Friday, 1 October 2021

                                         
                                 


 Reflection for 27th Sunday in Ordinary Time (03/10/2021) By Bro. Justin Dhavade





सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार

दिनांक – ०३/१०/२०२१

पहिले वाचन:  उत्पत्ती : २:१८-२४

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र २:९-११

शुभवर्तमान: मार्क १०:२-१६

“जे देवाने जोडले आहे, ते मनुष्याने तोडू नये.”



प्रस्तावना

        आज आपण सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची वाचणे आपल्याला देवाने जे पवित्र, पावन व मंगल केले होते ते मानवाने स्वतःच्या स्वार्थापायी, ते पवित्र बंधन त्याने पायळी तुडविले आहे. देवाला प्राधान्य न देता, सैतानाला स्वतःच्या जीवनात प्रथम स्थान दिले; आणि ह्याच कारणास्तव आपण स्वतःच्या जीवनाची राखरांगोळी करून घेतली.

     आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला असे दिसून येते की, परमेश्वराने सर्व काही चांगले ते निर्माण केले व त्यांना नाव ध्यावे ह्याकरिता मनुष्याला त्यांच्यावर परिपूर्ण अधिकार गाजवायला दिला. तसेच आदाम व ऐवेला निर्माण करून परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केले, जेणे करून ते फलद्रूप होतील. दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते की, येशूने मरण सोसल्यामुळे त्याला गौरव व थोरवी प्राप्त झाली. जो पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात येत आहे, ते सर्व एकापासूनच आहेत; हे इब्रीलोकांस पाठवलेल्या पत्रात आपल्याला सांगण्यात येते. आजच्या मार्क लिखित शुभवर्तमानामध्ये परमेश्वर एक अतूट बंधनाविषयी आपल्याला सूचित करत आहे. “जे देवाने जोडले आहे, ते मनुष्याने तोडू नेये.”

     देवाने आपल्याला नर व नारी म्हणून निर्माण करून संपूर्ण जग आपल्या हवाली केले. आपल्याला परीपूर्ण असा आशीर्वाद दिला. जेणे करून आपण देवाच्या सानिध्यात राहू व जगू. जर आपण देवाच्या सानिध्यात राहण्यास व जगण्यास कमी पडलो असले तर परमेश्वराकडे क्षमेची याचना करूया.

मनन चिंतन

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधूनो. अनेकदा आपल्या मनामध्ये विचार येत असतील की, लग्न म्हणजे काय? लग्न हा शब्द नेमका आला तरी कुठून? लग्नानंतर आपल्याला काय मिळते? एकदा एक मुलगा आणि एक मुलगी चांगले मित्र होते. ते एकाच शाळेमध्ये असल्याकारणाने एकमेकांची खूप मदत करायचे. शाळेत एकत्र जाणे, एकत्र अभ्यास करणे, एकमेकांना गृहपाठ करण्यासाठी मदत करणे इतकेच नाही तर परीक्षेच्या वेळी एकमेकांकडून नक्कल करणे, अशा गोष्टींमुळे त्यांची मैत्री ही शाळेमध्ये प्रसिद्ध होती. शाळेनंतर पुढे कॉलेज ही त्यांनी एकत्रच निवडली. त्यांना एकमेकांविषयी खूप आदर आणि जिव्हाळा होता. त्यांची ही मैत्री आता हळू-हळू प्रेमामध्ये बदलत चालली होती. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी भावना होत्या. पण दोघेही एकमेकांना सांगायला घाबरत होते. एके दिवशी दोघांनीही वेलंकनी येथे मरियामातेच्या नेव्हेनाला जाण्याचा निर्णय केला. वेलंकनीला गेल्यावर लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे दोघेही एकमेकांपासून हरवून गेले. दोघांना एकमेकांशिवाय राहायची सवय नसल्याकारणाने दोघेही एकदम अस्वस्थ झाले. दोघांचाही जीव एकदम कासाविस झाला. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. मुलीने जागेवर गुडघे घालून मरियामातेकडे विनंती करण्यास सुरुवात केली. इतक्यात मागून कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती मागे वळून पाहताच तिला तिचे अश्रू अनावर झाले. कारण तिच्या खांद्यावर हात ठेवणारी व्यक्ती हा तिचा हरवलेला मित्रच होता. लागलीच त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि आपल्या मनातील भावना एकमेकांसमोर व्यक्त केल्या. कालांतराने दोघांचे लग्न झाले आणि त्यांनी नवीन जीवनाला सुरवात केली.

