देवाची आराधना नियमितपणे आणि दृढ श्रद्धेने करणे गरजेचे आहे. आजच्या शुभवर्तमानात प्रभु येशुआपणांस पटवून देत आहे की, जे देवाचे ते देवाला द्या आणि जे कैसराचे ते कैसराला. पैसे कैसराचे म्हणून जे काही त्याचे आहे ते कैसरला दिले पाहिजे. तसेच हे सर्व विश्व, निसर्ग, डोंगर, नदी, झाडे, वेली हे सर्व देवाचे आहे, आपण देखील देवाचेच आहोत. ह्या मिस्सा बलीदानात भाग घेत असताना आनंदाने स्तुती व आराधना करीत परमेश्वराला आपल्या जीवनात प्रथम स्थान देऊया.

‘मिशन’ हा ख्रिस्ती श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. ख्रिस्त हा प्रथम आणि सर्वश्रेष्ठ मिशनरी असून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देऊळमाता आपल्याला शुभवर्तमान जगभर पसरविण्यासाठी पाठवीत आहे. आज आपण मिशन रविवार साजरा करीत असताना जे मिशनकार्य करत आहेत त्यांना त्यांच्या नि:स्वार्थी सेवेत परमेश्वराची साथ मिळावी व सर्व संकटापासून त्यांचे संरक्षण व्हावे व आपणसुद्धा मिशनकार्यात सहभाग घ्यावा म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करू या.

 सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ४५:१, ४-६

यशया संदेष्टा सांगतो की परमेश्वराने कोरेश (सायरस) ह्याला अभिषिक्त केले आहे. देवाच्या सामर्थ्याने राजा कोरेशने सर्व राजांना नमविले. त्याने बंदिवासात असलेल्या सर्व यहुदियांना मुक्त करून त्यांना त्यांच्या घरी पाठविले. देव हा सर्वसामर्थ्य आहे. तो आपला एकच परमेश्वर देव आहे जो आपल्याला नावाने हाक मारून आम्हांला कामगिरी सोपवीत असतो असे यशया संदेष्टा आपल्याला सांगत आहे.

 दुसरे वाचन: १ थेस्सलोनीकाकरांस १:१-५ब

ह्या पत्रात संत पौल सुरवातीला थेस्सलोनीकाकरांची स्तुती करत आहे असे आपल्याला दिसून येते. पौल त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे ह्यावरून त्याची प्रीती व आस्था स्पष्टपणे दिसून येते. ह्याद्वारे तो त्यांना त्यांचे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी धीर व उत्तेजन देत आहे. संत पौल थेसलोनिकाकरांस सांगतो की आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हांला कळविण्यात आली आहे.

 शुभवर्तमान: मत्तय २२: १५-२१

येशू व परुशी ह्यांच्यात वादविवाद होत असे. परुशी येशूच्या विरोधात बोलत होते कारण येशूची शिकवण त्यांना पटत नव्हती. येशूला बोलताना पकडावे, त्याच्या तोंडाची उलट-सुलट विधाने त्याच्यावरच उलटवावी हा त्यांचा उद्देश होता. परुश्यांनी आपल्या शिष्यांना येशूकडे पाठवून त्याला प्रश्न केला.

 मनन चिंतन:

