Thursday, 9 September 2021

                                   


Reflection for 24th Sunday in Ordinary Time (12/09/2021) By Bro. Pravin Bandya   




सामान्य काळातील चोविसावा रविवार


दिनांक १२/०९/२०२१

पहिले वाचन: यशया ५०:५-९

दुसरे वाचन: याकोबाचे पत्र २:१४-१८

शुभवर्तमान: मार्क ८:२७-३५


पेत्र येशूला म्हणाला, आपण ख्रिस्त आहा

प्रस्तावना

आज देऊमाता सामान्य काळातील चोविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला परमेश्वरावरील विश्वासात दृढ होण्यास पाचारण करीत आहे. ‘माझ्याठायी विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्याच्यापासून काय लाभ’ असं संत याकोब आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये सांगत आहे. ज्या प्रमाणे एका नाण्याला दोन बाजू म्हणजे छापा आणि काटा असतो, त्याप्रमाणे विश्वासाच्या दोन बाजू आहेत, त्या म्हणजे कृती आणि शब्द. आजच्या शुभवर्तमानात देखील आपण पाहतो कि, पेत्राने प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास फक्त शब्दाने प्रगट केला नाही तर, ख्रिस्ताच्या  मरण, पुनरुत्थान  आणि स्वर्गरोहणानंतर देखील त्याने प्रभू येशूख्रिस्तासाठी आपला प्राण देऊन, कृतीद्वारे विश्वास प्रगट केला. आपणाला देखील प्रभू येशूख्रिस्ताने अशा विश्वासाच्या दानाने परिपूर्ण करावं, म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन

आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर यशया संदेशाद्वारे, आपण दुःखामध्ये विश्वासात कशा प्रकारे टिकून राहावे, याविषयी आपल्याला शिकवत आहे. प्रभू परमेश्वर माझा सहाय्यक आहे, तर मला दोषी कोण ठरवणार? अशा पवित्र शब्दांमध्ये यशया संदेष्टा आपलं  सांत्वन करत  आहे.

दुसरे वाचन

आजच्या दुसऱ्या वाचनात संत याकोब म्हणतो, कि विश्वासाला जर कृतीची जोड नसेल तर तो विश्वास निर्जीव आहे. आपल्या चांगल्या कृत्याद्वारे आपला विश्वास सजीव करण्यास प्रभु  येशू ख्रिस्ताची कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

शुभवर्तमान

आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो, कि जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा आणि मला अनुसरत राहावे. दुःखामध्ये देखील आपला ख्रिस्तावरिल विश्वास प्रगट करण्यास आजचे शुभवर्तमान आपल्याला पाचारण करीत आहे.

मनन-चिंतन

विश्वास या विषयावर आज आपण मनन चिंतन करीत असताना, विश्वासाच्या तीन भागांवर म्हणजे ‘अपूर्ण विश्वास’, ‘अंधविश्वास’ आणि ‘पूर्ण विश्वास’ ह्या विषयांवर चिंतन करणार आहोत.

        ‘अपूर्ण विश्वास’ म्हणजे, आपण कधी-कधी प्रार्थना करतो पण आपल्या मनात  शंका असते की, माझी प्रार्थना परमेश्वर नक्की ऐकत आहे का? किंवा मी प्रार्थनेला बसलो असताना प्रभू परमेश्वर माझ्या बरोबर उपस्थित आहे का? परमेश्वर माझ्या प्रार्थनेचे उत्तर देईल का? अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शंका आपल्या मनामध्ये निर्माण होतात. परंतु इब्री लोकांस पत्र ११:१ मध्ये प्रभुचे वचन आपणाला सांगत आहे कि, “विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टी विषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे”. म्हणून जरी आपल्याला ख्रिस्त दिसत नसला तरीपण तो आपल्या बरोबर आहे; हा विश्वास आपण बाळगणे   गरजेचे आहे. कारण पुढे अध्याय ११: ६ मध्ये आपण वाचतो कि, “विश्वासावाचून त्याला आनंदित करणे अशक्य आहे”. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपण परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे.