वरील गोष्टीमध्ये त्या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम होते हे लक्षात येते. त्या प्रेमाद्वारेच ते भल्यामोठ्या गर्दीमध्ये हरवून सुद्धा एकत्र झाले. परंतु आज आपण समाजामध्ये पाहिले तर, विवाहित जोडपी ही स्वतःच्या घरांमध्येच हरवलेली दिसतात. एकमेकांविषयी प्रेम, आदर भावना ह्या गोष्टी ते हरवून बसलेली आहेत. आज प्रभू येशूख्रिस्त हा आपल्याला पती आणि पत्नी ह्या पवित्र नात्याविषयी बोध देत असताना म्हणत आहे की, पती-पत्नी हे नाते एक पवित्र नाते आहे. लग्न संस्काराद्वारे पती-पत्नी हे दोघे नसून एकात्म झालेली असतात. त्यामुळेच पती आणि पत्नी हे दोघेही एकमेकांसाठी एक जबाबदारी बनत असतात. आजची तिन्ही वाचणे ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यासाठी आमंत्रण करत आहेत. १) मानवाची निर्मिती, २) दुःख आणि मरण, आणि ३) दोन देह आणि एक जीव.

. मानवाची निर्मिती: आपण उत्पत्तीचे पुस्तकांमध्ये वाचतो की, देवाने पहिल्यांदा जगाची निर्मिती केली आणि सर्वात शेवटी मानवाला उत्पन्न केले. मानवाला इतर प्राणीमात्रांवर अधिकार गाजविण्यासाठी नव्हे, तर इतर जीवांची काळजी घेण्यासाठी उत्पन्न केले, याचा अर्थ माणूस हा सर्व प्राणीमात्रांचा रक्षणकर्ता आहे. माणसाच्या निर्मितीनंतर देवाने माणसाच्या फासळीपासून स्त्रीची निर्मिती केली; जेणेकरून ते दोघे एक म्हणून सुखी समाधानी जीवन जगतील.

. दुःख आणि मरण: दुःख आणि मरण, हे आपल्या जीवनातील महत्त्वाचे पैलू आहेत. ह्या  विश्वातील प्रत्येक जीव हा एक ना एक दिवस मरणाला सामोरे जात असतो. हेच जीवनाचे सत्य आहे. प्रभू येशूख्रिस्त हा मरण पावला. परंतु आपल्या मरणाने त्याने मरणावर विजय मिळवला. कारण तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. आपणही आपल्या मरणाद्वारे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये उठले जाणार आहोत. त्यामुळे मरणाला न भिता आपण आनंदाने त्याचा स्वीकार करायला हवा.

. दोन देह एक जीव: लग्न संस्कार हे मानवासाठी एक मोठी जबाबदारी असते. लग्न संस्काराद्वारे पती आणि पत्नी जन्मभरासाठी एक होत असतात. जर एखाद्या वेळी पती-पत्नीमध्ये काही कारणास्तव गैरसमज किंवा भांडण झाले असेल, तर त्याचा निर्णय किंवा निकाल पर्याय हा घटस्फोट नसतो. कुठलीही समस्या ही पती-पत्नीने एकजुटीने समजून घेतल्यास सहजपणे पार पाडता येते. यामुळे कुटुंबामध्ये प्रार्थना ही नेहमी महत्त्वाची असते.

आज आपण देवाची मुले म्हणून नेहमी त्याच्या नियमाप्रमाणे चालावे व त्यासाठी देवाची भरपूर अशी कृपा शक्ती आपणा सर्वांना नेहमी मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद – हे प्रभो, आम्हा सर्वाना सदैव तुझ्या कृपेच्या छायेत राहू दे.

१) परमेश्वराने पवित्र, मंगल नर-नारी बनवली. पण आम्ही आमच्या स्वार्थासाठी, आमच्या स्वतःच्या ‘मी’ पणासाठी हे पवित्र बंधन जे देवाने निर्माण केलेले आहे ते तोडत आहोत. जे देवाने जोडले आहे ते मनुष्याने स्वतःच्या स्वार्थापाही तोडू नये म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

२) येशू ख्रिस्ताने आम्हा सर्वाना प्रकाशाची लेकरे बनवली आहेत. पण आम्ही खोट्या सुखाच्या मोहाला बळी पडून परमेश्वरापासून दुरावले आहोत. त्यामुळे कुटुंबात शांतता नाही. कुटुंबामध्ये संशय व अहंकार भरलेला आहे. तर या पवित्र बलीदानाद्वारे देवाचा व आम्हा सर्वाचा पुन्हा एकदा नव्याने समेत व्हावा म्हणून प्रार्थान करूया.

