Thursday, 8 July 2021

                                   

  Reflection for the 15th Sunday in Ordinary Time (11/07/2021) By Bro. Baritan Nigrel


सामान्य काळातील पंधरावा रविवार

पहिले वाचन: आमोस ७:१२-१५

दुसरे वाचन: इफिसिकारंस पत्र १:३-१४.

शुभवर्तमान: मार्क ६:७-१३


“वाटेसाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका”

प्रस्तावना:

आजची उपासना आपल्याला देवाच्या प्रेमाची सुवार्ता इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी आमंत्रित करीत आहे.  पहिल्या वाचनात आपणास सांगण्यात आले आहे की, देवाची सुवार्ता व साक्ष इतरांना देताना आपल्याला आमोस संदेष्ट्याप्रमाणे अनेक संकटाना सामोरे जावे लागेल. अनेकजण आपला तिरस्कार करतील; पण परमेश्वर आपल्याला एकटे सोडणार नाही. ज्या कार्यासाठी परमेश्वर आमोसला बोलावितो, ते कार्य तो सिद्धीस नेतो. संत पौल दुसऱ्या वाचनात आपल्याला आठवण करून देतो की, बाप्तिस्माद्वारे आपण सर्वजण देवामध्ये एक झालो आहोत. म्हणून देवाची सुवार्ता ही फक्त निवडलेल्या लोकांसाठी नाही; तर सर्वांसाठी आहे. शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना देवराज्याची सुवार्ता पसरविण्यास अधिकाराने पाठवतो. आपण सर्वजण देवाची निवडलेली प्रिय आहोत. आजही येशू ख्रिस्त आपल्याला त्याचे कार्य व सुवार्ता इतरांना देण्यास बोलावीत आहे. आपल्या जीवनाद्वारे देवाचे प्रेम इतरांपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे; म्हणून आजच्या ह्या मिस्साबलिदानात आपण विशेष प्रार्थना करू या.

सम्यक विवरण:

पहिले वाचन:

पहिल्या वाचनात अमासिया, आमोस ह्या संदेष्ट्याला त्याच्या देशात परत जाण्यास सांगतो; कारण शलमोन राजाच्या मरणाअगोदरच इस्रायलची दोन भागांमध्ये विभागणी झाली होती; यहुदी आणि इस्रायल.

          आमोस हा यहुदिया प्रांतातून इस्रायल प्रांतात देवाची शुभसंदेश सांगण्यासाठी आला होता. पण आमोस अमासियाला सांगतो की, मी स्वतःहून आलो नाही, तर देवाने मला त्याची सुवार्ता सांगण्याकरिता पाठविले आहे.

          आमोस इस्रायल प्रांतात धन-दौलत मिळवण्यासाठी आला नव्हता; कारण मेंढपाळ म्हणून तो त्याच्या कार्यात आनंदी होता. आमोस हा उपदेशक नव्हता, अर्थात संदेष्टा बनणे हे त्याच्या विचारापलिकडचे होते, परंतु देवाने त्याला पाचारण केले आहे असे तो ठामपणे सांगतो व देवाचा संदेश देत इस्रायलच्या काना कोपऱ्यात फिरतो, हे आमोसाचे उदाहरण लक्षणीय आहे.

दुसरे वाचन:

            संत पौल इफिसकरांस ईश्वस्तवन करण्यास सांगतो, कारण देवाने आपणा सर्वांना येशूच्या रक्ताने त्याची लेकरे (दत्तक) म्हणून स्विकारले आहे. अर्थात ख्रिस्तामध्ये आपण देवाच्या पवित्र आत्म्याचे वतनदार झालो आहोत. आणि देवाचा कृपाशिर्वाद आपणावर सदैव हजर आहे. पुढे संत पौल म्हणतो की, ज्या ख्रिस्तावर आपण पूर्वीपासून आशा ठेवली आहे, त्या येशूचा गौरव आणि महिमा गाणे अवश्य आहे.