Ø दुसरा भाग आहे, अंधविश्वास

अंधविश्वासाविषयी यिर्मया  संदेष्टा अध्याय १७:५ आणि ६ म्हणतो, “जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे. तो वैराणांतल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही; अरण्यांतील वृक्ष स्थळें, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यांत तो वस्ती करील”.

आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, पेत्राने जिवंत देवाचा पुत्र, प्रभू येशूख्रिस्तावरील आपला विश्वास प्रगट केला कि, आपण जिवंत देवाचे पुत्र ख्रिस्त आहा. आज आपण स्वतःला प्रश्न विचारूया कि,  आपण कोणावर विश्वास ठेवत आहोत? जिवंत देवावर कि इतर गोष्टींवर? जर आपण परमेश्वराला सोडून इतर गोष्टींवर विश्वास ठेवत असू, तर आपण देखील अंधविश्वासामध्ये अडकलेले आहोत.

Ø तिसरा भाग आहे, पूर्ण विश्वास

ह्या तिसर्‍या भागावर मनन-चिंतन करीत असताना मी तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण विश्वासात टिकून राहण्यासाठी एक गोष्ट सांगणार आहे.

एकदा एका कुटुंबामध्ये एक सुंदरशी मुलगी जन्मास आली. ती लहानाची मोठ्ठी झाली. लग्नाच्या वयाची झाली असताना तिच्या आई-वडिलांनी विचार केला कि, आता आपण मुलीचं लग्न करूया आणि म्हणून त्यांनी तिच्यासाठी चांगलं स्थळ शोधलं; व तिचा साखरपुडा करण्याचा दिवसही ठरवला. तो महान दिवस उगवताच मुला-मुलीने एकामेकाच्या बोटामंध्ये अंगठ्या घातल्या. अचानक साखरपुडाच्या दुसऱ्याच दिवशी त्या मुलाला आपल्या कंपनीतून पत्र आलं की, परदेशामध्ये आपल्या कंपनीतील काही ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी कमी आहेत, म्हणून तुला काही महिन्यासाठी परदेशातील ऑफिसमध्ये जायचं आहे. त्या मुलाला दुःख झालं कि, कालच माझा साखरपुडा झाला; मी माझ्या प्रेयसी बरोबर कधी शॉपिंग मॉल किंवा सिनेमा पहायलासुद्धा  गेलो नाही, कधी कुठे फिरायला गेलो नाही.  आपल्या काळजावर दगड ठेवून हा मुलगा परदेशामध्ये गेला. त्या वेळेला मोबाईल नव्हते, फोन नव्हते, कधी पत्र पाठवलं तरच एकमेकांविषयी कळत असे. मुलगा परदेशामध्ये जाऊन एक वर्ष निघून गेले; दुसरे वर्ष देखील निघून गेले आणि असे करून जवळ-जवळ  चार ते पाच वर्ष निघून गेली. तरी देखील ह्या मुलाचा काय पत्ता  नाही. आता पत्र देखील नाही. त्या मुलीबरोबरच्या दुसऱ्या मुलींची लग्न झाली. घरची माणसं व सर्व लोक तिला म्हणायला लागली की, तू दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करून घे,  पण ती एकच शब्द म्हणत होती, “ज्या दिवशी त्याने माझ्या बोटामध्ये अंगठी घातली, त्या दिवशी त्याने मला वचन दिलं की, मी तुला घेण्यासाठी पुन्हा येणार, म्हणून माझा विश्वास आहे कि, तो माझ्यासाठी नक्की येणार”. आणखी पाच वर्षे निघून गेली; म्हणजे या गोष्टीला तब्बल दहा वर्षं निघून गेली. आणि दहा वर्षानंतर तो मुलगा परदेशातून संपूर्ण वैभव घेऊन पुन्हा आला. तिला लग्न न केलेले पाहून, तिचा त्याच्यावरील विश्वास बघून त्याला आनंद झाला. त्याने तिच्या बरोबर लग्न केलं आणि पुढील आयुष्य सुखामध्ये घालवलं.