३) आजच्या युगामध्ये लग्न हा एक प्रकारचा व्यवहार व खेळ झाला आहे. लोक आपसात करार करून स्वतःच्या स्वार्थापही एकत्र राहून पवित्र संस्काराला व देव निर्मितीला जुमानत नाही. त्यामुळे कुटुंबाना व चरण घरपण राहिले नाही. परमेश्वराने त्याच्या कृपेचा वर्षाव आम्हा सर्वांवर करावा जेणे करून आम्ही ख्रिस्ती आहोत याची जाणीव  आम्हला व्हावी म्हणून परमेश्वराकडे याचन करूया.

४) प्रत्येक कुटुंबाचे ख्रिस्तामध्ये नुतनीकरण व्हावे. लेकरांना, आई-वडिलांच्या कष्टाची  जाणीव व्हावी. व त्यांनी आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांनी त्यांचा आधार बनावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

५) आम्ही सर्वजण देवाची मुले आहोत; म्हणून आमच्या समाजामध्ये स्त्री-पुरुष भेदाभेद न होता, प्रेमाने, प्रीतीने प्रार्थानामय जीवन, पवित्र शास्त्राच्या वचनाद्वारे जीवनाचा कायापालट व्हावा, समाजामधील प्रत्येक कुटुंबाने देंवाचा गौरव करावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.




Thursday, 23 September 2021

                                   


   Reflection for 26th Sunday in Ordinary Time (26/09/2021) By Bro. Jeoff Patil 

सामान्य काळातील सव्विसावा रविवार

दिनांक – २६-०९-२०१८

पहिले वाचन – गणना ११:२५-२९

दुसरे वाचन – याकोब ५:१-६

शुभवर्तमान - मार्क ९:३८-४८

“जो आपल्याविरुद्ध नाही तो आपल्याला अनुकूल आहे”.



प्रस्तावना

            आज आपण सामान्य काळातील सव्विसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला ख्रिस्ताच्या कार्यात सहभागी होण्यास आमंत्रण देत आहे.

          आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो कि, देवाने मोशेचे काम हलके करण्यासाठी सत्तर जणांची निवड केली. दुसरे वाचन आपल्याला धन व त्याचा गैरवापर कशाप्रकारे वाईट मार्गाला घेऊन जाऊ शकतो हे स्पष्टपणे सांगत आहे. तसेच आजचे शुभवर्तमान आपल्याला ख्रिस्त हा सर्वव्यापी आहे व त्याचे दर्शन आपल्याला चांगल्या व्यक्तीमध्ये व त्याच्या कार्यामध्ये दिसून येते, हे सांगत आहे.

          दैनंदिन जीवन जगात असताना आपण अनेक लोकांच्या संपर्कात येतो जी निस्वार्थीपने दुसऱ्यांची सेवा करतात. ह्या लोकांच्या कार्याचा कधी-कधी चुकीचा अर्थ काढला जातो. आशा लोकांच्या पाठीही उभे राहून त्यांच्या कार्यास आधार द्यावा व त्याद्वारे ख्रिस्ती लोकांपर्यंत पोहचवण्यास आपणास कृपा मिळावी, म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.   

मनन चिंतन

          “जो आपल्याविरुद्ध नाही तो आपल्याला अनुकूल आहे”. ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो आजची उपासना आपल्याला ख्रिस्ताच्या कार्यात सहभागी होण्यास बोलावत आहे. ख्रिस्ताचे कार्य हे फक्त ख्रिस्ती लोकांसाठीच मर्यादित नाही तर अख्रिस्ती लोकांसाठी सुद्धा आहे. ह्याची जाणीव आपल्याला आजच्या शुभवर्तमानात पाहायला मिळते.