स्टीव हा आफ्रिका खंडातील तिसरा व्यक्ती आहे. त्याचे जीवन हे खूप यशस्वी झाले आहे. पैसा, धन, दौलत बिजनेस हे सर्व काही त्याच्या जीवनातील यशस्वी व्हायचे कारण नाही. त्याने दिलेल्या एका मुलाखतीत असे म्हटले आहे की, “आज जर माझे जीवन यशस्वी आणि समृद्धीची झाले असेल, तर ते फक्त देवाच्या कृपेमुळेच.” तो म्हणतो की मी देवाला माझ्या जीवनामध्ये प्रथम स्थान दिले आहे आणि त्याची ओळख मला चांगल्या प्रकारे लाभावी म्हणून दररोज दोन तास मी बायबल वाचन करतो. आज जे काही माझ्याजवळ आहे, ते सर्व देवाच्या कृपा सामर्थ्याने मला लाभलेले आहे आणि जे काही मला मिळालेले नाही ते माझ्या भल्यासाठी आणि चांगुलपणासाठीच आहे. स्टीव सारखी अशी अनेक उदाहरणे आज आपल्या समोर आहेत. ज्यांनी देवाला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवलेला आहे आणि देवाने त्यांच्या जीवनाचा कायापालट करून उद्धार केला आहे. असीसीकर संत फ्रांसिस ह्यांनी अशे म्हटले आहे, “माझ्या देवा, माझ्या सर्वा!” ह्या फ्रान्सिसला देवाने उंचाविले आहे. संत मदर तेरेसा हिने परमेश्वराला आपलं सर्वस्व बहाल केलं कारण परमेश्वर तिच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता आणि परमेश्वराने तिला देखील उंचाविले आहे.

आजच्या शुभवर्तमान द्वारे आपल्याला तीन मुख्य बोध मिळत आहेत:

१)    येशूची परीक्षा किंवा येशूच्या ज्ञानाचे प्रकटीकरण

येशूला वादविवादात सापडून त्याला दोषी ठरवण्याचा षड्यंत्रामध्ये शास्त्री आणि परुशी येशूला प्रश्न विचारतात, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही? (मत्तयं २२:१७) परुशी येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात. परंतु येशू त्यांची मने ओळखतो त्यांचा दृष्ट विचार ओळखतो. आणि येशूचे उत्तर त्याच्या ज्ञानाचे आणि हुशारीचा एक नमुना आहे. “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला द्या.”

माझ्या कपटी व्यवहारामुळे मी देखील येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु येशू माझे आंत: आणि बाह्य मन जाणून आहे. माझ्या खोल अंतर मनातील प्रत्येक विचार तो जाणून आहे आणि माझी प्रत्येक बाह्य कृती तो पडताळतो.  त्यामुळे आपण जसे आहोत तसेच किंवा त्याच प्रमाणे वागणे किंवा नम्रपणे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जगणे हे आपल्या हिताचे ठरेल.

२)    देवाला प्रथम स्थान देणे

परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात त्याच्या विषयीची ओढ निर्माण केली आहे. देवाला जाणून घेण्यासाठी त्याचा शोध घ्यावा अशी ओढ मानवात सर्वत्र दिसून येते. संत अगस्तीन म्हणतात की, “तू आम्हाला तुझ्यासाठीच निर्माण केले आणि आमची हृदय तुझा शोध घेतल्याविना अस्वस्थच असतील.” परमेश्वराचा शोध घेणे हे मानवाला स्वाभाविकच आहे. संत एडीथ म्हणतात, जेव्हा माणूस सत्याचा शोध घेतो तेव्हा तो कळत न कळत परमेश्वराचा शोध घेत असतो.”

देवाला प्रथम स्थान देणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यातच आपले समाधान आहे. आपल्या यशस्वी जीवनाचा मंत्र आहे. जेव्हा देव आपल्या जीवनामध्ये प्रथम असतो, तेव्हा देवाचा आशीर्वाद, कृपा, वात्सल्य आणि त्याची प्रेरणा आपल्याला कधीच माघारी टाकणार नाही.

३)    देव आपला निर्माण करता आहे

देवाला जाणून घेणे, त्याला आराधन करणे हे आपले कर्तव्य आहे. कॅथोलिक श्रद्धा ग्रंथ क्रमांक १ ते ३ ह्यामध्ये असे सांगितले आहे, ‘परमेश्वराने त्याच्या नि:स्वार्थ व स्वयंस्फूर्त प्रेमाने आपणास आणि सर्वकाही निर्माण केली आहे... आपण परमेश्वराला ओळखावे, त्याच्यावर संपूर्ण हृदयाने प्रेम करावे, त्याच्या इच्छेनुसार सत्कृत्ये करीत राहावे आणि जीवनाच्या शेवटी स्वर्ग मिळावा यासाठी आपले जीवन आहे.

 विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो मिशन कार्य करण्यास आम्हांला सहाय्य कर.

१. आपले पोप, कार्डीनल्स, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्या सर्वांना त्यांच्या मिशन कार्यात प्रभूचा आशीर्वाद लाभावा व सर्व संकट व दु:खापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. जे कोणी जगात शांती, ऐकोपा, प्रेम प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या कार्यात परमेश्वराचे सामर्थ्य व मार्गदर्शन लाभावे व त्यांच्या कार्याद्वारे ह्या जगात शांतीमय वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.

३. आपल्या देशाच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या सर्व राजकीय नेत्यांनी आपल्या डोळ्यासमोर न्याय, प्रेम, बंधुत्व ह्यांना प्राधान्य द्यावे व सर्व मतभेत विसरून ‘सर्व-धर्म समभाव’ ही संकल्पना आत्मसात करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. आपल्या धर्मग्रामातील सर्व आजारी लोकांना विशेष करून जे कोणी कोरोना ह्या रोगाला बळी पडले आहेत अशा  सर्वाना देवाने आरोग्यदायी स्पर्श करावा व त्यांना परत एकदा चांगले आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी माते मरियेच्या मध्यस्थी द्वारे प्रभूचरणी प्रार्थना करुया.

Thursday, 8 October 2020

  


   Reflections for the 28th Sunday in Ordinary Time (11/10/2020) by Fr. Wilson D’Souza





सामान्य काळातील अठ्ठाविसावा रविवार


दिनांक: ११/१०/२०२०

पहिले वाचन: यशया २५:६-१०

दुसरे वाचन: फिलीप्पीकरांस पत्र ४:१२-१४, १९-२०

शुभवर्तमान: मत्तय २२:१-१४


 



प्रस्तावना:

          आज आपण सामान्य काळातील अठ्ठाविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणास दैवी मेजवानीत सहभागी होण्यासाठी तयार करीत आहोत. प्रत्येक दिवशी आपण जेव्हा  मिस्साबलीत सहभागी होतो तेव्हा आपण हे प्रीती भोजन साजरं करतो. मिस्साबली केवळ एक बाह्य देखावा नाही किंवा पूजापाठ नाही किंबहुना तो केवळ अर्पण किंवा विधी नाही, तर संपूर्ण जीवनाचं समर्पण ह्या यज्ञात दडेलेल आहे. जो कोणी ह्या समर्पणाद्वारे आपल्या स्वतःचं समर्पण करील त्या व्यक्तीला अनंत व सार्वकालिन जीवनाचा अनुभव येईल. ह्या विधीत ख्रिस्ताने स्वतःस समर्पित केले. त्याच्या समर्पणात सहभागी होवून दैवी मेजवानीत भाग घेण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आजच्या ह्या मिस्साबलिदानाच्या सुरुवातीला  आपल्या मनाची, अंतःकरणाची तयारी करूया.

 पहिले वाचन: यशया २५:६-१०

          यशया संदेष्टा मिष्टान्नाची मेजवानी आणि उत्तम द्राक्षरसाचं पेय आपणास देण्याची हमी देत आहे. हे एक केवळ आश्वासन नाही, तर जेव्हा दैवी मेजवानीत आपण सहभागी होऊ, तेव्हा ते आश्वासन पूर्ण होईल. दुसरी गोष्ट म्हणजे मृत्यूचा नायनाट केला जाईल व परमेश्वर आपल्या चेहऱ्यावरील अश्रू कायम पुसेल अशी आशा आपणाला बाळगावी लागेल. तो काळ व समय असेल उल्हासाचा, हर्षाचा व आपल्या तारणाचा असं भाकीत संदेष्टा करतो.

 दुसरे वाचन: फिलीप्पीकरांस पत्र ४:१२-१४, १९-२०

संत पौलाचे फिलीप्पीकरांवर अत्यंत प्रेम होते. आपल्या जीवनात येणाऱ्या अनेक अडचणी फिलिप्पीकर आपल्या जीवनाचा भाग मानून त्यात आनंद मानत असत. त्यांना सर्वकाही सहन करण्यासाठी ख्रिस्ताकडून शक्ती मिळत असे. ते सर्व देवाच्या गौरवासाठी वापरत असत. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीत देवावरील भिस्त कमी न होवू देणे हा या वाचनाचा संदेश आहे.

 शुभवर्तमान: मत्तय २२:१-१४

          प्रभू येशू आज आपणासमोर मेजवानीस आमंत्रण दिलेल्या आमंत्रीतांचा दाखला ठेवीत आहे. आमंत्रित मेजवानीस उपस्थित राहण्यास असमर्थ ठरले असे ह्या दाखल्याद्वारे सांगितलेले आहे. आमंत्रितांनी अनेक सबबी व करणे देऊन राजाच्या आमंत्रणास नकार दिला. आजही अनेक लोक देवाच्या व देऊळ मातेच्या आमंत्रणाला नकार देवून मिस्साबलीत व इतर धार्मिक व सामाजिक बांधिलकीत सहभागी होण्या ऐवजी सबबी व कारणे देत असतात. थोडा वेळ शांत राहून मनन चिंतन करूया. मी माझा परिपूर्ण सहभाग दाखवतो का? कि अनेक कारणे व सबबी देऊन माझ्या जबाबदारीपासून दूर जातो?

 बोधकथा:  

प्रेम नगर नावाचं एक गाव होत. ह्या गावात एक विचित्र कुटुंब रहात होतं. त्या गावात कोणताही कार्यक्रम असला तरी हे कुटुंब दुसऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत नसे. दुसऱ्यांशी मिळून मिसळून राहणे, शेजारधर्म पाळणे त्यांना जमत नसे. 

गावातील काही मान्यवर व्यक्तींनी ह्या कुटुंबाला भेट देऊन सांगितले की ‘आपलं कुटुंब कधी गावातील समारंभात, सुख-दुःखात, अडीअडचणीत तसेच कुठल्याही सभेला उपस्थित नसतं, आपण ह्या पुढे गावातील कार्यक्रमात सक्रिय सहभाग दाखवावा’. असे सांगून ते निघून गेले. परंतु ह्या कुटुंबाने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी काही वर्षानंतर ह्या कुटुंबावर जेव्हा संकट आले तेव्हा त्याच्या मदतीस किंवा सहकार्यास कोणीही पुढे आले नाही. त्यांनी मदत व सहकार्य विचारले असता गावकऱ्यांनी वेगवेगळ्या सबबी व करणे देऊन त्यांना मदत करायचे टाळले, त्यांना वाळीत टाकले.

 मनन चिंतन:

आपला भारतीय समाज व कुटुंब एकमेकांशी निगडित व जवळकीचे आहे. घरात कोणताही कार्यक्रम असला तर संपूर्ण गावाला आमंत्रित केले जाते. एखादं घर विसरून गेलं, तर त्या कुटुंबाला फार राग येत असतो. सध्याची कोविड १९ ची परिस्थिती वगळता आपले गावातील समारंभ हे सामुदायिक असतात. आमंत्रण देणे, त्याचा स्वीकार करणे, पाहुण्याचा पाहुणचार करणे, समारंभाला उपस्थित राहण्याचे आश्वासन देणे ही प्रथा आजही आहे.

आजच्या शुभवर्तमानात आपल्याला सांगण्यात आले आहे की, राजाच्या मुलाचा लग्न सोहळा होता. तो श्रीमंत व प्रतिष्ठित असल्यामुळे आपल्या घरी लग्नाला खूप लोक येतील ह्या आशेने त्याने मोठी मेजवानी तयार केली होती.

मेजवानीचा वेळ आल्यावर लोकांना बोलविण्यासाठी दासांना पाठविण्यात आले. ज्या लोकांनी आमंत्रणाचा स्वीकार केला होता व येण्याचे आशवासन दिले होते, त्यांनी नकार देण्यास सुरुवात केली. जेवण तयार आहे. पुष्ट पशू कापले आहेत. दासानी लोकांना सांगितले, परंतु त्यांनी मनावर घेतले नाही. ते आपापल्या कामधंद्यात, शेतीत मग्न झाले, तर दुसऱ्यांनी अनेक कारणे व सबबी देऊन लग्नाला व मेजवानीला येण्याचे टाळले. इतकेच नव्हे, तर काही लोकांनी राजाच्या दासंचा अपमान केला व काहींना जिवे मारले.

परिणामी राजाला आपल्या प्रजेचा राग आला, त्याने सैन्य पाठवून त्या अत्याचारी लोकांचा नाश केला आणि त्यांचे नगर जाळून टाकले. राजाचा अपमान प्रजेला महाग पडला. त्यांना शिक्षा मिळाली, ज्यांना बोलावले होते त्यांची लायकी नव्हती.

होय, देव आपल्याला प्रत्येक रविवारी प्रीती भोजनसाठी मिस्साबलीत सहभागी होण्यासाठी आमंत्रण देत असतो. वेळ येते तेव्हा आपण राजाच्या प्रजेप्रमाने अंग काढण्याचा प्रयत्न करतो. अनेक सबबी व कारणे देवून मिस्साबलीत, धार्मिक विधीत व सामाजिक बांधिलकीत सहभाग दाखवत नाही, कधी कधी मिस्साला वेळेवर पोहचत नाही. जर मिस्सा चुकला, तर त्याचं दुःख आपणास होत नाही. 

परंतु अशी वेळ येईल जेव्हा परमेश्वर मिष्टान्नाची व द्राक्षरसाची मेजवानी आपल्या सर्वकालिक जीवनात मांडेल तेव्हा आपला सहभाग  होऊ शकत नाही; कारण आज आपण अनेक सबबी व कारणे    देऊन परमेश्वराचं आमंत्रण फेटाळतो. आपल्या जीवनाच्या शेवटी आपणास समय व ठरलेली वेळ येताना त्याच्या दैवी मेजवानीत उल्हासित व हर्ष भरीत होण्याचे भाग्य लाभणार नाही, अशी पाळी न येवो. ती दैवी मेजवानी एक आशेची व तारणाची, आपल्या चेहऱ्यावरील अश्रू पुसणारी देव राज्यात असणारी मेजवानी असणार.

जो देवाच्या आमंत्रणाला सदोदित होकार देईल त्याच्या भोजनावलीत सदोदित सहभाग दाखवेल त्याला आपत्ती-विपत्ती, दैनव्यवस्था तसेच कोरोनासारख्या महामारित परमेश्वराचे सामर्थ्य व शक्ती लाभेल.

 विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्तसभेचे पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेत त्यांची श्रद्धा ख्रिस्ताने शिकाविलेलेया प्रार्थनेद्वारे बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. सर्व आजारी व पिडीत लोकांनी विशेष करून कोरोना रोगाने पिडीत असलेल्या लोकांना प्रभूच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व त्यांची आजारातून सुटका होऊन त्यांच्या वेदना कमी व्हाव्यात यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

३. आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांवर ख्रिस्ताचा आशीर्वाद यावा व स्वतःला नाकारून जगातील आनंदापासून वंचित राहून जागतिक मोह-मायेचा त्याग करून आपण शुभवर्तमानाच्या मुल्यांप्रमाणे जगावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

४. सर्व पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत, त्यांना देव राज्याविषयी शिकवण द्यावी. स्वतः परमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून, मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.

 

 

Friday, 2 October 2020

 

Reflections for the 27th Sunday in Ordinary Time & 
Feast of St Francis of Assisi (04/10/2020) 
by Fr. Benjamin Alphonso




सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार व असिसिकर संत फ्रान्सिसचा सण

 

दिनांक: ०४/११/२०२०

पहिले वाचन: यशया ५:१-७

दुसरे वाचन: फिलीप्पीकरांस पत्र ४:६-९

शुभवर्तमान: मत्तय २१:३३-४३



 


प्रस्तावना:

          आज आपण सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार साजरा करीत आहोत. तसेच आज पवित्र देऊळमाता निसर्गप्रेमी व महान संत असिसिकर संत फ्रान्सिस ह्यांचा सण साजरा करीत आहे. संत फ्रान्सिस नेहमी नम्र राहून त्यांनी देवावर अतोनात प्रेम केले आणि गरीबीचे जीवन जगले. आजची उपासना आपल्याला परमेश्वराची दया आणि मानवी वागणूक ह्यांवर मनन चिंतन करण्यास बोलावत आहे. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपल्याला द्राक्ष मळ्याचा दृष्टांत देऊन परमेश्वराचा इस्राएल लोकांवर असेलेला राग व्यक्त करतो; कारण इस्राएल लोक देवाच्या आज्ञेशी एकनिष्ठ नव्हते. दुसऱ्या वाचनात संत पौल फिलीप्पीकरांस परमेश्वराचे आभार व स्तवन करण्यास प्रोत्साहित करून सदोदित आनंदी राहण्यास सांगत आहे. तसेच आजच्या मत्तयलिखित शुभवर्तमानातदेखील प्रभू येशू द्राक्षमळा व माळेकरी याचा दाखला देत आहे. ह्या दाखल्यात इस्राएल लोकांनी देवाच्या संदेष्ट्यांचा व ख्रिस्ताचा केलेला धिक्कार ह्याचे वर्णन करतो. देवाची दया मिळण्यासाठी आपण नेहमी नम्र राहिले पाहिजे. आपण द्वेष, राग व कठोरता ह्यापासून दूर राहिले पाहिजे. ह्यासाठी ह्या पवित्र मिस्साबलीदानात प्रभू परमेश्वराजवळ खास प्रार्थना करूया. 

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ५:१-७

हा छोटासा दाखला अतिउत्कृष्ट आहे. याचा आरंभ प्रेम गीतासारखा आहे. तो कर्णमधुरकल्पक आहे. हा दाखला वाचत असताना आपण स्वतःचीच चौकशी करून घेत आहोत असे आढळते. तसेच ह्या दाखल्याद्वारे पापाचे खरे रूप स्पष्ट होते व ते सर्वस्वी असमर्थनीय आहे असे जाणवते. 

दुसरे वाचन: फिलीप्पीकरांस पत्र ४:६-९

ह्या पत्रामध्ये आनंद हा विषय मांडला आहे. प्रेषिताने आपल्या वाचकांना सदोदित आनंद करण्यास सांगितले आहे. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. हेच त्याचे आव्हान आहे. ख्रिस्ती लोकांच्या जीवनात चिंतेला अजिबात थारा नसावा, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीविषयी प्रार्थना, विनंती करता येते व ती करावी. ख्रिस्ती व्यक्तींचे विचार जीवनाला धरून असावेत. आपले उच्चार व आचार-कृती सर्वांना चांगले वळण लावतील, कारण ह्या गोष्टी खऱ्या, प्रामाणिक, योग्य, शुद्ध, सन्मानीय आणि प्रिय अशा आहेत. 

शुभवर्तमान: मत्तय २१:३३-४३

ह्या दाखल्यात द्राक्षमळा व माळेकरी यांचे उदाहरण दिले आहे. परगावी राहणारा जमीनदार व त्याचे माळेकरी यांचा हा वृत्तांत आहे. मळ्याचा खंड म्हणून उत्पन्नाचा काही ठराविक हिस्सा मालकास देण्यास ते नकार देत होते व हेच कारण त्यांना काढून टाकण्यास पुरेसे होते. परंतु जमीन मालकाच्या मुलाचा खून केल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले. या दाखल्याचे मर्म याजक व परुशी यांना ताबडतोब उमजले कारण संदेष्ट्याचे पुस्तक माहीत असणाऱ्या कोणालाही ते समजले असते. इस्रायल देवाच्या अपेक्षा पूर्ण करण्यास ते नेहमी उणे पडले, हे यशयाने त्या सर्वश्रुत द्राक्षमळ्याच्या दाखल्यातून प्रतीक रूपाने दाखवले आहे. हे पुढारी लवकरच देवाच्या पुत्राला ठार करणार होते. त्याहून गतकाळात त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांचा पुन्हा-पुन्हा अव्हेर केला होता. या वाचनातून या दाखल्याचा गंभीर अर्थ स्पष्ट केला आहे. इस्रायलच्या पुढाऱ्यांनी ज्याला नाकारले, त्याला सन्मानाच्या सर्वोच्च पदासाठी निवडलेले आहे हे सिद्ध होते. द्राक्षमळा या चिन्हाचे दर्शविलेले राज्य त्यांचे नव्हे, तर देवाचे आहे आणि देव ते जबाबदार व्यक्तीस सोपवून देईल.

 मनन चिंतन:

देवाने ही सुंदर अशी पृथ्वी उत्पन्न करुन मनुष्याच्या हाती सोपवलेली आहे. मनुष्य ह्या सृष्टीचा रक्षणकर्ता बनला पाहिजे; परंतु आज आपल्याला वेगळेच चित्र दिसते. मनुष्य हा जास्त भक्षक बनला आहे. मनुष्य स्वार्थी आणि कठोर बनला आहे. जगात पाप आणि दुःख आले आहे. जर मनुष्य देवाचे आणि देवाच्या वचनाशी प्रामाणिक राहिला, तरच मनुष्याचं तारण होऊ शकते. हीच गोष्ट प्रामुख्याने आजची वाचने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मनुष्याने आपल्या अंगी नम्रता, सौम्यता बाळगली पाहिजे. मनुष्याने देवाने दिलेल्या किंवा पाठविलेल्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवला पाहिजे; परंतु तसं होत नाही आणि म्हणून आपणावर मनुष्यावर आपत्ती कोसळते. देवाने आपल्या उद्धारासाठी आपला एकुलता एक पुत्र हा या जगात पाठवला. शास्त्री व पुरुशी यांनी त्याचा धिक्कार केला नाही, तर त्यांनी त्याला क्रुसावर खिळवून जीवे मारले. परंतु देवाने मानवाला देवाने कधीच सोडले नाही, तर मानवावर त्याने नेहमी प्रीतीच केली. जो कोणी देवावर आणि त्याच्या पुत्रावर प्रीती करतो व त्याचा सन्मान करतो त्याचे  तारण होइल.

असिसिकर संत फ्रान्सिस हयांनी देवावर पूर्णपणे प्रेम केले. तो देवाच्या पुत्र येशूच्या प्रेमात पूर्णपणे वाहून गेला होता. ह्याचच प्रतीक म्हणून येशू ख्रिस्ताने संत फ्रांसिसला पाच पवित्र घायांचे वरदान दिले होते. संत फ्रान्सिसला गोरगरीबांमध्ये येशू ख्रिस्त दिसला म्हणून त्यांनी आमरण गरिबीची व्रत स्वीकारले. देवाने आपल्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला या भुतलावर पाठवले हे संत फ्रांसिस यांना समजत नव्हते, त्याहीपेक्षा श्रेष्ठ म्हणजे ख्रिस्ताने क्रूसावर केलेले बलिदान हे त्याच्या प्रार्थनेचा व चिंतना विषय होता. तो नेहमी प्रार्थनेमध्ये हरवून जायचा त्याला देव सृष्टीत दिसत होता म्हणून त्यांने ‘कँटिकल ऑफ ब्रदर’ हे गीत ते आजही प्रसिद्ध आहे.

संत फ्रांसिसचं निसर्गावर फार प्रेम होते म्हणून तो निसर्गाची काळजी घ्यायचा. ‘निसर्गाचा संत’ म्हणून त्याची गणना केली जाते. आपले पोप फ्रान्सिस यांची पोप पदाची निवड झाल्यावर असिसिकर संत फ्रान्सिस या नावाची त्यांनी निवड केली. तसेच त्यांनी पर्यावरणावर ‘लावदा तो सी’ हे परिपत्रक 2016 साली प्रसिद्ध केले. आपल्या समाज्याला आमंत्रित केले की, असिसीकर संत फ्रान्सिसप्रमाणे निसर्गावर प्रेम करा व काळजी घ्या.

बोधकथा:

एकदा एक युवकाचा ग्रुप एकत्रपणे एका उजाड किंवा पडीत जमिनी जवळून जात होता. तेथे एक वृध्द माणूस झाडे लावत होता. युवकांनी त्या वृध्द माणसाची चेष्टा केली. ते म्हणाले, ‘तू म्हातारा आहेस आणि लवकर मारणार आहेस तु झाडे कशाला लावतोस?’ तू त्याची फळे खाऊ शकणार नाहीस मग तेव्हा तो म्हातारा माणूस उत्तरला मी हे माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्या पिढीसाठी करतो. काही वर्षांनंतर हे युवक जे आता प्रौढ झाले होते ते त्याच मार्गाने जात होते. तेव्हा त्यांना तिकडे फळांनी भरलेली झाडे दिसली, जी त्या वृध्द व्यक्तीने लावलेली होती. तेव्हा त्यांना त्या वृध्द व्यक्तीचे ते शब्द आठवले की, ‘हे मी तूम्हासाठी करतो.’

आपण संत फ्रान्सिसप्रमाणे निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. तरच पर्यावरण आपली काळजी घेईल. आपण सुद्धा देवावर प्रेम केले, तर देव आपल्यावर प्रेम करील व आपलं तारण होईल. आज आपण देवाजवळ प्रार्थना करूया की हे देवा असिसिकार संत फ्रान्सिस प्रमाणे तुझ्यावर व निसर्गावर प्रेम करण्यास आम्हास सुबुद्धी दे.

 विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू असिसिकर संत फ्रान्सिसच्या मध्यस्थीने आमची प्रार्थना ऐक.

 १. आपण आपले पोप फ्रान्सिस, महागुरू व सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी ह्यांच्यासाठी खास प्रार्थना करूया की संत फ्रान्सिस प्रमाणे ते दयेचे व शांतीचे साधन बनावेत.

 २. आपण सर्व तरुणासाठी जे मार्ग चुकले आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करूया. संत फ्रान्सिस असिसिकरचे उदाहरण त्यांनी जीवनात पाळावे व त्यांनी जीवनात योग्य मार्ग निवडावा.

 ३. पर्यावरणाचा आश्रयदाता संत फ्रान्सीसप्रमाणे आपण देखील निसर्गाच संवर्धन कराव आणि ही पृथ्वी सगळ्यांना जगण्यासारखी करून सर्वांनी गुण्या गोविंदाने रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. आज आपण आपल्या ख्रिस्त सभेसाठी प्रार्थना करूया की, ह्या कोरोना विषाणूच्या वेळी आपण चर्चला जात नाही. परंतु देवाच्या अधिक समीप आहोत. देवाने आपले परमगुरु फ्रान्सिस, कार्डिनल्स, महागुरू, धर्मगुरू, तसेच सर्व श्रद्धावंतांना आशीर्वादित करून, सुखी-समाधानी व नीरोगी ठेवावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

 ५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक विनंत्या परमेश्वरास अर्पण करूया.