जुन्या करारामध्ये होशेयाच्या पुस्तकातील अध्याय २:१९-२० मध्ये परमेश्वर होशेयास म्हणतो. तुला माझी चिरंतन वधू करीन. मी चांगुलपणा, न्याय,प्रेम दया यांच्यासह तुला वधू करून घेईन.  मी तुला माझी विश्वासू वधू बनवीन. मग तू परमेश्वराला खरोखर जाणशील.

परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर परमेश्वराने  एक करार केला आहे. परमेश्वर आपला देव आहे आणि आपण त्याची लोकं आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्माच्या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये कराराची अंगठी घातलेली आहे आणि तो शेवटच्या दिवशी आपल्याला घ्यायला नक्की येणार आहे. तेव्हा आपला विश्वास कसा असेल? गोष्टीमधल्या त्या मुली प्रमाणे पूर्ण विश्वास असेल की, अपूर्ण विश्वास असेल? किंवा अंधविश्वास असेल? या गोष्टीवर आज आपण मनन-चिंतन करूया. आपल्या अंतःकरणात डोकावून पाहूया व परमेश्वराने आपल्याला पूर्ण विश्वासाने परिपूर्ण करावं, म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना.

प्रतिसाद: हे प्रभू, आमचा विश्वास वाढव.

१) आपले महागुरू पोप, बिशप्स, कार्डीनल, धर्मगुरू-धर्मभागिनी तसेच ख्रिस्तामध्ये एकरूप होऊन सेवाकार्य करणाऱ्या या सर्व लोकांना प्रभूचे कार्य व्यवस्थितरित्या पुढे नेता यावे व त्यांना चांगले आरोग्य, कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) सध्या जगामध्ये अशांतता दिसून येत आहे. घातकी संकटे कोसळत आहेत. राजकीय, शैक्षणिक, कौटुंबिक व आर्थिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) सर्व ख्रिस्ती बांधवात एकोपा निर्माण व्हावा, एकमेकांना समजून घ्यावं, आप-आपसातली वैर-भावना या गोष्टींचा त्यांग करून प्रेम, सदभावना निर्माण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) जे लोक आजारी आहेत, ज्याचं मरण जवळ येऊन ठेपल आहे त्यांनी जीवनात निराश न होता त्यानां प्रभूची प्रेरणा मिळावी व धैर्याने जीवन जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) देव प्रीती आहे, तो आपली प्रार्थना ऐकतो म्हणून आता आपण आपल्या स्थानिक गरजा शांतपणे प्रभूचरणी मांडूया.

 





Thursday, 2 September 2021

                                              


   Reflection for 23rd Sunday in Ordinary Time (05/09/2021) By Bro. Aaron Lobo



सामान्य काळातील तेविसावा रविवार


दिनांक ०५-०९-२०२१

पहिले वाचन यशया - ३५:४-७

दुसरे वाचन याकोबाचे पत्र - २:१-५

शुभवर्तमान मार्क ७:३१-३७


 “‘इफ्फाथा,’ मोकळा हो”


प्रस्तावना

            आज आपण सामान्य काळातील तेविसावा रविवार साजरा करीत आहोत. परमेश्वर दयाळू व विश्वासू आहे. आजची उपासना आपल्याला परमेश्वाच्या दयेवर विश्वास ठेवण्यास बोलावत आहे. पहिल्या वाचनात आपण वाचतो कि, देव आपल्याला वाचवतो आणि आपल्याला नवीन जीवन देतो. दुसरे वाचन आपल्याला सांगते कि, देव निःपक्षपाती आहे आणि त्याच्या सर्व मुलांवर तो प्रेम करतो. तसेच शुभवर्तमानात, येशू बधिर माणसाला बरे करतो. आजची वाचने आपल्या मनात अनेक प्रश्न आणतात. देव आपल्या प्रत्येकांवर निःपक्षपाती प्रेम करतो यावर आपण खरोखर विश्वास ठेवतो का? आपण देवाप्रमाणे प्रेम करण्याचा प्रयत्न करतो का? आणि देव आपल्याला काय सांगत आहे, हे ऐकण्यासाठी आपण आपले कान उघडून तयार आहोत का?