          जेव्हा आपण एकत्र राहत असतो तेव्हा तेथे समस्या उद्भवतात कारण आपल्या बहुतेकजनात मत्सर व राग रुजलेला असतो. एक मनुष्य ख्रिस्ताच्या नावाने भुते काढत होता. कदाचित ह्या मनुष्याने ख्रिस्ताविषयी ऐकले असेल. कारण येशूची ख्याती सर्व ठिकाणी पसरली होती. म्हणून हा मनुष्य येशू हा दैवी रूप आहे, हे जाणून येशूच्या नावाने लोकांस बरे करणे व भुते काढण्यास यशस्वी ठरतो. हे पाहून येशूचे शिष्य थक्क झाले. आपण येशूच्या अधिक जवळ असून सुद्धा लोकांना बरे करण्यास ते असफल ठरले; ह्या गोष्टीची त्यांना लाज वाटली. योहानाने येशूकडे तक्रार केली पण येशूने त्याला सरळ शब्दांत त्याच्या चुकीची जाणीव करून दिली. येशू म्हणाला, “जो आपल्या विरुद्ध नाही, तो आपल्या बरोबर आहे”. ह्याचा अर्थ म्हणजे त्या मनुष्याला लाभलेलं सामर्थ्य हे देवाकडून आहे. देव त्याच्याद्वारे ख्रिस्ताची सुवार्ता पसरवित होता.

          आपण ख्रिस्ती जीवन जगात असतांना आपल्या जीवनात बरे व वाईट बोलणारे लोक भेटतात, कारण मत्सर हे मतभेदाचे मूळ कारण आहे. आपण ख्रिस्तसभेमध्ये नाही तर सर्व ठिकाणी मतभेद करणारे लोक पाहत असतो.

एका गाढवाला झाडाला बांधले होते. एका रात्री भुताने दोरी कापून गाढव सोडले. गाढवाने जाऊन शेतातील पिके नष्ट केली. चिडलेल्या शेतकऱ्याच्या बायकोने गाढवाला दगड घालून ठार केले. या गाढवाचा मालक नुकसानीमुळे उध्वस्त झाला. प्रत्युत्तरादाखल त्याने शेतकऱ्याच्या बायकोला दगड घालून ठार केले. पत्नीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने विळा घेऊन गाढवाच्या मालकाची हत्या केली. गाढवाच्या मालकाच्या पत्नीला राग आला तिने आणि तिच्या मुलांने शेतकऱ्याच्या घराला आग लावली. शेतकऱ्याने आपल्या घराची राख बघून पुढे जाऊन त्या गाढवाच्या मालकाच्या बायकोला आणि मुलाला दोघांना ठार मारले.शेवटी जेंव्हा शेतकऱ्याला वाईट वाटले, तेव्हा तो त्या भुताला म्हणाला "तुझ्यामुळे हे सगळे मेले, तू असं का केलंस?" त्या भूताने उत्तर दिलं "मी कुणालाही ठार मारले नाही, मी फक्त दोरीने बांधलेले गाढव सोडले."

 मत्सर आपल्याला आंधळा बनवू शकतो आणि आपल्याला वाईटाकडे घेऊन जाऊ शकतो. आणि आपल्यामध्ये असलेला चांगुलपणा त्याची वाढ थांबू शकतो. येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे कि, देव हा वाईट व बरे करणाऱ्यावर त्याचा प्रकाश टाकतो. तसेच आपण सुद्धा आपल्या जीवनात ते वाईट व बरे त्याच्यात मतभेद न करता सर्वांवर देवाचे प्रेम द्यायला पाहिजे व ख्रिस्ताची सुवार्ता सर्वत्र पसरवली पाहिजे.

          ख्रिस्ताचे कार्य हे फक्त प्रवचन करणे, बाप्तिस्मा देणे किंवा इतरांना ख्रिस्ती धर्मात आनणे ह्यापुरता मर्यादित नाही, तर त्याही पलीकडे आहे; माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाला माणूस म्हणून वागवणे आहे. जेव्हा एखादी अख्रिस्ती व्यक्ती तहानलेल्या व्यक्तीस पाणी पाजते, रोग्यांना औषध देते, दीन-दुबळ्यांची सेवा करते व दुःखितांचे सांत्वन करते तेव्हा ती व्यक्ती ख्रिस्ताच्या कार्यात सहभागी होते. दुसऱ्या व्हॅटिकन सभेने ख्रिस्ताचे वास्तव्य हे सर्वव्यापी आहे; ह्याची जाणीव अखिल ख्रिस्तसभेला करून दिली आहे. आपल्या ह्या जगात जर देवाचे राज्य प्रस्थापित करायचे असेल तर आपणा सर्वांना एकत्र येऊन देवाचे सेवाकार्य या पृथ्वीवर प्रस्थापित करावे लागेल.