          आपण ऐकलेल्या सुवार्तेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याचा प्रचार करण्यासाठी हातभार लावला पाहिजे. ख्रिस्ताने आपणावर पवित्र आत्मा पाठवून शिक्का मोर्तब केला आहे. ख्रिस्तामुळेच आम्हांला मुक्ती मिळाली आहे.

शुभवर्तमान:

            अविश्वास असला तरीही सुवार्ताप्रसाराचे कार्य पुढे चालू ठेवणे आवश्यक होते, म्हणून येशूने बारा जणांना या कामगिरीवर पाठवले. प्रेषितांनी बरोबर काय घ्यावे, कोणती वस्त्रे घालावी वैगेरे शुभवर्तमानाच्या तपशिलात वर्णिले आहे त्यात कदाचित फरक आहे; पण ते इतके महत्त्वाचे नाही. प्रवासात जास्त ओझे घ्यायचे नाहीहे सूत्र सर्वांनीच सांगितले आहे. सुवार्ताप्रसाराचे कार्य शिरावर घेतलेल्या व्यक्तींनी अन्नपाणी, मुक्कामाची जागा वैगेरे गोष्टींची उगाच चिंता करू नये. आपल्यावर सोपवलेली कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यात श्रोत्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न गुंतला आहे हे त्यांनी कायम मनात ठेवले पाहिजे. यहुदी लोक परक्या ठिकाणी गेले तर तेथून परतताना अनेकदा तिकडची धूळ तिकडेच झटकून टाकीत. पण या प्रसंगी त्यांनी सुवार्ता नाकारल्याचे चिन्ह, रीतसर साक्ष म्हणून ते करायचे होते.

ह्या बारा जणांना येशूने भुते काढण्याचे सामर्थ्य दिले. तथापी सुवार्तेची घोषणा करणे हेच त्यांचे मुख्य कार्य होते हे आपणाला १२ ओवीमध्ये दिसते. ते तेथून निघाले व लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली.ह्या घोषनेतूनच भुते काढणे व आजाऱ्यांना बरे करणे ही कार्य होतात. तेलाभ्यंग करणे हे येथे प्रतीकात्मक आहे.

मनन-चिंतन:

प्रभू येशूच्या मरणाने व पुनरुत्थानाने आपल्याला नवीन जीवन मिळाले आहे. हे जीवन जे येशूमध्ये आपल्याला मिळालेलं आहे, ते आशीर्वादाच जीवन आहे; ते आशा असलेल जीवन आहे; ते जीवन देवाच्या अधिकाराने भरलेलं जीवन आहे आणि आजच्या शुभवर्तमानात आपण तेच पाहतो, प्रभू येशू त्याच्या शिष्यांना अधिकार देऊन जोडी-जोडीने देवाराज्याची सुवार्ता घोषविण्यासाठी पाठवितो. येशू ख्रिस्त देवाचे कार्य (Mission) आपल्या शिष्यांबरोबर वाटतो, जेणेकरून हरवलेली मेंढरे देवाची सुवार्ता ऐकून पश्चात्तापी अंतःकरणाने देवाकडे परत येतील. ‘येशू जीवन घेण्यासाठी नव्हे; तर जीवन देण्यासाठी आला आहे’ (योहान १०:१०). म्हणून हे जीवन विपुलतेने सर्वांना मिळावे ह्यासाठी येशू त्याच्या शिष्यांना सुवार्ता पसरविण्याची जबाबदारी देतो.

येशूने निवडलेले शिष्य हे महान नव्हते; पण येशू ख्रिस्ताने त्यांना महान व सक्षम केले. ते परिपूर्ण नव्हते; पण येशू ख्रिस्ताने त्यांना परिपूर्ण केले. जो कोणी स्वतःला देवापुढे नम्र करतो, परमेश्वर त्याला दैवी कृपेने भरतो व सुवार्ता घोषविण्याचे कार्य त्याच्या हाती देतो. जो कोणी देवावर विश्वास ठेवतो आणि त्याला अनुसरतो, परमेश्वर त्याच्याद्वारे देव राज्याची सुवार्ता इतरापर्यंत पोहचवतो.