मनन चिंतन

            आजची तिन्ही वाचने आपल्याला, देवाने केलेल्या चमत्कारांविषयी सांगत आहेत. पहिल्या वाचनात यशया संदेष्टा निराश्रित इस्त्राएली लोकांना आशेचे किरण दाखवतो. याच हताश लोकांची प्रतिमा आपण आजच्या शुभवर्तमानात असलेल्या बहिऱ्या-तोतऱ्या माणसात पाहतो. ज्या संदेष्याविषयी यशया संदेष्ट्याने इस्त्राएली लोकांना भाकीत केले होते, ते शुभवर्तमानातील मूक व बधिर असलेल्या माणसात पूर्णत्वास आले.

        बहिऱ्या-तोतऱ्या माणसाला बरे करण्यामागे प्रभू येशू चार कृत्ये करतो, ज्याचावर आपण मनन चिंतन करणार आहोत. सर्व प्रथम येशू त्या माणसाला एकीकडे नेतो, म्हणजेच, त्याला इतर लोकांपासून वेगळे करितो, त्याची निवड करतो. ह्या कृत्याचे महत्व असे कि, ज्या प्रमाणे येशूने ह्या माणसाची निवड केली त्याच प्रमाणे देवाने ही इस्त्राएली लोकांना इतर राष्ट्रांपासून विंचले किंवा इस्त्राएली लोकांना इतर राष्ट्रांपासून वेगळे केले. एखाद्या व्यक्तीची अशी निवड करणे हे त्या व्यक्तीबद्दल स्वःमनात असलेले प्रेम जाहीर करते. त्यानंतर येशू त्याच्या कानाला स्पर्श करतो. स्पर्श हे प्रेमाची  अभिव्यक्ती आहे. एखाद्या तान्ह्या बाळाला त्याच्या आईचे प्रेम तिच्या स्पर्श्याद्वारेच समजून येते; हेच मातृत्वाचे प्रेम प्रभू येशू आपल्या स्पर्श्याद्वारे त्या निराश्रित माणसासमोर दर्शवतो. तिसरे कृत्य म्हणजे, येशूने थुंकून त्या माणसाच्या जिभेला स्पर्श केला. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिल्यास मानवी थुंकीमध्ये उपचारक गुणधर्म असतात. ह्या माणसाच्या आरोग्य प्राप्तीमध्ये प्रभू येशू थुंकी ह्या एका नैसर्गिक बाबीचा उपयोग करतो. ह्याचे कारण असे कि, या कृत्याद्वारे येशू ख्रिस्ती संस्काराचे मूल्य प्रकट करतो. ख्रिस्ती संस्कार जी दैविक कृपा मिळवून देते, ही सगळी अशाच नैसर्गिक बाबीचा वापर करतात, तर थुंकी हे ख्रिस्ती संस्काराचे प्रतीकात्मक प्रकटीकरण आहे. ज्या प्रमाणे त्या थुंकीद्वारे त्या माणसाला आरोग्य प्राप्त झाले, त्याच प्रमाणे ख्रिस्ती संस्कारही पवित्र साक्रामेंताद्वारे आरोग्य प्राप्त करून देते. चौथे कृत्य म्हणजे, येशूने ‘इफ्फाथा’ आसा शब्द उचारला, ज्याचा अर्थ ‘मोकळा हो’. येशूच्या शब्दात अपार अशी शक्ती आहे, आणि संत पेत्राने म्हटल्या प्रमाणे, त्याच्या शब्दात सार्वकालिक जीवन आहे (योहान ६: ६८).