आजच्या शुभवर्तमानातील दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पापी वृत्ती. जर आपला कुठलाही अवयव आपणास पापास प्रवृत्त करत असेल तर तो आपण काढून टाकावा. कारण आपला संपूर्ण नाश होण्याएवजी आपण अपंग स्वर्गात गेलेलं बरे. ह्या व्याक्याचा आपण तंतोतंत अर्थ घेऊ नये तर ह्या वाक्याद्वारे येशू ख्रिस्त आपल्या काय संदेश देत आहे, हे महत्वाचे आहे. आपले शारीरिक अवयव हे आपल्यासाठी जगातील सर्व संपत्तीहून अधिक अनमोल आहेत. म्हणून जर आपल्या अनमोल गोष्टी जर आपल्याला पापांकडे नेत असतील, व ख्रिस्त व आपल्यामध्ये दुरी निर्माण करीत असतील तर त्या पापांचा आपण त्याग करावा. असे येशू ख्रिस्त आपल्याला ह्या वाक्याद्वारे संदेश देतो.

स्वर्गराज्यापेक्षा अधिक महत्वाची दुसरी गोष्ट असू शकत नाही हे आपल्याला येशू ख्रिस्त आजच्या उपासनेत पटवून देत आहे. ख्रिस्ताचे खरे शिष्य बनून त्याचे कार्य करण्यास ईश्वरी प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थाना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

आपला प्रतिसाद – हे प्रभू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. हे परमेश्वरा तुझ्या सेवेत बोलाविलेले आमचे पोप फ्रान्सिस, बिशप्स, फादर्स व सर्व व्रतस्त बंधू-भगिनी ह्यांना तुझे कार्य करण्यास शारीरिक व मानसिक आरोग्य मिळावे. व तुझ्याशी एकनिष्ठ राहून जगाला तुझी ओळख द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. जे लोक देवापासून दूर गेले आहेत. त्या सर्वाना दैवी दयेचा स्पर्श व्हावा व देवाकडे वळून एक नवीन, विश्वासू जीवन जगावे म्हणून प्रार्थना करूया.

3.  जी कुटुंबे दैनिक वादविवादाला बळी पडून मोडकळीस आली आहेत, त्या कुटुंबात शांती नांदावी व प्रेमाला उधान यावे म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

४. जी दापत्ये अजून बाळाच्या देणगीची वाट पाहत आहेत, त्याची प्रार्थना परमेश्वराने ऐकावी व बाळाच्या देणगीने त्याचे जीवन आनंदमय व्हावे म्हणून प्रार्थान करूया.

५. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.


Thursday, 16 September 2021

  Reflection for 25th Sunday in Ordinary Time (19/09/2021) By Bro. Gilbert Fernandes



सामान्य काळातील पंचविसावा रविवार

दिनांक – १९-०९-२०१८

पहिले वाचन – शलमोनचा ज्ञानग्रंथ २:१२;१७-२०

दुसरे वाचन – याकोब  ३:१६,४:३

शुभवर्तमान – मार्क ९:३०-३७


‘जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे.




प्रस्तावना

        आज आपण सामान्य काळातील पंचविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची तिन्ही वाचने आपल्या नितीमत्व, एकाग्रता व नम्रता ह्या मानवी जीवनातील तीन महत्वपूर्ण गोष्टींवर विचार- विनिमय करण्यास बोलावत आहेत.

        शल्मोनाच्या ज्ञानग्रंथातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, जर नीतिमान माणूस देवाचा पुत्र असेल तर देव त्याला सहाय्य करील आणि त्याची शत्रूंच्या तावडीतून सुटका करील. दुसऱ्या वाचनात संत याकोब आपल्याला ह्या जगातील ऐहिक गोष्टींचा मोह न धरता, ख्रिस्ताच्या वचनाचा ध्यास आपल्या जीवनात कसा उतरावा ह्या विषयी उपदेश करत आहे. शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्या शिष्यांना बालकाचे उदाहरण देऊन नम्रतेविषयी धडा देत आहे. प्रभू म्हणतो, “जो कोणी पहिला होऊ इच्छितो त्याने प्रथम सेवक झाले पाहिजे”.  