‘सुवार्ता’ ह्या शब्दाचे मूळ ‘euaggelion’ ह्या ग्रीक शब्दात आहे. हा शब्द ग्रीक नव्या करारात ७२ वेळा आला आहे. ‘Euaggelio’ हा ग्रीक शब्द - सुवार्ता सांगणे, गाजवणे, घोषित करणे अशा पर्यायी अर्थाने नव्या करारात ५५ वेळा वापरण्यात आलेला आहे.

सुवार्ता ही येशू ख्रिस्ताची सुवार्ता आहे (मार्क १:१,२ गलती १:७). तो दीनांना सुवार्ता सांगण्यास ह्या जगात आला (मत्तय ११.५, लूक ४.१८). सुवार्ता ही देवाची सुवार्ता आहे (१ थेसल २:२, , ९) कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला (योहान ३.१६).

संत पौल सुद्धा सुवार्तेचा अर्थ वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून आपल्याला सांगत आहे. सुवार्ता ही सत्याची आहे (गलती २.५, १४, कलसै १.५). सुवार्ता आशेची आहे (कलसै १.२३). सुवार्ता शांतीची आहे (इफिस ६.१५). सुवार्ता जीवन, पुनरुत्थान, आणि अमरत्व ह्यांविषयी आहे (२ तिम १.१०, २.८). सुवार्ता ही तारणाविषयी आहे (इफिस १.१३).

प्रिय भाविकांनो, सुवार्ता ही सर्व जगासाठी आहे. प्रभू येशू लूकच्या शुभवर्तमानात म्हणतो, ‘मला इतर नगरांत पण देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे; कारण त्यासाठीच मला पाठवले आहे’ (लूक ४.४३). म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना अधिकार देऊन देवाची सुवार्ता घोषविण्यास बाहेर पाठवले.

प्रभू येशूच्या द्वारे परमेश्वराने देऊ केलेले तारण सर्व जगासाठी आहे, हे सर्व जगाला कळले पाहिजे. त्यासाठी येशूने जी शेवटची महान आज्ञा दिली ती ही होती की, ‘तुम्ही सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्ता सांगा’ (मार्क १६:१५).

आज आपण पाहतो की, माणसे परमेश्वरामध्ये जीवन जगत नाही; कारण त्यांना अजूनही परमेश्वर सापडलेला नाही. कितीतरी माणसे आशेने जीवन जगत नाही. ते संकटात आहेत. ते त्रासामध्ये आहेत, टेन्शनमध्ये आहेत. नेहमी निराशेमध्ये असतात. वेगवेगळ्या तणावातून ते जातात. कारण अजूनही देवाची सुवार्ता त्यांनी ऐकलेली नाही. देव हा जीवन देणारा देव आहे, ह्याचा अजूनही त्यांना अनुभव आलेला नाही.

आज प्रभू येशू आपल्या सर्वांना सुवार्ता पसरविण्यासाठी पाठवत आहे; कारण प्रभूला आपल्याद्वारे इतरांच्या जीवनात आनंद द्यायचा आहे. जे प्रभूच्या सुवार्तेचा स्वीकार करतात, ते जीवन देवाच्या नावाने जगतात. असिसिकर संत फ्रान्सिस म्हणतात, ‘हे प्रभो, मला तुझ्या शांतीचे साधन बनव.’ आपण सर्वजण असिसिकर संत फ्रान्सिस ह्यांच्यासारखे देवाच्या सुवार्तेचे साधन बनून देवाची सुवार्ता इतरापर्यंत पोहोचावी म्हणून देवाकडे कृपा मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

आपला प्रतिसाद :- हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

1. आपल्या ख्रिस्तसभेचे आधारस्तंभ परमगुरु, महागुरू, धर्मगुरू यांनी प्रेषित कार्य करण्यास प्रयत्न करावे, यासाठी त्यांना परमेश्वराकडून शक्ती मिळावी म्हणून आपण प्रभू कडे प्रार्थना करूया.