        आजच्या आधुनिक काळात आंधळे, मुके व बहिरे हे गंभीर आजार आहेत परंतु त्यांच्यावर उपचार शक्य आहेत. या शारीरिक आजारापेक्षा, आध्यात्मिक आंधळेपणा, बहिरेपणा व मुकेपणा हे जास्त गंभीर आहेत. समाज्यात अन्याय घडतात पण त्याच्यावरती आपण कानाडोळा करतो व त्याच्याविरुद्द आपण आवाज उठवण्यापेक्षा शांत राहतो हेच आजच्या आधुनिक युगातील आंधळेपणा, मुकेपणा व बहिरेपणा आहेत. ह्या आजारांपासून वंचित राहण्यापेक्षा त्याच्यावर उपचार म्हणून येशू आपल्याला त्याच्या स्पर्शाद्वारे, त्याच्या शब्दांद्वारे, त्याच्या संस्काराद्वारे ह्या आजारांवर तोडगा म्हणून आपली निवड करतो. ह्या आजारांपासून बरे होणे म्हणजेच आपल्याला मिळालेली सुवार्ता आपण इतरांपर्यंत पसरविण्याचे आवाहन आहे.

        ह्या आजारांतून बरे होण्याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे. ह्या करिता आपला दैविक विश्वास आपण आपल्या कृत्याद्वारे आपण व्यक्त केला पाहिजे. अन्यायाविरुद्द तोंड देणे, निराश्रितांच्या बरोबर उभे राहणे, आणि घडलेल्या अन्यायांचा धैर्याने सामना करणे, ह्याद्वारे आपण जो ख्रिस्ताने घडविलेला चमत्कार आपल्या कृत्याद्वारे प्रकट करू शकतो. तर मग हा चमत्कार आजच्या समाज्यात घडविण्यासाठी आपण तयार आहोत का? आपल्या बंधू-भागीनींवर घडलेल्या अन्यायाविरुद्द तोंड देण्यास व त्यांना सहानुभूती देण्यास आपली तयारी आहे का? तर मग ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून ख्रिस्ताप्रमाणे दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणण्यास ख्रिस्ताला अनुसरुया. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

आपला प्रतिसाद : हे प्रभू, दया करून आमची प्रार्थना ऐक.

१) आपल्या धर्माची धुरा वाहणारे आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी, धर्मगुरू आणि धर्मभागिनी ह्या सर्वाना देव राज्यांची मुल्ये आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे जगजाहीर करता यावी व त्यासाठी त्यांना परमेश्वराची कृपा मिळा,वी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) आपण आपल्या कुटुंबातील व मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने व सहनशीलतेने समजून घ्यावे व एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरुण-तरुणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) सर्व पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत, त्यांना देव राज्याविषयी शिकवण द्यावी, स्वतः परमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून, मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.


Thursday, 26 August 2021

                                         

   Reflection for 22nd Sunday in Ordinary Time (29/08/2021) By Bro. Brijal Lopes



सामान्य काळातील बाविसावा रविवार


दिनांक: २९/०८/२०२१

पहिले वाचन: अनुवाद ४: १-२, ६-८  

दुसरे वाचन: याकोबाचे पत्र १: १७-१८,२१-२२,२७  

शुभवर्तमान: मार्क ७: १-८, १४-१५,२१-२३  


बाहेरून माणसाच्या आंत जाऊन त्याला भ्रष्ट करील असें काहीं नाहीं. तर माणसाच्या आंतून जे निघतें तेंच त्याला भ्रष्ट करितें. 



प्रस्तावना

आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील बाविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणास नियम शास्त्राचे पालन करून त्यांचे आपल्या दैनंदिन जीवनात पालन करून, पवित्र व सुजानतेचे जीवन जगण्यासाठी बोलावत आहे. परमेश्वराने आपली निर्मिती एकमेकांना मदत करण्यासाठी, प्रेम करण्यासाठी व इतरांबद्दल आपुलकी ठेवण्यासाठी केलेली आहे. आजची तिन्ही वाचणे आपणास नियमांचे पालन करून, इतर व्यक्तींना व समाजव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी व त्यांचा विकास करण्यासाठी बोलावत आहे.