         मानवी जीवनातील अहंकारपणा किंवा मी-पणा मानवाला ख्रिस्ताकडून व त्याच्या शिकवणुकीतून दूर नेत असतो. ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतीरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण करून आपल्यासमोर नम्रतेचे आणि लीनतेचे उत्तम उदाहरण ठेवले आहे. ह्या पवित्र मिस्साबलीदानामध्ये सहभागी होत असतांना, आपणही ख्रिस्तासारखे नम्र व लीन बनावे व त्यासाठी लागणारी कृपा आपल्याला प्रभुने द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन - शलमोनचा ज्ञानग्रंथ २:१२;१७-२०

            शलमोनचा ज्ञानग्रंथ आपल्याला सांगत आहे की, नीतिमान मनुष्य ह्या त्याच्या चांगल्या कार्यामुळे त्याच्या शत्रूंना सतत अडथळा आणत असतो. व त्या कारणामुळे ते त्याला जीवे मारण्यास तयार असतात. हा नीतिमान मनुष्य इतरांनाही चांगले जीवन जगण्यास आव्हान करीत असतो. परंतु ते त्यांना पटत नाही. त्यांना हे ही माहित असते की, देव त्याच्या सहाय्यास येतो तरीही ते त्याला जीवे मारण्याचा कट रचतात.

            परंतु आपण पुढे पाहतो की, नीतिमान हा त्याच्या चांगल्या कार्यामुळे शाश्वत जीवनास योग्य ठरतो. तो वाईटापासून व ऐहिक मोहापासून दूर राहतो. अशा नीतिमान व चांगल्या लोकांची कसोटी वेळो-वेळी केली जाते; परंतु देवावर पूर्ण विश्वास ठेवल्याने नीतिमान मनुष्याची विरोधकाराच्या तावडीतून सदैव सुटका होत असते. कारण त्याची चांगली कार्ये व सौम्यपणा त्याच्या मदतीला येत असतात.

दुसरे वाचन - संत याकोबाचे पत्र ३:१६,४:३

            संत याकोब आपल्या पत्राद्वारे ख्रिस्ती जनांसमोर खोटे व खरे ज्ञान कुठचे हे सांगतो. मुळात ज्ञान कधीच घमेंड करत नाही. जेथे मत्सर असतो आणि तट-फुटी पाडण्याचा प्रयत्न केलेला असतो, तेथे खरे ज्ञान नसेत. ज्याला ज्ञान म्हटले जाते ते देवापासून नसते, तर ऐहिक जगापासून असते. ते पापी स्वभावापासून व इंद्रियजन्य असते. ते सैतानाने पुरविलेले असते व यामुळे गोंधळ व अव्यवस्था माजते व सर्व प्रकारचे वाईट घडते.

            परंतु जे ज्ञान देवापासून मिळते ते १००% शुद्ध असते. ते पवित्र असते. या ज्ञानाने तट न पडता शांतीची स्थापना होते.

            पुढे संत याकोब म्हणतो, आपण का भांडतो, तर आपणा प्रत्येकामध्ये पापी स्वभाव असतो. या पापी  स्वभावाचे प्रमुख गुणलक्षण “स्वार्थ” हा आहे. आपण सदा आपल्या फायद्याचे पाहतो व त्यामुळे आपल्याला हवे ते मिळत नाही पण जर का आपण निस्वार्थी जीवन जगलो. दुसऱ्याच्या भल्याचे केले तर नक्कीच आपलेही भले होईल.

शुभवर्तमान - मार्क ९:३०-३७

            मार्क लिखित शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशू पुन्हा एकदा आपल्या मरणाविषयी शिष्यांना सांगत आहे. व नेहमी प्रमाणे शिष्यांना काही समजत नाही. आपण पाहतो की, येशूला त्यांच्या मरणाची पूर्व खबर होती व तो आपल्या शिष्यांना त्यासाठी तयार करीत होता. येशूला माहिती होते की, आपले राज्य इथले नाही तर स्वर्गाचे आहे. परंतु शिष्यांना ह्याची जाणीव होत नाही व ते येशूचे राज्य इथले  समजतात व त्या अनुशंगात ते स्वःताच्या मोठेपणाची चर्चा करतात.