2. आजच्या तरुण पिढीने प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी ईश्वरी पाचारणाला प्रतिसाद द्यावा म्हणून प्रार्थना करूया.

3. आपल्या धर्मग्रामातील आजारी, दुःखी व पिडीत लोकांना परमेश्वराचा गुणकारी स्पर्श व्हावा व त्यांचे आजार व दुःखे हलकी व्हावीत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

4. आपल्या देशातील राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या समाजातील गरीब लोकांसाठी विकासाची कार्य करावेत व त्यातून खरा समाज बांधावा, म्हणून आपण प्रभू कडे प्रार्थना करूया.

5. आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतू साठी प्रार्थना करूया.

Friday, 2 July 2021

Reflection for the 14th Sunday in Ordinary Time (04/07/2021) By Bro. Jeoff Patil



सामान्य काळातील चौदावा रविवार

यहेजकेल: - २:२-५

२ करिंथ: - १२:७-१०

मार्क: - ६: १-६

“जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.”


प्रस्तावना

    आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला आपल्या पाचारणाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, परमेश्वर यहेजकेल संदेष्ट्याला इस्त्रेलाचा उद्धार करण्यासाठी पाचारण करीत आहे. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे आपण बढाई मारू नये, म्हणून त्याने आपल्या शरीरात एक काटा रुतला असल्याचे सांगतो. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूख्रिस्त संदेष्ट्याचा सन्मान त्याच्या देशात होत नसतो, असे विधान मांडून आपला शिष्यांना आपल्या कार्यामध्ये स्थिर राहण्यासाठी ताकीद देत आहे. प्रत्येक ख्रिस्ती हा ख्रिस्ताचा सुवर्तिक असतो. ख्रिस्ताची सुवार्ता पसरविणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. परमेश्वराच्या मळ्यात कार्य करीत असतांना स्तुती बरोबर निंदा, टीका आपल्या वाट्याला येणार आहेत; परंतु आप ह्या कार्यामध्ये न डगमगता सतत पुढे जाण्यास आपल्याला परमेश्वराची विशेष कृपा शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

पहिले वाचन

    इस्रायलच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा काळ हा संदेष्ट्यांचा काळ होता. समुद्राच्या लाटांनी किनारा धुवून काढावा असे हे संदेष्टे समाज धुवून काढीत. म्हणूनच परमेश्वराने यहेजकेल संदेष्ट्याची निवड केली. इस्राएल लोकांच्या फितुरीमुळे देवाने त्यांना हद्दपार करून गुलामगिरीत वाढविले. लोकांची सुटका केल्यावर देवाने यहेजकेल ह्यास आपला संदेष्टा म्हणून निवडले होते. आत्म्याने माझ्याठायी प्रवेश करून मला माझ्या पायांवर उभे केले”. या वाक्यावरून आपणास कळते की देवाने त्याला पवित्र आत्म्याने परिपूर्ण करून इस्राएल लोकांना आपला संदेश देण्यासाठी निवडले आहे.

दुसरे वाचन

    संत पौलला ख्रिस्ताच्या कार्यामध्ये आपण जरी अशक्त व दुर्बल असलो तरी ख्रिस्त आपल्या अशक्तेत प्रट होत असतो, हे त्याला दाखवायचे आहे. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे ह्या शब्दांद्वारे संत पौल आपणास त्याला झालेल्या पाच जणांची साक्ष देतो. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी गर्विष्ठ बनवू नये, म्हणून माझ्या शरीरात एक काटा, ह्या वाक्यातून संत पौल आपल्याला विपुल ते प्रकटीकरणे झालेली होती हे स्पष्ट करून देतो. प्रकटीकरणाच्या ह्या विपुलतेमुळे तो डून जाऊ नये म्हणूनच संत पौल बढाई मारू नये म्हणून ख्रिस्ताने त्याच्या शरीरात एक काटा रुतलेला आहे असे तो म्हणतो. कारण त्याने गर्वपणा धारण न करता नम्रपणा धारण करावा व ख्रिस्ताची साक्ष द्यावी असा होईल.