सम्यक विवरण

पहिले वाचन

आजच्या पहिल्या वाचनात आपण आज्ञा पाळून व त्यांचे पालन करण्यासाठी, आपणास मोशे उपदेश करत आहे. त्याचप्रमाणे आजचे वाचन त्याच्या उपस्थितीची जाणीव व देवाचे ज्ञान ह्या आज्ञेद्वारे आपणासमोर व्यक्त केलेली आहेत.

दुसरे वाचन

आजच्या दुसऱ्या वाचनात संत याकोब आपणास देवाचा शब्द ऐकून तो कृतीमध्ये उतरविण्यासाठी व त्याद्वारे गरजवंतांना मदत करण्यासाठी सांगत आहे.

शुभवर्तमान

आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपणास अंतःकरणापासून देवाची भक्ती, व त्याद्वारे आपले अंतकरण शुद्ध ठेवून निर्जल व निर्मळ जीवन कशाप्रकारे जगावे ह्या विषयी आपणास सांगण्यात येत आहे.

मनन चिंतन

विल्यम बाकले नावाचे एक स्कॉटीश ईशज्ञानी विचारवंत त्यांनी एक सुंदर अशी कथा लिहिले आहे की, ज्यामध्ये परुशी धर्मगुरू व त्यांचे अनुयायी कशाप्रकारे नियम व कायदे पाळत असत. त्या कथेमध्ये ते सांगतात की, रब्बी एक परुशी धर्मगुरू रोमन कारागृहात बंदिस्त होते. तुरुंगात असताना त्याच्या सर्व गोष्टीची व्यवस्थितपणे काळजी घेतली जायची. त्यांना वेळोवेळी पाणी जेवण व त्यांच्या आरोग्याची काळजी व्यवस्थितपणे घेतली जायची. दिवसामागून दिवस जात असताना रब्बींची प्रकृती हळूहळू कमजोर होत गेली आणि अचानक त्यांची प्रकृती खालावली. अधिकाऱ्याने ताबडतोब वैद्यांना बोलावले. वैद्यकीय तपासणी झाल्यावर त्यांना डीहायड्रेट (dehydrate) आहे; म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन चक्कर, डोकेदुखी सारखे समस्या होतात. हा अहवाल समोर आल्यावर कारागृहातील प्रशासक विचारात पडू लागले की, हे असे का घडले? वेळोवेळी सर्व गोष्टींची दखल घेऊन सुद्धा अशा समस्या का निर्माण होऊ लागल्या? व ताबडतोब कारागृहातील प्रशासकांनी काही शिपाई त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी पाठविले शिपायांनी निरीक्षण करून, योग्य ती तपासणी करून त्यांचा अहवाल अधिकाऱ्यासमोर ठेवला. अहवाल वाचल्यानंतर त्यांना धक्काच बसला की जे पाणी त्यांना पिण्यासाठी दिले होते, त्या पाण्याचा वापर ते त्याच्या धार्मिक रीतीरीवाजासाठी वापरत होते. प्रार्थनेपूर्वी हात धुणे, तसेच जेवणाअगोदर हात धुणे याचा परिणाम त्यांना थोडे पाणी त्यावेळेस मिळत असे.