            परंतु येशू त्यांचा गैरसमज दूर करतो व सांगतो, देवाच्या राज्यात जो अधिकार गाजवितो तो मोठा असतो असे नाही तर मोठा तो असतो जो स्वतःला दुसऱ्याच्या सेवेसाठी नमवितो. पुढे येशू त्यांना लहान बालकाचे उदाहरण देतो. बालके हे स्वभावाने निर्मळ, स्वाभिमानी व वागण्याने नितळ असतात. ह्यास्तव जो कोणी बालकाप्रमाणे आपल्या जीवनात स्वाभिमान व नितळपणा ह्यांचा स्विकार करतो, तो ख्रिस्ताचाच नव्हे तर ज्याने ख्रिस्ताला पाठवले आहे त्याचा स्विकार करतो.

मनन चिंतन:

            आजचे आधुनिक जग हे जाहिरातीचे, प्रसारमाध्यमाचे व तत्वज्ञानाचे युग आहे. सर्वत्र जो तो मान-सन्मान, प्रतिष्ठा, मोठेपणा ह्याच्यामध्ये गुंफलेला आहे. जीवनात आपण कसे होऊ व नव-नवीन उच्च पदवीस्थाने कसे मिळवू? ह्यामध्ये गुरफटत चालला आहे. खरे पाहिले तर हा जगाचा नियम आहे. जगाच्या निर्मितीपासूनच ह्या नियमाची जोड जगाला लागली होती, येशू ख्रिस्ताचे शिष्य ह्या अस्तित्वाला निराळे होते असे नाही. संत मार्कच्या शुभवर्तमानात ऐकल्याप्रमाणे येशूचे शिष्य आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण? ह्याविषयी चर्चा करीत होते. तेदेखील मान-सन्मानमोठेपणा ह्यामध्ये गुंफून गेलेले होते.

        शिष्यांना ठाऊक होते कि, येशू ख्रिस्त ज्याने इतके चमत्कार केले आहेत तो सर्वसामान्य मनुष्य नसून एक दैवी मानव आहे. तो एक चमत्कारी असून त्याच्याठायी दैवी शक्ती आहे. त्याचे गौरवशाली राज्य प्रस्थापित करण्यासाठी तो ह्या जगात अवतरला आहे. त्या वैभवशाली राज्याचे भागीदार होण्यासाठी, वारस होण्यासाठी त्याने आमची निवड केली आहे. एक दिवस आम्हांला सुद्धा मान-सन्मान, प्रतिष्ठा गाठता येईल.

        परंतु आजच्या शुभवर्तमानाद्वारे ख्रिस्त त्यांना नम्रतेचा व लीनतेचा धडा शिकवत आहे. “जो कोणी तुम्हांमध्ये उच्च होऊ इच्छितो, त्याने सर्वांचा सेवक बनावे”.

        जीवनात यशस्वी होणे किंवा कोणतेही उच्च पद मिळविणे हे मुळीच चुकीचे नाही. देवाने दिलेल्या देणग्यांचा वापर करूनच आपण जीवनात यशस्वी बनत असतो. पण अनेक वेळा आपल्याला, आपल्या यशस्वीपणाचा अहंकार चढतो. आपण दुसऱ्याला विसरतो. दुसऱ्याकडे दुर्लक्ष करतो. संकटकाळी त्यांच्या मदतीला पाठ फिरवत असतो. अशा ह्या ‘मी’ घटक वृत्तीला बळी न पडण्यासाठी जीवनात नम्र व लीन राहणे आवश्यक आहे. 

        येशू ख्रिस्ताने शुभवर्तमानात आपला संदेश, आपली शिकवणूक स्पष्ट करण्यासाठी अनेक अशा वृतांचा, दाखल्यांचा व चिन्हांचा वापर केला आहे. आजच्या शुभवर्तमानात देखील त्याने ‘बालकाचे’ उदाहरण त्याच्या शिष्यांसमोर ठेवल्याचे आपण पाहतो. छोटी मुले ही मनाने नितळ व शुद्ध असतात. त्यांच्यात कुभावना कदापि नसते. कोण मोठा व कोण छोटा असा भेदभाव ते कदापि करत नसतात. बालकांप्रमाणे नितीमान, नितळ शुद्ध, प्रेमळ होण्यासाठी ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना पाचारले होते. ते जगातील राज्याचे शिष्य नसून, स्वर्गीय राज्याचे शिष्य होते. ह्याची जाणीव ख्रिस्ताला आपल्या शिष्यांना करुन द्यायची होती.