शुभवर्तमान

    संत मार्क आपल्या शुभवर्तमानात येशूला खरा प्रवक्ता किंवा संदेष्टा असे संभोधितो. येशू गालीलात असताना त्याला आपल्या गावी जाण्याची इच्छा झाली होती. म्हणून येशू गालीलातून निघण्या अगोदर आपल्या नाझरेथ या गावास भेट देतो. ज्या दिवशी येशूने आपल्या गावास भेट दिली तो दिवस शब्बाथ दिवस होता. शब्बाथ दिवशी यहुदी लोक देवळात प्रार्थना करण्यासाठी जात असत आणि येशूने तिथे उपदेश केला होता, त्याचा तो उपदेश ऐकून लोक अतिशय प्रभावित झाले. काहींच्या मनात खवळल उडाली, तर काहीजण एकमेकास विचारपूस करत होते. ह्याला हे सर्व ज्ञान कोठून प्राप्त झाले? हा सुतार नाही काय? हा मरीयेचा मुलगा ना? अशा शब्दात त्यांनी त्यांची अवहेलना केली होती. ह्या त्यांनी केलेल्या अव्हेलनेला येशू ने म्हटले होते, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या देशात त्याचा अपमान होतो. प्रेषित कार्यामध्ये आपला सतत सन्मान होणार असे नाही, तर निंदा, भेदभाव, टीका, छळ अशा संकटांना सामोरे जावे लागते. असे ठाम मत संत मार्क आपल्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहे.

मनन चिंतन

    मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले’. प्रत्येक ख्रिस्ती माणूस हा प्रेषित आहे. बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती झाल्यामुळे अनेक अधिकार आपणास प्राप्त झालेले आहेत. आपण नावाने केवळ ख्रिस्ती असलो व आपलं कार्य शून्य असेल, तर आपण ख्रिस्ती असणे केवळ ढोंगीपणा चे लक्षण ठरेल. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत असताना आपण स्तुती बरोबर निंदा, टीका, छळ आपल्या वाट्याला येणार आहे; परंतु अशा परिस्थितीमध्ये न डगमगता येशू ख्रिस्ताच्या दुखः सहनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपले मिशन कार्य पुढे चालू ठेवणार आहात का? आजची तिन्ही वाचणे आपल्याला सांगत आहेत कि, देवाची सुवार्ता सांगत असतांना जरी अडचणी आणि दुःखे आली तरी डगमगू किंवा घाबरू नये तर धैऱ्याने आपण सुवार्ता पसरवली पाहिजे. परिपूर्ण आनंद हा अपमान, गैरसमज व दुःख सहन करण्यात आहे, असे असिसिकर संत फ्रान्सिस म्हणतात. 