आजची उपासना आपणास हाच संदेश देत आहे की, रीतीरिवाज व कायदे पाळणे हा धर्माचा मध्यभाग नाही, तर देवावरील प्रीती; त्याचबरोबर शेजार धर्मावर प्रीती, हा मध्यभाग आहे. आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना हात न धुता, कणसे खातांना पाहून परुशांना भीती वाटली व ते स्तब्ध झाले. येशू ख्रिस्तामध्ये व परुशांत वाद -विवाद निर्माण झाला. देवाने दिलेले नियम खूप चांगले आहेत व त्याची मानवाला खूप आवश्यकता आहे; कारण नियम हे देवाने मानवाशी असलेले प्रेमळ संबंध व देवाची मानवात असलेली हजेरी किंवा देवाला मानवाशी असलेले अतूट नातं आहे. त्या नियमाद्वारे आपल्याला विश्वासू राहायचं आहे, आणि ते केवळ त्यावर प्रेम करून, कारण देवाचे प्रेम हे मूळ आहे व त्यावर केलेली प्रीति हे त्याचे फळ आहे. देवाचे नियम पाळणे म्हणजे आपण त्याच्याजवळ येणे. आपण आपल्या अंतःकरणापासून त्याच्या जवळ येणे व आपल्या समोर इतरांना त्याच्यासमोर सोबत घेऊन येणे, त्याच्याजवळ देणे. मानवजातीची निर्मिती ही देवाची मानवाला दिलेली फार मोठी देणगी आहे. आणि प्रत्येक मानव एकमेकांविषयी आपुलकीचे नाते संबंध प्रस्थापित करण्यासाठी व त्या त्याला जीवनात ईश्वराचे प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगले व प्रेमळ जीवन जगणे आवश्यक आहे. स्वतःला जपण्यासाठी व इतरांना जपण्यासाठी काही गोष्टी किंवा मार्गदर्शन आपल्याला पाळावी लागतात. पण त्याचा उपयोग मानवाला देवाकडे घेऊन जाण्यासाठी असावा ज्याला केवळ एक सुंदर जीवन जगण्यासाठी, पवित्र जीवन जगण्यासाठी व इतरांना येशू ख्रिस्ताच्या कार्याची दिशा दाखवून त्यांना जीवन देण्यासाठी नियम पाळावे लागतात. जीवनात सुंदर गोष्टी करायच्या असतील तर त्या फक्त हृदयाने घडू शकतात, कारण देव माणसाच्या हृदयाकडे पाहतो, त्याला बाहेरून केलेल्या कृतीवर नाही. विश्वास, आशा, प्रीती ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण त्यामध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. संत जेम्स आपणास आठवण करून देत आहे की, सर्व काही पित्याकडून येते की, त्यांनी आपणास त्याची लेकरे बनवली कारण आपण त्याला प्रेमाने साक्षीदार व्हावे; त्यामुळे आपण फक्त देवाचा शब्द ऐकून पाळणार नाही, तर त्या शब्दाचा वापर कृतीमध्ये करावा व आपल्या जीवनात अंगीकारावा. आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपण देवाने दिलेल्या आज्ञेचा उपयोग अंतरित जीवनासाठी करावा, बाह्यरुपी नाही. आजच्या ह्या मिस्साबलिदानात भाग घेत असताना, आपण निश्चय करूया की, आपण ह्या आज्ञेचा पालन, मानसन्मान करून व त्या आपल्या हृदयात ठेवून त्याला मानवी जीवनाचे कल्याण व त्यांना ईश्वराकडे घेऊन जाण्यासाठी करूया.

 विश्वासू लोकांच्या प्रार्थना

आपले उत्तर:  हे परमेश्वरा आम्हाला मदत कर

१. अखिल ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले परमचार्य पोप फ्रान्सिस व इतर सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी यांना पवित्र       आत्म्याच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करून त्याचा वापर ख्रिस्तसभेसाठी करावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपण आज विशेष करून जे भाविक Covid-19 या विषाणूने ग्रासलेले आहेत. जे हॉस्पिटलमध्ये आहेत, ज्यांना वेळोवेळी उपचार मिळत नाही, अशा सर्वांना देवाने बरे करावेत व त्यांना चांगले आरोग्य द्यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. डॉक्टर्स, नर्सेस ह्यांना परमेश्वराची कृपा मिळावी व त्यांच्याद्वारे लोकांना परमेश्वराचा स्पर्श जाणावा व जे डॉक्टर्स नर्सेस लोकांच्या दबावाखाली घाबरत आहेत, त्यांना योग्य ती शक्ती, सामर्थ्य मिळावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे भाविक लोकांपर्यंत मदतीचा हात देत आहेत. जे या महामारीचा सामना करत आहेत. अशा सर्वांना पवित्र आत्म्याने बळ द्यावे व त्यावर परमेश्वराची कृपा असावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपल्या जीवनाद्वारे आपण इतरांना देवाचे प्रेम व एकमेकांविषयी आदर बाळगावा व त्याद्वारे आपण देवाच्या प्रेमात वाढावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.