          आजचे शुभवर्तमान आपल्याला नम्रतेने आणि लीनपणे जीवन जगण्यास बोलावीत आहे. स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जीवन जगणे खूप महत्वाचे आहे. एके दिवशी एक माणूस देवाला म्हणाला, “देवा, मला स्वर्ग आणि नरक कसे आहेत हे जाणून घ्यायचे आहे. देवाने त्या माणसाला दोन खोल्या दाखविल्या पहिल्या खोलीच्या मध्यभागी एका मोठ्या टेबलावर स्वादिष्ट अशा रस्स्याने भरलेले पातेले होते. पण त्या टेबलाभोवती बसलेले लोक पातळ आणि आजारी होते. त्यांच्याकडे लांब हाताचे चमचे होते. त्या चमच्यांनी तो रस्सा घेणे त्यांना शक्य होते. परंतु त्या चमच्यांनी भरलेला रस्सा त्यांच्या स्वतःच्या तोंडाजवळ आणणे त्यांना अशक्य होते. हे त्यांचे दुःख पाहून तो माणूस थरथरला. देव त्याला म्हणाला हे तू नरक पहिले. मग देव त्याला माणसाला दुसऱ्या खोलीत घेऊन गेला. त्या खोलीत सुद्धा एका मोठ्या टेबलावर स्वादिष्ट अशा रस्स्याने भरलेले पातेलं होतं, पण त्या टेबलाभोवती बसलेले लोक चांगले आणि सदृढ होते त्यांच्याकडे सुद्धा लांब हाताचे चमचे होते, परंतु ते स्वतःन तो स्वादिष्ट रस्सा न पिता दुसऱ्यांना भरवत होते. हे सर्व दृश पाहून तो माणूस आश्चर्यचकित झाला. देवा त्याला म्हणाला, हे तू स्वर्ग पाहिले आहे. नरकातील लोक स्वतःचा विचार करत होते. ते स्वार्थी वृत्तीचे होते. याउलट स्वर्गातील लोक दुसऱ्यांचा विचार करत होते. ते निस्वार्थी होते.  

आपले जीवन हे निःस्वार्थीपणे दुसऱ्यांच्या सेवेसाठी वापरणे गरजेचे आहे. आज आपल्या समोर संत मदर तेरेजा, संत मॅक्सिमिलीयन कोलबे ह्यांसारखे अनेक आदर्श आहेत; ज्यांनी आपले संपूर्ण जीवन दुसऱ्यांच्या सेवेसाठी व उद्धारासाठी पणाला लावले. आज त्यामुळे ते संत म्हणून गणले जातात. त्यामुळेच जर का आपल्याला सुद्धा श्रेष्ठ व्हायचे असेल तर आपण सुद्धा आपल्या जीवनात निस्वार्थी वृत्तीने व नम्रपणे इतरांची सेवा करण्यास झटावे व त्यासाठी लागणारी कृपा परमेश्वराने आपल्याला द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे प्रभू आम्हाला तुझ्यासारखे नम्र बनव.

१) आपल्या ख्रिस्तसभेत अखंडरीत्या कार्य करणारे परमगुरु, महागुरू, धर्म-गुरु आणि धर्म-भगिनी व इतर सर्व ख्रिस्ती-बांधव जे देवाचे कार्य पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने ख्रिस्तामध्ये नम्र होऊन करत आहेत, या सर्वांना देवाने चांगले व निरोगी आरोग्य बहाल करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक लोक रस्त्यावर आलेले आहेत, त्यांची पुष्कळ अशी हानी झाली आहे. ह्या सर्वांना प्रभूने दिलासा द्यावा व त्यांना नव्याने जगण्यास प्रेरणा मिळावी म्हणून, आपण प्रार्थना करूया.

३) जे लोक आजारी आहेत अश्यांना प्रभूचा प्रेमदायी स्पर्श व्हावा व त्यांना त्यांचा आजार सहन करण्यास सहनशीलता व शक्ती मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी कार्य करणारे आपले राजकीय पुढारी व नेत्यांनी नम्रता हा गुण अंगी बाळगून देशाच्या हितासाठी कार्यरत रहावे व जनतेच्या कल्याणासाठी निःस्वार्थीपणाने झटावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.