    एकदा संत फ्रान्सिस असिसिकर आपल्या घरातून बाहेर भिक्षा मागण्यास गेले होते. त्यांना येण्यास उशीर झाला. जेव्हा ते आपल्या घरात परत आले तेव्हा त्यांनी दरवाजा वाजवला. घरातून एक बंधू बाहेर आला. हा बंधू संत फ्रांसिसचे स्वागत करण्याऐवजी त्याचा अपमान व निंदा केली व त्यांना घराबाहेर काढले कारण तो बंधू नवीन असून संत फ्रान्सिस ह्यांना ओळखत नव्हते. संत फ्रान्सिसच्या मते हाच परिपूर्ण आनंद आहे, असे बोलत ते देवाची स्तुती करत बाहेर गेले. आजच्या शुभवर्तमानामध्ये देखील आपल्यालादिसून येते कि येशूचा देखील त्याच्या स्वतःच्या गावात पमान व निंदा करण्यात आली. परंतु येशू मागे न जाता, देवाची सुवार्ता सर्वांना पसरवित तो पुढे गेला. पल्यापैकी बर्‍याच लोकांना वाटते की श्रद्धा म्हणजे भक्ती करणे, नोव्हेना व प्रार्थनेत सहभागी होणे. भक्ती हा श्रद्धेचा भाग असला तरी भक्ती म्हणजे श्रद्धा नव्हे. श्रद्धा म्हणजे परमेश्वर पित्याला शरण जाणे. आपला सर्वस्व चांगले आणि वाईट त्याच्या हातात सोपविणे येशू ख्रिस्ताप्रमाणे टीकेची पर्वा न करता देव राज्य उभारण्यासाठी धडपड करीत राहणे, हे आपल्याला आजच्या वाचनात सांगण्यात आले आहे. 

    आज ख्रिस्तसभेमध्ये अशा काही व्यक्ती आहेत की, केवळ आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी सेवेचा वापर करतात. मी ख्रिस्तसभेसाठी काय करतो यापेक्षा माझ्यासाठी ख्रिस्तसभा माझ्यासाठी काय करते? हा प्रश्न त्यांना महत्त्वाचा वाटतो. काहीवेळा मिस्साला येणे, दानधर्म करणे, कायद्याचे पालन करणे एवढीच त्यांची भूमिका असते. तुम्ही आणि मी आजचे संदेष्टे आहोत. ख्रिस्ताचे संदेष्टे म्हणून आपण सुरुवात कुठून करावी? प्रथम माझ्या स्वतःच्या घरातून, गावातून, नगरातून, राज्यातून आणि मग देशात. आज प्रभू येशूख्रिस्त, त्याच्या वाचनाद्वारे आपणा सर्वांना पाचारण करीत आहे. त्याचा प्रेषित होण्यास मी तयार आहे का? माझा वेळ मी त्याच्यासाठी देऊ शकेल का? केवळ मान, प्रतिष्ठा न मिळता, कुठलीही अपेक्षा न करता, मी निस्वार्थीपणे देवाचे कार्य करण्यास तयार आहे का? आजच्या शुभवर्तमानाद्वारे कार्य करीत असताना, येणाऱ्या अडचणींना, निंदेला व टीकेला सामोरे जाण्यास आपणा सर्वांना ख्रिस्ताकडून विशेष कृपा शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करू या.

विश्वासू लोकांची प्रार्थना

प्रतिसाद:- नम्र होऊनी प्रभू तुज करितो प्रार्थना.

1.  ख्रिस्ताचे प्रेषित म्हणून, त्याचे कार्य जगभर पसरविणारे पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी ह्या सर्वाना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशिर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

2.  आपल्या जीवनात ख्रिस्ताला अधिक महत्व देऊन त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गावागावात होणाऱ्या कार्यक्रमात सहभाग घेऊन समेट घडवून आणावा व एकीचा समाज निर्माण व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

3.  आपण प्रेषित कार्य करीत असताना कौतुकाबरोबरच येणाऱ्या टिकेला, अडचणींना सामोरे जाता यावे व अश्या प्रसंगाकडे आशावादी दृष्टीकोनातून पाहता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

4.  आमच्या धर्मग्रामात जे लोक आजारी आहेत त्यांना तुझा स्पर्श लाभू दे. तसेच जे लोक तुझ्या पासून दूर जात आहे त्यांना तुझ्या प्रेमाची हाक ऐकू यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.   

5.  आता आपल्या स्वतःच्या कौटुंबिक हेतूसाठी तसेच वैयक्तिक गरजांसाठी थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया.